|
॥ श्रीरामचरितमानस ॥ (मराठी अनुवाद) ॥ अयोध्याकाण्ड ॥ अध्याय २० वा ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥ Download mp3 प्रमुदित होति तीर्थपति-वासी । वैरवानस बटु गृहीं उदासी ॥ दो० :- तुम्हीं ग्लानि मनिं नका करुं मायकरणि चिंतून ॥ तिर्थराज प्रयागात निवास करणारे वानप्रस्थ ब्रह्मचारी, गृहस्थ व संन्यासी इ. सर्व प्रमुदित झाले व ॥ १ ॥ दहा पंधरा ( थोडे थोडे) लोक एकत्र जमून म्हणू लागले की भरताचे शील व स्नेह पवित्र व सत्य आहेत ॥ २ ॥ रामचंद्रांचे शुभ ( कल्याण कारक) गुण श्रवण करीत भरत भारद्वाज मुनींकडे आले ॥ ३ ॥ भरत दंडवत करीत असलेले मुनीश्रेष्ठांनी पाहिले व हे आपले मूर्तीमंत भाग्यच आहे असे त्यांस वाटले ॥ ४ ॥ व धावत जाऊन त्यांस उठवून हृदयाशी धरले आणि आशीर्वाद देऊन कृतार्थ केले ॥ ५ ॥ मुनींनी आसन दिले व भरत त्यांस नमन करुन आसनावर बसले ( आसनावर बसले म्हणण्यापेक्षा) संकोच रुपी घरातच जणूं ( घाबरुन) घुसूं बघत आहेत, ( असे म्हणणे चांगले. अत्यंत खजिल झाले असून अत्यंत संकोच वाटत आहे)॥ ६ ॥ मनांत अतिशय चिंता आहे की मुनी काहीतरी विचारतील भरताचे ते शील व तो संकोच मुनीच्या लक्षात आला तेव्हा मुनी म्हणाले ॥ ७ ॥ भरत ! आम्हाला सगळी बातमी कळली आहे, पण दैवाच्या करणीपुढे कोणाचा काही उपाय चालत नाही ॥ ८ ॥ तात ! मातेची करणी मनांत आणून तुम्ही मुळीच ग्लानी करु नका त्यांत कैकेयीचा काहीच दोष नाही ( कैकेयी दोषी नाही) कारण, सरस्वती ( तिची) बुद्धी फिरवून गेली. ॥ दो० २०६ ॥ हें ही भले म्हणे ना कोणी । लोक-वेद बुध संमत दोनी ॥ दो० :- भलें फार कृत हें योग्यचि मत तव ठायिं ॥ हे म्हणणे सुद्धा चांगले आहे असे कोणी ( अज्ञानी लोक) म्हणणार नाहीत. पण दोन्ही विचार लोकसंमत आणि वेदबुधसंमत आहेत ॥ १ ॥ तात ! तुमच्या निर्मल यशाचे गान करतील व लोक आणि वेदसुद्धा महत्व पावतील ॥ २ ॥ वेद व लोक यांना हे संमत आहे आणि सर्वच म्हणतात की पिता ज्याला राज्य अर्पण करतो तोच राज्य करतो ( त्याने करावे) ॥ ३ ॥ दशरथ महाराज सत्यप्रतिज्ञ असल्यामुळे ( ते असते तर) त्यांनी तुम्हांला आणले असते आणि तुम्हाला राज्य, धर्म, सुख व महती अर्पण करते ॥ ४ ॥ रामवनगमन हे सर्व अनर्थाचे मूळ आहे आणि त्यामुळे सर्व जगाला पीडा होत आहे हे खरे ॥ ५ ॥ पण ते प्रारब्ध बलानेच झाले आहे व अज्ञानी राणीने दैव वशात कुचाळी केली ( खरी), पण तिला आता पश्चाताप होत आहे ॥ ६ ॥ ( कैकेयीने जे केले) त्यात तुम्ही थोडासाही अपराध केलात असे जो म्हणेल तो नीच, मूर्ख व दुष्ट आहे ( असे ठरेल) ॥ ७ ॥ तुम्ही राज्य केले असतेत तरीही काही दोष घडला नसता व ते ऐकून रामचंद्रांस सुद्धा संतोष झाला असता ॥ ८ ॥ ( तथापि) भरत ! तुम्ही ( केलेत ते) फार चांगले, तुमच्या ठिकाणी हे मत योग्यच आहे; ( कारण) या जगात सकल सुमंगलाचे मूळ म्हणजे रघुवर चरणी प्रेमच ( स्नेहच) ॥ दो० २०७ ॥ तें धन जीवन तुमचे प्राणहि । भूरिभाग्य सम तुम्हां किं आनहि ॥ दो० :- भरत तुम्हांस कलंक हा अम्हां जगा उपदेश ॥ ते तर तुमचे धन, जीवन, आणि प्राण आहे ( म्हणून) तुमच्या सारखा अत्यंत भाग्यवान ( जगात) दुसरा कोणीतरी आहे काय ? ( कोणीही नाही) ॥ १ ॥ पण तात ! यांत तुमचे काही नवल नाही. आश्चर्य नाही कारण तुम्ही दशरथसुत व रामाचे धाकटे भाऊ आहांत ॥ २ ॥ हे पहा भरत ! रघुवरांच्या मनात तुमच्यासारखा प्रेमपात्र कोणी नाही ॥ ३ ॥ सीता राम व लक्ष्मण यांनी अत्यंत प्रीतीने वर्णन करीत ( या आश्रमांत होते) ती रात्र केव्हाच संपविली ॥ ४ ॥ सकाळी प्रयागात स्नान करताना सुद्धा हि तेच मर्म कळले; तुमच्या अनुरागात राम मग्न होत होते ॥ ५ ॥ सुखमय जीवनावर जसे मुर्खाचे प्रेम असते तसे रामाचे तुमच्यावर प्रेम आहे. ॥ ६ ॥ पण यांत रघुवीराची अति महत्ता आहे असे नाही; कारण की रघुपती शरणागताच्या कुटुंबाचे पालक आहेतच ( असतात) ॥ ७ ॥ भरत माझे हेच मत आहे की तुम्ही तर देहधारी रामस्नेहच आहांत ॥ ८ ॥ भरत ! तुम्हाला वाटते की हा ( तुमच्याजवळ असलेला स्वयंसिद्ध भक्तिरस) कलंक आहे, पण आम्हाला व जगाला हा उपदेश आहे रामभक्तीरुपी रस सिद्धीसाठी हा शुभ समय ही शुभ वेळ म्हणजे श्रीगणेशा आहे ॥ दो० २०८ ॥ तात ! विमल नवीन यश तर । रघुवर-किंकर चकोर कैरव ॥ दो० :- यत्प्रेमा-संकोच-वद प्रगट राम येऊन ॥ तात ! ( भरत) तुझे विमल यश हा नवीन विमल चंद्र आहे व रघुवराचे सेवक चकोर व कुमुदे होते ॥ १ ॥ हा सदासर्वदा उगवलेला राहील व कधीही अस्तास जाणार नाही, याला क्षय नाही, पण ( दिवसे दिवस) जगरुपी आकाशातीत याची वृद्धी होत राहील ॥ २ ॥ लोक व स्वर्गादि लोकरुपी चक्रवाक ( सुद्धा) याच्यावर अत्यंत प्रीती करतील व प्रभूचा प्रतापरुपी भास्कर याच्या कांतीला कधी नाहीशी करणार नाहीत ॥ ३ ॥ हा चंद्र सर्वांनाच सदा सर्वदा सुख देईल व कैकेयीचा करणीरुपी राहू याला ग्रासणार नाही ॥ ४ ॥ हा शुद्ध रामप्रेमरुपी पियूषाने पूर्ण आहे व गुरु ( पत्नी) अपमानरुपी दोषाने दूषित झालेला नाही ॥ ५॥ ( राम) भक्त हो ! आता रामप्रेमरुपी अमृत पोटभर घ्या ! भरताने सुधेला या पृथ्वीवर सहज मिळण्यासारखी केली आहे ॥ ६ ॥ स्मरण केल्यानेच सकल सुमंगल देणारी गंगा राजा भगिरथाने आणली तर त्यांची कीर्ती अमर झाली ॥ ७ ॥ दशरथांच्या गुणसमुदायाचे ( तर) वर्णन करणेच अशक्य ! ( कारण) त्याच्यासारखा सुद्धा कोणी जगात नाही मग अधिक कोठून असणार ? ॥ ८॥ ( कारण) त्यांच्या प्रेमाला व संकोचाला वश होऊन ते राम येऊन प्रगट झाले ( घरात पुत्र व पुत्राप्रमाणे) की ज्यांच्याकडे मनाच्या नेत्रांनी हृदयात सतत बघत राहून सुद्धा शंकर अजून कधी तृप्त झाले नाहीत. ॥ दो० २०९ ॥ तुम्हीं किइर्ति विधु अनुपम केला । राम प्रेम जिथें मृग वसला ॥ दो० :- सिताराम हृदिं तनुं पुलक नेत्र सरोरुहिं पाणि ॥ भरत ! तुम्ही असा उपमारहित कीर्तीचंद्र ( उदित) केलात की ज्यांत ( तुमच्यावरील व भक्तांवरील) रामाचे प्रेमरुपी मृग राहीला आहे ॥ १ ॥ तात ! तुम्ही तर आपल्या मनांत वृथा ग्लानी करीत आहांत; परीस मुठीत असून तुम्ही दारिद्रयाला घाबरत आहांत ॥ २ ॥ भरत ! आम्ही खोटे नाही सांगत ( कारण) आम्ही उदासीन वृत्तीने वनात राहणारे तपस्वी आहोत ॥ ३ ॥ सर्व साधनांचे उत्तम सुंदर फले म्हणजे लक्ष्मण, राम व सीता यांचे दर्शन लाभले ॥ ४ ॥ व त्या फळाचे फळ तुमचे दर्शन लाभले हे प्रयागासह आमचे अति भाग्य होय ॥ ५ ॥ भरत ! तुम्ही धन्य आहांत ! तुम्ही आपल्या यशाने जगाला जिंकलेत असे म्हणून मुनी प्रेम मग्न झाले ॥ ६ ॥ भरद्वाजांचे भाषण ऐकून सर्व सभासदांना हर्ष झाला. ‘शाबास, शाबास, छान, छान’ म्हणत देवांनी पुष्पवृष्टी केली ॥७॥ आकाशात व प्रयागात ( सुरु झालेली) भरत धन्य, मुनी धन्य अशी वाणी ऐकून भरत प्रेमात मग्न झाले ॥ ८ ॥ सीताराम हृदयात आहेत, अंगावर रोमांच आहेत व नेत्रकमलांत पाणी भरले आहे, अशा दशेत सर्व मुनी मंडलास नमस्कार करुन भरत सद्गदित होऊन बोलू लागले ॥ दो० २१० ॥ तीर्थराज नी मुनी-समाज । सत्यहि शपथ अतीव अकाज ॥ दो० :- अजिन वसन फल अशन, महिं शयनहि तृणपर्णांत ॥ मुनीसमाज आणि तीर्थराज येथे असतां खरी शपथ घेणे सुद्धां अति अकार्य आहे ॥ १ ॥ या ठिकाणी मी जर काही बनवून सांगेन तर त्याच्यासारखे किंवा त्याहून अधिक पाप व नीचपणा नाही ॥ २ ॥ मी सद्भावनेनेच सांगतो; आपण सर्वज्ञ आहांत व अंतर्यामी रघुवरासही सर्व कळतेच ॥ ३ ॥ मातेच्या करणीचा मला शोक नाही की जग मला खोटा म्हणेल याचे दु:ख मनांत नाही ॥ ४ ॥ परलोकाचा जरी नाश झाला तरी त्याचे भय नाही व पित्याच्या मरणाचा शोकही मला नाही ॥ ५ ॥ त्यांचे सुकृत व सुयश सर्व भुवनांत शोभायमान झाले आहे आणि लक्ष्मण व राम यांच्यासारखे पुत्र लाभले ॥ ६ ॥ नश्वर तनूचा रामविरहांत त्याग केला ( असे असल्याने) भूपतींचा शोक करण्याचा प्रसंगच नाही ॥ ७ ॥ राम लक्ष्मण सीता पायी अनवाणी मुनीवेषांत वनावनांत हिडंत आहेत ॥ ८ ॥ मृगचर्म नेसायची, फळे खायची व नुसत्या जमिनीवर पाला पाचोळ्यांत व गवतात झोपायचे ( आशा रीतीने) झाडांच्या खाली राहून सतत ऊन पाऊस, थंडी वारा सहन करीत आहेत ॥ दो० २११ ॥ दुःख दाह हा जाळि उर सदा । भूक न दिनिं, निशिं निद्रा न कदा ॥ दो० :- सांत्वुनि मुनि वदले, अतिथि प्रेमप्रिय तुम्हिं व्हा हि ॥ या दु:खाचा दाह सदा छाती जाळीत आहे दिवसा कधी भूक नाही व रात्री कधी झोप नाही ॥ १ ॥ मी सगळे विश्व मनांत धुंडाळून पाहीले परंतू या कुरोगाला औषध नाही ॥ २ ॥ मातेचे कुमत हा पापमूळ सुतार होय व माझे हित त्याने वाकस बनविले ॥ ३ ॥ कलि = कलहरुपी निंध काष्ठ घेऊन त्याने ( एक) कुयंत्र बनविले व कटू मंत्र म्हणून ( १४ वर्षाच्या) अवधीने ते अयोध्येत गाडले ॥ ४ ॥ माझ्यासाठी हा अशा प्रकारचा कुत्सित थाट सजविला व सर्व जगाला बारा वाटा करुन नष्ट केले ॥ ५ ॥ राम अयोध्येत परत आले म्हणजे ( माझा) हा कुरोग नष्ट होईल व अन्य उपायांनी अयोध्या वसणार नाही ॥ ६ ॥ भरताचे भाषण श्रवण करुन मुनी सुख पावले आणि इतर सर्वांनी नाना परींनी भरताची प्रशंसा केली ॥ ७ ॥ भरद्वाज म्हणाले तात ! तुम्ही विशेष शोक करुं नका रामचंद्रांचे पाय दृष्टीस पडताच सर्व दु:खे नाहीशी होतील ॥ ८ ॥( या प्रमाणे) भरताचे सांत्वन करुन भरद्वाज म्हणाले की आपण आमच्या प्रेमाचे प्रिय अतिथी जरुर व्हावे व जे काही कंदफलफूल ( फूल ना फुलाची पाकळी) आम्ही देऊ त्याचा कृपा करुन स्वीकार करा ॥ दो० २१२ ॥ ऐकुनि भरता चिंता हृदयीं । पडे कठिण संकोच कु-समयीं ॥ दो० :- रामविरह विव्हळ भरत सानुज सहित समाज ॥ ( भरद्वाजांची विनंती) ऐकून भरताच्या मनांत चिंता उत्पन्न झाली की भलत्याच वेळी मोठा कठिण संकोच येऊन पडला ! ( हो म्हणणे बरे नाही, नाही म्हणतां येत नाही) ॥ १ ॥ पुन्हा ( विचार करुन पाहता) गुरुजींच्या वचनाचे महत्व जाणून पायांना वंदन करुन हात जोडून भरत म्हणाले ॥ २ ॥ नाथ ! आपली आज्ञा शिरसावंद्य मानून पालन करणे हा आमचा धर्म आहे ॥ ३ ॥ भरताचे म्हणणे मुनींच्या मनाला रुचले व त्यांनी पवित्र सेवकांना व शिष्यांना जवळ बोलावले ( व म्हणाले) ॥ ४ ॥ भरताचा पाहुणचार करायचा आहे, तरी जाऊन कंदमूल फल फूले घेऊन या ॥ ५ ॥ नाथ ! फार उत्तम असे म्हणून त्यांनी पायी वंदन केले व ते आपापल्या कार्याला निघून गेले ॥ ६ ॥ बडा - थोर पाहुणा आज बोलावला आहे व जसा देव तसे पूजन करणे आवश्यक व उचित आहे, अशी चिंता मुनींना लागली ॥ ७ ॥ ( मुनींच्या मनातील वचन ऐकून) ऋद्धी आणि मादिक सिद्धीही आल्या व म्हणाल्या की स्वामी ! आज्ञा द्यावी म्हणजे आम्ही तसे करु ॥८॥ मुनीराज प्रसन्न होऊन सिद्धींना म्हणाले की अनुजासह आणि समाजासह भरत रामविरहाने व्याकुळ झालेले आहेत तरी पाहूणचार करुन श्रम हरण करा ॥ दो० २१३ ॥ ऋद्धि सिद्धि, मुनिवच शिरिं धरती । महाभाग्य आपलें समजती ॥ दो० :- भरता परिजन-सह दिले ऋषि आज्ञे-अनुसार ॥ ऋद्धी - सिद्धींनी मुनीश्रेष्ठांचे वचन शिरसावंद्य मानले व आपण महाभाग्यवान आहोत असे त्या समजल्या ॥ १ ॥ सिद्धी व ऋद्धी समूह आपापसांत म्हणतात की रामाचे धाकटे बंधु अतुलनीय अतिथी आहेत ॥ २ ॥ तेव्हा आपण मुनीचरणांना वंदन करुन आज असे करु की सर्व राजसमाज सुखी होईल ॥ ३ ॥ मग सुंदर सुंदर नाना प्रकारची भवने अशी निर्माण केली की ती पाहून विमानानां ( देव) सुद्धा लाज वाटली ॥ ४ ॥ त्या घरांतून भोग ऐश्वर्य इतके विपुल भरुन ठेवले की, ते पाहून देवांना सुद्धा हाव सुटली ॥ ५ ॥ दास दासी विविध सामग्री घेऊन ( ज्याच्या त्याच्या मनाची) रुची राखून जपत राहणारे आहेत ॥ ६ ॥ या प्रमाणे सिद्धींनी सर्व तयारी एका पळांतच केली ( व असे सुखसाधन तयार केले की) ते सुख स्वर्गात सप्नात सुद्धां मिळणे शक्य नाही ॥ ७ ॥ प्रथम ( बाकीच्या) सर्वांना ज्याच्या त्याच्या इच्छेप्रमाणे सुंदर व सुखदायक निवासस्थाने दिली ॥ ८ ॥ व मुनींच्या आज्ञेप्रमाणे परिवारासह भरतांस निवासस्थान दिले ऋधी सिद्धींनी मुनीच्या तपोबलाने ब्रह्मदेवाला सुद्धा आश्चर्यचकित करणारे वैभव निर्माण केले ॥ दो० २१४ ॥ मुनी प्रभावा भरत विलोकत । सकल लोक लोकप लघु वाटत ॥ दो० :- चक्रि चक्र संपद् भरत मुनि-शासन गारोडि ॥ ज्यावेळी मुनींचा प्रभाव भरताच्या दृष्टीस पडला त्यावेळी सर्व लोक व लोकपाल त्यांस तुच्छ वाटले ॥ १ ॥ भोग सामग्रीचे वर्णन कोण कसे करूं शकणार ? हे विषय भोग पाहून ज्ञानी सुद्धा वैराग्य विसरले त्यांवर आसक्त झाले ॥ २ ॥ आसने, शय्या, उत्तम वस्त्रे, वने पुष्पवाटिका, विविध पशुपक्षी इ. नाना पदार्थांना ॥ ३ ॥ व सुवासिक फुले, अमृता सारखी स्वादिष्ट फळे, विविध प्रकारचे अनुपम व निर्मल जलाशय इत्यादी पदार्थांना ॥ ४ ॥ आणि अमृताला सुद्धा अमृतासारखे व पवित्र खाण्यापिण्याचे पदार्थ इत्यादिंना पाहून लोक साधकांसारखे लाजू लागले ॥ ५ ॥ सर्वांनाच ( प्रत्येक घरी) कामधेनू व कल्पवृक्ष आहेत ते सर्व पाहून इंद्र व शची यांना सुद्धा लालूच उत्पन्न झाली ॥ ६ ॥ वसंत ऋतू असून शीतल सुगंधी - मंद वारा वहात आहे व भोजनातील चारी प्रकारचे पदार्थ ( चोष्य, लेहय, खद्य, पेय) सर्वांना सुलभ आहेत ॥ ७ ॥ पुष्पमाला ( स्त्रक्) चंदन ( उटी लावण्यास) व वनिता ( तरुण स्त्रिया) वगैरे भोग पण सुलभ आहेत व त्यांना पाहून लोकांना हर्ष - आश्चर्य व विषाद वाटू लागला. ( काहींना हर्ष, काहीना आश्चर्य व काहींना विषाद) ॥ ८ ॥ त्या भवनातील संपत्ती ही चक्रवाकी आहे व भरत चक्रवाक आहे. मुनींची आज्ञा हा गारोडी आहे त्या गारोड्याने त्या दोघांना आश्रमातील पिंजर्यात रात्र सरे पर्यंत कोंडुन ठेवले ॥ दो ० २१५ ॥ श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु |