|
॥ श्रीरामचरितमानस ॥ (मराठी अनुवाद) ॥ लंकाकाण्ड ॥ ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥ अध्याय १२ वा Download mp3 बघत पतिशिरें मंदोदरी । मूर्छित विकल पडे भूवरी ॥ छं० :- गणिला मनुज सम दनुजकाननदहन पावक हरि च जो । मंदोदरी विलाप - पतीची शिरे बघताच मंदोदरी व्याकुळ होऊन धरणीवर पडली. ॥ १ ॥ इतर स्त्रिया रडत आक्रोश करीतच तेथे आल्या व तिला उठवून ( शुद्धीवर आणून ) रावण जिथे पडला होता तेथे आल्या. ॥ २ ॥ पतीची ती दशा पाहून, त्या रडत विलाप करु लागल्या; त्यांचे केस सुटले व त्या देहभान विसरल्या. ॥ ३ ॥ मग त्या अनेक प्रकारांनी छाती बडवून घेवूं लागल्या व रडत रडत रावणाचा प्रताप वर्णन करु लागल्या. ॥ ४ ॥ हे नाथ ! तुमच्या बळाने पृथ्वी नेहमी डोलत होती व ( तुमच्या पुढे ) सूर्य-चंद्र, अग्नि हे निस्तेज झाले होते. ॥ ५ ॥ तुमचा भार शेष व कूर्म सुद्धा सहन करु शकले नाहीत आणि आता तेच शरीर मातीत पडले आहे. ॥ ६ ॥ वरुण, कुबेर, इंद्र, वायू, इ. कोणी तुमच्या समोर युद्धात धीर धरु शकले नाहीत. ॥ ७ ॥ स्वामी ! तुम्ही आपल्या भुजबळाने काळ व यम यांना सुद्धा जिंकलेत, पण तेच तुम्ही आज इथे अनाथासारखे पडले आहात. ॥ ८ ॥ तुमची प्रभुता सगळ्या जगात प्रख्यात होती आणि पुत्र परिवाराचे बळ सुद्धा कोणी वर्णन करणे शक्य नव्हते. ॥ ९ ॥ असे असता तुम्ही रामविरोधी झाल्यामुळे तुमचे हे असे हाल झाले व तुमच्यामागे तुमच्यासाठी रडायला सुद्धा कोणी ( पुरुष ) तुमच्या कुळात राहीला नाही. ॥ १० ॥ हे नाथ ! ब्रह्मदेवाने निर्माण केलेले सर्व तुम्हांला वश होते दिक्पाल तर भयभीत होऊन रोज तुम्हांला नमन करीत होते. ॥ ११ ॥ पण आता तुमची शिरे व बाहू कोल्हे कुत्रे इ. खात आहेत रामविमुख झालात त्यामुळे असे होणे अनुचित नाही (योग्यच आहे) ॥ १२ ॥ पती ! तुम्ही काळाला विशेष वश झाल्यामुळे माझे म्हणणे ऐकले नाहीत आणि जो चराचराचा नाथ आहे त्याला तुम्ही मनुष्य समजलांत. ॥ १३ ॥ निशाचरांच्या अरण्याला जाळून टाकणारा पावक असा जो हरी त्यालाच तुम्ही मनुष्य समजलांत ज्याला शंकर ब्रह्मदेव व सर्व सुर नमस्कार करतात, त्याला हे प्रिया ! तो करुणासागर असून तुम्ही भजला नाहीत तुमचा हा देह जन्मापासूनच पाप प्रवाहमय असून तुम्ही सदा परद्रोहरत होतात तरी तुम्हाला सुद्धा त्याने निजधाम दिले. अशा त्या रामाला ब्रह्माला जो निरामय आहे त्याला मी नमस्कार करते. ॥ छंद ॥ अहह ! नाथ ! रघुनाथासारखा कृपासिंधु दुसरा कोणी नाही. कारण योगी वृंदांना सुद्धा दुर्लभ असणारी गति त्या भगवंताने तुला दिली. ॥ दो० १०४ ॥ मंदोदरी वचन आकर्णित । सुर मुनि सकल सिद्ध सुख मानित ॥ दो० :- मंदोदरी आदि सब देति तिलांजलि त्यास ॥ मंदोदरीचे शब्द कानी पडताच सगळे सुर, मुनी व सगळे सिद्ध यांना सुख झाले. ॥ १ ॥ ब्रह्मदेव, महेश, नारद व सनकादिक जे चांगले परमार्थवादी मुनीश्रेष्ठ होते. ॥ २ ॥ ते डोळे भरुन रघुपतीला न्याहाळून पाहू लागले व प्रेम मग्न होऊन सगळे सुखी झाले. ॥ ३ ॥ त्या सर्व रावण स्त्रिया रडत आहेत असे पाहून बिभीषण त्यांच्याजवळ गेला व फार दु:खी झाला. ॥ ४ ॥ भावाची दशा पाहून बिभिषण दु:ख करुं लागला; तेव्हा प्रभूंनी अनुजाला आज्ञा दिली. ॥ ५ ॥ त्याप्रमाणे लक्ष्मणाने नानापरींनी बिभीषणाचे सांत्वन केले, तेव्हा बिभीषण प्रभूंकडे आला. ॥ ६ ॥ कृपादृष्टिने बिभीषणाकडे पाहून प्रभू म्हणाले की शोक सोडून क्रिया करा. ॥ ७ ॥ प्रभूची आज्ञा मानून, देशकालांचा विचार करुन बिभीषणाने रावणाची दाहक्रिया यथाविधी केली. ॥ ८ ॥ मंदोदरी प्रमुख सर्व स्त्रियांनी त्याला तिलांजली दिली आणि रघुपतीच्या गुण समूहाचे मनात वर्णन करीत त्या घरी गेल्या. ॥ दो० १०५ ॥ येइ बिभीषण नमीं पदाब्जां । कृपासिंधु बोलाविति अनुजा ॥ छं० :- केले सुखी त्यां वाक्सुधें तुमचे बळें रिपु मारले ॥ भूप-बिभीषण – बिभीषण ( क्रिया करुन ) आला व त्याने प्रभुच्या चरण कमलांस नमन केले. मग कृपासिंधु प्रभूंनी अनुजाला बोलावले. ॥ १ ॥ ( व म्हणाले ) तुम्ही, कपीश सुग्रीव अंगद, नल, नील, जाबंवंत आणि मारुती असे सर्व नीतीनिपुण मिळून सर्वांनी बिभीषणाबरोबर जावे आणि त्यांना राज्याभिषेक करावा. ॥ २-३ ॥ पितृवचनामुळे मी नगरात येऊ शकत नाही, पण माझ्याच सारखे कपि व अनुज यांना पाठवीत आहे. ॥ ४ ॥ प्रभुच्या सांगण्याप्रमाणे सारी मंडळी गेली व त्यांनी राज्याभिषेकाची सर्व तयारी केली. ॥ ५ ॥ बिभीषणाला आदराने सिंहासनावर बसवून राज्याभिषेक केला व त्याची स्तुती केली. ॥ ६ ॥ हात जोडून सर्वांनी मस्तक नमवून त्यास नमस्कार केला व बिभीषणासह सर्व जण प्रभूचरणीं परत आले. ॥ ७ ॥ मग रघुवीराने कपींना बोलावले व प्रिय वाणीने सर्वांना सुखी केले. ॥ ८ ॥ रघुवीराने अमृतवाणीने याप्रमाणे सुखी केले ( म्हणाले की ) तुमच्या बळाने मी रावणाला मारले, बिभीषणाला राज्य मिळाले, व तुमचे सुयश सर्व जगात पसरले, माझ्यासहित ही तुमची शुभ कीर्ती जे कोणी अति प्रेमाने वाचतील ते अपार संसार सागर श्रमावाचून तरुन जातील. ॥ छंद ॥ प्रभूची वचने ऐकून वानर समूह तृप्त झाले नाहीत, ते पुन:पुन्हा मस्तक नमवूं लागले व चरण कमल धरुं लागले. ॥ दो० १०६ ॥ प्रभु मग हनुमंता बोलावति । लंके जावे भगवान् सांगति ॥ छं० :- अति हर्ष मनिं, तनुं पुलक लोचनिं जल, वदे घडि घडि रमा । सीता रघुपति मीलन –मग प्रभूंनी हनुमंताला बोलावले व भगवंतानी सांगीतले की तुम्ही लंकेत जा. ॥ १ ॥ जानकीला समाचार सांगून तिचे कुशल विचारुन तुम्ही परत या. ॥ २ ॥ तेव्हा हनुमान नगरात आले व हे कळताच निशाचरी व निशाचर ( त्यांचे स्वागत करण्यास ) धावत आले. ॥ ३ ॥ त्यांनी नाना प्रकारांनी कपीची पूजा केली व जनकसुता त्यास दाखविली. ॥ ४ ॥ हनुमंताने दुरुन नमस्कार केला, तेव्हा जानकीने ओळखले की हा रघुपतींचा दूत आहे. ॥ ५ ॥ ( व म्हणाली की ) तात ! सांगा पाहू कृपानिधी अनुज व सैन्य यांसह कुशल आहेत नां ? ॥ ६ ॥ माते ! कोसलाधीश सर्व प्रकारे कुशल आहेत, त्यांनी दशशीर्षाला युद्धात जिंकला. ॥ ७ ॥ व बिभीषणाला अविचल राज्य मिळाले कपीचे हे भाषण ऐकून जानकीला हृदयांत हर्ष झाला. ॥ ८ ॥ जानकीच्या मनात अति हर्ष झाला आहे, देह पुलकित झाला आहे, व नेत्रांत अश्रू आले आहेत, अशी ती रमा पुन:पुन्हा म्हणते की हे कपि ! मी तुला देऊं तरी काय ? या वाणीसारखे जगात काहीच नाही. हनुमान म्हणाला की हे माते ऐक ! युद्धात शत्रुला व त्याच्या सैन्याला जिंकलेल्या रामचंद्रांस बंधूसह पूर्ण पणे कुशल स्थितीत मी पाहीले यातच मला सगळ्या जगाचे राज्य आज मिळाले ! ॥ छंद ॥ ( सीता म्हणाली ) हे सुता, ऐक ! सर्व सदगुण तुझ्या हृदयात वसोत हनुमंता ! अनंतासह कोसलपती सदा तुझ्यावर प्रसन्न असोत. ॥ दो० १०७ ॥ तात ! असा कर अतां किं यत्न हि । पाहिन नयनिं शाम मृदु गात्रहि ॥ दो० :- यास्तव करुणानिधि वदति कांहि तदा दुर्वाद ॥ तात ! आता असा यत्न करा की मी श्यामल मृदु शरीरास या डोळ्यांनी पाहूं शकेन. ॥ १ ॥ मग हनुमान रामापाशी गेला व त्याने जनक सुतेचे कुशल निरोपासह सांगीतले. ॥ २ ॥ निरोप ऐकून भानुकुशलभूषण रघुपतींनी युवराज अंगद व बिभीषण यास बोलावून घेतले. ॥ ३ ॥ आणि सांगीतले की तुम्ही मारुत सुताबरोबर जाऊन जनक सुतेला आदराने घेऊन या. ॥ ४ ॥ नंतर जेथे निशाचरी विनम्रपणे सीतेची सेवा करीत होत्या तेथे ते सर्व सत्वर गेले. ॥ ५ ॥ बिभीषणाने त्या सर्व निशाचरींना त्वरेने शिकवले तेव्हा त्यांनी सीतेला अनेक प्रकारांनी स्नान घातले. ॥ ६ ॥ नाना प्रकारचे अलंकार वस्त्र भूषणे तिच्या अंगावर घातली, इतक्यात एक सुंदर मेणा उत्तम प्रकारे शृंगारलेला आणला गेला. ॥ ७ ॥ सुखधाम स्नेही रामचंद्राचे स्मरण करुन वैदेही हर्षाने त्यात बसली. ॥ ८ ॥ ( सीतेच्या मेण्याच्या ) चारी बाजूस भालदार चोपदार ( वेताच्या छड्या हातात घेतलेले ) संरक्षक फार उत्साहाने चालले आहेत. ॥ ९ ॥ सीतेच्या दर्शनासाठी भल्ल कपी जवळ येऊ लागले, तेव्हा रक्षक त्यांना क्रोधाने ( छडीमार देऊन ) हाकलूं लागले. ॥ १० ॥ तेव्हा रघुवीर म्हणाले की सखे ! बिभीषणा ! मी सांगतो ते ऐका ! माना सीतेला पायी चालतच आणा. ॥ ११ ॥ स्वामी रघुनाथ हसून म्हणाले की सगळे कपि तिला जननी समान पाहतील. ॥ १२ ॥ प्रभुवचनाने भल्ल कपींना हर्ष झाला व देव आकाशातून पुष्पवृष्टी करुं लागले. ॥ १३ ॥ सीतेला पूर्वी अग्नित गुप्त ठेवली आहे, तिला अन्त:साक्षी प्रभू प्रगट करुं इच्छित आहेत. ॥ १४ ॥ म्हणून करुणानिधी ( असूनही ) रघुनाथ काही( अपशब्द ) सीतेला बोलले ते ऐकून ( तिच्या बरोबर आलेल्या ) सर्व राक्षसी दु:खाने हळहळूं लागल्या. ॥ दो० १०८ ॥ प्रभुवचना शिरिं धरुनी सीता । वदली मनकृति वचनपुनीता ॥ छं० :- श्रीखंडसम पावकिं शिरे प्रभुला स्मरोनी मैथिली । प्रभुचे वचन शिर सामान्य करुन मनाने कर्माने व वाणीने पुनीत असलेली सीता ॥ १ ॥ लक्ष्मणास म्हणाली की हे लक्ष्मणा ! तुम्ही माझे धर्म बंधू व्हा, तुम्ही त्वरेने पावक प्रगट करा. ॥ २ ॥ विरह, विवेक व धर्म प्रीती यांनी मिश्रित असे सीतेचे वचन ऐकून लक्ष्मणाचे डोळे अश्रूंनी भरले व त्याने दोन्ही हात जोडले, पण तो सुद्धा प्रभूला काही सांगू शकला नाही. ॥ ४ ॥ रामचंद्रांचा कल पाहून लक्ष्मण धावले व पावक प्रगट करुन पुष्कळ काष्ठे आणली. ॥ ५ ॥ पावक प्रबल झाला आहे असे पाहून सीतेला ( वैदेहीला ) हर्ष झाला, तिच्या हृदयांस कसलेही भय वाटले नाही, ती म्हणाली, जर मनाने, वाणीने, आणि कृतीने माझ्या हृदयास रघुवीरावाचून अन्य गति नसेल तर, ॥ ७ ॥ सर्वांची गति उत्तम जाणणारा अग्नि आहे, तो मला चंदनासारख शीतल होवो. ॥ ८ ॥ प्रभु रामचंद्रांचे स्मरण करुन, व ज्या चरणांना महेश वंदन करतात व ज्या चरणांच्या ठिकाणी सीतेचे उत्तम निर्मळ प्रेम आहे त्या कोसल पतींचा जय जय कार करुन मैथिलीने चंदनासारख्या शीतल पावकात प्रवेश केला, सीतेची प्रतिकृती आणि लौकिक कलंक त्या प्रचंड पावकात दग्ध झाले ते प्रभुचरित्र कोणी जाणले नाही, पण आकाशात असलेले देव, सिद्ध व मुनी ते पहात आहेत. ॥ छं१ ॥ मग मूर्तीमान अग्नीने वेदामध्ये व लोकात प्रसिद्ध असलेली जी सत्य सीता तिचा हात धरुन ती रामचंद्रांस समर्पण केली, जशी क्षीरसागराने विष्णूला लक्ष्मी, समर्पण केली ती सीता रामचंद्राच्या वामभागी विराजत आहे. त्यांची उत्तम शोभा अशी ती अति सुंदर आहे, की जणूं नविन फुललेल्या नीलकमळाच्या जवळ सोन कमळाची कळीच सुशोभित झाली आहे. ॥ छंद २ ॥ देव हर्षित होऊन पुष्पवृष्टी करुं लागले, आकाशात सुरवाद्यांचा गजर सुरु झाला किंन्नर गावूं लागले अप्सरा विमानात नृत्य करुं लागल्या. ॥ दो०१०९ रा॥ जानकीसहित प्रभुची अपरिमित अपार शोभा पाहून भल्ल व कपि आनंदित झाले व सुखसार रघुपतीचा जयजयकार करुं लागले. ॥ दो०१०९ म ॥ श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु |