॥ श्रीरामचरितमानस ॥

(मराठी अनुवाद)

॥ उत्तराकाण्ड ॥

॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥


अध्याय ७ वा



Download mp3

मी जशि कथा श्रुता भवमोचनि । तो प्रसंग वदुं सुमुखि सुलोचनि ॥
तुम्हिं अवतरलां प्रथम दक्षघरिं । सती नाम तुमचें तेव्हां पति ॥
होइ दक्षमखि तव अवमान । क्रोधें तुम्हिं तैं त्यजिले प्राण ॥
मम अनुचर करती मखभंगा । त्या सब जाणां तुम्हीं प्रसंगा ॥
तैं अतिशोक होइ मनिं माझ्या । प्रिये ! दुःखि बहु विरहें तूझ्या ॥
सुंदर गिरि वन सरित तडागां । बघत फिरें कौतुक विण रागा ॥
गिरि सुमेरु, उत्तर दिशिं दूरीं । एक नील गिरि सुंदर भूरी ॥
शिखरें उज्वल कनकमय तया ॥ चार चारु रुचलीं मम हृदया ॥
प्रत्येकीं तरु एक विशाल हि ॥ वट पिंपळ पिंपरी रसाल हि ॥
शैलावर सर सुंदर शोभे । मणि-सोपान बघुन मन शोभे ॥

दो० :- शीतल अमल मधुर जल जलज विपुल बहुरंग ॥
कूजति कलरव हंस गण गुंजति मंजुल भृंग ॥ ५६ ॥

हे सुमुखि ! सुलोचनी ! मी ही भवातून सोडविणारी कथा कशी श्रवण केली तो सर्व प्रसंग सांगतो ऐक ॥ १ ॥ प्रथम तुमचा अवतार दक्षाचा घरी झाला, तेव्हा तुमचे नाव ‘ सती ’ होते परंतु ॥ २ ॥ दक्षयज्ञात तुमचा अपमान झाला तेव्हा तुम्ही क्रोधाने प्राणत्याग केलात. ॥ ३ ॥ मग माझ्या सेवकांनी यज्ञाचा विध्वंस केला तो सर्व प्रसंग तुम्ही जाणताच ॥ ४ ॥ तेव्हा माझ्या मनांत अति शोक झाला, व प्रिये, तुझ्या विरहाने मी अति दु:खी झालो ॥ ५ ॥ मग (मन रमावे म्हणून) सुंदर पर्वत, वने, नद्या, तलाव वगैरे बघत, कौतुक पहात भटकू लागलो (पण कुठेही कशातही) रुचि वाटली नाही (मन रमले नाही) ॥ ६ ॥
शंकरांचे काकाकडून रामकथा श्रवण - उत्तरदिशेला सुमेरु पर्वत असून त्याच्या उत्तरेस फार सुंदर ‘नील’ पर्वत आहे ॥ ७ ॥ त्याला सुवर्णमय दैदिप्यमान अशी चार सुंदर शिखरे आहेत ती मला फार फार आवडली ॥ ८ ॥ त्या प्रत्येक शिखरावर एक असे क्रमश: वड, पिंपळ, पिंपरी व आंबा हे विशाल वृक्ष आहेत. ॥ ९ ॥ त्या नील पर्वतावर एक सुंदर तलाव शोभत असून त्याला रत्नांच्या पायर्‍या आहेत, तो पाहताच मन तेथे लुब्ध होते ॥ १० ॥ त्याचे जल, शीतल, मधुर निर्मल असून त्यात अनेक रंगांची कमळे फुललेली आहेत, हंसाचे थवे मधुर स्वरात कुजन करीत आहेत व त्या कमळांवर भृंग मंजुळ गुंजारव करीत असतात. ॥ दो० ५६ ॥

शैलिं रुचिर त्या विहग वसे तो । त्यास नास कल्पांतिं नसे तों ॥
मायाकृत गुणदोष अनेक हि ।मोह मनोज आदि अविवेकहि ॥
ब्यापुनि अवघ्या जगा राहती । त्यागिरि सन्निध कधिं न फिरकती ॥
तिथें बसुनि हरि भजतो काक । कसा उमे ! अनुरागें ऐक ॥
पिप्पलतलिं तो ध्याना धरतो । जपयज्ञा पिंपरितलिं करतो ॥
करि रसालतलिं मानसपूजा । भजनविना व्यवसाय न दूजा ॥
वटतळिं करि हरिकथा मनोरम । श्रवणा येति अनेक विहंगम ॥
रामचरित विचित्र विध नाना । प्रेमानें करि सादर गाना ॥
सकल विमलमति मराल ऐकति । जे त्या सरांत संतत निवसति ॥
जैं मी जाउन कौतुक पाही । तैं आनंद विशेष मनाही ॥

दो० :- कांहिं काळ मी हंसतनु धरुनि तत्र कृत वास ॥
सादर ऐकुनि रामगुण आलो कैलासास ॥ ५७ ॥

त्या सुंदर पर्वतावर तो पक्षी राहतो व त्याचा नाश महाकल्पान्ती सुद्धा होत नाही ॥ १ ॥ मायेने निर्माण केलेले मोह, कामादिक आणि अज्ञान इत्यादि अनेक गुण व दोष सगळ्या जगाला व्यापून राहीले आहेत, पण ते त्या गिरीजवळ कधी फिरकत सुद्धा नाहीत ॥ २-३ ॥ तिथे निवास करुन तो कावळा हरीला कसा भजतो ते उमे ! तू प्रेमाने श्रवण कर ॥ ४ ॥ पिंपळाखाली ध्यान, पिंपरीखाली जप – यज्ञ, आंब्याखाली मानसपूजा करतो व भजनाशिवाय तो दुसरा काही उद्योगच करीत नाही ॥ ६ ॥ तो काक वटवृक्षाखाली सुंदर हरीकथा सांगतो आणि श्रवणाला अनेक पक्षी येतात ॥ ७ ॥ तो अनेक प्रकारे विचित्र रामचरित्राचे प्रेमाने आदरपूर्वक गान करीत असतो. ॥ ८ ॥ त्या तलावात सतत राहणारे निर्मल बुद्धीचे सगळे हंस ते रामारित्र नेहमी श्रवण करीत असतात. ॥ ९ ॥ मी तेथे जाऊन जेव्हा ते कौतुक पाहीले तेव्हा माझ्या मनाला विशेष आनंद झाला ॥ १० ॥ मग हंसरुप धारण करुन कांही काळ तेथेच त्या तलावात राहीलो, आणि रामगुणांचे आदराने श्रवण केले आणि मग कैलासास आलो ॥ दो० ५७ ॥

कथित सकल इतिहास पार्वति । कसा कदा मी गत काका प्रति ॥
अतां कथा ती श्रुणु तो हेतू । काकनिकट गत खगकुल केतू ॥
जैं कृत रणिं रघुनाथें क्रीडा । स्मरत चरित मज वाटे व्रीडा ॥
स्वयें इंद्रजितपाशीं पडती । तैं नारद गरुडास धाडती ॥
गत बंधन भंगुनि भुजगाद । उपजे हृदीं प्रचंड विषाद ॥
स्मरतां प्रभुबंधन उरगारी । नानापरि करि विचार भारी ॥
व्यापी ब्रह्म विरज वागीश्वर । माया मोह पार परमेश्वर ॥
श्रुत मी तो जगिं अवतरलाहि । तो प्रभाव दिसला ना काहीं ॥

दो० :- भवबंधातुनि सुटति नर जपुनी यन्नामास ॥
क्षुद्र निशाचर बद्ध करि नागपाशिं रामास ॥ ५८ ॥

हे गिरीजे ! मी कसा व केव्हा काकाकडे गेलो तो सर्व इतिहास तुला सांगीतला ॥ १ ॥ गरुड काकापाशी श्रवणास का गेला ? त्याचे उत्तर – पक्षीकुलभूषण गरुड ज्या कारणास्तव काकाकडे गेला ती कथा आता ऐक ॥ २ ॥ जेव्हा रघुनाथाने रणात क्रीडा केली तेव्हाचे चरित्र आठवतच मला वाटते ॥ ३ ॥ रघुनाथ स्वत:च इंद्रजिताच्या नागपाशात पडले तेव्हा नारदाने गरुडाला पाठवले ॥ ४ ॥ भुजंग भक्षक गरुड नागपाश बंधन तोडून गेला (त्याने सगळे नाग खाऊन टाकले) आणि त्याच्या हृदयात प्रचंड विषाद उपजला. ॥ ५ ॥ प्रभूच्या नागपाशबंधनाचे स्मरण होताच गरुड नाना प्रकारे पुष्कळ विचार करुं लागला ॥ ६ ॥ जो सर्व व्यापक, विकाररहित, वाणी पती, माया मोहातील परमेश्वर आहे, तोच जगात अवतरला आहे असे ऐकले होते पण (येऊन पाहीले तो) काहीच प्रभाव दिसला नाही. ॥ ७-८ ॥ ज्याच्या नामाचा जप करुन मनुष्य भवबंधनातून सुटतात, त्या रामाला एका क्षूद्र निशाचराने नागपाशात बांधले (हे कसे) ? ॥ दो० ५८ ॥

विविध विधा समजावि मनासी । ज्ञान नव्हे भ्रम हृदया ग्रासी ॥
खेद खिन्न मनि तर्क वाढवी । झाला वश मोहा तुम्हिं जेवीं ॥
व्याकुळ गेला सुरर्षि पासीं । वदे सकल जे किंतु मनासी ॥
श्रवुनि नारदा येइ अति दया । खगा ! प्रबल रामाची माया ॥
जी ज्ञानी चित्ता अपहरते । बलात्कारिं मनिं विमोह करते ॥
जी नाचवि बहु वेळां मजला । व्यापी तीच विहगपति ! तुजला ॥
महामोह मनिं तुझ्या उपजला । जाइ न शीघ्र वचें मम हरला ॥
जा चतुरानन निकट खगेशा । तेंच करा ज्या देति निदेशां ॥

दो- :- असें वदुनि गत देवऋषि करित रामगुण गान ॥
हरिमायाबल वर्णित घडि घडि परम सुजाण ॥ ५९ ॥

गरुडाने नाना प्रकारे आपल्या मनाची समजूत घातली, पण मनाला बोध होईना, आणि भ्रमाने हृदय ग्रासले ॥ १ ॥ मनात तर्क वाढू लागला व त्यामुळे होणार्‍या दु:खाने अगदी खिन्न झाला आणि तुमच्या सारखाच मोहवश झाला (राम परमेश्वर नाहीत असे त्याला वाटू लागले) ॥ २ ॥ तेव्हा तो व्याकुळ होऊन देवर्षी नारदांकडे गेला, व आपल्या मनातले संशय त्याने नारदांना सांगीतले ॥ ३ ॥ ते ऐकून नारदांना अति दया आली (व ते मनात म्हणाले) हे खगा ! रामचंद्रांची माया फार बलवान आहे ॥ ४॥ जी ज्ञान्यांच्या चित्ताला सुद्धा आकर्षित करते व बलात्काराने त्यांच्या मनात महामोह उत्पन्न करते ॥ ५ ॥ जिने मला पुष्कळ वेळा नाचविले आहे, तीच (माया) हे पक्षीराजा ! तुला व्यापून राहीली आहे. ॥ ६ ॥ तुझ्या मनात महामोह उत्पन्न झाला आहे व तो माझ्या वचनांनी लवकर हरला जाणार नाही ॥ ७ ॥ म्हणून अहो खगराज ! तुम्ही चुतुरानन ब्रह्मदेवांकडे जा व जशी आज्ञा देतील तसे करा ॥ ८ ॥ असे सांगून परम सुजाण देवर्षी नारद रामगुणगान करीत तेथून गेले व हरीमायेचे बल वारंवार वर्णन करीत निघाले ॥ दो० ५९ ॥

खगपति विरंचिपाशीं गेला । निज संदेह निवेदन केला ॥
तैं विरंचि रामा शिर नमती । प्रभुता स्मरता प्रेमा भरती ॥
विचारास विधि करिति मनीं या । ज्ञानी कवि कोविद वश माया ॥
हरिमाया प्रभाव मिति नाहीं । ती नाचवि बहुवार मला ही ॥
अग जग मय जग मीच निर्मिलें । नहि विस्मय खगराज मोहिले ॥
मग वदले विधि रुचिर खगेशा ! । विदित राम महिमा किं महेशा ॥
वैनतेय जा निकट शंकरा । तात ! न पुसणें कोठें इतरा ॥
होइ तिथें तव संशय हानी । निघे विहग ऐकत विधि वाणी ॥

दो० :- मग परमातुर विहगपति आला जैं मजपाशिं ॥
होतो जात कुबेरगृहिं उमे ! तुम्हीं कैलासिं ॥ ६० ॥

मग पक्षीराज विरंचीकडे गेला व त्याने आपला संदेह त्यांना सविस्तर सांगीतला ॥ १ ॥ तेव्हा रामाने विरंचीला मस्तक नमविले आणि राम प्रभावाचे स्मरण होताचे प्रेमाला भरती आली ॥ २ ॥ विधाता मनात विचार करुं लागले की ज्ञानी, कवी, पंडित इ. सर्व राममायेला वश होतात ॥ ३ ॥ कारण हरीमायेच्या प्रभावाला सीमा नाही तिने मला सुद्धा पुष्कळ वेळा नाचविले आहे. ॥ ४ ॥ स्थावर जंगमात्मक जग तर मीच निर्माण केले आहे. मग पक्षिराजास मोहित केले यात काही आश्चर्य नाही ॥ ५ ॥ मग विधि रुचिर भाषेत म्हणाले की खगेशा ! श्रीरामाचा महिमा महेशांस माहीत आहे ॥ ६ ॥ म्हणून वैनतेया ! तुम्ही शंकराकडे जा. तात ! दुसर्‍या कुठेही व कोणालाही विचारु नका ॥ ७ ॥ तेथे तुमचा संशय नाहीसा होईल ब्रह्मदेवाचे हे वचन ऐकताच विहंग निघाला ॥ ८ ॥ मग अत्यंत आतुर झालेला खगपती जेव्हा माझ्या पाशी आला तेव्हा मी कुबेराच्या घरी जात होतो आणि उमे ! तुम्ही त्यावेळी कैलासावर होतात ॥ दो० ६० ॥

मम पदिं सादर नमुनि शिरासी । तो सांगे निज संदेहासी ॥
त्याची श्रवुनि विनति मृदु वाणी । प्रेमें मी वदलो किं भवानी ! ॥
गरुडा ! मार्गी भेटसि मजला । अतां कसें समजावूं तुजला ॥
तदा सकल संदेहां भंग । जैं बहुकाळ करिति सत्संग ॥
तिथें रुचिर हरिकथा ऐकणें । ज्या वर्णित बहुपरीं मुनिगणें ॥
आदि मध्य अवसानिं जयांतहि । प्रभू राम भगवान् प्रतिपाद्यहि ॥
नित्य हरिकथा होते जेथें । करा श्रवण जा धाडूं तेथें ॥
श्रवणें जाति सकल संदेह । रामचरणिं अति उपजे स्नेह ॥

दो० :- विण सत्संग न हरिकथा त्याविण मोह न जात ॥
मोह नाशविण रामपदिं दृढ अनुराग न तात ॥ ६१ ॥

त्याने आदराने माझ्या पायावर मस्तक ठेवले व आपला संदेह मला सांगीतला ॥ १ ॥ भवानी ! त्याची विनंती व नम्र् वाणी ऐकून मी प्रेमाने म्हणालो की ॥ २ ॥ गरुडा ! तू मला रस्त्यात भेटलास, आता, जेथे तुला मी कसे समजावून सांगू ? ॥ ३ ॥ जेव्हा पुष्कळ काळ सत्संग करावा तेव्हा सर्व नाश होतो. ॥ ४ ॥ आणि तेथे मुनिगणांनी नाना प्रकारांनी वर्णिलेल्या सुंदर हरिकथा श्रवण करव्या ॥ ५ ॥ की ज्यात आदि, मध्य, व अंती प्रभुराम भगवानच प्रतिपाद्य आहेत. ॥ ६ ॥ जेथे नित्य नियमाने हरिकथा होत असते तेथे मी तुम्हाला पाठवतो, तेथे जाऊन श्रवण करा. ॥ ७ ॥ तेथे श्रवण केल्याने संदेह जातील व श्रीरामचरणीं अत्यंत स्नेह उत्पन्न होईल ॥ ८ ॥ हे तात ! सत्संगाशिवाय हरिकथा श्रवण नाही, आणि त्याशिवाय मोह जात नाही, मोहनाश झाल्याशिवाय रामचरणी द्रुढ प्रेम प्राप्त होत नाही ॥ दो० ६१ ॥

रघुपतिलाभ न विण अनुरागा । ज्ञान योग तप करुनि, विरागां ॥
उत्तरेस गिरि नील मनोहर । काकभुशुंडि सुशील वसे वर ॥
रामभक्ति पथिं परम प्रविण । ज्ञानि गुणगृह बहुकालीन ॥
रामकथा तो गाई निरंतर । ऐकति सादर विविध विहगवर ॥
ऐक तिथें जा हरिगुण भूरी । होतिल मोहज दुःखे दूरीं ॥
मी त्या कथित सकल समजाउनि । हर्षित निघे पदींशिर नमवुनि ॥
मी न उमे ! त्याला उपदेशिलें । रघुपति कृपें मर्म मज कळलें ॥
कधि असेल अभिमान किं झाला । उपटूं बघति कृपाब्धी त्याला ॥
आणिक मी न ठेविला त्यासी । जाणतात खग खग भाषेसी ॥
प्रभु माया बलवंत भवानी । मोहि न ज्यास कवण कीं ज्ञानी ॥

दो० :- ज्ञानी भक्तशिरोमणि त्रिभुवनपतिचें यान ॥
त्यास मोहि माया, नर पामर करिति गुमान ॥ ६२रा ॥

रघुपतीची प्राप्ती (सगुण साक्षात्कार वा दर्शन) द्रुढ अनुरागा शिवाय केवळ वैराग्याने, ज्ञानाने वा योग – याग तप करुन होत नाही ॥ १ ॥ उत्तर दिशेला मनोहर नील पर्वत आहे, त्यावर सुशील काकभुशुंडी राहतो. ॥ २ ॥ तो रामभक्ती मार्गात परम प्रवीण असून ज्ञानी व सद्गुणधाम आहे, आणि फार पुरातन काळचा (पासून तो तिथे) आहे ॥ ३ ॥ तो नित्य नेमाने रामकथेचे गान करीत असतो आणि नाना प्रकारचे श्रेष्ठ पक्षी श्रवण करतात ॥ ४ ॥ तिथे जा व हरिचरित्र पुष्कळ श्रवण करा म्हणजे मोहापासून उत्पन्न झालेली तुमची सर्व दु:खे दूर होतील. ॥ ५ ॥ मी त्याला सगळे समजावून सांगितले तेव्हा तो माझ्या चरणांना वंदन करुन गेला ॥ ६ ॥ उमे ! रघुपतीच्या कृपेने मला मर्म कळले म्हणून मी त्याला उपदेश केला नाही ॥ ७ ॥ त्याला कधी तरी अभिमान झाला असेल व कृपासागर रघुपती तो उपटून टाकू पहात आहेत (म्हणून मी त्याला काका कडे पाठवले) ॥ ८ ॥ मी त्याला ठेवून घेतला नाही कारण पक्षीच पक्ष्यांची भाषा चांगली जाणतात ॥ ९ ॥ भवानी ! प्रभूची माया अशी बलवान आहे की ज्याला ती मोहू शकणार नाही असा ज्ञानी कोण आहे ? (कोणीही नाही)॥ १० ॥ ज्ञानी भक्तशिरोमणी आणि त्रिभुवनपती नारायणाचे वा विष्णूचे वाहन असा जो गरुड त्याला सुद्धा मोहित केला ! तरीही नीच मनुष्य व्यर्थ घमेंड करतात. ॥ दो० ६२ रा ॥

* * * * *

श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु

GO TOP