|
॥ श्रीरामचरितमानस ॥ (मराठी अनुवाद) ॥ अयोध्याकाण्ड ॥ अध्याय २७ वा ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥ Download mp3 श्रवुनि भूप भरत व्यवहार । कनकिं सुगंध सुधें शशिसार ॥ दो० :- निरवधि गुण निरुपमपुरुष भरत भरतसम नान ॥ जनक सुनयना संवाद - सोन्यात सुगंध आणि सुधेता चंद्राचे सार यांच्यासारखा भराताचा व्यवहार भूपतींनी ऐकून घेऊन ॥ १ ॥ अश्रू आलेले आपले डोळे मिटले ( त्यांच्या) सर्वागांवर रोमांच उभे राहीले व आनंदित मनाने ते भरताचे सुयश वर्णू लागले ॥ २ ॥ सुमुखी ! सुलोचनी ! अगदी सावधपणे ऐक, भरतकथा भवबंदातून मुक्त करणारी आहे ॥ ३ ॥ धर्म, राजनीती व ब्रह्मविचार यांत मी यथामति प्रवेश करु शकतो ॥ ४ ॥ पण ती माझी मति भरत महिमा कसा वर्णू शकेल ? ( कारण) ती छलानेही त्या महिम्याच्या छायेला स्पर्श सुद्धा करु शकत नाही ॥ ५ ॥ विधी ( ब्रह्मा), गणपति, शिव, शेष, शारदा, कवि, कोविद, विद्वान व जे कोणी बुद्धिविशारद असतील त्या सर्वांना ॥ ६ ॥ भरताचेचरित्र कीर्ती, करणी, धर्म, शील, विमलगुण व विमल ऐश्वर्य ॥ ७ ॥ समजण्यात व ऐकण्यात अंतरांत सुख होते भरत चरित्रादि पवित्रपणात गंगेचा व स्वादात अमृताचा सुद्धा निरादर करणारे आहे ॥ ८ ॥ भरताच्या गुणांना सीमा नाही व ते उपमारहित पुरुष आहेत, भरत भरतासारखे आहेत त्याच्यासारखा दुसरा कोणी नाही सुमेरु पर्वत शेरासारखा गणाल काय ? ( म्हणूनच) सर्व कविवर्ग लज्जायमान होतो ॥ दो० २८८ ॥ वर्णुं न शकति कोणि वरवर्णी । जशि जलहीन मीनगति धरणीं ॥ दो० :- चुकुनिहि भरत न टाळिती मनेंहि रामाज्ञेस ॥ जे वरवर्णी जसे जलहीन धरणीवर माशाचे गमन करणे, चालणे शक्य नाही त्याप्रमाणे ( भरत महीमा) कोणीच वर्णन करू शकत नाहीत ॥ १ ॥ ( कारण) राणी ! हे पहा की भरताचा महिमा अमित आहे ( अपार, अगाध, आहे), राम जाणतात पण त्यांनासुद्धा वाणीने सांगता येत नाही ॥ २ ॥ ( याप्रमाणे) प्रेमाने भरताचा अनुभव वर्णन करुन स्त्रीच्या मनातील रुची जाणून भूपती म्हणाले की ॥ ३ ॥ लक्ष्मण परततील व भरत वनात जातील ( तर) ते सर्वांना हितकर होईल व सर्वांच्या मनाला आवडते ( हे खरे पण) ॥ ४ ॥ परंतु देवी ! रघुवर व भरत यांच्यातील प्रीती व प्रतीती तर्कवत नाहीत ॥ ५ ॥ भरत स्नेह व ममता यांची जरि अवधि असले तरी राम समतेची सीमा आहेत ॥ ६ ॥ सगळे स्वार्थ सगळे परमार्थ, व सगळी सुखे यापैकी कशालाही भरत स्वप्नातसुद्धा मनात आणीत नाहीत ॥ ७ ॥ रामपदी स्नेह हेच साधन व सिद्धी हे भरताच्या मताचे लक्षण मला दिसते वाटते ॥ ८ ॥ भरत चुकून कल्पनेने ( मनाने सुद्धा) रामाज्ञा मोडणार नाहीत. म्हणून स्नेहाला वश होऊन शोक चिंता करु नये; असे व्याकुळ होऊन नरेश म्हणाले ॥ दो० २८९ ॥ राम भरत गुण गणतां प्रीतीं उभयां निमिषासम रजनी ती ॥ दो० :- प्राणां प्राणहि जिवा जिव सुखास सुख तुम्हिं राम ॥ राम व भरत यांच्या गुणांचे चिंतन व वर्णन करीत असताच त्या दोघांना ती रात्र निमिषासारखी गेली वाटली ॥ १ ॥ सकाळी दोन्ही राजसमाज जागे झाले व स्नान करुन देवपूजा करु लागले ॥ २ ॥ रघुपतींनी स्नान केले व ते गुरुकडे गेले; आणि पायांना वंदन करुन त्यांचा कल पाहून म्हणाले की ॥ ३ ॥ नाथ ! भरत सर्व माता व पुरवासी लोक शोकाकुल असून ( आणखी) वनवासांत दु:खी होत आहेत ॥ ४ ॥ तसेच राजा मिथिलापती आपल्या सर्व समाजासह आज पुष्कळ दिवस क्लेश सोशीत आहेत ॥ ५ ॥ योग्य वाटेल ते आपण करावे, आता सर्वांचे हित आपल्या हातात आहे ॥ ६ ॥ असे म्हणून रघुराज ( अति) संकोचित झाले; तो स्वभाव व ते शील पाहून मुनी रोमांचित झाले ॥ ७ ॥ ( व म्हणाले की) राम ! तुम्ही प्राणांचे प्राण, जीवाचे जीव व सुखाचे सुख आहात तुम्हाला सोडून ज्याना घर गोड वाटत असेल त्यांचे दैवच उलटे फिरले ॥ दो० २९० ॥ जळो कर्म सुख धर्महि साधन । ज्थें राम पद पंकज भाव न ॥ दो० :- ज्ञान निधान सुजाण शुचि धर्म धीर नरपाल ॥ जिथे रामपदकमलांच्या ठिकाणी भक्ती नाही, ते कर्म, तो धर्म, ते सुख आणि सर्व साधने यांना आग लागो. ( ती सर्व निरर्थक होत) ॥ १ ॥ जिथे रामप्रेमाला प्राधान्य नाही तो योग कुयोगच, आणि ते ज्ञान अज्ञानच ( समजावे) ॥ २ ॥ ( हे दोन्ही समाज) तुमच्या वाचून दु:खी व तुमच्यामुळे सुखी ( होणारे) आहेत, व ज्यांच्या मनात जे आहे ते सर्व तुम्ही यथार्थ जाणताच ॥ ३ ॥ आपली आज्ञा सर्वांच्या मस्तकावर आहे व हे कृपाला आपण समस्त ( सर्वांगपूर्ण) स्थिती जाणतांच ॥ ४ ॥ तरी आता आपण आपल्या आश्रमात जावे असे म्हणून मुनीराज स्नेहाने शिथिल झाले ( बोलवेना) ॥ ५ ॥ राम प्रणाम करुन आश्रमात परतले ॥ ६ ॥ परिसुनि वचन जनक अनुरागति । ज्ञान विराग विरागि, बघत गति ॥ दो० :- राम सत्यव्रत धर्मरत स्नेहि सुशील कृपाल ॥ ( वसिष्ठांचे) भाषण ऐकून जनक अनुराग मग्न झाले; ती त्यांची दशा बघताच ज्ञान व विराग विरागी बनले ॥ १ ॥ स्नेहाने शिथिल होऊन चित्तांतच विचार करुं लागले की आपण इथे आलो हे चांगले केले नाही ( चूक झाली आपली) ॥ २ ॥ दशरथ राजांनी रामचंद्रांस वनात धाडले ( खरे, पण) आपल्या प्रियाच्या प्रेमाचे पालन करुन दाखवले ॥ ३ ॥ आम्ही ( मात्र आता) त्यांस वनातून वनास पाठवूं व ज्ञानाच्या महत्तेने ( ज्ञानाचा टेंभा मिरवित) मोठ्या आनंदाने परत जाऊ ॥ ४ ॥ ब्राह्मण, तापस, मुनी यांनी वसिष्ठांचे वचन ऐकले व ही जनकांची दशा पाहीली मात्र तो ते सर्व प्रेमाने विशेष व्याकुळ झाले ॥ ५ ॥ समय ओळखून राजांनी धीर धरला व समुदायासहित भरताकडे गेले ॥ ६ ॥ जनक भरत संवाद - भरत पुढे येऊन त्यांस घेऊन गेले व समयानुसार चांगली आसने ( बसावयास) दिली ॥ ७ ॥ तेव्हा निमिराजा म्हणाले की तात ! भरत ! तुम्हाला रघुवीराचा स्वभाव माहीत आहे की ॥ ८ ॥ राम सत्यvrव्रत, धर्मनिष्ठ, स्नेही सुशील व कृपाल आहेत; त्यामुळे सर्वांच्या संकोचाने संकट सोशीत आहेत, तरी तुम्ही जे म्हणाल ते आम्ही त्यांस करण्यास सांगू . ॥ दो० २९२ ॥ परिसुनि लोचन सजल, पुलकुनी । वदले भरत धीर अति धरुनी ॥ दो० :- प्रभुरुचि धर्मव्रत जतन, परवश मज जाणून ॥ जनकांचे भाषण ऐकून डोळे पाण्याने भरलेले व शरीर रोमांचित झालेले भरत अति धीर धरुन म्हणाले की ॥ १ ॥ प्रभो, आपण पित्यासारखे पूज्य व प्रिय आहांत, कुलगुरुसारखे हितकर्ते ( सुहृद) आईबाप सुद्धा नाहीत ॥ २ ॥ कौशिकादि अनेक मुनी व सचिव यांच्या समाजात ज्ञानाचे सागर असे आपण आज आहांत ॥ ३ ॥ स्वामी ! मी आपला शिशु व आज्ञा पालन करणारा सेवक आहे हे जाणून आपण मला उपदेश करावा ॥ ४ ॥ या ( चित्रकूटासारख्या) स्थळी व या समाजात आपण विचारता ( खरे) पण मी मलिन ( आर्त) असल्याने मौन राहणेच योग्य आहे व बोलणे म्हणजे मूर्खपणा आहे ॥ ५ ॥ मी लहान तोंडी मोठा घास घेत आहे म्हणून माझे दैव फिरले आहे हे जाणून आपण मला क्षमा करावी ॥ ६ ॥ वेद, शात्र, पुराणे म्हणतात की सेवाधर्म कठीण आहे जग सुद्धा हे जाणते ॥ ७ ॥ स्वामी धर्म आणि स्वार्थ यात विरोध उत्पन्न झाला आहे, वैर आंधळे असते व प्रेमात ज्ञान विवेक रहात नाही ॥ ८ ॥ म्हणून मी परवश आहे हे जाणून स्वामी रामचंद्रांची इच्छा, त्यांचा धर्म व त्यांचे सत्यव्रत यांचे संरक्षण ( जतन) होईल असे सर्वाना मान्य व सर्वांचे हितकारक वाटेल ते सर्वांचे प्रेम पाहून करावे ॥ दो० २९३ ॥ श्रवुनि वचन पाहुनी स्वभाव । सह समाज वाखाणिति राव ॥ दो०:- स्नेह भीड वश राम ही म्हणति खिन्न सुरराज ॥ भरताचे भाषण ऐकून आणि स्वभाव पाहून सर्व समाजासहित राजा जनक त्या भाषणाची प्रशंसा करु लागले ॥ १ ॥ सुगम असून अगम्य, सुंदर मृदु असून कठोर, अर्थ अमित पण अक्षरे अगदी थोडी ॥ २ ॥ जरी आरसा आपल्या हातात असला व त्या आरश्यात आपले मुख असले तरी ते ( हातात) घेववत नाही तशी भरत – वाणी अदभुत आहे ॥ ३ ॥ राजा जनक, भरत, वसिष्ठादि मुनी, व सर्व समाज यांच्यासह तिथे गेले जेथे देवरुपी कुमुंदांचे उडुराज = चंद्र रामचंद्र आहेत ॥ ४ ॥ नवे पाणी आले म्हणजे मीनांचे थवे जसे व्याकुळ होतात तसेच जणू हे ( ही बातमी) कळताच सर्व लोक शोकाने व्याकुळ झाले ॥ ५ ॥ स्वार्थी सुर हरले घाबरले – देवांनी प्रथम कुलगुरु वसिष्ठांची दशा पाहीली, नंतर विदेहांच्या ठिकाणचा अति स्नेह पाहीला ॥ ६ ॥ नंतर तर भरत भक्तीमयच दिसले, तेव्हा स्वार्थी देव ( मनात) हसले व घाबरले ॥ ७ ॥ पुढे पाहतात तो सगळेच लोक रामप्रेममय दिसले, तेव्हा तर लेख ( देव) अपार अपरमित चिंतातुर झाले ॥ ८ ॥ तेव्हा देवराज खिन्न होऊन म्हणाले की राम स्नेहाला व भीडेला वश होणारे आहेत म्हणून पंचांच्या मताने प्रपंच म्हणजे माया-कपट काहीतरी रचा नाहीतर अकार्य झालेच म्हणून समजा ॥ दो० २९४ ॥ स्मरुनि प्रार्थिति देव शारदे । देवि ! पाहि ! सुर शरण थार दे ॥ दो० :- स्वार्थी विबुध मलीन मन करिति कुमंत्र कुथाट ॥ देवांनी शारदेचे स्मरण करुन प्रार्थना केली की देवी ! आम्ही सर्व देव तुला शरण आलो आहोत, आमचे रक्षण कर व आश्रय दे. ॥ १ ॥ माया रचून भरताची बुद्धी फिरव व कपटरुपी छाया कर आणि विबुध कुळांचे पालन कर ॥ २ ॥ देवांची विनंती ऐकून व विबुध स्वार्थाने जड झाले आहेत हे जाणून सूज्ञ देवी म्हणाली की ॥ ३ ॥ भरताची मति फिरव असे मला म्हणता होय ? हजार नेत्र असून तुम्हाला मेरु पर्वत दिसत नाही ? ॥ ४ ॥ ब्रह्मदेव विष्णू व महादेव यांची अति प्रबल माया सुद्धा भरताच्या मतीकडे पाहण्यास असमर्थ असल्याने बघू शकत नाही ॥ ५ ॥ ती भरताची मति फिरव असे मला म्हणता होय ? चांदण्याने कधी चंद्राची चोरी केली आहे काय ? ॥ ६ ॥ भरताच्या हृदयात राम व सीता यांचा निवास आहे ! जिथे सूर्य प्रकाशत असतो तेथे कधी काळोख असतो काय ? ॥ ७ ॥ असे म्हणून शारदा ब्रह्मलोकास निघून गेली व रात्री चक्रवाकांना जशी व्याकुळता येते तसे देव व्याकूळ झाले ॥ ८ ॥ ( तरीपण) स्वार्थी, मलिन मनाच्या देवांनी दुर्विचाराने दुष्ट प्रयत्न केलाच. आपल्या प्रबल कपट मायेने प्रबल भ्रम, भय, दु:ख, व उच्चाटन यांची निर्मिती केली. ॥ दो० २९५ ॥ करुनि कपट सुरपति चिंता करि । कार्यहानि वा सिद्धी भरत करिं ॥ दो० :- श्रवुनि शपथ ही मुनि जनक लज्जित सभे समेत ॥ असे कपट करुन सुरराजा इंद्र चिंता करु लागला की कार्यसिद्धी किंवा कार्यहानी ( आता) भरतांच्या हाती आहे ! ( काय करावे !) ॥ १ ॥ सभा संकुचित दिसतां सारी । रामबंधु धरि धीरा भारी ॥ दो० :- बघुनि विवेक विलोचनीं स्नेहें शिथिल समाज ॥ सर्व सभा खजिल झालेली दिसतांच रामबंधु भारी धीर धरता झाला ॥ १ ॥ अगस्ती ऋषींनी विंध्य पर्वताची वाढ जशी आवरली त्याप्रमाणे अडचणीची वेळ आहे हे जाणून भरतानी आपला स्नेह सावरला ॥ २ ॥ सर्व लोकांचा शोकरुपी हिरण्याक्ष ( जनकादि सर्वांच्या) बुद्धिरुपी पृथ्वीला चोरुन नेता झाला तेव्हा निर्मल गुणसमूहांनी युक्त भरतरुपी ब्रह्मदेवाच्या पासून ( भरताचा) विवेकरुपी विशाल वराहावतार झाला व त्याने तत्काळ, काही सायास न पडता त्या बुद्धिरुपी पृथ्वीचा उद्धार केला ॥ ३-४ ॥ प्रभु ! पितरौ गुरु सुहृद स्वामी । पूज्य परम हित अंतर्यामी ॥ दो० :- नाथ कृपें नि भलाइनें केलें मम हित फार ॥ प्रभु ! आपण माझे आई, बाप सुहृद व स्वामी आहांत, परम पुज्य, परम हितकर्ते व अंतार्यामी आहांत ॥ १ ॥ सरल, उत्तम धनी असून शिलनिधी आहांत सर्वज्ञ सुजाण असून प्रणतपालक आहांत ॥ २ ॥ फार समर्थ असून शरणागताचे हित करणारे आहांत व गुणग्राहक असून सर्व दोष निवारक व सर्व पापसंहारक आहांत ॥ ३ ॥ महाराज ! आपल्या सारखे उत्तम स्वामी जगात आपणच व माझ्यासारखा स्वामी द्रोही मीच ॥ ४ ॥ प्रभूचे व पित्याचे वचन मोहाने उल्हंघन करुन मी सर्व समाजाला ( सैन्य इ.) समजून येथे आलो ॥ ५ ॥ जगात सुष्ट, दुष्ट, उच्य, नीच, अमृत, अमरपद, विष – मृत्यु इ. कोणी मनाने सुद्धा रामाज्ञा मोडील असे ( कोणाच्या) पाहण्यांत किंवा ऐकण्यात कधी कुठेही नाही ॥ ६-७ ॥ पण देवा, ती धृष्टता मी केली परंतु स्वामींनी स्नेहामुळे तिला उत्तम सेवा म्हणून मानली ॥ ८ ॥ नाथ ! आपल्या कृपेने व चांगुलपणाने माझे फारच हित केले, सर्व दुषणे भूषणासारखी झाली व सुंदर निर्मल यश चारी दिशांस पसरले ॥ दो० २९८ ॥ अपली रीति सुबाणा महती । जगत-विदित निगमागम वदती ॥ दो० :- जनां सुधारुनि गौरवुनि केले साधु किरीट ॥ आपली वागण्याची सुंदर रीत, सुंदर बाणा व महती जगप्रसिद्ध असून वेदपुराणादि वर्णन करतात ॥ १ ॥ क्रुर कुटिल दुष्ट कुबुद्धी कलंकित नीच निशील, निरिश्वरवादी व अनाथ निशंक ॥ २ ॥ असे सुद्धा शरण आलेले ऐकून व समोर पाहून त्यांनी एकदाच प्रणाम केल्यावर त्यांना आपले करता मानता ॥ ३ ॥ दोष दिसून सुद्धा कधी मनात आणीत नाही व उलट गुण ऐकून स्वत: संतांच्या समूहांत त्यांची संत म्हणून प्रशंसा करता ॥ ४ ॥ असा कोण स्वामी आहे की जो सेवकांचा सर्व साजसंच जमवून ( त्यांच्याजवळ नसलेले त्यांस पुरवून) त्यांचे रक्षण करतो ? ( योगक्षेम, प्रापंचिक व पारमार्थिक चालवितो) ॥ ५ ॥ आपण सेवकासाठी केलेले महत्कृत्य मनात सुद्धा आठवीत नाही व दासांचा संकोच व चिंता आपण आपल्या मनांत बाळगीत असता ॥ ६ ॥ असा स्वामी दुसरा कोणीही नाही हे मी बाहू वर करुन ( प्रतिज्ञेने) सांगतो ॥ ७ ॥ पोपट पाठ म्हणून दाखवण्यात कुशल असतात व पशु नाचण्यात कुशल असतात, पण ( पोपटाचा पाठ म्हणून दाखवण्याचा) गुण पाठकाच्या त्याला पढविण्याच्या अधीन असतो व पशूची ( नाचण्याची) गती ( त्याला शिकविणार्या) नटाच्या अधीन असते ॥ ८ ॥ ( तसेच) आपण आपल्या सेवकांस सुधारले व गौरव करुन त्यांस साधूचे मुकुटमणी बनविले असा कृपालुशिवाय कोण आहे की जो आपली ब्रीदावलि उत्तम प्रकारे पाळूं शकेल ? ॥ दो० २९९ ॥ स्नेहशोकिं कीं बाल चपलतां । आलों लंभुन वचन तत्त्वता ॥ दो० :- सुज्ञ सुहृत् स्वामी पुढे बहु वदणें अति दोष ॥ स्नेहाने म्हणा, शोकाने म्हणा की बालचपलतेने ( स्वाभाविक मूर्खपणाने) म्हणा, स्वामीची आज्ञा मोडून ( येथे) आलो खरा ॥ १ ॥ तरीसुद्धा कृपाळूंनी आपल्या brब्रीदाकडे पाहून माझे सगळे गोड मानून घेतले ॥ २ ॥ सुमंगलांचे मूळ असे हे पाय दिसले ( तेव्हा) जाणले खात्री झाली की स्वामी सहज अनुकूल आहेत ॥ ३ ॥ महापुरुषांच्या समाजात माझे भाग्यही मला कळून आले की इतकी मोठी चूक केल्यानंतर सुद्धा स्वामी माझ्यावर फार प्रसन्न आहेत ॥ ४ ॥ हे कृपाल ! आपण माझ्यावर सर्वांग परिपूर्ण कृपा – प्रसाद ( अनुग्रह) केला, इतकेच नव्हे तर सर्वच अधिक केले ॥ ५ ॥ स्वामी ! आपण आपल्या स्वाभाविक सौजन्याने व सुशीलाने माझे सर्व लाड पुरविलेत. ॥ ६ ॥ नाथ ! मी स्वामी व समाज यांची भीड न धरतां बोललो ही मोठी धृष्टता केली ॥ ७ ॥ ( माझे हे) अविनयाने ( उद्धटपणाने) वा विनयाने वाटेल ते बोलणे अति आर्त ( झालेल्याचे) आहे हे जाणून देवा ! क्षमा करावी ॥ ८ ॥ कारण सुजाण = सुज्ञ व सुहृद असलेल्या स्वामी पुढे फार बोलणे हा अति दोष आहे ( म्हणून) देवा ! आता आपण मला आज्ञा द्यावी, म्हणजे तीच मला निर्दोषकरील. ॥ दो० ३०० ॥ श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु |