॥ श्रीरामचरितमानस ॥

(मराठी अनुवाद)

॥ अरण्यकाण्ड ॥

॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

अध्याय ७ वा



Download mp3

पहा उदार सहज रघुनायक । सुंदर अगम सुगम वरदायक ॥
द्या वर एक मागतो स्वामी । जरी जाणतां अंतर्यामी ॥
मत्स्वभाव मुनि तुम्हां ठाउका । कांहि कधी भक्तांसि लपवुं कां ॥
प्रिय अशि वस्तु हि मला कोणती । मागुं शका न मुनि आपण ती ॥
जना अदेय नसे मम कांहीं । त्यजा न हा विश्वास कदा ही ॥
तैं नारद वदले हर्षित मन । हा वर मागुं करुनि उद्धटपण ॥
प्रभुच्या नामां जरी अनेकां । श्रुति सांगे एकाहुनि एका ॥
'राम' सकल नामांहुनि अधिकहि । असो नाथ ! अघखगगण-वधिकहि ॥

दो० :- राका-जननी भक्ति तव रामनाम तो सोम ॥
अपर नाम उडुगण विमल वसो भक्तहृद्‌व्योम ॥ ४२ रा ॥
एवमस्तु वदले मुनिसि कृपासिंधु रघुनाथ ॥
तैं नारद अति हर्षुनी प्रभुपदिं नमिती माथ ॥ ४२ म ॥

सहज उदार रघुनायका ! हे पहा की आपण सुंदर अगम व सुगम वर देणारे आहांत. ॥ १ ॥ स्वामी ! आपण अंतर्यामी असल्याने सर्व जाणतांच, तरी पण मी एक वर मागतो तो आपण द्या. ॥ २ ॥ मुनि ! माझा स्वभाव तुम्हांला ठाऊक आहे; भक्तांपासून मी कधी काही लपवून ठेवतो का ? ॥ ३ ॥ अशी कोणती माझी प्रिय वस्तू आहे की - मुनि ! ती आपण मागूं शकत नाही ? ॥ ४ ॥ दासांना न देण्यासारखे (अदेय) माझेकडे कांहीच नाही हा विश्वास केव्हांही सोडूं नका. ॥ ५ ॥ तव्हां नारद हर्षित मनाने म्हणाले की मी उद्धटपणा करून हा वर मागतो. ॥ ६ ॥ एकाहून एक श्रेष्ठ अशी प्रभूची अनेक नामे श्रुतीनी जरी सांगितली असली; ॥ ७ ॥ तरी नाथ ! ’राम’ नाम सकल नामांत श्रेष्ठ होवो व ते पापरूपी पक्षी समूहाला इतरांहून विनाशक होवो. ॥ ८ ॥ आपली भक्ति ही पौर्णिमेची रात्र आहे; रामनाम पूर्णचंद्र होवो व इतर विमल नामें विमल नक्षत्रगण बनून भक्तांच्या हृदयरूपी आकाशांत वसोत, निवास करोत. ॥ दो० ४२रा ॥ कृपासिंधु रघुनाथ मुनीस ’एवं अस्तु’ (असेच होवो) असे म्हणाले तेव्हां नारदांस अति हर्ष झाला व त्यांनी प्रभूच्या पायांवर मस्तक ठेवले. ॥ दो० ४२म ॥

सुप्रसन्न रघुनाथा पाहति । नारद पुन्हां वचन मृदु भाषति ॥
राम ! यदा प्रेरुनि निज माया । मला मोहिला प्रभु रघुराया ॥
तदा लग्न मी करूं पाहिलें । कारण कवण किं करूं नहि दिलें ॥
श्रुणु मुनि हर्षे तुला सांगतो । त्यजुनि भरंवसा सब मज भजतो ॥
त्यास सदा मी रक्षीं ताता ! । जशी बालका जपते माता ॥
धरुं अहि अनल वत्स शिशु जाई । निवारते न कळत जशि आई ॥
प्रौढ होत त्या माय सुतावरि । प्रीति करी, पूर्वी सम ना परि ॥
प्रौढ तनय सम मजला ज्ञानी । बालक सुत सम दास अमानी ॥
मम बल भक्तां, स्वबल तयानां । काम कोप हे रिपु उभयानां ॥
हें जाणुनि पंडित मज भजती । ज्ञान लाभिंहि न भक्ती त्यजती ॥

दो० :- काम कोप लोभादि मद प्रबल मोहदल भारि ॥
त्यांत सुदारुण-दुःखदा माया रूपी नारि ॥ ४३ ॥

रघुनाथ अति प्रसन्न आहेत असे पाहून नारद पुन्हां मृदु वाणीने म्हणाले की- ॥ १ ॥ राम ! जेव्हां आपल्या मायेला प्रेरून मला मोहित केलात तेव्हां रघुराया ? ॥ २ ॥ प्रभू मला लग्न करण्याची इच्छा झाली होती. मग आपण कोणत्या कारणास्तव मला लग्न करूं दिले नाही ? ॥ ३ ॥ मुनि ! ऐक, तुला मी हर्षाने सांगतो की सर्व भरवसा सोडून जो मला भजतो, ॥ ४ ॥ त्याचे, बालकास समान समजून जशी माता जपते तसे त्याचे हे ताता ! मी सतत संरक्षण करतो. ॥ ५ ॥ लहान बालक (शिशु वत्स) अग्नि किंवा सर्प धरण्यास जाऊं लागले म्हणजे त्याची आई जशी त्याला न कळूं देतां (गुपचुप) निवारण करते (तसे मी करतो) ॥ ६ ॥ तो मुलगा प्रौढ (मोठा) झाल्यावर माता त्यावर प्रीती करते (नाही असे नाही) पण पूर्वीच्या सारखी करीत नाही. ॥ ७ ॥ ज्ञानी मला प्रौढ मुलांसारखे आहेत, व अमानी दास बालकसुता (शिशुवत्सा) सारखे आहेत. ॥ ८ ॥ भक्तांना माझे बळ असते पण ज्ञानी लोकांना स्वतःचेच बळ ! काम, क्रोध इ. शत्रु दोघांनाही असतातच. ॥ ९ ॥ हे जाणून जे पंडित (शहाणे, स्वहितज्ञ) असतात ते मला भजतात व ज्ञानलाभ झाल्यानंतर सुद्धां भक्तीचा त्याग करीत नाहीत. ॥ १० ॥ काम-क्रोधलोभ मद आदि मोहाची प्रबळ सेनादलच आहे पण त्यांत अति दारूण व अति दुःखदायक मायारूपी नारी आहे (नारीरूपाने असलेली माया आहे). ॥ दो० ४३ ॥

श्रुणु मुनि ! पुराण वेद व संत । म्हणति मोहवनिं नारि वसंत ॥
जप तप नेम जलाशय भारी । ग्रीष्म बनुनि शोषी त्यां नारी ॥
काम कोप मद मत्सर भेकां । स्त्री वर्षा हर्षा दे एका ॥
दुर्वासना कुमुद-निकुरंबक । त्या स्त्री शरद सदा सुखदायक ॥
धर्म सकल सरसिज-वृंदा ही । अधम सौख्यदा स्त्री हिम दाही ॥
ममता यवासगण पालवतो । नारि शिशिरऋतु जैं वावरतो ॥
अघ-उलूक संघा सुखकारी । नारि निबिड रजनी अंधारी ॥
मति बल शील सत्य सब मीन । नारी गळ वर्णिती प्रवीण ॥

दो० :- अवगुण मूलहि शूलदा प्रमदा सुदुःख-खाण ॥
हें जाणुनि मी निवारण केलें मुनि ! मनिं जाण ॥ ४४ ॥

हे मुनि ! ऐक, पुराणें वेद आणि संत म्हणतात की मोहरूपी वनाला नारी वसंत ऋतु आहे. ॥ १ ॥ जपतपनेम इत्यादि पुष्कळ जलाशय आहेत पण नारी ग्रीष्म ऋतु बनून त्यांना शुष्क करून टाकते. ॥ २ ॥ काम क्रोध मद मत्सर इत्यादि बेडकांना हर्ष देणारा वर्षांऋतु म्हणजे एकटी नारी आहे. ॥ ३ ॥ दुष्ट वासनारूपी रात्रिविकासी कमलांचे जे समुदाय (निकुरंबक) आहेत त्यांना सदा सुख देणारा शरद ऋतु स्त्री आहे. ॥ ४ ॥ सगळे धर्म हे सूर्यविकासी कमळांचे ताटवे आहेत पण अधम सौख्य देणारी स्त्री हेमंत ऋतु बनून त्यांना जाळून टाकते. ॥ ५ ॥ नारीरूपी शिशिर ऋतु वावरूं लागला म्हणजे ममता रूपी यवासांचा समुदाय पालवतो. ॥ ६ ॥ पापरूपी घुबडांच्या समूहाला सुखकारक अशी निबिड अंधाराची रात्र म्हणजे स्त्री आहे. ॥ ७ ॥ बुद्धि, बळ, शील, सत्य इ. सर्व मीन-मासे आहेत व नारी त्यांना गळा सारखी आहे, असे प्रवीण सांगतात. ॥ ८ ॥ अवगुणांची मुळी, शुल देणारी, आणि अति दुःखाची खाण म्हणजे प्रमदा (तरुण नारी) आहे. मुनि ! लक्षांत घ्या की, हे जाणून मी निवारण केले. ॥ दो० ४४ ॥

परिसुनि रघुपति वचन सुशोभन । मुनि तनु पुलकित सजल विलोचन ॥
वदा कुणा प्रभुची अशि रीती । दासांवर ममता नी प्रीती ॥
प्रभु न असा, भ्रम त्यजुनि भजति जे । ज्ञानरंक जडमति अभागि ते ॥
मग म्हणति सादर मुनि नारद । पहा राम !विज्ञान विशारद ॥
हे रघुवीरा संत-लक्षणां । वदा नाथ ! भव-भीति-भंजना ॥
श्रुणु मुनि संत-गुणांनां वदतो ।ज्यांस्तव मी त्यांना वश असतो ॥
षड्‌विकार जित अनघ अकाम हि ।अचल अकिंचन शुचि सुखधाम हि ॥
अमित बोध अनीह मितभोगी । सत्यसार कवि कोविद योगी ॥
सावधान, मानद, मद नाहीं । धीर धर्मगति-निपुण पुरा ही ॥

दो० :- गुणागार संसार-दुख-रहित विगत संदेह ॥
मम पद-सरसिज विना प्रिय त्यां नहि गेह न देह ॥ ४५ ॥

रघुपतींचे सुंदर भाषण ऐकून नारदमुनींचे शरीर रोमांचित झाले व डोळे पाण्याने भरले. कोणत्या स्वामीची अशी रीति आहे व कोणत्या दासांवर अशी ममता व प्रीति आहे हे सांगा पाहू. ॥ २ ॥ जे अशा प्रभूला भ्रम सोडून भजत नाहीत ते ज्ञानरंक, मूढमति व अभागीच. ॥ ३ ॥ मग नारदमुनि आदराने म्हणाले की, विज्ञानविशारद राम ! हे पहा की ! ॥ ४ ॥ नाथ ! भवभीतिभंजना रघुवीरा ! मला संतांची लक्षणे सांगावी. ॥ ५ ॥ मुने ! ज्या गुणांमुळे मी संतांना सदा वश असतो ते संतांचे गुण सांगतो, ऐक. ॥ ६ ॥ त्यांनी कामक्रोधादि सहा विकार जिंकलेले असतात. ते निष्पाप, अकाम, अचल, अकिंचन, अन्तर्बाह्य पवित्र व सुखाचे निवासस्थान असतात. ॥ ७ ॥ त्यांचे ज्ञान (बोध) अमित असते; इच्छारहित, परिमित भोग भोगणारे, सत्य हेच सार मानणारे, कवि, विद्वान व योगी असतात. ॥ ८ ॥ सावधान, दुसर्‍यांस मान देणारे, गर्वरहित, धैर्यवान, धर्मज्ञ व धर्मचरणांत परम निपुण असतात. ॥ ९ ॥ ते गुणांचे माहेरघर, संसारदुःखरहित व सदा संदेहरहित असून माझ्या चरणकमलांवाचून त्यांना इतर घर देह इत्यादि कांहीच प्रिय वाटत नाही. ॥ दो० ४५ ॥

स्वगुण कानिं पडतां संकोचति । अन्य गुणां परिसत बहु हर्षति ॥
सम शीतल, ना त्यागिति नीती । सहज सरल सकलांसी प्रीती ॥
व्रत-जप तप दम संयम नेम हि । गुरु-गोविंदविप्र-पदिं प्रेम हि ॥
दया क्षमा मैत्री श्रद्धा अति । मुदिता, मम पदिं निष्कपटा रति ॥
विरति विवेक विनय विज्ञानी । बोध यथार्थहि वेद-पुराणीं ॥
दंभ मान मद कधी न करती । चुकुनि कुमार्गीं पाय न धरती ॥
गाति सदा मम लीला ऐकति । निर्हेतुक सहजा परहित-रति ॥
श्रुणु मुनि साधूंचे गुण जितके । वदुं न शकति गिरा श्रुति तितके ॥

छं० :- वदुं न शकति शेष न शारदा पदपद्म नारद धरितसे ।
किति दीनबंधु कृपाल मुखिं निज भक्तगुण वदले असे ॥
शिर नमुनि वारंवार चरणीं ब्रह्मपुरिं नारद गत ।
ते धन्य तुलसी दास आस विहाय हरिरंगी रत ॥
दो० :- रावणारि-यश पावन ऐकति जे गातात ॥
विण जप-योग-विराग, दृढ रामभक्ति लभतात ॥ ४६ रा ॥
दीपशिखेसम युवति तनु होइ न मना पतंग ॥
काम-मदां त्यज, राम भज, संतत कर सत्संग ॥ ४६ म ॥

स्वतःचे गुण कानी पडतांच संकोच वाटतो पण दुसर्‍यांचे गुण ऐकले म्हणजे फार हर्ष होतो. ॥ १ ॥ ते सम, शांत असतात व नीतीचा कधी त्याग करीत नाहीत; स्वभावताच सरळ असतात व सगळ्यांशीच प्रीतीने वागतात. । २ ॥ व्रत, जप, तप, इंद्रियनिग्रह (दम), मनोनिग्रह (शम), संयम आणि नियम यांचे पालन करतात आणि गुरु, गोविंद (परमात्मा) व विप्र यांच्या चरणी प्रेम करतात. ॥ ३ ॥ अति श्रद्धा, दया, क्षमा, मैत्री, मुदिता हे गुण असून माझ्या (रघुपतीच्या) पायांच्या ठिकणी अकृत्रिम (निष्कपट) सहज प्रेम (रति) असते. ॥ ४ ॥ ते वैराग्य, विवेक, विनय व विज्ञानसंपन्न असतात आणि वेद पुराणादिकांतील यथार्थ ते चांगला जाणतात. ॥ ५ ॥ कधींही दंभ, मान, मद करीत नाहीत, आणि चुकून सुद्धां कुमार्गावर पाऊल टाकीत नाहीत. ॥ ६ ॥ माझ्या लीला सदा गातात व ऐकतात आणि स्वतःचा कोणताही स्वार्थ नसतां दुसर्‍यांचे (शत्रूंचे सुद्धां) हित करण्यांत सहज रत असतात. ॥ ७ ॥ मुने ! ऐक, साधूंचे जितके गुण आहेत त्या सर्वांचे वर्णन गिरा (शारदा) व शेष यांना सुद्धां करतां येत नाही. ॥ ८ ॥ साधूंचे गुण शेष शारदा वर्णू शकत नाहीत. हे ऐकताच नारदांनी प्रभूचे चरणकमल धरले. प्रभु किती दीनबंधु आणि कृपाल कीं त्यांनी आपल्या मुखाने या प्रमाणे असे आपल्या भक्तांचे गुण वर्णन केले ! प्रभूच्या चरणांवर वारंवार मस्तक नमवून नारद ब्रह्मलोकांस निघून गेले. तुलसीदास म्हणतात की सर्व आशा सोडून जे दास हरिरंगात रमले तेच धन्य ! ॥ छं० ॥ रावणारि रघुवीराचे पावन यश जे लोक ऐकतात व गातात ते जप, वैराग्य, योग यांच्या वाचूनच दृढ रामभक्ति पावतात. ॥ दो० ४६रा ॥ हे मना स्त्रीची तनु दीपाच्या ज्योती सारखी आहे. तिच्यावर तूं पतंग होऊं नको. काम आणि मद यांचा त्याग कर, राम भजन सतत कर व सदा सत्संग कर. ॥ दो ४६म ॥

॥ इति श्रीरामचरितमानसे अरण्यकाण्ड समाप्तः ॥

इति श्रीमद् रामचरितमानसे सकल-कलि-कलुष-विध्वंसने
तृतीयः सोपानः
अरण्यकाण्डं समाप्तं
जय जय रघुवीर समर्थ

* * * * *

श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु

GO TOP