|
॥ श्रीरामचरितमानस ॥ (मराठी अनुवाद) ॥ लंकाकाण्ड ॥ ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥ अध्याय ८ वा Download mp3 दो० :- नख गिरि पादप उपलधर धावति कपि कोपून ॥ नखे, पर्वत, वृक्ष व पाषाण धारण केलेले वानर क्रुद्ध होऊन धावले तेव्हा राक्षसविशेष व्याकुळ होऊन परत फिरले व पळून जाऊन गडावर चढले. ॥ दो० ७४ म ॥ मेघनाद मूर्छेतून उठला । पित्या पाहुनी फार लाजला ॥ दो० :- रघुपति चरणीं नमुनि शिर निघती त्वरें अनंत ॥ मेघनादाची मूर्च्छा उडाली पण पित्याला समोर पाहून त्याला फार लाज वाटली. ॥ १ ॥ तो त्वरेने श्रेष्ठ गिरीच्या गुहेत गेला व अजय मख करावा असे त्याने मनाशी ठरविले. ॥ २ ॥ इकडे बिभीषण गुप्त सल्ला देऊं लागला की अतुल बलवान व उदार प्रभू ! ऐकावे. ॥ ३ ॥ देवांना सर्व प्रकारे सतावणारा दुष्ट मायावी मेघनाद अपवित्र यज्ञ करीत आहे. ॥ ४ ॥ प्रभू ! जर का तो यज्ञ सिद्धीस गेला तर त्याला लवकर जिंकणे अशक्य होईल. ॥ ५ ॥ ते ऐकून रघुपतींनी अति सुख मानले आणि अंगदादी पुष्कळ कपींना बोलावले, ॥ ६ ॥ व सांगितले की तुम्ही सर्व लक्ष्मणाबरोबर जा आणि तुम्ही यज्ञाचा विध्वंस करा ॥ ७ ॥ लक्ष्मण तुम्ही त्याला युद्ध करुन मारा, देव भयभीत झालेले पाहून मला अति दु:ख होत आहे. ॥ ८ ॥ त्याला बळाच्या व बुद्धीच्या प्रयत्नांनी असा मारा की जेणें करुन त्या निशाचराचा नाश होईल. ॥ ९ ॥ जांबंवंत, सुग्रीव व बिभीषण ! तुम्ही सैन्यासह लक्ष्मणाच्या बरोबर रहा. ॥ १० ॥ जेव्हा रघुवीराने आज्ञा दिली तेव्हा लक्ष्मणाने कमरेला भाता कसून बांधला व धनुष्य सज्ज केले. ॥ ११ ॥ आणि प्रभूचा प्रताप हृदयात धारण करुन रणधीर लक्ष्मण मेघासारख्या गंभीर वाणीने म्हणाले, ॥ १२ ॥ आज मी जर त्याचा वध केल्याशीवाय आलो तर स्वत:स कधीही रघुपतीसेवक म्हणविणार नाही ॥ १३ ॥ जरी शंभर शंकर त्याच्या सहाय्याला आले तरी रघुवराची शपथ सांगतो की मी त्याला ठार मारिन. ॥ १४ ॥ रघुपतीच्या चरणीं मस्तक नमवून अनंत (लक्ष्मण) त्वरेने निघाले, बरोबर अंगद, नील-नल मयंद हनुमान इ. वीरही आहेत. ॥ दो० ७५ ॥ जाति बघति कपि बसलेला तो । रुधिर महिष आहुतींस देतो ॥ दो० :- वदुनि कुठें रामानुज राम कुठें, त्यजि प्राण । कपी गेले ( त्या गिरीगुहेत ) व बघतात तो, तो बसलेला असून रक्त व रेड्याचे मांस यांच्या आहुती देत आहे. ॥ १ ॥ कपींनी सर्व यज्ञाचा विध्वंस केला, तरी तो आसनावरुन उठला नाही, तेव्हा कपीनी त्याची प्रशंसा केली. ॥ २ ॥ तरीही तो आसन सोडेना तेव्हा कपींनी त्याचे केस धरले व पुष्कळ लाथा मारुन पळू लागले. ॥ ३ ॥ तेव्हा तो त्रिशूळ घेऊन धावला तेव्हा कपी पळाले व रामानुजा जवळ आले. ॥ ४ ॥ जो जणूं अति क्रोधाने ( आग ओकीतच बाहेर ) आला व वारंवार घोर ध्वनीने गर्जना करुं लागला. ॥ ५ ॥ हनुमान व अंगद त्याच्यावर धावले, पण त्याने त्यांच्या उरात त्रिशूळ मारुन त्यांना भूमीवर पाडले. ॥ ६ ॥ प्रभू लक्ष्मणावर त्याने एक प्रचंड शूल फेकला पण लक्ष्मणाने बाणाने त्याचे दोन तुकडे केले. ॥ ७ ॥ मारुती व अंगद उठून अति कोपाने त्याला मारुं लागले पण त्यांचे घाव त्याला लागेनात. ॥ ८ ॥ मारुनही शत्रू मरत नाही म्हणून ते वीर मागे फिरले तेव्हा तो घोर चीत्कार करीत त्यांच्या पाठीस लागला. ॥ ९ ॥ जणूं काळच क्रुद्ध होऊन अंगावर येत आहे असे पाहून लक्ष्मणाने भयंकर बाण सोडले. ॥ १० ॥ वज्रासारख्या त्या बाणांना येताना पाहून तो दुष्ट क्षणांत गुप्त झाला. ॥ ११ ॥ तो नाना प्रकारची रुपे घेऊन लढाई करुं लागला. तो कधी प्रगट होतो तर कधी गुप्त होतो ! ॥ १२ ॥ शत्रु अजिंक्य आहे असे दिसताच सर्व कपी भयभीत झाले तेव्हा शेष – लक्ष्मण अति क्रुद्ध झाले. ॥ १३ ॥ लक्ष्मणाच्या मनाने असा निश्चय केला की या पाप्याला मी फार खेळवला. ॥ १४ ॥ कोसलपतींच्या प्रतापाचे स्मरण करुन पुष्कळ त्वेषाने लक्ष्मणाने शरसंधान केले, ॥ १५ ॥ व बाण सोडला, तो त्याच्या छातीत घुसला, मरणकाळी त्याने सर्व कपट सोडले. ॥ १६ ॥ रामानुज कुठे आहे ? कुठे आहे राम ? असे म्हणून त्याने प्राण सोडले ( ते ऐकून ) अंगद, हनुमान म्हणाले तुझी जननी धन्य आहे ! ॥ दो० ७६ ॥
अनायास हनुमान उचलुनी । आला लंकाद्वारिं ठेउनी ॥ दो० :- तैं दशकंठें विविध विधिं सकळ सांत्विल्या नारि ॥ (मेघनादाचा तो मृत देह) हनुमंताने सहज उचलला व तो लंकेच्या एका द्वारात नेऊन ठेवला. व हनुमान परत आला. ॥ १ ॥ इंद्रजित मेला हे पाहून व ऐकून देव, गंधर्व इ. विमानात बसून आकाशात आले. ॥ २ ॥ पुष्पवृष्टी करुन त्यांनी दुंदुभी वाजविल्या व श्रीरघुनाथाच्या विमल यशाचे वर्णन केले. ॥ ३ ॥ “ जय अनंत, जय जगदाधारा ! प्रभो तुम्ही सर्व देवांचा उद्धार केलात ” ॥ ४ ॥ अशी विविध स्तुती करुन सुर, सिधू, गंधर्वादि सर्व परत निघाले व लक्ष्मण कृपासागर रघुनाथा पाशी आले. ॥ ५ ॥ पुत्रवधाचे वृत्त दशकंठास समजतात त्याचक्षणीं तो मूर्च्छित होऊन पडला. ॥ ६ ॥ मंदोदरी ऊर बडवीत व नाना प्रकारे आक्रोश करीत भारी रुदन करु लागली (व तिच्यासह इतरही राक्षसस्त्रिया रडू लागल्या). ॥ ७ ॥ लंकावासी लोक शोक करीत व्याकुळ झाले व सर्वच दशकंठ नीच आहे असे म्हणू लागले. ॥ ८ ॥ तेव्हा मग दशकंठाने सर्व स्त्रियांचे सांत्वन केले की हे सर्व दृश्य नश्वर आहे, हृदयांत चांगला विचार करुन पहा इ. ॥ दो० ७७ ॥ तया ज्ञान उपदेशी रावण । आपण मंद, कथा शुभ पावन ॥ दो० :- त्या किं संपदा शकुन शुभ स्वप्निंहि मनिं विश्राम । रावणाने त्या स्त्रियांना ज्ञानाचा उपदेश केला तो स्वत: नीच आहे पण त्याने सांगीतलेल्या गोष्टी शुभ व पवित्र आहेत. ॥ १ ॥ दुसर्यांस उपदेश करण्यात बहुतेक सगळेच कुशल असतात, पण त्या प्रमाणे आचरण करणारे फारच थोडे ! ॥ २ ॥ चाले निशिचर कटक अपारहि । चतुरंगिणी चमू बहु धारहि ॥ छं० :- धावति विशाल कराल मर्कट भल्ल काल समान ते । निशाचरांचे अपार सैन्य चालू लागले, चतुरंगिणी सैन्याची मोठी धारच वाहू लागली. ॥ १ ॥ त्यात रथ, वाहने व अनेक प्रकारची याने असून ती विचित्र व अगणित ध्वजपताकांनी युक्त आहेत. ॥ २ ॥ मत्त हत्तींचे अगणित युथ चालले आहेत, ते जणूं वर्षाकाळचे मेघ जोराच्या वार्याने पळत आहेत. ॥ ३ ॥ वीरांच्या समूहाचा वीरवेष चित्रविचित्र आहे व ते सर्व रणशूर असून पुष्कळ माया ( कपट=जादू ) जाणणारे आहेत. ॥ ४ ॥ ती सेना अशी विचीत्र शोभत आहे की जणूं वसंतरुपी वीरानेच आपले सैन्य सजविले आहे. ॥ ५ ॥ सैन्य चालू लागताच दिग्गज डोलूं लागले, सागर क्षुब्ध झाले व पर्वत डळमळूं लागले. ॥ ६ ॥ सैन्याच्या चालण्याने धूळ उडून सूर्य झाकला गेला वायुची गती कुंठीत झाली व पृथ्वी व्याकुळ झाली. ॥ ७ ॥ पणव, निशाण, इ. घोर वाद्यांचे ध्वनी असे निघूं लागले की जणूं प्रलय काळाचे मेघच गर्जत आहेत. ॥ ८ ॥ भेरी, तुतार्या सनया वाजू लागल्या व वीरांच्या हृदयास सुखविणारा मारु राग वाजू लागला. ॥ ९ ॥ सगळे वीर सिंहनाद करुन आपापल्या बळाचा व पौरुषाचा उच्चार करुं लागले. ॥ १० ॥ दशानन म्हणाला सुभट हो ! ऐका, तुम्ही कपी भल्लसमूहाचा संहार करा मी त्या दोन नृपबंधूंना मारीन असे म्हणत त्याने आपली सेना सरपटत पुढे चालवली. ॥ ११-१२ ॥ ही बातमी कपींना लागताच ते सर्व रघुवीरांचा जयजयकार करीत शत्रुवर तुटून पडले. ॥ १३ ॥ ते विशाल व कराल मर्कट भल्ल काळासारखे धावले; जणू विविध वर्णाचे पुष्कळ पर्वत समूह पंख फुटून उडत आहेत असे वाटले. नखे, दंत, मोठे पर्वत व विशाल वृक्ष ही त्यांची आयुधे असून सबळ असल्याने जरासुद्धा ! भय ते मानीत नाहीत रावणरुपी मत्त हत्तींचा विनाश करणार्या सिंहा ! रामचंद्रा ! आपले ऐश्वर्य प्रगट करा असे म्हणत सुयश वर्णन करीत आहेत. ॥ छंद ॥ ते ( कपी व राक्षस ) जयजयकार करुन आपापली जोडी पाहून इकडचे रामाची प्रशंसा करुन व तिकडचे रावण-प्रशंसा करुन लढूं लागले. ॥ दो० ७९ ॥ रावण रथीं विरथ रघुवीर । बघुन बिभीषण होई अधीर ॥ दो० :- महाअजय संसार रिपु जिंकुं शके तो वीर ॥ श्रीधर्म गीता – धर्ममय रथ – रावण रथी आहे व रघुवीर रथविहीन आहेत असे पाहून बिभीषण फार अधीर झाला (त्याचा धीर सुटला). ॥ १ ॥ प्रीती अधिक असल्याने मनांत संदेह आला, तेव्हा चरणांना वंदन करुन अति स्नेहाने म्हणाला, ॥ २ ॥ की हे नाथ ! आपल्यापाशी ना रथ ना चिलखत, साधे पादत्राणही नाही अशा स्थितीत आपण बलवान वीर रावणाला कसे जिंकणार ? ॥ ३ ॥ (त्यावर राम त्याला म्हणतात) कृपासागर रघुवीर म्हणतात सखे, ऐक निश्चितपणे जय विजयच देणारा दुसरा रथ आहे बरं ! ॥ ४ ॥ त्या रथाला शौर्य आणि धैर्य अशी दोन चाके आहेत दृढ सत्य व दृढ शील या त्याच्या दृढ ध्वजा पताका आहेत. ॥ ५ ॥ बल, विवेक, इंद्रियनिग्रह आणि परहित हे चार घोडे आहेत व ते क्षमा, कृपा व समता या तीन पेडी लगामाने रथाला जुंपलेले आहेत. ॥ ६ ॥ शंकर-भजन हा सुजाण सारथी आहे. वैराग्य ही ढाल असून संतोष हे कृपाण किंवा तरवार आहे. ॥ ७ ॥ दान हा परशु होय, बुद्धी ही प्रचंड शक्ती आहे, उत्तम विज्ञान हे कोदंड आहे. ॥ ८ ॥ निर्मल व अचल मन हे भात्यासारखे असून त्यात शम, नियम, यम असे विविध बाण आहेत. ॥ ९ ॥ विप्रपूजा व गुरुपूजा हे अभेद्य कवच आहे. या सारखा विजय प्राप्त होण्यास दुसरा उपाय नाही. ॥ १० ॥ हे मित्रा, असा धर्ममय रथ ज्याच्याजवळ आहे त्यास जिंकण्यास जगात कोणी शत्रूच कुठे उरत नाही ॥ ११ ॥ हे धीर बुद्धी मित्रा, ऐक ! महा अजिंक्य अशा संसार-शत्रूला जो जिंकू शकतो तोच खरा वीर व तोच वीर जिंकू शकतो की ज्याच्या पाशी असा दृढ रथ असतो. ॥ दो० ८० रा ॥ प्रभूचे भाषण ऐकून बिभीषणाने हर्षित होऊन चरण कमल घट्ट धरले, आणि म्हणाला की हे कृपासागरा, सुखसागर रामा ! या निमित्ताने आपण मला अतिशय सुंदर उपदेश केलात. ॥ दो० ८० म ॥ श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु |