|
॥ श्रीरामचरितमानस ॥ (मराठी अनुवाद) ॥ बालकाण्ड ॥ अध्याय ३१ वा ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥ Download mp3 पोंचति दूत रामपुरिं पावन । हर्षति नगरी पाहुन शोभन ॥ दो ० :- बंधु प्राणप्रिय उभय कुशल ! कुठें ! आहेत ॥ श्री रघुवीर वर्हाड प्रकरण - पुलकित परिसुनि पत्रा भ्राते । प्रेम फार राहि न गात्रां तें ॥ दो० :- भूप-मुकुट-मणि तुम्हां सम ऐका धन्य न कोणि ॥ पत्र ऐकून दोन्ही भावांचे देह रोमांचित झाले व प्रेम फार झाल्याने ते गात्रांत मावेनासे झाले ॥ १ ॥ भरताची पुनीत प्रीती पाहून त्या सर्व सभेने विशेष सुखाचा संचय केला. ॥ २ ॥ मग राजाने दूतांना जवळ बसविले व मधुर मनोहर वचने बोलू लागले ॥ ३ ॥ बाबांनो, सांगा पाहूं माझ्या दोन्ही बाळांचे कुशल, तुम्ही आपल्या डोळ्यांनी माझ्या बाळांना नीट पाहीलेत नां ? ॥ ४ ॥ ते श्यामल व गौर वर्णाचे आहेत, धनुष्य व भाते धारण केलेले आहेत वयाने किशोर असून, कौशिक मुनींसमवेत आहेत. ॥ ५ ॥ ओळखले असलेत तर माझ्या त्या बाळांचा स्वभाव कसा आहे सांगा पाहू, असे राजाने प्रेमवश होऊन कितीदां तरी विचारले ॥ ६ ॥ ज्या दिवशी विश्वामित्र त्यांना घेऊन गेले तेव्हापासून आज त्यांचा समाचार कळला ॥ ७ ॥ विदेहाने त्यांना कशा प्रकारे जाणले ते सांगा पाहू हे प्रिय भाषण ऐकून दूत हसले व म्हणाले ॥ ८ ॥ भूपशिरोमणी ! ऐकावे, सर्व विश्वाचे विभूषण असणारे राम, व लक्ष्मण हे दोघे ज्यांचे पुत्र आहेत, असा आपल्या सारखा धन्य (विश्वात) कोणी नाही. ॥ दो० २९१ ॥ भवत्सुतां पुसणें कें अवश्यक । पुरुषसिंह जे जगत्प्रकाशक ॥ दो० :- तिथें राम रघुवंशमणि पहा महामहिपाल ॥ महाराज ! जे पुरुषसिंह तिन्ही लोकांना प्रकाशमान करणारे आहेत त्या आपल्या पुत्रांबद्दल विचारण्याची आवश्यकताच काय ? (काहीच नाही) ॥ १ ॥ ज्यांच्या यशापुढे चंद्र मलिन व प्रतापापुढे सूर्य शीतल वाटतो, (त्यांच्या विषयी काय सांगावे ?) ॥ २ ॥ प्रभु ! ते कसे ओळखले म्हणून काय सांगावे - हातात दिवा घेऊन का सूर्याला पाहतात ? ॥ ३ ॥ सीता स्वयंवरात एकापेक्षा एक महावीर असलेले सगळे राजे जमले होते. ॥ ४ ॥ (पण) शिवधनुष्य कोणालाही (जरा सुद्धा) उचलता आले नाही. सगळे बलवान वीर हरले ॥ ५ ॥ तिन्ही लोकातील जे कोणी वीरतेचा अभिमान बाळगणारे होते त्या सर्वांची शक्ती शंभु धनुष्याने नष्ट केली ॥ ६ ॥ जो बाणासुर मेरु पर्वत सुद्धा उचलू शकतो, तो सुद्धा मनात बिचकून (हार खाऊन) परत फिरला ॥ ७ ॥ ज्याने सहज लीलेने शिवासह कैलास उचलला तो (रावण) सुद्धा त्या सभेत पराजित झाला. ॥ ८ ॥ अन् महाराज! राजाधिराज ! पहा तर खरे की रघुवंशमणी रामचंद्रांनी ते शिवधनुष्य इतके सहज मोडले की जसे हत्तीने कमळाचे देठ तोडावे ॥ दो० २९२ ॥ ऐकुनि आले सरोष भृगुपति । नानापरिं दाबिति धमकावति ॥ दो० :- उठुनि पत्र मग देति नृप वसिष्ठांस जाऊन । धनुर्भंगाची वार्ता ऐकून भृगुपति क्रोधाविष्ट होऊन आले आणि त्यांना नाना प्रकारे डोळे वटारुन धमकावले ॥ १ ॥ पण रामांचे बल पाहून त्यांनी आपले धनुष्य रामांना दिले आणि रामांची अत्यंत स्तुती करुन ते वनांत निघून गेले ॥ २ ॥ हे राजन ! जसे राम अतुलबल आहेत तसेंच तेजनिधान लक्ष्मणही आहेत. ॥ ३ ॥ त्यांनी केवळ दृष्टी टाकली असता सिंहाच्या छाव्यास पाहून हत्ती जसे कापतात (भयभीत होतात) तसे राजे लोक कापू लागतात ॥ ४ ॥ हे देवा ! आपल्या दोन्ही पुत्रांना पाहिल्यानंतर आता अन्य कोणी दृष्टीसमोर येतच नाही ॥ ५ ॥ प्रेम, ऐश्वर्य व वीररस यांनी भरलेली दूताच्या वचनांची रचना प्रिय वाटली ॥ ६ ॥ सभेसहित राजा प्रेमात रंगले व दूतांना बक्षिस देऊं लागले ॥ ७ ॥ अनीती आहे असे म्हणून त्यांनी कानावर हात ठेवले तेव्हा विचार करुन सर्वांनी सुख मानले ॥ ८ ॥ मग दशरथांनी उठून वसिष्ठांकडे जाऊन ते पत्र त्यास दिले व दूतांना आदराने आणवून त्यांच्याकडून सर्व कथा सांगविली ॥ दो० २९३ ॥ ऐकुनि गुरु वदले सुखघूर्णिंत । मही पुण्य पुरुषा सुखपूरित ॥ दो० :- "चला शीघ्र" गुरुवचा श्रुत ’प्रभु ! बरं’ नमुनि पदांस ॥ (दूतांनी सांगितलेले सर्व) ऐकून गुरु सुखाने डोलत म्हणाले - की - पुण्यशील पुरुषाला सर्व पृथ्वी सुखाने भरलेली असते ॥ १ ॥ सागराला जशी इच्छा नसली तरी नद्या जाऊन त्यास मिळतात ॥ २ ॥ तशीच (सर्व) सुख व संपत्ती न मागता धर्मशील पुरुषाजवळ येतात, जमतात. ॥ ३ ॥ तुम्ही गुरु, विप्र, धेनु व देव यांची सेवा करणारे आहात आणि कौसल्यादेवीही तशाच पुनीत आहेत ॥ ४ ॥ तुमच्यासारखा सुकृती पूर्वी झाला नाही, आज विद्यमान नाही व पुढे होणार नाही. ॥ ५ ॥ राजा ! ज्याचा रामासारखा पुत्र आहे त्याच्यापेक्षा अधिक मोठे पुण्य कोणाचे असणार ? ॥ ६ ॥ वीर जितेंद्रिय, व विनम्र आणि धर्म हेच व्रत धारण करणारे श्रेष्ठ गुणसागर असे तुमचे चारी पुत्र आहेत ॥ ७ ॥ तुमचे सतत (सर्वकाळ) कल्याण होईल तरी डंके पिटून वर्हाडाची तयारी करा. ॥ ८ ॥ ‘ शीघ्र चला ’ या गुरुवचनास ऐकून ‘ प्रभु ! बरे आहे ’ असे म्हणून मग त्या दूतांना उतरण्यास जागा देऊन भूपती घरी गेले. ॥ दो० २९४ ॥ नृप राण्यांस सकल बोलाविति । जनक-पत्रिका वाचुनि दाविति ॥ सो० :- ओवाळणी अपार याचक बोलावुनि दिधलि ॥ राजाने सर्व राण्यांना एकत्र बोलावल्या व (सर्वांना) जनकपत्रिका वाचून दाखविली ॥ १ ॥ पत्र कानी पडताच त्या सगळ्या राण्यांना हर्ष झाला. (मग) बाकीची सर्व कथा राजाने विस्तारपूर्वक वर्णन करून सांगितली. ॥ २ ॥ प्रेमाने प्रफुल्लित झालेल्या राण्या अशा शोभू लागल्या की जणूं लांडोरींनी मेघगर्जना ऐकली असावी ॥ ३ ॥ गुरुनारींनी आनंदित होऊन आशीर्वाद दिले तेव्हा सर्व माता आनंदात फारच मग्न झाल्या ॥ ४ ॥ ते अत्यंत प्रिय पत्र एकमेकांनी एकमेकीं पासून (आळी पाळीने) घेऊन आपल्या हृदयाशी धारण करुन राण्या आपली छाती निववूं लागल्या ॥ ५ ॥ भूपश्रेष्ठ दशरथांनी रामलक्ष्मणांची करणी व कीर्ती वारंवार वर्णन केली ॥ ६ ॥ ही सर्व विश्वामित्र मुनींची कृपा आहे असे म्हणून दशरथ बाहेर गेले व राण्यांनी ब्राम्हणांस बोलावून घेतले ॥ ७ ॥ आनंदित होऊन त्यांना दाने दिली व विप्रश्रेष्ठ आशीर्वाद देऊन गेले ॥ ८ ॥ याचकांना बोलावून आणवून त्यांना अपार ओवाळणीचे पदार्थ दिले चक्रवर्ती दशरथ राजांचे चार पुत्र चिरंजीव होवोत (असे त्यांनी मनातून आशीर्वाद दिले). ॥ दो० २९५ ॥ वदत जाति घालुनिपट नाना । मुदित हणिति धम्धमां निशाणां ॥ दो० :- मंगलमय निज निज भवन करिति लोक सजवून ॥ ‘ चक्रवर्ती दशरथांचे चार पुत्र चिरंजीव होवोत ’ असे म्हणत नाना प्रकारची वस्त्रे अंगात घालून हर्षाने परत चालले हर्षाने नगारे धमाधम वाजविले गेले ॥ १ ॥ (जनकसुता - रघुवीर विवाह ठरला असून त्यासाठी राजा वर्हाडासह शीघ्र निघणार) हा समाचार सर्व लोकांना कळला व घरोघरी अभिनंदनोत्सव सुरु झाले ॥ २ ॥ एवढेच नव्हे तर जनकसुता रघुवीर विवाहाचा उत्साह चौदाही भुवनात (ब्रह्मलोक ते पाताळ) भरुन राहीला ॥ ३ ॥ हा शुभ समाचार ऐकून सर्व लोक प्रेममग्न होऊन रस्ते, बोळ व घरे शृंगारु लागले ॥ ४ ॥ अयोध्या मंगलमय पावन रामपुरी असल्याने सदा सर्वदाच शोभन व सुंदर असते ॥ ५ ॥ तरी प्रीतीची रीतच अशी सुंदर आहे की, तिने विविध, मनोहर मंगल रचना केलीच. ॥ ६ ॥ सुंदर ध्वजा, पताका, पडदे चवर्या इत्यादिंनी सर्व बाजार परम विचित्र सजविले गेले ॥ ७ ॥ कनकाचे कलश, मोत्याची तोरणे, रत्नांच्या जाळ्या, हळद - कुंकू, दही, अक्षता, माळा इत्यादिनी. ॥ ८ ॥ (या मंगल द्रव्यादिकांनी) सर्व लोकांनी आपापली घरे सजवून मंगलमय बनविली आणि रस्ते ‘ चतुरसम ’ नावाच्या सुगंधी द्रव्याने शिंपून सुंदर रांगोळ्या काढून ठेवल्या. ॥ दो० २९६ ॥ जिथं तिथं मिळूनि थवांनीं भामिनि । सब नव सप्त सजुनि दुति दामिनि ॥ दो० :- शोभा दशरथभवनिंची कुणि करि वर्णि किं पार ॥ विजेसारखी कान्ती असलेल्या, चंद्रासारखे मुख असलेल्या, हरिणीच्या पाडसा सारखे नेत्र असलेल्या, सोळा स्थानी शृंगारांनी सजलेल्या व आपल्या सुरुपाने रतीचे गर्वहरण करणार्या सुंदर स्त्रिया थव्याथव्यांनी जमून मंजुळ सुरावर मंगल गीते गाऊ लागल्या त्यांचा तो सुंदर स्वर ऐकून कोकिळाही लाजल्या ! ॥ १-२-३ ॥ जेथे विश्वाला विमोहित करणारा मंडप घातला गेला त्या राजवाड्याचे वर्णन कसे करणार ! ॥ ४ ॥ विविध मनोहर मंगल वस्तू शोभत आहेत व विविध विपुल नगारे वाजत आहेत ॥ ५ ॥ कुठे बंदी ब्रीदाचा घोष करीत आहेत तर कुठे विप्र वेदघोष करीत आहेत ॥ ६ ॥ कुठे (अंत:पुरात) सुंदर स्त्रिया राम व सीता यांची नांवे पुन:पुन्हा उच्चारुन मंगल गीतांतून गात आहेत ॥ ७ ॥ असा हा उत्साह फार मोठा झाल्याने - वाढल्याने त्याला राजवाडा थोकडा - अपुरा पडू लागला जणूं उत्साहाचा पूर चोहोंकडे वाहू लागला ॥ ८ ॥ सर्व देवशिरोमणीदेवाने - रामाने जेथे अवतार घेतला त्या दशरथ भवनाची शोभा पूर्ण वर्णू शकेल असा कवी कोण आहे बरे ? ॥ दो० २९७ ॥ घेति भूप भरता बोलावुनि । हय गज सजवा स्यंदन जाउनि ॥ दो० :- शोकिन निवडक सुबक ते शूर सुजाण नवीन ॥ (मग) दशरथ राजांनी भरतास बोलावून सांगितले की, जाऊन घोडे, हत्ती, रथ, सजवा ॥ १ ॥ रघुवीराच्या वर्हाडात त्वरेने चला. (हे ऐकताच) त्या भावांच्या देहावर दाट रोमांच उभे राहीले ॥ २ ॥ भरताने जाऊन (त्या त्या खात्यांचे) सर्व दरोगे अधिकारी (व्यक्ति) बोलावून आणविले, आज्ञा देताच ते सर्व आनंदाने उठून धावत निघाले ॥ ३ ॥ त्यांनी तुरंगांवर यथा रुचि सुंदर जीन घालून त्यांना शृंगारले व विविध वर्णाचे श्रेष्ठ घोडे शोभू लागले ॥ ४ ॥ हे सर्व घोडे अति सुभग व गतीमान चालीचे आहेत; इतके की लाल झालेल्या लोखंडावर पाय पडावेत तसे यांचे पाय जमिनीवर पडत आहेत ॥ ५ ॥ यात इतक्या विविध जाती आहेत की त्या सांगता येणे शक्य नाही, पवनाला जिंकूनच जणू उडू पाहत आहेत ॥ ६ ॥ भरत व समवयस्क शोकिन राजकुमार त्यावर स्वार झाले आहेत ॥ ७ ॥ हे सगळे सुंदर व सगळी भूषणे घातलेले असून हातात मोठ मोठी धनुष्ये व कमरेला मोठ मोठे भाते बांधलेले (कसलेले) असे आहेत. ॥ ८ ॥ भरताबरोबर सर्व राजकुमार शोकिन, निवडक व रुपाने सुबक असून किशोर वयाचे असून शूर व सुजाण आहेत आणि प्रत्येक घोडे स्वाराबरोबर तलवार बहाद्दूर असलेले दोन - दोन पायदळ स्वार आहेत ॥ दो० २९८ ॥ वीरवेषिं रणधीर शोभले । निघुनि पुरी बाहेर थांबले ॥ दो० :- जमुं लागे बस-बसुनि रथिं पुरि-बाहेर वरात ॥ ते सर्व राजकुमार वीर वेषात सुशोभित झालेले रणधीर वीर निघून नगराच्या बाहेर जाऊन थांबले . ॥ १ ॥ तेथे ते चतुर वीर आपापल्या चपळ तुरंगांना विविध गतींनी फिरवूं लागले. ढोल नगार्याचा आवाज ऐकून उत्साह वाढला ॥ २ ॥ (इकडे) सारथ्यांनी ध्वजा, पताका, रत्ने भूषणे इत्यादि रथांना लावून ते उत्तम प्रकारे सुंदर सजविले ॥ ३ ॥ चवर्या (वार्याने) झुलताहेत, व घंटिका-घागर्यांचा मधुर कोमल ध्वनी निघत आहे, असे हे रथ जणू सूर्याच्या रथाच्या शोभेचा अपहार करीत आहेत. ॥ ४ ॥ (अश्वमेध यज्ञांत लागणारे) श्यामकर्ण घोडे अगणित होते ते सारथ्यांनी त्या रथांना जुंपले ॥ ५ ॥ (ते सर्व श्यामकर्ण) सुंदर असून सकल अलंकारांनी सजविल्यामुळे विशेषच शोभायमान झाले, त्यांना पाहून मुनींची मने सुद्धा मोहित होऊ लागली. ॥ ६ ॥ ते जसे जमिनीवर चालतात तसे पाण्यावरही चालतात व अतिवेग असल्यामुळे त्यांच्या टापाही पाण्यात बुडत नाहीत ॥ ७ ॥ अशी अस्त्रादी सर्व सामग्री सजवून सारथींनी रथींना बोलावून घेतले ॥ ८ ॥ आपापल्या रथात क्रमश: बसून नगराच्या बाहेर वरातीची मिरवणूकीची जुळणी सुरु झाली जे ज्या कार्यासाठी निघाले, त्यांना त्यांना तसे सुंदर शकुन होऊ लागले ॥ दो० २९९ ॥ अंबार्या सुंदर करिवरतीं । वदलें न जाइ न अशा सजवती ॥ दो० :- हर्ष परम सकलां मनीं पूरित पुलक शरीर ॥ सुंदर हत्तींवर सुंदर अंबार्या अशा सजविल्या गेल्या की काही सांगता येत नाही ॥ १ ॥ घंटांनी सुशोभित असे मत्त हत्ती चालू लागले (तेव्हा असे वाटले की) जणूं अत्यंत सुंदर अशा श्रावणातील मेघांच्या रांगाच चालल्या आहेत. ॥ २ ॥ दुसर्या पुष्कळ व अनेक प्रकारच्या सुंदर वाहनात मेणे, सुंदर डोल्या व पालख्या इत्यादीत ॥ ३ ॥ बसून विप्रश्रेष्ठांचे समुदाय चालले (तेव्हा वाटले की) सर्व वेद व उपनिषदेच शरीरे धारण करुन जात आहेत. ॥ ४ ॥ मागध, सूत बंदी व गुणगायक आपापल्या योग्यतेनुसार योग्य वाहनावर बसून निघाले ॥ ५ ॥ अगणित पदार्थांनी लादलेली विविध जातीची खेचरे, विविध प्रकारचे उंट व नाना जातींचे बैल चालू लागले ॥ ६ ॥ गडी अगणित कावड्या घेऊन निघाले (एकेका) कावडीत विविध प्रकारचे किती पदार्थ भरले आहेत हे किती वर्णन करून सांगावे बरे ! ॥ ७ ॥ सगळे सेवक आपापल्या पत्न्यांसह समूहा - समूहाने थाटाने निघाले आहेत. ॥ ८॥ सर्वांच्या मनात परम हर्ष झाला असून, सर्वांचे देह रोमांचांनी फुलले आहेत व राम - लक्ष्मण या दोघा वीरांना कधी एकदा डोळे भरुन पाहूं (अशी सर्वांनाच उत्कंठा लागली आहे) ॥ दो० ३०० ॥ गज घंटा भीषण घण्घणती । रथ रव चहुँ दिशिं अश्व हेषती ॥ दो० :- वसिष्ठांस रथिं रुचिर त्या चढविति मुदित नरेश ॥ हत्तींच्या घंटा घोर (मोठमोठ्याने) घणघणाट करीत आहेत, रथांचा खडखडाट व घोड्यांचे खिंकाळणे चोहोकडे चालू आहे ॥ १ ॥ मेघांना लाजवित डंक्यांचा घडघडाट चालू आहे व त्यामुळे आपला किंवा दुसर्याचा शब्द कानी येत नाही ॥ २ ॥ राजद्वाराजवळ तर इतकी भारी गर्दी झाली आहे की, (तेथे) दगड फेकला तर त्याचे पीठ होऊन जाईल ॥ ३ ॥ स्त्रिया गच्यांवर चढून तबकात मंगल - आरती घेऊन बघत आहेत. ॥ ४ ॥ आणि त्या मनोहर मंगल गीते गात आहेत. आनंद तर इतका अत्यंत आहे की वर्णन करणे अशक्य ! ॥ ५ ॥ दोन रथ सुमंतांनी सजविले व सूर्याच्या घोड्यांना लाजविणारे घोडे त्यास जोडले ॥ ६ ॥ ते दोन रुचिर रथ (त्याने) राजाजवळ आणले त्यांचे वर्णन शारदेलाही करता येणार नाही. ॥ ७ ॥ एका रथांत राजांची सर्व सामग्री सजविली असून दुसरा रथ तेज:पुंज व विशेष शोभायमान आहे ॥ ८ ॥ त्या सुंदर रथात राजाने आनंदाने वसिष्ठांस चढविले व आपणही शंकर, गुरु गौरी व गणेश यांचे स्मरण करुन त्याच रथावर आरुढ झाले. ॥ दो० ३०१ ॥ सह वसिष्ठ शोभति नृप तैसे । सुर-गुरु-संगिं पुरंदर जैसे ॥ दो० :- तुरग नाचविति कुमरवर मृदंगादि अनुकूल ॥ बृहस्पतींसह इंद्र शोभावा तसे वसिष्ठांसह राजा दशरथ शोभत आहे. ॥ १ ॥ वेदविधी व कुलरिवाजाप्रमाणे जो विधी करावयाचा तो करुन व (आपल्या बरोबर येणार्या) समाजाची सर्वप्रकारे सज्जता झाली आहे हे पाहून ॥ २ ॥ रामाचे स्मरण करून व गुरुजींची आज्ञा घेऊन, शंख वाजवून महीपतींनी प्रयाणास प्रारंभ केला ॥ ३ ॥ ती मिरवणूक पाहून देवांना हर्ष झाला व त्यांनी अतिमंगल अशी पुष्पवृष्टी केली ॥ ४ ॥ (तेव्हा) अत्यंत गोंगाट, गलबला सुरु झाला घोडे, हत्ती गर्जू लागले आणि आकाशात व मिरवणूकीत (वरातीत) वाद्ये वाजू लागली. ॥ ५ ॥ अप्सरा व अयोध्येतील स्त्रिया मंगलगान करीत आहेत व सनया वगैरे कोमल वाद्ये उत्तम रागदारीत वाजत आहेत ॥ ६ ॥ छोट्या - मोठ्या घंटाचा ध्वनी वर्णनातीत आहे सेवक (पैलवान) अनेक प्रकारचे कसरतीचे नव - नवे खेळ करीत आहेत. ॥ ७ ॥ विदूषक नाना प्रकारचे कौतुक करीत असून ते हास्यरस निर्माण करण्यात कुशल व सुंदर गायनात निपुण आहेत ॥ ८ ॥ सुंदर राजकुमार मृदंगादिकांच्या वादनानुसार आपापल्या तुरंगाना नाचवित आहेत व त्यांचे ताल - सम वगैरे मुळीच चुकत नाहीत हे निरखून चतुर नट सुद्धा आश्चर्यचकित होत आहेत. ॥ दो० ३०२ ॥ सज्ज वरात वदलि ना जाई । होति शकुन सुंदर शुभदाई ॥ दो० :- मंगलमय कल्याणमय अभिमत फळ जे देत ॥ ही वरात इतकी सुंदर सजली आहे की वर्णन करता येत नाही सुंदर शुभ - दायक शकुन (सर्वांना) होऊ लागले ॥ १ ॥ चासपक्षी डाव्या बाजूस आपले भक्ष्य खात आहे व जणू सांगत आहे की सर्व प्रकारचे मंगल होणार ॥ २ ॥ उत्तम शेतात उजव्या बाजूस कावळे दिसले व मुंगुस आपल्याकडे पुन:पुन्हा वळून बघत आहे असे सर्वांना दिसले ॥ ३ ॥ शीत, मंद व सुगंधित वारा अनुकूल वाहू लागला डोक्यावर पाण्याची घागर व कमरेला बालक घेतलेली सौभाग्यवती स्त्री समोरुन येताना दिसली ॥ ४ ॥ भालू (कोल्हाची मादी) वळून खुषीने दर्शन देत आहे व धेनू वत्साला समोरच पाजीत आहे ॥ ५ ॥ हरीणाचा कळप डावीकडून वळून उजवा आला व जणूं सर्व मंगल गणांचे दर्शन देता झाला ॥ ६ ॥ लाल घार (क्षेमकरी) विशेष सांगत आहे आणि शुभ वृक्षावर डाव्या बाजूस श्यामा - कोकिळा दिसली ॥ ७ ॥ कोणी दही व मासे समोरुन घेऊन आला व दोन विद्वान ब्राम्हण हातात पुस्तक असलेले येताना दिसले ॥ ८ ॥ जे शकुन मंगलमय, कल्याणमय व इच्छिलेले फळ देतात ते सगळे शकुन जणूं सत्य ठरण्यासाठी एकाच वेळी आले असे दिसले ॥ दो० ३०३ ॥ त्या सब शकुन सुगम मंगलकर । ज्याचा ब्रह्म सगुण, सुत सुंदर ॥ दो० :- जाणून येत वर्हाड वर वाद्य घोष ऐकून ॥ सगुण ब्रह्मच ज्यांचा पुत्र आहे त्यांना मंगलकारक सर्व शकुन एकच वेळी होणे यात नवल ते काय ? ॥ १ ॥ रामासारखा वर व सीतेसारखी वधू आणि दशरथ जनकासारखे पुनीत व्याही आहेत ॥ २ ॥ हे ऐकून शकुंनांचा समुदाय आनंदाने नाचू लागला की आता विरंचीने आंम्हाला सत्य ठरविले ॥ ३ ॥ याप्रमाणे वरातीने प्रयाण केले (तेव्हा) घोडे, हत्ती गर्जू लागले व डंके पिटले गेले ॥ ४ ॥ सूर्यवंशाचे ध्वज दशरथ महाराज येत आहेत असे जाणून जनक राजाने सरितांवर तात्पुरते पूल बांधविले ॥ ५ ॥ मधे - मधे वस्ती करण्यासाठी चांगली निवासस्थाने तयार करविली आणि ती (इंद्रपुरी-इंद्राची राजधानी) अमरावती सारख्या संपदेने अगदी खचून - भरुन ठेवली ॥ ६ ॥ खाण्याचे व भोजनादिकांचे उत्तम पदार्थ गाद्या वगैरे झोपण्यासाठी उत्तम साधने व सुंदर वस्त्रे वगैरे सर्व गोष्टी सर्व वर्हाडांना आपापल्या मनाच्या आवडीप्रमाणे मिळाल्या ॥ ७ ॥ आपणास इष्ट वाटणारे सुख रोज नवनवे अवतरलेले पाहून सर्व वर्हाडी मंदिर (हृदयातील राम-मंदिर) भुलून गेले ॥ ८ ॥ श्रेष्ठ वर्हाड येत आहे असे जाणून वाद्यांचा घोष ऐकून स्वागती (स्वागत करण्यास जाणारी मंडळी) हत्ती, घोडे, रथ, पायदळ वगैरे सजवून वर्हाडास घेऊन येण्यासाठी निघाली. ॥ दो० ३०४ ॥ श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु |