॥ श्रीरामचरितमानस ॥

(मराठी अनुवाद)

॥ लंकाकाण्ड ॥

॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

अध्याय १३ वा



Download mp3

तैं रघुपति अनुशासन पावुनि । मातलि जाइ चरणिं शिर नमवुनि ॥
देव सदा स्वार्थी ठाकले । वदति जणूं परमार्थीं भलें ॥
दीनबंधू दयाल रघुराथा । देव ! दयाकृत देवनिकायां ॥
जगद् द्रोहरत हा खल कामी । नष्ट अघें निज कुमार्गगामीं ॥
तुम्हिं सम सदा ब्रह्म अविनाशी । सदा एकरस सहज उदासी ॥
अकल अगुण अज अनघ अनामय । अजित अमोघ शक्ति करुणामय ॥
मीन कमठ सूकर नरहरी । वामन परशुराम व्हा तरी ॥
जैं जैं दुःखे नाथ ! सुरानां । हरलीं तुम्हिंच धरुनि तनु नाना ॥
सुरद्रोहि खल मलिन सतत हा । क्रोधी कामलोभ मद रत हा ॥
तव पद पावे अधम शिरोमणि । वाटे हा विस्मय अमचे मनिं ॥
आम्हिं परम अधिकारि देवता । प्रभो ! स्वार्थरत भक्ति विस्मृता ॥
संतत पतित अम्हीं भवनदीं । आतां पाहि ! शरण प्रभु ! पदीं ॥

दो० :- विनति करुनि सुर सिद्ध सब उभे जोडुनी हात ॥
प्रेमें अति पुलकित विधि पुन्हां स्तुती करतात ॥ ११० ॥

सर्वदेवकृत स्तुती – विशाखा नक्षत्र स्तुती – मग रघुपतीची आज्ञा मिळताच मातली चरणांना मस्तक नमवून (रथ घेऊन स्वर्गास निघून) गेला ॥ १ ॥ सदा स्वार्थी असलेले सर्व देव आले व असे बोलूं लागले की जणूं मोठे परमार्थीच आहेत. ॥ २ ॥ हे दिनबंधू ! दयाळा ! हे रघुराया ! हे देव ! आपण सर्व देव समूहावर दया केलीत. ॥ ३ ॥ जगांचा द्रोह करण्यात तत्पर असलेला हा दुष्ट कामी आणि कुमार्गाने जाणारा स्वत:च्याच पापाने नष्ट झाला. ॥ ४ ॥ तुम्ही सदा सम असणारे अविनाशी ब्रह्म आहांत, नित्य एकरस, स्वभावताच उदासीन, पूर्ण अगुण, जन्मरहित, विकार रहित, अजय, अमोघ शक्ती असलेले आणि करुणामय आहांत. ॥५-६॥ म्हणूनच तर मत्स्य, कूर्म, वराह, नरहरि, वामन व परशुराम झालात. ॥ ७ ॥ हे नाथ ! जेव्हा जेव्हा सुरांना दु:ख झाले तेव्हा तेव्हा तुम्हीच विविध देह धारण करुन त्या दु:खाचा विनाश केलात. ॥ ८ ॥ हा दुष्ट सदा पापी, सदा देवांचा द्रोह करणारा, काम, क्रोध, लोभ, मद यातच सदा मग्न असणारा, असा अधमांचा शिरोमणी असून सुद्धा त्याला तुमचे पद प्राप्त झाले हे आमच्या मनाला फार मोठे आश्चर्य वाटले. ॥ ९-१० ॥ आम्ही देवता परम अधिकारी असून स्वार्थ परायण होऊन प्रभो ! तुमची भक्ती विसरलो. ॥ ११ ॥ आणि म्हणूनच आम्ही निरंतर भवनदीत पडलो आहोत प्रभु, आता आपल्या पायी शरण आलो आहोत आमचे रक्षण करा ॥ १२ ॥ अशी विनंती, स्तुती, प्रार्थना करुन सर्व देव सिद्ध वगैरे हात जोडून उभे राहीले. मग ब्रह्मदेव अति प्रेमाने पुलकित होऊन पुन्हा स्तुती करु लागले. ॥ दो० ११० ॥

तो०:- जय राम सदा सुखधामहरे । रघुनायक सायक चाप करे ॥
भव वारण दारण सिंह ! प्रभो । गुणसागर नागर नाथ विभो ॥
तनु काम अनेक अनूप छवी । गुण वानिति सिद्ध मुनींद्र कवी ॥
यश पावन, रावण नागवरा । खगनाथ यथा युत कोप धरां ॥
जन रंजन भंजन शोक भयं । गत कोप सदा प्रभु बोधमयं ॥
अवतार उदार अपार गुणं । महिभार विभंजन बोध घनं ॥
अज सर्वग एक अनादि सदा । करुणाकर राम नमामि मुदा ॥
रघुवंश विभूषण दूषण हा । कृत भूपति दीन बिभीषण हा ॥
गुण बोध निधान अमान अजं । नित राम नमामि विभुं विरजं ॥
भुजदंड प्रचंड प्रताप बलं । खलवृंदनिकंद महा कुशलं ॥
विण कारण दीनदयाल हितं । छविधाम नमामि रमासहितं ॥
भव तारण कारण कार्य परं । मनसंभव दारुण दोषहरं ॥
शरचाप मनोहर तूण धरं । जलजारूण लोचन भूपवरं ॥
सुख मंदिर सुंदर मा रमणं । मद मार मुधाममता शमनं ॥
अनवद्य अखंड, न गोचर गो । जगरूप सदा जग होइ न गो ॥
इति वेद वदंति, न दंत कथा । रवि आतप भिन्न अभिन्न यथा ॥
कृतकृत्य विभो सब वानर हे । निरखीति तवानन सादर हे ॥
धिग जीवन देव शरीर हरे । तव भक्तिविना भवभूलिं खरे ॥
तरि दीनदयाल दया करणें । मति माझी विभेदकरी हरणे ॥
विपरीत कृतीच जिनें करतो । सुख मानुनि दुःख सुखी फिरतो ॥
खल खंडन मंडन रम्य मही । पदपंकज सेव्य उमा-शिवही ॥
नृपनायक दे वरदानमिदं । चरणांबुज प्रेम सदा शुभदं ॥

दो० :- कृता विनति चतुराननें प्रेम सुपुलकित गात्र ॥
शोभासिंधु विलोकत लोचन तृप्ति न मात्र ॥ १११ ॥

ब्रह्मदेवकृत – अनुराधा नक्षत्र स्तुती - हे सदा सर्वदा सुखधाम हरे ! हे हातात धनुष्यबाण घेतलेल्या रघुनायका ! हे राम ! आपला जय असो. हे प्रभो ! आपण भवरुपी हत्तीला विदारण करणारे सिंह आहात हे नाथ ! हे विभो ! आपण गुणसागर व चतुर आहांत. ॥ १ ॥ आपल्या तनूची छबी अनेक कामदेवांसारखी पण अनुपम आहे सिद्ध, मुनीश्रेष्ठ व कवी आपले गुणवर्णन करीत आहेत. तुमचे यश पावन असून आपण रावणरुपी सर्प श्रेष्ठास गरुडाप्रमाणे क्रोधाने धरलात. ॥ २ ॥ हे प्रभो ! आपण सेवकांचे रंजन करणारे, व शोक व भय यांना गांजणारे, सदा कोपरहित व सदा ज्ञानमय आहात आपला अवतार उदार व अपार गुणांनी युक्त, भूभार हरण करणारा व ज्ञानघन आहे. ॥ ३ ॥ जन्मरहित, सर्वव्यापक, एक अनादी असून तुम्ही नित्य आहात हे सदा करुणा करा रामचंद्रा ! आपल्याला उल्हासाने नमन करतो हे रघुवंश विभूषणा ! दुषणादिकांचा नाश करणार्‍या हा बिभीषण दीन होता, त्याला तुम्ही लंकेचा भूपती केलात. ॥ ४ ॥ गुणनिधान, ज्ञाननिधान, मानरहित, जन्मरहित, व्यापक व विकाररहित असणार्‍या रामा ! मी तुम्हाला नित्य नमन करतो. तुमच्या भुजदंडाचा प्रताप व बल प्रचंड आहेत. व दुष्टांच्या समुहांचा संहार करण्यात तुम्ही महा कुशल आहांत. ॥ ५ ॥ कारणांशिवायच दीनांवर दया करुन त्यांचे हित करणार्‍या शोभाधामा ! रमेसहित मी आपल्याला नमन करतो आपण भवसागरातून तारणारे असून कारण व कार्य यांच्या पलिकडे असून मनात उत्पन्न होणार्‍या दारुण दोषांचे हरण करणारे आहात. ॥ ६ ॥ आपण मनोहर धनुष्यबाण व मनोहर भाता धारण करणारे असून नेत्र लाल कमळासारखे लाल आहेत व आपण भूपश्रेष्ठ आहांत सुखाचे मंदिर, सुंदर लक्ष्मीरमण असून मद – काम व मिथ्या ममता यांचा संहार करणारे आहांत. ॥ ७ ॥ आपण पूर्ण दोषरहित, अखंड, असून इंद्रिय-गोचर नाही आपण सर्व जगरुप असून सुद्धा जग आपण नव्हेत. व इंद्रियेही आपण नव्हेत असे वेदच म्हणतात ही दंतकथा नव्हे ज्या प्रमाणे सूर्य व सूर्यप्रकाश भिन्न आहेत व भिन्न नाहीतही. ॥ ८ ॥ हे विभो ! हे सर्व वानर जे तुमचे मुख आदराने निरखून पहात आहेत ते कृतकृत्य होत. हे हरे ! आमचे जीवन व आमचे देवशरीर यांचा धिक्कार असो ! कारण की तुमच्या भक्तीवाचून आम्ही खरोखर भवभ्रमात आहोत. ॥ ९ ॥ म्हणून तरी हे दीनदयळा ! आता माझ्यावर कृपा करावी आणि ज्या माझ्या विभेद उत्पन्न करणार्‍या बुद्धीने मी विपरीत आचरण करीत असतो आणि दु:खालाच सुख मानून सुखी होऊन फिरत असतो ती माझी विभेद बुद्धी दूर करा. ॥ १० ॥ आपण खलांचे खंडन केलेत आपण महीचे रम्य मंडण भूषण आहांत आपल्या चरण कमलांची सेवा शिव व उमा सुद्धा करीत असतात हे नृपनाथा ! तुमच्या चरण कमलांच्या ठिकाणी कल्याणदायक प्रेम उत्पन्न होईल असे हे वरदान मला द्या. ॥ ११ ॥ प्रेमाने अति पुलकित तनु झालेल्या चतुराननाने स्तुती केली मात्र् शोभा सिंधु अवलोकित असता त्यांच्या नेत्रांची तृप्ती झाली नाही. ॥ दो० १११ ॥

तेव्हां तेथे दशरथ आले । बघुनि तनय नयनीं जल भरलें ॥
प्रभु अनुजासह करिती नमना । दशरत्थ देती आशीर्वचना ॥
पुण्यप्रभाव तव सब ताता । विजित किं अजय निशाचर नाथा ॥
सुतवचनें प्रीती अति वाढे । सजल नयन रोमांचहि गाढे ॥
प्रेम पूर्विचें रघुपति जाणुनि । ज्ञान दिलें दृढ पित्या विलोकुनि ॥
उमे ! मुक्त दशरथ ना झाले । कारण, भेद भक्तिनें धाले ॥
सगुणोपासक मोक्ष न घेती । तयां राम निज भक्ती देती ॥
प्रभूला वारंवार वंदुनी । दशरथ जाति मुदित सुरसदनीं ॥

दो० :- प्रभु जानकि अनुजा सह कुशल कोसलाधीश ॥
शोभा निरखुनि हर्षुनी स्तुती करी सुर ईश ॥ ११२ ॥

श्रीराम दशरथ समागम – तेव्हा दशरथ स्वर्गातून तेथे आले व पुत्रास पाहून त्यांच्या डोळ्यात पाणी आले. ॥ १ ॥ प्रभूंनी अनुजासह नमस्कार केला. तेव्हा पित्याने आशीर्वाद दिले. ॥ २ ॥ (मग राम म्हणाले) तात ! हा सर्व तुमच्याच पुण्याचा प्रभाव आहे की अजिंक्य असा निशाचर राजा जिंकला गेला. ॥ ३ ॥ पुत्राचे वचन ऐकून प्रीती अति वाढली, नेत्र पाण्याने भरले व घनदाट रोमांच उभे राहीले. ॥ ४ ॥ दशरथांचे पूर्वीचेच प्रेम अजून आहे असे जाणून रघुपतींनी पित्याकडे कृपादृष्टीने विलोकन करुन त्यांस दृढ ज्ञान दिले. ॥ ५ ॥ उमे ! ज्ञान दृढ झाल्यानंतर सुद्धा दशरथ मुक्त झाले नाहीत कारण दशरथांनी भेद भक्तीतच समाधान मानले. ॥ ६ ॥ सगुणोपासक मोक्ष घेत नाहीत, राम त्यांना आपली भक्ती देतात. ॥ ७ ॥ प्रभूला वारंवार प्रणाम करुन दशरथ प्रसन्न होऊन स्वर्गात गेले. ॥ ८ ॥
इंद्रकृत – जेष्ठा नक्षत्र स्तुती – जानकी व अनुज यांच्यासहित प्रभु कोसलाधीश कुशल पाहून व त्यांची शोभा पाहून सुरराज इंद्र हर्षित होऊन स्तुती करु लागला. ॥ दो० ११२ ॥

छं० :- जय राम शोभा धाम । दायक प्रणत विश्राम ॥
धृत तूण वर शर चाप । भुजदंड प्रबल प्रताप ॥
जय दूषणारि खरारि । मर्दन निशाचर भारि ॥
हा दुष्ट वधिला नाथ । कृत देव सर्व सनाथ ॥
जय हरण धरणी भार । महिमा उदार अपार ॥
जय रावणारि कृपाल ।कृत यातुधान निकाल ॥
लंकेश सुबल सुगर्व । कृत वश्य सुर गंधर्व ॥
मुनि सिद्ध नर खग नाग । कर धुउनि पाठी लाग ॥
परवैर रत अति दुष्ट । पावे फला पापिष्ट ॥
ऐका हि दीन दयाल । राजीव नयन विशाल ॥
होता मला स्वभिमान । नहि कोणि मज किं समान ॥
बघतां अतां प्रभु पाय । अति मान दुःखद जाय ॥
कुणि ब्रह्म निर्गुण ध्याति । अव्यक्त जें श्रुति गाति ॥
प्रिय मजसि कोसलभूप । श्रीराम सगुण सरूप ॥
वैदेहि बंधु समेत । मम हृदिं करा किं निकेत ॥
मज जाणणें निज दास । दे भक्ति रमा निवास ॥

छं० :- दे भक्ति रमानिवास भीति हरण शरण सुखदायका ।
सुखधाम राम नमामि काम अनेक छवि रघुनायका ॥
सुरवृंद रंजन ! द्वंद्वभंजन मनुजतनु अतुलित बलं ।
ब्रह्मादि शंकर सेव्य राम नमामि करुणा कोमलं ॥ १ ॥
दो० :- करुनि कृपा दृष्टी अतां आज्ञा द्यावि कृपाल ॥
काय करूं प्रियवाक् श्रवुनि वदले दीन दयाल ॥ ११३ ॥

शोभेचे धाम, प्रणतांस विश्राम- दायक, भाता सुंदर धनुष्यबाण धारण केलेल्या आणि प्रबल प्रतापवान भुजदंड असलेल्या हे रामचंद्रा ! आपला जय असो. ॥ १ ॥ आपण खर आणि दूषण यांचे शत्रू व भारी निशाचरांचे मर्दन करणारे आहांत हे नाथ ! आपण हा दुष्ट मारलात व सर्व देवांना सनाथ केलेत. ॥ २ ॥ आपण धरणीचा भार हरण करणारे असून आपला महिमा अपार व उदार आहे आपला जय असो आपण कृपाल व रावणारि असून आपण राक्षसांचा निकाल लावलात आपला जय असो. ॥ ३ ॥ लंकेशाला आपल्या अति बलाचा गर्व होता, त्याने देव व गंधर्व यांना जिंकले होते आणि तो मुनी, सिद्ध, नाग, पक्षी, नर इ. सर्वांचाच हात धुवून पाठीस लागला होता. ॥ ४ ॥ रावण परद्रोह करण्यात फार तत्पर होता अति दुष्ट होता त्याचे फळ त्या पापिष्ठ्याला मिळाले. हे दीन दयाल ! विशाल राजीव नयना ! आता माझ्याविषयी सांगतो ते ऐका. ॥ ५ ॥ मला अति अभिमान होता की माझ्यासारखा दुसरा कोणी नाही पण आता प्रभुंच्या पायांच्या दर्शनाने तो दु:खदायक अति अभिमान गेला. ॥ ६ ॥ ज्याला वेद अव्यक्त म्हणतात त्या निर्गुण ब्रह्माचे कोणी ध्यान करतात, परंतु मला सगुण साकार ( सरुप ) श्रीराम कोसलभूपच प्रिय वाटतात. ॥ ७ ॥ वैदेही व बंधू लक्ष्मण यांच्यासह तुम्ही माझ्या हृदयात घर करा – रहा व मला आपला एक दास जाणून हे रमानिवास मला भक्ती द्या. ॥ ८ ॥ हे रमानिवास ! शरणागतांची भीती हरण करुन त्यास सुख देणार्‍या ! आपली भक्ती मला द्या. हे सुखधाम ! अनेक कामदेवांची शोभा असलेल्या रघुनायका रामचंद्रा ! मी आपल्याला नमस्कार करतो. हे देव समुदायांना आनंद देणार्‍या द्वंद्वांचा विनाश करणार्‍या मनुष्य देहधारी पण अतुलनीय बल असलेल्या ब्रह्मा, शिव इत्यादिकांकडून सेविल्या जाणार्‍या व करुणेने कोमल असणार्‍या रामा ! मी आपल्याला नमस्कार करतो. ॥ छंद ॥ आता माझ्यावर कृपादृष्टी करुन हे कृपाला ! मला आज्ञा द्यावी, मी काय करु ते सांगावे ही प्रियवाणी ऐकून दीनदयाळ म्हणाले. ॥ दो० ११३ ॥

श्रुणु सुरपति अमचे रिस वानर । निशिचर हत पडले रणभूवर ॥
तिहीं त्यक्त मजसाठीं प्राणां । जिववा सुज्ञ सुरेश तयानां ॥
ही प्रभुची वणी, श्रुणु खगपति ! । गूढ अती ज्ञानी मुनि जाणति ॥
त्रिभुवन जिववुं वधूं प्रभु शकती । केवळ शक्रा दिधली महती ॥
सुधा वर्षुनी कपि रिस जिववित । प्रभुपदीं आले उठुनी हर्षित ॥
सुधा वर्षली उभय दळांवर । भल्ल कपिच उठले न निशाचर ॥
त्यांचें रामाकार होइ मन । मुक्त सकल, सुटलें भवबंधन ॥
कीश रीस ते सुरांश सगळे । रघुपति इच्छे जिवंत उठले ॥
कोण राम सम दीन हितंकर । केले मुक्त असंख्य निशाचर ॥
खल मलधाम कामरत रावण । पावे गति जी मुनिवर लभत न ॥

दो० :- सुर सब गत वर्षुनि सुमन बसुनी रुचिंर विमानिं ॥
सुसमय बघुनी प्रभुनिकट येति शंभु सुज्ञानी ॥ ११४रा ॥
कर जुळुनी प्रेमें परम नलिन नयनि ये वारि ॥
पुलकित तनु गद्‌गद गिरा स्तुति करिती त्रिपुरारि ॥ ११४म ॥

सुरपति ऐका ! आमचे ऋक्ष व वानर निशाचरांनी मारलेले रणभूमीत पडले आहेत. ॥ १ ॥ त्यानी माझ्यासाठी प्राण दिले, म्हणून हे सूज्ञ सुरेशा ! त्यांना जिवंत करा. ॥ २ ॥ खगपति ऐका ! ही प्रभुची वाणी अतिगूढ आहे, ज्ञानी मुनीच ती जाणतात. ॥ ३ ॥ प्रभु त्रिभुवनाला जगवूं किंवा मारु शकतात, पण येथे केवळ इंद्राला मोठेपणा दिला. ॥ ४ ॥ अमृताचा वर्षाव करुन कपि आणि भल्ल जिवंत केले व ते हर्षाने उठून प्रभु चरणांजवळ आले. ॥ ५ ॥ सुधावृष्टी दोन्ही सैन्यावर झाली, पण जिवंत उठले भल्ल व कपीच, राक्षस सजीव झाले नाहीत. ॥ ६ ॥ कारण मरताना त्यांचे मन रामाकार झाल्याने त्यांचे भवबंधन सुटून ते सारे मुक्त झाले. ॥ ७ ॥ ते सर्व कपि, भल्ल सुरांश असल्याने रघुपतीच्या इच्छेने सजीव होऊन उठले. ॥ ८ ॥ रामाच्या सारखा दीनांचे हित करणारा कोण आहे ? त्यांनी असंख्य निशाचरांना मुक्त केले. ॥ ९ ॥ फार काय खल, पापांचे धाम सदा कामरत असणा‍र्‍या रावणाला सुद्धा जशी गति मिळाली की जी मुनीश्रेष्ठांना सुद्धा मिळत नाही. ॥ १० ॥ सर्व देव पुष्पवृष्टी करुन ( आपापल्या ) सुंदर विमानात बसून परत गेले तेव्हा उत्तम संधी पाहून सुजान शंभू प्रभुच्या जवळ आले. ॥ दो० ११४ रा ॥ त्यांनी परम प्रेमाने दोन्ही हात जोडले तोच त्यांच्या कमलनयनांत अश्रु आले, तनु रोमांचित झाली, कंठ गदगद् झाला व त्रिपुरारी स्तुती करुं लागले. ॥ दो० ११४ म ॥

मामभिरक्षय रघुकुलनायक । धृतवरचाप रुचिर करिं सायक ॥
मोह महा घन-घटा प्रभंजन । संशय विपिन अनल सुर रंजन ॥
अगुण सगुण गुणमंदिर सुंदर । भ्रम तम महा प्रताप दिवाकर ॥
काम कोप मद गज पंचानन । वसां निरंतर जनमन कानन ॥
विषय मनोरथ पुंज कंज वन । प्रबल तुषार उदाराअर मन ॥
भव वारिधिमंदर परमं दर । वारय तारय संसृति दुस्तर ॥
श्याम गात्र राजीव विलोचन । दीनबंधु प्रणतार्ति विमोचन ॥
अनुज जानकी सहित निरंतर । वसा राम नृप मम उर अंतर ॥
मुनिरंजन महिमंडल मंडन । तुलसिदास प्रभु भीति विखंडन ॥

दो० :- नाथ यदा कोसलपुरीं होइल तिलक तुम्हांस ॥
कृपासिंधु येईन मी बघुं उदार चरितास ॥ ११५ ॥

त्रिपुरारि ( शंभु ) कृत – मूळ नक्षत्र स्तुती – सुंदर हातात श्रेष्ठ धनुष्य व सुंदर बाण धारण केलेल्या रघुनायका ! माझे सर्वतोपरि रक्षण करा. ॥ १ ॥ आपण मोह व महामोहरुपी मेघ समूहांना पळवून लावणारे प्रभंजन ( सोसाट्याचा वारा ) आहांत, संशयरुपी अरण्याचे अग्नी व देवांना आनंद देणारे आहांत. ॥ २ ॥ तुम्हीच अगुण ( निर्गुण व गुणमंद्र सुंदर आहांत, आणि भ्रमरुपी महा अंधकाराला नष्ट करनारे महा प्रतापी सूर्य आहांत. ॥ ३ ॥ काम, क्रोध व मद रुपी हत्तीचा विध्वंस करणारे सिंह तुम्हीच आहांत व सेवकाच्या मनरुपी काननात निरंतर निवास करीत असता. ॥ ४ ॥ विषय मनोरथांचे समूह रुपी कमल वनाचा विनाश करणारे प्रबल हिम आपण आहांत आपण उदार असून आपली उदारता कल्पनातीत आहे व आपण मनाच्या पलीकडे आहांत. ॥ ५ ॥ भवसागराचे मंथन करण्यासाठी आपण मंदर आहात, आपण माझे परम भय निवारण करा व संसार सागराच्या पार न्या – तारा ॥ ६ ॥ हे श्याम सुंदर शरीर धारण करणार्‍या ! हे राजीव नयना ! हे दीनबंधो ! शरणागतांची दु:खे हरण करणार्‍या ! हे रामराजा ! धाकटे बंधु लक्ष्मण व जानकीसहित आपण माझ्या हृदयात निवास करा. ॥ ७-८ ॥ आपण मुनींना आनंद देणारे, पृथ्वीमंडलाचे भूषण, तुलसीदासाचे स्वामी व भिती विनाश करणारे आहात. ॥ ९ ॥ हे नाथ ! जेव्हा कोसलपुरीत तुम्हांला राज्याभिषेक होईल तेव्हा हे कृपासिंधु ! मी आपले उदार चरित्र पाहण्यास येईन. ॥ दो० ११५ ॥

करुनि विनंति शंभु जैं गेले । तैं प्रभुनिकट बिभीषण आले ॥
पदिं शिर नमुनि वदति मृदु वाणीं । श्रुणु विनती प्रभु रारंग्‌पाणी ॥
सकुल सदल वधला प्रभु रावण । त्रिभुवनिं विस्तरलें यश पावन ॥
दीन मलीन हीन मति जाती । मजवर केली विविध कृपा ती ॥
अतां दास गृह पुनीत करणें । करुनी स्नान रणश्रम हरणें ॥
बघुनि कोष मंदिर संपदा । द्यावी कृपालु कपीनां मुदा ॥
सर्वपरें मज अपला करुनी । मग कोसल पुरिं चला घेउनी ॥
ऐकत मृदु वच दीन दयाल । सजल जाहले नयन विशाल ॥

दो० :- तुझे कोषगृह ममचि सब सत्य वदे श्रुणु भाइ ॥
भरतदशा स्मरता मज निमिष कल्पसम जाइ ॥ ११६रा ॥
तापसवेष गात्र कृश सतत जपत मजला हि ॥
सखे यत्‍न कर विनवुं तुज सत्वर भेटूं त्या हि ॥ ११६म ॥
जाइन सरतां अवधि जर वीर न भेटे जीत ॥
प्रभु बंधूप्रीती स्मरत घडि घडि तनु पुलकीत ॥ ११६चं ॥
करा कल्पभर राज्य तुम्हिं मजला स्मरा मनांत ॥
मग मम धामा जाल सब संत जिथें जातात ॥ ११६द्र ॥

बसुनि पुष्पकी कपिसमेत ! निघतिं अयोध्ये कृपानिकेत – स्तुती करुन जेव्हा शंभु परत गेले तेव्हा बिभीषण प्रभूच्या जवळ आले. ॥ १ ॥ पायवर डोके ठेऊन नम्र मृदु वाणीने म्हणाला हे शारंगपाणी प्रभु ! माझी विनंती ऐकावी. ॥ २ ॥ प्रभु आपण रावणाला त्याच्या कुळासह व सैन्यासह मारलात, व पावन यश त्रिभुवनात पसरलेत. ॥ ३ ॥ मी दीन, पापी बुद्धीहीन व हीन जातीचा असून तुम्ही माझ्यावर नाना प्रकारे कृपा केलीत ती सर्वांना ज्ञात आहे. ॥ ४ ॥ हे प्रभो ! आता या दासाचे घर पुनीत करावे व स्नान करुन युद्धात झालेल्या श्रमांचा परिहार करावा. ॥ ५ ॥ खजिना, मंदिर व सर्व संपत्ती दृष्टीखाली घालून त्यातील संपत्ती वगैरे प्रसन्न चित्ताने कपींना द्यावी ॥ ६ ॥ मला आपला करुन मग मला घेऊन आपण अयोध्येस चलावे. ॥ ७ ॥ हे नम्र वचन ऐकताच दीन दयाळाचे नेत्र पाण्याने भरले (व म्हणाले की) ॥ ८ ॥ अरे बंधो ! तुझे घर, खजिना इ. सर्व माझेच आहे हे अगदी खरे, पण मी सत्य सांगतो ते ऐक भरताच्या दशेचे स्मरण होताच मला आता एक निमिष कल्पासारखे वाटत आहे. ॥ दो० ११६ रा ॥ भरत तपस्वी वेषात रहात असून, शरीर कृश झालेले आहे व निरंतर माझ्या नामाचा जप करीत आहे. म्हणून मित्रा, तुला प्रार्थना करतो की, त्याला सत्वर भेटता येईल असा काही यत्‍न उपाय करा. ॥ दो० ११६ म ॥ ठरलेली मुदत उलटून गेल्यानंतर जर मी उशीरा गेलो तर तो वीर जिवंत भेटणार नाही. भरताच्या प्रीतीचे स्मरण होताच प्रभूचे शरीर पुन:पुन्हा पुलकित होऊं लागले. ॥ दो ११६ चं ॥ तुम्ही कल्पभर राज्य करा व मनात माझे सदा स्मरण करीत रहा. मग ज्या माझ्या धामात सर्व संत जातात, तिथे तुम्ही जाल. ॥ दो० ११६ द्र ॥

श्रवत बिभीषण वच रामाचें । पद धरि हर्षिं कृपाधामाचें ॥
हर्षित सगळी कपि सेना ती । प्रभुपद धरुनि विमल गुण गाती ॥
तदा बिभीषण भवनिं परतले । मणिगणवसनीं विमान भरलें ॥
पुष्पक आणुनि पुढें ठेवलें । कृपासिंधु प्रभु हसुनि बोलले ॥
बसुनि विमानीं सखे बिभीषण नभिं जाउनि वर्षा पट भूषण ॥
जाउनि गगनिं विभीषण तत्क्षण । करत सकल मणि अंबर वर्षण ॥
जें ज्या रुचले तें ते घेती । कपि चाखुनि मणि टाकुनि देती ॥
हसति राम सीता सह लक्ष्मण । परम कौतुकी कृपानिकेतन ॥

दो० :- ध्यानिं न पावति मुनि जया नेति वानिति वेद ॥
तेच कृपानिधि कपिंसवें करिति अनेक विनोद ॥ ११७रा ॥
उमे ! योग जप दान तप मख नाना व्रत नेम ॥
राम कृपा ना करिति जशि निर्मळ करतां प्रेम ॥ ११७म ॥

रामचंद्रांचे वचन ऐकताच बिभीषणाने हर्षाने कृपाधामाचे पाय धरले. ॥ १ ॥ ती सगळी कपिसेना हर्षीत झाली त्यांनीही प्रभूचे पाय धरले व सारे प्रभूंचे विमल गुण गावूं लागले. ॥ २ ॥ तेव्हा बिभीषण घरी परत गेला आणि रत्‍नभूषणे, वस्त्रे यांनी विमान भरले. ॥ ३ ॥ ते पुष्पक विमान त्याने प्रभूंना समर्पण केले तेव्हा कृपासिंधु हसून म्हणाले. ॥ ४ ॥ मित्रा, बिभीषणा ! विमानात बसून आकाशात जाऊन वस्त्रे, भूषणे इ. चा वर्षाव करा. ॥ ५ ॥ तत्क्षणीं आकाशात जाऊन बिभीषणाने सर्व मणी वस्त्र भूषणे इत्यादिंची वृष्टी केली. ॥ ६ ॥ जे ज्यांना आवडले ते ते घेऊं लागले कपी मणि, रत्‍ने तोंडात घालून चाखून टाकून देऊं लागले. ॥ ७ ॥ हे पाहून राम, सीता व लक्ष्मण यांना हसू लोटले असे राम परम कौतुकी = विनोदी व कृपेचे धामही आहेत. ॥ ८ ॥ मुनी ज्यांची प्राप्ती ध्यानात सुद्धा करु शकत नाहीत, वेदही ज्यांचे नेति नेति म्हणून वर्णन करतात, तेच कृपासागर कपींच्या बरोबर अनेक विनोद करीत आहेत. ॥ दो० ११७ रा ॥ उमे! योग, जप, दान तप, नाना यज्ञयाग-व्रते व नेम केल्याने राम तशी कृपा करीत नाहीत जशी निर्मळ प्रेम केल्याने करतात ॥ दो ११७ म ॥

भल्लुक कपि पट भूषण घेती । घालुनि रघुपतिपाशीं येती ॥
नानाविध बघुनी त्या कीशां । लोटे हंसें कोसलधीशां ॥
करुनि दया निरखुनि समुदाया । वदले मृदुल वचन रघुराया ॥
तुमच्या बळें मारिला रावण । राज्यीं स्थापित सखा बिभीषण ॥
आतां निज निज गृहिं तुम्हिं जावें । स्मरा मजसि कोणा ना भ्यावें ॥
ऐकुनि हें प्रेमाकुल वानर । पाणी जोडुनि वदले सादर ॥
प्रभु जें बोलां तुम्हा शोभतें । ऐकुनि अमचें चित्त मोहतें ॥
दीन गणुनि कृत सनाथ कपिगण । त्रिलोकेश रघुनाथा ! आपण ॥
प्रभुवच ऐकुनि लाजे मरुं हरि । मशक करिति खगपति हित कधितरिं ? ॥
बघुनि रामरुचि कीश भल्लुक हि । प्रेममग्न गृहकांक्षा त्यां नहिं ॥

दो० :- प्रभु आज्ञें कपि भल्ल हृदिं रामरूप राखून ॥
हर्ष खेद युत चालले विविधविधा विनवून ॥ ११८रा ॥
कपिपति नील ऋक्षपति अंगद नल हनुमान ॥
सहित बिभीषण अपर जे यूथप कपि बलवान ॥ ११८म ॥
वदुं न शकति मुळि, प्रेमवश लोचनिं भरुनी नीर ॥
बघति राम मुख निरखुनी निर्निमेष कपिवीर ॥ ११८चंद्र ॥

भल्ल व कपी वस्त्रभूषणे घेऊन अंगावर घालून ( एका मागून एक ) रघुपतीपाशी येऊं लागले. ॥ १ ॥ नाना प्रकारच्या भल्ल कपींना पाहून कोसलाधीशांना हसे लोटले. ॥ २ ॥ त्या सर्व कपिभल्ल समुदायाकडे पाहून त्यांच्यावर दया केली आणि रघुराया रामचंद्र मृदुवाणीने म्हणाले की, ॥ ३ ॥ तुमच्या बळावर रावण मारला व सखा बिभीषणाला राज्यावर बसविला. ॥ ४ ॥ आता तुम्ही सर्व आपापल्या घरी जा बरं ! माझे नेहमी स्मरण करा आणि कोणाला व कशालाही भिऊं नका. ॥ ५ ॥ हे ऐकताच वानर प्रेमाने व्याकुळ झाले पण हात जोडून आदराने म्हणाले की, ॥ ६ ॥ हे प्रभो ! तुम्ही जे काही बोलता, बोलाल ते तुम्हांला शोभते, पण तुमचे भाषण ऐकून आमच्या हृदयात मोह उत्पन्न होतो. ॥ ७ ॥ हे रघुनाथा ! तुम्ही त्रैलोक्याचे ईश आहात व दीन जाणून आम्हा कपी समूहांना सनाथ कृतार्थ केलेत. ॥ ८ ॥ हे हरी ! आपले वचन ऐकून आम्ही लाजेने मरत आहोत, कारण मशक कधी तरी गरुडाचे हित करु शकतील काय ? (कधीच नाही). ॥ ९ ॥ रामचंद्रांची इच्छा जाणून कपि आणि भल्ल प्रेममग्न झाले त्यांना घरी जाण्याची इच्छा मुळीच नाही. (परंतु ) ॥ १० ॥ रामचंद्रांच्या आज्ञेने ते ( बहुतेक सर्व ) भल्ल व कपि रामरुप हृदयात राखुन, विविध प्रकारे प्रार्थना विनंती करुन हर्ष खेद युक्त होऊन चालू लागले. ॥ दो० ११८ रा ॥ कपीपती सुग्रीव, नील, ऋक्षपती जांबवान, अंगद, नल, हनुमान आणि बिभीषण आणि त्यांच्या पेक्षा खालच्या दर्जाचे जे बलवान यूथपती आहेत. ॥ दो० ११८ म ॥ ते काही सांगू शकत नाहीत, पण प्रेमवश होऊन डोळे अश्रूंनी भरुन डोळ्यांच्या पापण्या न हालविता ते सर्व कपीवीर राममुखाकडे (दीन मुद्रेने) निरखून पहात राहीले. ॥ दो० ११८ च ॥

प्रीति अती रघुराजा पाहुनि । सकलां घेति विमानीं बसवुनि ॥
मनीं विप्रचरणीं शिर नमिलें । उत्तर दिशे विमान निघाले ॥
निघतां विमान गलका भारी । जय रघुवीर वदति जय सारीं ॥
सिंहासन अति उच्च मनोहर । श्री समेत वसलेले प्रभु वर ॥
राजति राम सहित भामिनी । मेरु शृंगिं जणुं घन दामिनी ॥
चाले रुचिर विमान सुसत्वर । हर्षित वर्षति सुमनें सुरवर ॥
त्रिविधा पवन परम सुखकारी । सागर सर सरि निर्मल वारी ॥
शकुन होति सर्वत्रहि सुंदर । सुप्रसन्न मन विमल दिगंबर ॥
रघुविर वदले सीते ! बघ रण । इंद्रजिता वधि इथेंच लक्ष्मण ॥
हनुमान् अंगद यांच्या मारें । पडले बघ रणिं निशिचर भारे ॥
कुंभकर्ण रावण दो भाई । येहें हत सुरमुनि दुखदाई ॥

दो० :- इथें बद्ध सेतू पहा स्थापित शिव सुखधाम ॥
सीतेसहित कृपाब्धिनें कृत शंभुला प्रणाम ॥ ११९रा ॥
कृपाब्धिनें वनिं जिथं जिथें कृत वस्ती विश्राम ॥
सकल दाविलीं जानकिस सांगुनि तें तें नाम ॥ ११९म ॥

सुग्रीवादि त्या सर्वांची अतिशय प्रीती पाहून रघुराजांनी सर्वांना विमानात बसवून घेतले. ॥ १ ॥ मनोमन विप्र चरणांस नमस्कार केला व विमान उत्तर दिशेला निघाले. ॥ २ ॥ विमान निघताना फारच मोठा गलका ( कोलाहल ) झाला कारण की सगळीच मंडळी “जय जय रघुवीर” असे ( मोठ्याने ) म्हणाली. ॥ ३ ॥ विमानात अति उंच व मनोहर सिंहासन असून सीते सहित प्रभु त्यावर बसलेले आहेत. ॥ ४ ॥ सीतेसहित रामचंद्र असे विराजत आहेत की जणू मेरु पर्वत शिखरावर सौदामिनी सहित मेघच. ॥ ५ ॥ ते सुंदर विमान अति त्वरेने चालू लागले तेव्हा सुरवरांनी हर्षित होऊन पुष्पवृष्टी केली. ॥ ६ ॥ शीतल मंद सुगंधी असा त्रिविध वारा परम सुखदायक वाहू लागला सागर, सरोवरे व सरिता यांचे जल निर्मल झाले. ॥ ७ ॥ सर्वत्र शुभ शकुन होऊं लागले सर्वांचे मन सुप्रसन्न झाले व दिशा व आकाश निर्मल दिसूं लागली. ॥ ८ ॥ रघुवीर म्हणाले सीते ! हे रणांगण पहा, तेथेच लक्ष्मणाने इंद्रजिताचा वध केला बरं का ! ॥ ९ ॥ हे पहा हनुमान आणि अंगद यांच्या माराने राक्षसांचे भारेच्या भारे मरुन पडले आहेत. ॥ १० ॥ आणि हे पहा ठिकाण, सुरमुनींना दु:ख देणारे दोघे भाऊ कुंभकर्ण व रावण इथे मारले गेले. ॥ ११ ॥ इथे सेतू बांधला गेला व इथे सुखधाम शिवाची स्थापना केली गेली, असे सांगून कृपासिंधुने सीतेसह शंभूला प्रणाम केला ॥ दो० ११९ रा ॥ कृपासागराने ( लंकेत येताना ) जेथे जेथे वनात वस्ती व विश्राम केला होता ती सर्व स्थाने जानकीला दाखविली व त्या त्या स्थानांची नांवे सांगीतली ॥ दो० ११९ म ॥

येइ तिथें मग विमान सत्वर । दंडक वन जेथें अति सुंदर ॥
कुंभाजादि मुनिनायक नाना । जाति राम सकलांचे स्थानां ॥
आशीर्वाद सकल मुनि देती । चित्रकुटिं जगदीश्वर येती ॥
सकल मुनींना तिथें तोषवुनि । तडक निघालें विमान तेथुनि ॥
रामजानकिस पुढें दाखवित । यमुना कलिमल हरणि सुशोभित ॥
दिसत पुढें सुरनदी पुनीता । म्हणति राम कर नमना सीता ! ॥
पहा प्रयागा तीर्थ पतीतें । निरखत जन्म कोटि अघ जातें ॥
परम पुनीता पहा त्रिवेणी । शोक हरणि हरिपदनिःश्रेणी ॥
पुरी अयोध्या बघ अति पावनि । त्रिविधताप भवरोग विनाशनि ॥

दो० :- करिति अयोध्ये कृपानिधि सहजानकी प्रणाम ॥
सजल नयन तनु पुलकिता घडिं घडिं हर्षित राम ॥ १२०रा ॥
प्रभु परतुनी त्रिवेणीं हर्षित केलें स्नान ॥
कपींसहित विप्रां बहु दिलें विविधविध दान ॥ १२०म ॥

मग जिथे अति सुंदर दंडकारण्य होते तेथे विमान अगदी त्वरेने आले. ॥ १ ॥ अगस्ती आदि जे मुनिश्रेष्ठ होते त्या सर्वांच्या आश्रमात राम गेले. ॥ २ ॥ त्या सर्व मुनींनी आशीर्वाद दिले आणि मग जगदीश्वर चित्रकूटला आले. ॥ ३ ॥ तेथे अत्रि आदि सर्व ऋषी-मुनींना संतुष्ट करुन तेथून विमान तडक निघाले. ॥ ४ ॥ पुढे रामचंद्रांनी कलिमल हरण करणारी सुशोभित यमुना नदी सीतेला दाखविली. ॥ ५ ॥ मग पुढे पुनीत देवनदी गंगा दिसली तेव्हा राम सीतेला म्हणाले सीते ! गंगेला प्रणाम कर. ॥ ६ ॥ सीते ! हा तीर्थराज प्रयाग पहा याच्या नुसत्या दर्शनाने कोटी जन्मातील कोट्यावधी पापे नष्ट होतात. ॥ ७ ॥ आता ही पहा परम पावन त्रिवेणी, ही शोक हरण करणारी व हरिपदास नेणारी शिडी ( नि:श्रेणी ) आहे. ॥ ८ ॥ ती पहा त्रिविधताप हरण करणारी व भवरोग विनाश करणारी अति पावन अयोध्या पुरी. ॥ ९ ॥ कृपालु रामचंद्रांनी सीतेसह अयोध्येला प्रणाम केला. तेव्हा राम हर्षित होऊन त्यांचे नेत्र अश्रूंनी भरले व शरीर वारंवार रोमांचित होऊं लागले. ॥ १२० रा ॥ मग प्रभु त्रिवेणीला परत आले व हर्षाने त्रिवेणी स्नान केले आणि कपींनी व प्रभूंनी पुष्कळ ब्राह्मणांना नाना प्रकारचे दान दिले. ॥ दो० १२० म ॥

प्रभु हनुमंता वदति समजाउनि । अयोध्येंत बटुरुपें जाउनि ॥
भरता अमचें कुशल वदावें । समाचार घेउनि तुम्हिं यावें ॥
शीघ्र पवनसुत जाते झाले । प्रभू भरद्वाजाश्रमिं आले ॥
मुनिं नानापरिं पूजन करुनी । देती आशीर्वादां स्तवुनी ॥
जोडुनि कर युग मुनिपदिं नमुनी । परत निघति प्रभु विमानिं बसुनी ॥
इथें श्रवत गुह कीं प्रभु आले । नाव, नाव कुठं ? लोक जमविले ॥
यान येत तों सुरसरि लंघुनि । तटिं उतरे प्रभु आज्ञा पावुनि ॥
तैं सीता पूजी सुरनदी । बहुपरिं करि वंदन मग पदीं ॥
गंगा दे आशीस मुदित मन । सुंदरि तव सौभाग्या भंग न ॥
ऐकुनि गुह धावे प्रेमाकुल । आला निकट परम सुख संकुल ॥
प्रभुस विलोकुनि सह वैदेही । पडे अवनिं तनुभान नुरे ही ॥
प्रीति परम रघुराजा पाहुनि । हृदयीं धरिला हर्षे उठवुनि ॥

छं० :- निज हृदयिं धरिति कृपानिधान सुजाणराय रमापती ।
बसवून परम समीप पुसलें कुशल; करि तो सुविनती ॥
कीं कुशल पद पंकज बघून विरंचि शंकर सेव्य जे ।
सुखधाम पूरित काम राम नमामि राम नमामि ते ॥ १ ॥
सबरीति अधम निषाद त्या हरि भरत सम हृदयीं धरी ।
मति मंद तुलसीदास तो प्रभु मोहवश विसरे तरी ॥
हे रावणारि चरित्र पावन रामपदरति दे सदा ।
कामादिहर विज्ञानकर सुरसिद्धमुनि गाती मुदा ॥ २ ॥
दो० :- जे रघुवीर समर जय चरिता श्रवति सुजाण ॥
विजय विवेक विभूति त्यां नित्य देति भगवान ॥ १२१रा ॥
हा कलिकाल मलायतन मन ! बघ करुनि विचार ॥
श्री रघुनाथ नामविण नाहिं अन्य आधार ॥ १२१म ॥
इति श्रीमद् रामचरितमानसे सकल कलि कलुष विध्वंसने
षष्ठः सोपानः
लंकाकाण्डं समाप्तम्
॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

प्रभुंनी हनुमंतास समजावून सांगीतले की तुम्ही बटुरूप घेऊन अयोध्येत जा. ॥ १ ॥ भरताला आमचे ( तिघांचे ) कुशल सांगा व त्यांच्या कडील कुशल समाचार घेऊन तुम्ही लवकर परत या. ॥ २ ॥ लगेच पवनसुत शीघ्र गतीने निघाला व प्रभु ( सर्व कपी मंडळींसह विमानाने ) भरद्वाज मुनींच्या आश्रमात आले. ॥ ३ ॥ मुनीनी नाना प्रकारे पूजा, स्तुती करुन मग आशीर्वाद दिले ॥ ४ ॥ मुनीचरणांना वंदन करुन व दोन्ही हात जोडून ( निरोप घेऊन ) प्रभु विमानात बसून परत निघाले. ॥ ५ ॥ इकडे निषादराज गुहाने ऐकले की प्रभु आले तेव्हा अरे नाव कुठे आहे ? नाव कुठे आहे ? असे म्हणत लोक जमविले. ॥ ६ ॥ ( निषादराज नाव नाव करुन धांदल करीत आहे ) तोच विमान गंगा ओलाडून आले सुद्धा व प्रभुच्या आज्ञेने ते तीरावर उतरले. ॥ ७ ॥ मग सीतेने नाना परींनी गंगेची पूजा केली व तिच्या पायांना वंदन केले. ॥ ८ ॥ गंगेने प्रसन्न मनाने आशीर्वाद दिला की हे सुंदरी ! तुझे सौभाग्य अभंग – अखंड राहील. ॥ ९ ॥ ( इतक्यात गुहाने ऐकले की प्रभु गंगेच्या या तीरावर आले आहेत ) हे ऐकताच गुह प्रेमाकुळ होऊन धावला, व परम सुखाने भरलेला ( असा परिपूर्ण ) प्रभूच्या जवळ आला. ॥ १० ॥ वैदेही सहित प्रभूला पाहताच तो भूमीवर पडला व त्याला देहभान राहीले नाही. ॥ ११ ॥ त्याची परम प्रीती पाहून रघुराजाने त्याला उठवून हृदयाशी धरला. ॥ १२ ॥ सुजाणांचे शिरोमणी सीतापती कृपानिधान श्रीरामचंद्रानी त्याला हृदयाशी धरला व अत्यंत जवळ बसवून त्याला कुशल विचारले तेव्हा त्याने सुंदर विनंती केली की, ज्या चरण कमलांची सेवा ब्रह्मदेव व शंकर करतात त्या आपल्या चरणकमलांच्या दर्शनाने कुशल आहे. हे सुखधाम ! हे पूर्णकाम ! राम मी नमस्कार करतो, राम मी तुम्हाला नमस्कार करतो. ॥ छं १ ॥ सर्व प्रकारे नीच असलेल्या निषादाला श्रीहरीने भरतासारखा हृदयाशी धरला ! तरीही मतिमंद तुलसीदास मोहवश होऊन त्या प्रभूला विसरला ! हे रावणारिचे पावन करणारे पावन चरित्र सदा रामचरणी परम प्रीती देणारे आहे. हे कामादि विकारांचा विनाश करणारे व विज्ञान ( अन्वय ज्ञान ) उत्पन्न करणारे आहे सुर सिद्ध व मुनी यांचे आनंदाने गान करीत असतात. ॥ छं २ ॥ रघुवीराच्या युद्धातील जयाचे – विजयाचे हे चरित्र जे सुजाण श्रवण करतील त्यांना भगवान नित्य विजय, नित्य विवेक व नित्य विभूती ( ऐश्वर्य ) देतील. ॥ दो १२१ रा ॥ हे मना ! तू विचार करुन पहा की हा कलिकाल पापांचे निवासस्थान आहे म्हणून श्रीरघुनाथाच्या नामाशिवाय दुसरा आधार नाही. ॥ दो० १२१ म ॥

इति श्रीमद्‌रामचरित मानसे सकलकलिकलुष विध्वंसने षष्ठ: सोपान:
लंकाकाण्डं समाप्तं
श्रीरघुवीरचरणांबुजयो: समर्पितास्तु !

* * * * *

श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु

GO TOP