|
॥ श्रीरामचरितमानस ॥ (मराठी अनुवाद) ॥ अयोध्याकाण्ड ॥ अध्याय १९ वा ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥ Download mp3 वसुनि सई-तटीं उदयिं निघाले । शृंगवेरपुर-समीप आले ॥ दो० :- गुह विचार हा ज्ञातिला, व्हा सावध, सांगून ॥ (तिसर्या दिवशी) सई नदीच्या तिरावर वस्ती केली व उजाडतांच निघून ( सर्व) शृंगेवर पुराजवळ आले ॥ १ ॥ हा सर्व समाचार निषादराजाला कळला तेव्हा तो विषादयुक्त होऊन विचार करुं लागला की ॥ २ ॥ भरत वनात जात आहेत याचे कारण काय असावे बरें ? मनात काहीतरी कपट असले पाहीजे ॥ ३ ॥ मनात कपटभाव नसता तर एवढे सैन्य बरोबर कशाला आणले असते ? ( तेव्हा) त्यांच्या मनात असावे की अनुजासहित रामाचा वध करावा आणि सुखाने निष्कंटक ( शत्रूरहित) असे राज्य करावे ॥ ४-५ ॥ भरताने राजनीती मनात आणली नाही ( विचार केला नाही), तेव्हा कलंक लागला तर आता जीवे मरतील ॥ ६ ॥ देवा सुरातील सर्व रणझुंझार वीर एकत्र जमले तरी कोणीही रामाला रणांगणात जिंकू शकणार नाहीत ॥ ७ ॥ ( पण) भरत असे करित आहेत यात आश्चर्य कसले ? विषवल्लीला कधी अमृत फळे लागली आहेत काय ? ॥ ८ ॥ मनात आलेले विचार गुहाने आपल्या ज्ञाती बांधवांना सांगितले व म्हणाला की सावध असा सर्व ! सुकाणांचे दांडे काढून घ्या, होड्या पाण्यात बुडवून टाका व सर्व घाट अडवून धरा ॥ १८९ ॥ व्हा सुसज्ज सब अडवा घाटां । रणमरणा सब कर किं थाटा ॥ दो० :- विगत-विषाद् निषाद पति लोकि भरुनि उत्साह ॥ सगळे सुसज्ज व्हा घाट अडवा व सर्वजण रणांगणांत मरण्याची तयारी करा ॥ १ ॥ भराताबरोबर रणांगणात लढू या. जोपर्यंत कुडीत प्राण आहे तोपर्यंत कोणालाही गंगानदी उतरु द्यायची नाही ॥ २ ॥ युद्धात मरण, त्यावर गंगातीरावर आणि त्यांतही रामकार्यात ! शरीर तर बोलून चालून क्षणभंगुर ! ॥ ३ ॥ त्यातही मी एक नीच रामसेवक आणि भरत राजा व रामबंधु ! असे मरण मोठ्या भाग्यानेच मिळते ॥ ४ ॥ स्वामीकार्यात धनघोर युद्ध करीन व माझ्या धवल यशाचे चौदा भुवने भरीनच. ॥ ५ ॥ रघुनाथाच्या हितासाठी प्राण समर्पण करीन व माझ्य़ा दोन्ही हातांत आनंदरुपी मोदक येतील ॥ ६ ॥ साधु समाजात ज्याची गणना नाही व रामभक्तात ज्याला स्थान नाही. ॥ ७ ॥ तो या जगात वृथा भूमीभार होऊनच जगतो व तो आपल्या जननीच्या यौवनरुपी वृक्षाला तोडण्यास कुर्हाडच होय. ॥ ८ ॥ विषादरहित होऊन निषाद राजाने आपल्या सर्व लोकांत उत्साह भरला व रामस्मरण करुन भाता, धनुष्य, व चिलखत इ. त्वरेने आणण्यास सांगीतले ( मागवले) ॥ दो० १९० ॥ बंधु ! शीघ्र साजां सजवावे । आज्ञा ऐकुनि कुणि न डरावें ॥ दो० :- बंधु ! काज मम आज अति घालुं नका धोक्यांत ॥ गुह म्हणतात बंधूंनो ! झटपट तयारी करुन सज्ज व्हा व माझी आज्ञा ऐकून भिऊ नका ॥ १ ॥ ठीक आहे महाराज ! असे सर्व हर्षाने म्हणाले व एकमेकांना आवेश चढवूं लागले ॥ २ ॥ विषादराजाला नमन करून ते जिकडे तिकडे ( तयारी करण्यासाठी) गेले ! सगळे शूर असून त्यांना रणभूमीत लढण्याची हौस आहे ॥ ३ ॥ रामचरणकमलांच्या पादुकांचे स्मरण करुन त्यांनी लहान भाते कसले, धनुष्यावर प्रत्यंच्या ( दोरी) चढवल्या ॥ ४ ॥ अंगावर कवचे घातली व डोक्यावर टोप घातले; व भाले, बरच्या, परशु ( बाण, तरवारी इ. शस्त्रे) घासून साफसूफ करु लागले ॥ ५ ॥ जे फरी ( छोटी ढाल ओढून) व तरवार खेळण्यात कुशल होते ते जणूं जमिन सोडुन आकाशात उडूं लागले ॥ ६ ॥ ( याप्रमाणे) आपापली टोळी व सामानसुमान सज्ज करुन ते ( क्रमाने) जाऊन गुह राजाला जोहारुं लागले ॥ ७ ॥ सर्व सुभटांना पाहता ते लायक आहेत हे गुहाने जाणले व प्रत्येकाचे नाव घेऊन सगळ्यांचा सन्मान केला ॥ ८ ॥ ( व निषादराज म्हणाला) बंधूंनो ! आज माझे फारच मोठे कार्य आहे ( तरी मला धोक्यात मात्र घालू नका) ( तेव्हा) ते सर्व आवेशाने म्हणाले की, वीर ! आपण अधीर होऊ नये. ॥ दो० १९१ ॥ राम-प्रताप तवबल काजीं । कटक अभट-घोटक करुं आजीं ॥ दो० :- धरा घाट भट ! मिळुनि सब भेटूं जाणूं मर्म ॥ रामप्रताप व तुझे बळ यांच्या जोरावर आज आम्ही युद्धांत सर्व सैन्य भट विहींत व घोड्यांवाचून करुन टाकतो ॥ १ ॥ कुडीत प्राण आहेत तोवर पाय मागे घेणार नाही व धरणी धडे व मुंडे यांनी भरुन टाकतो ( समजलांत !) ॥ २ ॥ गुहाने तो विरांचा भव्य समुदाय पाहीला व रणढोल पिटण्याची आज्ञा दिली ॥ ३ ॥ इतक्यांत डाव्या बाजूला कोणीतरी शिंकला, तेव्हा शकुन जाणणारे ( तरुण) म्हणाले की, युद्धात आपला जय झालाच ( म्हणून समजा) ॥ ४ ॥ पण शकुनाचा विचार करुन एक म्हातारा म्हणाला की युद्धच होत नाही, तुम्ही जाऊन भरतास भेटा ॥ ५ ॥ भरत रामाला विनवण्यासाठी जात आहेत व युद्धाचे कारण नाही असे हा शकुन सांगतो ॥ ६ ॥ ( तें वृद्ध वचन ऐकले) तेव्हा गुह म्हणाला की वृद्धाचे म्हणणे चांगले, योग्य आहे. अविचाराने साहस करुन मूर्ख पश्चाताप पावतो ॥ ७ ॥ भरताच्या मनातील भाव व त्यांचे शील हे न जाणतां अज्ञानाने लढणे म्हणजे अति हानी आहे. ॥ ८ ॥ सगळे वीर मिळून घाट अडवून, रोखून ठेवा, मी भेट घेऊन सर्व ओळखतो की मित्र शत्रु की उदासीन आहे हे पाहून मग जे काय करणे ते करुं ॥ दो० १९२ ॥ स्नेह सुशीलें ये आकळता । प्रीति वैर ना लपति लपवितां ॥ दो० :- जरत दंडवत बघुनि त्या भरत घेति हृदयासि ॥ चांगल्या शीलावरुन स्नेह जाणता येतो, कारण की प्रीती व वैर लपवून लपत नाहीत मग भेट नेण्याच्या वस्तू जमवू लागले कंदमूळ फलादि व पशु पक्षी मागितले आणण्यास सांगीतले ॥ १-२ ॥ पाठीन जातीचे ( लठ्ठ) व जुने पुराणे खारवलेले मासे इ. पदार्थ पाट्या भरभरुन पुष्कळ सेवक घेऊन आले ॥ ३ ॥ याप्रमाणे भेट जमवून निषादराज ( भरतास) भेटण्यासाठी निघाला व त्यांना मंगलकारक शुभ शकुन झाले ॥ ४ ॥ दुरुन दृष्टी पडतांच आपले नांव वगैरे सांगून त्याने मुनिश्रेष्ठ वसिष्ठांस दंडवत नमस्कार घातला ॥५॥ रामप्रिय आहे हे जाणून मुनींनी आशीर्वाद दिला व त्याच्या विषयी भरतांस ( रामसखा, रामसेवाप्रिय आहे इ.) समजावून सांगीतले ॥ ६ ॥ ‘ रामसखा ’ इतके ऐकतांच भरतांनी रथाचा त्याग केला व रथातून उतरुन प्रेमभराने (निषादास भेटण्यासाठी) चालू लागले ॥ ७ ॥ त्याने गांव जात व गुह हे आपले नांव सांगून जोहार केला ॥ ८ ॥ तो दंडवत घालीत आहे असे पाहून भरतानी त्यास उठवून हृदयाशी धरला; तेव्हा असे वाटले त्यांना की जणू लक्ष्मणाचीच भेट झाली; व प्रेम हृदयात मावेना. ॥ दो० १९३ ॥ भरत तया सुप्रीतिं भेटती । प्रेमरीति जन सेर्षा स्तवती ॥ दो० :- श्वपच शबर खस यवन जड पामर कोळि किरात ॥ भरत त्याला इतक्या अत्यंत प्रीतीने भेटले की त्या प्रेमाच्या रीतीची लोक ईर्षेने प्रंशंसा करु लागले ॥ १ ॥ आकाशांतूनही मंगलमूल असणारा धन्य, धन्य असा ध्वनी ऐकू येऊं लागला व देव त्याची प्रशंसा करुन पुष्पवृष्टी करु लागले ॥ २ ॥ ( देव म्हणाले) जो लोकात व वेदात सर्व प्रकारे नीच म्हणून ठरलेला व ज्याच्या छायेचा स्पर्श झाला तर स्नान ( करण्यास) सांगीतले आहे ॥ ३ ॥ त्याला रामाचंद्रांचे धाकटेबंधू कवटाळून भेटत आहेत व त्यांचे सर्व शरीर रोमांचांनी फुलून गेले आहे ! ॥ ४ ॥ ‘ राम ’ ‘ राम ’ म्हणत जे जांभई देतात त्यांच्यासमोर ( सुद्धा) पापपुंज येत नाहीत ॥ ५ ॥ ( मग) याला तर रामचंद्रांनी हृदयाशी कवळून कुळासहित जगपावन केला आहे ! ॥ ६ ॥ कर्मनाशी नदीचे जल गंगेत पडल्यावर त्याला कोण नाही मस्तकावर धारण करीत ? ॥ ७ ॥ उलटे राम नाम जपल्याने वल्मीकी ब्रह्मसमान झाले हे सर्व जगात प्रसिद्ध आहे ॥ ८ ॥ चांडाल शबर ( भिल्ल) खस, यवन, कोळी, किरात इ. जड-मूढ-नीच लोक सुद्धा रामनामाच्या उच्याराने परम पावन व लोकांत विख्यात होतात ॥ दो० १९४ ॥ हें युगिं युगिं चाले विस्मय ना । देति महति रघुवीर न कणवा ॥ दो० :- मम करणी कुल समजुनी प्रभु महिमा जाणून ॥ यात आश्चर्य काही नाही कारण की हे युगायुगाचे ठायी चालत आले आहे रघुवीरानी मोठेपणा कोणाला नाही दिला ? ॥ १ ॥ ( या प्रमाणे) रामनामाचा महिमा देवांनी वर्णन केला व तो ऐकून अयोध्येतील लोकांना सुख झाले ॥ २ ॥ भरत रामसख्याला अति प्रेमाने भेटले व त्याला क्षेम व सुमंगल समाचार विचारला ॥ ३ ॥ भरताचे शील व सुस्नेह पाहून निषादराजा विदेही झाला - देहभान विसरला ॥ ४ ॥ लज्जा, स्नेह, व आनंद यांना हृदयात पूर आला आहे व गूह टक लावून भरताकडे बघत राहीला आहे. ॥ ५ ॥ मग ( काही वेळाने) धीर करुन भरताच्या चरणांना वंदन केले व हात जोडून प्रेमाने विनंती करु लागला ॥ ६ ॥ सर्व कुशलाचे मूळ ( श्रीराम) पद कमलांचे दर्शन झाले तेव्हापासून मी समजतो की माझे त्रिकाळी कुशल आहे ॥ ७ ॥ आणि प्रभु ! आता तुझ्या परम अनुग्रहाने कोटी कुळांसहित मंगल झाले ॥ ८ ॥ माझी करणी व कुल यांचा विचार करुन आणि प्रभूचा महिमा ध्यानात घेऊन ( जाणून) जो रघुवीर चरणांना भजणार नाही, त्याला विधीने पक्का फसवला असे समजावे ॥ दो०१९५ ॥ कपटी कातर कुमति कुजाती । लोकीं वेदिं बाह्य सब रीतीं ॥ दो० :- खुणवि सेव्कां सकल गत स्वामि-हेतु जाणून ॥ मी कपटी कातर दुर्बुद्धी व नीच जातीचा असून, आणि सर्व प्रकारे लोकबहिष्कृत असून ॥ १ ॥ ज्या वेळी रामचंद्रांनी मला आपला म्हंटला तेव्हा पासून मी भुवन - भूषण बनलो ( हा रामाचा महिमा) ॥ २ ॥ प्रीती पाहून व शुभ विनंती ऐकून भरताचे (च) धाकटे बंधू शत्रुघ्न त्याला भेटले ॥ ३ ॥ निषादाने सुंदर शब्दांनी आपले नाव सांगीतले व सगळ्या राण्यांना आदराने जोहार केला ॥ ४ ॥ राण्यांनी त्याला लक्ष्मणा सारखा जाणून आशीर्वाद दिला की शंभर लक्ष वर्षे सुखात रहा - जगा ॥ ५ ॥ अयोध्येतील स्त्रीपुरुषांनी गुहाला न्यहाळून पाहिला व त्यांना जणू काय लक्ष्मणास पाहील्यासारखे सुख झाले. ॥ ६ ॥ व ते सर्व लोक म्हणू लागले की याला जीवनाचा ( खरा) लाभ मिळाला; ( कारण) रामचंद्र याला आपल्या बाहूंनी - बाहूत धरुन भेटले ॥ ७ ॥ आपल्या भाग्याची प्रशंसा निषादराजाने ऐकून घेतली व अति प्रसन्न मनाने ( भरताला सैन्यासह) घेऊन ( आपल्या पुराकडे) निघाला ॥ ८ ॥ त्याने आपल्या सेवकांना खुणेने सुचना दिली व ते सगळे आपल्या स्वामीचा हेतू जाणून गेले. त्यांनी जाऊन घरात, झाडांच्या खाली तलावांच्या काठी, बागांत व वनांत वसति स्थाने तयार केली ॥ दो०१९६ ॥ शृंगवेर पुर भरता दिसतां । ये सर्वांगीं स्नेह-शिथिलता ॥ दो० :- असें स्नान करुनी भरत गुर्वाज्ञा घेतात ॥ शृंगवेरपुर दृष्टीस पडताच भरताचे सर्व अवयव ( अंगे) स्नेहाने शिथिल झाले ॥ १ ॥ भरत निषादाच्या आधाराने ( त्याच्या खांद्यावर हात ठेऊन) जात असता ते दोघे असे शोभत आहेत की जणू प्रेम व विनय च देहधारी बनून जात आहेत. ॥ २ ॥ याप्रमाणे भरत सर्व सेनेसह गेले व जगाला पावन करणार्या गंगेचे त्यांस दर्शन झाले ॥ ३ ॥ भरतानी रामघाटाला प्रणमन केले व राम स्नेहात इतके मग्न झाले की जणूं रामभेटच झाली ॥ ४ ॥ नगरातील स्त्रिया व पुरुष गंगेला प्रणाम करुं लागले व ब्रह्ममय पाणी पाहून सुखी होऊ लागले ॥ ५ ॥ स्नान करुन गंगेला हात जोडून मागतात की आमचे रामचंद्राच्या पायी पुष्कळ प्रेम असूं दे ॥ ६ ॥ भरत म्हणाले की सुर सरिते, तुझा जलरुण, सर्वांना सुखदायक व सेवकांची तर कामधेनूच आहे ॥ ७ ॥ मी हात जोडून इतकाच वर मागतो की ज्याला सहज स्नेह म्हणतात तो सीतारामांच्या चरणी मला द्या ॥ ८ ॥ या प्रमाणे स्नान केल्यावर भरतांनी गुरुजींची आज्ञा घेतली व सर्व मातांची स्नाने झाले आहेत असे पाहून सर्व तंबू वगैरे सह गेले ॥ दो० १९७ ॥ जिथें तिथें जन तंबू देती । भरत शोध सर्वांचा घेती ॥ दो० :- रघुवर शिचि शिंशपातळिं जिथें करिति विश्राम । लोकांनी जिथे जिथे तंबू ठोकले तिथे तिथे जाऊन भरताने सर्वांची चौकशी केली ॥ १ ॥ गुरुसेवा करुन त्यांची आज्ञा घेतली व दोघे बंधू राममातेकडे आले ॥ २ ॥ ( दोघानी) पाय चेपले व भरताने गोड शब्दांनी सर्व जननींचा सन्मान केला ॥ ३ ॥ जननीची सेवा भावाकडे ( शत्रुघ्नाकडे) सोपवून भरताने निषादराजाला बोलावून घेतला ॥ ४ ॥ मित्राच्या हातात हात घालून चालले आहेत व अति स्नेहाने शरिर शिथिल पडले आहे ॥ ५ ॥ मित्रा ! मला ते स्थान दाखवा व डोळ्यांची व मनाची जळजळ जरा निववा ॥ ६ ॥ सीताराम व लक्ष्मण जेथे झोपले होते असे बोलता बोलतांच डोळ्यांच्या कोपर्यात पाणी भरले ॥ ७ ॥ भरताचे भाषण ऐकून निषादाला विषाद वाटला व तो त्वरेने तेथे घेऊन गेला ॥ ८ ॥ जिथे पावन शिंशपा ( शिसवी) वृक्षाखाली रघुवरांनी विश्राम केला होता ( झोपले होते) ते दुरुन पाहताच भरताने अति स्नेहाने व आदराने दंडवत नमस्कार केला ॥ दो० १९८ ॥ सुंदर कुश-शयनास पाहिलें । प्रदक्षिणा घालुनि मग नमिलें ॥ दो० :- पतिव्रता-स्त्री शिरोमणि सीता-शेज-बघून ॥ जवळ जाऊन ती सुंदर कुश - शय्या पाहीली व तिला प्रदक्षिणा घालून साष्टांग नमस्कार केला ॥ १ ॥ तेथील रामचंद्रांच्या चरणचिन्हांची धूळ डोळ्यास लावताना प्रीती इतकी वाढली की तिचे वर्णन करवत नाही ॥ २ ॥ सोन्याचे दोनचार कण दिसले, ते घेऊन मस्तकावर ठेवले व त्यांना सीतेसारखे मानले ॥ ३ ॥ डोळे पाण्याने भरले व हृदयास ग्लानी आली आहे ( अशा दशेत) सुंदर वाणीने मित्रास म्हणाले ॥ ४ ॥ जसे अयोध्येतील पुरुष स्त्रिया दीन मलीन दिसत आहेत तसेच हे कांचन कण सीतेच्या विरहाने शोभाहीन व तेजोहीन झाले आहेत ॥ ५ ॥ जिचे वडील जनकराज असे आहेत की त्यांच्या तुलनेस कोणी नाही व जगांतील सर्व भोग व योग त्यांच्या मुठीत आहेत ॥ ६ ॥ ज्यांचा हेवा अमरावती पती - इंद्र करतात असे भानुकुल भानू भूपती जिचे श्वशुर - सासरे ॥ ७ ॥ व तिचे प्राणनाथ प्रभु रघुनंदन असे आहेत की मोठ्यांना जो मोठेपणा मिळतो तो त्यांच्याच - रामाच्याच महतीने ॥ ८ ॥ त्या पतिव्रता स्त्री शिरोमणी सीतेची ( ही) तृणपर्णशय्या पाहून हर ! हर ! हे माझे हृदय कंप सुटून फुटले नाही ! फुटत नाही, त्याअर्थी ते वज्रापेक्षा फार कठीण असलेच पाहीजे ॥ दो० १९९ ॥ लालन-योग्य चारु लघु लक्ष्मण । असा त्रिकाळिं न बंधु सुलक्षण ॥ दो० :- सुखस्वरूप रघुवंशशिरोमणि मंगल-मोद-निधान ॥ लक्ष्मणासारखा सुंदर लाड करण्य़ासारखा लहान व सुलक्षण भाऊ भूत भविष्य व वर्तमान या तिन्ही काळांत नाही ॥ १ ॥ पुरजनांना प्रिय, आईबापांचा लाडका आणि सीता व रघुवीर यांना तर प्राणासारखा प्रिय ॥ २ ॥ शरीर ( मूर्ती) नाजूक व स्वभाव सुद्धा कोवळा ! ज्याच्या देहाला गरम हवा कधीच माहीत नाही ॥ ३ ॥ त्याला ( आज) वनांत सगळ्यांच विपत्ति सोसाव्या लागत आहेत, ( पण) माझ्या हृदयाला कोटी कुलिशे सुद्धा लाजत असतील. ( कारण एवढे सर्व ऐकून सुद्धा अद्याप याचे तुकडे झाले नाहीत) ॥ ४ ॥ रामचंद्रांनी जन्माला येऊन जग प्रकाशमय केले; ते रुपशील सुख व सर्व सद्गुण यांचे सागर आहेत ॥ ५ ॥ अयोध्यावासी प्रजा, परिवार, कुलगुरु, पिता व माता या सर्वांना सुख देणारा रामाचा स्वभाव आहे ॥ ६ ॥ रघुकुळाचे वैरीसुद्धा रामाची महती गातात की राम बोलणे, भेटणे व नम्रता यांनी मन हरण करतात ॥ ७ ॥ कोटि शारदा व अगणित शेष यांनासुद्धा प्रभुच्या गुणसमुदायाच्या लेशाचे सुद्धा वर्णन करतां येत नाही ( तेथे मी काय किती सांगणार !) ॥ ८ ॥ सुखस्वरुप, रघुवंशशिरोमणी कल्याण व आनंद यांचे निधान असून ते कुश पर्ण शय्येवर झोपतात ! तेव्हा दैवगति अति बलवान आहे ( असेच म्हणने भाग आहे) ॥ दो० २०० ॥ रामकानिं कधिं दुःख न पडलें । जीवनतरु-सम राजा जपले ॥ छं० :- कीं वाम विधिची कठिण करणी जननिला करिं बावळी ॥ रामचंद्रांनी दु:ख कधी कानांनी ऐकले सुद्धा नव्हते, जिवनतरुला जपावे तसे महाराजा त्यांना जपत असत. ॥ १ ॥ डोळ्याच्या पापण्या बुबुळांना व सर्प जसे मण्याला जपतात तशा सर्व माता ज्यांना दिवसरात्र जपत होत्या ते आता वनात पायांनी हिंडत आहेत; आणि कंदमूल फळे फुले यांचा आहार करीत आहेत ॥ २-३ ॥ अमंगल मूळ असलेल्या कैकेयीचा धिक्कार असो, कारण प्राणांना सर्वांपेक्षा प्रिय असलेल्या रामास ती प्रतिकूल झाली ॥ ४ ॥ ज्याच्यासाठी ज्याच्यामूळे हे सर्व उत्पात घडले त्या पापसिंधु अभाग्याचा माझा धिक्कार, धिक्कार असो ॥ ५ ॥ विधात्याने मला कुलकलंक जन्मास घातला व कुमातेने मला स्वामीद्रोही केला ॥ ६ ॥ तेव्हा ( ते भरताचे भाषण ऐकल्यावर) निषादराज प्रेमाने समजूत घालू लागला ( व म्हणाला की) नाथ ! विनाकारण विषाद कां बरं करतां ! ॥ ७ ॥ तुम्ही रामचंद्रांस प्रिय आहांत व राम तुम्हांला प्रिय आहेत ( आणि) सगळ्यांचे सार निष्कर्ष एवढाच की वाम विधी दोषी आहे ॥ ८ ॥ ( कारण) वामविधीची करणी अशी कठीण आहे की त्याने जननीला बावळी केली ( कारण) त्या रात्री प्रभु रामचंद्र आदराने तुमची वारंवार प्रशंसा करीत होते तुलसीदास म्हणतात की, तो म्हणाला आपल्या सारखा अत्यंत प्रिय रामचंद्रांस कोणी नाही हे मी शपथपूर्वक सांगतो. शेवटी मंगल होईल हे जाणून नाथ ! तुम्ही आपल्या मनात धीर धरावा ॥ छंद ॥ राम अंतर्यामी असून प्रेम संकोच व करुणा यांचे माहेरघर आहेत या विचाराने मन दृढ करुन चला पाहू व घ्या विश्रांती ॥ दो० २०१ ॥ श्रवुनि सखा वच धरुनी धीरा । निघती स्मरत वासिं रघुवीरा ॥ दो० :- नित्यकर्म कृत मातृपदिं नमुनि गुरुसि वंदून ॥ मित्राचे वचन ऐकून भरतांनी धीर धरला व रघुवीराचे स्मरण करीत तळावर चालले ॥ १ ॥ ही हकीकत कळताच अयोध्यावासी स्त्री पुरुष मंडळी आतुरतेने बघण्यासाठी चालाली ॥ २ ॥ लोक प्रदक्षिणा घालून नमस्कार करु लागले व कैकेयीला मनमुराद दोष देऊ लागले ॥ ३ ॥ त्यांचे डोळे अश्रुंनी भरुन येऊ लागले व ते वाम विधात्याला दोष देऊ लागले ॥ ४ ॥ कोणी भरताचा स्नेह वाखाणू लागले तर कोणी म्हणू लागले की महाराजांनी आपल्या स्नेहाचा निर्वाह केला ॥ ५ ॥ सर्वच लोक आपली निंदा व निषादाची प्रशंसा करु लागले; ( त्या वेळच्या) त्या वियोगाचे व विषादाचे वर्णन कोण करुं शकेल ? ॥ ६ ॥ या प्रमाणे लोक रात्रभर जागले व उजाडल्या बरोबर नावा चालू झाल्या ॥ ७ ॥ भरतानी सुंदर मोठ्या नौकेत गुरुजींना चढविले व नव्या नौकांत सर्व मातांना चढविल्या ॥ ८ ॥ चार घटकांत सर्व पलीकडील तीराला गेले व भरताने ( नावेतून) उतरुन सर्वांचा शोध घेतला ॥ ९ ॥ नंतर ( सकाळचे) नित्यकर्म उरकुन मातांना वंदन केले व गुरुजींना वंदन करुन निषादांच्या टोळ्या पुढे ठेऊन सैन्य धाडून दिले ॥ दो० २०२ ॥ करिति निषाद्नाथ पथदर्शन । मातृ-पालख्या दिधल्या धाडुन ॥ दो० :- इसरे प्रहरीं भरत मग प्रयागांत शिरतात ॥ निषादनाथाला पुढे वाटाड्या ठेऊन मातांच्या पालख्या पाठवून दिल्या ॥ १ ॥ शत्रुघ्नाला बरोबर पाठवला तेव्हा विप्रांसह गुरुवर वसिष्ठांनी गमन केले ॥ २ ॥ मग स्वत: भरताने देवनदीला नमस्कार केला व लक्ष्मण स्मरण आणि सीता राम चरणांचे स्मरण केले ॥ ३ ॥ भरत पायी चालतच निघाले आणि त्यांच्याबरोबर कोतवाल ( शोभेचे घोडे) चालविले गेले ॥ ४ ॥ सुसेवकांनी वारंवार विनवले की नाथ ! आपण घोड्यावर स्वार व्हावं की ॥ ५ ॥ ( भरत म्हणाले) राम तर पायी पायीच चालत गेले आणि रथ, हत्ती, घोडे आमच्या साठीच निर्माण केले आहेत ॥ ६ ॥ मला तर मस्तकाने चालत जाणेच उचित होते ( ज्या मार्गाने राम गेले त्या धुळीला पाय लावणे योग्य नाही, तिला मस्तकाने नमन करणेच योग्य आहे) असा सेवकधर्म सर्व धर्मात कठोर आहे ! ॥ ७ ॥ हे मृदुवचन ऐकून व भरताची ती प्रेमविव्हळ दशा पाहून ते सगळे सेवक अतिशय ग्लानी करु लागले ॥ ८ ॥ मग तिसरे प्रहरी भरत प्रयागात शिरले व भारी प्रेमाचे भरते येऊन राम ! राम ! सीताराम ! इ. प्रकारे उच्चार करीत आहेत ॥ दो० २०३ ॥ फोड झळकती पायीं कैसे । पंकज-कोषीं दवकण जैसे ॥ दो० :- अर्थ न धर्म न काम रुचि नको गतिहि निर्वाण ॥ कमळाच्या कोषांत दवांचे बिंदू जसे झळकावे तसे भरताच्या पायांवर फोड झळकत आहेत ॥ १ ॥ आज भरत पायी पायीच आले की हे ऐकताच सर्व समाजात विषाद पसरला ॥ २ ॥ ( भरतानी येऊन) शोध घेतला तेव्हा कळले की सर्वाची स्नाने उरकली आहेत तेव्हा भरत त्रिविणीस आले व नमस्कार केला ॥ ३ ॥ मग श्वेतशाम जलांत यथाविधी स्नान केले, व विप्रांना सन्मान पूर्वक दाने दिली ॥ ४ ॥ श्यामल व धवल तरंगांना पाहताच भरताने हात जोडले व अंगावर रोमांचही आले ॥ ५ ॥ ( व विनवितात की) हे सुतीर्थराजा ! तुम्ही ! सर्व कामना पुरविणारे आहात, असा तुमचा प्रभाव वेदांमध्ये व लोकांमध्येही प्रसिद्ध आहे ॥ ६ ॥ मी स्वधर्माचा त्याग करुन भीक मागत आहे; पण आर्त कोणते कुकर्म करीत नाही ! ( आर्त झालेल्या माणसाला वाटेल ते कुकर्म करावेसे वाटते) ॥ ७ ॥ हे जाणून जे सुजाण उत्तम दाते असतात ते या जगात याचकाची याचना सफल करतात ॥ ८ ॥ मला अर्थाची ना धर्माची ना कामाची आवड ! इतर कोणतीही गती किंवा निर्वाण = मोक्ष सुद्धा नको आहे, जन्मोजन्मीं रामपदरति हे वरदान द्या दुसरे काही नको ॥ दो० २०४ ॥ मला कुटिल जरि राम समजले । स्वामि-गुरुद्रोही जग वदलें ॥ दो० :- श्रवुनि हर्ष हृदिं पुलक तनुं वेणिवचन अनुकूल ॥ राम स्वत: जरी मला कुटील समजले व सर्व जगाने जरी स्वामीद्रोही, गुरुद्रोही म्हटले ॥ १ ॥ तरी तुझ्या कृपेने दिवसे दिवस माझी सीताराम चरणारति अनुपम वाढो ॥ २ ॥ ( मेघाला) जलदाला जन्मांत चातकाची आठवण न होवो व जल मागत असता वज्र व पाषाण ( विजा व गारा) यांचा वर्षाव करो ॥ ३ ॥ पण चातकाचा घोष जर घटला तर त्याची अकीर्ती होईल ( चातक या नांवाला कलंक लागेल) प्रेम वाढण्यांतच ( त्याचा) सर्व भलेपणा आहे तापविल्याने जसे सोन्याचे तेज वाढते तशीच प्रियतम चरणांच्या प्रेमाच्या निर्वाहाने ( सेवकाची पात्रता वाढते) ॥ ५ ॥ भरताचे भाषण ऐकून त्रिवेणीच्या मध्यभागी सुमंगलदायक मृदुवाणी झाली ॥ ६ ॥ तात ! भरत ! तुम्ही सर्व प्रकारे साधू आहांत श्रीरामचरणांच्या ठायी तुमचे अगाध प्रेम आहे ॥ ७ ॥ तुम्ही आपल्या मनात ही ग्लानी निष्कारण व्यर्थ करीत आहांत ( कारण) रामचंद्रांस तुमच्यासारखे प्रिय कोणी सुद्धा नाही ॥ ८ ॥ त्रिवेणीचे अनुकूल वचन ऐकून भरताच्या हृदयात हर्ष झाला व तनु पुलकीत झाली व देवांनी धन्य भरत, धन्य भरत असे म्हणत हर्षाने पुष्पवृष्टी केली ॥ दो० २०५ ॥ श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु |