|
॥ श्रीरामचरितमानस ॥ (मराठी अनुवाद) ॥ अयोध्याकाण्ड ॥ अध्याय ४ था ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥ Download mp3 प्राणप्रिय ! मनिं रुचे मागते । एक वरें भरतास राज्य तें ॥ दो० :- घडे काय कोण्या समयिं हत नारी-विश्वासिं ॥ प्राणप्रिया ! मला मनापासून आवडते ते मागेत एका वराने भरताला राज्य द्या. ॥ १ ॥ नाथ ! मी हात जोडून दुसरा वर मागते तुम्ही माझा मनोरथ पूर्ण करा ॥ २ ॥ रामाने तापस वेषांत विशेष उदासीन राहून चौदा वर्षे वनांत वास करावा ॥ ३ ॥ कोमल वचन ऐकून राजाच्या हृदयात असा शोक झाला की, चंद्र किरणाच्या स्पर्शाने चक्रवाक व्याकुळ व्हावा ॥ ४ ॥ राजे इतके घाबरले की मुखावाटे शब्द उमटेना जणू वनात लावा पक्षावर ससाण्याने झडप घातली असावी ॥ ५ ॥ राजाला इतके वैवर्ण्य आले की जणु ताडाच्या वृक्षावर वीजच पडली ॥ ६ ॥ दोन्ही हातांनी डोके घट्ट धरुन व डोळे मिटून जणू शोकच देहधारी होऊन शोक करु लागला हो ॥ ७ ॥ माझा मनोरथ रुपी सुस्तरु फुलला व आता फळणार तोच हत्तीणीने समूळ उपटून टाकला की हो ! ॥ ८ ॥ कैकयीने अयोध्येला उजाड पाडली व जणू विपत्तींची बनविलेली मेढ अचल अशी रोवली ॥ ९ ॥ कोणत्या वेळी काय घडले हे ! नारीविश्वासाने माझा घात केला ( मी मारला गेलो) योगसिद्धीचे फल प्राप्त होण्याची वेळ अगदी जवळ आली असता अविद्येने जसा यतीचा नाश करावा ( तसे माझे झाले) ॥ दो० २९ ॥ असे मनोमनिं भूपति कुढती । बघुनि दशा, मनिं कुमति रुष्ट ती ॥ दो० :- धर्म धुरंधर धीर धरि उघडी नेत्रां राव ॥ याप्रमाणे भूपती मनातल्या मनात कुढत आहेत राजाची ती दुर्दशा पाहून दुर्बुद्धि कैकयी मनात चिडली. ॥ १ ॥ व ( विचारते की) भरत तुमचा मुलगा नाही की काय ? मला तुम्ही विकत आणलीत की काय ? ॥ २ ॥ ( मी जे मागितले ते) माझे वचन तुमच्या हृदयाला जर बाणासारखे बोचते आहे तर बोलताना विचार करुन का नाही बोललात ॥ ३ ॥ माझ्या म्हणण्याला तुम्ही अनुकूल आहांत की नाही याचे प्रथम उत्तर द्या. ( मात्र लक्षात ठेवा की) तुम्ही सत्यसंध – सत्यप्रतिज्ञ आणि रघुवंशी आहांत ॥ ४ ॥ वर देतो म्हणून कबूल करून आता नाही देत, ठीक आहे नका देऊ व सत्याचा लोप करून जगात अपयश घ्य़ा पदरांत ॥ ५ ॥ सत्याची प्रशंसा करुन वर देतो असे म्हणालात तेव्हा चणे फुटाणे घेईल मागून असे वाटले होते की काय ? ॥ ६ ॥शिबी, दधिची व बली हे जे काही बोलले ते ते वचनरुपी पण आपला देह, धन इ. ( सर्वस्व) त्याग करुन सुद्धा त्यांनी पाळला ॥ ७ ॥ या प्रमाणे कैकेयी अत्यंत कटू भाषण करुन जणूं जखमेत मीठच भरत आहे ॥ ८ ॥ धर्म धुरंधर राजाने धीर धरला व डोळे उघडले डोके बडवून एक दीर्घ श्वास घेतला व ( मनात) म्हणाला की ही तलवार माझ्य़ा मर्मावर घाव करीत आहे ॥ दो० ३० ॥ क्रोधें जळत पुढें बहु दिसली । जणूं रोष-तरवार उपसली ॥ दो० :- राज्यलोभ रामा नसे भरतीं परमा प्रीति ॥ ( डोळे उघडताच राजाला) आपल्या पुढे क्रोधाने फार जळत असलेली ( कैकयी) जणू काय रोषरुपी उपसलेली ( नंगी) तरवारच दिसली ॥ १ ॥ दुर्बुद्धि ही तिची मुठ असून निष्ठुरतारुपी धार कुबडीरुपी सहाणेवर पाजविली गेल्याने ॥ २ ॥ महिपालास ती कठोर व विक्राळ दिसली व लक्षात आले की ही खरोखर माझा जीव घेणार की काय ? ॥ ३ ॥ छाती कठीण करुन तिला आवडणारी अशी विनययुक्त वाणी राजा बोलू लागले ॥ ४ ॥ प्रिये ! भीरु ! प्रचीती व प्रीती यांचा त्याग करुन तू भलत्याच प्रकारे कसे बोललीस ? ॥ ५ ॥ मी शंकरांना साक्षी ठेवून सांगतो की भरत व राम हे दोन्ही माझे डोळे आहेत ॥ ६ ॥ ( सकाळी) सूर्योदय होताच मी दूतांना नक्की पाठवतो व ( आज्ञा) ऐकता क्षणीच ते दोघे बंधू वेगाने निघून येतील ॥ ७ ॥ मग शुभ दिवस पाहून सर्व साज सजवू व उत्सवाने मोठ्या थाटाने – भरताला राज्यावर बसवू ( मग तर झाले नां तुझ्या मनासारखे) ॥ ८ ॥ रामाला राज्यलोभ मूळीच नाही व त्याची भरतावर परम प्रीती आहे; पण मीच लहान मोठा हा विचार करुन राजनीतीचे पालन करीत होतो. ॥ दो० ३१ ॥ वदे स्वभावें राम-शपथ शत । राम जननि कधिं कांहिं न सांगत ॥ दो० :- प्रिये हास रुष सोडुनी माग करुनि सुविवेक ॥ रामाची शपथ शंभर वेळा घेऊन तुला सांगतो की रामाच्या मातेने मला कधीच काही सुद्धा सांगितले नाही ॥ १ ॥ तुला न विचारता मीच सगळे केले; त्यामुळे माझे सर्व मनोरथ धुळीला मिळाले ॥ २ ॥ आता हा सर्व रोष सोडून दे नी कर पाहू उत्सवाची तयारी; थोड्याच दिवसात भरत युवराज ( झाला म्हणून समज) ॥ ३ ॥ एकाच गोष्टीने मला दु:खात लोटले आहे, दुसरा वर फार अडचणीचा मागितला आहे ॥ ४ ॥ ती आग अजून सुद्धा माझ्या हृदयाला जाळीत आहे, तेव्हा तुझा हा रोष थट्टेतला आहे की अगदी खराच आहे ( सांग बरं एकदा) ॥ ५ ॥ रोष सोड व रामाचा अपराध कोणता तो सांग तरी सगळे लोक म्हणतात की, राम अत्यंत साधु आहेत ॥ ६ ॥ तू सुद्धा रामाची प्रशंसा करीत असतेस व त्याच्यावर स्नेह करतेस, परंतु तुझ्या आजच्या या वचनाने माझ्या मनात संदेह उठू लागला आहे ॥ ७ ॥ ज्याचा स्वभाव शत्रूला सुद्धा अनुकूल ( कृपा) करणारा आहे तो आईला प्रतिकूल कसे करील ? ॥ ८ ॥ प्रिये हा विनोदात्मक रोष सोड आणि चांगला विवेक करुन माग तरच मी भरताला राज्याभिषेक झालेला डोळे भरुन पाहीन ॥ दो० ३२ ॥ वारि विहीन मीन तरि जगती । फणि मणिविण दिन दीन कंठती ॥ दो० :- मुनिवेषें जर उदयिं ना जातिल राम वनांत ॥ मासे पाण्यातून बाहेर काढले तरी ( कदाचित) जगतील; मणीहीन झालेले फणी दीन होऊन दिवस कंठू शकतील ॥ १ ॥ परंतु सहज स्वभावाने मी सांगतो, मनात कपट ठेवून नव्हे, की माझे जीवन रामाशिवाय राहणे शक्य नाही ॥ २ ॥ प्रिये ! तू प्रवीण आहेस ( म्हणून) मनात जरा विचार करुन बघ ( म्हणजे कळेल) की माझे जीवन रामदर्शनाच्या स्वाधीन – रामदर्शनावर अवलंबून आहे ॥ ३ ॥ राजाचे मृदु भाषण ऐकून दुर्बुद्धि राणी अधिकच जळू लागली जणू अग्नित तुपाच्या आहुतीच पडल्या ॥ ४ ॥ ती म्हणाली तुम्ही अनंत उपाय करा नां का; इथे तुमची माया काही चालणार नाही ॥ ५ ॥ ( मी मागितले ते वर) द्या, नाहीतर नाही देत म्हणून अपयश पदरांत घ्या, फार प्रपंच ( शब्दावडंबर) मला मुळीसुद्धा आवडत नाही ॥ ६ ॥ राम साधु आहेत, तुम्ही शहाणे साधु आहांत आणी राममाता साधी आहे ! मी सगळ्यांना चांगली ओळखते ! ॥ ७ ॥ कौसल्येने जसे माझे चांगले चिंतले तसेच त्याचे चांगले फळ मी त्यांनाच देईन बरं ! ॥ ८ ॥ सकाळ होताच जर का राम मुनीवेषाने वनात गेले नाहीत, तर राजा ! मनात पक्के समजून ठेवा की माझे मरण व तुमचे अपयश होणार ! ॥ दो०३३ ॥ कुटिल वदुनि असं तडकन् उठली । रोष तरंगिणि जणुं अति फुगलीं ॥ दो० :- बघुनि व्याधि असाध्य नृप पडे धरिणिं पिटिि माथ ॥ असे सांगून कुटील कैकयी ताडकन उठली – उभी राहीली, जणूं रोष नदीच अतिशय फुगली ( पूर आला, वाढली) ॥ १ ॥ ती पापरुपी पर्वतातून प्रगट झाली असून क्रोधजळाने ( इतकी) भरली आहे ( की) तिच्याकडे बघण्याची सोय नाही ॥ २ ॥ दोन वर हे तिचे दोन तट ( किनारे) आहेत. तिचा हट्ट ही फार घोर धार आहे आणि कुबडीच्या वचनांनी दिलेली प्रेरणा ( चिथावणी) हा भोवरा आहे.॥ ३ ॥ राजारुपी तरुला मूळासुद्धा उलथून टाकून ती विपत्ती सागराला मिळण्यास ( वेगाने) चालली आहे ॥ ४ ॥ नरेशाला कळले की ही जे म्हणाली ( तो विनोद नसून) खरेच आहे व आपला मृत्यु स्त्रीच्या निमित्ताने शिरावर नाचत आहे ॥ ५ ॥ ( तेव्हा) तिला बसवून तिची पायधरणी करुन विनंती करतात की तू सूर्यकुळाला कुर्हाड बनू नकोस ॥ ६ ॥ माझे मस्तक ( हवे तर) आता माग तुला आताच देतो; पण तू मला रामवियोगाने मारु नकोस ॥ ७ ॥ तुला वाटेल ते ( बाकीचे) कर पण रामाला ठेव नाहीतर जन्मभर तुझी छाती जळत राहील ॥ ८ ॥ रोग असाध्य आहे असे जाणून राजा मस्तक बडवीत धरणीवर पडला व परम आर्त ( स्वराने) राम ! राम ! रघुनाथ ! असे उच्चारुं लागला ॥ दो० ३४ ॥ व्याकुळ राव शिथिलता अंगां । जणुं करि करिणि कल्पतरु-भंगा ॥ दो० :- श्रवुनि मर्म वच नृप म्हणे वद, न दोष तव कांहिं ॥ राजा व्याकुळ झाला व सर्व अवयवांना अशी शिथिलता आली की जणू करिणीने कल्पतरुच मोडून टाकला ॥ १ ॥ कंठ सुकून गेला, मुखातून शब्द सुद्धां निघेना व असा दीन झाला की पाण्यावाचून पाठीनच ( मासा) ॥ २ ॥ तेव्हा ( पुन्हा) कैकयी कटू व कठोर बोलून जणूं जखमेत विषच भरुं लागली ॥ ३ ॥ तुमच्या मनात सरते शेवटी असेच करायचे होते तर मग ‘ माग ’ असे कोणाच्या बळावर म्हणालात ? ॥ ४ ॥ भूपाला ! दोन विरोधी गोष्टी एकाच वेळी घडू शकतात काय ? खदखदां हसणे व गाल फुगवणे ॥ ५ ॥ दाता म्हणविले व कृपणपणा ( आणि) शुरवीर म्हणवून क्षेमकुशल साधणे ( या गोष्टी एकाच वेळी घडतात काय ?) ॥ ६ ॥ तेव्हा एक तर वचन मोडा नाही तर धीर धरा, बायकांच्या सारखे ( मुळुमुळु रडत) शोक करीत बसू नका ॥ ७ ॥ जे सत्यसंध असतात त्यांना आपले शरीर, स्त्री, पुत्र, धरणी, घर व धन ही तृणासमान वाटतात असे ( सज्जन) म्हणतात ॥ ८ ॥ तिचे मर्मी भाषण ऐकून राजा म्हणाला बोल ( तुला हवे ते बोल) त्यात तुझा मुळीच दोष नाही हा काळच तुला पिशाच्यासारखा लागला आहे व तोच तुझ्याकडून हे बोलवीत आहे. ॥ दो० ३५ ॥ भरत न हौं इच्छि मुळि नृपती । विधिवश जीविं वसे तव कुमती ॥ दो० :- पडे भूप बहु निववुनी कां करिशी अवसान ॥ राजा होण्याची इच्छा भरताला मुळीच नाही. पण दुर्दैवाने दुर्बुद्धिने तुझ्या हृदयात वस्ती केली ॥ १ ॥ हे पापाचे परिपक्व झालेले हे फळ आहे; म्हणूनच भलत्या वेळी दैव फिरले ॥ २ ॥ पुरी अयोध्या पुन्हा सुशोभित होऊन स्वतंत्रपणे वसेल आणि सर्व गुणांचे सागर अशा रामाची सत्ता सुरु होईल ॥ ३ ॥ सगळे बंधु रामाची सेवा करतील हे निश्चित आणि रामाची महत्ता त्रैलोक्यात गाइली जाईल ॥ ४ ॥ ( परंतु) तुझा कलंक ( तूं) मेल्यावर सुद्धा कधी जाणार नाही व माझा पश्चाताप मी मेल्यावर सुद्धा शांत होणार नाही ॥ ५ ॥ आता तुला बरे वाटेल ते कर; ( फक्त) येथून दूर जा व आपले ( काळे) तोंड लपवून बस ( कुठेही) ॥ ६ ॥ तुला हात जोडून विनंती करतो की जोपर्यंत मी जगेन तोपर्यंत तू पुन्हा काही सुद्धा बोलू नकोस ॥ ७ ॥ ( चामड्याच्या) वादीसाठी गाय मारीत आहेस पण तू अभागी आहेस व शेवटी तुला ( भरपूर) पश्चाताप करावा लागेल ॥ ८ ॥ माझा विनाश कां करते आहेस असे नाना प्रकारे विनवून राजा मूर्च्छित पडला पण कपट-चतुर काहीही बोलली नाही जणू काही स्मशान जागवीत आहे . ॥ दो० ३६ ॥ राम राम मुखिं भूप विकळ तो । जणुं विहंग विण पंख विवळतो ॥ दो० :- द्वारिं दाटि सेवक सचिव म्हणति उदय पाहून ॥ विह्वळ होऊन भूपती ‘ राम, राम ’ असे म्हणत आहे की जणूं पंख नसलेला ( तोडलेला) पक्षीच विवळत आहे ॥ १ ॥ राजा मनात विनवीत आहे की उजाडूच नये व ही बातमी कोणी रामाला सांगू नये ॥ २ ॥ हे रवि ! तुम्ही रघुकुलाचे गुरु आहांत तरी आपण उगवूच नये, नाही तर ही नगरी पाहून तुमच्या हृदयात शूळ उठेल ॥ ३ ॥ ( कवी म्हणतात) राजाची प्रीती व कैकयीची कठोरता ही दोन्ही विधात्याने परमावधीची बनविली आहेत. ॥ ४ ॥ राजा विलाप करीत असताच प्रात:काळ झाला व द्वाराजवळ वीणा, शंख इत्यादी मंगल वाद्ये वाजू लागली ॥ ५ ॥ भाट ब्रीदावली उच्चारु लागले व गायक ( राजाचे) गुण गाऊ लागले ( परंतू) ते सर्व ऐकून राजाला जणू बाण लागू लागले ॥ ६ ॥ पतीबरोबर सहगमन करणार्या सतीला जशी विभूषणे अप्रिय वाटतात तसेच हे सर्व मंगल समुदाय राजाला दु:खद वाटू लागले ॥ ७ ॥ सर्वांनाच रामदर्शनोत्सवाची उत्कंठा लागली असल्याने त्या रात्री कोणीच झोपले नाहीत ॥ ८ ॥ राजवाड्याच्या द्वाराशी सेवक सचिव वगैरेंची गर्दी झाली आहे व सूर्योदय झालेला पाहून ते म्हणतात की अजून राजे जागे झाले नाहीत असे विशेष कारण तरी काय आहे ? ॥ दो० ३७ ॥ श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु |