॥ श्रीरामचरितमानस ॥

(मराठी अनुवाद)

॥ अरण्यकाण्ड ॥

॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

अध्याय ३ रा



Download mp3

भक्तियोग परिसुनी सुखी अति । लक्ष्मण शीर्षा प्रभुपदीं नमवति ॥
गेले काहिं दिवस या रीतीं । विरती ज्ञान कथित गुण नीती ॥
शूर्पणखा जी रावण-भगिनी । दुष्ट हृदय दारुण जशि अहिनी ॥
पंचवटिस एके दिनिं आली । बघुनि कुमारां विकल जहाली ॥
भ्राता पिता पुत्र उरगारी । पुरुष मनोहर निरखत नारी ॥
होइ विकल नावरूं शके मन । जसा द्रवे रविमणि रवि पाहुन ॥
रुचिर रूप धरि ये प्रभुपासी । स्मित बहु करुनि वदे वचनासी ॥
पुरुष तुम्हांसम नारि न मजसम । विधि विचारि रचि हा योगोत्तम ॥
मम अनुरूप पुरुष बघतां ही । सोधुनि लोकत्रयांत नाहीं ॥
म्हणुन कुमारी असे आजवरि । तुम्हां न्यहाळुनि तोष कांहिं तरि ॥
सिते बघत वदले प्रभु बाई ! । असे कुमार किं मम लघु भाई ॥
ये; रिपुभगिनी जाणुनि लक्ष्मण । प्रभुसि बघत मृदु वदले तत्क्षण ॥
श्रुणु सुंदरि मी सेवक यांचा । पराधीन, नहि तुला सुखाचा ॥
प्रभु समर्थ कोसलपुर-राजे । जें करतिल तें त्यां सब साजे ॥
दास इच्छि सुख मान भिकारी । व्यसनी धन सुगती व्यभिचारी ॥
लोभी इच्छि यश चार गुमानी । बघति काढुं नभदुध हे प्राणी ॥
फिरुनी आली रामनिकट ती । प्रभु लक्ष्मणाकडे पाठवती ॥
लक्ष्मण वदले वरील तुज तो । तृण तोडुनि टाकील लाज जो ॥
चिडुनि जाइ मग रामा प्रती । प्रगटी भेसुर रूपा अती ॥
सीते सभय बघुनि रघुराजा । बोधिति खूण करोनी अनुजा ॥

दो० :- लक्ष्मण तिज सुलाघवे, करि विण नासा कान ॥
तिचें करीं रावणा जणुं दिधलें कीं आव्हान ॥ १७ ॥

भक्तियोग श्रवण करून लक्ष्मण अति सुखी झाले व त्यांनी प्रभूच्या पायांवर मस्तक ठेऊन नमस्कार केला. ॥ १ ॥ अशा रीतीने वैराग्य, ज्ञान, गुण व नीति कथन करण्यांत काही दिवस (पंचवटीत) निघून गेले. ॥ २ ॥
शूर्पणखा श्रुति नासा खंडन - रावणाची बहिण शूर्पणखा जी नागिणीसारखी दुष्ट हृदयाची व भयानक होती, ॥ ३ ॥ ती एके दिवशी पंचवटीस आली आणि दोन कुमारांना पाहून कामाने विव्हळ झाली. ॥ ४ ॥ हे उरगारी ! (गरुडा) सूर्याला पाहून जसा सूर्यमणी द्रवतो तशी स्त्री, भाऊ, बाप, पुत्र इ. मनोहर पुरुषाला पाहून काम विव्हळ होते, आपले मन आवरूं शकत नाही. ॥ ५-६ ॥ तिने सुंदर रूप धारण केले आणि प्रभुपाशी आली व पुष्कळ स्मित करून म्हणाली की, ॥ ७ ॥ तुमच्या सारखा पुरुष नाही व माझ्या सारखी स्त्री नाही; तेव्हां हा उत्तम योग विचारी विधीनेच जुळवून आणला आहे. ॥ ८ ॥ मी तिन्ही लोकांत शोधून पाहिले पण माझ्या योग्यतेचा, मला अनुरूप असा पुरुष कोठेच दिसला नाही. ॥ ९ ॥ त्यामुळे मी आजपर्यंत कुमारी राहिले आहे (पण आज) तुम्हांला न्याहाळून पाहिल्यावर (काही तरी, थोडा तरी) संतोष वाटला. ॥ १० ॥ सीतेकडे बघत प्रभु तिला म्हणाले की बाई ! माझा धाकटा भाऊ कुमार आहे की ! ॥ ११ ॥ हे ऐकतांच ती आली लक्ष्मणाजवळ, शत्रूची बहीण आहे असे (प्रभुप्रेरणेने) जाणून प्रभुकडे बघत तत्क्षणी मृदु वाणीने म्हणाले की, ॥ १२ ॥ सुंदरी ! ऐक मी यांचा सेवक आहे, पराधीन आहे. मी तुला सुखाचा ठरणार नाही (माझ्यापासून तुला सुख मिळणार नाही). ॥ १३ ॥ प्रभु (माझे स्वामी) समर्थ आहेत, ते कोसलपुरीचे राजे आहेत व ते जे करतील (त्यांनी दुसरे लग्न केले तरी) ते त्यांना साजेल-शोभेल (मला नाही शोभणार). ॥ १४ ॥ सेवकाने सुखाची व मानाची इच्छा करणे ! भिकार्‍याने मानसन्मानाची, व्यसनी माणसाने धनाची (श्रीमंत होण्याची), व्यभिचारी व्यक्तीने सद्‌गती मिळविण्याची, लोभी माणसाने व घमेंडखोर हेराने यशाची इच्छा करणे, म्हणजे या प्राण्यांनी आकाशाचे दूध काढण्याचा प्रयत्‍न करणे आहे. ॥ १५-१६ ॥ ती पुन्हा वळून रामचंद्राजवळ आली. प्रभूनी तिला परत लक्ष्मणाकडे पाठविली. ॥ १७ ॥ लक्ष्मण म्हणाले की जो लज्जेशी काडीमोड करून तिचा त्याग करील तोच तुला वरील. ॥ १८ ॥ मग ती चिडून रामाकडे चालली व भयानक रूप प्रगट करती झाली. ॥ १९ ॥ सीता भयभीत झाली आहे असे रघुराजानी पाहिले आणि अनुजाला खूण करून समजाऊन सांगितले. ॥ २० ॥ लक्ष्मणाने अति लाघवाने तिला नाक कान विरहित केली आणि जणूं तिच्या हाती रावणाला आव्हानच दिले. ॥ दो० १७ ॥

नाक-कान-विण विक्राळा अति । गेरुपाट जणुं शैलीं वाहति ॥
उप-खर दूषण विलपत पळली । धिक् पौरुष बल बंधो ! वदली ॥
सांगे सगळे पुसतां तेणें । श्रवुनि जमवि यातुधान सेने ॥
धावति निशिचर-निकर-वरूथ । जणुं सपक्ष कज्जलगिरि यूथ ॥
नाना वाहन नानाकार हि ।नानायुध-धर घोर अपारहि ॥
अश्रुति-नासा अशुभरूप ती- । शूर्पणखा ते ठेविति पुढतीं ॥
होती अशकुन भीतिद मिति ना । मृत्यु विवश झुंडी मानिति ना ॥
गर्जति तर्जति गगनीं उडती । बघुनि कटक भट भारि हर्षती ॥
धरा बंधु दो जिते कुणि म्हणे । वधा धरुनि कुणि नारिस हरणें ॥
धूलिपूर्ण नभमंडल बने । राम बाहुनी अनुजा म्हणे ॥
जा गिरि कंदरिं जानकि घेउनि । निशिचर कटक घोर ये चालुनि ॥
प्रभुवच ’सावध रहा’ श्रवण करि । जाई श्रीसह चापबाण करिं ॥
राम बघुनि रिपुदल ये चालुनि । चढवि कठिण कोदंडा विहसुनि ॥

छं० :- कोदंड चढवुनि कठिण, बांधित शिरिं जटा शोभति कसे ॥
मरकत गिरीवर लढत दामिनि कोटिसह अहि युग जसे ॥
कटिं कसुनि तूण विशाल भुजिं धृत चाप विशिखा घासुनी ॥
मृगराज कीं प्रभु निरखिती गजराज यूथां पाहुनी ॥ १ ॥
सो० :- आले त्वरा करून धरा धरा धावत सुभट ॥
एका यथा बघून बाल-रविसि घेरिति दनुज ॥ १८ ॥

नाक कान गेल्याने ती फारच विक्राळ दिसूं लागली व डोंगरावरून जणूं गेरूचे कावेचे पाटच वाहूं लागले ॥ १ ॥ ती विलाप करीत खरदूषणांच्या जवळ गेली व म्हणाली की, बंधो, तुझ्या पुरुषार्थाला व बलाला धिःकार असो. ॥ २ ॥ त्याने विचारल्यावर तिने सर्व सांगितले. ते ऐकून त्याने राक्षसांचे सैन्य युद्धासाठी जमविले, सज्ज केले. ॥ ३ ॥ जणूं काय पंख फुटलेल्या पर्वतांच्या टोळ्या काजळाच्या पर्वतांच्या टोळ्यांप्रमाणे निशाचर समूहांच्या झुंडीच्या झुंडी धावूं लागल्या. ॥ ४ ॥ त्यांची वाहने नाना प्रकारची असून ते नाना आकारांचे आहेत व नाना प्रकारची घोर अगणित शस्त्रे त्यांनी धारण केली असून ते सुद्धां घोर व अपार दिसत आहेत. ॥ ५ ॥ त्यांनी त्या नाककान कापलेल्या अमंगळरूप शूर्पणखेला सर्वांच्या पुढे ठेवली आहे. ॥ ६ ॥ भयसूचक अगणित अपशकून होत आहेत. पण त्या सर्व झुंडी मृत्युला विशेष वश झाल्या असल्याने अपशकुनांना जुमानित नाहीत. ॥ ७ ॥ गर्जना करीत, दटावीत आकशांत उडत आहेत असे आपले सैन्य पाहून योद्धे फार हर्षित झाले. ॥ ८ ॥ कोणी म्हणाले की त्या दोघा भावांना जिवंत धरा, कोणी म्हणाले धरून ठार करा, कोणी म्हणाले त्या स्त्रीला पळवून आणा. ॥ ९ ॥ आकाशमंडळ धुळीने पूर्ण भरले तेव्हां रामानी अनुजाला बोलावून सांगितले की, ॥ १० ॥ निशाचरांचे घोर सैन्य चाल करून येत आहे म्हणून जानकीला घेऊन डोंगराच्या गुहेत जा. ॥ ११ ॥ सावध रहा, असे प्रभूचे वचन ऐकले आणि लक्ष्मण हातांत धनुष्यबाण घेऊन सीतेसहित निघाले. ॥ १२ ॥ शत्रूचे सैन्य चाल करून येत आहे असे पाहून रामचंद्रानी आपले कठिण कोदंड मोठ्याने हसून सज्ज केले. ॥ १३ ॥ छं - कठिण कोदंडाची दोरी चढविल्यावर जटा बांधीत असतां प्रभु कसे शोभत होते तर नीलमण्यांच्या पर्वतावर कोटि सौदामिनी (विजा) बरोबर जणूं दोन भुजंगच लढत असावेत तसे दिसले. कमरेला विशाल भाता कसून व विशाल हातांत धनुष्य घेऊन व बाण घासून घेऊन प्रभु येणार्‍या शत्रूंकडे असे बघत आहेत की जणूं गजराजांच्या कळपांना पाहून मृगराज सिंहच त्यांच्याकडे निरखून पहात आहे. ॥ १ ॥ उगवत्या सूर्या (बालरवीला) एकटा पाहून जसे दनुज (मन्देह नावाचे राक्षस) घेरतात त्याप्रमाणे मोठमोठे राक्षस योद्धे धरा धरा असे ओरडत त्वरेने धावत आहेत. ॥ दो० १८ ॥

प्रभुस बघुनि शर सोडुं न श्कती । निशिचर भट सब चकित निरखिति ॥
बाहुनि सचिव वदति खर-दूषण । हा कुणि नृपबालक नरभूषण ॥
नाग असुर सुर नर मुनि जितके । दृष्ट विजित अम्हिं हत वा कितके ॥
एका, जन्मामध्यें हि नाहीं । कुठें पाहिली सुंदरता ही ॥
केली भगिनी यदपि विरूपहि । अनुपम पुरुष वधा लायक नहि ॥
द्या सत्वर निज नारि गोपिता । भवनिं जिते जा बंधु उभयता ॥
माझे वचन तया सांगावे । शीघ्र तदुत्तर ऐकुनि यावें ॥
वदले रामा दूत जाउनी । श्रवुनि राम वदले स्मित करुनी ॥
क्षत्रिय अम्हिं मृगया वनिं करतों । तुमच्या सम खलमृगां धुंडतों ॥
रिपु बलवंत हि बघुन न डरतों । काळासिहि करुं सुकृत् समर तों ॥
यद्यपि मनुज दनुज कुल दालक । मुनिपालक खलनाशक बालक ॥
बळ नसेल तर घरास जा ना ।मी न मारि कधिं रण विमुखानां ॥
रणिं येउनि कां कपट चतुरता । रिपुवर कृपा परम कातरता ! ॥
त्वरित जाउनी दूत कळवती । परिसुनि खर दूषण अति जळती ॥

छं० :- उर जळत वदले धरा धावति विकट भट रजनीचर ॥
शर चाप तोमर शक्ति शूल कृपाण परशु गदा धर ॥
प्रभु आधिं करिति कठोर धनु टंकार घोर भयंकर ॥
तैं बधिर विव्हळ यातुधान, न शुद्धि राहे तिळभर ॥ १ ॥
दो० :- होऊनि सावध धावले जाणुनि सबल अराति ॥
रिपु रामावर वर्षती अस्त्र शस्त्र बहु जाति ॥ १९रा ॥
तोडुनि त्यांचीं आयुधें तीं तिळसम रघुवीर ॥
ताणुनि आश्रुति कार्मुका मग सोडिति निज तीर ॥ १९म ॥

प्रभूला पाहिल्यावर कोणीही त्यांच्यावर बाण सोडूं शकले नाहीत व सगळे निशाचर वीर चकित होऊन प्रभूला निरखीत राहिले. ॥ १ ॥ सचिवांना बोलावून निशाचर म्हणाले की हा कोणीतरी नृपबालक नरविभूषण आहे. ॥ २ ॥ आज पर्यंत नाग, असुर देव, नर व मुनि जितके असतील तितके आम्हीं पाहिले, जिंकले व किती ठार मारले. ॥ ३ ॥ पण बंधूंनो ऐका ! असले सौंदर्य, ही सुंदरता आम्ही अवघ्या जन्मांत कुठेच पाहिली नाही. ॥ ४ ॥ यांनी बहिणीला विरूप केली हे खरे असले तरी हा अनुपम पुरुष असल्यामुळे वध करण्यास पात्र नाही. ॥ ५ ॥ लपवून ठेवलेल्या आपल्या स्त्रीला लवकर द्या व तुम्ही दोघे भाऊ जिवंत घरी जा. ॥ ६ ॥ हे माझे म्हणणे त्याला सांगा व त्याचे उत्तर ऐकून त्वरेने या असे सचिवांस सांगितले. ॥ ७ ॥ दूतांनी जाऊन रामास सांगितले ते ऐकून राम स्मित करून म्हणाले की ॥ ८ ॥ आम्ही क्षत्रिय असून वनांत शिकार करीत असतो व तुमच्या सारख्या खलरूपी पशूंना शोधीत फिरत असतो. ॥ ९ ॥ बलवान शत्रूला पाहून सुद्धां आम्ही भीत नाही. फार काय एकवेळ काळाशी सुद्धां युद्ध करूं. ॥ १० ॥ मी जरी मनुज असलो तरी दनुजकुळाचा निर्दालक आहे व जरी बालक असलो तरी मुनींचा पालक व खलांचा संहार करणारा आहे. ॥ ११ ॥ अंगी बळ नसेल तर घरी परत कां नाही जात ? रणांतून पाठ फिरवून जाणारांस मी कधीच मारीत नाही. ॥ १२ ॥ रणांत येऊन कपटाने चतुरपणा कां दाखवितां ? शत्रूवर कृपा करणे ही अति कातरता, भ्याडपणा आहे. ॥ १३ ॥ दूतांनी त्वरेने जाऊन उत्तर कळविले आणि ते ऐकून खर-दूषणांचा अति जळफळाट झाला. ॥ १४ ॥ मनांत जळफळतच खरदूषण म्हणाले की धरा. त्याबरोबर आक्राळ विक्राळ निशाचर योद्धे धावले. त्यांनी धनुष्य, बाण तोमर, शक्ति, कृपाण (पट्टे) परशु, गदा इ. शस्त्रास्त्रे धारण केली आहेत. प्रभूनी आधी कठोर, घोर व भयंकर असा धनुष्याचा टणत्कार केला तेव्हां ते सर्व राक्षस व्याकुळ व बहिरे झाले आणि त्यांना तिळभर सुद्धां शुद्धी राहिली नाही. ॥ छं १ ॥ ते निशाचर वीर शुद्धीवर येऊन धावले व शत्रु बलाढ्य आहे हे जाणून ते विविध जातींच्या शस्त्रास्त्रांचा रामावर वर्षाव करूं लागले. ॥ दो० १९रा ॥ तीं त्यांची आयुधे आपल्या बाणांनी तिला तिळा तिळा एवढी फोडून मग रघुवीर कानापर्यंत धनुष्य ताणून आपले बाण सोडूं लागले. ॥ दो० १९म ॥

छं०:- मग जाति बाण कराल । फुं-करत बहु कीं व्याल ॥
रणिं कोपले श्रीराम । शर सुटति निशित निकाम ॥
पाहोनि खरतर तीर । पळतात निशिचर वीर ॥
त्रय रुष्ट वदती भाइ । पळुनी रणांतुनि जाइ ॥
करिं मारुं आम्हीं त्यास । फिरले हि देहिं उदास ॥
विविधायुधें हि अपार । करतात संमुख मार ॥
रिपु रुष्ट अति पाहून । प्रभु धनुषिं शर लावून ॥
बहु सोडिती नाराच । तोडीति विकट पिशाच ॥
कर पाद उर भुज शीस । पडुं लागलीं धरणींस ॥
चीत्-करति लागत बाण । धड पडति कुधर समान ॥
भट तुटति तनु शत खंड । विण मौलि धावति रुंड ॥
नभिं उडति बहु भुज मुंड । विण मौलि धावति रुंड ॥
खग कंक काक शृगाल । कट्-कटति कठिण कराल ॥

छं० :- कट्-कटति कोल्हे भूत पिशाच्च खर्परि सांचती ॥
वेताळ वीर कपाल ताला धरिति योगिणि नाचती ॥
रघुवीर-मार्गण चंड खंडित वीर-बाहुं-उर-शिरां ॥
सर्वत्र पडती उठति लढती रटति धर धर भयगिरा ॥ १ ॥
अंत्रांसि घेवुनि उडति गृध्र पिशाच्च करिं धृत धावती ॥
संग्राम-पुर-वासी पतंगां बालबहु जणुं उडवती ॥
मारून पडले वक्ष-फुटले विव्हळत भट कण्हत रें ॥
पाहूनिं निज दळ विकळ भट खर धावले त्रिशिरा त्वरें ॥ २ ॥
शर शक्ति शूल कृपाण तोमर परशु एके क्षणिं किती ॥
संक्रुद्ध निशिचर रणीं श्रीरघुवीरिं अगणित फेकिती ॥
प्रभु निमिषिं रिपु-शस्त्रास्त्र खंडुनि सोडि घोषुनि सायकां ॥
उरिं विशिख दशदश घोर मारिति सर्व निशिचर-नायकां ॥ ३ ॥
महिं पडति उठती लढति, मरति न करति माया भट अती ॥
सुरसभय रिपु चौदा हजारहि एकटे कोसलपती ॥
प्रभु बघुनी मुनि सुर सभय, मायानाथ कौतुक करि असें ॥
बघुनी परस्पर राम रिपुदल समर करुनी मरतसे ॥ ४ ॥
दो० :- राम राम म्हणतां मरति पावति पद निर्वाण ॥
क्षणिं उपाय करुनि रिपू मारिति कृपानिधान ॥ २०रा ॥
हर्षित वर्षति सुमन सुर दुंदुभि-रव गगनांत ॥
स्तुति कर करुनी सकल गत रुचिर गगनयानांत ॥ २०म ॥

मग फूत्कार करीत जाणार्‍या पुष्कळ भुजंगा प्रमाणेच जणूं कराल बाण जाऊं लागले. श्रीराम रणांत कोपले व अति तीक्ष्ण बाण सुटूं लागले. ॥ १ ॥ ते फार खडतर तीर येत असलेले पाहून निशाचर वीर पळूं लागले तेव्हां खर-दूषण व त्रिशिरा हे तिघे भाऊ रुष्ट होऊन म्हणाले की जो युद्धांतून पळून जाईल त्याला आम्ही आपल्या हातानी ठार मारूं तेव्हां देहावर उदार उदासीन होऊन ते परत वळले व अगणित विविध आयुधांचा मारा समोरून करूं लागले. ॥ २-३ ॥ शत्रू फार चवताळले आहेत असे पाहून प्रभूनी धनुष्यावर एक साधा बाण लावून अनेक लोखंडी बाण (नाराच) सोडण्यास प्रारंभ केला व विक्राळ राक्षसांना तोडूं लागले. ॥ ४ ॥ पुष्कळ हात, पाय, छाती, भुजा, डोकी इ. धरणीवर पडूं लागली. बाण लागतांच हत्तींच्या सारखा चित्कार करूं लागले व पर्वतांसारखी धडें पडूं लागली. ॥ ५ ॥ वीरांचे देह शतखंड तुकडे तुकडे होऊं लागले तरी ते माया करून उठूं लागले. आकाशांत पुष्कळ भुजा व मुंडकी उडूं लागली, व मस्तकहीन धडे (रूंड) धावूं लागली. ॥ ६ ॥ कावळे, करकोचे, गिधाडे इ. पक्षी व कोल्हे कठोर व भयानक असा कट् कट् शब्द करूं लागले. ॥ ७ ॥ कोल्हे कट्कट्, तट्तट् आवाज काढीत आहेत, भूतप्रेत पिशाच्चें डोक्यांचा कवट्यांत रक्तमांसादि गोळा करीत आहेत, वीर वेताळ कवट्यांचा ताल धरूं लागले व योगिणी नाचूं लागल्या. रघुवीराचे प्रचंड बाण प्रचंड निशाचर वीरांचे उर, बाहू, मस्तकें यांचे खंडण करूं लागले, जिकडे तिकडे राक्षस पडूं लागले पण पुन्हां उठून धरा धरा असा भयंकर आवाज करीत ओरडत लढूं लागले. ॥ छं १ ॥ गिधाडं आतडी तोंडात धरून उडूं लागले व पिशाच्यादि त्या आतड्यांचे लोंबत असलेली टोके हातांत धरून धावूं लागली तेव्हां वाटले की जणूं युद्धपुरींतील पुष्कळ मुले पतंगच उडवीत आहेत. मारून पाडलेले, वक्षःस्थळे फुटलेले योद्धे रेरे करीत कण्हत विव्हळत आहेत. आपले सैन्य व्याकुळ झाले आहे असे पाहून खर-दूषण त्रिशिरादि योद्धे त्वरेने धावले. ॥ छं २ ॥ बाण, शक्ती, शूळ, पट्टे, तोमर, परशु इ. अगणित शस्त्रास्त्रे एकाच क्षणीं ते अति क्रुद्ध झालेले अगणित निशाचर श्रीरघुवीरावर मारते झाले. प्रभूनीं एका निमिषांत त्यांची सर्व शस्त्रास्त्रें तोडून टाकली व गर्जना करून बाण सोडले व सर्व निशाचर नायकांच्या छातींत प्रत्येकी दहादहा बाण मारले. ॥ छं ३ ॥ ते राक्षस वीर खाली पडतात पण न मरतां पुन्हां उठून लढतात व अति माया करीत आहेत हे पाहून देव घाबरले. मायानाथ प्रभूनी जेव्हां पाहिले की देव व मुनि भयभीत झाले आहेत तेव्हां त्यांनी एक कौतुक केले, त्यावरोबर एकमेकांस रामरूप पाहून ते सर्व सैन्य आपसांत लढून मेले. ॥ छं ४ ॥ रामराम म्हणत असतां मरण पावले आणि त्यांना मोक्षपद प्राप्त झाले. अशाप्रकारे उपाय करून कृपानिधानानी एका क्षणांत सर्व शत्रू मारले. ॥ दो० २०रा ॥ निरनिराळ्या देवगणांनी निरनिराळी स्तुती केली. देवांनी आकाशांत वाजविलेल्या नगार्‍यांचा ध्वनी व केलेल्या स्तुतींतील जयजयकारही गुप्त राहिलेल्या लक्ष्मणाच्या कानी गेला असेलच. त्यामुळे लक्ष्मण आतां सीतेसह येतील. ॥ दो० २०म ॥

* * * * *

श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु

GO TOP