॥ श्रीरामचरितमानस ॥

(मराठी अनुवाद)

॥ सुंदरकाण्ड ॥

॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

अध्याय ६ वा



Download mp3

प्रेमें यापरिं करित विचारा । येइ सपदिं या सागर-पारा ॥
येतां विभीषणा कपि पाहति । शत्रु-दूत कुणि विशेष जाणति ॥
त्या रोखुनि ते कपीश्वरप्रति । येउनि समाचार सब सांगति ॥
श्रुणु रघुराजा वदला सुग्रिव । ये दशकंठ-बंधु भेटीस्तव ॥
प्रभु वदले कीं सखे काय मत । ऐका नरपति कपीश सांगत ॥
निशिचर माया न ये कळोनी । कामरूप कां येइ धरोनी ॥
अपला भेद घेउं शठ आला । मम मत बांधुन ठेउं तयाला ॥
सखे ! नीति मत तुमचें उत्तम । शरणागत-भयहारी पण मम ॥
या प्रभुवचें हर्ष हनुमंता । शरणागत- वत्सल भगवंता ! ॥

दो :- शरणागतास जे त्यजिति निज अनहित मानून ॥
ते नर पामर पापमय हानि त्यांस देखून ॥ ४३ ॥

याप्रमाणे विचार करीत बिभीषण सागराच्या या तीराला येऊन पोहोचला सुद्धा. ॥ १ ॥ त्याला तेथेच थोपवून काही कपी कपीश्वराकडे आले व त्याला सर्व समाचार सांगितला. ॥ ३ ॥ मग रघुनाथाजवळ जाऊन सुग्रीव म्हणाला की, रघुराजा ऐका. दशकंठाचा भाऊ भेटण्यासाठी आला आहे. ॥ ४ ॥ प्रभू म्हणाले की सखे ! तुमचे काय मत आहे ? कपीश म्हणाला, हे पहा नरेश, निशाचरांची मया (कपट) कळून येत नाही. इच्छानुरूप रूप घेता येत असलेले हे रूप घेऊन कोण आणि का आला आहे कसे ओळखावे ? ॥ ५-६ ॥ आपला भेद घेण्यासठी तो शठ आला असला पाहिजे, म्हणून मला वाटते की बांधून ठेवावा. ॥ ७ ॥ मित्रा, तुम्ही जे राजनीतीनुसार सांगितलेत ते उत्तम आहे पण, शरणागताचे भय हरण करणे हे माझे ब्रीद आहे. ॥ ८ ॥ या प्रभू वचनाने हनुमंतास फार हर्ष झाला व तो मनात म्हणतो भगवंता ! तुम्ही खरेच शरणागत वत्सल आहांतच ! ॥ ९ ॥ प्रभू म्हणाले - आपले अकल्याण होईल असे समजून शरण आलेल्याचा त्याग करतात ते लोक नीच पापमय होत. त्यांच्या मुखावलोकनाने हानी होते. ॥ दो. ४३ ॥

कोटि विप्रवध पाप जया ही । येतांशरण न त्यजुं तया ही ॥
सम्मुख होइ जीव मम जेव्हां । जन्म कोटि अघ नासति तेव्हां ॥
सहज शील कीं हें पाप्यांचे । सदा वावडें मम भजनाचें ॥
दुष्ट हृदय सत्यच असता जर । मम सम्मुख येता तो का तर ॥
निर्मल मन जन तो मज पावे । मला कपट छल छिद्र न भावे ॥
भेद घेउं धाडी दशशीस हि । तरि न कांहिं भय हानि कपीशहि ॥
सखे ! निशाचर जगांत जितके । लक्ष्मण मारिल निमिषीं तितके ॥
शरण सभीत असे जर आला । प्राणां सम रक्षीन तयाला ॥

दो:- उभयपरीं त्या आणणें हसले कृपानिकेत ॥
जय कृपालु ! कपि चालले अंगद हनू समेत ॥ ४४ ॥

प्रभू ब्रीद - कोटी ब्रह्महत्येचे पाप केलेला सुद्धा जर मला शरण आला तर त्याचा सुद्धा मी त्याग करीत नाही. ॥ १ ॥ जीव जेव्हा माझ्यासमोर येतो त्याच क्षणी (माझ्या दर्शनाने) त्याच्या कोटी जन्मांची पापे नष्ट होतात. ॥ २ ॥ पाप्यांचा हा सहज स्वभाव असतो की त्यांना माझे भजन आवडत नाही. ॥ ३ ॥ तो जर खराच दुष्ट हृदयाचा असता तर तो माझ्यासमोर का आला असता ? ॥ ४ ॥ जो निर्मळ मनाचा असेल तोच माझ्यासमोर येऊ शकतो. मला कपट, छल, छिद्र व (दोष निंदादि) आवडत नाहीत. ॥ ५ ॥ दशाननाने भेद घेण्यासाठी पाठवला असला तरी हे कपीश ! काही हानी वा भय नाही. ॥ ६ ॥ कारण हे मित्रा ! या जगात जितके निशाचर आहेत तितके सर्व एकटा लक्ष्मण निमिषात मारून टाकील. ॥ ७ ॥ तो बिभीषण जर भयभीत होऊन शरण आला असेल तर मी त्याचे प्राणासमान रक्षण करीन. ॥ ८ ॥ कोणत्याही प्रकाराने त्यास घेऊन या (असे प्रभू म्हणाले) व कृपानिकेत हसले. जय कृपालु ! जय कृपालु ! असा घोष करीत कपी अंगद व हनुमान यांच्यासह त्याला आणण्यासाठी चालले. ॥ दो. ४४ ॥

सादर करुनि पुढें त्या वानर । चलति जिथें रघुपति करुणाकर ॥
दिसले दुरुनी दोघे भ्राते । नयनानंद दान जे दाते ॥
मग छविधाम राम जै पाहे । पक्ष्म न हालति थबकुन राहे ॥
भुज विशाल कंजारुण लोचन । श्यामल वपू प्रणत-भय मोचन ॥
सिंह अंस आयत उर शोभत । आनन अमित मदन-मन मोहत ॥
गात्रिं पुलक अति नयनीं नीर । बोले मृदु, मनिं धरुनी धीर ॥
नाथ ! दशमुखाचा मी भ्राता । निशिचरवंशिं जन्म सुरपाता ! ॥
सहज अघप्रिय तामस देह । जसा उलूकां तिमिरीं स्नेह ॥

दो :- प्रभु ! आलो ऐकुनि सुयश भव-भी-भंजन धीर ! ॥
त्राही त्राही आर्तिहर शरण-सुखद रघुवीर ॥ ४५ ॥

बिभीषणाला आदराने पुढे करून करुणासागर रघुपती जेथे आहेत तिकडे वानर चालले. ॥ १ ॥ त्याला दुरूनच नयनानंद दान देणारे ते दोघे भाऊ दिसले. ॥ २ ॥ मग त्याने छबिधाम रामचंद्रांकडे पाहिले आणि डोळ्यांच्या पापण्याही न लवता तो त्यांच्याकडे एकटक पहातच राहिला.. ॥ ३ ॥ विशाल बाहू, लाल कमळासारखे नेत्र, व श्याम वर्णाचे शरणागताचे भय दूर करणारे शरीर आहे. ॥ ४ ॥ सिंहासारखे (उंच व भरदार असे) विशाल खांदे आहेत, छातीही रूंद व शोभायमान आहे. मुख तर अनंत मदनांना मोहविणारे आहे. ॥ ५ ॥ असे ते मनोहारी रूप पाहून विभीषणाच्या अंगावर खूप रोमांच उठले व डोळ्यांत प्रेमाश्रू तरळले, पण मनात धीर धरून तो मृदु वाणीने बोलू लागला. ॥ ६ ॥ नाथ ! मी दशमुखाचा बंधू आहे. हे सुररक्षका ! मी निशाचर वंशात जन्मलो आहे. ॥ ७ ॥ जसा घुबडांना जात्याच अंधार आवडतो तसा हा माझा देह सहज पापप्रिय व तामस आहे. ॥ ८ ॥ तथापि हे धीर, प्रभू ! आपण भवभीतीभंजन करणारे आहात, तसे आपले सुमन ऐकून मी आपणास शरण आलो आहे. हे संकट हरण करणार्‍या, व शरणागतांना सुख देणार्‍या रघुवीरा ! माझे रक्षण करा, रक्षण करा. (असे म्हणून दंडवत नमस्कार घालू लागला). ॥ दो. ४५ ॥

वदुनि दंडवत करीत, देखुनि । उठति जवें प्रभु विशेष हर्षुनि ॥
श्रवुनि दीन वच प्रभुमनिं भरला । धरुनि विशाल भुजीं हृदिं धरला ॥
सानुज भेटुनि समीप बसविति । भक्तभीतिहर तया विचारिति ॥
वद लंकेश सहित परिवार हि । कुशल कुठायीं तुमचा वास हि ॥
खल मंडलिं दिनरात वसतसां । सखे धर्म निर्वाह तरि कसां ॥
मी जाणें तुमची सब रीती । अति नय निपुण, न रुचे अनीती ॥
भला वास नरकीं तरि ताता । दुष्टसंग देवो न विधाता ॥
पद बघुनीहि कुशल रघुराया । जैं जन जाणुनि करा तुम्हिं दया ॥

दो :- तोंवर जीवा कुशल नहि स्वप्निं मना विश्राम ॥
जों न राम भजतो त्यजुनि शोकधाम जो काम ॥ ४६ ॥

त्राही त्राही बोलत दंडवत करीत असलेला दिसला तेव्हा प्रभू वेगाने व विशेष हर्षित होऊन उठले. ॥ १ ॥ त्याचे दीन भाषण ऐकून तो प्रभूच्या मनात भरला (आवडला) व आपल्या विशाल बाहूंनी त्याला धरून, उचलून घेऊन हृदयाशी धरला. ॥ २ ॥ अनुजासह त्याला भेटून जवळ बसविला व भक्तभीतिहरण करणारे प्रभु त्यास विचारू लागले. ॥ ३ ॥ हे लंकेश ! कुत्सित - अपवित्र स्थळी परिवारासह तुमचा निवास होता तेव्हा परिवारासह तुमचे कशल सांग. ॥ ४ ॥ मित्रा ! तुम्ही रात्रंदिवस खलांच्या मंडलात (खलांनी घेरलेले) राहता तरी तुमच्या धर्माचा निभाव तेथे लागतो तरी कसा ? ॥ ५ ॥ मी तुमची सर्व रीत जाणतो, तुम्ही अतिशय नीतिनिपुण असून अनीती तुम्हाला आवडत नाही. ॥ ६ ॥ हे ताता ! नरकात वास करणे बरे पण विधात्याने दुर्जनांची संगती कोणाला देऊ नये. ॥ ७ ॥ हे रघुराया ! जेव्हा तुम्ही आपला सेवक (जन, दास) जाणून दया केलीत आणि आपल्या पायांचे दर्शन झाले तेव्हाच आता कुशल आहे. ॥ ८ ॥ जोपर्यंत शोकाचे धाम असा जो काम (कामना) त्यांचा त्याग करून जीव रामास भजत नाही, तोपर्यंत जीवाला कुशल नाही व स्वप्नातसुद्धा मनाला विश्राम नाही. ॥ दो. ४६ ॥

हृदयिं वसति खल नाना तोंवर । लोभ मोह मद मान नि मत्सर- ॥
जो हृदयिं वसति न रघुनायक । तूण कटीं धृत कार्मुक सायक ॥
ममता तरुण तमी अंधारी । द्वेष राग घुबडां सुखकारी ॥
तोंवर् जीवांचे मनिं राही । प्रभुचा प्रताप-रवि जों नाहीं ॥
अतां कुशल, भय भारि संपलें । बघुनि राम तुमचीं पद-कमलें ॥
तुम्हीं कृपाल जया अनुकूल । व्यापिति त्या न तीन भवशूल ॥
अती स्वभाव अधम, मी निशिचर । कृत न कधीं शुभ आचरणा तर ॥
मुनीध्यानिं यद्‍रूप न येतें । मज हृदिं धरती प्रभु हर्षें ते ॥

दो :- अहो भाग्य मम अमित, अति राम ! कृपा-सुखपुंज ॥
दिसले नयनिं विरंचि-शिव-सेव्य युगल पदकंज ॥ ४७ ॥

जोपर्यंत कमरेला भाता व हाती धनुष्यबाण घेतलेले रघुनायक हृदयात रहात नाहीत, तोपर्यंत लोभ, मोह, मद, मान, मत्सर इत्यादि अनेक खल हृदयात राहतात. ॥ १-२ ॥ द्वेष आसक्तिरूपी घुबडांना सुखकर वाटणारी ममतारूपी तरुण अंधारी रात्र तोपर्यंतच जीवाच्या मनात राहते जोवर प्रभूचा प्रतापरवी हृदयात उगवत नाही. ॥ ३-४ ॥ राम ! तुमची पदकमले पाहिल्याने माझे भारी भय गेले (समाप्त झाले) व आता मी कुशल आहे. ॥ ५ ॥ तुम्ही कृपाल ज्यावर प्रसन्न होता त्याला तीन भवशूल (काम-क्रोध-लोभ) व्यापीत नाहीत; बाधत नाहीत. ॥ ६ ॥ मी निशाचर, माझा स्वभाव अति अधम, व शुभ आचरण तर कधीच केलेले नाही. ॥ ७ ॥ तथापि ज्यांचे रूप मुनींच्या सुद्धा ध्यानात येत नाही, ते प्रभू मला हर्षाने हृदयाशी धरते झाले. ॥ ८ ॥ हे रामचंद्रा ! हे अति कृपापुंज ! सुखपुंज ! माझे भाग्य आश्चर्यकारक व अपरिमित आहे. कारण ब्रह्मदेव व शंकर ज्या पदकमलयुग्माची सेवा करतात ते मला या डोळ्यांनी दिसले ॥ दो. ४७ ॥

श्रुणु निज सांगूं स्वभाव सखया । जाणति भुशुंडिं शिव गिरितनया ॥
चराचरा द्रोही नर असुनी । येइ सभय मज शरण लक्षुनी ॥
त्यजुनि मोहमद विविध छलासी । सद्य साधुसम करतो त्यासी ॥
जननी जनक बंधु सुत नारी । तन धन भवन सुहृद परिवारी ॥
जी ममता ते धागे जमवुनि । वळुनि दोरी, मन मम पदिं जखडुनि ॥
समदर्शी इच्छा मुळिं नाहीं । हर्ष शोक भय मनिं नहि कांहीं ॥
हे सज्जन हृदिं वसति मम कसे । लोभी-हृदयीं वसे धन जसें ॥
संत समान तुम्हीं प्रिय मातें । प्रार्थुनि इतरिं न धरुं देहातें ॥

दो :- सगुणोपासक परहितीं निरत नीति दृढ नेम ॥
नर ते प्राणांसम मला द्विजपदिं ज्यांचे प्रेम ॥ ४८ ॥

मित्रा ! माझा स्वभाव सांगतो ऐक. तो भुशुंडी, शिव व पार्वती यांनी जाणला आहे. ॥ १ ॥ चराचराचा द्रोह करणारा मनुष्य असून जो मोह, मद व विविध छल इ. चा त्याग करून मलाच आश्रय जाणून भयभीत होऊन शरण येईल, त्याला मी ताबडतोब साधूसारखा करतो. ॥ २-३ ॥ माता-पिता, बंधू, पुत्र, नारी, देह, धन, घर, इष्टमित्र व परिवार यांच्यावर जी ममता असेल ते ममतेचे धागे काढून एकत्र करून त्यांची दोरी वळून जे आपल्या मनाला माझ्या पायाशी घट्ट बांधून ठेवतात; ॥ ४-५ ॥ जे समदर्शी झालेले असतात, इच्छा मुळीच नसते, हर्ष-शोक-भय इत्यादि नसतात; ॥ ६ ॥ असे ते सज्जन माझ्या हृदयात कसे राहतात माहित आहे का ? लोभी माणसाच्या हृदयात जसे धन रहावे तसे ! ॥ ७ ॥ तुमच्यासारखे संत मला इतके प्रिय असतात की इतरांनी प्रार्थना केल्या तरी मी देह धारण करीत नाही (पण तुमच्या सारख्यांनी विनविताच मी देह धारण करतो). ॥ ८ ॥ सगुणाचे उपासक, परहित करण्यात (सदैव) अत्यंत रत असणारे, नीतीनिरत, दृढनेम निरत, व ज्यांना ब्राह्मणचरणी प्रेम असते ते सर्व मला प्राणांसारखे प्रिय आहेत. ॥ दो. ४८ ॥

श्रुणु तुजमधिं सब गुण लंकापति । तुम्हीं त्यामुळें मजला प्रिय अति ॥
रामवचन ऐकुन कपि-यूथ । सकल वदति जय कृपा-वरुथ ॥
प्रभुवचनास बिभीषण ऐकत । तृप्त नव्हे, श्रवणामृत वाटत ॥
पद-अंबुज धृत वारंवारा । हृदयिं राहि ना प्रीति अपारा ॥
ऐका देव अगजगत् स्वामी । प्रणतपाल हृदयांतर्यामी ॥
पूर्वि अल्प, इच्छा राहिली । प्रभुपद-प्रीति सरित वाहिली ॥
अतां स्वभक्ति कृपाल पावनी । द्यावि सदा शिव-मन-भावनी ॥
प्रभु तथास्तु वदुनी रणधीर । मागति सपदिं सिंधुचें नीर ॥
यदपि सखे तव इच्छा नाहीं । जगिं दर्शन मम अमोघ पाही ॥
तया राम कृपतिलका करती । अमित सुमन नभिं देव वर्षति ॥

दो :- रावण-कोप कृशानु, निज दिधलें श्वास समीर, प्रचंड ।
जळत बिभीषण राखिला दिधलें राज्य अखंड ॥ ४९ रा ॥
जी संपत् शिव रावणा देति देत दश-माथ ॥
बिभीषणा ती भूति दे संकोचें रघुनाथ ॥ ४९ म ॥

हे लंकापती, ऐक ! तुझ्यामध्ये हे सर्व संत गुण आहेत. त्यामुळे तुम्ही मला अतिशय प्रिय आहात. ॥ १ ॥ रामवचन ऐकून सर्व वानरयूध ’जयकृपावरूथ’ अशा घोषणा देऊं लागले. ॥ २ ॥ बिभीषणाने प्रभूचे वचन ऐकले व ते त्यास श्रवणामृत वाटले म्हणून त्याची वृत्ती होईना. ॥ ३ ॥ बिभीषणाने वारंवार प्रभूचे चरणकमल धरले व अपार प्रीती हृदयात मावेना. ॥ ४ ॥ स्वाती नक्षत्र स्तुती - तेव्हा म्हणाला - हे देवा, स्थावरजंगमांच्या स्वामी ! ऐका. आपण प्रणतांचे पालन करणारे, हृदयांत अंतर्यामी रूपाने आहातच. ॥ ५ ॥ प्रभू चरणांची प्रीती पूर्वी अगदी अल्प होती त्यामुळे तेवढी इच्छा राहिली होती पण आता प्रभुचरण प्रीतीची सरिताच वाहू लागली. ॥ ६ ॥ आता हे कृपालु ! शंकरांच्या मनाला सदैव भावणारी अशी आपली पावन भक्ति आपण मला द्यावी. याशिवाय दुसरे काहीही मला नको. ॥ ७ ॥ प्रभूंनी त्यावर लगेच तथास्तु म्हटले व रणधीर रघुवीरांनी सागराचे जल ताबडतोब मागवले. ॥ ८ ॥ हे मित्रा ! तुला जरी कसलीही इच्छा नाही, तरी या जगात माझे दर्शन अमोघ (निष्फळ न ठरणारे) असते. ॥ ९ ॥ असे म्हणून रामचंद्रांनी त्यास राजतिलक (लंका राज्याभिषेक) केला. ॥ १० ॥ रावणाचा क्रोध हा अग्नि व त्याचा स्वतःचा श्वास हा सोसाट्याचा वारा, त्यामुळे तो अग्नि प्रचंड होऊन बिभीषण त्यात जळत होता, पण रघुवीराने त्याला राखला (शीतल केला) व त्यास अखंड राज्य दिले. ॥ दो. ४९ रा ॥ रावणाने आपली दहा मस्तके शिवाला वाहिल्यावर शिवाने रावणाला जी संपत्ती दिली, तीच संपत्ती (ऐश्वर्य वा वैभव) रघुनाथाने बिभीषणास संकोचाने दिली (अगदीच थोडे व सध्या प्रतिकात्मक दिले याबद्दल संकोच वाटला). ॥ दो. ४९ म ॥

त्यजुनि असा प्रभु भजती आना । ते नर पशु विण पुच्छ-विषाणा ॥
निज जन जाणुनि केला अपला । कपिनां प्रभुचा स्वभाव रुचला ॥
मम सर्वज्ञ सर्व-उर-वासी । सर्व रूप सब रहित उदासी ॥
वदति वचन नीति-प्रतिपालक । कारणमनुज दनुजकुलघातक ॥
श्रुणु कपीश वीर हि लंकापति । तरणें केविं गभीर अपांपति ॥
संकुल उरग मकर झष नाना । अति अगाध अति दुस्तर जाणा ॥
मग लंकेश वदे रघुनायक । कोटि सिंधु शोषक तव सायक ॥
तरी नीतिचें असें सांगणें । कीं जाउन सागरा प्रार्थणें ॥

दो :- प्रभु तुमचा कुलगुरु जलधि चिंतुनि कथिल उपाय ॥
अनायास कपि भल्ल चमु सागर तरुन जाय ॥ ५० ॥

असा प्रभू सोडून जे इतरांस भजतात ते नरपशू होत; त्यांना पुच्छ व शिंगे नाहीत इतकेच ! ॥ १ ॥ आपला भक्त आहे हे जाणून बिभीषणाला आपला केला हा प्रभूचा स्वभाव सर्व कपींना आवडला. ॥ २ ॥ सागर निग्रहकथा - मग सर्व जाणणारे, सर्वांच्या हृदयात, निवास करणारे, सर्व विश्व ज्यांचे रूप आहे, असे सर्वरूप, सर्व रहित, उदासीन प्रभु नीती प्रतिपालक वचन बोलले. कारण ते मायामनुष्य असून दानवकुलाचा विनाश करणारे आहेत. ॥ ३-४ ॥ हे वीर कपीश ! आणि हे वीर लंकापती ! ऐका - हा अगाध सागर कसा तरावा ! ॥ ५ ॥ हा सर्प, मगरी व अनेक प्रकारचे मासे यांनी भरलेला असून अति अगाध व तरून जाण्यास कठीण आहे. ॥ ६ ॥ मग (सुग्रीव वगैरे कोणी काही बोलत नाही असे पाहून) लंकेश बिभीषण म्हणाला, हे रघुनायका ! तुमचा बाण कोट्यवधी सागरांना क्षणात सुकवून टाकील. ॥ ७ ॥ पण तरी सुद्धा नीती असे सांगते की सागराजवळ जाऊन त्याला प्रार्थना करावी. ॥ ८ ॥ कारण हे प्रभू ! सागर तुमचा कुलगुरु पूर्वज आहे, तो विचार करून काहीतरी उपाय सांगेल व आयास न पडता सर्व कपी व ऋक्ष सेना सहज सागर तरून जाईल. ॥ दो. ५० ॥

कथित सखे चांगल्या उपाया । करू होइ जर दैव सहाया ॥
लक्ष्मणास हा मंत्र न भावे । रामवचें अति दुःखा पावे ॥
नाथ ! कोण तो दैव-भरोसा । सिंधु शोषणें आणुनि रोषा ॥
दैवचि गति कीं भ्याड मनाची । दैव दैव ओरड अलसांची ॥
परिसत हसुनि वदति रघुवीर । करूं असेंच मनिं धरणे धीर ॥
प्रभु अनुजा यापरिं समजाउनि । सिंधुनिकट रघुराजा जाउनि ॥
प्रथम नमन केलें शिर नमुनी । मग बसले तटिं दर्भ पसरुनी ॥
येइ बिभीषण जैं प्रभुपासीं । पाठिं धाडि रावण हेरासी ॥

दो :- सकल चरित बघती ते धरुनि कपट-कपि-देह ॥
प्रभुगुण हृदिं वाखाणती प्रणतावरती स्नेह ॥ ५१ ॥

राम म्हणाले मित्रा ! तुम्ही चांगला उपाय सांगितलात. दैवाने साथ दिली तर हेही आपले कार्य सिद्ध होईल. ॥ १ ॥ हा मंत्र लक्ष्मणाला आवडला नाही व राम वचनाने त्यास अति दुःख झाले. ॥ २ ॥ नाथ ! दैवाचा भरंवसा कोण देतो ? रोष आणून सागर शोषून टाकावा (बस्स !). ॥ ३ ॥ भ्याड्यांच्या मनाला एक दैवाचाच आधार असतो, आळशी लोकच नेहमी दैव दैव म्हणून ओरडत असतात. ॥ ४ ॥ हे ऐकताच हसून रघुवीर म्हणाले हो हो, असेच करू पण जरा धीर धरा. ॥ ५ ॥ याप्रमाणे प्रभूंनी धाकट्या भावाची समजूत काढली व रघुराज सागराच्या जवळ गेले. ॥ ६ ॥ प्रथम मस्तक नमवून नमस्कार केला, व मग तटावर दर्भ पसरून त्यावर प्रार्थना करीत बसले. ? ॥ ७ ॥ विभीषण प्रभूंकडे आला तेव्हा त्या पाठोपाठ रावणाने हेरांना पाठविले. ॥ ८ ॥ कपटाने कपिदेह धारण करून त्यांनी सगळे चरित्र अवलोकन केले व ते प्रभु गुण (विशेषतः) शरणागतावरील स्नेह हृदयात वाखाणू लागले. ॥ दो. ५१ ॥

* * * * *

श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु

GO TOP