|
॥ श्रीरामचरितमानस ॥ (मराठी अनुवाद) ॥ अयोध्याकाण्ड ॥ अध्याय ९ वा ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥ Download mp3 प्रजा प्रेमवश रघुपति पाहति । सदय हृदयिं अति दुःखा पावति ॥ दो :- सिता राम लक्ष्मण रथीं शंभुस नमिति चढून ॥ प्रजा प्रेमवश झाली आहे असे रघुपतींना दिसले व ते दयाळू असल्याने त्यांना हृदयात अति दु:ख झाले ॥ १ ॥ रघुनाथ जितेंद्रिय असले तरी करुणामय असल्यामुळे त्यांना दुसर्यांचे दु:ख लवकर होते (दुसर्यांच्या दु:खाने चटकन दु:खी होतात) ॥ २ ॥ (मग) प्रेमळ, मृदु व सुन्दर बोलून रामचंद्रांनी लोकांना पुष्कळ सांगून ॥ ३ ॥ पुष्कळ धर्मोपदेश केला; पण प्रेमीलोक फिरवतां फिरेनात ॥ ४ ॥ शीलाचा त्याग करता येत नाही व स्नेहही सोडता येत नाही (अशा) अडचणींत रघुराज पडले असतां ॥ ५ ॥ श्रमांमुळे व शोकामुळे लोकांना (गाढ) झोप लागली, व देवमायेने त्यांस थोडेसे मोहित केले ॥ ६ ॥ रात्रीचे दोन प्रहर उलटून गेल्यावर राम प्रेमाने सुमंत्रांस म्हणाले की ॥ ७ ॥ तात ! रथाचा माग न ठेवतां (आता) रथ हाकणे जरुर आहे, यांतून सुटण्यास दुसरा काही उपाय नाही ॥ ८ ॥ सीता राम व लक्ष्मण यांनी रथांत चढून शंभूस नमन केले व सचिवाने रथाचा माग मुळीच न ठेवता त्वरेने रथ चालविला - हाकला. ॥ दो० ८५ ॥ जागृत सगळे लोक सकाळां । गत रघुनाथ ओरडा झाला ॥ दो० :- रामदर्शना व्रतादिक करुं लागति नर नारि ॥ सकाळ होताच सगळे लोक जागे झाले व रघुनाथ गेले असा ओरडा, गोंगाट सुरु झाला ॥ १ ॥ राम ! हा राम ! असे ओरडत चारी दिशांना धावपळ करीत आहेत पण रथाचा माग कोठेच लागेना ॥ २ ॥ सागरात जहाज बुडून व्यापारी लोक जसे व्याकुळ व्हावेत तसे जणू सर्व लोक अति व्याकुळ झाले ॥ ३ ॥ (मग) ते एकमेकांस उपदेश करुं लागले की आपल्याला क्लेश होतील हे जाणून रामचंद्रांनी आपला त्याग केला ॥ ४ ॥ सर्व लोक स्वत:ची निंदा व मीनांची प्रशंसा करु लागले की रघुवीर विहीन असलेल्या आमच्या जगण्याला धिक्कार असो ॥ ५ ॥ ब्रह्मदेवाने जर प्रियवियोग निर्माण केला तर आता मागितल्या बरोबर मरण का देत नाही ॥ ६ ॥ या प्रमाणे पुष्कळ प्रलाप करीत अत्यंत परितप्त होऊन लोक अयोध्येस परत आले ॥ ७ ॥ त्यांच्या त्या कठिण वियोग दशेचे वर्णन करणे शक्य नाही (पण) १४ वर्षांच्या मुदतीच्या आशेवर सर्वांनी आपले प्राण ठेवले आहेत ॥ ८ ॥ सर्व स्त्रिया व पुरुष रामदर्शनासाठी व्रत नेम इत्यादींचे पालन करु लागले व असे दीन झाले की जणू भास्कराशिवाय चक्रवाक, चक्रवाकी व कमलेच. ॥ दो० ८६ ॥ सिता सचिव सह लक्ष्मण रघुपति । शृंगवेरपुर समीप पोंचति ॥ दो० :- शुद्ध सच्चिदानंदमय कंद भानुकुल-केतु ॥ सीता व सचिव यांसहित लक्ष्मण व राम शृंगवेरपुराजवळ येऊन पोचले ॥ १ ॥ देवनदी - गंगा दृष्टीस पडताच राम रथातून उतरले व अति हर्षित होऊन त्यांनी गंगेला साष्टांग नमस्कार केला ॥ २ ॥ व लक्ष्मण व सचिव यांनीही केला. सीतेने प्राणाम केला व सर्वांसहित रामचंद्रांना सुख झाले ॥ ३ ॥ गंगा सर्व मोहाचे व मंगलाचे मूळ असून सर्व सुखकारख व सर्व शूल निवारक आहे ॥ ४ ॥ विविध कथा प्रसंगांचे वर्णन करीत राम गंगेच्या तरंगांकडे बघत आहेत ॥ ५ ॥ सचिवाला, लक्ष्मणाला व प्रियेला देवनदीची अति अधिक (विशेष) महती रामांनी वर्णन करून सांगीतली ॥ ६ ॥ नंतर स्नान केले तेव्हा प्रवासाने आलेला थकवा गेला व पवित्र जलाचे पान केल्यावर मन आनंदाने भरले ॥ ७ ॥ ज्यांचे स्मरण केल्याने श्रमांचा सर्व भारच सरतो त्यांना श्रम झाले, हा केवळ लौकिक व्यवहार आहे ॥ ८ ॥ शुद्ध (गुणमायातीत) सत् चित् आनंदमय, सुख देणारे, सूर्यकुळ कीर्तीची ध्वजारुप, (राम) मनुष्यासारखे चरित्र आचरण करीत आहेत, (पण) ते संसार सागरावरील सेतू सारखे आहेत ॥ दो० ८७ ॥ कळतां वृत्त निषाद गुहाला । मुदित बोलवी प्रिय सुहृदांला ॥ दो० :- वर्ष चार दश वास वनिं मुनिंचें व्रत आहार ॥ हा समाचार गुह नावाच्या निषादाला कळला, तेव्हा त्याने आपली प्रिय मंडळी व सुहृद यांना बोलावून घेतले ॥ १ ॥ फलमूलादि बरीच भेट समर्पण करुन त्याने दंडवत नमस्कार केला व अति प्रेमाने प्रभूकडे बघतच राहीला ॥ ३ ॥ रघुराज सहज स्नेहालाच विशेष वश होतात (म्हणूनच) त्याला आपल्या जवळ बसविला व कुशलही विचारले ॥ ४ ॥ (गुह म्हणाला) नाथ ! आपल्या चरण कमलांचे दर्शन झाले म्हणजे कुशल आहे (हे ठरले) व आपला एक दास म्हणून माझी गणना झाली त्या अर्थी मी भाग्याचे पात्र झालो आहे ॥ ५ ॥ देवा ! ही धरणी, घर, धन, वगैरे सर्व आपले आहे व माझ्या परिवारासह मीही आपला एक नीच दास आहे ॥ ६ ॥ कृपा करुन पुराला (नगरीला) आपण आपले पाय लावावेत व मला मोठेपणा द्यावा की जेणे करुन लोकांनी मला धन्य म्हणावा ॥ ७ ॥ सुजाण सख्या तू म्हणालास ते सर्व खरे आहे, पण मला वडिलांची आज्ञा निराळी आहे ॥ ८ ॥ चार व दहा वर्षे वनांत वास आणि मुनींच्या व्रताचे व आहारादिंकांचे पालन करावयाचे आहे. त्यामुळे गावात (सुद्धा) वस्ती करणे उचित नाही हे ऐकून गुहाला अपार दु:ख झाले ॥ दो० ८८ ॥ राम सिता लक्ष्मण छवि बघती । प्रेमें ग्राम नारि नर वदति- ॥ दो० :- सिता-सचिव-बंधू सहित खाति मूल फल कंद ॥ राम लक्ष्मण व सीता यांचे रुप पाहून शृंगवेर पुरीतील नरनारी प्रेमाने आपसात म्हणतात की ॥ १ ॥ ज्यांनी अशा बालकांना वनात पाठवले ते आईबाप, सखे ! आहेत तरी कसे ! ॥ २ ॥ कोणी म्हणतात राजा भला आहे आणि त्याने चांगलेच केले, विधीनेच आपल्याला लोचनलाभ दिला. ॥ ३ ॥ तेव्हा (रघुनाथ पुरात येत नाहीत असे ठरल्यावर) निषादपतीने मनात अनुमान केले व शिंशपा (शिसवी) वृक्ष मनोहर आहे असे वाटले - जाणले ॥ ४ ॥ रघुनाथास ते ठिकाण दाखवले तेव्हा राम म्हणाले वा ! वा ! छान आहे ! ॥ ५ ॥ पुरजन जोहार करुन परत घरी आले. व रघुवर (सायं) संध्या करण्यासाठी (गंगेवर) निघून गेले ॥ ६ ॥ गुहाने कुश व झाडांची नवीन सुंदर कोवळी पालवी पसरुन मऊ मऊ मनोहर अंथरुण तयार करुन ठेवले ॥ ७ ॥ पवित्र फळे व मुळे मधुर व मृदु आहेत असे पाहून अनेक द्रोणांत भरुन ठेवली व द्रोणांत गंगाजल भरुन ठेवले ॥ ८ ॥ सीता, सचिव, व बंधू लक्ष्मण यांच्यासह रघुकुलमणी रामचंद्रांनी कंदमूळ फळे खाल्ली व रघुकुलमणी त्या अंथरुणावर झोपले व बंधु लक्ष्मण रामचंद्रांचे सुखमूल असे चरण चेपीत बसला ॥ दो० ८९ ॥ अनुज उठे कळतां ’प्रभु निजले’ । ’निजा’ वचनिं मृदु सचिवा वदले ॥ दो० :- शुचि सुविचित्र सुभोगमय सुमन सुगंधि सुवास ॥ प्रभूंना झोप लागली आहे असे कळताच लक्ष्मण उठले व मृदु वचनांनी सचिवास म्हणाले की आपण आता निजावे ॥ १ ॥ (मग) जरा दूर धनुष्यावर बाण सज्ज करून वीरासन घालून जागत बसले ॥ २ ॥ गुहाने विश्वासू पहारेकरी आणले व अति प्रेमाने पुष्कळ ठिकाणी त्यांना ठेवले ॥ ३ ॥ आपण स्वत: कमरेला लहान भाता (भाती) बांधून व धनुष्यावर बाण लावून लक्ष्मणाजवळ येऊन बसला ॥ ४ ॥ गाद्या गिरद्या विविध वसनवर । क्षीरफेन-मृदु विशद मनोहर ॥ दो० :- कैकय नंदिनि मंदधी करि कटु कुटिलपणास ॥ (त्या पलंगावर) विविध प्रकारची वस्त्रे, प्रावरणे, उशा, गिर्द्या असून त्या दुधाच्या फेसासारख्या कोमल, व उज्वल व मनोहर असतात. ॥ १ ॥ तेथे रोज (रात्री) सीताराम शयन करतात व आपल्या रुपाने रति व मदन यांचा गर्व हरण करतात ॥ २ ॥ तेच सीताराम आज तृणपर्ण शय्येवर थकले – भागलेले, वस्त्रांवाचून (केवळ वल्कले) झोपले आहेत ! त्यामुळे त्याच्याकडे पाहवत सुद्धा नाही ॥ २ ॥ माता, पिता, परिजन पुरवासी, सुशील सखे, उत्तम दास, व उत्तम दासी ॥ ४ ॥ ज्यांना प्राणांपलिकडे जपत असत ते स्वामी राम आज जमिनीवर झोपले आहेत ॥ ५ ॥ ज्यांचा प्रभाव लोकविश्रुत आहे ते जनकराजा जिचे पिता आहेत इंद्राचे मित्र रघुराज (दशरथ) जिचा सासरा आहे ॥ ६ ॥ व रामचंद्र पति आहेत ती वैदेही भुईवर झोपली आहे ! (तेव्हा) दैव कोणावर उलटत नाही ? ॥ ७ ॥ सीता रघुवीर काय वनाला योग्य आहेत काय ? कर्म प्रधान आहे असे लोक म्हणतात तेच खरे ! ॥ ८ ॥ कैकयराजाला आनंद देणार्या मंदबुद्धी कैकयीने कठिण कुटिलपणा व रघुकुलास आनंद देणार्या रघुनाथांस व जानकीला सुखाच्या वेळी दु:ख दिले ॥ दो० ९१ ॥ रवि-कुल-विटप-कुठारी झाली । कुमति विश्व सब दुःखीं घाली ॥ दो० :- स्वप्नीं होइ भिकारि नृप होइ रंक नाकेश ॥ कुबुद्धी (कैकयी) सूर्यकुलरुपी वृक्षाला कुर्हाड झाली व सगळे विश्व तिने दु:खात लोटले ॥ १ ॥ सीतारामचंद्रांना जमिनीवर निजलेले पाहून निषादाला भारी विषाद झाला ॥ २ ॥ अशा विचारें रोष नसावा । वृथा दोष कोणा ना द्यावा ॥ दो० :- भक्त भूमि भूसुर सुरभि सुरहित राम कृपाल ॥ याप्रमाणे विचार करुन कोणावर रागावू नये व वृथा दोष कोणालाही देऊ नये ॥ १ ॥ सर्व लोक मोहरुपी रात्रीत निजणारे आहेत व कितीतरी प्रकारची स्वप्ने त्यांना दिसत असतात. ॥ २ ॥ या जगरुपी रात्रीत प्रपंचवियोगी झालेले जे परमार्थी योगी असतात तेच जागे असतात ॥ ३ ॥ ज्यावेळी (सर्व) विषयविलासांत वैराग्य उत्पन्न होईल त्यावेळीच जगरुपी रात्रीत जीव जागा झाला असे जाणावे ॥ ४ ॥ अशा प्रकारे आत्मज्ञान होते व मोह आणि भ्रम सुद्धा नाश पावतो; तेव्हा मग रघुनाथचरणीं अनुरागही उत्पन्न होऊं शकतो. ॥ ५ ॥ राम हेच परमार्थरुप ब्रह्म होत ते अव्यक्त अनुपम आदिरहित, भेदरहित, विकाररहित व नित्य असून वेद त्यांचे नेति नेति असे वर्णन करतात ॥ ७-८ ॥ भक्त, भूमी, ब्राम्हण, गाई व देव यांच्या हितासाठी कृपालु राम मनुष्य शरीर धारण करुन लीलाचरित्र करतात व त्यांच्या श्रवणाने जगरुपी जाळे उरत नाही. ॥ दो० ९३ ॥ श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु |