|
॥ श्रीरामचरितमानस ॥ (मराठी अनुवाद) ॥ बालकाण्ड ॥ अध्याय १० वा ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥ Download mp3 जाउनि मुनि हिमवंता धाडिति । ते विनवुनि गिरिजे गृहिं आणिति ॥ दो० :- समजाउनि विधि वदति तैं दनुज निधन होईल ॥ मुनींनी जाऊन हिमवंतास पार्वतीकडे पाठवले. त्यांनी गिरीजेला विनवून तिला घरी आणली ॥१॥ मग सप्तर्षी पुन्हा शिवाकडे गेले व उमेची ती सगळी कथा त्यांचे कानी घातली ॥ २ ॥ तिचा स्नेह ऐकताच ( शिव ) त्यात मग्न झाले तेव्हा सप्तर्षी आपापल्या घरी गेले ॥ ३ ॥ शंभू सुजाण असल्याने त्यांनी आपले मन आवरुन स्थिर केले व ते रघुपतीचे ध्यान करु लागले ॥ ४ ॥ त्याच समयी तारक नावाचा असुर भारी बलवान, तेज, प्रतापधारी झाला. ॥ ५ ॥ त्याने सर्व लोकपतींचे लोक जिंकले व सर्व देव सुख संपत्तीविहीन झाले ॥६॥ तो अजर व अमर होता त्यामुळे जिंकला जाईना नाना प्रकारे युद्ध करुन सर्व देव समुदाय थकले ॥७॥ तेव्हा त्यांनी जाऊन विरंचीला आळविले तेव्हा ब्रह्मदेवाला सर्व देव फार दु:खी दिसले ॥८॥ दो. सर्वांना समजावून ब्रह्मदेवाने सांगीतले की शंभूच्या वीर्यापासून पुत्र उत्पन्न होईल तोच दनुजाला जिंकील व त्याला (तारकासुरास) मरण येईल ॥दो. ८२॥ मी वदतो त्या करा उपाया । होइल, ईश्वर करिल सहाया ॥ दो० :- निज विपदा सुर सांगती परिसुनि करी विचार ॥ मी सांगतो तसा उपाय करा म्हणजे कार्य होईल, ईश्वर साह्य करील ॥१॥ ज्या सतीने दक्षाच्या यज्ञात देह त्याग केला, ती जाऊन हिमालयाच्या घरी जन्मली ॥२॥ (व) तिने शंभू पति मिळावा म्हणून तप केले (परंतु) सर्वत्यागी शिव समाधिमग्न बसले आहेत. ॥३॥ ते काम फार दुष्कर आहे असे वाटते; तरी आम्ही सांगतो ती गोष्ट ऐका. ॥ ४ ॥ जाऊन कामदेवाला शंकरांजवळ पाठवा व त्याला शंकरांच्या मनात क्षोभ उत्पन्न करु द्या. ॥ ५ ॥ मग आम्ही जाऊन शिवपदी मस्तक नमवून, भीड घालवून विवाह करावयास लावू ॥ ६ ॥ देवांचे हित होण्यास हाच उत्तम उपाय आहे. तेव्हा सर्वजण म्हणाले की, या सारखे दुसरे मत ( सल्ला ) नाही. ॥ ७ ॥ नंतर तेथून जाऊन देवांनी पुष्कळ स्तुती केली तेव्हा विषमबाण मीनकेतू ( मदन ) प्रगट झाला. ॥ ८ ॥ दो०-देवांनी मदनाला आपल्या सर्व विपत्ती सांगीतल्या. त्या ऐकून त्याने विचार केला व हसून मार म्हणाला की शंभूशी विरोध केल्याने मी कुशल राहणार नाही. ॥ दो० ८३ ॥ तदपि करिन कार्या तुमचे बरं । वेद वदे उपकार धर्म पर ॥ छंद :- पळला विवेक सहाय सह रणिं विमुख सुभटहि जाहले तरीपण मी तुमचे कार्य चांगले करीन, कारण उपकार करणे हा परमधर्म आहे असे वेद म्हणतात. ॥ १ ॥ परहित साधण्यासाठी जो कोणी देहत्याग करतो त्याची संत सुद्धा सतत प्रशंसा करतात. ॥ २ ॥ मग असे सांगून सर्वांना नमस्कार करुन काम निघाला. तेव्हा त्याच्या हाती पुष्पधनुष्य, पुष्पे व बरोबर सहायक होते. ॥ ३ ॥ जाता जाता मार ( मदन ) मनाशी विचार करुं लागला की शिव – विरोध केल्याने आंम्हास मरण येणार हे निश्चित. ॥ ४ ॥ तेव्हा त्याने आपला प्रभाव पसरला व या संसारात असणार्या सर्वांना आपल्या वश करून टाकले ॥ ५ ॥ जेव्हा जलचर- केतू कोपला तेव्हा तत्काळ सर्व वेदमर्यादा नष्ट झाल्य़ा ॥ ६ ॥ ब्रह्मचर्य, संयम, नाना व्रते, धैर्य, धर्म, बोध, ( ज्ञान ) विज्ञान यांसह सदाचार जप, योग व वैराग्य इ. सर्व विवेकाचे सैन्य पळत सुटले. ॥ ७-८ ॥ छं – विवेक भूपती आपल्या सहायकांसह पळाला, त्याचे मोठमोठे खंदे वीर रणांगणातून परत वळले; व ते सर्व सदग्रंथरुपी पर्वतांच्या गुहांत जाऊन लपून राहिले व सर्व जगात जिकडे तिकडे खळबळ उडाली जो तो म्हणूं लागला कि हा ! दैवा ! काय होणार आता ? आमचं रक्षण कोण करणार ! असा दोन डोक्यांचा, उलट्या डोक्याचा कोण आहे की ज्याच्या साठी कामदेवाने क्रुद्ध होऊन हातात धनुष्य घेऊन वर बाण लावले आहेत ! दो० – या जगातील सर्व स्थावर व जंगम सजीव प्राणी नावाने स्त्री किंवा पुरुष असलेले सुद्धा आपापली मर्यादा सोडून कामवश झाले. ॥ दो० ८४ ॥ सर्वां मनीं मदनअभिलाषा । बघुनि लता लवविति तरु शाखा ॥ छंद :- जैं कामवश योगीश तापस पामरा गति का वदा ॥ सर्वांच्याच मनात कामाची प्रबल इच्छा उत्पन्न झाली. उदा- लतांना पाहून वृक्ष आपल्या शाखा लववू लागले ॥ १ ॥ नद्या फुगून सागराकडे धावू लागल्या. पुष्करिणी व तलाव यांचा संगम होऊ लागला ॥ २ ॥ जिथे जडांची अशी दशा झाली तिथे चेतनांच्या ( कामांध ) दशेचे व त्यांच्या करणीचे वर्णन कोण कसे करुं शकणार ! ॥ ३ ॥पशु, पक्षी, नभचर, जलचर, स्थिरचर सगळेच जंगम जीव काळवेळ विसरुन कामवश झाले. ॥ ४ ॥ सर्वच लोक कामविव्हळ व काम मदांध झाले. दिवस आहे की रात्र, पुरुष कोण कसा आहे, स्त्री कोण कशी आहे हे सुद्धा बघत नाहीसे झाले. ॥ ५ ॥ देव, दनुज, मानव, नाग, प्रेत, पिशाच, भुते व वेताळ यांना सदा कामाचे किंकर जाणून त्यांची जी दशा झाली तिचे वर्णन केले नाही. ॥ ६-७ ॥ सिद्ध, विरक्त, महामुनी, व योगी हे सुद्धां कामवश होऊन वियोगी बनले. ॥ ८ ॥ जिथे मोठमोठे योगीश्रेष्ठ व महातपस्वी कामवश झाले तेथे ( इतर ) पामरांची दशा काय झाली असेल याचे वर्णन कशाला करा ! जे सर्व जग ब्रह्ममय बघत असत त्यांना सर्व चराचर सृष्टी स्त्रीमय दिसूं लागली ! स्त्रियांना सर्व जग पुरुषमय दिसू लागले व पुरुषांना स्त्रीमय दिसू लागले. कामदेवाने केलेली ही अदभूत लीला सर्व ब्रह्मांडभर दोन घटकांपर्यंत चालू राहीली ॥ छंद ॥ ( त्यावेळी ) कोणीही धीर धरुं शकले नाहीत व मदनाने सर्वांचे मन हरण केले, परंतु रघुवीरांनी ज्यांचे रक्षण केले तेवढेच त्या काळात (कामाच्या तडाख्यातून) वाचले. ॥ दो० ८५ ॥ दोन घडी अस कौतुक होई । शंभु समीप काम जों जाई ॥ छं. जागृत मनोभव मृतहि मनिं वदवे न वनशोभा जरा । मदन दमन : काम शंभूसमीप जाईपर्यंत दोन घटकाच असे कौतुक चालू राहीले ॥ १ ॥ शिवाला पाहताच मदनाला शंका उत्पन्न झाली. व संसाराला पूर्वीची स्थिती प्राप्त झाली. ॥ २ ॥ मदमस्तांचा मद उतरला म्हणजे त्यास जसे सुख होते तसे तत्काळ सर्व जीवांना सुख झाले ॥ ३ ॥ दुराधर्ष, दुर्गम भगवंताला रुद्राला पाहून मदन घाबरला ॥ ४ ॥ परत फिरावे तर लाज वाटते, कार्य तर काही करवत नाही ( असे झाले तेव्हा ) हातावर शिर घेऊन उपाय सुरु केले. ॥ ५ ॥ लगेच मनोहर असा ऋतुराज वसंत प्रगट केला; त्याबरोबर जिकडे तिकडे टवटवीत फुललेल्या वृक्षांच्या रांगा भ्राजमान झाल्या. ॥ ६ ॥ बने, उपवने, वापी तलाव व दाही दिशांतील सर्व विभाग परम रमणीय दिसू लागून ॥ ७ ॥ जिकडे तिकडे जणू प्रेमाला पूर आला. ( तो इतका की ) मेलेल्याच्या मनात सुद्धा काम जागृत झाला. ॥ ८ ॥ वनाची शोभा तर जरा सुद्धा वर्णन करवत नाही. कामरुपी अग्नीचा खराखुरा मित्र शीतल सुगंधी व अगदी मंद वाहणारा वारा वाहूं लागला. तलावात पुष्कळ कमळे फुलली. मधुकरांचे थवे मंजूळ गुंजारव करू लागले कलहंस, पोपट व कोकिळ मधुर मनोहर कूंजन करू लागले व अप्सरा गायन करीत नाचू लागल्या. ॥ छंद १ ॥ कामदेवाने आपल्या सेनेसह कोट्यावधी कामकला करून पाहील्या ( पण शेवटी ) त्याने सेनेसह कच खाल्ली. तेव्हा तो मागे सरला, पण शिवाची अचल समाधी मुळीच चळेना. ( तेव्हा ) काम ( हृदयनिकेत ) कोपला ॥ दो० ८६ ॥ बघुनि रसाल विटपि विटपा वर । मदन रुष्ट चिडुनी चढला वर ॥ छं. :- योगी अकंटक होति पतिगति परिसतां मूर्च्छित रती । आम्रवृक्षाची एक सुंदर शाखा पाहून रुष्ट झालेला मदन चिडून वर चढला. ॥ १ ॥ फुलांच्या धनुष्यावर आपले बाण लावून नेमच धरुन धनुष्य कानापर्यंत ताणले ॥ २ ॥ व कठीण असे आपले पाच बाण ( अरविंद = लाल कमळ, अशोक मंजिरी, आम्रमंजिरी, मदनबाण, व नीलकमल ) सोडले. ते छातीत लागले तेव्हा समाधी सुटली व शंभू जागे झाले ॥ ३ ॥ ( त्यामुळे ) ईशाचे मन फार क्षुब्ध झाले ( तेव्हा ) त्यांनी डोळे उघडून दशदिशांस पाहीले. ॥ ४ ॥ ( तेव्हा ) आम्रपल्लवांत ( लपलेला ) मदन द्दष्टीस पडला; त्या बरोबर कोप झाला व त्रैलोक्य कंपायमान झाले ॥ ५ ॥ ( तत्काळ ) शिवांनी आपला तिसरा नयन उघडला व त्याच्याकडे निरखून पाहता क्षणीच काम जळून भस्म झाला. ॥ ६ ॥ जगात सर्वत्र हाहाकार झाला. सर्व देव भारी भयभीत झाले व देवशत्रू – असुर सुखी झाले. ॥ ७ ॥ जे विषयासक्त भोगप्रिय होते ते कामसुखाचे स्मरण करुन शोक करु लागले. – दु:खी झाले, परमार्थ साधक योगी इत्यादिंचा मार्ग निष्कंटक झाला. ॥ ८ ॥
योगी अकंटक झाले. आपल्या पतीची ती दशा ऐकताच रती ( मदन – पत्नी ) मूर्च्छित झाली. ( मग ) नाना प्रकारांनी विलाप करीत रडली. व शोक करीत ती शंकरांजवळ गेली तिने हात जोडले व प्रेमाने नाना प्रकारे विनवण्या केल्या. सर्व-समर्थ ( प्रभू ) व शीघ्र संतुष्ट होणारे कृपालु शिव त्या अबलेला पाहून शेवटी म्हणालेच ॥ छंद ॥ हे रती, आज पासून तुझ्या पतीला अंनंग असे म्हणतील व तो शरीराशिवायच सर्वांना व्यापील. तुझी व त्याची भेट कोणत्या प्रसंगी होईल ते ऐक ॥ दो० ८७ ॥ जैं यदुवंशिं कृष्ण अवतार । हरण्या होइ महा महिभार ॥ दो० :- सकल सुरा हृदयीं असा शंकर! परमोत्साह ॥ जेव्हा महामहीभार हरण करण्यासाठी यदुवंशात कृष्णावतार होईल. ॥ १ ॥ तेव्हा कृष्णाचा पुत्र (प्रद्युम्न) तुझा पती होईल, माझे वचन जरासुद्धा खोटे होणार नाही. ॥ २ ॥ हे शंकरांचे वचन ऐकून रती परत गेली. ( याज्ञवल्क्य भरद्वाजांस म्हणतात ) आता दुसरी कथा सांगतो ती ऐका. ॥ ३ ॥ हा उत्सव बघुं भरून लोचन । करणें तेंच, मदन मद मोचन! ॥ दो० :- अमचा शब्द न मानिला नारद मुनि उपदेश ॥ जेणे करुन हा उत्सव आम्हा सर्वांना डोळे भरुन पाहण्यास मिळेल तेच हे मदन-मदमोचना आपण करावे ॥१॥ कामाला जाळून रतीला आपण वर दिलात ही गोष्ट हे कृपासागरा आपण फारच चांगली केलीत ॥२॥ शिक्षा करून त्यावर प्रसाद-अनुग्रह करणे हा नाथ ! समर्थांचा सहज स्वभाव (प्रकृती) आहे. ॥३॥ पार्वतीने (तर) अपार तप केले आहे, तरी आता तिचा अंगीकार करणे आवश्यक आहे ॥४॥ विधीची विनंती ऐकून आणि राम प्रभूंचे वचन लक्षात घेऊन, सुख मानून शंकर म्हणाले की असेच होवो ॥५॥ (तेव्हा लगेच) देवांनी दुंदुभी वाजविण्यास व पुष्पवृष्टी करण्यास प्रारंभ केला व ’जय जय सुरनायक’ म्हणून जयजयकार केला ॥६॥ यावेळी आपण गेले पाहीजे असे मानून सप्तर्षी तेथे आले तेव्हा विधीने त्यास त्वरेने गिरिराजाच्या घरी पाठवून दिले ॥७॥ सप्तर्षी प्रथम भवानीच्या निवास स्थानी गेले व छलमिश्रित पण मधुर वाणीने म्हणाले ॥८॥ आमचं सांगणं त्यावेळी मानलं नाहीत व नारदाचा उपदेश मानलात ! तुमचा पण आता अगदी खोटा ठरला, कारण महेशांनी कामालाच जाळून खाक केला ॥दो. ८९॥ श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु |