|
॥ श्रीरामचरितमानस ॥ (मराठी अनुवाद) ॥ उत्तराकाण्ड ॥ ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥ अध्याय २ रा Download mp3 लंकापति कपीश नलनीलहि । जांबवंत अंगद शुभशीलहि ॥ दो० :- मम कौसल्या चरणिं ते सगळे नमिती माथ ॥ लंकापती बिभीषण, कपीश सुग्रीव, नल नील, जांबवान अंगद आणि हनुमान आदि सर्व सुस्वभावी वानरवीरानी चांगले मनोहर मनुष्यदेह धारण केले आहेत. ॥ १-२ ॥ ते सर्व भरताचे सुशील स्नेह व नेम यांची आदराने व अतिप्रेमाने प्रशंसा करीत आहेत. ॥ ३ ॥ व पुरवासी लोकांची रीत पाहून त्यांच्या प्रभुचरणी असलेल्या प्रीतीची ते सर्व प्रशंसा करीत आहेत. ॥ ४ ॥ मग रघुपतींनी आपल्या सर्व मित्रांना (सुग्रीवादिकांना) बोलावून त्यांना वसिष्ठ मुनींच्या पाया पडण्यास सांगीतले व म्हणाले की आमच्या कुळाला पूज्य असलेले वसिष्ठ गुरु म्हणतात ते हे यांच्याच कृपेने राक्षस मारले गेले ॥ ५-६ ॥ अहो ! मुनी ! हे पहा, हे सगळे माझे सखे आहेत हे युद्धसागरात मला जहाज बनले ॥ ७ ॥ हे मला भरतापेक्षाही जास्त प्रिय आहेत. कारण यांनी माझ्या हितासाठी आपला जन्म वेचला ॥ ८ ॥ प्रभूचे वचन ऐकून ते सगळे प्रेममग्न झाले. व त्यांना निमिषा निमिषाला नवसुख होऊं लागले ॥ ९ ॥ मग बिभीषण सुग्रीवादी सर्वांनी कौसल्येच्या चरणांना वंदन केले, तेव्हा हर्षित होऊन तिने सर्वांना अशीर्वाद दिला व म्हणाली की तुम्ही मला रघुनाथासारखे प्रिय आहांत.॥ दो० ८ रा ॥ मग सुखकंद रामचंद्र नगरात जाण्यास निघाले तेव्हा आकाश फुलांच्या वृष्टीने भरुन गेले आणि नगरातील स्त्री पुरुष समुदाय सौधांवर चढचढून प्रभूंचे दर्शन घेऊ लागले ॥ दो० ८ म ॥ कांचन कलश विचित्र सजवले । घरोघरी द्वारांत मांडले ॥ दो० :- नारि कुमुदिनी अवध सर रघुपति विरह दिनेश ॥ सोन्याचे कलश चित्र विचित्र सजविले असून ते लोकांनी आपल्या घराच्या पुढील द्वारांत मांडून ठेवले आहेत. ॥ १ ॥ सुंदर तोरणे, पताका, ध्वज वगैरे मंगलोत्सव चिन्हे सर्व लोकांनी लावली आहेत. ॥ २ ॥ सर्व रस्ते सुगंधित जलाने शिंपलेले असून गजमुक्तांच्या रांगोळ्या जागोजागी काढल्या आहेत. ॥ ३ ॥ नाना प्रकारचे मंगलसाज सजविले असून नगरात हर्षाने पुष्कळ डंके (वगैरे शुभ वाद्ये) वाजत आहेत ॥ ४ ॥ ठिकठिकाणी स्त्रिया (विविध वस्तू) ओवाळून टाकीत आहेत व मनातून हर्षित होऊन आशीर्वाद देत आहेत. (राम लक्ष्मण जानकी यांना) ॥ ५ ॥ पुष्कळ युवती सोन्याच्या तबकातून नाना प्रकारच्या आरत्या सजवून मंगलगान करीत आहेत ॥ ६ ॥ रघुकुलरुपी कमलवनाला प्रफुल्लित करणार्या श्रीरामसूर्याची आर्तिहराची आरती करीत आहेत. ॥ ७ ॥ अयोध्या पुरीची शोभा, मंगल व संपत्ती यांची प्रशंसा वेद, सरस्वती व शेष करतात. ॥८॥ परंतु ते सुद्धा हे चरित्र पाहून चकित झाल्यासारखे राहीले आहेत. मग उमे ! त्यांचे गुण मनुष्य कसे वर्णन करुं शकेल ? ॥ ९ ॥ स्त्रिया चंद्रविकासी कमले होत, अयोध्यापुरी हा तलाव होय, रघुपती विरह हा सूर्य होय तो जेव्हा अस्तास गेला तेव्हा रामचंद्ररुपी पूर्णचंद्राला पाहून त्या कुमुदिनी विकसित प्रफुल्लित झाल्या ॥ दो० ९ रा ॥ नाना प्रकारचे शुभ शकुन होत आहेत, आकाशात डंके वाजत आहेत, व अयोध्यावासी नरनारींना सनाथ करणारे भगवान रामचंद्र आपल्या घरी जाण्य़ास निघाले ॥ दो० ९ म ॥ लज्जित कैकेयी, प्रभु जाणति । प्रथम तिचें गृहिं गेले पार्वति ! ॥ दो० :- सुमंत्रास मुनि कथिति तैं श्रवत मुदित जातात ॥ कैकेयी लज्जित झाली आहे हे प्रभूंनी जाणले असल्याने हे पार्वती ते प्रथम तिच्या महालात गेले ॥ १ ॥ नाना प्रकारे तिची समजूत घालून तिला पुष्कळ सुख दिले व मग हरिचरण आपल्या महालात जाण्यास वळले ॥ २ ॥ कृपासिंधु जेव्हा मंदिरात गेले तेव्हा नगरातील स्त्रिया पुरुष सर्व सुखी झाले ॥ ३ ॥ श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु |