॥ श्रीरामचरितमानस ॥

(मराठी अनुवाद)

॥ किष्किंधाकाण्ड ॥

॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

अध्याय ३ रा



Download mp3

सुंदर वन कुसुमित अति शोभे । गुंजति मघुप-निकर मधुलोभें ॥
कंद मूल फल पत्र सुशोभित । झालीं विपुल यदा प्रभु आगत ॥
शैल मनोहर अनुपम बघती । अनुजासह सुरभूप राहती ॥
मधुकर-खग-मृग-तनु सुर धरती- । सिद्ध मुनी प्रभुसेवा करती ॥
मंगलरूप बने वन तैं तें । करिति निवास रमापति जैं तें ॥
स्फटिक-शिले अति शुभ्र सुशोभन । सुखासीन बंधू दोघेजण ॥
अनुजा सांगत कथा अनेका । भक्ति विरति नृपनीति विवेका ॥
वर्षाकाल-मेंघि नभ भरले । गर्जनिं वाटति फार चांगलें ॥

दो० :- पहा लक्ष्मणा मोरगण नाचति जलद बघून ॥
जसा विरति रत मुदित गृहिं हरिभक्ता पाहून ॥ १३ ॥

रामांचा प्रवर्षण गिरीवर निवास
सुंदर बन फुलल्यामुळे शोभायमान दिसत आहे. भुंग्याचे समूह मधाच्या लोभाने गुंजारव करीत आहेत. ॥१॥ प्रभू तेथे आले तेव्हा कंदमूळ फळे, पाने सुशोभित व विपुल झाली. ॥२॥ शैल अनुपम व मनोहर आहे असे पाहीले व सुरभुप (राम) लक्ष्मणासह तेथे राहीले. ॥३॥ देव, सिद्ध व मुनी भ्रमर, पक्षी व मृग यांचे देह धारण करून प्रभूंची सेवा करू लागले. ॥४॥ रमापतींनी जेव्हा तेथे निवास केला तेव्हा पासून वन मंगलमय बनले. ॥५॥ अतिशुभ व सुशोभित स्फटिक शीलेवर दोघे भाऊ सुखाने बसले. ॥६॥ वर्षा वर्णन : ­ तेथे राम अनुजाला भक्तीच्या अनेक कथा, वैराग्य, राजनीती, ज्ञान इ. सांगत असत. ॥७॥ (असेच एक दिवस बसले असता) वर्षाकालच्या मेघांनी आकाश भरले व ते गर्जू लागले तेव्हा फार चांगले( गोड सुखकर) वाटले. ॥८॥ दो. (ते पाहून राम लक्ष्मणाला म्हणाले) लक्ष्मणा ! हरि भक्तांना पाहून वैराग्य रत गृहस्थ जसे हर्षित होतात. तसे हे पहा मोरांचे समूह मेघांना पाहून नाचत आहेत ॥दो. १३॥

घन घुड् घुड् गर्जति नभिं घोर । प्रियाहीन मम मनिं भय थोर ॥
दामिनि चमक न घनांत राही । प्रीति खलाची स्थिर जशि नाहीं ॥
वर्षति वारिद भूवरि लोंबुनि । जसे नमति बुध विद्या पावुनि ॥
बिंदुघात गिरि सोसति तैसे । संत सहति खल वचनें जैसे ॥
क्षुद्र नद्या भरुनी फोफवति । अल्पधनें हि जसे खल माजति ॥
भूवर पडतां पाणि गढुळलें । जणुं मायेनें जीव वेष्टले ॥
जल सांचुनि सर हळुहळु भरती । जसे सुगुण सज्जनांत जमती ॥
सरिता जल जलनिधिमधिं जावुनि । होइ अचल जिव इव हरि पावुनि ॥

दो० :- हरित भूमि तृण-संकुला नुमजति कुठेंहि पंथ ॥
पाखंडी वादें जसे गुप्त होति सद्‌ग्रंथ ॥ १४ ॥

मोठे मोठे मेघ आकाशात घुड्‌घुड्‌ अशी गर्जना करीत आहेत. पण लक्ष्मणा ! मी प्रियाहीन असल्यामुळे माझ्या मनाला फार भीती वाटत आहे. ॥१॥ जशी खलांची प्रीती स्थिर नसते तसाच विजांचा चमचमाट घनात रहात नाही बघ. ॥२॥ विद्या प्राप्त झाल्याने ज्ञानी जसे नम्र होतात तसे मेघ जमिनीजवळ येऊन वर्षू लागले आहेत. ॥३॥ संत दुष्टांची वचने जशी सोसतात तसे पर्वत पावसांच्या थेंबाचे प्रहार सोसत आहेत. ॥४॥ जसे दुष्ट थोड्‌याशा धनाने माजतात तसे क्षुद्र नद्या भरून फोफावत आहेत. ॥५॥ मायेने जणूं जीवांना वेष्टन घालावे तसे पाणी जमिनीवर पडताच गढूळ होत आहे. ॥६॥ सद्‌गुण सज्जनात जमावेत तसे तलाव पाण्याने हळूहळू भरत आहेत. ॥७॥ जीव हरीला पाहून अचल होतो तसे नद्यांचे पाणी सागरात जाऊन स्थिरावत आहे. ॥८॥ पाखंडी वादाने जसे सद्‌ग्रंथ (वेद, शास्त्र, पुराणादी.) गुप्त होतात तसे भूमी गवताने व्यापली जाऊन त्या हिरव्या शालूत सार्‍या वाटा, रस्ते अगदी पाऊलवाटाही बुजुन गेल्या आहेत. ॥१४॥

दर्दुर-रव चहुंदिशीं रम्य तो । बटु समुदाय वेद जणुं पढतो ॥
नव-पल्लव-युत विटप अनेक । साधक मन जसं मिळत विवेक ॥
अर्क यवासा अपत्र बनले । जसे सुराज्यिं खलोद्यम सरले ॥
धूळ मिळेना कुठेंहि सोधित । क्रोध जसा धर्माला पळवित ॥
खुले सस्य-संपन्न मही कशि । उपकार्‍याची संपत्ती जशि ॥
निशिं तमिं घन खद्योत विराजति । जणुं दांभिक गण बहु संमीलति ॥
फुटुनि बांध अतिवृष्टिं वाहती । स्त्रिया स्वतंत्रा जशा बिघडती ॥
चतुर शेतकरि कृषी खुरपती । मान मदादि जसे बुध तजती ॥
चक्रवाक, खग दृष्टि न पडती । धर्म जसे कलि येतां पळती ॥
ऊषरिं वर्षत उगवे तृण ना । जशि हरिजन हृदिं काम निपज ना ॥
विविध जंतु संकुल भू भ्राजे । प्रजे भरति जशि मिळत सुराजे ॥
स्थगित पथिक ठिकठिकाणिं नाना । जशिं इंद्रियें निपज जैं ज्ञाना ॥

दो० :- कधीं प्रभंजन विलयिं ने जिथें तिथें मेघांस ॥
जसा कुपुत्र उपजतां कुल-सद्धर्म-विनाश ॥ १५रा ॥
कधिं दिवसा तम निबिड कधिं प्रगट पळांत पतंग ॥
ज्ञान जाइ उपजे जसें मिळत कुसंग सुसंग ॥ १५म ॥

चोहोकडे बेडकांचा ध्वनी जणू बटू समुदाय वेद पठण करीत असल्यासारखा रम्य वाटत आहे. ॥१॥ विवेक वा ज्ञान मिळाल्यावर साधकाचे मन जसे शोभीवंत होते तसे अनेक वृक्ष नवीन पालवीने शोभून दिसत आहेत. ॥२॥ जसे सुराज्यात खलांचे उद्यम नाहीसे होतात तशी रूईची व धमाशाची झाडे पर्णविहीन झाली. ॥३॥ क्रोध जसा धर्माला पळवितो तशी धूळ शोधून सुद्धा कुठेही मिळत नाहीशी झाली. ॥४॥ उपकार्‍याची संपत्ती जशी शोभते तशी भूमी सस्यसंपन्न होऊन खुलून दिसत आहे. ॥५॥ रात्रीच्या दाट अंधारात काजवे असे चमकत आहेत की जणू दांभिकांच्या समुहांचे संमेलनच भरले आहे. ॥६॥ स्त्रिया स्वतंत्र झाल्या म्हणजे जशा बिघडतात तसे अतिवृष्टीने शेतांचे बांध (ताली) फुटुन वाहुन जात आहेत. ॥७॥ जसे ज्ञानी भक्त मान­-मद­-मोह इत्यादींचा त्याग करतात तसे चतुर शेतकरी आपल्या शेताची खुरपणी (बेणणी, निंदणी) करू लागले आहेत. ते पहा, ॥८॥ कलीचे आगमन झाल्यावर जसे धर्म पळून जातात तसे चक्रवाक वगैरे पक्षी दिसत नाहीसे झाले. ॥९॥ हरिभक्तांच्या हृदयात जशी कामाची निपज होत नाही तसा ऊखर भूमीवर (कितीही) पाऊस पडला तरी गवत सुद्धा उगवत नाही. ॥१०॥ सुराजे मिळाले म्हणजे प्रजेला जशी भरती येते तशी पृथ्वी नाना प्रकारच्या जंतूंनी (क्षुद्र जीवांनी) गजबजून गेली आहे. ॥११॥ ज्ञान उपजले म्हणजे इंद्रिये जशी स्थिर होतात, तसे विविध प्रवासी ठिकठिकाणी तटस्थ राहीलेले (अडकून पडले) आहेत. त्यामुळे लक्ष्मणा ! कोणी प्रवासी जात येत असलेले आपल्याला पुष्कळ दिवसातच या डोंगरावरून सुद्धा दिसले नाहीत. ॥१२॥ दो. जसा कुपुत्र उपजला म्हणजे कुळातील सद्धर्माचा विनाश करतो, तसा केव्हा सोसाट्‌याचा वारा सुटुन मेघांना जिकडे तिकडे विलयास नेतो ॥ दो. १५॥ केव्हा भर दिवसा गडद अंधार पडतो तर केव्हा क्षणात सूर्य प्रगट होतो, तसे ज्ञान कुसंगतीने नष्ट होते व सुसंग मिळाला म्हणजे उपजते ॥दो. १५॥

वर्षा विगत, शरद ऋतु आला । पहा लक्ष्मणा परम शोभला ॥
फुलुनि काश महि अखिला झाकवि । जणुं निज वार्धक वर्षा दाखवि ॥
उदित अगस्ति पंथ जल शोषे । जसा लोभ शोषे संतोषें ॥
सरितासरिं जल विमल शोभतें । जसें संत मन अ-मदमोह तें ॥
हळुहळु सुके सरितसर-पाणी । जेवीं ममता त्यजती ज्ञानी ॥
शरद जाणुनी आले खंजन । फळति सुकृत जशिं सुसमयिं शोभन ॥
पंक न रेणु रुचिर अशि धरणी । जशि नय निपुण नृपाची करणी ॥
होति विकल जल आटत मीन । अबुध कुटुंबि जसा धनहीन ॥
विमल निरभ्र रुचिर आकाश । हरिजन इव सांडुनि सब आस ॥
वृष्टि शारदी तुरळक थोडी । जशि मम भक्ति एक कुणि जोडी ॥

दो० :- निघति मुदित पुर तजुनि नृप तापस वणिज भिकारी ॥
त्यजिति जसे श्रम, मिळत हरि-भक्ति आश्रमी चारि ॥ १६ ॥

शरद वर्णन : ­ वर्षाऋतू पूर्णपणे गेला आणि शरद ऋतू आला, लक्ष्मणा ! पहा (कसा) अत्यंत शोभत आहे. ॥१॥ काश (एक दर्भाची जात) फुलून सर्व भूमीला (फुलांनी) झाकवीत आहेत. (तेव्हा वाटते की) जणू वर्षा आपले म्हातारपण (वार्धक्य)च प्रगट करीत आहे. ॥२॥ अगस्तीचा तारा उदय पावला आणि संतोषाने जसा लोभ शोषला जातो तसे मार्गातील पाणी शोषले गेले ॥३॥ नद्यात आणि तलावात निर्मल पाणी मदमोहरहित संताच्या हृदयासारखे शोभूं लागले. ॥४॥ ज्ञानी जसा ममतेचा त्याग करतात, तसे सरिता व तलाव यातील पाणी हळुहळू आटत चालले. ॥५॥ जशी शोभन सुकृते सुसमयी फळतात, तसे शरद ऋतू जाणून खंजनपक्षी आले. (पहा लक्ष्मणा !) ॥६॥ नीती निपुण नृपाची करणी जशी शोभते तशी चिखल किंवा धूळ नसलेली धरणी सुंदर दिसत आहे. ॥७॥ अविचारी मूर्ख कुटुंब चालक जसा धनहीन होऊन कुटुंबास व्याकुळ करतो तसे पाणी आटल्यामुळे मासे व्याकुळ झाले आहेत. ॥८॥ निरभ्र झालेले निर्मळ आकाश सर्व आशा सोडलेल्या हरिभक्तासारखे रमणीय दिसत आहे. ॥९॥ कोणी एखादाच विरळा जशी माझी भक्ती जोडतो (त्याला लाभते) तशी शरदातील वृष्टी कुठे कुठे तुरळक होत आहे. ॥१०॥ हरिभक्ती लाभल्यावर चारी आश्रमातील व्यक्ती जसा श्रमांचा त्याग करतात तसे राजे, तपस्वी, वाणी (व्यापारी) व भिकारी (संन्यासी) पुर नगर इत्यादींचा त्याग करून हर्षाने निघाले आहेत ॥दो. १६॥

सुखी मीन जे अगाध नीरां । जशि हरिशरणा बाधा न जरा ॥
कमल फुलुनि सर कसें खुलतसें । ब्रह्म अगुण जैं सगुण होतसे ॥
गुंजति मधुकर मुखर अनूपम । सुंदर खग रव विविध मनोरम ॥
दुःखि कोक मनिं निशा निरखुनी । खल इव पर-संपत्ती बघुनी ॥
चातक रटत तृषा अति आहे । जसा शिवद्रोहि न सुख लाहे ॥
निशिशशि शरातपा निवारी । जसें संत-दर्शन अघ वारी ॥
विधुस चकोर-कदंबक पाहुनि । निरखिति हरिजन इव हरि पावुनि ॥
मशकां दंशां हिमत्रास हरि । द्विजद्रोह कुळनाश जसा करि ॥

दो० :- जीव जाल महिं राहि ते शरदागमनें जाय ॥
जाति मिळत सद्‌गुरु जसे भ्रम-संशय-समुदाय ॥ १७ ॥

हरिशरणाला मुळीच बाधा नसते तसे अगाध जलातले मासे सुखी आहेत. ॥१॥ कमळे फुलून तलाव कसा दिसत आहे पहा, जसे निर्गुण ब्रह्म सगुण झाल्यावर शोभावे तसे. ॥२॥ भुंगे गुंजारव करीत असून त्यांचा ध्वनी अनुपम आहे, अनेक प्रकारचे सुंदर पक्षी मनोरम आवाज करीत आहेत. ॥३॥ (पण) परसंपत्ती पाहून दुर्जन जसे दु:खी होतात तसे रात्र पाहून चक्रवाक दु:खी होत आहेत. ॥४॥ शिवद्रोह्याला जसे सुख लाभत नाही तसा तृषार्त चातक अजूनही रडत आहे. ॥५॥ संत दर्शन जसे पातक दूर करते तसे रामचंद्र शरदातील उन्हाळ्‌याचा ताप दूर करतात. ॥६॥ हरिभक्तांना हरीची प्राप्ती झाली म्हणजे जसे हरीला निरखून पाहतात तसे हे चकोरांचे समूह चंद्राकडे निरखून पहात आहेत. ॥७॥ द्विजद्रोह जसा कुळाचा नाश करतो तसा थंडीच्या पीडेने मच्छर वा डास यांचा नाश केला. ॥८॥ दो. सद्‌गुरू भेटले (कृपा केली) म्हणजे जसे संशय भ्रमांचे समुदाय नष्ट होतात तसे (शरदापुर्वी) भूमीवर जे जीवांचे जाळे पसरले होते ते शरदामुळे नष्ट झाले. ॥ दो. १७॥

वर्षा गत निर्मल ऋतु आला । सीता-शोध न तात ! लागला ॥
शोध एकदां कसाहि जाणिन । काळच जिंकुनि निमिषीं आणिन ॥
असो कुठें, जर जिवंत जाणिन । यत्‍नां करुनि तात तिज आणिन ॥
सुग्रीवहि मम न करी स्मरणा । पावे राज्य कोष पुर ललना ॥
मी वाली वधिला ज्या बाणें । मारूं मूढहि उद्यां तयानें ॥
नाश यत्कृपें मद-मोहांसी । उमे ! स्वप्निं कीं क्रोध तयांसी ॥
या चरिता ज्ञानी मुनि जाणति । जे रघुवीर चरणिं रति मानिति ॥
प्रभु सक्रोध जाणती लक्ष्मण । चढवुनि चाप करी धृत मार्गण ॥

दो० :- समजाविति अनुजा तैं रघुपति करुणाशीव ॥
भय दावुनि या घेउनी तात सखा सुग्रीव ॥ १८ ॥

रामरोष : ­ वर्षा ऋतू संपून निर्मल शरद ऋतू आला तरीही तात ! सीतेचा शोध (अजूनही) लागला नाही. ॥१॥ एकदा कशाही प्रकारे शोध लागला (मात्र) पाहिजे, म्हणजे काळालाच निमिषांत आणीन. ॥२॥ कुठे का असेना ! जर जिवंत आहे असे कळले तर हे तात ! नाना यत्‍न करून तिला आणीन. ॥३॥ सुग्रीव तर माझे स्मरणही करीत नाही (मला विसरला). राज्य, खजिना, राजधानीचे पुर व पत्‍नी मिळाली ( आता माझी जरूर काय ?). ॥४॥ ज्या बाणाने मी वालीचा वध केला त्यानेच त्या मूढाला उद्या मारू (तर त्या योगे मी मूढ ठरेन). ॥५॥ उमे ! ज्याच्या कृपेने मद मोहादिकांचा विनाश होतो, त्याला स्वप्नात तरी राग येणे शक्य आहे का ? ॥६॥ जे ज्ञानी मुनी रघुवीर चरणी दृढ प्रेम करणारे आहेत ते या चारित्रातील रहस्य जाणतात. ॥७॥ प्रभू क्रोधयुक्त झाले आहेत असे लक्ष्मणाने जाणले व धनुष्याला दोरी चढवून हाती बाण घेतला. ॥८॥ दो. तेव्हा करूणेची परमसीमा असलेले रघुपती अनुजाला समजवून सांगतात की, हे बाळा ! सुग्रीव माझा सखा आहे ! त्याला भय दाखवून घेऊन या ( म्हणजे झाले, त्याला मारायचे नाही हं ) ! ॥दो. १८॥

इथें पवनसुत चित्तिं चिंतिती । रामकार्य सुग्रीव टाळिती ॥
जाउनि निकट चरणिं शिर लाविति । चारि तर्‍हानीं त्या समजाविति ॥
श्रवुनि सुकंठ परमभय मानी । ज्ञाना मम हरलें विषयानीं ॥
अतां मरुतसुत ! दूतवरूथ । धाडा जिथं जिथं वानरयूथ ॥
सांगा पक्षामधिं न परतती । ते मम हस्तें वधिले जाती ॥
हनुमान् बोलावुनि दूतांनां । देति बहुत सकलां सन्माना ॥
प्रीति नीति भीतिस दाखवती । चरणिं नमुनि शिर सगळे निघती ॥
या अवसरिं लक्ष्मण पुरिं शिरले । क्रोध बघुनि कपि चहुदिशिं पळले ॥

दो० :- तैं चढवुनि धनु म्हणति पुर जाळुनि करतो क्षार ॥
तैं व्याकुळ पाहुनि नगर आला वालिकुमार ॥ १९ ॥

कीश भय : ­ इकडे पवनसुताने मनात विचार केला की, सुग्रीव रामकार्य करणे टाळत आहे. ॥१॥ (मग) जवळ जाऊन त्याच्या चरणांवर मस्तक नमवून (साम­ दाम ­दंड ­भेद) या चारी तर्‍हांनी त्यास समजावून सांगीतले ॥२॥ (पवनसुताचे भाषण) ऐकून सुग्रीव मनातून फार घाबरला व (म्हणाला की) विषयांनी माझे ज्ञान नष्ट केले. ॥३॥ हे मारुते, आता जिकडे तिकडे वानरांचे जे समूह आहेत तेथे त्या दूत समुहांना पाठवा. ॥४॥ आणि त्यांना बजावून सांगा की १५ दिवसाचे आंत जे (कार्य करून) येणार नाहीत ते माझेकडून मारले जातील. ॥५॥ मग हनुमंताने दूतांना बोलावून त्यांचा खूप सन्मान केला. ॥६॥ त्यांना प्रीती ­नीती ­भीती दाखवली व ते सगळे नमस्कार करून मोहीमेवर निघाले. ॥७॥ या दरम्यान लक्ष्मण नगरीत प्रवेशले. त्यांचा क्रोध पाहून कपी (भीतीने) चारी दिशांना पळत सुटले. ॥८॥ दो. तेव्हा लक्ष्मणाने धनुष्यास दोरी चढवून (सज्ज करून) म्हटले की सारी किष्कींधा नगरी जाळून भस्म करून टाकतो. तेव्हा सर्व नगरी व्याकुळ झाल्याचे पाहून अंगद आला. ॥दो. १९॥

करी विनंती पदिं शिर नमुनी । लक्ष्मण दे अभया भुज उचलुनि ॥
’लक्ष्मण सकोप’ कानीं पडलें । अति भय-विव्हळ कपीश वदले ॥
श्रुणु हनुमंत सवें ने तारा । विनवोनी समजावि कुमारा ॥
हनुमान् तारे समेत जाती । नमुनि पदीं प्रभु-सुयशा गाती ॥
विनवुनि मग मंदिरास आणुनि । मंचीं बसवि पदां प्रक्षाळुनि ॥
कपिपतिनें शिर चरणिं ठेवलें । त्या लक्ष्मण भुजिं धरुनि भेटले ॥
नाथ ! विषयसम मद ना काहीं । मुनिमन मोहित करी क्षणां ही ॥
श्रवुनि विनीत वचन सुख पावती । त्या लक्ष्मण विविधा समजावति ॥
पवन तनय सब कथा निवेदित । जसे दूत समुदायां प्रेषित ॥

दो० :- हर्षुनि सुग्रिव चालले अंगदादि कपि साथ ॥
पुढें करुनि रामानुजा येति जिथें रघुनाथ ॥ २० ॥

पायावर मस्तक नमवून अंगदाने विनंती केली व लक्ष्मणाने भुजा उचलून त्याला अभय दिले. ॥१॥ लक्ष्मण क्रुद्ध झाला आहे हे सुग्रीवाच्या कानी आले तेव्हा भयाने अति व्याकुळ होऊन तो म्हणाला; ॥२॥ हनुमंता ऐक, तारेला बरोबर घेऊन जा आणि प्रार्थना पूर्वक लक्ष्मणाची समजूत घाल. ॥३॥ तारेला बरोबर घेऊन हनुमान गेले व पायांना नमन करून प्रभू रामचंद्राच्या सुयशाचे वर्णन केले. ॥४॥ प्रार्थना करून राजभवनात (मंदिरात) घेऊन आले व लक्ष्मणाचे पाय धुवून त्यास मंचावर बसविले. ॥५॥ सुग्रीवाने लक्ष्मणाच्या पायावर मस्तक नमविले तेव्हा त्याला आलिंगन देऊन लक्ष्मण त्यास भेटले. ॥६॥ सुग्रीव म्हणाले नाथ ! विषयासारखा दुसरा कोणताच मद नाही. तो मुनींच्या मनाला सुद्धा क्षणात मोहीत करतो. ॥७॥ त्याचे विशेष नम्र वचन ऐकून लक्ष्मणास सुख झाले व त्यांनी त्यांची नाना प्रकारे समजूत काढली. ॥८॥ कपिदूत समूह (दश दिशांना) जसे पाठविले ती सर्व कथा पवनसुताने सांगितली. ॥९॥ दो. मग अंगदादी वानरांना बरोबर घेऊन, रामानुज लक्ष्मणाला पुढे करून, हर्षित होऊन सुग्रीव चालू लागले व जिथे राघुनाथ आहेत तेथे (सर्वजण) आले. ॥ दो. २०॥

* * * * *

श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु

GO TOP