॥ श्रीरामचरितमानस ॥

(मराठी अनुवाद)

॥ बालकाण्ड ॥

अध्याय १५ वा

॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥


Download mp3

श्रुणु गिरिजे हरिचरित मनोरम । विपुल विशद गाती निगमागम ॥
हरिअवतारा हेतु कोणते । इदमित्थं वदले न जात ते ॥
राम अतर्क्य बुद्धिमनवाणीं । मत अमचें हें ऐक शहाणी ॥
तदपि संत मुनि वेद पुराणें । वदति कांहिं जें मतिअनुमानें ॥
सुमुखि सांगतो तुजला तैसें । कारण मजहि समजलें जैसें ॥
जैं जैं येते धर्मा ग्लानी । माजति असुर अधम‍अभिमानी ॥
करिति अनीति, न वदले जाई । सीदति विप्र धरा सुर गाई ॥
तैं तैं प्रभु वपु विविधा धरती । सज्जनपीडा कृपाब्धि हरती ॥

दो. :- स्थापि सुरां असुरां वधुनि निज राखी श्रुति सेतु ॥
जगिं विस्तारिति विशद यश रामजन्मिं हा हेतु ॥ १२१ ॥

गिरीजे ! ऐक हरीची चरित्रे पुष्कळ उज्वल व सुंदर आहेत व ती वेद पुराणे गातात.॥ १ ॥ हरि-अवताराचे हेतू कोणते हे, हाच अमूक हेतू असे निश्चित सांगता येत नाही ॥ २ ॥ तू शहाणी आहेस म्हणून सांगतो ते ऐक, राम बुद्धीने, मनाने व वाणीने अतर्क्य आहेत असे आमचे मत आहे ॥ ३ ॥ ( हरि – अवतार हेतू अतर्क्य असला ) तरी संत मुनी वेद व पुराणे आपापल्या बुद्धी बलानुसार अनुमानाने जे काही ( कारण ) सांगतात ॥ ४ ॥ ते हे सुमुखी तुला सांगतो; त्याच प्रमाणे मला जे काही कारण समजले आहे ते सुद्धा सांगतो ॥ ५ ॥ ज्या ज्या वेळी धर्माची हानी होते ( धर्म क्षीण होतो ) नीच देहाभिमानी असुर उन्मत्त होतात ( माजतात ) ॥ ६ ॥ व ते इतकी अनीती करतात की तिचे वर्णन करणे सुद्धा अशक्य ( व त्यामुळे ) विप्र, गाई, पृथ्वी व देव अगदी त्रस्त, पीडित होतात. ॥ ७ ॥ तेव्हा तेव्हा कृपासागर प्रभू विविध देह धारण करून सज्जनांची पीडा हरण करतात. ॥ ८ ॥ असुरांचा वध करुन देवांची – सुरांची पुन्हा स्थापना करतात व आपल्या वेद - मर्यादेचे रक्षण करतात व जगात आपले उज्वल यश पसरतात हा रामांनी जन्म घेण्यात हेतू असतो. ॥ दो ० १२१ ॥

तें यश गाति भक्त भव तरती । भक्तहिंता तनु कृपाब्धि धरती ॥
हेतु रामजन्मास अनेक हि । एकाहुनि अति विचित्र एकहि ॥
एक दोन जन्मां मीं वानीं । श्रुणु सावध तूं सुमति भवानी ॥
द्वारपाल हरिचे प्रिय दोघे । जय नि विजय जाणती अवघे ॥
विप्रशापवश दोघे भ्राते । धरिति असुर तामस देहा ते ॥
कनककशिपु नी हाटकलोचन । जगविश्रुत सुरपतिमदमोचन ॥
रणविजयी विख्यात वीर; परि । एका वराहवपुधर वधि हरि ॥
दुसर्‍या मारी बनुनी नरहरी । प्रल्हादाचें सुयशा पसरी ॥

दो. :- होति वीर बलवन्त अति धरुनि असुरदेहास ॥
कुंभकर्ण रावण सुभट सुरजयि विदित जगास ॥ १२२ ॥

ज्या यशाचे गान करुन भक्त भवसागर तरुन जातात, म्हणून कृपासिंधू भक्तांच्या हितासाठीच देह धारण करतात ( असे माझे मत आहे ) ॥ १ ॥ रामजन्माला अनेक हेतू आहेत व ते एकाहून एक अतिविचित्र आहेत. ॥ २ ॥ एक दोन जन्मांचे हेतू मी विस्तारपूर्वक सांगतो. भवानी ! तू सुमति आहेस तरी ध्यान देऊन श्रवण कर ॥ ३॥ हरीचे ( विष्णूचे ) दोन प्रिय व्दारपाल जय आणि विजय हे सर्वांना माहित आहेत. ॥ ४ ॥ विप्रशापबळाने ते दोघे भाऊ तामस असुर देह धारण करते झाले ॥ ५ ॥ तेच हिरण्यकशिपु व हिरण्याक्ष इंद्राचा गर्व हरण करणारे असे जगात प्रख्यात झाले. ॥ ६ ॥ ते दोघेही रणात विजयी व प्रख्यात वीर झाले तरी सुद्धा हरीने वराहरूप घेऊन हिरण्याक्षाचा वध केला. ॥ ७ ॥ नरसिंह बनून दुसर्‍याला मारला व भक्त प्रल्हादाचे सुयश जगात पसरले. ॥ ८ ॥ त्या दोघांनी असुर देह धारण केला व ते अति बलवान वीर कुंभकर्ण व रावण देवांना जिंकणारे सुभट झाले हे सर्व जगाला माहीत आहे. ॥ दो० १२२ ॥

मुक्त न झाले हत भगवानें । जन्म तीन कीं द्विजवचनानें ॥
एके वेळीं हरि त्यां लागी । धरिति शरीर भक्त‍अनुरागी ॥
कश्यप अदिति तदा पितृमाता । दशरथ कौसल्या विख्याता ॥
एक कल्पिं अवतार असा धरि । संसारीं पावन चरिता करि ॥
एक कल्पिं सुर दुःखी दिसतां । सकल जलंधर-समरीं हरतां ॥
त्यासि शंभु करिती रण पार न । दनुज महाबल मारुन मरत न ॥
परम सती असुराधिपनारी । तिच्या बळें त्रिपुरारिस भारी ॥

दो. :- भंगुनि कपटें व्रत तिचें प्रभु करि सुरकार्यास ॥
मर्म तिनें जैं जाणलें दे कोपें शापास ॥ १२३ ॥

भगवंतानी त्यांस मारले तरी ते मुक्त झाले नाहीत कारण की द्विजांच्या ( सनकादिक ) वचनाप्रमाणे त्यांना तीन जन्म घ्यावेच लागणार ॥ १ ॥ त्यांच्यासाठी एकदा भक्तावर प्रेम करणार्‍या हरीने ( विष्णूने ) ( नर ) शरीर धारण केले ( रामावतार ) ॥ २ ॥ त्यावेळी ( त्या अवतारात ) कश्यप व अदिती पिता व माता बनून दशरथ कौसल्या नावांनी विख्यात झाले. ॥ ३ ॥ या प्रमाणे एका कल्पात रामावतार घेऊन या जगात पावन चरित्र निर्माण करून ठेवले. ॥ ४ ॥ एका कल्पामध्ये जालंधराशी युद्ध करून सगळे देव हरले व दु:खी झाले ॥ ५ ॥ हे पाहून शंभूंनी अपार युद्ध केले; पण तो महाबलवान दनुज मारता मरेना ॥ ६ ॥ त्या असुराधिपाची स्त्री परम सती होती, तिच्या बलाने तो त्रिपुरारींना ( सुद्धा ) भारी झाला ॥ ७ ॥ कपटाने तिचे पातिव्रत्य भंग करुन प्रभुंनी सुरकार्य केले, तिने जेव्हा मर्म जाणले तेव्हा कोपाने प्रभूला ( शेषशायी – नारायणास ) शाप दिला ॥ दो० १२३ ॥

हरि तच्छापा प्रमाण मानी । भगवान् कृपालु कौतुकखाणी ॥
जलंधरें रावणवपु धरिलें । रामें रणिं हत परमपद दिलें ॥
जन्मा एका हेतु असे हा । ज्यास्तव रामें धृत नरदेहा ॥
प्रभुच्या प्रतिअवतार कथांनां । श्रुणु मुनि कविनीं वर्णित नाना ॥
शापिति नारद एके वारां । एक कल्प घे तरि अवतारा ॥
चकितचि गिरिजा ऐकुनि वाणि । विष्णुभक्त नारद तों ज्ञानी ॥
कारण काय किं मुनीश शापति । काय करी अपराध रमापति ॥
हा प्रसंग मज वदा पुरारी । मुनि मनिं मोह! आश्चर्य भारी ॥

दो. :- वदले हसुनि महेश तैं कोणि मूढ ना ज्ञानि ॥
रघुपति करि जैं ज्या जसा होइ तसा तैं प्राणि ॥ १२४ रा ॥
सो. :- वदूं रामगुणगाथ भरद्वाज आदरें श्रुणु ॥
भवभंजन रघुनाथ भज तुलसी त्यज मान मद ॥ १२४ म ॥

हरींनी शाप प्रमाण मानला ( कारण ) ते कृपालु, षड्गुणैश्वर्य संपन्न ( भगवान ) व कौतुकांची खाण आहेत. ॥ १ ॥ मग जलंधराने रावण देह धारण केला व रामानी त्याचा वध करुन त्याला परमपद ( निर्वाण – मोक्ष ) दिले. ॥ २ ॥ ज्या कारणास्तव रामांनी नरदेह धारण केला त्यात एका जन्माचा हेतू आहे. ॥ ३ ॥ ( याज्ञवल्क्यच म्हणतात ) मुनी ! ऐका ! प्रभूच्या प्रत्येक अवताराच्या अनेक कथांचे वर्णन कवींनी केले आहे. ॥ ४ ॥ एकदा नारदांनी शाप दिला व त्यामुळे एका कल्पात ( राम ) अवतार घेतला. ॥ ५ ॥ ( याज्ञ म्हणाले की शंकरांचे ) ते भाषण ऐकून गिरीजा अगदी चकितच झाली ( की ) नारद तर विष्णूभक्त व ज्ञानी ( आणि हे कसे घडले ? तेव्हा तिने विचारले की - ) ॥ ६ ॥ मुनीश नारदांनी शाप काय म्हणून दिला ? रमापतीने असा अपराध तरी काय केला? ॥ ७ ॥ हा सगळा प्रसंग, हे त्रिपुरारी ! मला सांगावा. मुनींच्या मनांत मोह झाला हे आश्चर्यच आहे ! ॥ ८ ॥ तेव्हा महेश हसून म्हणाले की कोणी मूढ नाही व कोणी ज्ञानी नाही, ज्यावेळी ज्याला रघुपती जसा करतात त्यावेळी तो प्राणी तसा होतो ॥ दो० १२४ रा ॥ ( याज्ञवल्क्य म्हणाले ) भरद्वाजा ! मी आता रामगुणगाथा सांगतो ती आदराने श्रवण करा तुलसीदास म्हणतात ( बा ! मना ! ) मान मद सोड व भवभंजन करणार्‍या रघुनाथाचे भजन कर ( त्यांचा आश्रय करून त्यांना शरण जा ) ॥ दो० १२४ म ॥

* * * * *

श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु

GO TOP