॥ श्रीरामचरितमानस ॥

(मराठी अनुवाद)

॥ बालकाण्ड ॥

अध्याय २१ वा

॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥


Download mp3

वाढति बहु खल चोर जुगारी । जे परधन-लंपट परदारी ॥
मानिति माय न पिता न देवां । साधूं-करवीं करविति सेवा ॥
ज्यांचें असं आचरण भवानी । जाण सर्व निशिचर ते प्राणी ॥
ग्लानी अति धर्माची कळतां । सु-भय धरेला परम विकलता ॥
गिरि सरि सिंधु भार मज नाहीं । परद्रोहि जड एक जसाही ॥
पाहि सकल धर्मां विपरीतां । वदुं न शके रावण-भय-भीता ॥
धेनुरूप धरूनी सुविचारें । गता जिथें सुर-मुनि-गण सारे ॥
रडुनी दाखवि निजदुःखाला । कांहींही करवे न कुणाला ॥

छं :- सुरमुनि गंधर्वहि मिळुनि सर्वहि विरंचिचे गतलोकीं ॥
सह गोतनुधारी भूमि बिचारीं परम विकल भय शोकीं ॥
ब्रह्मा सब जाणति मनिं अनुमानति मम आधीन न कांहीं ॥
ज्यांची तूं दासी ते अविनाशी तुला सहाय अह्यांही ॥ १ ॥
सो० :- धरे धरी धीरास स्मर हरिपद वदले द्रुहिण ॥
जाणति जन-दुःखास प्रभु करि दारुण-भय-हरण ॥ १८४ ॥

परधन व परस्त्री यांची तीव्र लालसा बाळगणारे असे अती खल, चोर व जुगारी लोक फार वाढले ॥ १ ॥ आई - बाप - देव इत्यादिना मानीत नाहीत व साधूंकडून सेवा करुन घेतात ॥ २ ॥ भवानी ! असे ज्यांचे आचरण असेल ते सर्व प्राणी राक्षस आहेत असे जाणावे ॥ ३ ॥ धर्माची अत्यंत ग्लानी झाली आहे असे पाहून धरेला अती भीती पडली व ती अत्यंत व्याकुळ झाली ॥ ४ ॥ ( ती म्हणते ) मला एका परद्रोहाचा भार जितका जड वाटतो तेवढा सर्व पर्वत, नद्या, सागर यांचा वाटत नाही ॥ ५ ॥ सर्व धर्म विपरीत झालेले आढळले, पण रावणाच्या भयाने घाबरलेली असल्याने ( कोणाजवळ ) काही बोलण्याची सोय नाही. ॥ ६ ॥ तिने चांगला विचार करुन धेनूरुप घेतले व जेथे सगळे सुरमुनीगण होते तेथे गेली ॥ ७ ॥ तिने रडून आपले दु:ख प्रगट करून दाखवले पण कोणाकडूनही तिचे कार्य झाले नाही. ( कोणाला काहीच करता येईना ) ॥ ८ ॥ छं- देव, मुनी, आणि गंधर्व हे सगळेच एकत्र मिळून विरंचीच्या लोकात गेले भयाने व शोकाने अत्यंत विव्हळ झालेली बिचारी गो ( धेनू ) रुप धारण केलेली भूमी त्यांच्याबरोबर गेली ब्रह्मदेवांनी सर्व काही जाणले व मनात अनुमानाने ठरविले की माझ्या आधीन काही सुद्धा नाही. तू ज्यांची दासी आहेस ते अविनाशी प्रभू तुला व आम्हाला ही साह्यकर्ते आहेत. ॥ सो० ॥ (म्हणून) धरे ! धीर धर व हरिपदाचे स्मरण कर ते भक्तांचे (सेवकांचे) दु:ख जाणतात ते प्रभू दारुण भयहरण करतील असे द्रुहिण=ब्रह्मदेव म्हणाले ॥ दो०१८४ ॥

करित विचार सकल सुर बसती । प्रार्थाया प्रभु कुठें गवसती ॥
वैकुण्ठा जावें कुणि वदती । प्रभु पयनिधिं वसती कुणी म्हणती ॥
प्रीति भक्ति जशि हृदयी ज्यातें । प्रगट सदा प्रभु तैसे त्यातें ॥
उमे! सभें त्या होतों बसलों । अवसर पावुनि वच मी वदलों ॥
हरि सर्वां व्यापुनि सम राहति । मी जाणें की प्रेमें प्रगटति ॥
देश काल दिग् विदिक् कवण ती । सांगा तरि जेथें प्रभु नसती ॥
अग-जग-मय निर्लेप अलग तो । प्रेमें पावक तसा प्रगटतो ॥
मत माझें सकलां आवडालें । साधु साधु तैं ब्रह्मा वदले ॥

दो० :- तैं विरंचि मनिं हर्ष तनु पुलकित नयनीं नीर ॥
जोडुनि कर करती स्तुती सावधान मति धीर ॥ १८५ ॥

सगळे देव तेथे बसले व विचार करु लागले की प्रभूची प्रार्थना करण्यास ( यावेळी ) ते कोठे सापडतील ? ॥ १ ॥ कोणी म्हणाले की वैकुठास जावे, कोणी म्हणाले की ते प्रभू क्षीरसागरात राहतात ॥ २ ॥ ज्याच्या हृदयात जशी भक्ती व जशी प्रीती असेल त्याप्रमाणे प्रभू सदा प्रगट होतात. ॥ ३ ॥ मी पण त्या सभेत समाजात बसलो होतो तेव्हा योग्य वेळ पाहून मी सुद्धा म्हणालो की - ॥ ४ ॥ हरी सर्व ठिकाणी सर्वांना सारखे व्यापून राहीले आहेत, व ते प्रेमाने प्रगट होतात हे मी जाणतो ॥ ५ ॥ असा कोणता देश, काल, दिशा वा उपदिशा आहेत की जेथे प्रभू नाहीत ते सांगा तर खरे ! ॥ ६ ॥ प्रभू सर्व चराचर - मय असून अलिप्त व त्याहून निराळे पण आहेत, अग्नि जसा मंथनाने उत्पन्न होतो - प्रगट होतो, तसे प्रभू प्रेमाने (प्रेमासाठी) प्रगट होतात. ॥ ७ ॥ माझे हे मत सर्वांना आवडले व ‘ साधु साधु ’ = उत्तम असे ब्रह्मदेव म्हणाले ॥ ८ ॥ तेव्हा ( हे माझे भाषण ऐकून ) विरंचीच्या मनात हर्ष झाला, शरीरावर रोमांच उभे राहीले, नेत्रांतून पाणी वाहू लागले व दोन्ही हात जोडून ते धीर बुद्धी सावधानतेने स्तुती करुं लागले ॥ दो०१८५ ॥

छ. :- जय जय सुरनायक जन सुखदायक प्रणतपाल भगवंता
गो-द्विज-हितकारी जय असुरारी सिंधुसुता-प्रियकान्ता ।
पालन सुरधरणी अद्‌भुतकरणी मर्म कळे न कुणाही ।
जो सहज कृपाळू दीन दयाळू करो अनुग्रह तो ही ॥ १ ॥
जय जय अविनाशी सब घटवासी व्यापक परमानंदा ।
अविगत गोऽतीता चरित-पुनीता मायारहित मुकुंदा ॥
ज्या लागिं विरागी अति अनुरागी विगतमोह मुनिवृंदा ॥
दिनरातीं ध्याती गुणगण गाती जयति सच्चिदानंदा ॥ २ ॥
जो सृष्टि उपजवी त्रिविधा बनवी कोणी साह्य न दूजा ।
तो देवो अघहर लक्ष अम्हांवर जाणूं भक्ति न पूजा ।
जो भवभयभंजन मुनिमनरंजन गंजन विपद्‌वरूथं ।
मन-वाक्‌कृति-बाणा त्यजुनी ज्ञाना शरण सकल सुरयूशा ॥ ३ ॥
वाणी-श्रुतिशेषां ऋषिस अशेषां ज्याचें ज्ञान कुणा ना ॥
प्रिय दीन जया श्रुति वदति दया अति ये कीं श्री भगवाना ॥
भववारिधिं मंदर सबविधिं सुंदर गुणमंदिर सुखपुंजा ॥
मुनि सिद्ध सकल सुर परम भयातुर नमिति नाथ पदकंजां ॥ ४ ॥

दो० :- बघुनि सभय सुर भूमि तें परिसुनि वच सस्नेह ॥
होइ गभीरा नभगिरा हरणि शोक संदेह ॥ १८६ ॥

ब्रह्मदेव कृत (अश्विनी नक्षत्र) रामस्तुती
- हे देवांच्या नायका ! दासांना सुख देणार्‍या ! शरणागतांचे पालन करणार्‍या भगवंता ! आपले ऐश्वर्य प्रगट करा, गोब्राह्मणांचे हित करणार्‍या असुरांचा विनाश करणार्‍या ! सिंधुसुतेच्या लक्ष्मीच्या प्रिय कान्ता ! आपले ऐश्वर्य प्रगट करा ! सुर व धरणी यांचे पालन करणार्‍या ! ज्याची करणी अदभुत असते व तिचे मर्म कोणालाही कळत नाही असा जो स्वभावताच कृपाळू व दीनांवर दया करणारा आहे तोच आमच्यावर कृपा करो. ॥ छं१ ॥ हे अविनाशी ! प्रत्येक देहपिंड रुपी घटात वास करणार्‍या सर्वव्यापक परमानंदा ! आपले ऐश्वर्य प्रगट करा. जे विशेष ज्ञानातीत, इंद्रियातीत आहेत ( पण ) ज्यांचे चरित्र पुनीत असते, जे मायारहित आहेत, मोक्ष देणारे आहेत, ज्यांच्या प्राप्तीसाठी वैराग्यशील व मोहरहित मुनिवृंद अत्यंत अनुरागाने रात्रंदिवस ध्यान करीत असतात व गुणगण गातात अशा सच्चिदानंद स्वरूप प्रभो ! आपले ऐश्वर्य प्रगट करा ! ॥ छं२ ॥ दुसरा कोणी साह्य नसता जो त्रिगुणात्मक सृष्टी उत्पन्न करुन तिची सुंदर रचना करतो तो दु:खपाप विनाशक आमच्याकडे लक्ष देवो; आम्ही भक्ती पूजा वगैरे काही जाणत नाही ! जो भवभयाचे भंजन करणारा, मुनींच्या मनाचे रंजन करणारा, व विपत्ती समुदायांचा विनाश करणारा आहे त्याला आम्ही सगळे सुरसमाज कायिक, वाचिक व मानसिक अभिमान आणि ज्ञानाहंकार सोडून शरण आलो आहोत ॥ छ ३ ॥ शारदा, वेद, शेष व समस्त ऋषी यांपैकी कोणालाही ज्ञान नाही व ज्याला दीन अती प्रिय आहेत असे वेद म्हणतात, त्या भगवंताला आमची दया येवो की भवसागराला मंदराचला प्रमाणे असणार्‍या, सर्व प्रकारे सुंदर असणार्‍या, सर्व गुणांचे मंदिर असणार्‍या नाथा ! मुनी, सिद्ध, व सगळे देव अत्यंत भय विव्हळ होऊन आपल्या चरणकमलांना वंदन करीत आहेत. ॥ छं ४ ॥ (ब्रह्मादि सर्व) देव आणि भूमी यांना भयभीत जाणून आणि त्यांचे स्नेहमय वचन ऐकून शोक हरण करणारी गंभीर आकाशवाणी झाली की- ॥ १८६ ॥

भिऊं नका मुनि सिद्ध सुरेश्वर । तुमचेस्तव धरुं नरवेषा वर ॥
अंशांसहित मनुज अवतारा । घेइन दिनकरकुलीं उदारा ॥
करतां कश्यप अदिती तप महा । पूर्वीं त्यां मी दिला वर पहा ॥
तीं दशरथकौसल्यारूप । कोसलपुरीं प्रगट नरभूप ॥
जाउनि धरुं तद्‌गृहिं अवतार हि । रघुकुलतिलक बंधु ते चारहि ॥
नारद वचन सत्य सब करतो । परम शक्ति समेत अवतर तो ॥
करिन सकल भूभार निवारण । निर्भय आतां रहा देवगण ॥
नभीं ब्रह्मवाणी ती श्रवुनी । शीघ्र निघति सुर हृदयें निवुनी ॥
तैं ब्रह्मा सांत्विति धरणीला । धरी भरवंसा त्यजि भीतीला ॥

दो० :- गत विरंचि निज लोकिं तैं अस सांगुनि देवांस ॥
महिवर वानर वपु धरुनि सेवा हरि पायांस ॥ १८७ ॥

मुनी, सिद्ध व देवश्रेष्ठ हो ! तुम्ही ( मुळीच ) भिऊ नका. मी तुमच्यासाठी उत्तम नरवेष धारण करीन ॥ १ ॥ मी माझ्या अंशांसह उदार अशा सूर्यवंशात मनुज अवतार घेईन ॥ २ ॥ पूर्वी अदिती कश्यप यानी महातप केले तेव्हा मी त्यास पूर्वीच वर दिला आहे ॥ ३ ॥ तीच कश्यप-अदिती दशरथे कौसल्यारुप धारण करुन अयोध्यापुरीत नरभूपती रुपाने प्रगट आहेत. ॥ ४ ॥ त्यांच्या घरी जाऊन अवतार घेईन तेच रघुकुल तिलक चारी बंधू समजावे. ॥ ५ ॥ नारदांचे सर्व वचन सत्य करतो व परम शक्तीसह अवतार घेतो॥६ ॥ मी सर्व भूभार हरण करीन तरी देवगण हो आता तुम्ही अगदी निर्भय रहा ॥ ७ ॥ आकाशात झालेली ती ब्रह्मवाणी कानी पडताच देवाचे हृदय निवले व ते त्वरेने निघाले ॥ ८ ॥ तेव्हा ब्रह्मदेवानी धरणीचे सांत्वन केले तेव्हा तिला भरवंसा वाटला व ती निर्भय झाली ॥ ९ ॥ विरंचीनी सर्व देवांस सांगितले की तुम्ही पृथ्वीवर जाऊन वानर शरीरे धारण करुन हरिचरणांची सेवा करा असे सांगून ते आपल्या ब्रह्मलोकास गेले ॥ दो० १८७ ॥

* * * * *

श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु

GO TOP