॥ श्रीरामचरितमानस ॥

(मराठी अनुवाद)

॥ बालकाण्ड ॥

अध्याय २८ वा

॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥


Download mp3

नृपभुजबल विधु शिवधनु राहू । गुरु कठोर ठाउक सर्वां हूं! ॥
भारि महाभट बाण नि रावण । गत चुपचाप बघोनि शरासन ॥
त्या कठोर पुररिपु कोदंडा । राज समाजिं आज करि खंडा ॥
त्रिभुवन-जयासहित वैदेही । त्या विचारविण वरिल हटें ही ॥
पणें सकल भूपाल लोभले । भट मानी मनिं फार रोषले ॥
त्वेषें उठले परिकर कसुनी । जाति इष्ट देवां शिर नमुनी ॥
क्रोधें बघति धरिति धनु लक्षुनि । न ढळे बहुबळ करतां कुंथुनि ॥
ज्यांस विचार जरासा चित्तीं । चाप समीप महीप न जाती ॥

दो० :- त्वेषें जड़ नृप धरिति धनु न हले लज्जित जाति ॥
जणुं पावुनि भट-बाहुबल अधिक अधिक जडताऽति ॥ २५० ॥

राजांचे बाहूबल हा चंद्र असून शिवाचे धनुष्य राहू आहे, सर्वांना माहीत आहे की ते धनुष्य अवजड व कठोर आहे हं ! ॥ १ ॥ बाण, बाणासुर व रावण हे भारी महाभट सुध्दा त्या धनुष्याला पाहून गुपचूपपणे निघून गेले ॥ २ ॥ पुररिपुच्या त्या कठिण कोदंडाला आज राजसमाजात जो मोडील, त्याला कोणताही विचार न करता, त्रिभुवनाच्या जयासहित वैदेही हट्टाने वरीलच ॥ ३-४ ॥ पण ऐकून सर्व भूपालांना लोभ सुटला व जे स्वत:स वीर मानणार होते त्यांना तर मनात फार रोष आला ॥ ५ ॥ (हे दोन्ही प्रकारचे भट मानी) कासोटे मारून त्वेषाने उठले व आपापल्या इष्ट देवतेला मस्तक नमवून धनुष्याजवळ चालले ॥ ६ ॥ क्रोधाने धनुष्याकडे बघून व कुठे धरावे हे लक्षात आणून धनुष्याला (एका मागून एक) धरु लागले व पुष्कळ कुंथून जोर करु लागले तरी ते जरा सुध्दा हलेना ॥ ७ ॥ ज्यांच्या चित्तात थोडा तरी विचार आहे ते महीप धनुष्याजवळ जातच नाहीत ॥ ८ ॥ मूर्ख राजे त्या धनुष्याला त्वेषाने धरुं लागले पण ते हलत सुध्दा नाही (असे कळताच) लज्जित होऊन परत वळूं लागले जणूं काय भटांचे बाहूबल मिळून त्याची जडता अधिकच वाढत चालली. ॥ दो० २५० ॥

एकदांच दशसहस्त्र नृपती । लागति उचलुं, न हले हलवती ॥
शंभु-सरासन डगे न कैसे । कामीवचनिं सती मन जैसें ॥
पात्र सकल नृप उपहासासी । जेविं विराग विना संन्यासी ॥
कीर्ती विजय वीरता भारी । हटें हरुनि गत धनुकरिं सारीं ॥
श्रीहत राजे हृदयीं हरले । जाउनि निज निज समाजिं बसले ॥
पाहुनि नृपां जनक घाबरले । वदति शब्द जणुं रोषें भरले ॥
द्वीपा-द्वीपाचे नृपती-गण । आले परिसुनि कृत जो मी पण ॥
सुर दानव मानव-वपुधारी । आले वीर धीर रणिं भारी ॥

दो० :- कुमरि मनोहर जय महा कीर्ति परम कमनीय ॥
मिळविणार जणुं विरंचि न विरची धनु-दमनीय ॥ २५१ ॥

दहा हजार राजे एकाच वेळी ते धनुष्य उचलूं लागले हलविण्याचा खूप प्रयत्‍न्न करुन ते जागचे जरा सुद्धा हलले नाही ॥ १ ॥ कामी पुरुषाच्या बोलण्याने जसे सतीचे मन विचलित होत नाही तसे ते शिवधनुष्य जरा सुध्दा ढळले नाही ॥ २ ॥ वैराग्य नसलेले संन्यासी जसे उपहासास पात्र होतात तसे ते सर्व राजे चेष्टेस पात्र झाले ॥ ३ ॥ भारी कीर्ती, भारी विजय व भारी वीरता इत्यादी धनुष्याच्या हाती जाणून बुजुन हट्टाने हरवून सर्व राजे तेथून परतले ॥ ४ ॥ हृदयात हार खाऊन ते सर्व राजे तेजोहीन झाले व जेथे आपापला समाज होता तेथे जाऊन बसले ॥ ५ ॥ नृपांना पाहून जनक घाबरले व जणू रोषाने भरलेले शब्द बोलू लागले ॥ ६ ॥ प्रत्येक द्वीपद्वीपातून आम्ही केलेला पण ऐकून अनेक नृपांचे समुदाय आले ॥ ७ ॥ मोठमोठे रणधीर देव – दानव वीरही मानव रुप घेऊन आले आहेत. ॥ ८ ॥ मनोहर राजकुमारी, महाविजय व अत्यंत वांछनीय सुंदर कीर्ती मिळविणारा धनुष्याचे दमन करण्यास समर्थ (असा कोणी वीर) विरंचीने विरचिलाच नाही असे वाटते. ॥ दो० २५१ ॥

वदा लाभ हा कुणा न रुचला । कुणि शंकर-धनु-गुण न लावला ॥
करणें सज्ज मोडणें राहो । नुचलां जमिनीवरुन जरा हो! ॥
अतां न मद भट-मानी धरणें । वीर-विहीन मही मी जाणें ॥
त्यजा आस जा निज ठावां, हा! । विधि न लिही वैदेहि-विवाहा ॥
सुकृत-हानि जर पणास परिहरुं । राहो कुमरि कुंवारि काय करु ॥
भट-विहीन जर मही जाणतों । पण करुन न उपहास पावतों ॥
जनकवचन परिसुन नरनारी । बघुन जानकिस, विषण्ण भारी ॥
रोष लक्ष्मणा भृकुटी चढती । नेत्र रुषारुण ओठ फडकती ॥

दो० :- वदुं न शकति रघुवीर भय लागति वच जणुं बाण ॥
नमुनि रामपद-कमलिं शिर वदले गिरा प्रमाण ॥ २५२ ॥

कोणीही शिवधनुष्याला दोरी सुद्धा लावली नाही (तेव्हा) हा लाभ कोणालाच रुचला नाही की काय ते सांगा ॥ १ ॥ अहो ! सज्ज करणे व मोडणे तर राहोच पण जमिनीपासून जरासुद्धा हे धनुष्य कोणी उचलले नाही ॥ २ ॥ मी वीर असा अभिमान वाटत असेल त्याने यापुढे तो गर्व धरु नये कारण सर्व पृथ्वी आता वीरविहीन आहे हे मी जाणले आहे ॥ ३ ॥ (आता) आशा सोडा व आपापल्या घरीं जा कसे ! हाय रे दैवा ! विधीने वैदेहीच्या नशिबात विवाह लिहीलाच नाही ॥ ४ ॥ पणाचा त्याग करावा तर (सर्व) सुकृताचा नाश होईल म्हणून मुलगी कुंवारी राहणार असेल तर राहो, त्याला मी तरी काय करु ॥ ५ ॥ मही भटवीरविहीन आहे हे जर मला पूर्वीच कळले असते तर हा पण करुन मी ‘ उपहास – पात्र ’ ठरलो नसतो ॥ ६ ॥ जनकाचे हे भाषण ऐकून नर- नारींनी जानकीकडे पाहीले व त्यांना फार फार दु:ख झाले ॥ ७ ॥ लक्ष्मणाला रोष आला त्यांच्या भिवया चढल्या डोळे रागाने लालीलाल झाले व ओठ थरथरुं लागले ॥ ८ ॥ ते जनकाचे शब्द जणूं बाणासारखे लागले, पण रघुवीराच्या धाकामुळे (जनकास) काही बोलता येणे अशक्य झाले (तेव्हा) रामपदकमलांना नमन करुन प्रमाणभूत वचन लक्ष्मण बोलले. ॥ दो० २५२ ॥

जिथें असेल कुणी रघुवंशी । त्या समाजिं कुणि असें न भाषी ॥
जनक जसे वच अनुचित वदले । जाणुनि रघुकुलमणि बासलेले ॥
पहा! भानुकुल-पंकज-भानू । वदें स्वभाव न लव अभिमानू ॥
जर आज्ञा आपली पावतो । कंदुकसें ब्रह्मांड उठवतो ॥
कच्चा घटसे टाकिन फोडुन । मेरु मुळ्यासम देइन मोडुन ॥
भगवन्! प्रताप महिमा तव तर । कोण बिचारें पिनाक जर्जर ॥
म्हणुन नाथ! मज आज्ञा देणें । कौतुक करतो सुखें पाहणें ॥
कमलनालसम सज्य शरासन । घेउन धावुं सत्य शत योजन ॥

दो० :- मोडिन-छत्रक-दंडसे त्वत्प्रताप-बल नाथ! ॥
जर न घडे, प्रभुपदशपथ धरिति न धनुशर हात ॥ २५३ ॥

जिथे रघुवंशातील कोणी (पुरुष, व्यक्ती) असेल त्या समाजात असे कोणीही बोलणार नाही - जसे, रघुकुलमणी येथे बसलेले आहेत हे जाणून सुद्धा जनक अनुचित वचन बोलले. ॥ १-२ ॥ भानुकुलरुपी कमलास प्रफुल्ल करणार्‍या भानू ! हे पहा की मी लवमात्र अभिमानाने बोलत नसून स्वभाव सांगतो ॥ ३ ॥ आपली परवानगी असेल तर सारे ब्रह्मांड मी चेंडूसारखे उचलतो ॥ ४ ॥ (सर्व ब्रह्मांड) कच्च्या मडक्यासारखे फोडून टाकीन, (फार काय) मेरु पर्वत मुळ्यासारखा मोडून (तुकडे तुमच्या हातात) देईन ॥ ५ ॥ पण भगवंता ! हा तर आपल्या प्रतापाचाच महिमा, (मग) हे जुने जर्जर झालेले पिनाक ते कोण ! ॥ ६ ॥ म्हणून नाथ ! हे जाणून मला आज्ञा द्यावी व मी एक मजा करतो ती पहावी ॥ ७ ॥ कमळाच्या देठासारखी त्या धनुष्याला दोरी लावून उचलून घेऊन शंभर योजने दूर पर्यत धावत जातो. ॥ ८ ॥ नाथ ! तुमच्या प्रतापाच्या बळाने ते धनुष्य कावळ्याच्या छत्रीच्या दांड्यासारखे मोडीन, हे जर घडले नाही तर हे हात पुन्हा धनुष्यबाण हातात घेणार नाहीत ! ॥ दो०२५३ ॥

जैं लक्ष्मण वच सकोप वदले । कंपित महि दिक्करी डोलले ॥
लोक सकल नृप भयें गांजले । सिते हर्ष हदिं, जनक लाजले ॥
गुरु रघुपति मुनिगण मनिं सगळे । मुदित, देह बहुवार पुलकले ॥
रघुपति अनुजा खुणें निवारिति । प्रेमानें निज समीप बसविति ॥
विश्वामित्र समय शुभ जाणति । अती स्नेहमय वचनें सांगति ॥
उठा राम भंगा भवचापा । वारा तात ! जनक-परितापा ॥
परिसुनि गुरुवच पदिं शिर नमलें । हर्षविषाद न मनास शिवले ॥
उभे स्वभावें सहजचि राहति । लाजवि ढब नव मृग-राजाप्रति ॥

दो० :- उदति उदयगिरि-मंचकीं रघुवर बाल-पतंग ॥
विकसित संत सरोज सब हर्षित लोचन भृंग ॥ २५४ ॥

जेव्हा लक्ष्मण (असे) क्रोधाने बोलले तेव्हा भूमी कंपायमान झाली व दिग्गज डोलूं लागले ॥ १ ॥ सगळे लोक व राजे भयाने ग्रस्त झाले. सीतेला हृदयात हर्ष झाला व जनक लाजले (खजिल झाले) ॥ २ ॥ गुरु - विश्वामित्र, राम व सगळे मुनीवृंद मनात प्रमुदित झाले व त्यांचे देह वारंवार रोमांचित होऊ लागले ॥ ३ ॥ रघुपतींनी अनुजाला खुणेने आणखी बोलण्यापासून परावृत्त केले व प्रेमाने आपल्या जवळ बसविले. ॥ ४ ॥ शुभ (योग्य) वेळ आहे हे विश्वामित्राने जाणले व अत्यंत स्नेहमय शब्दांनी सांगीतले . ॥ ५ ॥ राम ! उठा पाहू, भवचापाचा भंग करा व तात ! जनकाचा परिताप दूर करा. ॥ ६ ॥ गुरुचे वचन ऐकून त्यांच्या पायावर मस्तक नमले, पण मनाला हर्ष वा खेद यांचा स्पर्श सुध्दा झाला नाही. ॥ ७ ॥ (राम) आपल्या स्वभावानुसार सहज उठून उभे राहीले, पण त्या उठण्याच्या ढबीने तरूण मृगराज सिंहालाही लाजविले ॥ ८ ॥ रघुवर रुपी बालसूर्य मंचरुपी उदयगिरीवर उदय पावताच सर्व संत रुपी सरोजे फुलली - उमलली, व सर्व लोचनरुपी भृंग हर्षित झाले ॥ दो० २५४ ॥

भूपति-आशा निशा संपली । वाङ्‌नक्षत्रावली लोपली ॥
मानी महीप कुमुदें मिटलीं । कपटी भूप उलूकें लपलीं ॥
सोडी शोक कोक मुनि-देवां । वर्षति पुष्पें प्रगटति सेवा ॥
वंदुनि गुरुपद अनुरागें अति । राम मुनींची आज्ञा मागति ॥
सहज जाति सब जगती-स्वामी । मत्त-मंजु वा-कुंजर-गामी ॥
जात राम सब पुर नारी नर । पुलक पूर्ण वपु होति सुखाकर ॥
स्मरुनि सुकृत वंदुनि सुर पितरां । जर निज पुण्यां प्रभाव किं जरा ॥
तर शिवचाप समान मृणाला । तोडो राम देव! गणपाला! ॥

दो० :- प्रेमें रामा निरखुनी सखिंस निकट घेऊन ॥
सीता माता स्नेहवश वदे खिन्न होऊन ॥ २५५ ॥

भूपतींची आशारुपी रात्र संपली, त्यांची बडबड नक्षत्रे मावळली ॥ १ ॥ मानी राजेरुपी रात्रविकासी कमले कोमेजली आणि कपटी भूपरूपी घुबडे लपली ॥ २ ॥ मुनी व देवरुपी चक्रवाकांना शोक सोडून गेला व देवांनी पुष्पवृष्टी करुन आपली सेवा प्रगट केली ॥ ३ ॥ गुरूचरणांना अत्यंत प्रेमाने वंदन करुन रामचंद्रांनी मुनीवृंदाची आज्ञा मागितली. ॥ ४ ॥ समस्त जगताचे स्वामी सहज निघाले व सुंदर श्रेष्ठ मत्त हत्तीसारखे चालू लागले ॥ ५ ॥ राम चालू लागताच सर्व पुरनर नारींचे देह रोमांचांनी डवरले व सर्व लोक फार सुखी झाले ॥ ६ ॥ देवांना व पितरांना वंदन करुन (पुरनरनारींनी) आपापले पुण्य व प्रार्थना केली की आमच्या पुण्याच्या जरासा प्रभाव जर असेल तर हे गणेशा, देवा ! राम शिवधनुष्य कमल नाला प्रमाणे (सहजी) तोडोत ॥ ७-८ ॥ रामचंद्रांना प्रेमाने निरखून पाहून व आपल्या सखींना जवळ बोलावून सीतेची माता स्नेहवश झाल्याने खिन्न होऊन म्हणाली - ॥ दो०२५५ ॥

सखि सगळे कौतुक बघणारे । जे हितेच्छु अमचे म्हणणारे ॥
कोणिहि समजावी गुरुला ना । बालक हे! हा हट्ट भला ना ॥
रावण बाण न शिवले चापा । सब नृप हरले दावुनि दर्पा ॥
तें धनु राजकुमर करिं देत किं । बाल मराल मंदरा घेत किं ॥
नृपशहाणपण सरलें सगळें । सखि! विधिगति कांहींही नकळे ॥
बोले चतुरसखी मृदु-वाणीं । तेजवंत लघु गणां न राणी! ॥
कुंभज कोठें अपार सागर । शोषित, सुयश सकलही जगभर ॥
रविमंडल बघतां लघु वाटे । उगवे तैं त्रिभुवन-तम आटे ॥

दो० :- मंत्र परम लघु ज्यास वश विधि हरि हर सुर सर्व ॥
महामत्त गजपतिस ही वश करिं अंकुश खर्व ॥ २५६ ॥

हे सखे ! जे कोणी आमचे हितचिंतक म्हणविणारे आहेत ना ते सारे (दुरुन) मजा पाहणारे आहेत ! ॥ १ ॥ कारण कोणी एक जण सुध्दा त्या गुरुला समजावून सांगत नाही की हे राम बालक आहेत (तेव्हा त्यांना हे अवजड धनुष्य तोडण्याची आज्ञा देणे) हा हट्ट चांगला नाही ॥ २ ॥ रावण व बाणासुर यांनी ज्या धनुष्याला हात लावला नाही - व सर्व राजे दर्प घमेंड दाखवून शेवटी हरले ॥ ३ ॥ सखी, तेच धनुष्य राजकुमाराच्या हाती देत आहेत ! हंसाच्या पिलाने कधी मंदर पर्वत (शिरावर) घेतला आहे काय ? ॥ ४ ॥ आमच्या राजांचे सगळे शहाणपण संपले आहेसे वाटते, सखी ! विधिगती काय आहे काहीच कळत नाही ॥ ५ ॥ हे ऐकून चतुर सखी कोमल वाणीने म्हणाली ‘ राणीसाहेब ’ तेजस्वी पुरुषांना लहान समजूं नका, बरं ! ॥ ६ ॥ एवढेसे बुटके कुंभज (अगस्ती) कोठे व तो अपार सागर कुठे ! पण टाकला ना शुष्क करुन आणि सगळ्या जगभर सुयश पसरले ना ! ॥ ७ ॥ रविबिंब दिसण्यास किती लहान दिसते पण उगवल्याबरोबर त्रिभुवनातला अंधार नाहीसा होतो की नाही ? ॥ ८ ॥ मंत्र अतिशय छोटाच असतो पण ब्रह्मा, विष्णू, महेश व सर्व देव त्याला वश होतात. महामत्त गजराजाला इवलासा अंकुश वश करतो ॥ दो० २५६ ॥

काम कुसुम-धनु-सायक धरतो । भुवन निकाया निज वश करतो ॥
देवि! म्हणुन संशय सोडावे । राम मोडतिल चाप पहावें ॥
ये सखिवच परिसुनी प्रतीती । गत विषाद अति वाढे प्रीती ॥
तैं वैदेहि बघुनि रामाला । सभय हृदयिं विनवी ज्या त्याला ॥
प्रार्थी मनिं अति हो‍उनि विकला । व्हा प्रसन्न शिव-भवानि मजला ॥
आज सुफल निज भजना करणें । स्नेह करुनि धनु-जडत्व हरणें ॥
गणनायक वरदायक देवा । आजवरी केली तव सेवा ॥
कितिदां कृत मम विनति मनिं धरा । कार्मुक-गुरुता स्वल्प अति करा ॥

दो० :- बघुनि बघुनि रघुवीर तनु प्रार्थि सुरांस सधीर ॥
भरे प्रेमजल विलोचनिं भरलें पुलकिं शरीर ॥ २५७ ॥

कामदेव (मदन) फुलांचे गुच्छ नि फुलांचे बाण धारण करतो पण भुवन समूहाला आपल्या वश करतो. ॥ १ ॥ म्हणून हे विचारात घेऊन हे देवी ! आपण सर्व संशय सोडावे व राम धनुष्य मोडतील ते पहावे (लवकरच पहाल) ॥ २ ॥ सखीचे वचन ऐकून विश्वास वाटला, सर्व विषाद गेला व प्रीती अत्यंत वाढली ॥ ३ ॥ (मत्त मंजुवर कुंजर गामी राम चालू लागले) तेव्हा रामाला पाहून वैदेही हृदयात भयभीत होऊन ज्या त्या देव - देवतांना विनवूं लागली ॥ ४ ॥ ती अती व्याकुळ होऊन मनात प्रार्थना करते की हे शंकरा ! हे भवानी ! तुम्ही मला प्रसन्न व्हा ॥ ५ ॥ आजपर्यंत आपले जे काही भजन - पूजनादी केले असेल ते आज सुफल करावे (म्हणजेच) माझ्यावर स्नेह करून धनुष्याचा जडपणा नाहीसा करावा ॥ ६ ॥ हे वरद विनायका ! देवा ! आजपर्यंत मी तुमची भजन - पूजनादी सेवा केली ॥ ७ ॥ मी वारंवार केलेली प्रार्थना मनावर घेऊन धनुष्याची जडता व विशालता (गुरुत्व) अगदी स्वल्प करुन टाका ॥ ८ ॥ वारंवार रघुवीराच्या (कोमल) तनूकडे पाहून धीर धरुन सीता देवांना प्रार्थना करीत आहे, तिचे डोळे प्रेमाश्रूंनी भरले असून शरीर रोमांचांनी फुलले आहे ॥ दो० २५७ ॥

निरखुनि नीट नयनभर शोभे । स्मरुनि तातपण मन विक्षोभे ॥
अहह! तात! हट दारुण हा पण । लाभ हानि समजां ना आपण ॥
सचिव सभय, त्यां नहि उपदेशित । बुध समाजिं घडतें अति अनुचित ॥
कुठें धनू अति कुलिश-कठोर । कुठें श्याम मृदुगात्र किशोर ॥
हे विधि केविं मनीं धरुं धीरा । शिरिष-सुमन आणि वेधिल हीरां? ॥
सकल-सभा-मति एवीं भ्रमतां । शंभुचाप! गति तूंचि मम अतां ॥
निज जडता लोकांवर टाकुनि । धर लघुता रघुपती न्यहाळुनि ॥
सीतेच्या परिताप मनीं अति । लव निमेष युगशतसम लोटति ॥

दो० :- प्रभुस बघुन मग पाहि महिं राजति लोचन लोल ॥
खेळति मनसिज मीन युग जणुं विधुमंडल दोल ॥ २५८ ॥

रामाच्या शोभेला नखशिखान्त डोळे भरुन निरखून पाहताच वडिलांच्या पणाची आठवण होऊन मन भयचिंताकुल झाले ॥ १ ॥ अरेरे ! बाबा ! किती भयानक हट्ट व हा पण ! तुम्हाला काही लाभ - हानी समजत नाही कां ? ॥ २ ॥ सचिव सुध्दा भित्रेपणा मुळे त्यांची समजूत घालीत नाहीत ! शहाण्यांच्या समाजात हे अगदी अनुचित घडत आहे. (हाय रे दैवा ! मी आता काय करूं ?) ॥ ३ ॥ वज्रापेक्षाही अत्यंत कठोर असे ते धनुष्य कुठे अन् कोमल श्यामल गात्र हे किशोर कुठे ? ॥ ४ ॥ हे विधे ! मी आता मनांत धीर तरी कसा धरूं ? शिरीष कुसुमाच्या पाकळीच्या अग्राने हिर्‍याला छिद्र पाडता येईल कां ? ॥ ५ ॥ हे शंभुचापा ! सगळ्या सभेची बुध्दी अशी झाली असता आता मला तुझ्या वाचून दुसरी गती नाही ॥ ६ ॥ आपली जडता या लोकांवर टाकून व रघुपतीला न्याहाळून तू हलका हो ॥ ७ ॥ (याप्रमाणे) सीतेच्या मनात अत्यंत परिताप झाला आहे व एकेक लवनिमेष शंभर युगांप्रमाणे जात आहे ॥ ८ ॥ सीता एकदा प्रभूकडे बघते व लगेच जमिनीकडे खाली बघते, (त्यावेळी) तिचे चंचल लोचन कसे विराजतात पहा - जणू काय कामदेवाचे दोन मासे चंद्रमंडलरुपी हिंदोळ्यावर खेळत आहेत ॥ दो० २५८ ॥

वाग्‌भ्रमरिस मुखपंकज कोंडत । निरखुनि लाज-निशे ना प्रगटत ॥
लोचनकोनिं राहि जल-लोचन । जसें परम कृपणाचें कांचन ॥
लाजे अति विकलते बघोनी । धरि विश्वासा धीर धरोनी ॥
मम पण तन मन वचनिं सत्य अति । रघुपतिपदसरसिजीं चित्तरति ॥
तर भगवंत सकल उरवासी । करितिल मजला रघुवर दासी ॥
खरा ज्यावरी ज्याचा स्नेहो । मिळे तया तें नहि संदेहो ॥
बघुनि प्रभुकडे प्रेमपणा करि । जाणति राम कृपानिधि अंतरिं ॥
सीते बघुनि बघति धनु कैसें । गरुड बघे व्याला लघु जैसें ॥

दो० :- बंधु लक्षि रघुवंशमणि निरखिंति हर-कोदंड ॥
पुलकित-तनु वदले वचन पदिं दाबुनि विध्यंड ॥ २५९ ॥

वाणीरुपी भ्रमरीला मुखरुपी कमलाने कोंडून ठेवली आहे व लाजरूपी रात्रीला पाहून ती प्रगट होत नाही ॥ १ ॥ अत्यंत कृपणाचे सोने जसे कानाकोपर्‍यात गुप्त असते तसे डोळ्यातील अश्रू डोळ्यांच्या कोपर्‍यातच राहीले आहेत ॥ २ ॥ सीता स्वत:ची अती व्याकुळता पाहून लाजली व धीर धरून (धनुष्यभंग करतील असा) विश्वास धरला ॥ ३ ॥ जर माझा पण शरीर - मन - वाणीने सत्य असेल व माझे चित्त रघुपतीच्या चरण सरोजांवर आसक्त असेल तर सर्वांच्या हृदयात वास करणारे भगवान मला रघुवर - दासी करतील ॥ ४-५ ॥ ज्याचा ज्यावर खरा स्नेह असतो त्याची प्राप्ती त्याला होते यात मुळीच संदेह नाही ॥ ६ ॥ प्रभूकडे पाहून सीतेने प्रेमाचा पण केला हे कृपानिधी रामचंद्रांनी जाणले ॥ ७ ॥ (लगेच) त्यांनीही सीतेकडे पाहून धनुष्याकडे असा दृष्टीक्षेप केला की गरुडाने जसा क्षुद्र सर्पाकडे करावा ॥ ८ ॥ लक्ष्मणाच्या लक्षात आले की रघुवंशमणीने हरकोदंडाकडे पाहीले त्याबरोबर शरीर पुलकित झाले व ब्रह्मांडाला ब्रह्मदेव पायाने दाबून बोलू लागले. ॥ दो० २५९ ॥

दिक्कुंजर अहि कूर्म सूकरा । न चळो, धीरें धरा तुम्हिं धरा ॥
राम शंभु धनु भंगूं पाहति । सावध ममशासनें रहा अति ॥
चाप समीप राम जैं पावति । सुर-सुकृतां नरनारी प्रार्थति ॥
संशय अज्ञानहि सकलांचें । मद अभिमान मंद महिपांचे ॥
भृगुपति-गर्वाची अति गुरुता । सुर मुनिवर यांची कातरता ॥
सीताशोच जनक परिताप हि । राण्यांचा दारुण हृत्तापहि ॥
महाजहाज शंभुधनु-मिळुनी । जाउनि चढले सगळे मिळुनी ॥
रामबाहुबल सिंधु अपारहि । तरूं बघति कुणि कर्णधार नहि ॥

दो० :- राम विलोकित दिसति जन चित्रलिखित निःशेष ॥
सीते बघति कृपायतन जाणति विकल विशेष ॥ २६० ॥

लक्ष्मण म्हणतात हे दिग्गजांनो, हे शेष - कूर्म - वराहहो, धरणी डळमळणार नाही (हलणार नाही) अशा रीतीने तुम्ही तिचे धीराने धारण करा. ॥ १ ॥ (कारण) राम शंकरांच्या धनुष्याचा भंग करूं इच्छित आहेत म्हणून तुम्ही माझ्या आज्ञेने सावध रहा ॥ २ ॥ राम धनुष्याजवळ आले तेव्हा सर्व स्त्री - पुरुषांनी आपले पुण्य व देव यांना प्रार्थना केल्या.॥ ३ ॥ सगळ्यांचे संशय व अज्ञान, मूर्ख महीपांचा गर्व व अभिमान, भृगुपतीच्या गर्वाची विशालता, मुनीवरांची - सुरांची कातरता, सीतेची चिंता व जनकांचा पश्चाताप, राण्यांच्या हृदयाचा दारुण - दाह या सर्वांना शंभुधनुष्य हे फार मोठे जहाज मिळाले व सर्वजण मिळून जाऊन या जहाजावर चढले ॥ ४-७ ॥ रामचंद्रांच्या बाहूबलाचा सागर अपार आहे, त्यातून तरुन जाण्याची सर्वांची इच्छा आहे पण कोणी कर्णधार नाही ॥ ८ ॥ रामचंद्रांनी सर्व लोकांकडे पाहीले तो झाडून सारे लोक चित्रात काढल्यासारखे दिसले, कृपानिधानांनी सीतेकडे पाहीले तेव्हा जाणले की ती विशेष व्याकूळ झाली आहे ॥ दो० २६० ॥

दिसली विपुल विकल वैदेही । निमिष कल्पसें तिज जातें ही ॥
त्यजी तृषित तनु तोयाविण जर । सुधा तडाग मृता निष्फल तर ॥
वर्षा काय कृषी सब सुकतां । वृथा‍ऽनुताप किं समयीं चुकतां ॥
निरखिति, चिंतुनि असें, जानकिस । प्रभु पुलकति अति बघतां प्रीतिस ॥
गुरुला स्वमनीं प्रणाम करुनी । सुलाघवें धनु घेति उचलुनी ॥
चपलेसम घेतांस चमकलें । मग नभिं धनु मंडलसम वळलें ॥
घेत सज्यतां बळें ओढतां । लक्षि न कुणि, सब बघति तिष्ठतां ॥
रामें भग्न धनू मधिं तत्क्षण । भुवनिं भरे ध्वनि कठोर भीषण ॥
छं. :- भुवनांत घोर कठोर रव रवि-वाजि उत्पथिं धावती ॥
चीत्करति दिग्गज डोल महि अहि कूर्म कोलहि विवळती ॥
सुर असुर मुनि कर कानिं देती सकल विकल विचारती ॥
कोदंड खंडिति राम तुलसी सकल ‘जय’ उच्चारती ॥ १ ॥

सो. :- शंकर-चाप जहाज सागर रघुवर-बाहुबल ॥
बुडला सकल समाज चढे प्रथम जो मोहवश ॥ २६१ ॥

सीता फारच व्याकुळ होऊन वैदेही झालेली दिसली व एक एक निमेष तिला कल्पासारखे जात आहे असेही दिसले ॥ १ ॥ (तेव्हा रामांनी असा विचार केला की) तृषेने व्याकुळ झालेल्या माणसाने जर पाण्यावाचून प्राण सोडले तर मग मेल्यावर त्याला अमृतासारख्या तलावभर पाण्याचा) काय उपयोग ! शेती (कृषी+पिके) पार सुकून गेल्यावर पाऊस पडून काय उपयोग ! आणि सुसंधीचा (फायदा घेण्यात) चूक केली की पाठीमागून पश्चाताप काय कामाचा ! ॥ ३ ॥ असा विचार करून जानकीला निरखून पाहीली व तिची अत्यंत प्रीती पाहून प्रभू पुलकित झाले ॥ ४ ॥ गुरु (वसिष्ठांना) मनात प्रणाम करुन अत्यंत चपलतेने प्रभुंनी धनुष्य उचलून घेतले उचलून घेतानाच ते धनुष्य विजेसारखे चमकले व लगेच आकाशात ते मंडलाकार वळले ॥ ५-६ ॥ (मात्र) घेताना दोरी लावताना किंवा जोराने ओढताना कोणाच्या लक्षातही आले नाही (फक्त) राम उभे आहेत इतकेच उभे असणार्‍या सर्व लोकांना दिसले (केव्हा उचलले), केव्हा गुण लावला व केव्हा ओढले हे कोणालाही दिसले नाही ॥ ७ ॥ मंडलाकार झाल्याक्षणी रामचंद्रांनी ते धनुष्य मधल्यामध्ये (मधोमध) मोडले. सर्व भुवनात त्याचा कठोर ध्वनी भरला ॥ ८ ॥ घोर कठोर ध्वनी भुवनात भरला व सूर्याचे घोडे मार्ग सोडून धावू लागले दिग्गज चीत्कार करु लागले, मही डोलू लागली, शेष-कूर्म-वराह विवळू लागले सुर, असुर व मुनी यांनी आपले हात कानावर ठेवले (दाबले) सर्व लोक व्याकूळ होऊन विचारात पडले की रामचंद्रांनी धनुष्य मोडले की काय ? तुलसीदास म्हणतात तसा निश्चय होताच सर्व जयजयकार करुं लागले ॥ छंद ॥ शंकरचाप हे जहाज असून रघुवर बाहूबल हा सागर आहे जो समाज मोहवश होऊन (त्या जहाजावर) आधीच चढला होता तो (त्या जहाजासह त्या सागरात) बुडला. ॥ दो०२६१ ॥

प्रभु दो चाप-खंड महिं टाकति । पाहुनि सकल लोक सुख पावति ॥
कौशिक रूप-पयोनिधि पावन । प्रेम सुवारि अगाध सुशोभन ॥
रामरूप-राकेशा पाहत । वीची बहु पुलकावलि वाढत ॥
नभीं नौबदी दुम्‌दुम् वाजति । देव-वधू बहु गाती नाचति ॥
ब्रह्मादिक सुर सिद्ध मुनीश्वर । स्तविती प्रभुस देति आशिर्वर ॥
वर्षति बहुरंगीं सुम-माला । किंनर गीतां गाति रसालां ॥
भुवनिं कोंदली जय जय वाणी । धनुर्भंग रव येइ न कानीं ॥
जिथं जिथं म्हणति मुदित नरनारी । रामें भग्न शंभु-धनु भारी ॥

दो० :- बंदी-मागध-सूत गण ब्रीद वदति मति धीर ॥
करिति लोक ओवाळणी हय गज धन मणि चीर ॥ २६२ ॥

प्रभूंनी धनुष्याचे दोन तुकडे जमिनीवर टाकले ते पाहून सर्व लोकांस सुख झाले ॥ १ ॥ विश्वामित्र रुपी सुंदर व पवित्र प्रेमरुपी समुद्र अगाध व सुंदर जलाने भरला आहे. ॥ २ ॥ त्याने रामचंद्ररुपी पौर्णिमेचा चंद्र पाहताच त्याच्या रोमांच्यांच्या रांगारुपी लाटा सारख्या वाढूं लागल्या ॥ ३ ॥ आकाशात देवांचे नगारे दुमदुमू लागले व पुष्कळ अप्सरा गात गात नृत्य करूं लागल्या ॥ ४ ॥ ब्रह्मा, शिव इतर देव सिद्ध व मुनीश्रेष्ठ प्रभूंची स्तुती-प्रशंसा करुन उत्तम आशीर्वाद देऊं लागले ॥ ५ ॥ विविध रंगांच्या फुलांचा व पुष्पमालांचा वर्षाव केला, व किन्नर रसाळ गीते गाऊ लागले ॥ ६ ॥ सर्व भुवनात जयजयकराचा रव कोंदला व धनुष्यभंगाचा ध्वनी ऐकू येईनासा झाला. ॥ ७ ॥ प्रमुदित झालेल्या स्त्रिया व पुरुष जिथे तिथे (आपापसात) म्हणतात की शंभूंचे भारी धनुष्य रामचंद्रांनी मोडले ॥ ८ ॥ धीर बुद्धीचे भाट, मागध, व सूत यांचे समुदाय ब्रीदावली वर्णन करू लागले व लोकांनी हत्ती, घोडे, पैसे, रत्‍ने व वस्त्रे यांची ओवाळणी केली. ॥ दो०२६२ ॥

* * * * *

श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु

GO TOP