॥ श्रीरामचरितमानस ॥

(मराठी अनुवाद)

॥ अयोध्याकाण्ड ॥

अध्याय ६ वा

॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥


Download mp3

रघुकुल तिलक जोडुनी हातां । मुदित मातृपदिं ठेविति माथा ॥
दे आशीर्वच धरि हृदयासी । ओवाळी भूषण-वसनांसी ॥
वारंवार माय मुख चुंबित । स्नेह-नीर नयनीं तनु पुलकित ॥
घे मांडीवर दे आलिंगन । झरे प्रेमरस पयोदिं शोभन ॥
प्रेमा प्रमोद नाहिं वर्णवत । रंक धनद-पदवी जणुं पावत ॥
निरखुनि सादर सुंदर वदना । वदली माय मधुर मृदु वचना ॥
वदा तात ! कुरवंडिं कलेवर । कधिं शुभ मुहूर्त मुदमंगल-कर ॥
सुकृत-शील-सुख-सीमा परमा । जन्मलाभ अवधी किं निरुपमा ॥

दो० :- तो वांछिति नर नारि सब या प्रकारिं अत्यार्ति ॥
जशिं चातक चातकि तृषित वृष्टि शारदी स्वाति ॥ ५२ ॥

कौसल्या रघुनाथ संवाद --
रघुकुळटिळकांनी दोन्ही हात जोडले व आनंदाने मातेच्या पायावर मस्तक ठेवले. ॥ १ ॥ तिने आशीर्वाद दिले व त्यांस हृदयाशी धरले; मग वस्त्रे भूषणे त्यांच्यावरुन ओवाळून टाकली ॥ २ ॥ माता वारंवार ( राम) मुखाचे चुंबन घेऊ लागली, तिच्या डोळ्यात प्रेमाश्रू आले व शरीर रोमांचित झाले ॥ ३ ॥ त्यास चटकन मांडीवर घेऊन पुन्हा आलिंगन दिले. तेव्हा तिच्या पवित्र स्तनातून ( पयोद) प्रेमरस पाझरुं लागला ॥ ४ ॥ रंकाला कुबेरपद मिळाल्याने जसा आनंद व्हावा तसा कौसल्या मातेला अवर्णनीय प्रेमानंद झाला ॥ ५ ॥ सुंदर मुख आदराने निरखून पाहून माता मधुर व मृदु वाणीने म्हणाली की ॥ ६ ॥ बाळा ! मी आपला देह ओवाळून टाकते ! आनंद मंगल कारक तो शुभ मुहूर्त केव्हा आहे सांग बरं ! ॥ ७ ॥ जो सुकृत, सुख व शील यांची परम सीमा असून जन्मलाभाची उपमारहित ( अत्यंत) परमावधि आहे ॥ ८ ॥ जशी तृषार्त चातक - चातकी शरद ऋतूतील स्वातीच्या पावसाची वाट बघत असतात त्याचप्रमाणे सर्व स्त्रिया व पुरुष या शुभ मुहूर्ताची अत्यंत आर्तीने आकांक्षा करीत आहेत. ॥ दो० ५२ ॥

पिडा टळो स्नाना कर सत्वर । गोड घांस खा दोन किं रुचिकर ॥
वडिलांजवळ जाइ मग बाळा । तनु कुरवंडिं उशिर बहु झाला ॥
मातृवचां ऐकुनि अनुकूलां । जणूं स्नेह-सुरतरुचे फूलां ॥
श्रीमूलां अति सुख-सुरसांना । बघुनि राम-मन-अलि भुलला ना ॥
धर्म-धुरीण धर्मगति जाणुनि । सांगति माते अति मृदु बोलुनि ॥
देति तात मज काननराज्य ।कार्य बहुत मम तेथें प्राज्य ॥
माते दे आज्ञा मुदिता मनिं । मग मुदमंगल जातां काननिं ॥
चुकुनि न घाबरि हो स्नेहास्तव । अंब देइ आनंद कृपा तव ॥

दो० :- वर्ष चार दश वसुनि वनिं पाळुनि पितृवचनास ॥
येइन पाहिन पाय मीं म्लान करी न मनास ॥ ५३ ॥

बाळा ! सर्व इडा पिडा टळो ! लवकर स्नान कर व आवडीचे दोन गोड घास खाऊन घे कसा ॥ १ ॥ मग वडिलांकडे जा किती उशीर झाला हा ! ( हा देह ओवाळून टाकते) सर्व इडा पिडा टळो ॥ २ ॥ जणू स्नेह कल्पतरुच्या फुलांसारखी मातेची अनुकूल वचने ऐकून ॥ ३ ॥ ( ती जरी) सुखरुपी सुंदर रसाने भरलेली व सर्व श्री चे मूळ आहेत. तरी त्यांना पाहून रामचंद्राचे मन रुपी भुंगा ( भ्रमर) भुलला नाही ॥ ४ ॥ ( रघुवीर) धर्मधुरीण असल्याने त्यानी धर्मगति जाणली व अति मृदु बोलून मातेला सांगीतले की - ॥ ५ ॥ वडिलांनी मला काननाचे राज्य दिले आहे व माझे तेथे महत्वाचे पुष्कळ कार्य आहे ॥ ६ ॥ ( म्हणून) आई ! मला आनंदित मनाने आज्ञा - निरोप दे. म्हणजे मग वनात गेल्याने ( सुद्धा) मला आनंद मंगलाचीच प्राप्ती होईल. ॥ ७ ॥ स्नेहामुळे चुकून सुद्धा घाबरी होऊ नकोस; कारण की माते ! तुझी कृपाच मला आनंद देईल ॥ ८ ॥ वनात चार आणि दहा वर्षे राहीन आणि पित्याचे वचन पालन करुन परत येईन तू मन खट्टू करु नकोस ॥ दो० ५३ ॥

रघुवर-वचनें मधुर विनम्रहि । सलति मातृहृदिं जशिं बाणाग्रहि ॥
सुके घाबरुनि वचनें शीतल । पडत यवासिं जसें वर्षा्षजल ॥
वदवेना मुळिं हृदय-विषादा । श्रवुनि मृगी जणुं केसरि-नादा ॥
सजल नयन तन थरथर कापे । खाउनि गढुळि मीन जणुं धापे ॥
धीर धरुनि सुत मुखा न्यहाळी । माता गद्‌गद-कंठ म्हणाली ॥
प्राणप्रिय तूं बाळ ! पित्या तंव । मुदित नित्य पाहुनि चरितां तव ॥
राज्य अर्पण्या शुभ दिन काढिति । वनिं कोण्या अपराधें धाडिति ॥
सांग वासरा ! मजसि निदानू । कोण भानुकुळि होइ कृशानू ॥

दो० :- बघुनि रामकल सचिवसुत कारण सब समजावि ॥
ऐकुनि राही मूकशी कशी दशा वर्णावि ॥ ५४ ॥

रघुवराची अत्यंत मधुर व नम्र वचनेसुद्धा मातेच्या हृदयात बाणासारखी सलू लागली ॥ १ ॥ पावसाचे पाणी धमाश्यावर पडले म्हणजे ती झाडे जशी सुकतात तशीच जणू कौसल्या ती शीतल वाणी ऐकून घाबरुन सुकून गेली ॥ २ ॥ तिच्या हृदयातील विषादाचे मुळीच वर्णन करता येत नाही ( पण अशी दिसली की) जणू सिंहाची गर्जना श्रवण केलेली हरिणीच ! ॥ ३ ॥ नेत्र अश्रूंनी डबडबले व देह असा थरथर कापू लागला की जणू गढूळी खाऊन मासाच मूर्च्छित झाला ॥ ४ ॥ ( मग) धीर धरून पुत्राच्या मुखाकडे न्याहाळून पाहीले व माता सदगदित होऊन म्हणाली की ॥ ५ ॥ बाळा ! तूं तर वडिलांना प्राणांपेक्षा प्रिय आहेस व तुझ्या चरित्रांना पाहून ते नित्य प्रसन्न होतात ॥ ६ ॥ राज्य देण्य़ासाठी शुभ दिवस पाहीला आणि आता कोणत्या अपराधासाठी वनात धाडीत आहेत ? ॥ ७ ॥ तान्हुल्या ! ( याला) मूळ कारण कोण झालं ? सूर्यवंशाला अग्नि कोण बनलं ते तरी सांग ॥ ८ ॥ रामचंद्रांचा कल पाहून सचिव पुत्राने सर्व कारण समजावून सांगितले ते ऐकून माता मुक्यासारखी ( तटस्थ) होऊन राहीली. तिची ती दशा कशी वर्णन करता येईल ॥ दो० ५४ ॥

जा म्हणवे ना राखुं न शकते । दारुण दाहिं उभयपरिं जळते ॥
लिहित चंद्र राहू लिहिला ही । विधि गति वाम सदा सकलां ही ॥
धर्मस्नेह घेति घेरुनि मति । झाली साप चिचुंदरिची गति ॥
राखिन पुत्र करुनि जर आग्रह । धर्महानि नी बंधू विग्रह ॥
म्हणूं वनीं जा तरि अति हानी । संकट-चिंता-व्याकुळ राणी ॥
स्त्री-धर्मा समजुनी शहाणी । राम भरत सुत-युग सम मानी ॥
राममाय ती स्वभाव-सरला । वदे धरुनि भारी धीराला ॥
धन्य बाळ ! करिशी कीं इष्ट चि । सर्वधर्मिं पित्राज्ञा श्रेष्ठ चि ॥

दो० :- राज्य देउं वदुनी दिलें वन, मज दुःख न लेश ॥
तुजविण भरत-नृपां प्रजे दुःसह होती क्लेश ॥ ५५ ॥

वनात जा म्हणण्याचे धाडस करवत नाही व ठेऊनही घेऊ शकत नाही दोन्ही प्रकारांनी हृदयात दारुण दाह होत आहे ॥ १ ॥ ब्रह्मदेवाने चंद्र लिहीताना लिहीले गेले राहू ? दैवाची गती सर्वांनाच सदा उलटी आहे. ॥ २ ॥ धर्म व स्नेह यांनी ( कौसल्येच्या) बुद्धिला घेरुन घेतली आहे आणि साप व चिचुंदरी यांची गती झाली आहे . ॥ ३ ॥ आग्रह करुन मुलाला ठेऊन घ्यावा तर धर्महानी होते व बंधुविरोध होतो ( जा म्हणावे तर प्रेम - स्नेह आड येतो) ॥ ४ ॥ ( विचार करते की) वनात जा असे सांगावे तर मोठीच हानी होणार याप्रमाणे धर्म संकट व चिंता - शोक यानी व्याकुळ झाली ॥ ५ ॥ ( पण) स्त्रीधर्म काय आहे हे मनांत जाणून त्या शहाण्या राणीने राम व भरत हे दोन्ही पुत्र मला सारखेच आहेत असे जाणले ॥ ६ ॥ ती रामजननीच असल्याने ती स्वभावताच सरळ आहे; म्हणून भारी धीर धरुन म्हणाली की - ॥ ७ ॥ बाळा ! धन्य आहेस ! जे इष्ट आहे तेच करीत आहेस; कारण सर्व धर्मामध्ये पित्याची आज्ञा ( पालन करणे) हा धर्मच श्रेष्ठ आहे ॥ ८ ॥ राज्य देऊ म्हणून सांगुन वन दिले याबद्दल मला लेशमात्र दु:ख वाटत नाही; ( पण) तुझ्या वाचून भरताला, राजांना व प्रजेला दु:सह क्लेश होतील ( याचेच फार दु:ख वाटते) ॥ दो० ५५ ॥

जर केवळ पित्राज्ञा ताता । जा न, जाणुनी श्रेष्ठ माता ॥
मायबाप जर कथिती जावें । वन किं अयोध्याशत समजावें ॥
बाप माय वनदेव नि देवी । खग मृग चरणसरोरुह-सेवी ॥
नृपां उचित वनवासहि अंतीं । विलोकुनी वय वाटे खंती ॥
बहुभागी वन अभागिणी पुरी । रघुकुळ-टिळका त्यजा जिस पुरी ॥
न्या मजला संगें सुत ! म्हणुं जर । हृदिं संदेह होइ तुमच्या तर ॥
पुत्र ! परम तुम्हिं प्रिय सर्वांचे । प्राणां प्राणहि जीव जिवांचे ॥
ते तुम्हिं म्हणां जाउं माते वनिं । श्रवुनि, बसुनि मी पस्तावे मनिं ॥

दो० :- द्या विचारिं करितें न हट मिथ्या स्नेह धरून ॥
मान मातृनातें, मला जाउं नको विसरून ॥ ५६ ॥

जर ( तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे) केवळ पित्याचीच आज्ञा असती तर माता अधिक श्रेष्ठ असे जाणून जाऊ नको ( असे म्हटले असते) ॥ १ ॥ पण जर ( सचिव पुत्राने सांगितल्याप्रमाणे) पिता व कैकेयी माता यांनी वनात जा असे सांगितले आहे तर कौसल्येचे शुभाशिर्वाद अरण्य शंभर अयोध्येसारखे आहे ॥ २ ॥ वनात वनदेव तुमचे पिता व वनदेवी माता आहेत व पशुपक्षी चरणकमलांची सेवा करणारे सेवक होत ॥ ३ ॥ आयुष्याच्या शेवटच्या काळात राजांनी वनवासास जाणे योग्य आहे ( म्हणून तुमच्या) वयाकडे पाहीले म्हणजे दु:ख होते ( इतकेच) ॥ ४ ॥ ( ज्या वनांत तुम्ही जाल) ते वन महा भाग्यवंत व हे रघुकुळटिळका जिला पूर्ण पणे त्यागता ती ही अयोध्यापुरी पूर्ण अभागी आहे. ॥ ५ ॥ पुत्रा ! मला बरोबर वनात न्या असे सांगीतले तर तुमच्या हृदयात संशय येईल ( हे मला माहीत आहे म्हणून मी तसे म्हणत नाही) ॥ ६ ॥ पुत्रा तुम्ही सर्वांनाच परम प्रिय आहांत; ( कारण) तुम्ही प्राणांचे प्राण व जीवांचे जीव आहांत ॥ ७ ॥ ते तुम्ही म्हणता की “ माते मी वनात जातो ” तेव्हा ते ऐकून मला स्वस्थ बसून पश्चाताप करीत राहीले पाहीजे ॥ ८ ॥ या विचाराने मिथ्या स्नेह बाळगून मी हट्ट करीत नाही पण मातेचे नाते तू मान आणि ( तू मात्र) मला विसरुन जाऊ नकोस ॥ दो० ५६ ॥

गोस्वामी तव देव-पितर-गण । पक्ष्म नयन एव करोत रक्षण ॥
जल अवधी प्रिय परिजन मीन । तुम्हिं करुणाकर धर्म-धुरीण ॥
जाणुनि हें त्या करा उपाया । जितां सकल याल किं भेटाया ॥
लिंबलोण करुं, सुखें किं जा वनि । जन परिजन पुर अनाथ बनवुनि ॥
आज सुकृतफल सकलांचे गत । झाला काल कराल चि विपरित ॥
विविधा विलपुनि चिकटे चरणां । परम अभागिनि मानि आपणां ॥
भरे दाह हृदिं दुःसह दारुण । विपुल विलाप न करवे वर्णन ॥
उठवुनि राम हृदयिं तिज धरती । मृदु वचनें बहु सांत्वन करिती ॥

दो० :- वृत्त परिसुनी त समयिं सीता विकल उठून ॥
गता, सासुपदकमलिं शिर, नमुनिं बसे, वंदून ॥ ५७ ॥

गोस्वामी ! पापण्या जसे डोळ्यांचे रक्षण करतात तसे देवांचे व पितरांचे सर्व समूह तुमचे रक्षण करोत ॥ १ ॥ चौदा वर्षांचा अवधि हे पाणी असून प्रिय असणारे सर्व लोक व कुटुंब हे मासेे आहेत व तुम्ही करुणेचे आगर असून धर्मधुरीण आहांत ॥ २ ॥ याचा विचार करुन असा उपाय करा की ( अवधि सरातच) सर्वजण जिवंत असता तुम्ही भेटण्यास येऊ शकाल ॥ ३ ॥ जा, सुखाने वनात जा, मी तुमच्यावरुन ( देह कुरवंडून) लिंबलोण करते सर्व नगरी, आपले कुटुंब व सेवक या सगळ्यांना अनाथ बनवून खुशाल जा ! ॥ ४ ॥ सर्वांच्या सुकृताचे फळ आज गेले. काळ विपरीत व कराल ( भयंकर) झाला ॥ ५ ॥ याप्रमाणे नाना प्रकारे विलाप करुन कौसल्या रामाच्या पायांना चिकटली व मी अत्यंत अभागिण आहे असे तिला वाटले ॥ ६ ॥ हृदयात दु:सह दारुण दाह पसरला तिच्या ( त्या वेळच्या) अपार विलापांचे वर्णन करवत नाही ॥ ७ ॥ रामचंद्रांनी तिला उठवून हृदयाशी धरली व मृदु वचनांनी तिचे सांत्वन केले ॥ ८ ॥ त्याच वेळी ही बातमी ऐकून सीता व्याकुळ होऊन उठून गेली व सासूच्या पदकमलांना वंदन करून मान खाली घालून बसली ॥ दो० ५७ ॥

सासू मृदु आशीर्वच वदली । ’अति सुकुमारी’ बघुनि विकळली ॥
सीता विनतमुखी चिंता मनिं । पतिप्रेम सुपुनीत रूपखनि ॥
जीवननाथ जाउं वनिं बघती । कोण बरोबर जाइल सुकृती ? ॥
प्राण सतनु कीं प्राण एकले । विधि कर्तृत्व न कांहिं आकळे ॥
चारु चरणनखिं धरणी उकरित । नूपूर-मुखर मधुर कवि वर्णित ॥
जणूं प्रेमवश विनती करिती । सीतापद आम्हां ना त्यजिती ॥
मंजुल लोचनिं अश्रु ढाळते । बघुनि माय रामास सांगते ॥
बाळ ! सिता बघ अति सुकुमारी । सासु-सासरा-परिजन प्यारी ॥

दो० :- पिता जनक भूपाल मणि श्वशुर भानुकुल-भानु ॥
पति रविकुल-कैरव विपिन-विधु गुण-रूप-निधानु ॥ ५८ ॥

सासूने कोमल वाणीने आशीर्वाद दिला व सीता अति सुकुमार आहे असे पाहून ( सासू) व्याकुळ झाली ॥ १ ॥ रुपाची खाण व अति पवित्र पतिप्रेम असलेली खाली मान घालून बसलेली सीता मनात चिंता करते की ॥ २ ॥ जीवननाथ वनात जाऊ इच्छित आहेत, तरी आता कोण सुकृती बरोबर जाणार आहे ? ॥ ३ ॥ देहासहित प्राण बरोबर जाणार की एकटे प्राणच जाणार ? विधीचे कर्तृत्व जरासुद्धा आकलन करता येत नाही ॥ ४ ॥ सीता आपल्या सुंदर पायांच्या नखांनी धरणी उकरीत आहे ( त्यामुळे होणारा जो) नूपूरांचा मधुर ध्वनी त्याचे कवी वर्णन करतात ॥ ५ ॥ सीतेची नूपूरे प्रेमवश होऊन जणूं प्रार्थना करीत आहेत की सितेच्या पायांनी आमचा त्याग करु नये ॥ ६ ॥ व सीता आपल्या सुंदर नेत्रांतून अश्रू ढाळीत आहे . ( हे सर्व) पाहून माता रामचंद्रास सांगते की ॥ ७ ॥ बाळ ! हे पहा की सीता अति सुकुमार आहे आणि सासवा - सासरे व परिजन यांना फार प्रिय आहे ॥ ८ ॥ हिचा पिता भूपती शिरोमणी जनक महाराज आहेत; श्वशुर सूर्यवंशाचे सूर्य आहेत आणि हिचा पति रविकुलरुपी कुमुद वनास पूर्ण चंद्र असून गुण व रुप यांचे निधान आहे ॥ दो० ५८ ॥

पुत्र-वधू प्रिय मला लाभली । रूपराशि गुण-शील-आगळी ॥
नयनपुतळिशी प्रीति वाढवुनि । प्राण ठेवुं जानकीवर लावुनि ॥
कल्पवेलि सम विविधा लालन- । केलें स्नेहजलें प्रतिपालन ॥
विधी वाम जंव फुलते फळते । काय होय परिणाम न कळतें ॥
अंक पलंग पीठ झोपाळा । त्यजुन कठिण भुविं दे न पदाला ॥
जिवनमुळीसम जपत राहतें । ’दीपवात सार’ हि ना कथितें ॥
ती सिय जाउं बघत वनिं साथ । आज्ञा काय असे रघुनाथ ! ॥
चंद्र किरण रस-रसिक चकोरी । कशि निज नयनी निरखि तमोरी ॥

दो० :- करि केसरि निशिचर चरति दुष्ट जंतु वनिं भूरि ॥
विष वाटिकें खुले कि सुत शुभ संजीवनि सूरि ॥ ५९ ॥

मला तर अत्यंत रुपवती, उत्तम गुणांची व उत्तम शिलाची प्रिय अशी सून मिळाली आहे ॥ १ ॥ डोळ्यांतील पुतळी समजून तिच्यावर प्रीती वाढविली आहे व माझे प्राण जानकीवर लावून ठेवले आहेत ॥ २ ॥ कल्पवेली सारखे तिचे नाना प्रकारे पालन केले व स्नेहजल घालून तिचे प्रतिपालन केले ॥ ३ ॥ आता कुठे फुलणार फळणार तोच दैव फिरले व पुढे परिणाम काय होणार ते कळत नाही ॥ ४ ॥ सीतेने मांडी, मऊ आसन, पलंग, झोपाळा इत्यादी सोडून कठीण भूमीवर - जमिनीवर कधी पाऊल नाही टाकलं ॥ ५ ॥ जीवनमुळीप्रमाणे मी तिला जपत असते व दिव्याची वात सार असे सुद्धा तिला सांगत नाही ॥ ६ ॥ तीच सीता रघुनाथ ! तुमच्याबरोबर वनात जाऊ बघत आहे, तरी तुमची आज्ञा काय आहे ? ॥ ७ ॥ चंद्रकिरणातील रसाचा आस्वाद घेणारी चकोरी आपल्या डोळ्यांनी सूर्याकडे कशी निरखून पाहू शकेल ! ॥ ८ ॥ हत्ती, सिंह, निशाचर व इतर पुष्कळ दुष्ट जीवजंतू वनात संचार करीत असतात हे विचारवंत पुत्रा ! विषाच्या वृक्षांच्या बागेत सुंदर संजीवनी शोभेले काय ? ( कधीही नाही) ॥ दो० ५९ ॥

भिल्ल कोळि-कन्याच कानना । रचि विरंचि सुख विषयिं विदित ना ॥
उपल-जंतुशा स्वभावकठिणा । तयां क्लेश वनिं वाटे कधिं ना ॥
तापस वनिता वा वन-योग्या । तपासाठिं ज्या त्यजिती भोग्यां ॥
केविं वसेल तात ! वनिं सीता । चित्रलिखित कपि बघुनिहि भीता ॥
सुरसर सुभग - वनज - वन -चारी । डबक्या जोगि किं हंसकुमारी ॥
हें मनिं घेउनि, आज्ञा जैसी । जानकीस मी शिकविन तैसी ॥
सिता राहि गृहिं वदली अंबा । तर मज देइल बहु अवलंबा ॥
या जणुं शील स्नेह-सुधाखनि । मातृवचां प्रिय रघुविर परिसुनि ॥

दो० :- वदुनि विवेकी प्रिय वचन करिति मातृ-परितोष ॥
बोधुं लागले जानकिसि प्रगटुनि वन-गुण-दोष ॥ ६० ॥

भिल्ल व कोळी यांच्या कन्यांनाच विरंचीने काननासाठी निर्माण केल्या आहेत कारण त्यांना विषयातील सुख माहीतच नसते ॥ १ ॥ पाषाणांतील किडींप्रमाणे त्या स्वभावताच कठीण ( काटक) असतात. त्यामुळे त्याना वनांत कधीही क्लेश होत नाहीत ॥ २ ॥ किंवा तापसांच्या स्त्रिया वनात राहण्यास योग्य असतात. कारण त्यांनी तपासाठी भोग्य विषयांचा त्यागच केलेला असतो ॥ ३ ॥ बाळा ! चित्रातल्या माकडाला पाहून सुद्धा जी घाबरुन जाते ती सीता अरण्यात राहील तरी कशी ? ॥ ४ ॥ रमणीय मानस सरोवरातील कमलवनांत विहार करणारी हंसकुमारी डबक्यांत राहण्यास कां पात्र आहे ? ॥ ५ ॥ तेव्हा या सर्व गोष्टी विचारात घेऊन जशी आज्ञा होईल तसा उपदेश मी जानकीला करेन ॥ ६ ॥ माता म्हणाली की जर सीता घरी राहीली तर मला पुष्कळ आधार होईल. ॥ ७ ॥ मातेच्या या जणू शील व स्नेहरुपी सुधा यांची खाण असलेल्या प्रिय वचनांना ऐकून रघुवीर ॥ ८ ॥ विवेकी प्रिय वचने बोलून मातेचा परितोष करते झाले ( व मग) वनाचे गुणदोष प्रगट करुन जानकीला उपदेश करुं लागले ॥ दो० ६० ॥

* * * * *

श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु

GO TOP