॥ श्रीरामचरितमानस ॥

(मराठी अनुवाद)

॥ बालकाण्ड ॥

अध्याय १२ वा

॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥


Download mp3

स्वागति वर्‍हाड घेऊन आले । जानोसे त्या रुचिर अर्पिले ॥
सज्ज करी शुभ आरति मयना । गाती मंगल गीतें ललना ॥
कनकपात्र करिं चारु भासतें । हर्षि हरा ओवाळुं चालते ॥
पाहुनि रुद्रा कराल वेषीं । अबला उरिं भयभीत विशेषीं ॥
घुसल्या सभय घरामधिं धावत । गेले महेश जानोशाप्रत ॥
मैना चित्तीं दुःखी भारी । बोलविली गिरीश कुमारी ॥
अंकीं बसवी स्नेहें भारी । श्याम-सरोज-नयनिं ये वारी ॥
या रूपा तुज विधि देई जो । कां जड वर बावळा सृजी तो ॥

छंद :- कां बावळा वर निर्मि विधि जो तुजसि सौंदर्यास दे ।
सुरतरुसि फळ जें उचित जबरीं बाभळीला येइ तें ॥
गिरिवरुनि तुजसह पावकीं वा मी पडेन किं सागरीं ॥
घर बुडो अपयश हो‍उं जगिं जगतां विवाह न मीं करीं ॥ १ ॥
दो. :- विकल सकल अबला बघुनि गिरिनारी-दुःखास ॥
रडे वदे विलपतां अति स्मरुनि सुतास्नेहास ॥ ९६ ॥

स्वागत करणारी मंडळी वर्‍हाडास घेऊन आली, व त्या सर्वांना ( निरनिराळे ) सुंदर जानोसे ( उतरण्यास ) दिले गेले. ॥ १ ॥ मैनेने स्वत: मंगलारतीची तयारी केली व स्त्रिया तिच्याबरोबर मंगल गीते गाऊ लागल्या. ॥ २ ॥ मैनेच्या हातात कनकाचे तबक ( आरतीचे ) आहे व ती ( सर्व स्त्रियांसह ) हराला ओवालण्यासाठी हर्षाने चालू लागली ॥ ३ ॥ जेव्हा कराल वेषातील रुद्र दिसले तेव्हा त्या सर्व अबलांच्या उरात भयाने विशेष धडकीच भरली. ॥ ४ ॥ त्या भयभीत होऊन धावत पळत घरात घुसल्या. महेश जानोशाच्या ठिकाणी गेले. ॥ ५ ॥ मैना मनात फारच दु:खी झाली. व तिने गिरीशकुमारीला बोलावून घेतली ॥ ६ ‍॥ अत्यंत स्नेहाने मुलीला मांडीवर घेतली तोच मैनेचे कृष्णकमळासारखे नेत्र पाण्याने भरले. ॥ ७ ॥ व म्हणाली ज्या विधीने तुला हे असलं रुप दिलं त्या जडानेच असा जड व बावळा वर निर्माण केला तरी कशाला ! ॥ ८ ॥ ज्या विधीने तुला सौंदर्य दिले त्यानेच बावळट वर कशाला व कां निर्माण केला ? जे फळ कल्पवृक्षाला लागणे योग्य ते जबरीने बाभळीला लागत आहे. ( छे ! छे ! ते काही नाही ) मी तुझ्यासह पर्वताच्या कड्यावरून उडी घेईन किंवा अग्नित वा सागरात पडेन; घर बुडालं, अपकीर्ती जगात झाली तरी हरकत नाही, पण माझ्या जीवात जीव आहे तोवर मी हा विवाह करू देणार नाही ॥ छंद ॥ गिरिनारीला झालेले दु:ख पाहूने सगळ्या अबला व्याकुळ झाल्या, तो मुलीचा स्नेह आठवून आठवूने अतीविलाप करीत, रडत रडत मेना म्हणाली की ॥ दो० ९६ ॥

काय नारदा मी बिघडीलें । ग्रह किं नांदते मम बुडवीलें ॥
त्यांनी असें उमे शिकवीलें । मूढ वरास्तव तप आचरिलें ॥
त्यांस खरेंच न मोह न माया । उदासीन धन धाम न जाया ।
परघरघातक लाज खेद ना । वांझ किं जाणे प्रसव-वेदना ॥
जननी व्याकुळ बघुनि भवानी । वदली विवेकयुत मृदु वाणी ॥
कर विचार शुच हा त्यज आई । ब्रह्मलिखित फिरविलें न जाई ॥
कर्मिं लिखित जर नाथ बावळा । द्यावा का मग दोष कुणाला ॥
पुसशिल कीं तूं विधिचे अंका । घेसि वृथां कां जननि कलंका ॥

छं. :- कां घेसि जननि कलंक शोका सोड हा अवसर नसे ।
जें दुःख सुख मम लिखित भालीं जाइं तेथें मिळतसें ॥
या उमा वचनिं विनीत कोमल सकल अबला शोचती ।
बहुरीतिं विधिला देति दूषण नयन वारि विमोचती ॥ १ ॥
दो० :- समाचार हा तुहिन-गिरि ऐकुनि त्या समयास ।
नारदमुनि सह सप्तऋषि गेले शीघ्र गृहास ॥ ९७ ॥

मी नारदाचं असं काय बिघडवलं की त्यानी माझं नांदतं घर बुडवून टाकलं. ॥ १ ॥ त्यांनी उमेला असं काही शिकवल की तिने वेड्या वरासाठी तप केलनं ! ॥ २ ॥ त्याना ना मोह, ना माया असे म्हणतात ते अगदी खरं; सदा उदासीन, घर ना दार, बायको ना पोर, कवडी नाही जवळ ! ॥ ३ ॥ म्हणून दुसर्‍यांच्या घरांचा घात करताना त्यांना लाज ना खेद, ! वांझेला प्रसूतीच्या वेदना कशा कळणार ? ॥ ४ ॥ जननी व्याकुळ झाली आहे असे पाहून भवानी विवेकयुक्त मृदुवाणीने म्हणाली ॥ ५ ॥ ब्रह्मदेवाने जे कपाळी लिहिले असेल ते टळत नाही असा विचार कर. नि आई हा शोक सोड. ॥ ‍६ ॥ माझ्या कर्मात जर बावळा पतीच लिहिला आहे. तर दुसर्‍या कोणाला दोष का बरं द्यावा ॥ ७ ॥ कपाळिची ब्रह्मलिखित रेषा तूं पुसशील कां ? (नाही) मग आई ! वृथा कलंक का लावून घेतेस ? ॥ ८ ॥ ( भवानी म्हणाली ) शोक सोड पाहूं ही वेळ शोक करीत बसण्याची नाही ( कारण ) माझ्या कपाळी जे दु:ख, सुख लिहीले असेल ते मी जाईन तेथे मिळणारच. ( चुकणार नाही ) उमेचे हे विनय युक्त व कोमल भाषण ऐकून सगळ्या अबला चिंता – चिंतन – विचार करू लागल्या व नाना प्रकारांनी विधीला दोष देत डोळ्यातूने आसवे गाळूं लागल्या. ॥ छंद ॥ त्याच वेळी हा समाचार समजताच नारदासहित व सप्तर्षीसह हिमाचल त्वरेने घरी गेले. ॥ दो० ९७ ॥

नारद समजविति सर्वांला । सांगुनि पूर्व कथा-वृत्ताला ॥
ऐक सत्य, मैने! मम वाणी । जगदंबा तव सुता भवानी ॥
शक्ति अनादि अजा अविनाशिनि । सदा शंभु-अर्धांग-निवासिनी ॥
जग संभव-पालन-लयकारिणि । स्वेच्छें लीला-विग्रह-धारिणि ॥
प्रथम दक्ष-गृहिं जन्मे जाउनि । नाम सती सुंदर तनु पाउनि ॥
सती तिथें पण शिवा विवाही । विश्रुत विश्वीं सर्व कथा ही ॥
एक वेळ येतां शिव-संगा । पाहुन रघुकुल-कमल-पतंगा ॥
मोह होइ मानि न शिवभाषण । भ्रमें सिता-वेषा कृत धारण ॥

छंद. - घई सती सिय वेष या अपराधिं शंकर टाकती ।
हरविरहिं गत जैं जनकमखिं योगानलीं तनुदग्धती ॥
तव भवनिं जन्मुनि निजपतीस्तव ती तपा करि दुःसहा ॥
गिरिजा सदा प्रिय शंकरा समजा त्यजा संशय महा ॥
दो. :- ऐकुनि नारदवच उडे सर्वांचाय विषाद ॥
क्षणिं पसरे सगळ्या पुरीं घरिं घरिं हा संवाद ॥ ९८ ॥

( घरी गेल्यावर ) पार्वतीच्या पूर्वजन्मकथेचा सर्व वृत्तांत सांगून नारदांनी सर्वांची समजूत घातली. ॥ १ ॥ मैने मी सत्य सांगतो, ते ऐक. तुझी ही मुलगी या जगाची जननी भवानी आहे. ॥ २ ॥ ती जन्मरहित, आदिरहित व ( अन्तरहित ) अविनाशी शक्ती असून, सदा सर्वकाल शंकरांच्या अर्धांगात निवास करणारी आहे. ॥ ३ ॥ ही जगाची उत्पत्ती, पालन व प्रलय करणारी असून, आपल्या इच्छेप्रमाणे लीला शरीर धारण करते. ॥ ४ ॥ हिने पहिल्या प्रथम दक्षाच्या घरी जाऊन जन्म घेतला; तेव्हा ( सुद्धा ) तिचे शरीर सुंदर होते व नांव सती होते. ॥ ५ ॥ तिथे पण सतीने शिवाशीच विवाह केला ही गोष्ट सर्व जगात प्रसिद्ध आहे. ॥ ६ ॥ एकदा शिवांच्या बरोबर ( दंडकारण्यातून ) येत असता रघुकुल – कमलांना विकसित करणारे सूर्य – रामचंद्र द्दष्टीस पडले ॥ ७ ॥ तेव्हा सती मोहवश झाली व शिवांनी सांगितले ते न ऐकता भ्रमाने सीतेचा वेष धारण केला. ॥ ८ ॥ जेव्हा सतीने सीतेचा वेष धारण केला तेव्हा मग त्या अपराधामुळे शंकरांनी तिचा त्याग केला. हरविरहाने दु:खी झालेली सती जेव्हा बापाकडील यज्ञात गेली तेव्हा त्या ( सती ) देहाचा योगाग्निने त्याग केला. आता तुमच्या घरी जन्म घेऊन तिने आपल्या पतीसाठी दु:सह तप केले. गिरीजा सदाच शंकरांना प्रिय आहे हे ( नीट ) समजा व महासंशय सोडा ॥ छंद ॥ हे नारदांचे भाषण ऐकून सर्वांचाच विषाद पळून गेला व एका क्षणात हा सगळा संवाद त्या नगरात घरोघरी पसरला. ॥ दो० ९८ ॥

तैं मैना हिमवंत आनंदति । पुन्हां पुन्हां पार्वति पद वंदति ॥
जरठ तरुण बालक नर नारी । सर्व नगरजन हर्षित भारी ॥
आरंभिति पुरिं मंगल-गाना । सकल सजिति हाटकघट नाना ॥
स्वयंपाक नानाविध झाला । जसा सूप-शास्त्रानें कथिला ॥
स्वयंपाक तो कोण किं वानी । वसे सदनिं जे जननि भवानी ॥
सादर सकल वर्‍हाड अणविती । विष्णु विरंचि येति सुर-जाती ॥
पंक्ति भोजना नाना बसती । निपुण वाढपी वाढुं लागती ॥
सुरां जेवतां स्त्रिया पाहती । मधुर उखाणे विविध घालती ॥

छंद. :- सुंदरि उखाणे मंजु घालति मर्म वचनें बोलती ।
सुर करिति भोजन सावकाश विनोद ऐकुनि हासती ॥
आनंद वाढे जेवतां मुख कोटि वर्णिति केविं तो ।
अचवून देतां पान जिथं जनवास ज्याचा जाइ तो ॥ १ ॥
दो. :- लग्न पत्रिका वाचिती मुनि मग हिमवंतासि ॥
लग्नसमय अवलोकुनी बोलाविति देवांसि ॥ ९९ ॥

तेव्हा मैना व हिमवान यांना फार आनंद झाला व दोघेजण पुन:पुन्हा पार्वतीच्या पायांना वंदन करीत सुटली ॥ १ ॥ तरुण मुले, म्हातारे पुरुष व स्त्रिया इ. त्या नगरातील सर्वच मंडळी फार हर्षित झाली. ॥ २ ॥ नगरात जिकडे तिकडे मंगल गीते गाण्यास पुन्हा प्रारंभ झाला व सर्वांनी नाना प्रकरचे सुवर्ण – मंगल – कलश सजविले. ॥ ३ ॥ ( इकडे राजवाड्यात ) पाकशास्त्राने वर्णिल्या प्रमाणे नाना प्रकारचा सर्व स्वयंपाक तयार झाला. ॥ ४ ॥ ज्या सदनात प्रत्यक्ष माता भवानीचा निवास आहे, तेथील स्वयंपाकातील पदार्थांचे वर्णन कोणीतरी करुं शकेल काय ? ॥५ ॥ सगळ्या वर्‍हाडाला मोठ्या आदराने बोलावून आणले, तेव्हा विष्णू, विरंची व इतर सर्व जातींचे देव आले ॥ ६ ॥ व ते निरनिराळ्या पंक्तींनी जेवणास बसले लगेच हुशार वाढपी वाढूं लागले. ॥ ७ ॥ देव जेवत आहेत असे पाहून स्त्रियांनी मधुर वाणीने विविध उखाणे घालण्यास प्रारंभ केला ॥ ८ ॥ सुंदर सुंदर स्त्रिया सुंदर सुंदर उखाणे घालून हास्यविनोदयुक्त बोलूं लागल्या व देव सावकाश जेवताहेत व तो विनोद ऐकून हशा पिकतो आहे, अशा रीतीने जेवताना आनंदाला जी भरती आली त्याचे वर्णन कोटी मुखांनी तरी कसे करवणार ! हात धुवून विडे वगैरे दिले गेल्यावर जो तो आपल्या जानोशाच्या ठिकाणी परत गेला. ॥ छं ॥ मग मुनींनी लग्नपत्रिका हिमवंतास वाचून दाखविली; तेव्हा लग्नाची वेळ जवळ आली हे जाणून त्यांनी देवांना बोलावणे पाठविले ॥ दो० ९९ ॥

अणवुनि सादर सर्व सुरांनां । आसन उचित दिलें सर्वांनां ॥
सजिति वेदविधिवत वेदीतें । नारि गाति शुभ मंगल गीतें ॥
सिंहासन अति दिव्य सुशोभन । रचित विरंचि न करवे वर्णन ॥
बसति नमुनि शिव विप्रपदांनां । स्मरुनि हृदीं प्रभु निज रघुराणा ॥
तदा मुनीश उमे बोलाविति । सखी तिला शृंगारुनि आणिति ॥
बघत रूप सुर सर्व मोहले । वर्णिति छवि कवि विश्विं कोठले ॥
जगदंबा जाणुनि भव-भामा । करिती सुर निज मनीं प्रणामा ॥
सुंदरतासीमाच भवानी । वर्णुं शकति ना कोटिहि वाणी ॥

छं. :- जगदंबिका शोभा महा मुखिं वर्णवेना कोटि ती ।
श्रुति शेष लज्जित शारदा, मग मंदमति तुलसी किती ॥
छविखाणि गत माता भवानी मध्यमंडपिं शिव जिथें ।
लाजे, शकेना पाहुं पतिपदपद्म मन मधुपचि तिथें ॥ १ ॥
दो. :- मुनिअनुशासनिं गणपतिसिं पूजिति शंभुभवानि ॥
ऐकुनि संशय धरुं नका सुर अनादि घ्या ध्यानिं ॥ १०० ॥

सर्व देवांना आदराने बोलावून आणवले व सर्वांना यथा योग्य आसनावर बसविले. ॥ १ ॥ वेदविधीप्रमाणे वेदी शृंगारुन तयार केली व स्त्रिया मंगल गीते गाऊं लागल्या. ॥ २ ॥ विरंचिने आपल्या हातांनी तयार केलेले अतिदिव्य व अति शोभायमान असे सिंहासन ( त्या वेदीवर ) मांडले, त्याचे वर्णन करता येणे शक्य नाही. ॥ ३ ॥ विप्रांना नमस्कार करून आपले प्रभु – रघुपतींचे हृदयात स्मरण करुन शिव त्या सिंहासनावर बसले. ॥ ४ ॥ ( शंकरांना सिंहासनावर बसविल्यानंतर ) मुनीशांनी उमेला बोलावली तेव्हा तिला शृंगारून सखी घेऊन आल्या. ॥ ५ ॥ उमेचे रुप द्दष्टीस पडताच सर्वदेव मोहित झाले, तेव्हा तिच्या शोभेचे वर्णन करतील असे कवी विश्वात कुठले असणार ! ॥ ६ ॥ ती जगाची माता व भवभामा आहे हे जाणूंन देवांनी मनात नमस्कार केला. ॥ ७ ॥ भवानी सौंदर्याची सीमा असल्याने कोट्यावधी वाणींनी सुद्धा वर्णन केले जाणे अशक्य आहे. ॥ ८ ॥ जगज्जननीच्या महाशोभेचे वर्णन कोटी मुखांनी सुद्धा करवणार नाही. वेद, शेष व शारदा सुद्धा ते करण्यास लाजतात, मग मंदमती तुलसीदासाची कथा ती काय ! शोभेची खाण अशी माता भवानी, मंडपाच्या मध्यभागी जेथे शिव होते तेथे गेली व लाजली, ( लाजेने ) तिला पतिच्या पदकमलांकडे पाहवेना; ( मात्र ) तिचे मन त्यांत मधुप झाले. ॥ छंद ॥ मुनींचे सूचने प्रमाणे शंभुभवानींनी गणपती पूजन केले हे ऐकून कोणी संशय मानूं नये व सर्व देव अनादि आहेत हे ध्यानात ठेवावे ( म्हणजे संशयास जागा रहाणार नाही ) ॥ दो० १०० ॥

श्रुति विवाहविधि वर्णिति जेवीं । करविति सकल महामुनि तेवीं ॥
घे गिरीश कुश कन्यापाणी । जाणुनि भवा समर्पि भवानी ॥
पाणिग्रहणा महेश करती । तैं सुरेश सब हृदयिं हर्षति ॥
वेदमंत्र मुनिवर उच्चरिती । जय जय जय शंकर सुर करती ॥
वाजति वाद्यें विविध विधानां । पुष्पवृष्टि गगनीं विध नाना ॥
झाला हरगिरिसुता विवाहू । सकल भुवनिं भरला उत्साहू ॥
दासीदास तुरग रथनागां । धेनु वसन मणि वस्तु विभागां ॥
अन्न कनक भाजनिं बहु यानीं । आंदण दिलें कवण वाखाणी ॥

छं. :- आंदण दिलें विविधा करां मग जुळुनि हिमगिरि बोलले ।
म्यां काय द्यावें आप्त कामा, धरुनि शिवपद राहले ॥
संतुष्ट शंकर सासर्‍या करिती कृपानिधि बहुपरीं ।
मग पाद पद्मां प्रेमपूरितमानसें मयना धरी ॥ १ ॥
दो. :- नाथ! उमा मत्प्राणसी गृह-किंकरी करा हि ॥
क्षमा अतां अपराध वर मजला प्रसन्न द्या हि ॥ १०१ ॥

वेदांनी जसा विवाह विधि सांगितला आहे, त्याप्रमाणे महामुनींनी सर्व विधी करविले. ॥ १ ॥ नंतर गिरीशाने आपल्या हातात दर्भ, पाणी व कन्येचा हात घेऊन ती भवानी आहे असे जाणून ती भवाला समर्पण केली. ॥ २ ॥ शंकरांनी जेव्हा पाणिग्रहण केले तेव्हा सर्व देवांना व देवश्रेष्ठांना आनंद झाला ॥ ३ ॥ ( हा विधि होताना ) मुनिवर वेदमंत्रांचा उच्चार करीत होते व देव जय जय जय शंकर म्हणून जय जय कार करीत होते. ॥ ४ ॥ नाना प्रकारची वाद्ये नाना परींनी वाजू लागली. आकाशातून नाना प्रकारच्या फुलांची वृष्टी होऊं लागली ॥ ५ ॥ हर व गिरीजा यांचा विवाह झाला ( याचा ) उत्साह सर्व भुवनात भरुन राहीला. ॥ ६ ॥ दासी – दास, घोडे, हत्ती, धेनू, वस्त्रे, रत्‍ने व इतर नानाविध वस्तू, तसेच सोन्याच्या पात्रात विविध अन्न भरुन, ती गाड्या, रथ वगैरे वाहनात भरली व या सर्व वस्तू आंदण दिल्या यांचे वर्णन कोण करुं शकेल ? ॥ ७-८ ॥
याप्रमाणे विविधा आंदण देऊन मग हिमगिरी हात जोडून म्हणाले की आपण पूर्णकाम आहांत, तेव्हा मी आपणांस काय देणार ? व लगेच ते शिवाचे चरण धरुन राहीले, तेव्हा शंकरांनी आपल्या सासर्‍यास अनेक प्रकारांनी संतुष्ट केले. मग मेनेने प्रेमपरिपूर्ण हृदयाने शंकराचे चरणकमल धरले ॥ छंद ॥ ( व म्हणाली ) नाथ ! उमा मला माझ्या प्राणांसारखी प्रिय आहे, तरी पण आपण तिला आपल्या घरची दासी करावी, आता तिचे सर्वापराध क्षमा करावे, हाच वर आपण प्रसन्न होऊन मला द्यावा ॥ दो० १०१ ॥

शंभु किती सासुस समजाविति । गता भवनिं शिर नमुनि पदांप्रति ॥
जननि उमे बोलावुनि घेई । अंकीं सुंदर शिकवण देई ॥
संतत कर शंकरपदपूजा । नारिधर्म पति देव न दूजा ॥
लोचनिं वळलें वदतां वारी । मग आलिंगी हृदयिं कुमारीं ॥
का विधि जगिं निर्मी नारींना । पराधीन सुख तों स्वप्नींना ॥
प्रेम परम विव्हळ करि माते । जाणुनि कुसमय धरि धीरातें ॥
भेटे असकृत् धरी पद नमी । प्रेम परम करुं कसें कथन मीं ॥
उमा सकल नारींस भेटली । जाउनि जननीउरीं चिकटली ॥

छं. :- भेटुनि पुन्हां माते निघे सब देति आशिस उचित ही ।
फिर फिरुनि जननिस पाहते सखि नेति शंभुसमीप ही ॥
सब याचका तोषूनि शंकर सह उमे गृहिं चालती ।
सब अमर हर्षति सुमन वर्षति वाद्य नभिं बहु वाजती ॥ १ ॥
दो. :- प्रेमें अति हिमगिरि सवें पोचविण्या जातात ॥
बहु सांत्वुनी निरोप त्यां वृषकेतू देतात ॥ १०२ ॥

शंभूंनी किती प्रकारांनी सासूची समजूत घातली; तेव्हा ती शंकरांच्या पायांना मस्तक नमवून घरात गेली ॥ १ ॥ मग त्या जननीने उमेला बोलावून घेऊन तिला मांडीवर घेतली व सुंदर शिकवण दिली. ॥ २ ॥ नित्य नियमाने सदा सर्वदा शंकरांच्या चरणांची पूजा ( सेवा ) करीत जा, कारण पतीला देव मानणे हाच स्त्रियांचा धर्म आहे. (दुसरा देव त्यांना नाही) दुसरा नाही. ॥ ३ ॥ ( हे ) सांगताना तिच्या डोळ्यात अश्रू आले तेव्हा तिने मुलीला हृदयाशी धरुन आलिंगन दिले. ॥ ४ ॥ विधीने स्त्रियांना निर्माण केल्या तरी कशाला ! सदा पराधीन व सुख तर स्वप्नात नाही. ॥ ५ ॥ परम प्रेमाने माता विह्वळ झाली, पण कुवेळ आहे हे जाणून तिने धीर धरला ॥ ६ ॥ अनेक वेळा तिला भेटते व वारंवार पाय धरुन नमस्कार करते आहे. अशा त्या परम प्रेमाचे वर्णन मला कसे करवेल ? ॥ ७ ॥ उमा ( भवानी ) सगळ्या स्त्रियांना भेटली आईजवळ जाऊन तिच्या पोटाला – छातीला बिलगली. ॥ ८ ॥ पार्वती पुन्हा एकदा मातेला भेटून निघाली, तेव्हा सर्व स्त्रियांनी तिला उचित आशीर्वाद दिले. जाताना ती पुन्हा पुन्हा मागे वळून आईकडे पाहू लागली, तेव्हा तिच्या सखींनी तिला शंभूजवळ नेऊन पोचवली. शंकरांनी सर्व याचकांस संतुष्ट केले व ते उमेसह आपल्या घरी निघाले, ते पाहून सर्व देवांना हर्ष झाला. व त्यांनी आकाशातून पुष्पवृष्टी केली व विविध वाद्ये वाजू लागली. ( वरात निघाली ) ॥ छंद ॥ त्यावेळी गिरिराज हिमालय जावयांना पोचविण्यासाठी अतिप्रेमाने बरोबर गेले शंकरांनी त्यांचे अनेक प्रकारे सांत्वन केले व त्यास निरोप दिला. ॥ दो० १०२ ॥

शीघ्र भवनिं आले गिरिराजा । अणवुनि शैलसरादि समाजा ॥
आदर दान विनति बहु मानें । बोळविलें सकलां हिमवानें ॥
शंभु यदा कैलासीं आलें । निज निज लोका देव निघाले ॥
पितरौ विश्वा शंभु भवानी । यास्तव तंच्छृंगार न वानीं ॥
करित विविधविध भोगविलासां । गणांसहित वसति कैलासा ॥
प्रतिदिन हरगिरिजा विहार नव । काळ लोटला असा विपुल जंव ॥
जन्मे तदा कुमार षडानन । रणिं करि तारक‍असुर विनाशन ॥
विश्रुत आगम निगम पुराणां । षण्मुखजन्म विदित सकलांनां ॥

छं. :- जगविदित षण्मुख जन्म कर्म प्रताप पुरुषार्थहि महा ।
याकारणें वृषकेतुपुत्रचरित्रिं कृत संक्षेप हा ॥
हा उमाशंभुविवाह जे नर नारि गाती सांगती ।
कल्याण-कार्यिं विवाहमंगलिं सर्वदा सुख पावती ॥ १ ॥
दो. :- चरितसिंधु गिरिजारमण वेद न पावति पार ॥
तुलसिदास वर्णिल कसा अति मतिमंद गवार ॥ १०३ ॥

( मुलीला व जावयांना पोचवून ) लगेच गिरिराज घरी आले व सर्व पर्वत, तलावादि मंडळींना बोलावले ॥ १ ॥ त्यांचा पुष्कळ आदर, दान, विनंती, मान इ. देऊन हिमवंताने सर्वांना निरोप दिला. ॥ २ ॥ इकडे शंभू कैलासास येऊन पोचले. तेव्हा सर्व देव आपआपल्या लोकाला निघून गेले. ॥ ३ ॥ शंभू व भवानी सर्व जगाचे मातापिता असल्याने मी त्यांच्या शृंगाराचे वर्णन करीत नाही. ॥ ४ ॥ शंभू व भवानी गणां सहित कैलासावर राहू लागली व तेथे त्यांनी अनेक प्रकारे भोग – विलास केले. ॥ ५ ॥ हर व गिरीजा यांचा रोज नवा विहार सुरू झाला व याप्रमाणे पुष्कळ काळ निघून गेला ॥ ६ ॥ तेव्हा मग कुमार षडाननाचा जन्म झाला व त्याने रणांगणात तारकासुराच वध केला. ॥ ७ ॥ वेद, मंत्रादि शास्त्रे, व पुराणे यात ही कथा प्रसिद्ध आहे, व षण्मुखाचा जन्म सगळ्यांनाच माहीत आहे. ॥ ८ ॥ षण्मुखाचा जन्म, कर्म, प्रताप व महापुरुषार्थ इत्यादी सर्व जगाला माहीत आहे; म्हणून मी वृषध्वज – पुत्राच्या चरित्राचा ( येथे ) संक्षेप केला. जे कोणी स्त्रिया अथवा पुरुष हा उमा – शंभू –विवाह गातील अथवा सांगतील त्यांना कल्याणकारक कार्यात व विवाहादि मंगल कार्यात सर्वदा सुख मिळेल. ॥ छंद ॥ गिरीजारमणाचे चरित्र म्हणजे एक सागर आहे व वेदांना सुद्धा पार जाता येत नाही, ( तेथे ) अतिमतिमंद व गावंढळ तुलसीदास ते कसे वर्णन करणार ! ॥ दो० १०३ ॥

* * * * *

श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु

GO TOP