॥ श्रीरामचरितमानस ॥

(मराठी अनुवाद)

॥ सुंदरकाण्ड ॥

॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

अध्याय १ ला



Download mp3

अनुवादक कृत मंगलाचरण
स्रग्धराः- उत्तीर्ण यस्य नैव प्रभवति भवितुं रामचंद्रः स्वयं तं ।
भक्तानामग्रगण्यं खलगणगहन-ध्वंसकं वायुसूनुम् ॥
संसाराम्भोधिपारे गमनकृतमतिः प्राप्नुयाद्यत्सहायं ।
वन्देहं वानराणां मरणभयहरं आञ्जनेयं कपीशम् ॥ १ ॥
आर्याः - यदनुग्रह-भानुकरैर्दृश्यं सर्वं त्वदृश्यतां नीतम् ।
तं ब्रह्मविद्‍वरिष्ठं केवलचिन्मूर्तिरूपगुरुमीडे ॥ २ ॥
मूळ मंगलाचरण
शा वि - शान्तं शाश्वतमप्रमेयमनघं निर्वाणशान्तिप्रदं ।
ब्रह्माशंभुफणींद्रसेव्यमनिशं वेदान्तवेद्यं विभुम् ॥
रामाख्यं जगदीश्वरं सुरगुरुं मायामनुष्यं हरिं ।
वन्देऽहं करुणाकरं रघुवरं भूपालचूडामणिम् ॥ ३ ॥
व.ति. :- नान्या स्पृहा रघुपते हृदयेऽस्मदीये ।
सत्यं वदामि च भवानखिलान्तरात्मा ॥
भक्तिं प्रयच्छ रघुपुंगव निर्भरां मे ।
कामाहि दोष रहितं कुरु मानसं च ॥ ४ ॥
मालिनी :- अतुलितबलधामं स्वर्णशैलाभदेहं ।
दनुजवनकृशानुं ज्ञानिनामग्रगण्यं ।
सकलगुणनिधानं वानराणामधीशं ।
रघुपति प्रियभक्तं वातजातं नमामि ॥ ५ ॥

अनुवादककृत मंगलाचरण -
ज्याच्या ऋणातून उत्तीर्ण होण्यास स्वतः रामचंद्रसुद्धा समर्थ झाले नाहीत त्या भक्तांमध्ये अग्रगण्य असलेल्या, खलांचा समुदाय व (खलांचे) वन यांचा विध्वंस करणार्‍या, संसारसागराच्या पार जाण्याचा निश्चय करणार्‍यास् ज्यांचे साह्य मिळू शकते अशा, वानरांचे मरणभय हरण करणार्‍या, अंजनीपुत्र वायुसुत कपीश्वरास मी वंदन करतो. ॥ १ ॥ ज्यांच्या अनुग्रहरूपी सूर्याच्या किरणांनी सर्व दृश्य (प्रपंच जग) अदृश्यतेस नेले (नाहीसे केले) त्या केवल चैतन्यमूर्ती, ब्रह्मविद्‍वरिष्ठ श्रीगुरु (महाराजांना) मी प्रार्थना करतो.॥ २ ॥
गोस्वामी तुलसीदसकृत मूळ मंगलाचरण -
शांत, निरंतर अस्तित्वात असणारे, प्रमाणांनी ज्यांचे ज्ञान होऊ शकत नाही, मायाजनित पापविकार ज्यात नाहीत, मोक्ष व शांति (भक्ति) देणारे, ब्रह्मदेव, शंकर व शेष ज्यांची निरंतर सेवा करतात, जे वेदान्ताच्या साह्याने जाणले जातात, जे विभु आहेत, सर्व जगताचे ईश्वर, सर्व देवांत श्रेष्ठ, मायेच्या योगाने मनुष्यरूप दिसणारे राम नावाचे हरी, भूपालांचे शिरोमणी, करुणेचे सागर असे जे रघुवर त्यांना मी वंदन करतो. ॥ ३ ॥ हे रघुपते ! माझ्या हृदयात दुसरी काही इच्छा नाही हे मी सत्य सांगतो, व तुम्ही सर्वांचे अंतरात्मा आहात; हे रघुकुलश्रेष्ठ ! मला प्रगाढ (पूर्ण) भक्ति द्या, व माझे मन कामादि विकारहीन राहील असे करा. ॥ ४ ॥ अतुल बलाचे निवासस्थान, सोन्याच्या पर्वतासारखे तेजस्वी शरीर असलेले, दैत्यरूपी वनाला अग्नीरूप, ज्ञान्यांत अग्रगण्य, सकल गुणांचे निधान, वानरांचे स्वामी व रघुपतीचे प्रियकर अशा पवनपुत्राला मी प्रणाम करतो. ॥ ५ ॥

जांबवंत-वच रुचिर परिसतां । रुचलें अति चित्तीं हनुमंता ॥
तोंवर बंधू वाट मम पहा । कंद मूल फल खात दुख सहा ॥
जों येइन पाहुन सीतेसी । होइ काज मज हर्ष विशेषीं ॥
असं सांगुनि सर्वां नमि माथा । हर्षित निघे ध्यात रघुनाथा ॥
एक सिंधुतटिं भूधर सुंदर । उडुनी चढे सलील तयावर ॥
कितिदां तरि रघुवीर स्मरला । पवनतनयबल भारि उसळला ॥
हनुमान् दे ज्या शैलीं पदाला । तो तत्क्षण गेला पाताळा ॥
जैसा अमोघ रघुपति-बाण । त्याच तर्‍हें गेला हनुमान ॥
जलनिधि रघुपति-दूत-विचारीं । मैनाका तूं हो श्रमहारी ॥

दो:- हनुमान कर लावी त्याला करी प्रणाम ॥
रामकार्य केल्या विना कुठला मज विश्राम ॥ १ ॥

समीकुमार सागर उल्लंघी ०
जांबवताचे सुंदर भाषण ऐकून ते हनुमंताच्या मनाला अतिशय आवडले ॥ १ ॥ (व म्हणाले की) बंधूंनो ! (मी येईपर्यंत) तुम्ही कंदमूळे खात दुःख सहन करा व माझी वाट बघत रहा ॥ २ ॥ जोपर्यंत मी सीतेला पाहून (तिची गाठ घेऊन) येईन, हे कार्य नक्की होणार, कारण मला विशेष हर्ष होत आहे ॥ ३ ॥ असे सांगून सर्वांना मस्तक नमवून रघुनाथाचे ध्यान करीत हर्षाने निघाला. ॥ ४ ॥ सागराच्या तीरावर एक सुंदर पर्वत होता, त्याच्यावर सहज लीलेने (टुणकन्) उडी मारून चढला. ॥ ५ ॥ कितीदां तरी रघुवीराचे स्मरण केले व भारी बलवान् पवनतनय वर उसळला. ॥ ६ ॥ (उडी घेऊन उड्डाण करताना) हनुमंताने ज्या पर्वतावर आपले पाय रोवले होते तो त्याच क्षणी पाताळात गेला. ॥ ७ ॥ रघुपतीचा अमोघ बाण जसा जातो, त्याच तर्‍हेने हनुमान निघाला. ॥ ८ ॥ रघुपतीचा दूत आहे या विचाराने जलनिधी (मैनाकास म्हणाला) हे मैनाका ! तूं रामदूताचे श्रम हरण करणारा हो. ॥ ९ ॥ हनुमंताने मैनाकाला आपला उजवा हात लावला आणि प्रणाम केला (व सांगितले की) रामकार्य केल्याशिवाय मला आता कुठली विश्रांती ? ॥ दो १ ॥

देव पवनसुत जातां पाहुनि । जाणुं बुद्धिबल विशेष वांछुनि ॥
सुरसा नाम सर्प-जननीतें- । पाठविती; येउनि ती वदते-- ॥
देव देति मज आज अहार । ऐकत वदला पवन-कुमार ॥
रामकार्य मी करून येइन । सीता शुद्धी प्रभुला देइन ॥
येउन तव वदनांत शिरेनहि । माइ ! जाउं दे वदतो सत्यहि ॥
कुण्याहि यत्‍नें जाउं देइना । हनुमान् वदला मला ग्रससि ना ॥
योजन भर ती वक्त्रा पसरी । निज तनु कपि ही द्विगुण विस्तरी ॥
षोडश योजन ती करि आनन । होइ पवनसुत बत्तिस तत्क्षण ॥
वाढवि सुरसा मुखा जसजसें । द्विगुण रूप दाखवी कपि तसें ॥
ती शत योजन वदन निज करी । अति लघुरूपा पवनसुत धरी ॥
मुखिं शिरूनि बाहेर निसटला । आज्ञा मागे नमी शिर तिला ॥
प्रेषित मजसि सुरांनी ज्यास्तव । कळलें मति-बल-मर्म मला तव ॥

दो:- रामकार्य साधाल सब तुम्हि बल-बुद्धि-निधान ॥
आशीस देउन गेली हर्षित गत हनुमान ॥ २ ॥

पवनसुताला जाताना पाहून त्याचे विशेष बल व बुद्धी पाहण्याच्या इच्छेने देवांनी सुरसा नावाच्या सर्प-जननीला पाठवले व ती येऊन म्हणाली - ॥ १-२ ॥ आज देवांनी मला आहार दिला आहे. हे ऐकताच पवनकुमार म्हणाला की, ॥ ३ ॥ मी रामकार्य करून परत येईन आणि सीतेचा शोध प्रभुला देईन; ॥ ४ ॥ मग मी तुझ्या मुखात नक्की शिरेन, हे मी सत्य सांगतो. माते मला आता जाऊ दे. ॥ ५ ॥ कोणत्याही उपायाने ती काही जाऊ देईना (हे पाहताच) हनुमान म्हणाला की तू मला गिळत कां नाहीस (तू मला गिळू शकणार नाहीस हा गूढार्थ). ॥ ६ ॥ या बरोबर तिने आपले तोंड एक योजनभर पसरले. तेव्हा कपीने आपले शरीर दुप्पट केले. ॥ ७ ॥ तिने आपले तोंड सोळा योजने केले तर कपीने आपले शरीर बत्तीस योजनांचे केले. ॥ ८ ॥ सुरसेने जसजसे आपले मुख वाढविले तसतसे कपीनेही आपला देह त्याच्या दुप्पट करून दाखविला. ॥ ९ ॥ तिने आपले मुख शंभर योजने करताच पवनसुताने अति लघुरूप धारण केले; ॥ १० ॥ व तिच्या मुखात शिरून बाहेर पडला व तिला मस्तक नमवून तिची आज्ञा मागितली. ॥ ११ ॥ देवांनी मला ज्यास्तव पाठवले ते तुझ्या बळाचे व बुद्धीचे मर्म मला कळले. ॥ १२ ॥ तुम्ही सर्व रामकार्य साधाल; कारण की तुम्ही बल व बुद्धी यांचे निधान आहांत. ती असा आशीर्वाद देऊन गेली व हनुमान हर्षाने पुढे निघाले. ॥ दो २ ॥

वसे सिंधुमधिं एक निशाचरि । ती मायेनें नभग खगां धरि ॥
जीव जंतु जे उडती गगनीं । पडछाया जळिं पडती बघुनी ॥
छाया धरते उडुं न शकति ते । सदा गगनचर असे भक्षिते ॥
हनुमंतासि तसा छल ती करि । कपि जाणें तत्कपट शीघ्र परि ॥
तिज मारुनि मारुतसुत वीर । गत वारिधि-पार मतिधीर ॥
जाउन तिथें बघे वन शोभे । गुंजति चंचरीक मधु-लोभें ॥
नाना तरु फल फुल सुशोभन । खगमृग वृंदां बघत रमे मन ॥
पुढें एक गिरि विशाल पाहुनि । त्यावर निर्भय चढला धाउनि ॥
उमे कपिसि हें अधिक न काई । प्रभु प्रताप हि काळा खाई ॥
गिरिवर चढता लंका देखे । वदवे ना अति दुर्ग विशेषें ॥
अति उत्तुंग समुद्र सभोंवति । कनककोट भा परमा पाडति ॥

छं:- कनक-कोट विचित्र मणिकृत सुंदरायतनें घनें ।
चौव्हाट हाट सुवाट वीथी चारु पुर बहुपरिं बने ॥
गज वाजि खेचर-निकर पदचर रथ वरूथ न गणवती ॥
बहुरूप निशिचर-यूथ अतिबल वर्णि कटकें कवण तीं ॥ १ ॥
वन बाग उपवन वाटिका सर कूप वापि शोभती ।
नर-नाग-सुर-गंधर्व-कन्यारूपिं मुनि मन मोहती ॥
सम शैल मल्ल विशाल तनु कोठें बली अति गर्जती ।
नाना अखाडीं भिडति बहुपरिं एकमेकां तर्जती ॥ २ ॥
अति झटुनि भट कोटी विकल तनु नगर चौदिशिं रक्षिती ।
कोठे महिष नर धेनु खर अज खल निशाचर भक्षिती ॥
यांच्या कथेसी कांहिं तुलसीदास यास्तव कथित कीं ।
रघुवीर-शर-तीर्थीं त्यजुनि तनु पावतिल गति सत्य कीं ॥ ३ ॥
दो :- पुररक्षक बहु पाहुनी कपि चिंती चितांत ।
अति लघुरूपा घेउनी शिरूं रात्रिं नगरांत ॥ ३ ॥

त्या सागरात एक राक्षसी राहते. ती आपल्या मायेने आकाशातून उडणार्‍या पक्ष्यांना वगैरे धरते. ॥ १ ॥ जे जीवजंतु आकाशात उडतात त्यांच्या पडछाया पाण्यात पडतात त्या पाहून ती छाया पकडते व त्यामुळे त्यांना उडता येणे अशक्य होते, अशा रीतीने ती आकाशातून जाणार्‍यांना नेहमी खाते. ॥ २-३ ॥ तसेच कपट तिने हनुमंताशी केले परंतु, कपीने तिचे कपट तत्काळ ओळखले. ॥ ५ ॥ तिला मारून वीर धीरमती मारुतसुत सागराच्या पार गेला. ॥ ५ ॥ तेथे सागर तीरावर गेल्यावर वनशोभा दिसूं लागली. मधाच्या लोभाने भ्रमर गुंजारव करीत होते. ॥ ६ ॥ नाना प्रकारचे सुंदर वृक्ष, सुंदर फळे, सुंदर फुले व पक्ष्यांचे व पशूंचे समुदय पाहून मन रमले. ॥ ७ ॥ (पण थांबला नाही की फळे भक्षण केली नाहीत) समोरच एक विशाल पर्वत दिसला तेव्हा हनुमान धावत जाऊन त्याच्यावर निर्भयपणे चढला. ॥ ८ ॥ उमे ! यात कपीची काही विशेषता नाही. हा प्रभूचा प्रताप आहे. तो काळाला खाऊन टाकील. ॥ ९ ॥ पर्वतावर चढल्यावर लंका दृष्टीस पडली व ती अति विशेष दुर्गम दिसली. दुर्गमतेचे वर्णन करता येत नाही. ॥ १० ॥ एकतर अति उत्तुंग आहे, त्याच्या सभोवती सागर आहे आणि त्यातही सोन्याचे कोट अति प्रकाश पाडीत आहेत. ॥ ११ ॥ तो सोन्याचा कोट चित्रविचित्र रत्‍नांनी जडलेला असल्याने रमणीय दिसत आहे. (आत) सुंदर आयतने (घरे, वाडे, महाल) अगदी घनदाट आहेत. नगरात चव्हाटे, बाजार, उतम रस्ते, बोळ इ. सुंदर आहेत. असे ते नगर विविध प्रकारे सुंदर बनलेले आहे. हत्ती, घोडे, खेचरे यांचे तांडे आणि पायदळ व रथ यांचे समूह इतके आहेत की त्यांची गणती करवत नाही. नाना रूपाच्या राक्षसांच्या झुंडीच्या झुंडी असून त्या अति बलवान आहेत. त्या अति बलवंत (चतुरंगिणी) सेनेचे वर्णन कोण करेल ? ॥ छ. १ ॥ वन, बाग. उपवन, पुष्पवाटिका, तलाव, आड, विहिरी शोभत आहेत. मनुष्य, नाग, देव्, गंधर्व इत्यादिंच्या कन्यांचे रूप मुनींच्या मनाला (सुद्धा) मोहीत करणारे आहे. कुठे कुठे शैलासारखे विशाल देह असलेले अति बलवान मल्ल अति गर्जना करीत आहेत व निरनिराळ्या अनेक आखाड्यात एकमेकांशी नाना प्रकारे भिडून एकमेकांस दटावीत आहेत ॥ छं. २ ॥ अति विशाल देहाचे कोट्यावधी योद्धे चारी बाजूंनी नगरीचे अति झटून रक्षण करीत अहेत. कुठे कुठे दुष्ट राक्षस म्हशी, रेडे, माणसे यांना खात आहेत (असे दिसले). तुलसीदास म्हणतात की यांची कथा एवढ्याच साठी सांगितली आहे की हे सर्व रघुवीर बाणरूपी तीर्थात देहत्याग करून गति (मोक्ष) पावणार आहेत, हे सत्य आहे. ॥ छं ३ ॥ पुररक्षक पुष्कळ आहेत असे पाहून कपीने विचार केला, अति लहान रूप घेऊन रात्रीच्या वेळीच नगरात प्रवेश करू. ॥ दो ३ ॥

मशक-समान रूप कपि धरी । लंके निघे स्मरुनि नरहरी ॥
निशिचरि एका नाम लंकिनी । म्हणे जासि मज अपमानुनी ॥
जाणसि ना शठ मर्मा माझे । तस्कर तितके माझें खाजें ॥
मारी मुष्टि महा कपि बळें । रुधिर वमत धरणीं कोसळे ॥
उठे सावरुनि मग ती लंका । जोडुनि पाणी विनवि सशंका ॥
ब्रह्मा वर रावणास देउनि । गत विरंचि मज लक्षण सांगुनि ॥
विकल होसि तूं कपिच्या मारें । तदा समज हत निशाचर सारे ॥
तात ! पुण्य मम अती बहूत । दृष्ट नेत्रिं रामाचा दूत ॥

दो :- स्वर्ग-मोक्ष-सुख घालितां एका तुलांगिं तात ! ॥
सकल मिळुनि ना तोलवे सुख लव-सत्संगांत ॥ ४ ॥

हनुमानाने चिलटाएवढे रूप घेतले व नरहरी (राम)चे स्मरण करून लंकेत जाण्यास निघाला. ॥ १ ॥ लंकिनी नावाची एक निशाचरी म्हणाली की माझा अनादर करून चाललास काय ? ॥ २ ॥ रे शठा ! तू माझे मर्म जाणत नाहीस काय ? (लंकेत शिरणारे) जे चोर असतात ते सारे माझे भक्ष्य आहे, समजलास. ॥ ३ ॥ महाकपीने जोराने एक ठोसा लगावला त्याबरोबर ती रक्त ओकीत धरणीवर कोसळली. ॥ ४ ॥ मग ती लंका सावरून उठली व अतिशय भितीने हात जोडून विनवून सांगू लागली की; ॥ ५ ॥ ब्रह्मदेव रावणाला वर देऊन गेले तेव्हा ते मला लक्षण सांगून गेले. ॥ ६ ॥ जेव्हा तू कपीच्या माराने व्याकुळ होशील तेव्हा समज की सगळे निशाचर मारले गेले. ॥ ७ ॥ तात ! माझ्या पुण्याचा ठेवा अतिशय मोठा आहे (म्हणूनच) मला या डोळ्यांनी आज रामदूत दिसला. ॥ ८ ॥ तात ! स्वर्गसुख व मोक्षसुख हे सारेही तराजूच्या एका पारड्यात घातले व दुसरीकडे एक लवभर घडलेल्या सत्संगाचे सुख घातले तर सत्संगाचेच पारडे जड होते. ॥ दो. ४ ॥

शिरुनि नगरिं करिजे सब काजां । हृदिं राखुनि कोसलपुर-राजा ॥
गरल सुधा अरि करिति मित्रता । गोपद सिंधु अनलिं शीतलता ॥
गरुड ! सुमेरु रेणुसा त्यासी । राम कृपायुत बघती ज्यासी ॥
हनूमान् अति लघुरूपा धरुनी । पुरिं शिरला भगवंता स्मरुनी ॥
प्रति मंदिरिं मंदिरिं करि शोधा । बघे चहुंकडे अगणित योधां ॥
शिरे दशानन-मंदिर पाही । तें अति विचित्र वदवत नाहीं ॥
दिसे करित तो मंदिरिं शयना । दिसे न वैदेही कपि-नयनां ॥
भवन एक मग रम्य पाहिलें । तिथें भिन्न हरि मंदिर दिसलें ॥

दो :- रामायुध-अंकित गृह छवि वदली ना जाय ॥
नव तुलसीवन, हर्षला बघुनि तिथें कपिराय ॥ ५ ॥

(लंका म्हंणाली) नगरात शिरून हृदयात कोसल-राजाला ठेऊन सर्व कार्ये करा. ॥ १ ॥ (या प्रसंगाचे सार भुशुंडी गरुडास सांगतात) गरुडा, राम ज्यांच्याकडे कृपादृष्टीने पाहतात त्याला विष अमृत होते, शत्रू मित्र बनतात, सागर गोपदाएवढा होतो, आग शीतलता बनते, व त्याला सुमेरु पर्वत रजःकणासारखा होतो. ॥ २-३ ॥ अति लघुरूप घेऊन भगवंताचे स्मरण करून हनुमान लंकापुरीत शिरला. ॥ ४ ॥ प्रत्येक मंदिरा-मंदिरात (राक्षस सदनांत) शिरून त्याने शोध घेतला (पण कुठेही सीता दिसली नाहीच उलट) चहूकडे अगणीत योद्धे दिसले. ॥ ५ ॥ दशाननाच्या मंदिरात शिरला, तेथे सर्वत्र पाहिले तो ते इतके विचित्र दिसले की सांगता सोय नाही. ॥ ६ ॥ तो मंदिरात शयन करीत असलेला दिसला, पण कपीच्या नेत्रांना वैदेही मात्र कोठेच दिसली नाही (सर्व स्त्रिया देहलोभी व भोगरतच दिसल्या). ॥ ७ ॥ हनुमान बिभीषण भेट : मग काही वेळाने एक सुंदर भवन पाहिले, व तेथे एक अलग हरिमंदिर दिसले. ॥ ८ ॥ रामायुधांनी (धनुष्यबाण) अंकित केलेल्या त्या गृहाची शोभा काही अवर्णनीयच वाटली. तेथे नवतुलसींचे वन पाहून कपिराज हर्षित झाला. ॥ दो. ५ ॥

* * * * *

श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु

GO TOP