॥ श्रीरामचरितमानस ॥

(मराठी अनुवाद)

॥ बालकाण्ड ॥

अध्याय २० वा

॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥


Download mp3

करिति विविध तप तीन्ही भ्राते । परम उग्र ना वदलें जातें ॥
गत समीप तप बघुनि विधाता । वर मागा मी प्रसन्न ताता ॥
दशमुख विनवि धरुनि चरणांला । श्रुणु जगदीश! म्हणे वचनाला ॥
आम्हिं न मरुं मारितांहि कोणी । जाति मनुज कपि यां वाचोनी ॥
एवमस्तु तुम्हिं कृत सुतपाला । मी ब्रह्मयानें दत्त वराला ॥
प्रभु मग गत घटाकर्णापाशीं । त्या पाहुनि विस्मय चित्तासी ॥
नित्य करिल जर खल आहारा । सकल उजाडिल हा संसारा ॥
प्रेरुनि गिरे फिरवि धी त्याची । मागे निद्रा षण्‌मासांची ॥

दो. :- गेले निकट बिभीषणा म्हणति पुत्र वर माग ॥
तो मागे भगवंत-पद-कमलिं विमल अनुराग ॥ १७७ ॥

( रावणादी ) तिन्ही भावांनी इतके परम उग्र तप केले की वर्णन करणे शक्य नाही ॥ १ ॥ तेव्हा ते पाहून विधाता ( रावणाच्या ) जवळ गेले व म्हणाले की ताता ! मी प्रसन्न आहे, वर मागा ॥ २ ॥ दशमुखाने पाय धरुन विनंती केली व म्हणाला की जगदीश ! माझे म्हणणे ऐका ॥ ३ ॥ वानर व मानव या दोन जाती सोडून इतर कोणीही मारले तरी आम्हाला मरण येऊ नये. ॥ ४ ॥ ( तेव्हा शंकर म्हणतात, ) मी व ब्रह्मदेवाने मिळून त्याला म्हटले की तुम्ही अति तप केलेत व तथास्तु म्हणून त्याला वर दिला ॥ ५ ॥ मग प्रभू ( ब्रह्मदेव ) कुंभकर्णाजवळ गेले ( पण ) त्याला पाहताच चित्ताला विस्मय वाटला ॥ ६ ॥ व ( वाटले की ) हा खल जर रोजच्या रोज आहार करील तर हा सर्व सृष्टी उजाड करुन टाकील ॥ ७ ॥ म्हणून शारदेला आज्ञा देऊन त्याची बुद्धी फिरविली ( तेव्हा ) त्याने सहा महिन्यांची झोप व ( एक दिवस जागृती ) मागितली ॥ ८ ॥ मग ब्रह्मदेव विभीषणाजवळ गेले व म्हणाले की पुत्रा ! वर माग; तेव्हा त्याने भगवंताच्या पद-कमलांच्या ठिकाणी निर्मळ प्रेम ( भक्ती-अनुराग ) मागितले ॥ दो० १७७ ॥

ब्रह्मा वर देउनी निघाले । ते हर्षित निज सदनीं आले ॥
मय-तनया मंदोदरि नामा । परम सुंदरी नारि-ललामा ॥
रावणास ती मय दे आणुनि । यातुधान-पति होइल जाणुनि ॥
हर्षित होइ नारि भलि पावुनि । करि भावांचे विवाह जाउनि ॥
त्रिकूटाद्रि गिरि एक सागरीं । विधि निर्मित दुर्गम अति भारी ॥
त्यास पुन्हा मय दानव सजवित । रत्न।जडित कांचन गृह अगणित ॥
अहिकुलवास जशी भोगावति । शक्रनिवास जशी अमरावति ॥
त्यांहुनि दुर्ग सुरम्य न शंका । जग विख्यात नाम ती लंका ॥

दो. :- खंदक सिंधु गभीर अति चारि दिशांस तदीय ॥
कनककोट मणि-खचित दृढ रचना अवर्णनीय ॥ १७८ रा ॥
हरि-इच्छें ज्या कल्पिं जो होइ निशाचर-राज ॥
बली प्रतापी शूर अति वसे ससैन्य-समाज ॥ १७८ म ॥

( त्या तिघांना ) वर देऊन ब्रह्मदेव निघून गेले व ते तिघे आपल्या घरी आले. ॥ १ ॥ मय-दानवाची मंदोदरी नावाची मुलगी होती व ती परम सुंदर व स्त्रियांना भूषणभूत होती ॥ २ ॥ ती मयाने आणून रावणास दिली ( कारण ) रावण निशाचरांचा राजा होणार हे त्याने जाणले होते ॥ ३ ॥ उत्तम बायको मिळाल्याने रावणाला हर्ष झाला व त्याने जाऊन ( दोन्ही ) भावांचे विवाह केले ॥ ४ ॥ ब्रह्मदेवाने निर्माण केलेला एक अती मोठा व अति दुर्गम असा त्रिकूटाद्रि नावाचा पर्वत सागरात होता ॥ ५ ॥ तो मय दानवाने पुन्हा सुसज्ज केला, त्यात रत्‍नजडित कांचनाची अगणित घरे होती ॥ ६ ॥ नागकुळांची जशी भोगावती-नगरी, व इंद्राची राजधानी जशी अमरावती ( तशी ) पण त्यांच्या पेक्षा अधिक रमणीय व अधिक दुर्गम होती यात शंकाच नाही, तिच जगात प्रसिद्ध असलेली लंका-नगरी होय. ॥ ८ ॥ तिच्या चारी दिशांस अति खोल असा सागररूपी खंदक होता; व ज्याची रचना वर्णनातीत होती असा अती मजबूत रत्‍नजडित सोन्याचा तट ( कोट ) होता. ॥ दो० १७८ रा ॥ हरीच्या इच्छेप्रमाणे त्या कल्पामध्ये जो कोणी अत्यंत बलवान प्रतापी व शूर असा राक्षसाचा राजा होईल तो आपल्या सैन्यादी परिवारांसह तेथे रहावयाचा ( असा रिवाज होता ) ॥ दो०१७८ म ॥

होते निशिचर तिथें भट महा । अमरिं समरिं मारिले सरसहा ॥
शक्रें प्रेरित तेथें सांप्रति । अमित यक्षपति रक्षक नांदति ॥
कुठें खबर ही दशामुख पावुनि । घाली वेढा ससैन्य जाउनि ॥
बघुनि विकट भट कटक महा तें । यक्ष पळति घेउनि जीवांतें ॥
मग सब नगर दशानन पाहे । गत चिंता सुख विशेष लाहे ॥
सुंदर सहज अगम अनुमानी । रावण करि ती स्वराजधानी ॥
उचित वास वाटी ज्यां त्यांना । सुखवी सर्वां निशाचरांना ॥
मग घाली धनदावर घाला । जिंकुनि पुष्पक घेउनि आला ॥

दो. :- उचलुनि घेई एकदां लीलेनें कैलास ॥
जणुं निज भुजबल तोलुनी पावे परम सुखास ॥ १७९ ॥

पूर्वी तेथे मोठे निशाचर योद्धे रहात होते ( पण ) देवांनी त्या सर्वांना युद्धात ठार मारले ॥ १ ॥ नंतर सध्या तेथे इंद्राच्या आज्ञेने यक्षपती कुबेराचे अगणीत रक्षक नांदत आहेत ॥ २ ॥ अशी खबर दशाननाला कोठून तरी मिळाली तेव्हा त्याने सैन्यासह जाऊन लंकेला वेढा दिला. ॥ ३ ॥ ते अक्राळ वीरांचे मोठे सैन्य पाहूनच सगळे यक्ष जीव घेऊन पळून गेले ॥ ४ ॥ तेव्हा मग आत जाऊन दशाननाने सर्व नगर पाहीले व त्याची चिंता जाऊन त्याला विशेष सुख झाले लाभले ॥ ५ ॥ लंका सहज सुंदर व सहज अगम्य आहे असे अनुमान केले व रावणाने आपली तीच राजधानी केली ॥ ६ ॥ ज्याच्या त्याच्या योग्यते प्रमाणे योग्य अशी घरे रजनीचरांना रहाण्यास देऊन सर्वांना सुखी केले ॥ ७ ॥ एकदा कुबेरावर हल्ला करुन त्याला जिंकून त्याचे पुष्पक विमान रावण घेऊन आला. ॥ ८ ॥ नंतर एकदा ) त्याने जाऊन सहज लीलेने कैलास पर्वत उचलला व जणूं आपले भुजबल तोलून पाहीले आणि त्याला फार सुख झाले ॥ दो० १७९ ॥

सुख सुत सैन्य साह्य संपत्ती । जय, बल बुद्धी प्रताप महती ॥
वाढति नवनव निशिंवासर तीं । प्रतिलाभें जशि लोभा भरती ॥
अतिबल कुंभकर्णसा भ्राता । जगीं जया प्रतिभट न पहातां ॥
पान करुनि निजतो षण्‌मासीं । जैं जागे धडकीं त्रिजगासी ॥
प्रतिदिन तो जर दुर्भर भरता । विश्वा वेगें सपाट करता ॥
समरधीर करुं कसें वर्णना । तत्सम वीर बलाढ्य न गणना ॥
मेघनाद मोठा सुत रावणि । लेखित लोकिं सकल-वीराग्रणि ॥
ज्या कोणि न रणिं सन्मुख वळतें । सुरपुरिं सतत पळापळ उडते ॥

दो. :- कुमुख अकंपन कुलिशरद धूमकेतु अतिकाय ॥
प्रत्येक हि जग जिंकि कीं ऐसे सुभट-निकाय ॥ १८० ॥

सुख, सुत, सैन्य, सहायक, संपत्ती, जय, बल बुद्धी, प्रताप, व प्रतिष्ठा ही सर्व रात्रंदिवस नवीन नवीन वाढत होती. प्रत्येक वेळी लाभ झाला की जसा लोभ वाढतो तशी वाढली ॥ १-२ ॥ ज्याच्या तोडीचा योद्धा जगात शोधून सुद्धा सापडत नव्हता असा कुंभकर्णासारखा अतिबल असलेला भाऊ ॥ ३ ॥ तो मद्य पिऊन सहा महिने निजत असे ( पण ) जागा झाला म्हणजे त्रैलोक्याला धडकी भरत असे. ॥ ४ ॥ त्याने जर कधी न भरणारे - उदर दररोज भरले असते तर सर्व विश्व लवकरच सपाट करुन टाकले असते ॥ ५ ॥ कुंभकर्ण किती रणधीर होता याचे वर्णन मी कसे करूं शकणार ! त्याचे बलाढ्य वीर अगणित होते ॥ ६ ॥ रावणाचा मोठा मुलगा मेघनाद सर्व लोकांत वीराग्रणी म्हणून मानला जात असे ॥ ७ ॥ रणांगणात त्याच्या समोर येण्याची - फिरकण्याची कोणाची छाती नव्हती व स्वर्गलोकात तर ( त्याच्या भयाने ) सदा पळापळ उडत असे ॥ ८ ॥ कुमुख, अकंपन, कुळिशरद ( वज्रदंत, वज्रदंष्ट्र ) धूमकेतू व अतिकाय यांच्यासारखा एकेकटा जग जिंकू शकेल अशा सुभटांचे पुष्कळ समुदाय होते ॥ दो० १८० ॥

कामरूप सब अति मायावी । स्वप्निंहि धर्म दया ना ठावी ॥
सभे एकदां बसला रावण । पाहे निजपरिवारा पार न ॥
पुत्र पौत्रगण कुटुंब परिजन । कोण गणुं शके ते निशिचरगण ॥
सेना बघुनि सहज अभिमानी । क्रोध मदें युत वदला वाणी ॥
ऎका निशिचरवरूथ सगळे । विबुध-संघ निज वैरि आगळे ॥
ते सन्मुख ना युद्धा वळती । प्रबल रिपूला पाहुनि पळती ॥
त्यांच्या मरणा एक उपाया । सांगूं आतां श्रवण करा या ॥
द्विजभोजन मख होमां श्राद्धां । करा जाउनी सकलां बाधा ॥

दो. :- क्षुधाक्षीण बलहीन सुर सहज शरण येतील ॥
तैं मारूं वा सोडुं कीं मज वश जर होतील ॥ १८१ ॥

सगळे इच्छेनुसार रुप घेणारे होते व सर्वच अति मायावी होते व त्यांस धर्म व दया स्वप्नातही माहीत नव्हती ॥ १ ॥ एकदा रावण सभेत बसला असता त्याने आपला अपार परिवार पाहीला. ॥ २ ॥ त्यात पुत्र व नातू यांचे समुदाय व कुटुंबी परिजन यांचे अगणित समुदाय होते त्या निशाचरांच्या ( विविध ) गणांची गणना कोण करुं शकणार ? ॥ ३ ॥ ती सर्व सेना पाहून तो सहज अभिमानी क्रोध-मदाने युक्त असे भाषण करुं लागला ॥ ४ ॥ सर्व निशाचर वरुथहो, ऐका ! देवांचे सर्व समुदाय आपले मोठे वैरी आहेत ॥ ५ ॥ ते - देव युद्धाला समोर उभेच रहात नाहीत, प्रबल शत्रूला पाहताच पळ काढतात ॥ ६ ॥ तेव्हा आता त्यांच्या मरणाला असलेला एक उपाय हा आहे, सांगतो - ऐका. ॥ ७ ॥ ब्राह्मण-भोजन, होम-यज्ञ-याग, श्राद्ध, इत्यादित जाऊन तुम्ही विघ्ने आणा ॥ ८ ॥ त्यामुळे क्षुधेने क्षीण झालेले व बलहीन झालेले देव सहज शरण येतील मग त्यांना ठार मारु किंवा मला वश होऊन राहीले तर सोडुन देऊं ॥ दो० १८१ ॥

घननादा बोलावुनि आणवि । दे उपदेश वैर बल वाढवि ॥
समरधीर बलवंत सुरांनां । जे धरिती कीं रणाभिमाना ॥
रणीं जिंकुनी आण बांधुनी । जावें पितृवच वंद्य मानुनी ॥
ऐसें देउन सर्वां शासन । निघे गदा करिं घेउन आपण ॥
दशमुख चाले डोले अवनी । गर्जत गळति गर्भ सुररमणी ॥
क्रोधें रावण येत, परिसती । देव मेरुगिरि गुहा हुडकती ॥
दिक्पालांचे लोक सुशोभन । पाहे सगळे शून्य! दशानन ॥
सिंहनाद करि कितिदां भारी । गाळि देइ देवां पाचारी ॥
रणमदमत्त फिरे जगिं धावत । शोधी प्रतिभट कुठें न पावत ॥
रवि शशि पवन वरुण धनधारी । अग्नि काल यम सब अधिकारी ॥
किन्नर नाग सिद्ध नर अमरां । पाठिं हठें लागे अति जबरा ॥
ब्रह्मसृष्टि जितकी तनु-धारी । दशमुख वशवर्ती नरनारी ॥
आज्ञापालन सुभीत करती । नित्य येति पदिं विनम्र नमती ॥

दो. :- करुनि विश्व वश भुजबळें ठेवि न कुणा स्वतंत्र ॥
मंडलीकमणि रावणा शासनिं आपला मंत्र ॥ १८२ रा ॥
दो. :- देव - यक्ष - गंधर्व - नर - किन्नर - नाग - कुमारि ॥
जिंकि वरी निज भुजबळें बहु सुंदर वर नारि ॥ १८२ म ॥

मग मेघनादाला बोलावून आणवून देव वैर व त्याचे बळ वाढेल असा उपदेश केला. ॥ १ ॥ ज्या देवांना युद्धाचा अभिमान असेल व जे बलवान व रणधीर असतील त्यांना रणात बांधून जिंकून आण जा ऊठ, व आपणही गदा हातात घेऊन निघाला ॥ ४ ॥ दशानन चालू लागला तेव्हा पृथ्वी डोलू लागली व गर्जना करताच देवस्त्रियांचे गर्भ गळून पडूं लागले ॥ ५ ॥ रावण क्रुद्ध होऊन येत आहे असे ( कळताच ) कानी पडताच देव मेरु पर्वताच्या गुहा हुडकूं लागले. ॥ ६ ॥ इंद्रादि दिक्पालांचे लोक रावणाने पाहीले तो त्यास ते सर्व रिकामे दिसले ॥ ७ ॥ त्याने वारंवार मोठ्याने सिंहनाद केला, देवांना आव्हान देऊन शिव्या दिल्या ॥ ८ ॥ रणमदाने धुंद होऊन सर्व जगात धावाधाव केली पण त्याच्याशी युद्ध करणारा वीर शोधून सुद्धा त्याला भेटला नाही. ॥ ९ ॥ रवी, चंद्र, वायू, वरुण, कुबेर, अग्नी, काळ, यम इत्यादी सर्व मोठे अधिकारी तसेच किन्नर, नाग, सिद्ध, नर व अमर यांच्या पाठीस तो जबरा रावण अति हट्टाने लागला. ॥ १०-११ ॥ ब्रह्मदेवाच्या सृष्टीतील सर्व देहधारी प्राणी - स्त्री - पुरुष दशमुखाला वश होऊन त्याच्या तंत्राने वागू लागले. ॥ १२ ॥ सर्वच अगदी भयभीत होऊन त्याची आज्ञा पालन करु लागले व नित्य नियमाने येऊन त्याच्या पायांना अत्यंत नम्रतेने नमन करू लागले. ॥ १३ ॥ रावणाने सर्व विश्व आपल्या भुजबळाने वश केले व कोणालाही स्वतंत्र ठेवले नाही. मंडलीकांचा शिरोमणी असा रावण आपल्या स्वत:च्या यंत्रणेनुसार सत्ता चालवूं लागला. ॥ दो०१८२ रा ॥ देव, यक्ष, गंधर्व, नर, किन्नर, नाग, यांच्या सुंदर सुंदर कुमारी व पुष्कळ सुंदर उत्तम स्त्रिया त्याने आपल्या भुजबळाने जिंकून त्याच्याशी विवाह केले ॥ दो० १८२ म ॥

इंद्रजिता जें कथिलें जेवीं । तो जणुं आधिं करुन तें ठेवी ॥
आज्ञा प्रथम जयां दिधली ते । पहा कशा करती करणीतें ॥
दिसती भीमरूप सब पापी । निशिचर-निकर देव-परितापी ॥
असुर निकाय उपद्रव करती । विविधरूप मायेनें धरती ॥
जेणें होइ धर्म-निर्मूलन । श्रुति-विरोधि ते करिती भूल न ॥
जिथें जिथें द्विज धेनू पावति । नगरगांवपुरि आगी लावति ॥
शुभ आचरणा करि कोणी ना । देव विप्र गुरु कुणि मानी ना ॥
ज्ञान भक्ति जप तप मख कांहिं न । वेद पुराणें स्वप्निंहि कानिं न ॥

छ. :- जप योग विरागहि तप-मख-भागहि कानिं येत दशशीसा
तो धावत येई चालु न देई सकल नेइ विध्वंसा ॥
आचार महितला भ्रष्ट जहाला धर्महि ये ना कानां ॥
त्यां विविधा त्रासवि विदेशिं घालवि वदती वेद पुराणां ॥ १ ॥
सो. :- वदलि न जाइ अनीति घोर निशाचर जी करिति ॥
अति हिंसेची प्रीति त्यांच्या पापा कवण मिति ॥ १८३ ॥

इंद्रजिताला जे जसे सांगितले होते ते त्याने जणू आधीच करुन ठेवले होते. ॥ १ ॥ ज्यांना प्रथम आज्ञा दिली होती त्यांनी कशी काय करणी केली, ती ऐका ॥ २ ॥ देवांना दु:ख - संताप देणारे ते सर्व निशाचार समूह दिसण्यात भयानक व पापी होते ॥ ३ ॥ मायेने विविधरुप धारण करुन सुद्धा ते असुर समुदाय उपद्रव देत होते ॥ ४ ॥ ज्यांच्या योगाने धर्माचे निर्मूलन होईल असे वेद विरोधी उपाय करण्यात ते मुळीच चुकत नव्हते ॥ ५ ॥ जिथे गाई व ब्राह्मण दिसतील त्या त्या नगर - गांव - खेड्यांना ते आगी लावत असत ॥ ६ ॥ त्यामुळे कोणी कुठेही पुण्याचरण धर्माचरण करीनासे झाले व देव - ब्राह्मण - गुरु यांना कोणीच मानेनासे झाले ॥ ७ ॥ हरीभक्ती, ज्ञान, जप, तप, यज्ञयागादि बंद झाले व वेद - पुराणे स्वप्नात सुद्धां ऐकू येईनासे झाले ॥ ८ ॥ छं०- जप - तप - वैराग्य करीत आहेत, यज्ञभाग ( देवांना ) दिले जात आहेत, असे रावणाच्या कानी येताच तो धावत येई व त्यातील काही सुद्धां चालू न देता सगळ्यांचा विध्वंस करुन टाकीत असे. याप्रमाणे या पृथ्वीतलावर आचार भ्रष्ट झाला; धर्म कानांनी ऐकू येत नाहीसा झाला ॥ सो ॥ घोर निशाचर जी अनीती करु लागले तिचे वर्णन करणे शक्य नाही त्यांची हिंसेवर फार प्रीती असल्याने त्यांच्या पापांना मर्यादा कुठली ? ॥ दो०- १८३ ॥

* * * * *

श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु

GO TOP