|
॥ श्रीरामचरितमानस ॥ (मराठी अनुवाद) ॥ अयोध्याकाण्ड ॥ अध्याय २१ वा ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥ Download mp3 तीर्थराजिं तैं स्नाना करुनी । सहित समाज मुनिस शिर नमुनी ॥ दो० :- करित जाति छा जलद सुखद वहत वर वात ॥ ( उजाडल्यावर) तीर्थराज - प्रयागात स्नान केले व सर्व समाजासहित मुनींना नमस्कार करुन, त्याची आज्ञा व आशीर्वाद मस्तकी धारण करुन, मग दंडवत नमस्कार केला व पुष्कळ विनंती केली ॥ १-२ ॥ उत्तम वाटाड्यांना व सर्व लोकांना ( आपला समाज) बरोबर घेऊन चित्रकूटावर लक्ष लाऊन निघाले ॥ ३ ॥ रामसख्याचा गुहाचा हात आधाराला धरुन असे चालत आहेत की जणूं अनुरागाने देह धारण केला आहे ॥ ४ ॥ डोक्यावर छाया नाही व पायांत पादत्राण नाही, प्रेमाच्या नेमात व सेवकधर्माच्या व्रतात कपट नाही ॥ ५ ॥ लक्ष्मण, राम व सीता यांच्या प्रवासाची कहाणी रामसख्याला विचारीत आहेत व ते मृदु भाषणाने सांगत आहेत ॥ ६ ॥ रामवासाचे स्थळ वृक्ष इ. पाहतांच अनुराग हृदयांत शोधूनही रहात नाही. ॥ ७ ॥ ही प्रेम दशा पाहून देव पुष्पवृष्टी करु लागले भूमी मृदु झाली व मार्ग मंगलमूल झाला ॥ ८ ॥ सजल मेघ छाया करित जाऊ लागले व सुखदायक ( शीतल, मंद, सुगंधी) सुंदर वारा वाहू लागला, जात असता भरतास मार्ग जसा सुखकारक होत आहे तसा राम स्वत: जात असता त्यांना झाला नाही ॥ दो० २१६ ॥ पथिं जड चेतन जिव बहु नाना । ज्यां बघती प्रभु दिसले ज्यांना ॥ दो० :- प्रभु संकोची प्रेमवश प्रेम-पयोनिधि भाइ ॥ मार्गात ( आजू बाजूस) असणारे पुष्कळ व नाना प्रकारचे जड व चेतन जीव आहेत व ज्यांना प्रभूंनी पाहीले किंवा प्रभू ज्यांना दिसले ॥ १ ॥ ते सर्व त्यावेळीच परम पदाचे अधिकारी झाले व आता भरतांनी त्यांस पाहताच त्यांचा मोठा ( महान) भवरोगच नाहीसा झाला ॥ २॥ पण यात भरतांचे मोठे महत्व आहे असे नाही, कारण त्यांचे स्मरण राम ( स्वत:) आपल्या मनात करीत असतात ॥ ३ ॥ जे एकदाच ‘ राम ’ म्हणतात ते सुद्धा स्वत: ( भवसागर) तरुन इतरांस तारक होतात ॥ ४ ॥ भरत तर रामचंद्रांना प्रिय आणि त्यांचे धाकटे भाऊ, मग त्यांना मार्ग मंगलदाता का होणार नाही ? ॥ ५ ॥ असे सिद्ध साधु व मुनीवर म्हणू लागले व भरतास निरखून पाहून ते आपले हृदय आनंदाने भरु लागले ॥ ६ ॥ भरताचा प्रभाव पाहून सुरेशाला चिंता लागली ! सज्जनाला जग सज्जन वाटते व नीचाला नीच वाटते ॥ ७ ॥ तेव्हा इंद्र गुरुला म्हणाला, की प्रभू ! जेणे करुन राम-भरत-भेट होणारच नाही असे करावे ॥ ८ ॥ ( कारण) प्रभु संकोची ( भिडस्त स्वभावाचे) व प्रेमाला वश होणारे आहेत व रामबंधु भरत तर प्रेमाचा ( क्षीर) सागरच आहे, म्हणून काहीतरी ( कपट) युक्ती साधून यत्न करावा, नाहीतर आत्तापर्यंत साधलेले सर्व फुकट जाणार ॥ दो० २१७ ॥ सस्मित सुरगुरु परिसुनि वचना । गणिति अलोचन सहस्रनयना ॥ दो० :- मनिंहि न आंआ अमरपति रघुवर-भक्त-अकाज ॥ सुरेशाचे म्हणने ऐकून सुरगुरुंनी स्मित केले व त्यांना वाटले की त्याला हजार नेत्र असुन नेत्रविहीन आहे ॥ १ ॥ ( ते म्हणाले) सुरराजा ! मायापतीसेवकाशी कपटाचा प्रयोग केल्यास ती करणारांवर उलटते ॥ २ ॥ त्यावेळी जे काही केले ते रामाची रुची पाहून जाणून केले आता कुचाळी केली तर ( तुमचीच) हानी होईल ॥ ३ ॥ सुरेशा ऐक ! रघुपतीचा असा स्वभाव आहे की त्यांचा स्वत:चा अपराध केल्याने त्यांना कधी क्रोध येत नाही ॥ ४ ॥ पण जे भक्तांचे अपराध करतात ते रामाच्या शोकरुपी पावकात जळतात ॥ ५ ॥ लोकांमध्ये व वेदामध्ये हा इतिहास प्रसिद्ध आहे व हा महिमा दुर्वास ऋषींना चांगला माहीत आहे ॥ ६ ॥ भरतासारखा रामस्नेही कोणी आहे कां ? जग ‘ राम ’ नामाचा जप करते पण राम ज्यांच्या नांवाचा जप करतात ( असे भरत महान आहेत) ॥ ७ ॥ अमरपति ! रघुवरभक्ताचे अकार्य करण्याचे कधी मनांत सुद्धां आणू नका ( तसे कराल तर) सर्व लोकांत अकीर्ती व परलोकांत सुद्धा दु:खच भोगावे लागेल व दिवसे दिवस शोकाची वृद्धीच होत जाईल ॥ दो० २१८ ॥ श्रुणु सुरेश मम उपदेशाला । परम-प्रिय सेवक रामाला ॥ दो० :- रामभक्त परहित निरत परमदुख दुखी दयाल ॥ सुरेश ! आमचा उपदेश ऐक - रामाला आपला सेवक परम प्रिय वाटतो ॥ १॥ रामसेवकाची सेवा केल्याने राम सुखी होतात आणि रामसेवकाशी वैर केले तर राम अधिक वैर करतात ॥ २ ॥ जरी प्रभु सर्वांशी समानच असतात त्यांच्या ठिकाणी आसक्ती व क्रोध नाही, ते कोणाचे पापपुण्य वा गुणदोष घेत नाहीत ॥ ३ ॥ कारण त्यांनी या विश्वाला कर्म प्रधान करुन ठेवले आहे व जो जसे कर्म करतो तो तसे फळ चाखीत असतो ॥ ४ ॥ तरीसुद्धा ते भक्त किंवा अभक्त यांच्या हृदयानुसार सम - विषम - विहारलीला करीत असतात भक्तांवर अपार प्रेम करतात. ॥ ५ ॥ अगुण, अलिप्त, अप्रमेय सदा एकरस असे जे राम तेच भक्तांच्या प्रेमाला वश होऊन सगुण होतात झाले आहेत ॥ ६ ॥ राम सदा सेवकाची आवड पुरवितात अशी वेद, पुराणे, साधु व देव साक्ष देत असतात ॥ ७ ॥ हे मनात नीट जाणून भरताशी कुटिलपण सोडा व भरतचरणी सुंदर निष्कपट प्रीती करा ॥ ८ ॥ रामभक्त दुसर्यांचे व शत्रूंचेही हित करण्यात सदा रत असतात, कारण ते दयालु व परदु:खाने दु:खी होणारे आहेत. भरत तर रामभक्त शिरोमणी आहेत म्हणून सुरपाल ! त्यांचे भय मुळीच बाळगूं नका ॥ दो० २१९ ॥ सत्यसंघ प्रभु सुरहितकारी । भरत हि रामाज्ञा-अनुसारी ॥ दो० :- रघुवर वर्ण बघून वर वारि समेत समाज ॥ प्रभु सत्यप्रतिज्ञ असून सुरांचे हितकर्ते आहेत. आणि भरत रामाच्या आज्ञेनुसार वागणारे आहेत ( म्हणून राम परत जातील अशी भीती भरतामुळे बाळगण्याचे काही कारणच नाही) ॥ १ ॥ तुम्ही मात्र स्वार्थाला विशेष बळी पडून व्याकुळ झाला आहांत यात भरताचा दोष नसून तुम्हाला मोह वा भ्रम झाला आहे ॥ २ ॥ सुरवराने आपल्या गुरुवरांची वर ( सुंदर ! श्रेष्ठ) वाणी ऐकली व त्याची ग्लानी नष्ट होऊन तो प्रमुदित झाला ॥ ३ ॥ सुरपतीने हर्षित होऊन पुष्पवृष्टी केली व तो भरताचा सुस्वभाव वाखाणू लागला ॥ ४ ॥ अशा प्रकारे भरत मार्गाने चालत जात आहेत त्यांची ती दशा पाहून सिद्ध व मुनी ईर्षेने त्यांची प्रशंसा करीत आहेत ॥ ५ ॥ राम असा उच्यार करीत ज्यावेळी दिर्घ श्वास घेतात त्यावेळी जणूं चारी दिशांना प्रेमाला पूर येतात ॥ ६ ॥ तो ध्वनी ऐकून वज्र व पाषाण यांना सुद्धा पाझर फुटूं लागले, व पुरवासी लोकांचे प्रेम तर वर्णन करुन सांगता येत नाही ॥ ७ ॥ मध्ये एक वस्ती करुन यमुनेजवळ आले व ते नीर ( पाणी) पाहून भरतांने डोळे पाण्याने भरले ॥ ८ ॥ रघुवराच्या वर्णाचे ते सुंदर पाणी पाहून समाजासहीत विरह सागरात बुडत असता भरताने विवेक रुपी जहाजाचा आधार घेतला ( व ते त्यात बसले) ॥ दो० २२० ॥ श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु |