॥ श्रीरामचरितमानस ॥

(मराठी अनुवाद)

॥ उत्तराकाण्ड ॥

॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥


अध्याय १५ वा



Download mp3

समजाविला ज्ञानसिद्धान्त । भक्तिमणी प्रभुता श्रुणु तात ! ॥
रामभक्ति चिंतामणी सुंदर । वसे गरुड ! ज्याचे हृदयांतर ॥
परम प्रकाशरूप दिनराती । काहिंच नको दिवा घृत वाती ॥
निकट मोह दारिद्र्य येत ना । त्याला विझवीं लोभ वात ना ॥
प्रबल अविद्या तिमिर नासतो । सकल शलभ समुदाय हारतो ॥
निकट अविद्या तिमिर नासतो । सकल शलभ समुदाय हारतो ॥
खल कामादि निकट न वळती । ज्याचें हृदयिं भक्ति करि वसती ॥
गरल सुधासम अरि हित होती । त्या मणि विण सुख कुणि न पावती ॥
व्यापिति मानस रोग न भारी । ज्यां वश जीवां दुःखें सारीं ॥
रामभक्ति मणि ज्या उरिं राही । दुःखलेश त्या स्वप्निंहि नाहीं ॥
चतुर शिरोमणि तेच किं जगतीं । मण्यासाठिं जे सुयत्‍न करती ॥
प्रगट यदपि तो मणि जगिं आहे । रामकृपेविण कोणि न लाहे ॥
सुगम उपाय जरी पावाया । नर हतभागी उडविति पायां ॥
वेदपुराणें पर्वत पावन । रामकथा रुचिराकर पार न ॥
मर्मी सज्जन् सुमति पहारी । ज्ञान विराग नयन उरगारी ॥
शोधिल जो प्राणी सद्‌भावे ।सबसुखदानि भक्तिमणि पावे ॥
हा विश्वास मला प्रभु ! वाटे । रामदास रामाहुनि मोठे ॥
रामसिंधु घन सज्जन धीर । चंदनतरु हरि संत समीर ॥
सकल फलहि हरिभक्ति सुशोभन । संत कृपेविण कुणाहि लाभ न ॥
हें समजुनि जो करि सत्संगा । रामभक्ति त्या सुलभ विहंगा ॥

दो० :- ब्रह्म पयोनिधि, मंदर ज्ञान, जाण सुर संत ॥
काढिति मथुनि कथा सुधा भक्तिमाधुरीमंत ॥ १२०रा ॥
विरति ढाल, असि बोध, रिपु लोभ मदादि वधून ॥
जय देते ती हरिभक्ति, बघ खगेश चिंतून ॥ १२०म ॥

ज्ञानसिद्धान्त समजावून सांगीतला हे तात ! भक्ती मण्याची प्रभुता ऐका ॥ १ ॥ रामभक्ती हा सुंदर चिंतामणी आहे; गरुडा ! हा ज्या कोणा (परम भाग्यवंता) च्या हृदयात राहतो ॥ २ ॥ तो (परम भाग्यवान प्राणी) रात्रंदिवस प्रकाशरुप असतो. कारण की (हा चिंतामणी) रात्रंदिवस प्रकाशरुप असतो. याला दीपपात्र (दिवा – पणती) तूप, वाती वगैरे साधन सामुग्रीची मुळीच आवश्यकता नाही ॥ ३ ॥ मोहरुपी द्रारिद्र्य या भक्ती चिंतामणीच्या जवळ येत नाही, त्याला लोभ (विषय लालसा) विझवूं शकत नाही. ॥ ४ ॥ प्रबल अविद्यारुपी अंधकार विनाश पावतो आणि सगळ्या पतंगांचा समूह नाश पावतो ॥ ५ ॥ ज्याच्या हृदयात हरिभक्ती वसते त्याच्याजवळ काम, क्रोध हे खल जात नाहीत ॥ ६ ॥ त्याला विष अमृतासारखे होते व शत्रु हितकर्ते मित्र बनतात. त्या रामभक्ती चिंतामणीवाचून कोणी सुख पावूं शकत नाही ॥ ७ ॥ ज्यांच्या योगे जीवांना दु:खे भोगावी लागतात ते मानव रोग त्याला व्यापत नाहीत ॥ ८ ॥ रामभक्ती चिंतामणी ज्याच्या हृदयात राहतो त्याला स्वप्नात सुद्धा दु:खाचा लेशही नसतो. ॥ ९ ॥ जे या मण्यासाठी सुयत्न करतात तेच या जगात चतुर शिरोमणी होत. ॥ १० ॥ तो मणी जरी जगात प्रगट आहे तरी श्रीरामाच्या कृपेशिवाय तो कोणालाही मिळत नाही ॥ ११ ॥ हा मणी मिळण्याचा उपाय सोपा आहे, पण त्या उपायाला हतभागी, दुर्दैवी माणसे पायांनी उडवितात. ॥ १२ ॥ वेदपुराणे हे पवित्र पर्वत आहेत, आणि अपार रामकथा त्यातल्या सुंदर खाणी आहेत. ॥ १३ ॥ संत, सदगुरु त्या खाणींचे मर्मज्ञ आहेत, सुमति ही पहार आणि ज्ञान व वैराग्य हे दोन नेत्र होत (या मर्मज्ञांकडचे) ॥ १४ ॥ जो प्राणी शुद्ध भावाने त्या खाणीत शोधील त्याला तो सर्वसुखदायक रामभक्ती – चिंतामणी मिळेल ॥ १५ ॥ हे प्रभु ! (गरुडा), मला असा विश्वास वाटतो की रामाचे दास रामांपेक्षा मोठे असतात. ॥ १६ ॥ राम सागर असून धीर संत मेघ होत. श्रीहरी चंदनवृक्ष तर संत (रामभक्त) वायु होत. ॥ १७ ॥ सर्व साधनांचे फळ म्हणजे सुंदर हरिभक्ती होय. पण संतकृपेशिवाय तिचा लाभ कुणालाही होत नाही. ॥ १८ ॥ हे ध्यानात घेऊन हे विहंगा ! जो संत समागम करतो त्याला रामभक्ती सहज प्राप्त होते ॥ १९ ॥ वेद पुराण हा क्षीरसागर, ज्ञान हा मंदर पर्वत, व संत हे सुर आहेत ते त्याचे मंथन करुन माधुरी असलेले कथारुपी अमृत काढतात ॥ दो० १२० रा ॥ वैराग्यरुपी ढाल, ज्ञानरुपी तलवार यांनी लोभ मद मोह मत्सरादि शत्रुंना मारुन जी जय मिळवून देते ती हरीभक्तीच ! हे खगपती ! नीट विचार करुन पहा ॥ दो० १२० म ॥

मग सप्रेम वदे खगराव । जर कृपाल ! मजवरती भाव ॥
नाथ ! मला निज सेवक जाणुनि । सप्त प्रश्न मम सांगा वर्णुनि ॥
प्रथमचि वदा नाथ ! मति धीर । सर्वीं दुर्लभ कवण शरीर ॥
मोठें दुःख कवण सुख भारी । तें संक्षेपें वदा विचारीं ॥
संतअसंतमर्म तुम्हिं जाणां । सहजस्वभाव त्यांचा वाना ॥
पुण्य महा श्रुतिविदित कोणतें । वदा घोर अति पाप कवण तें ॥
सांगा मानस रोग सविस्तर । तुम्हिं सर्वज्ञ कृपा अति मजवर ॥
श्रुणु ताता ! सादर सुप्रीतीं । मी संक्षिप्त वदें ही नीती ॥
नरतनु सम नहि देह दुजा वर । तया याचिती जीव चराचर ॥
नर्क नाक अपवर्गां निसणी । ज्ञान विराग भक्ति शुभ देणी ॥
ती तनुधर हरि भजति न जे नर । होति विषयरत मंद मंदतर ॥
काचखंड ते बदला घेती । करगत परीस फेकुन देती ॥
दारिद्र्यासम जगीं दुःख ना । संतभेटिसम जगांत सुख ना ॥
पर उपकार वचन मनकायां । प्रकृति सहज संतां खगराया ॥
संत सहति दुख परहित लागीं । परदुःखार्थ असंत अभागी ॥
भूर्जतरूसम कृपालु संत हि । परहितिं सहति विपद अति सततहि ॥
सण इव खल परबंधन करतो । साल काढवुनि विपदीं मरतो॥
विना स्वार्थ खल पर अपकारी । अहि मूषकसा श्रुणु उरगारी ॥
पर संपत्ति विनाशुनि नासति । पीक विनाशुनि गारा वितळति ॥
दुष्टउदय जगदार्ती हेतू । प्रथित अधम जैसा ग्रह केतू ॥
संत‍उदय संतत हितकारी । विश्व-सुखद इव इंदु तमारी ॥
परमधर्म वेदोक्त अहिंसा । परनिंदा अघ अधिक गिरीशा ॥
हरिगुरुनिंदक दर्दुर होतो । जन्म सहस्र तीच तनु लभतो ॥
द्विजनिंदक बहु नरकां भोगुनि । जगीं जन्मतो वायस हौनि ॥
देव वेद निंदक अभिमानी । रौरव नरकिं पडति ते प्राणी ॥
होति उलूक संत निंदारत । मोह निशा प्रिय बोध भानु गत ॥
निंदितात जे जड सर्वानां । वटवाघुळ अवतार तयानां ॥
तात ऐक मानस रोगानां । दुःख देति जे सब लोकानां ॥
मोह सकल रोगांचें मूळ हि । तेथुनि बहु उद्‍भवती शूळ हि ॥
काम वात कफ लोभ अमित तो । क्रोध पित्त उर नित्य जाळतो ॥
प्रीति करिति जर तीन्ही भाई । उपजे सन्निपात दुखदाई ॥
विषय मनोरथ दुर्गम नाना । सकल शूल ते मिति नामां ना ॥
ईर्षा कच्छू दद्रू ममता । हर्ष विषादां ग्रहां विपुलता ॥
क्षय जळणें परसुख पाहतां । कुष्ट दुष्टता मनकुटिलता ॥
अहंकार अर्बुद अति दुःखद । नारू दंभ हि कपट मान मद ॥
तृष्णा उदरवृद्धि अति भारी । त्रिविध एषणा तरुण तिजारी ॥
दोन्ही ज्वर मत्सर अविवेक । कुठवर सांगु कुरोग अनेक ॥

दो० :- एक रोगवश नर मरति बहु असाध्य या व्याधि ॥
संतत जीवा पीडिती तो कशि लभे समाधि ॥ १२१रा ॥
नेम धर्म आचार तप ज्ञान यज्ञ जप दान ।
भेषज कोटि करून नहि जाति रोग हरियान ॥ १२१म ॥

सप्तप्रश्न गीता – मग खगराज गरुड भुशुंडीला प्रेमाने म्हणाला की, हे कृपालु जर माझ्यावर आपला स्नेह आहे तर ॥ १ ॥ मला आपला नित्य (निज) सेवक जाणुन माझ्या सात प्रश्नांचे सविस्तर उत्तर द्यावे. ॥ २ ॥ हे धीर बुद्धी ! नाथ ! प्रथमत: सांगावे की सर्वात दुर्लभ शरीर कोणते ? ॥ ३ ॥ सर्वात मोठे दु:ख कोणते व सर्वात मोठे सुख कोणते ? ते विचार करुन संक्षेपाने सांगा ॥ ४ ॥ संत आणि असंत यांचे मर्म तुम्ही जाणतां, म्हणून त्यांचा सहज स्वभाव वर्णन करुन सांगा. ॥ ५ ॥ वेदांनी वाणिलेले सर्वात मोठे पुण्य कोणते ? आणि वेदवर्णित सर्वात अति घोर पातक कोणते ते सांगा ॥ ६ ॥ आणि शेवटी मानस रोगांचे सविस्तर वर्णन करुन सांगा. तुम्ही सर्वज्ञ आहांत आणि माझ्यावर तुमची अतिशय कृपा आहे (म्हणून विचारले). ॥ ७ ॥
सात प्रश्नांची उत्तरे – (१) हे तात ! अति प्रीतीने व आदराने श्रवण करा; मी आदराने व अतिप्रीतीने ही नीती थोडक्यांत सांगतो. ॥ ८ ॥ नरदेहासारखा किंवा त्याहून श्रेष्ठ दुसरा देह नाही. त्याची याचना सर्व चराचर जीव करीत असतात. ॥ ९ ॥ नरतनु स्वर्ग-नर्क व मोक्ष यांच्याकडे नेणारी शिडी आहे, तसेच ज्ञान वैराग्य व सुंदर भक्ती देणारी आहे ॥ १० ॥ ही तनु धारण केलेले जे मनुष्य हरीचे भजन करीत नाहीत व विषयरत होतात ते मंदमति होत व ते अधिकाधिक मंद होत जातात. ॥ ११ ॥ ते मनुष्य काचेचे तुकडे हातात घेऊन त्या बदल्यात हातात असलेला परीस फेकून देतात. ॥ १२ ॥ (२) दरिद्रयासारखे दुसरे दु:ख जगात नाही आणि (३) संतांच्या भेटीसारखे दुसरे सुख जगात नाही. ॥ १३ ॥ खगराजा ! वाणीने, मनाने व कर्माने परोपकार करणे हा संताचा सहज स्वभाव होय. ॥ १४ ॥ संत परहितासाठी दु:ख सहन करतात व अभागी असंत (दुष्ट) दुसर्‍यांना दु:ख देण्यासाठी दु:ख सोसतात (हा असंतांचा सहज स्वभाव आहे.) ॥ १५ ॥ संतभूर्जतरुसारखे कृपालु असतात आणि सदा दुसर्‍यांच्या हितासाठी मोठ्या विपत्ती सोसतात ॥ १६ ॥ पण खल सणासारखा (तागासारखा) दुसर्‍यांना बंधन करतो, (व तेवढ्यासाठी) आपल्या अंगाच्या साली काढवून विपत्तींनी मरतो. ॥ १७ ॥ हे उरगारी ! ऐक कोणत्याही स्वार्थावाचून खल सर्प व उंदिर यांच्याप्रमाणे दुसर्‍यांना (त्रास देऊन) उपकार करतात. ॥ १८ ॥ पावसाच्या गारा जशा पिकांचा नाश करुन वितळून जातात, तसे दुष्ट दुसर्‍यांच्या संपत्तीचा विनाश करुन नाश पावतात ॥ १९ ॥ प्रसिद्ध नीच ग्रह जो धूमकेतू त्याचा उदय जसा जगाच्या दु:ख पीडांचे कारण होतो तसाच दुष्टांचा उदय जगाला दु:खकारक होतो. ॥ २० ॥ चंद्र व सूर्य यांचा उदय जसा विश्वास सुखदायक असतो तसाच संताचा उदय विश्वाचे सतत हित करणारा, व विश्वाला सुख दायक असतो. ॥ २१ ॥ वेदोक्त परम धर्म अहिंसा हा आहे; आणि परनिंदा हे पाप पर्वतराजापेक्षाही अधिक मोठे आहे. ॥ २२ ॥ हरि, हर आणि गुरु यांची निंदा करणारा (पुष्कळ नर्क भोगून) बेडूक होतो आणि हजार जन्म त्याला तो एकच देह मिळतो. ॥ २३ ॥ ब्राह्मण – निंदा करणारा अनेक प्रकारच्या नरक यातना भोगून नंतर या जगात कावळा होऊन जन्मास येतो. ॥ २४ ॥ जे अभिमानी मानव प्राणी देवांची व वेदांची निंदा करतात ते रौरव नर्कात पडतात (व नंतर कावळ्याच्या जन्माला जातात) ॥ २५ ॥ संताची निंदा करण्यात जे तत्पर असतात ते मोहरुपी रात्र प्रिय असलेले, व ज्ञानरुपी सूर्य ज्यांच्यापासून निघून गेला आहे असे घुबड होतात ॥ २६ ॥ जे जड सर्वांचीच निंदा करतात ते वटवाघूळ होऊन उलटे लोंबत राहतात. ॥ २७ ॥
मानस रोग - हे तात ! जे सर्व लोकांना दु:ख देतात त्या मानस रोगांचे श्रवण करा. ॥ २८ ॥ मोह (अज्ञान) सर्व रोगांचे मूळ आहे मग त्यांच्यापासून अनेक दु:खद रोग उत्पन्न होतात. ॥ २९ ॥ काम हा वात आहे, लोभ हा कफ असून तो अमित आहे व क्रोध पित्त आहे व तो नेहमी छाती जाळीत राहतो. ॥ ३० ॥ या तीन भावांची प्रीती जमली की अति दु:खदायक सन्निपात रोग उदभवतो ॥ ३१ ॥ नाना प्रकरचे दुर्गम विषय मनोरथ केले जातात ते सर्व शूल (दु:खद) आहेत, त्यांची अगणित नांवे आहेत, (ती किती म्हणून मोजावी ?) ॥ ३२ ॥ ईर्षा ही खरुज, ममता ही गजकर्ण व नायटे होत आणि हर्ष – विषाद या ग्रहांची तर विपुलताच असते. ॥ ३३ ॥ दुसर्‍यांचे सुख पाहून जळणे हा क्षयरोग आहे, दुष्टपणा व मनाचा कुटिलपणा हा कुष्टरोग (कोड) होय. ॥ ३४ ॥ ‘ अहंकार ’ हा अति दु:खदायक कॅन्सर रोग आहे ॥ ३५ ॥ अति भारी विषयतृष्णा हा अतिभारी जलोदर (उदरवृद्धी) रोग होय तीन प्रकारच्या एषणा हा तिसर्‍या दिवशी येणारा तरूण ज्वर होय ॥ ३६ ॥ मत्सर (वैष्णव) आणि अविवेक (शैव) हे दोन प्रकारचे ज्वर आहेत असे या कुरोगांचे वर्णन कुठवर व किती करणार ! कारण ते अनंत आहेत! ॥ ३७ ॥ एका रोगाला वश होऊनही लोक मरतात, आणि या तर पुष्कळ आणि असाध्य व्याधी आहेत आणि या सदा सर्वकाळ जीवाला पीडा देत असतात. मग त्याला समाधि (समाधान, विश्राम) कशी मिळेल ? ॥ दो० १२१ रा ॥ नियम, धर्म, आचार, तप, ज्ञान, यज्ञ, जप, दान आणि दुसरी कोट्यावधि औषधे (उपाय योजना) करुन सुद्धा हे हरिवाहना ! हे रोग जात नाहीत. ॥ दो० १२१ म ॥

यापरिं सकल जीव जगिं रोगी । शोक हर्ष भी प्रीति वियोगी ॥
मानस रोग कांहिं मी वर्णित । सकलां असुनि एक कुणि जाणत ॥
जाणत जरा क्षीण, परि पापी- । नाश न पावति जन परितापी ॥
विषयकुपथ्य मिळत धडफुडे । मुनि हृदयिं हि नर किति बापुडे ॥
रामकृपें सब रोग विनाशति । असा सुयोग कधीं जर लाभति ॥
सद्‌गुरु वैद्य वचनिं विश्वास हि । संयम हा कीं विषयाशा नहि ॥
रघुपतिभक्ति मुळी संजीवनि । अनुपाना श्रद्धा अति पावनि ॥
सुखे याचपरिं रोग नाशती । ना तर कोटि उपायिं न जाती ॥
जाणा स्वामि ! विरुज मन तेव्हां । हृदिं बल विराग वाढे जेव्हां ॥
क्षुधा सुमति दिन दिन वाढतां । विषयाशा दुर्बलता गता ॥
ज्ञान विमल जलिं करी स्नान जैं । रामभक्ति उरिं करी स्थान तैं ॥
शिव अज शुक सनकादिक नारद, । मुनि जे ब्रह्म विचार विशारद ॥
सर्वांचे मत खगपति हें हो ! । करा रामपदकंजीं स्नेहो ॥
श्रुति पुराण सद्‍ग्रंथ वदति ही । रघुपतिभक्तिविना सुख नाही ॥
कमठ पृष्ठिं जरि वाढति बाल । वंध्यासुत जरि कोणि वधाल ॥
फुललीं नभिं बहुविध फूलहि । जीवा सुख न हरीप्रतिकूल हि ॥
तृषाशान्ति जरि मृगजल पानें । फुटलीं जरिं शशशिरीं विषाणें ॥
अंधारें जरि रविस गिळावें । रामविमुख न जीव सुख पावे ॥
अनल जरी प्रगटला हिमांतुनि । विमुख राम सुख पावे ना कुणि ॥

दो० :- वारि मथुनि घृत होई जरि सिकते पासुनि तेल ॥
विण हरिभजन न भवतरण सिद्धांत, चि न टळेल ॥ १२२रा ॥
प्रभु विरिंचि मशका करिति मशकाहुनि अज हीन ॥
हें जाणुनि संशय तजुनि रामहिं भजे प्रवीण ॥ १२२म ॥
श्लो० :- विनिश्चितं वदामि ते न अन्यथा वचांसि मे ॥
हरिं नरा भजंति येऽति दुस्तरं तरंति ते ॥ १२२चं ॥

अशा प्रकारे जगातील सर्वच जीव रोगी आहेत शोक, हर्ष, भय, प्रीती आणि वियोग यानी पीडलेले आहेत ॥ १ ॥ मी काही मानस रोगांचे वर्णन केले. ते सगळ्यांनाच झालेले असले तरी कोणी एखादाच जाणतो की मी (मानसरोगग्रस्त) आहे. ॥ २॥ जाणण्याने ते (रोग) थोडे क्षीण होतात (इतकेच) पण सर्व बाजूंनी लोकांना ताप देणारे ते पापी नाश पावत नाहीत. ॥ ३ ॥ विषयरुपी कुपथ्य मिळताच मुनींच्या हृदयात सुद्धा धडधाकट होतात मग बिचार्‍या पामर नरांची कथा ती काय ? ॥ ४ ॥ श्रीरामाच्या कृपेने असा (पुढे सांगीतलेला) सुयोग जर जुळुन आला तर सर्व मानस रोग नाश पावतात. ॥ ५ ॥
रोगांवर औषध वा उपाय - सदगुरु वैद्य (डॉक्टर), त्याच्या वचनांवर विश्वास, आणि विषयांची आशा नसणे हा संयम वा पथ्य (या तीनही गोष्टी जुळल्या पाहीजेत) ॥ ६ ॥ रामकथाश्रवणरुपी रघुपतीभक्ती ही संजीवनी मुळी आहे आणि अनुपान म्हणून अति पावन (सात्विक) श्रद्धा पाहीजे. ॥ ७ ॥ हे असेल तरच सुखाने रोगनाश होतो नाहीतर अनंत कोटी उपाय करुनही काही उपयोग नाही ॥ ८ ॥ स्वामी ! जेव्हा हृदयात वैराग्य रुपी बल वाढते तेव्हा मन रोगमुक्त झाले असे जाणावे. ॥ ९ ॥ सुमतिरुपी भूक दिवसेंदिवस वाढत जाऊन विषयांची आशा रुपी दुर्बलता (हळू हळू) गेली (म्हणजे मग) ॥ १० ॥ विमल ज्ञान रुपी विमल जलांत जेव्हा तो स्नान करील तेव्हा मग रामभक्ती = रामप्रेम हृदयात सतत निवास करील. ॥ ११ ॥ शिव, ब्रह्मदेव, शुकाचार्य, सनकादिक मुनी, नारद-मुनी आणि जे ब्रह्मविचार करण्यात परम प्रवीण आहेत ॥ १२ ॥ त्या सर्वांचे अहो खगनायक ! हेच मत आहे की श्रीरामचरणकमलीं स्नेह करा, करावा ॥ १३ ॥ वेद, पुराण, आणि सदग्रंथ सुद्धा सांगतात की श्री रघुपतीच्या भक्ती वाचून सुख मिळणे शक्य नाही.॥ १४ ॥ कासवाच्या पाठीवर केस वाढले, वांझेच्या पोराचा जरी वध केला (तरी हरिविमुख जीवाला सुख मिळणार नाही) ॥ १५ ॥ आकाशात जरी नाना प्रकारची फुले फुलली तरी हरिप्रतिकूल जीवाला सुख मिळणार नाही. ॥ १६ ॥ मृगजळ पिऊन जरी तहान भागली किंवा सश्याच्या शिरावर शिंगे फुटली ॥ १७ ॥ अंधाराने सूर्याला गिळले तरी रामविमुख जीवाला सुख मिळणे शक्य नाही ॥ १८ ॥ पाणी घुसळून जरी तूप झाले किंवा वाळूपासून तेल निघाले तरीसुद्धा हरी भजनावाचून भवसागर तरणे अशक्य हा सिद्धांत आहे तो कधीही टळणार नाही. ॥ दो० १२२ रा ॥ प्रभु रघुनाथ चिलटाला विंरची करतात, व विरंचीलाही चिलटाहून हीन करतात हे जाणून सर्व संशय सोडून जो रामाला भजतो तोच खरा शाहाणा. ॥ दो० १२२ म ॥ विशेष निश्चित केलेला सिद्धांत मी तुला सांगतो, माझे म्हणणे खोटे नाही. जे मानव श्रीहरिला भजतात ते अति दुस्तर (जशी हरिमाया म्हणजेच संसार सागर) तरुन जातात. ॥ दो० १२२ चंद्र ॥

* * * * *

श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु

GO TOP