॥ श्रीरामचरितमानस ॥

(मराठी अनुवाद)

॥ लंकाकाण्ड ॥

॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

अध्याय ९ वा



Download mp3

दो० :- दशमुख ललकारी तिथें इथ अंगद हनुमान ॥
लढति निशाचर भल्ल कपि करुनी स्वप्रभु आण ॥ ८०चं ॥

तिकडून दशानन ललकारतो आहे व इकडून अंगद हनुमान ललकारीत आहेत. निशाचर आणि भल्ल कपि आपापल्या स्वामीची शपथ घेऊन लढत आहेत. ॥ दो० ८० चं ॥

सुर विधि आदि सिद्ध मुनि नाना । बघती रण नभिं बसुनि विमानां ॥
आम्हिहि उमे होतों त्यां-संगां । पाहत रामचरित रणरंगा ॥
रणरसमद चढला उभयानां । कपि जयशील रामबल त्यांनां ॥
एकैकासि लढति ललकारिति । एकैका मर्दुनि महिं पाडिति ॥
मारिति कापिति धरिति अपटिती । शिरें तोडुनी शिरें ताडिती ॥
उदर विदारिति बाहू उखळिति । धरुनि पाय महिं भटां आदळिति ॥
निशिचर भटां भल्ल भुवि गाडिति । वर भरभर बहु वाळु टाकिति ॥
वीर वलीमुख युद्धिं विरुद्ध । काल विपुल जणुं दिसती क्रुद्ध ॥

छं० :- क्रुद्धचि कृतान्त समान कपि तनु गळत शोणित राजती ॥
मर्दिति निशाचर चमु भटां बलवंत घनसे गाजती ॥
देती चपेटा दांतिं तोडुनि लाथ हाणुनि चुर्डिती ॥
चीत्करति मर्कट भल्ल छलबल करिति खल रिपुनाशिती ॥ १ ॥
कुणि गाल फाडिति उर विदारिति कंठिं अंत्रें घालती ॥
प्रल्हाद पति जणुं विविध तनुधर समर संगणिं खेळती ॥
धर मार पाड हि काप घोर गिरा गगनिं भरली महीं ॥
जय राम जो तृण कुलिश करि, कुलिशास तृणकरि सहजही ॥ २ ॥
दो० :- निज दल विचलित पाहुनी वीस भुजीं दशचाप ॥
निघे बसुनि रथिं दशानन फिरा फिरा दे ताप ॥ ८१ ॥

ब्रह्मादिदेव सिद्ध व अनेक मुनी विमानात बसून आकाशातून युद्ध पाहू लागले. ॥ १ ॥ उमे ! आम्ही सुद्धा त्यांच्याबरोबर रणांगणातील रामचंद्रच्या लीला पहात होतो. ॥ २ ॥ रणरसाचा मद दोन्हीकडील वीरांना चढला पण रामबल असल्याने ते जयशील आहेत. ॥ ३ ॥ एक दुसर्‍यास ललकार्‍या देऊन त्यांच्याशी लढत आहेत, तर एक दुसर्‍यास मर्दून जमिनीवर पाडत आहेत. ॥ ४ ॥ कोणी मारीत आहेत तर कोणी कापीत आहेत तर कोणी नखांनी दांतांनी कापीत आहेत, तर कोणी शिरे कापून त्याच शिरांनी मारीत आहेत. ॥ ५ ॥ कोणी पोट फाडीत आहेत तर कोणी बाहू उखडून टाकीत आहेत. कोणी वीरांना पाय धरुन जमिनीवर आपटत आहेत. ॥ ६ ॥ राक्षसवीरांना भल्ल जमिनीत गाडून वर भराभर पुष्कळ वाळू टाकीत आहेत. ॥ ७ ॥ युद्धात विरोध करु लागलेले मर्कटवीर जणूं कृद्ध झालेल्या असंख्य काळासारखे दिसत आहेत. ॥ ८ ॥ कपी कृतांतासारखे चवताळले असून रक्त गळत असलेले त्यांचे देह सुशोभित दिसत आहेत ते बलवंत कपी राक्षससेनेतील बलवंत वीरांना मर्दून मेघांप्रमाणे गर्जत आहेत कोणी चपेटा मारु, कोणी दातांनी तोडून कापून, तर कोणी लाथा हाणून चुराडा करीत आहेत मर्कट भल्ल वीर ( हत्तीप्रमाणे ) चीत्कार व गर्जना करुन युक्ती व बळाने दुष्ट शत्रुंचा विनाश करीत आहेत. ॥ छं १ ॥ कोणी राक्षसांचे गाल फाडीत आहेत, कोणी छाती विदारण करीत आहेत, तर कोणी राक्षसांची आतडी गळ्यात घालीत आहेत ( ते पाहून असे वाटले की ) जणूं नरसिंह विविध देह धारण करुन रणांगणांत क्रीडा करीत आहे. धरा, मारा, पाडा, कापा अशा घोर गर्जना आकाशात व पृथ्वीवर दुमदुमत आहेत. जे गवताच्या काडीचे सुद्धा वज्र करतात व वज्रालाही सहज तृण बनवितात त्या रामचंद्रांचा जय असो. ॥ छं २ ॥ आपले सैन्य पळत असलेले पाहून वीस बाहूंनी दहा धनुष्ये धारण करुन दशानन रथात बसून निघाला व मागे फिरा मागे फिरा ( पळू नका, परत या ) असे ओरडून तो त्यांना ताप देऊं लागला. ॥ दो० ८१ ॥

धावे क्रुद्ध परम दशकंधर । सम्मुख जाती हुप् हुप् वांदर ॥
उपल शैल बहु पादप उपटिति । एकावेळीं त्यावर टाकिति ॥
शैल वज्रदेहीं आदळती । खंड खंड ते तत्क्षणिं फुटती ॥
न चळे, अचळ असे रथ थोपुनि । रण दुर्मद रावण अति कोपुनि ॥
कपिंस चहुंकडे झडपुनि दपटी । क्रोधें अति मर्दुनि महिं अपटी ॥
सुटले पळत भल्ल कपि नाना । त्राहि ! त्राहि ! अंगद हनुमाना ! ॥
स्वामि ! पाहि ! रघुवीरा पाही ! । हा खळ खातो काळ जसा ही ॥
बघुनि सकल कपिनां पळतांही । लावी सायक कार्मुकिं दही ॥

छं० :- शर निकर लक्षुनि सोडि उरगां समहि उडुनि लागती ॥
शर धरणि अंबर भरुनि उरले विदिशिं दिशिं कपि धावती ॥
कोलाहलहि बहु विकल कपिदल भल्ल बोलति धाव रे ॥
रघुवीर करुणासिंधु आर्त सुबंधु जन रक्षक हरे ॥ १ ॥
दो० :- स्वदल विकल बघुनी कटीं कसुनि तूण धनु हातिण् ॥
नमुन रामपदिं मस्तका लक्ष्मण सकोप जाति ॥ ८२ ॥

दशकंठ अत्यंत क्रुद्ध होऊन कपींवर धावला तेव्हा वानर हुप्, हुप् करीत समोर चालून आले. ॥ १ ॥ पुष्कळ पाषाण, पर्वत व वृक्ष उपटून घेऊन ते सर्व कपी एकाच क्षणी रावणावर टाकू लागले. ॥ २ ॥ त्याच्या वज्रासारख्या देहावर ते शैल आदळताच तत्काळ त्यांचे तुकडे तुकडे होऊन ते फुटूं लागले. ॥ ३ ॥ तो जरा सुद्धा चळला की ढळला नाही, रणमदाने मत्त होऊन, अति कोपून तो रथ थोपवून स्थिर राहीला. ॥ ४ ॥ अति क्रोधाने कपींवर झडप घालून, धाकदपटशा देत, जिकडे तिकडे मर्दून भूमीवर आपटू लागला. ॥ ५ ॥ पुष्कळ भल्ल व कपी अंगदा रक्षण कर, हनुमंत रक्षण कर असे ओरडत पळत सुटले. ॥ ६ ॥ हे रघुवीरा ! अहो स्वामी रक्षण करा, रक्षण करा, हा दुष्ट काळासारखा आम्हाला खात आहे. ॥ ७ ॥ सर्व कपींना पळत असलेले पाहून रावणाने दाही धनुष्यावर बाण लावले. ॥ ८ ॥ नेम धरुन तो बाणसमूह सोडू लागला व ते बाण सर्पासारखे उडून जाऊंन कपींना लागू लागले बाण पृथ्वी व सर्व आकाशात भरुन राहीले आणि कपी दाही दिशांना – उपदिशांना ( वाट फुटेल तिकडे ) पळूं लागले अति कोलाहल झाला आणि कपी भल्ल दळे व्याकुळ होऊन बोलू लागली की धाव रे रघुवीरा ! हे करुणासागरा ! हे आर्ताच्या उत्तम बंधो ! सेवक रक्षका ! हे हरी ! धाव रे धाव ! ॥ छंद ॥ आपले सैन्य व्याकुळ झाले आहे असे पाहून लक्ष्मणाने कमरेला भाता कसला, व हातात धनुष्य सज्ज करुन घेतले आणि श्रीरामचरणांवर मस्तक नमवून ते क्रोधाने निघाले. ॥ दो० ८२ ॥

रे खल कपि कां रीस मारसी । काळ तुझा मी विलोकि मजसी ॥
साधित होतो तुज सुत घाती ! । आज मारुनी निवविन छाती ॥
वदुनि सोडि तो शरां प्रचंडा । लक्ष्मण करी सकल शतखंडा ॥
कोटि आयुधें रावण मारी । तिळ तिळ कापुनि सर्व निवारी ॥
निज नाराचीं तया प्रहारी । स्यंदन भंगुनि सूता मारी ॥
शत शत शर दश भालिं मारले । व्याळ जणूं गिरिशृंगी शिरले ॥
मग शत शर मारिले उरावर । पडे धरणि तळिं शुद्धि न तिळभर ॥
उठे प्रबल मूर्छा जैं उडली । ब्रह्मदत्त शक्तीच सोडली ॥

छं० :- ती ब्रह्मदत्त प्रचंड शक्ति अनंत उरिं खरि लागतां ॥
तो वीर मूर्छित, उचलि दशमुख अतुलबल महिमा गता ॥
ब्रह्मांड भवन निवास ज्याचे एक शिरिं सम रजकणी ॥
त्या उचलुं पाहे मूढ रावण उमज ना त्रिभुवन धनी ॥ १ ॥
दो० :- बघुनि पवनसुत धावला बोलत वचन कठोर ॥
येतां कपिला मारि तो मुष्टिघात अति घोर ॥ ८३ ॥

लक्ष्मण म्हणाले अरे दुष्टा ! माकडांना व अस्वलांना काय मारतोस ? जरा माझ्या कडे पहा, मी हा तुझा काळ बनून आलो आहे. ॥ १ ॥ रावण म्हणाला अरे पुत्र घातक्या ! मी तुलाच शोधीत होतो ( बरा सापडलास ) आज तुला मारुन मी आपली छाती निववितो ॥ २ ॥ असे बोलून त्याने प्रचंड बाण सोडले पण लक्ष्मणाने त्याचे शतश: तुकडे केले. ॥ ३ ॥ नंतर रावणाने अगणित आयुधे फेकली पण लक्ष्मणाने त्याचे तिळाएवढे तुकडे करुन त्यांचे निवारण केले. ॥ ४ ॥ नंतर लक्ष्मणाने आपल्या बाणांनी त्याच्यावर प्रहार केले, त्याचा रथ भंगून सारथ्याला ठार मारले. ॥ ५ ॥ मग शंभर शंभर बाण त्याच्या प्रत्येक डोक्यावर असे मारले की जणूं अनेक सर्प गिरीशिखरात घुसावेत असे. ॥ ६ ॥ मग शंभर बाण रावणाच्या छातीवर मारले तेव्हा तो पृथ्वीतळावर पडला व त्याला मूर्च्छा आली. ॥ ७ ॥ प्रबल मूर्च्छेतून जागा होताच तो उठला व ब्रह्मदेवाने दिलेली शक्ती त्याने लक्ष्मणावर सोडली. ॥ ८ ॥ लक्ष्मणाच्या छातीत ती लागताच तो वीर मूर्च्छित पडला रावण त्याला वीस हातांनी उचलूं लागला पण अतुल बलवान असा त्याचा जो महिमा तो नष्ट झाल्याने तो उचलूं शकला नाही ज्याच्या एका शिरावर ब्रह्मांडरुपी भवन रज:कणासारखे राहते त्याला मूर्ख रावण त्रिभुवनांचा धनी हे समजत नाही व त्याला उचलूं पाहतो ! ॥ छंद ॥ हे पाहून पवनसुत कठोर वचने बोलत धावला. कपी येताच रावणाने त्याला एक अति घोर मुष्ठी प्रहार केला. ॥ दो० ८३ ॥

जानु टेकि कपि महिं ना पडे । उठे सावरुनि रोषा चढे ॥
मुष्टी एक तया कपि मारी । पडे शैल जणुं पवी प्रहारीं ॥
मूर्छा जाउनि जैं तो जागे । विपुल कपिबला प्रशंसु लागे ॥
धिग् धिग् मम पौरुष धिग् मजसी । सुर द्रोहि तूं अजून जगसी ॥
वदुनि लक्ष्मण कपि ये घेउनि । दशमुख विस्मित झाला पाहुनि ॥
रघुविर वदति समज मनिं ताता । तूं कृतान्त भक्षक सुरपाता ॥
ऐकुनि वचना कृपाल उठला । गेली नभिं ती शक्ति कराला ॥
मग कोदंड बाण घे धावे । रिपु सम्मुख अति सत्वर पावे ॥

छं० :- सत्वर पुन्हां रथ भंगुनी हत सारथी व्याकुळ करी ॥
दशकंठ महि अति विकल पडला बाण शत लागत उरीं ॥
त्या घालुनी रथिं अन्य सारथि शीघ्र ने लंकेप्रती ॥
रघुवीर बंधु प्रतापराशी प्रभुपदीं ये करि नती ॥ १ ॥
दो० :- तिथें दशानन जागतां करूं लागला यज्ञ ॥
रामविरोधीं इच्छि जय शठहटवश अति अज्ञ ॥ ८४ ॥

हनुमान गुडघे टेकल्यामुळे जमिनीवर पडला नाही सावरुन उठला आणि फार क्रुद्ध झाला. ॥ १ ॥ कपीने त्याला एक मूठ मारली तेव्हा तो असा पडला की जणूं वज्राच्या प्रहाराने पर्वतच कोसळला. ॥ २ ॥ मूर्च्छा जाऊन जेव्हा तो जागा झाला तेव्हा कपीच्या विपुल बलाची तो प्रशंसा करुं लागला. ॥ ३ ॥ ( कपि म्हणाला ) धिक्कार असो माझ्या पौरुषाला व मला कारण की तूं सुर द्रोही अजून जिवंत राहीलास. ॥ ४ ॥ असे म्हणून कपी लक्ष्मणास घेऊन आला ते पाहून दशमुख विस्मित झाला. ॥ ५ ॥ रघुवीर म्हणाले की ताता ! मनात जरा विचार कर. की तूं कृतांत भक्षक असून देवांचा संरक्षक त्राता आहेस. (मनुष्य नाहीस). ॥ ६ ॥ हे वचन ऐकून कृपालु ( अनंत ) उठून बसला व ती कराल शक्ती आकाशात गेली. ॥ ७ ॥ मग लक्ष्मण कोदंड बाण घेऊन धावले आणि त्वरेने शत्रूसमोर येऊन पोचले. ॥ ८ ॥ त्वरेने पुन्हा रथाचा चुराडा करुन त्याचा सारथी मारला व त्याला ( रावणाला ) अति व्याकुळ केला शंभर बाण छातीत लागताच दशानन अति व्याकुळ होऊन धरणीवर पडला. दुसर्‍या सारथीने त्याला दुसर्‍या रथात घालून त्वरेने लंकेत नेला ( तेव्हा ) रघुवीर बंधु प्रतापराशी लक्ष्मण प्रभुचरणापाशी परत आला व नमस्कार केला. ॥ छंद ॥ तिकडे दशानन मूर्च्छेतून जागा झाला व एक यज्ञ करुं लागला तो दुष्ट अति अडाणी हट्टाला वश होऊन, रामविरोध करण्यात जय मिळविण्याची इच्छा करीत आहे. ॥ दो० ८४ ॥

इथें बिभीषण खबर पावला । सपदि जाइ सांगे रघुपतिला ।
नाथ ! एक करि रावण यागा । होतां सिद्ध न मरे अभागा ॥
धाडा नाथ ! शीघ्र भट वांदर । विध्वंसिति येइल दशकंधर ॥
प्रातः प्रभु सुभटानां धाडति । हनुमानादि अंगद सब धावति ॥
प्रविशति सहज उडुनि कपि लंका । शिरले रावण भवनिं न शंका ॥
यज्ञ करित जै तो आढळला । सकल कपींस कोप अति चढला ॥
रण सोडुनि निर्लज्ज पळाला । करी इथें बगळा ध्यानाला ॥
वदुनी अंगद लाथा मारी । शठ न बघे स्वार्थीं रत भारी ॥
छंद०- जैं पाहिना, कपि कुपित दंतीं धरिति लाथा मारती ॥
नारींस धरुनी केश ओढिति दीन विलपति त्या अति ॥
मग उठुनि कुपित कृतान्तसम कपि धरुनि पायां उडवले ॥
संधींत या कपि नाशिती मख बघुनि मन अति कचरलें ॥ १ ॥

दो० :- मख विध्वंसुनि कुशलकपि आले रघुपति पाशि ॥
निघे निशाचर कुपित, न हि जीवन आशा त्यासि ॥ ८५ ॥

इकडे बिभीषणाला ( रावण यज्ञ करीत असल्याची ) खबर मिळाली; त्याने त्याच पावली जाऊन रघुवीरास ती निवेदन केली. ॥ १ ॥ नाथ ! रावण एक यज्ञ करीत आहे तो जर सिद्धीस गेला तर तो अभागी मरणार नाही. ॥ २ ॥ म्हणून नाथ ! वानर वीरांना त्वरेने पाठवावे ( म्हणजे ) ते यज्ञाचा विध्वंस करतील व रावण युद्धाला येईल. ॥ ३ ॥ प्रात:काळ होताच प्रभुंनी सुभटांना पाठविले हनुमंतादि अंगद व इतर सर्व कपी धावले. ॥ ४ ॥ ते सहज लीलेने उड्या मारुन लंकेत शिरले व नि:शंकपणे त्यांनी रावणाच्या वाड्यात प्रवेश केला. ॥ ५ ॥ तो यज्ञ करीत आहे असे जेव्हा दिसले तेव्हा सर्व कपींना अति क्रोध आला. ॥ ६ ॥ हा निर्लज्ज युद्धातून पळून घरी आला आणि इथे बगळा ध्यान करीत बसला आहे. ॥ ७ ॥ असे बोलून अंगद रावणाला लाथा मारुं लागला पण तो अति स्वार्थरत रावण डोळे उघडून पाहीना. ॥ ८ ॥ जेव्हा तो पाहीना तेव्हा कपि कोपून त्याला दातांनी पकडून लाथा मारु लागले स्त्रियांचे केस धरुन त्यांना ओढीत आणल्या, त्या दीन वाणीने अति विलाप करुं लागल्या तेव्हा तो रावण कृतान्तासारखा क्रुद्ध होऊन उठला व कपींचे पाय धरुन धरुन त्यांना आपटून फेकून देऊं लागला इतक्यात कपींनी यज्ञाचा विध्वंस केला. यज्ञाचा विनाश झालेला पाहून तो मनात फार कचरला. ॥ छंद ॥ यज्ञाचा विध्वंस करुन सर्व कपी रघुपती पाशी जाऊन कुशल पोचले निशाचर क्रोधाने निघाला त्याला आता जगण्याची आशा उरली नाही. ॥ दो० ८५ ॥

निघत होति अति अशुभ भयंकर । वसति गिधाडे उडुनि शिरावर ॥
होइ कालवश कुणा न गणतो । युद्ध निशाणें पिटाकिं म्हणतो ॥
निघे तमीचर चमू महा ती । बहु गजरथ हय भट पादाती ॥
प्रभु सम्मुख खल धावति तैसे । शलभसंघ अनलावर जैसे ॥
इकडे देवांनीं स्तुति केली । दारुण दुःखें यानें दिधली ॥
पुरे राम ! या खेळविणें ही । होते अति दुःखी वैदेही ॥
प्रभु सस्मित जैं सुर वच कानां । मग रघुवीर निरीक्षिति बाणां ॥
जटाजूट मस्तकिं दृढ बांधति । कुसुमें ग्रथित मधें अति शोभति ॥
अरुण नयन तन मेघश्यामा । अखिल लोक लोचनाभिरामा ॥
कटिंतटिं परिकर कसुनि निषंगा । करिं कोदंड कठिण शारंगा ॥

छं० :- करिं शार्ङ्ग सुंदर कटि निषंग शिलीमुखाकर कसितसे ॥
भुजदंड पीन मनोहरायत उरिं धरासुर पद लसे ॥
तुलसी वदे कीं प्रभु यदा शर चाप करिं निज फिरवती ॥
ब्रह्मांड दिग्गज कमठ अहि महि सिंधु भूधर कंपती ॥
दो० :- हर्षित सुर शोभा बघुनि वर्षति सुमन अपार ॥
जय जय जय करुणानिधि छवि बल गुण आगार ॥ ८६ ॥

रघुपती राघव समर वर्णन – निघताच अति अशुभ व भयंकर शकुन होऊं लागले गिधाडे वारंवार उडून रावणाच्या डोक्यावर बसूं लागली. ॥ १ ॥ पण तो कालवश झाला असल्याने कोणालाच जुमानीत नाही आणि म्हणाला की युद्ध निशाणे वाजवा. ॥ २ ॥ निशाचरांची महासेना निघाली ती पुष्कळ हत्तीस्वार, घोडेस्वार, रथ आणि पायदळ यांनी युक्त आहे. ॥ ३ ॥ शलभांच्या थव्यांनी अग्नीवर झडप घालण्यास जावे तसे ते खल प्रभुच्या समोर धावत चालले. ॥ ४ ॥ इकडे देवांनी स्तुती केली ( व म्हणाले की ) या रावणाने आम्हास दारुण दु:खे दिली आहेत. ॥ ५ ॥ हे राम ! आता याला खेळविणे पुरे झाले, कारण की वैदेही अति दु:खी होत आहे. ॥ ६ ॥ देवांचे म्हणणे कानी पडताच प्रभूंनी स्मित केले, मग उठून रघुवीराने बाणांचे निरीक्षण केले. ॥ ७ ॥ मस्तकावर जटा मुकुटासारख्या घट्ट बांधल्या, त्यातमध्ये गुफलेली फुले फारच शोभत आहेत. ॥ ८ ॥ नेत्र लाल असून मेघांसारखे श्याम शरीर सकल लोकांच्या नेत्रांना आनंद देणारे आहेत. ॥ ९ ॥ कमरेला पटका व भाता कसलेला असून हातात शार्ङ्ग धनुष्य असून कमरेला बाणांचा अक्षय भाता कसलेला आहे, बाहू भरदार आहेत व मनोहर विशाल वक्ष:स्थलावर विप्रपाद चिन्ह विराजत आहे तुलसीदास म्हणतात की प्रभु जेव्हा हातांनी धनुष्य व बाण फिरवूं लागले तेव्हा ब्रह्मांड दिग्गज, कूर्म, शेष, पृथ्वी, सागर आणि पर्वत कंप पावू लागले. ॥ छंद ॥ शोभा पाहून देव हर्षीत झाले आणि अपार पुष्पे वर्षू लागले आणि शोभाधाम, बलधाम व गुणधाम करुणानिधींचा जयजयकार करु लागले. ॥ दो० ८६ ॥

या संधींत निशाचर अनी । येई टक्करत कोण किं गणी ॥
बघुनि जाति सम्मुख कपि भट्टां । प्रळय काळच्या जणुं घनघट्टा ॥
किति कृपाण तरवारि चमकति । जणुं बलाहक सुघोर गर्जति ॥
गज-रथ वाजी-स्वन कर्कश अति । जणूं बलाहक सुघोर गर्जति ॥
कपि लांगूल विपुल नभिं पसरति । जणूं इंद्रधनु सुंदर विलसति ॥
उडते धूळ जणूं जलधारा । बाण बिंदुवृष्टीहि अपारा ॥
उभय हि करिति गिरिप्रहरां । वज्रपात जणुं वारंवारां ॥
रघुपति कुपित बाणझड लावति । निशिचर निकर फार घायाळति ॥
लागत बाण वीर चीत्कारती । जिथें तिथें महिं मूर्छित पडती ॥
स्रवति शैलिं जणुं निर्झर भारी । शोणित सरि कातर भयकारी ॥

छं० :- कातर भयंकर रुधिर सरिता अति अपावन चालली ॥
युग कूल दल, रथ रेति, भंवरे चक्र भयदा वाहली ॥
जलजंतु पदचर तुरग खर गज विविध यान न मोजवे ॥
शर शक्ति तोमर सर्प, कार्मुक वीचि, ढाली कासवें ॥ १ ॥
दो० :- वीर पडति जणुं तीर तरु वाहे मज्जा फेन ॥
देखत कातर डरति अति सुभटांचे मनिं चैन ॥ ८७ ॥

या मधल्या काळात ( रघुवीर युद्धाची तयारी करतात त्या वेळात ) एकमेकांस टकरा देत अगणित राक्षस सैन्य आले. ॥ १ ॥ हे पाहून कपि सुभट असे समोर गेले की जणूं प्रलय काळच्या मेघांचे समूहच. ॥ २ ॥ अनेक पट्टे व तरवारी अशा चमकूं लागल्या की जणूं दाही दिशांत विजाच दमक करीत चमकत आहेत. ॥ ३ ॥ हत्ती, रथ व घोडे यांचे अति कर्कश आवाज जणूं मेघाच्या घोर गर्जनासारखे होऊं लागले. ॥ ४ ॥ कपींची दीर्घ पुच्छे आकाशात पुष्कळ पसरली ती जणूं सुंदर इंद्रधनुष्ये पडली. ॥ ५ ॥ उडणारी धुळ म्हणजेच जणू जलधारा व बाण सुटूं लागले व ती जणूं बिंदूंची वृष्टी होऊं लागली. ॥ ६ ॥ दोन्ही बाजूंचे वीर पर्वताचे प्रहार करु लागले तेच जणूं वारंवार वज्रपात ( विजा पडणे ) होऊ लागले. ॥ ७ ॥ क्रुद्ध झालेल्या रघुपतींनी तर बाणांची झडच लावली व निशाचर-समूह फार घायाळ होऊं लागले. ॥ ८ ॥ बाण लागताच वीर ची ची ध्वनी करुन जिकडे तिकडे मूर्च्छित पडू लागले. ॥ ९ ॥ पडलेल्या वीरांच्या शरीरातून रक्त असे वहात आहे की जणूं डोंगरातून पाण्याचे नालेच वहात आहेत, त्यामुळे भ्याडांना भयदायक अशी रक्ताची नदीच वाहू लागली. ॥ १० ॥ भित्र्याना भयंकर व अति अपवित्र अशी रुधिर नदीच वहात निघाली. दोन्ही सैन्य हे दोन किनारे आहेत, रथ मधली रैताड बेटे आहेत, व रथाची चाके हे भोवरे असलेली भयानक नदी वाहू लागली पायदळ, घोडे, हत्ती, गाढवे व विविध याने हे अगणित जलचर प्राणी आहेत बाण शक्ती व तोमर हे सर्प आहेत. धनुष्य लाटा तर ढाली कासवे आहेत. ॥ छंद ॥ पडणारे वीर हे तीरावरील वृक्ष होत व मज्जा वाहते आहे तो फेस आहे. ही नदी पाहून भित्रे अति घाबरुन जात आहेत, पण सुभटांच्या मनाला मजा सुख वाटत आहे. ॥ दो० ८७ ॥

प्रेत भुतें मज्जति वेताळ हि । प्रमथ महा झोटिंग कराल हि ॥
काक कंक भुज घेउनि पळती । एकैकांचे हिसकुनि गिळती ॥
कोणी म्हणति अशी स्वस्ताई । शठ तुमचें दारिद्र्य न जाई ॥
पडले कण्हत विद्ध भट तटीं । पतित अर्ध जलिं जणुं शेवटीं ॥
गृध्र तटीं आंतडि ओढती । शांत, गळें जणुं झष पकडती ॥
भट वाहति बहु खग वर बसती । जणुं नदींत नौक्रीडा करती ॥
योगिणि रुधिर खर्परीं सांचति । भूतपिशाच वधू नभिं नाचति ॥
भटकपाल करताल वाजवति । चामुंडा गाती विविधा अति ॥
जंबुक निकर तटातट तोडति । खाती ! हू ! हू ! दुजां दटावति ॥
कोटी रुंड मुंडविण डोल्लति । शिरें पतित महिं जयजय बोल्लती ॥

छं० :- बोल्लती जयजय मुंड, रुंड प्रचंड शिरविण धावती ।
खग खर्परीं झडपुनि झुंझति सुभटभट बहु ढकलती ॥
वानर निशाचर निकर मर्दिति रामबल दर्पे युत ।
संग्राम अंगणिं सुभट निद्रित राम शर निकरें हत ॥ १ ॥
दो० :- रावण हृदयिं विचारी कृत निशिचर संहार ॥
भल्ल कीश बहु, एक मी माया निर्मुं अपार ॥ ८८ ॥

भुते, प्रेते, वेताळ, शिवगण ( प्रमथ ) आणि मोठे मोठे भयंकर झोटिंग त्या रुधिर नदीत बुड्या मारुन स्नान करुं लागले. ॥ १ ॥ कावळे करकोचे इ. भुजा घेऊन पळत आहेत, तर कोणी दुसर्‍या जवळचे हिसकून खात आहेत. ॥ २ ॥ कोणी त्यास म्हणतात की शठांनो ! अशी स्वस्ताई आहे तरी तुमचे दारिद्र्य अजून जात नाही ? ॥ ३ ॥ घायाळ वीर तटावर असे कष्टत पडले आहेत की जणूं अंतकाळी अर्धे जलात पडून राहीले आहेत. ॥ ४ ॥ गिधाडे तटावर बसून आतडी अशी अगदी शांतपणे ओढीत आहेत की जणूं गळाने मासेच पकडीत आहेत. ॥ ५ ॥ पुष्कळ वीर वहात चालले असून त्यांच्यावर पुष्कळ पक्षी असे बसले आहेत की जणू नदीत कोणी लोक नौका-क्रीडाच करीत आहेत. ॥ ६ ॥ योगिणी भटांच्या कपालात रक्त साचवीत भरत आहेत व भूत पिशाच्यांच्या स्त्रिया आकाशात नृत्य करीत आहेत. ॥ ७ ॥ भटांच्या कपालांचे करताल वाजवीत चामुंडा नाना प्रकारे गात आहेत. ॥ ८ ॥ कोल्ह्यांचे कळप तटातट तोडून खात आहेत व हूं हूं करीत इतरांस दटावीत आहेत ॥ ९ ॥ शिरे नसलेली कोट्यवधी धडे मोठ्याने डोलू लागली व जमिनीवर पडलेली शिरे जय जय बोलू लागली ॥ १० ॥ मुंडे जय जय बोलत आहेत व प्रचंड धडे शिरावाचून धावत आहेत पक्षी मुडांवर झडपा घालून आपसात झुंजत आहेत त्यातील सुभट पुष्कळ भटांना ढकलून देत आहेत रामबळाच्या दर्पाने युक्त झालेले वानर निशाचर समूहांचे मर्दन करीत आहेत. राम बाणांनी मारलेले सुभट रणभूमीरुपी अंगणात निजले आहेत. ॥ छंद ॥ रावण खिन्न होऊन मनात विचार करुं लागला की निशाचरांचा तर संहार झालाच मी एकटा आहे आणि भल्ल कपी अपार आहेत म्हणून आता माया निर्माण करु या. ॥ दो० ८८ ॥

देवानां प्रभु पदचर दिसले । तदा सकल अति खिन्न जाहले ॥
तत्क्षणिं सुरपति धाडि रथाला । हर्षित मातलि घेउन आला ॥
तेजपुंज रथिं अनुपम दिव्यहि । हर्षित चढति अयोध्या भूपहि ॥
चंचल तुरग मनोहर चारी । अजर अमर मनसम गतिकारी ॥
रथारूढ रघुनाथां पाहुनि । कपि धावति बल विशेष पावुनि ॥
कपिमारा त्या असह्य भारी । तैं रावण माया विस्तारी ॥
त्या माये रघुवीर जाणती । लक्ष्मण कपि ती सत्य मानती ॥
दिसति कपीनां निशिचर अनीं । सानुज अगणित कोसल धनी ॥

छं० :- बहु रामलक्ष्मण बघुन कपिदल भयें कल्पित गडबडे ।
जणुं चित्र लिखित समेत लक्ष्मण बघत ठायिंच सब खडे ॥
चमु चकित बघुनी हसुनि लाविति चापिं शर कोसलधनी ।
माया हरी हरि निमिषिं, हर्षे सकल मर्कट वाहिनी ॥ १ ॥
दो० :- बघुनि राम सर्वांकडे वदले वच गंभीर ॥
द्वंद्वयुद्ध सगळे पहा श्रमला तुम्हि अति वीर ॥ ८९ ॥

देवांना प्रभू पादचारी दिसले तेव्हा सगळे देव फार खिन्न झाले. ॥ १ ॥ तत्क्षणीं सुरपतीने आपला रथ धाडला, मातली हर्षाने घेऊन आला. ॥ २ ॥ त्या तेजपुंज दिव्य व अनुपम रथांत अयोध्यापती हर्षाने बसले. ॥ ३ ॥ त्याचे चारी घोडे चंचल, मनोहर, जरारहित व मरणरहित असून ते मना प्रमाणे गमन करणारे आहेत. ॥ ४ ॥ रघुनाथांस रथांत आरुढ झालेले पाहून कपि विशेष बल पाहून (रावणावर) धावले. ॥ ५ ॥ कपींनी केलेला मारा त्यास फारच असह्य झाला तेव्हा त्याने मायेचा विस्तार केला. ॥ ६ ॥ त्या मायेला रघुवीराने ओळखले, लक्ष्मण व कपी यांनी ती खरी मानली. ॥ ७ ॥ कपिसेनेला निशाचर सेनेत अगणित राम व लक्ष्मण दिसूं लागले. ॥ ८ ॥ अगणित राम-लक्ष्मणांना पाहताच सगळेच कपिसैन्य कल्पित भयाने गडबडून गेले आणि लक्ष्मणासह सगळे जागच्या जागी जणूं चित्रासारखे बघत राहीले आपली सेना भयाने चकित झालेली पाहून कोसलाधीश राम हसले व त्यांनी धनुष्यावर बाण लावला व एका निमिषात हरीने माया हरली तेव्हा सर्व वानर सेना हर्षित झाली. ॥ छंद ॥ मग सर्वांकडे पाहून राम गंभीर वाणीने म्हणाले की वीर हो ! तुम्हाला फार श्रम झाले आहेत, तुम्ही आता सारे द्वंद्व युद्ध पहा. ॥ दो० ८९ ॥

* * * * *

श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु

GO TOP