समाप्तम्

॥ श्रीरामचरितमानस ॥

(मराठी अनुवाद)

॥ उत्तराकाण्ड ॥

॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥


अध्याय १६ वा



Download mp3

कथित नाथ हरिचरित्र अनुपम । व्याससमासें यथा बुद्धि मम ॥
उरगारी ! हा श्रुति सिद्धान्त हि । राम भजा भुलुनी सब काजहि ॥
भज्य कोण तजुनी प्रभु रघुपति । ज्याची ममता शठिं मजशा अति ॥
तुम्हिं विज्ञानरूप नहि मोहो । नाथ ! कृपाकृत मजवर अति हो ! ॥
पुसिली रामथा अति पावनिं । शुकसनकादि शंभुमनभावनि ॥
सत्संगति दुर्लभ संसारां । निमिष घडीभर एकहि वारां ॥
बघा गरुड ! निज हृदिं सुविचारीं । मी रघुवीर भजन अधिकारी ! ॥
शकुनाधम सबरीतिं अपावन । प्रभु मज करिति विदित जग पावन ॥

दो० :- आज धन्य मी धन्य अति सर्वपरीं जरि हीन ॥
संतसमागम राम दे जाणुनि निज जन दीन ॥ १२३रा ॥
नाथ ! यथामति कथित मी कांहीहि न गोपोनि ॥
चरितसिंधु रघुनायक ठाव किं पावे कोणि ॥ १२३म ॥

उपसंहार प्रकरण – (भुशुंडी गरुडास म्हणाला) हे नाथ ! मी आपल्या बुद्धीप्रमाणे काही विस्ताराने व काही संक्षेपाने अनुपम रामचरित्र सांगीतले ॥ १ ॥ हे उरगारी ! हा श्रुतीचाच सिद्धान्त आहे की सर्व कामकाज भुलून राम भजावा ॥ २ ॥ माझ्या सारख्या अति शठावर ज्यांची ममता आहे त्या प्रभु रघुपतीला सोडून कोण भजण्यास योग्य आहे ? (कोणीही नाही). ॥ ३ ॥ तुम्ही विज्ञानरुप आहांत, तुमच्या ठिकाणी मोह नव्हताच, परंतु अहो नाथ ! तुम्ही माझ्यावर अति कृपा केलीत. ॥ ४ ॥ शुक, सनकादि, व शंभू यांच्या मनाला आवडणारी अति पावन रामकथा तुम्ही विचारलीत ॥ ५ ॥ या संसारात एक घटकाभर, क्षणभर, एकवेळचीही संतसंगती दुर्लभ आहे ॥ ६ ॥ अहो गरुड ! आपण आपल्या हृदयात सुविचाराने जरा पहा की मी रघुवीर भजनाचा अधिकारी आहे कां ? ॥ ७ ॥ मी सर्व पक्ष्यांमध्ये अधम, सर्व प्रकारे अधम आणि अपवित्र असून प्रभूंनी मला पावन करुन जगात प्रसिद्ध केला ॥ ८ ॥ जरी मी सर्व प्रकारे हीन असलो तरी आज मी धन्य झालो, अति धन्य झालो, कारण की श्रीरामचंद्रांनी दीन निजदास जाणून संत समागम दिला ॥ दो० १२३ रा ॥ हे नाथ ! मी यथामति सर्व सांगीतले काही सुद्धा गुप्त ठेवले नाही, रघुनायकाचे चरित्र हा एक सागर आहे. त्याचा ठाव कुणी पावू शकेल कां ? (शक्यच नाही) ॥ दो० १२३ म ॥

स्मरुनि रामगुणगणांस नाना । घडि घडि हर्ष भुशुंडि सुजाणा ॥
नेति नेति महिमा श्रुति वर्णित । प्रभुता प्रताप बलही अतुलित ॥
शिव अज पूज्य चरण जे रघुवर । कृपा परम मृदुलता किं मजवर ॥
कुठें स्वभाव न हा श्रुत देखूं । कुणा खगेश राम सम लेखूं ॥
साधक सिद्ध विमुक्त उदासी । कवि कोविद कृतज्ञ संन्यासी ॥
शूर सुतापस योगी ज्ञानी । धर्मनिरत पंडित विज्ञानी ॥
तरति न सेवेविण मत्स्वामी । राम नमामि नमामि नमामी ॥
शरण जात मजसे अघराशी । होति शुद्ध नमामि अविनाशी ॥

दो० :- यस्य नाम भवभेषज घोर हरी त्रय शूल ॥
तो कृपालु मज तुजवरी असो सदा अनुकूल ॥ १२४रा ॥
श्रवुनि भुशुंडीवचन शुभ प्रभुपदिं बघुनी स्नेह ॥
प्रेमसहित वदला गिरा गरुड विगत संदेह ॥ १२४म ॥

श्रीरामचंद्रांच्या अनेक गुणसमूहांचे स्मरण होऊन सुजाण भुशुंडीला वारंवार हर्ष झाला. ॥ १ ॥ नेति नेति म्हणून वेद महिमा वर्णन करीत असतात आणि प्रभुता, प्रताप आणि बल (इ. सर्वच) अतुलनीय आहेत. ॥ २ ॥ ज्या रघुनायकाचे चरण शिव व ब्रह्मदेव यांच्याकडून पूजले जातात, त्याची माझ्यावर परम कृपा झाली ही त्यांची परम कोमलता होय. ॥ ३ ॥ अहो खगराज ! असा स्वभाव कुठे कोणाचाही ऐकला नाही, दिसत नाही, मग मी कोणाला रघुपतीसमान लेखू ? ॥ ४ ॥ साधक, सिद्ध, विमुक्त, विरागी, कवी, कोविद, कृतज्ञ, संन्यासी, शूर, उत्तम तपस्वी योगी, ज्ञानी, धर्मशील, पंडित आणि विज्ञानी (इत्यादि कोणीही असोत) ॥ ५-६ ॥ ते माझ्या स्वामीची सेवा=भक्ती न करता भवसागर तरणे शक्य नाही. हे रामा, मी तुला पुन:पुन्हा, वारंवार नमस्कार करतो ॥ ७ ॥ ज्यांना शरण जाताच माझ्यासारखे पापांचे पर्वत, पाप-सागर शुद्ध होतात त्या अविनाशी रामचंद्रांस मी नमन करतो. ॥ ८ ॥ ज्याचे नामच भवरोगाचे औषध आहे व जे महाघोर त्रिविध तापांचा नाश करते तो कृपालु प्रभु रामचंद्र सदा माझ्यावर व तुझ्यावर प्रसन्न असो. ॥ दो० १२४ रा ॥ भुशुंडीचे शुभ वचन ऐकून व श्रीरामप्रभूंच्या चरणीं त्याचा स्नेह पाहून, अगदी संदेह मुक्त झालेला गरुड प्रेमाने भाषण करु लागला ॥ दो० १२४ म.॥

मज कृतकृत्य करी तव भाषण । जे रघुवीर भक्तिरस मिश्रण ॥
रामचरणिं नव रति उपजली । माया जनित विपद नासली ॥
मोह जलधिं जहाज जाहलां । दिधलें नाथ ! विविध सुख मला ॥
मज करवे ना प्रत्युपकारा । पाया पडतो वारंवारां ॥
पूरितकाम राम अनुरागी । कुणि न तुम्हांसम तात सुभागी ॥
संत विटप सरिता गिरि धरणी । सर्वांची परहितार्थ करणी ॥
संत हृदय लोण्यासम वदले । जे कवि त्यांना मर्म न कळलें ॥
निज परितापें द्रव नवनीता । द्रव परदुःखिं सुपावन संतां ॥
माझें जीवन जन्म हि सुफलित । तव प्रसादें संशय सब गत ॥
समजा सदा मजसि निज किंकर । धडि घडि उमे ! वदे विहंगवर ॥

दो० :- त्याचे पदि शिर नमवुनि प्रेमानें मतिधीर ॥
वैकुंठा गेला गरुड हृदयिं धरुनि रघुवीर ॥ १२५रा ॥
गिरिजे ! संत समागम सम न लाभ जगि आन ॥
तो न मिळे हरिकृपेविण गाती वेद पुराण ॥ १२५म ॥

श्रीरघुवीराच्या भक्तीरुपी रसाचे मिश्रण असे जे तुमचे भाषण त्यामुळे मी कृतकत्य झालो ॥ १ ॥ श्रीरामचरणी नवीन द्दढप्रीती उदभवली व मायेपासून निर्माण झालेली विपत्ती नष्ट झाली ॥ २ ॥ अहो नाथ ! मला मोहसागरातून तारुन नेण्यास तुम्ही जहाज झालांत आणि मला विविध प्रकारचे सुख दिलेत ॥ ३ ॥ मला तुमच्या उपकारांची फेड करता येणे शक्य नाही मी तुमच्या वारंवार पाया पडतो ॥ ४ ॥ हे तात ! तुम्ही पूर्णकाम असून तुमच्या सारखा रामावर प्रेम करणारा कोणी नाही आणि तुमच्यासारखा महा भाग्यवान कोणी नाही. ॥ ५ ॥ संत, वृक्ष, नदी, पर्वत, धरणी या सर्वांची कृती दुसर्‍यांच्या हितासाठीच असते ॥ ६ ॥ संतांचे हृदय लोण्यासारखे असते असे जे कवी म्हणाले त्यांना मर्म कळलेच नाही ॥ ७ ॥ लोणी स्वत:च्याच उष्णतेने वितळते पण अति पवित्र संत दुसर्‍यांच्या दु:खाने द्रवतात. ॥ ८ ॥ तुमच्या कृपा प्रसादाने माझे सर्व संशय नष्ट झाले ॥ ९ ॥ आता मला आपण आपला नित्य दास समजा (एवढीच विनंती आहे) उमे ! खगश्रेष्ठ गरुड असे पुन:पुन्हा म्हणाला ॥ १० ॥ त्या काकाच्या चरणांवर प्रेमाने मस्तक नमवून धीरमति गरुड रघुवीरास हृदयात धारण करुन वैकुंठास गेला ॥ दो० १२५ रा ॥ (शंकर सांगतात) गिरीजे ! या जगात संतसमागमासारखा दुसरा लाभ नाही, पण तो हरिकृपेवाचून मिळत नाही असे वेद पुराणे वर्णन करतात. ॥ दो० १२५ म. ॥

कथित परम पुनीत इतिहास । श्रवत कानिं सुटती भवपाश ॥
प्रणत कल्पतरु करुणापुंजीं । उपजे प्रीति रामपदकंजीं ॥
मन कृति वचन जनित अघ भंजन । श्रवति कथा लावुनि जे श्रुति मन ॥
तीर्थाटन नाना साधन गण । योग विरक्ती ज्ञान निपुणपण ॥
कर्म धर्म नाना व्रत दानें । शम दम जप तप यज्ञ साधनें ॥
द्विजगुण सेवा भूतसदयता । विद्या विनय विवेक महत्ता ॥
साधन जितकें श्रुति वाखाणी । सर्वांफल हरिभक्ति भवानी ॥
श्रुति गीता रघुनाथ भक्ति ते । रामकृपें कुणि एका मिळते ॥

दो० :- मुनि दुर्लभ हरिभक्ति नर पावति नाना प्रयास ॥
जे ही कथा निरंतर ऐकति युत विश्वास ॥ १२६ ॥

मी हा परम पुनीत इतिहास सांगीतला तो कानाने श्रवण केल्याने भवपाश सुटतात ॥ १ ॥ शरणागतांचा कल्पतरु आणि करुणेचा सागर जे श्रीराम त्यांच्या पदकमलीं प्रीती उत्पन्न होते. ॥ २ ॥ (कारण) जे ही कथा कान व मन लावून ऐकतात त्यांचे कायिक वाचिक मानसिक पाप नष्ट होते. ॥ ३ ॥ तीर्थाटन आणि विविध साधनांचे समुदाय (उदाहरणार्थ) योग, वैराग्य, आणि ज्ञान यात निपुणता ॥ ४ ॥ अनेक कर्म, धर्म, अनेक व्रते-दाने, मनोनिग्रह, इंद्रियनिग्रह, जप, तप व विविध यज्ञ यागादि साधने ॥ ५ ॥ विप्रसेवा, गुरुसेवा, भूतांवर दया करणे, विद्या विनय आणि विवेक यांची महती ॥ ६ ॥ इत्यादि जितकी साधने वेदांनी वर्णिली आहेत त्या सर्वांचे अंतिम फळ हे भवानी ! हरीभक्तीच आहे. ॥ ७ ॥ वेदांनी वर्णिलेली ती श्रीरघुनाथाची भक्ती रामकृपेने कोणा एखाद्यास मिळते ॥ ८ ॥ (परंतु) जे नर विश्वासयुक्त होऊन ही कथा निरंतर श्रवण करतात त्यांना मुनीदुर्लभ असलेली ती रघुनाथभक्ती प्रयासांवाचून मिळते ॥ दो० १२६ ॥

तो सर्वज्ञ गुणी तो ज्ञाता । तो महि मंडित पंडित दाता ॥
धर्मपरायण कुलपाता तो । रामचरणिं मन ज्याचें रत तो ॥
नीति निपुण तो परम शहाणा । श्रुति सिद्धान्त सुज्ञ तो जाणा ॥
तो कवि कोविद तो रणधीर । भजे त्यजुनि छल जो रघुवीर ॥
धन्य देश जेथें सुरसरी । ती स्त्री धन्य पतिव्रत करी ॥
धन्य भूप जो नीती पाळी । धन्य विप्र निज धर्म न टाळी ॥
तें धन धन्य चि जया प्रथम गति । धन्य पुण्यरत पावन ती मति ॥
जैं सत्संगति काळ धन्य तो । द्विज भक्ती दृढ धन्य जन्म तो ॥

दो० :- ऐक उमे ! कुळ धन्य तें जगत्पूज्य सुपुनीत ॥
श्री रघुवीर परायण जिथं नर होइ विनीत ॥ १२७ ॥

ज्याचे मन श्रीरामचरणी रत झाले तोच खरा सर्वज्ञ, तोच गुणी, तोच ज्ञानी, तोच पृथ्वीला सुशोभित करणारा, तोच पंडित, तोच दाता, तोच धर्मपरायण आणि कुलाचा रक्षकही खरा तोच. ॥ १-२ ॥ जो छलाचा त्याग करुन रघुवीरास भजतो तोच खरा नीतीनिपुण, तोच परम शहाणा, व त्यानेच श्रुती-सिद्धांत चांगला जाणला हे लक्षात ठेवा. तोच खरा कोविद, आणि तोच खरा रणधीर होय. ॥ ३-४ ॥ सुरनदी गंगा ज्या देशात वाहते तो देश धन्य होय. जी स्त्री पतिव्रताचे पालन करते ती स्त्री धन्य होय. ॥ ५ ॥ जो नीतीचे पालन करतो तो राजा धन्य होय. जो स्वधर्म न टाळता, स्वधर्म निरत राहतो तो ब्राह्मण होय. ॥ ६ ॥ ज्या धनाला दान करणे ही (प्रथम) मुख्य गति मिळते ते धन धन्य होय. जी मति सदा पुण्यरत व पावन असते ती बुद्धी धन्य होय. ॥ ७ ॥ जितका वेळ संतसमागमात जाईल तितका काळ धन्य आहे. आणि ज्या जन्मात द्दढ द्विजभक्ती घडेल तो जन्म धन्य होय. ॥ ८ ॥ हे उमे, ऐक ज्या कुळात श्रीरघुवीर परायण विनम्र मनुष्य उत्पन्न होईल ते कूळ धन्य, सर्व जगात पूज्य व अति पवित्र होय. ॥ दो० १२७ ॥

कथा यथामति मी सांगितली । प्रथम जरी ती गुप्त राखिली ॥
प्रीति अधिक तव मनीं पाहिली । रघुपति कथा तदा मी कथिली ॥
ही न वदावि शठां हठशीलां । श्रवति न लावुनि मन हरिलीला ॥
न वदा लोभी, क्रोधि, कामिला । जे न भजति अग जगत्स्वामिला ॥
द्विजां द्रोहि त्या कधिं न वदा ही । सुरपति सम जरि नृप असला ही ॥
राम कथेचे ते अधिकारी । सत्संगति ज्यानां प्रिय भारी ॥
प्रीति गुरुपदीं नीति निरत जे । अधिकारी द्विज सेवारत ते ॥
ही तयास विशेष सुखदायक । प्राणप्रिय ज्या श्रीरघुनायक ॥

दो० :- रामचरणिं रति वांछि जो अथवा पदनिर्वाण ॥
भावसहित तो ही कथा, करो श्रवणपुटिं पान ॥ १२८ ॥

मी ही कथा (इतिहासरुपी) माझ्या बुद्धीप्रमाणे सांगीतली प्रथम जरी मी ही गुप्त ठेवली होती तरी तुझ्या मनातील (रघुनाथ व कथा विषयक) विशेष प्रीती पाहीली तेव्हा ही रघुपतीकथा तुला सांगीतली ॥ १-२ ॥
अनधिकारी कोण ? - ही कथा शठांना, हट्टी स्वभावाचे असतील त्यांना आणि जे हरीलीला मन लावून ऐकत नाहीत त्यांना सांगू नये ॥ ३ ॥ जे लोभी, क्रोधी, कामी असतील आणि जे स्थावर जंगमात्मक जगाच्या स्वामीला – रघुपतीला भजत नाहीत, त्यांना ही कथा सांगू नये ॥ ४ ॥ आणि ब्राह्मणांचा द्रोह करणारा जरी इंद्रासारखा राजा असला तरी त्याला सुद्धा ही कथा सांगू नये ॥ ५ ॥
अधिकारी कोण ? – ज्यांना संतसंगती अत्यंत प्रिय असते तेच या रामकथेचे अधिकारी होत. ॥ ६ ॥ ज्यांचे गुरुपदीं प्रेम असेल, जे नीतीपरायण असतील, किंवा जे विप्र सेवातत्पर असतील, ते सुद्धा या रामकथेचे अधिकारी होत. ॥ ७ ॥ ज्याला श्रीरघुनायक प्राणप्रिय असतील त्याला ही कथा विशेष सुखदायक आहे ॥ ८ ॥ ज्याला रामचंद्रांच्या चरणी दृढ प्रेमभक्ती हवी असेल किंवा ज्याला निर्वाणपद (कैवल्य मोक्ष) पाहीजे त्याने प्रेमाने या कथेचे कर्णपुटांनी पान करावे. ॥ दो० १२८ ॥

गिरिजे ! रामकथा कृत वर्णन । कलिमल शमन मनोमल नाशन ॥
संजीवनि मुळि भवरोगा, ती । रामकथा, श्रुति सूरी गाती ॥
रुचिर हिच्यांत सप्त सोपान । रघुपति भक्तीचे पंथान ॥
होते अति हरि कृपा जयावर । पाय देइ तो या मार्गावर ॥
पावति मनकामना सिद्धि ते । त्यजुनि कपट ही कथा गाति जे ॥
श्रवण कथन अनुमोदन करती । ते भवनिधि गोपद इव तरती ॥
श्रवुनि कथा सब हृदिं अति भरली । रुचिर गिरा गिरिजा उद्‍गरली ॥
नाथकृपें मम गत संदेहो । रामचरणिं नव उपजे स्नेहो ॥

दो० :- मी कृतार्थ झाले अतां कृपें तव हि विश्वेश ॥
रामभक्ति दृढ उपजली गेले सगळें क्लेश ॥ १२९ ॥

गिरीजे ! कलिमलांचे शमन करणारी व मनोमलांचा नाश करणारी जी रामकथा तिचे मी वर्णन केले ॥ १ ॥ भवरोगाला नष्ट करणारी जी संजीवनमुळी तीच रामकथा असे वेद व विद्वान लोक वर्णन करतात. ॥ २ ॥ हिच्यात सात सुंदर सोपान आहेत, जे रघुनाथ भक्तीचे मार्ग आहेत. ॥ ३ ॥ ज्यांच्यावर अत्यंत हरिकृपा होते तोच या मार्गावर पाऊल टाकतो. ॥ ४ ॥ जे ही कथा कपट टाकून गातात, त्यांच्या मनातील सर्व कामना सिद्धीस जातात ॥ ५ ॥ जे ही कथा ऐकतात, सांगतात व हिची प्रशंसा करतात ते भवसागर गो पदासारख्या तरतात ॥ ६ ॥ सर्व कथा श्रवण करुन ती पार्वतीला फार आवडली, तेव्हा गिरीजा सुंदर वचन बोलली ॥ ७ ॥ हे नाथ ! आपल्या कृपेने माझे सर्व संदेह गेले आणि श्रीरामचरणी नवीन स्नेह उत्पन्न झाला ॥ ८ ॥ हे विश्वेश्वरा ! मी तुमच्याच कृपेने आता कृतार्थ (कृतकल्प) झाले माझ्या हृदयांत दृढ रामभक्ती उपजली आणि (मोहसंशयजनित) सगळे गेले ॥ दो० १२९ ॥

हा शुभ शंभु उमासंवाद । सुख संपादन शमन विषाद ॥
संदेहां गंजन भवभंजन । हाचि सज्जना प्रिय जनरंजन ॥
राम उपासक जगामधें जे । प्रिय यासम काहीं ना त्यांतें ॥
रघुपति कृपें यथामति गीत । मी हें सुंदर चरितपुनीत ॥
या कलिकालीं दुजें न साधन । योग यज्ञ जप, व्रत तप पूजन ॥
रामचि गाणे स्मरणें राम हि । श्रवणें सतत राम गुण वृंदहि ॥
यस्य पतित पावन बाणा अति । श्रुति पुराण कवि साधू वानति ॥
त्यजुनि कुटिलता तया भज मना । राम भजुनि गति लब्ध न कवणा ॥

छं० :- गति कुणा प्राप्त न पतित पावन राम भजुनी शठ मना ।
गणिका अजामिल मृगयु गृध्र गजादिं तारित खलगणां ॥
आभीर यवन किरात खस चाण्डाल अति अघरूप जे ।
ते नाम सकृदपि वदत पावन होति राम नमामि ते ॥ १ ॥
रघुवंशभूषण चरित हें नर कथिति परिसति गाति जे ॥
कलिमल मनोमल धुउनि अश्रम रामधामीं जाति ते ॥
पांच सात चौपाया मनोहर जाणुनी नर उरिं धरी ।
दारुण अविद्या पंच, जनित विकार श्री रघुवर हरी ॥ २ ॥
सुंदर सुजाण कृपानिधान अनाथिं करतो प्रीती जो ।
तो एक राम अकामहित निर्वाणदायक नान्य तों ॥
ज्याच्या कृपालेशामुळें मतिमंद तुलसीदास ही ।
पावे परम विश्राम तो प्रभु राम, सम कोठें नही ॥ ३ ॥
दो० :- मजसम दीन न, दीनहित सम रघुवीर तुम्हांहि ।
हें जाणुनि रघुवंशमणि भवभय विषम हरा हि ॥ १३०रा ॥
कामि नरा प्रिय नारि जशी लोभी नरा प्रिय दाम ।
मज रघुनाथ ! निरंतर व्हा तसेच प्रिय राम ॥ १३०म ॥
शा.वि.०:- यत्पूर्वं प्रभुणा कृतं सुकविना श्री शंभुना दुर्गमम् ।
श्रीमद्‌रामपदाब्जभक्तिमनिशं प्राप्त्यै तु रामायणम् ॥ १ ॥
मत्वा तद्‌रघुनाथनामनिरतं स्वान्तस्तमः शान्तये ।
भाषाबद्धमिदं चकार तुलसीदासस्तथा मानसम् ॥ १ ॥
पुण्यं पापहरं सदा शिवकरं विज्ञानभक्तिप्रदं ।
मायामोहमलापहं सुविमलं प्रेमाम्बुपूरं शुभम् ॥
श्रीमद्‌रामचरित्रमानसमिदं भक्त्याऽवगाहन्ति ये ।
ते संसारपतंगघोर किरणैर्दह्यन्ति नो मानवाः ॥ २ ॥

हा कल्याणकारण शंभु उमा संवाद विवादाचा नाश करुन सुख प्राप्त करुन देणारा आहे. ॥ १ ॥ हा संदेहांचा नाश करुन भवाचा विनाश करणारा आहे. (म्हणून) संतांना हाच प्रिय वाटतो व हा सर्व लोकांचे मनोरंजन करणारा आहे. ॥ २ ॥ जगामध्ये जे रामभक्त असतील त्यांना या रामचरितमानसा सारखे दुसरे काही प्रिय नाही ॥ ३ ॥ हे सुंदर पुनीत रामचरित्र श्री रघुपतीच्या कृपेने यथामति विस्तार-पूर्वक सांगीतले ॥ ४ ॥ या कलिकालात योग, यज्ञ, जप, व्रत, पूजन इत्यादि दुसरे साधन नाही. ॥ ५ ॥ रामगुणांचेच गान करणे, रामनामाचेच स्मरण करावे आणि सतत श्री रामचंद्रांच्या गुणसमूहाचे श्रवण करावे. ॥ ६ ॥ ज्याचा पतितपावन हा मोठा बाणा आहे असे वेद, पुराण, संत, व कवी वर्णन करतात ॥ ७ ॥ त्याला हे मना ! कुटिलता सोडून शरण जाऊन भजन (भक्ती) कर. रामास भजल्याने कोणास गती नाही मिळाली बरें ? ॥ ८ ॥ (सर्वांना मिळाली – पहा) अरे मूर्ख मना ! पतितपावन श्री रामचंद्रास भजून गति कोणाला नाही मिळाली ? गणिका, अजामेळ, व्याध, गिधाड, गज इत्यादि दुष्टांच्या समूहांना प्रभूंनी तारलेच. आभीर, यवन, किरात, खस, चांडाल इत्यादि जे अति पापरुप असलेले ते सुद्धा एकदाच रामनाम उच्चारल्याने पावन होतात अशा रामा, मी तुला नमस्कार करतो ॥ छंद १ ॥ रघुवंशभूषण श्रीरामचंद्रांचे चरित्र जे कोणी कथन, श्रवण करतील गातील ते कलियुगातील पापरुपी मल व मनो विकाररुपी मल धुवून टाकून रामचंद्रांच्या धामात जातील. (इतकेच कशाला) यातील बारा मनोहर चौपाया जाणून त्यांचे हृदयात ध्यान करतील तर घोर अविद्यापंचक (अविद्या, अस्मिता, रागद्वेष, अभिनिवेश मृत्युभय) आणि त्यापासून उत्पन्न होणारे विकार श्रीरघुवर हरण करतील ॥ छं २ ॥ सुंदर, सुजाण (सर्वज्ञ, सर्वदर्शी) कृपासागर असून जो अनाथांवर प्रीती करतो असा प्रभु फक्त एक रामचंद्रच होय ते निर्हेतुक हितकर्ते व निष्कामांचे मित्र आहेत. आणि त्यांच्यासारखा मोक्ष देणारा तर दुसरा नाहीच. ज्याच्या कृपालेशामुळे मंदबुद्धी तुलसीदास सुद्धा परम विश्राम पावला तो प्रभु-रामच, त्यांच्यासारखा प्रभु कोठेही नाही ॥ छं ३ ॥ हे रघुवीरा ! माझ्यासारखा कोणी दीन नाही, व तुमच्यासारखा दीनांचे हित करणारा कोणी नाही, हे जाणून हे रघुवंश शिरोमणी ! माझे विषम भवभय हरण करा. ॥ दो० १३० रा ॥ कामी पुरुषाला जशी नारी प्रिय असते (तिचे रुप), व लोभी मनुष्याला जसा पैसा (त्याची संख्या) प्रिय असतो, तसे हे रघुनाथ ! हे राम ! तुम्ही मला प्रिय व्हा. ॥ दो० १३० म ॥ श्रीरामचंद्रांच्या चरण कमलांची भक्ती नित्य निरंतर प्राप्त व्हावी म्हणून प्रभु व उत्कृष्ट कवी शंभु यांनी जे रामायण पूर्वी रचले होते, ते दुर्गम पण श्रीरघुनाथ-नाम-निरत आहे असे जाणून तुलसीदासाने आपल्या अंतरातील तमाच्या शान्तीसाठी ते जसेच्या तसे रामचरितमानस रुपाने स्वभाषेत रचले ॥ १ ॥ हे श्रीरामचरितमानस पुण्यरुप आहे, पापांचा विनाश करणारे आहे, सदा कल्याण करणारे आहे (सदाशिवाचा वरदहस्तच आहे). विज्ञान (विमल ज्ञान) देणारे व भक्ती देणारे आहे माया व मोहादि मल यांचा नाश करणारे आहे. अति निर्मल आहे, प्रेमरुपी जलाने परिपूर्ण आहे आणि मंगलरुप आहे. जे मनुष्य भक्तीने यात बुड्या मारतील ते संसाररुपी सूर्याच्या अति घोर किरणांनी जाळले जाणार नाहीत. ॥ २ ॥

अनुवादककृत उपसंहार

आर्या० :- श्रीरामा तव नामीं सुखदामीं नित्य चित्त रंगावें ।
कोमलपदाकमलीं तव मन मधुपें नित्यची तरंगावें ॥ १ ॥
गावा गुणगणगरिमा गगनाहुनि गहन गोड गंभीर ।
तारी त्रितापतरणी तापार्णव दावि चरण तव तीर ॥ २ ॥
देवा ! प्रज्ञानाला द्यावें जों कायसंघ निश्वासें ।
सेवा विश्वाची या तवरूपाची घडो सुविश्वासें ॥ ३ ॥

अनुवादक कृत उपसंहार
१) हे श्रीरामा माझे मन नित्य तुझ्या नामांत रंगू दे तुझ्या नामरुपी सुखाचा हार वा माळ माझ्या कंठात नित्य राहू दे. तुझ्या नाम स्वरांच्या स्पंदन लहरींवर हे मन नित्य तरंगत, विहरत राहो. तुझ्या कोमल पदकमलांत माझे मन ‘ मधुप ’ बनून तो भक्ती मकरंद अखंड अविरत पान करत राहो.
२) हे रामा, तुझ्या गुणांचा (गुणसमूहांचा) महिमा-प्रभाव प्रताप गगनाहुनही विशाल, अगाध आणि गंभीर (जलदाप्रमाणे कृपेने भरलेला) असा आहे. त्रिविध तापरुपी सूर्याची प्रखर किरणे जाळून त्यांचा जणूं ‘ भक्तीसागर ’ बनवून त्या सागराच्या किनार्‍यावर पोचविणारे हे तुझे मानसरुपी गुण मला नित्य भिजवू देत.
३) देवा ! श्रीरामा ! हा प्रज्ञानानंद केवळ तुझ्या भरंवश्यावर श्वास-निश्वास टाकीत जिवंत आहे. तेव्हा अशाच तुझ्यावर भरोसलेल्या या देहेंद्रियांकडून समस्त विश्वाची-तुझ्या रुपाचीच सेवा घडो.

इति श्रीमद्‌रामचरित मानसे
सकल कलि कलुष विध्वंसने
सप्तमः सोपानः
॥ उत्तरकाण्डं समाप्तम् ॥
॥ श्रीरामचरितमानस संपूर्ण ॥

॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥


* * * * *

श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु

GO TOP