तिथे निशाचर वसति स-शंके । कपि जाळुन गेल्यावर लंके ॥
निज निज गृहिं सब विचार करती । नसे निशाचर-कुळा धडगती ॥
वर्णवे न यद्दूत-बलातें । काय होय भलं पुरिं येतां ते ॥
दूतिमुखें पुरजनोक्ति कळली । मंदोदरी अधिक विव्हळली ॥
रहसिं जुळुनि कर पति पदिं पडली । वदली वाक्य नीति रस-भरलीं ॥
कान्त ! वैर हरिशीं परिहरणें । मम शब्दां अतिहित हृदिं धरणें ॥
यद्दूतें कृत करणी स्मरती । निशिचर-गृहिणी गर्भां स्रवती ॥
तत्स्त्री निज सचिवां बोलावुनि । प्रिय ! हित इच्छा तर द्या धाडुनि ॥
दुःखद तव कुल-कमल-वनासी । आली सीता शीत निशा-सी ॥
ऐका नाथ ! विना सीतार्पण । तव हित करिति न शिव चतुरानन ॥
दो :- राम बाण अहिगण सदृश निशिचर समूह भेक ॥
जों ग्रसती ना तों करा यत्न सोडुनी टेक ॥ ३६ ॥
येऊन भेटे कसा बिभीषण -
कपी लंका जाळून गेल्यापासून तिकडे (लंकेत) सर्व राक्षस भयभीत होऊन राहू लागले. ॥ १ ॥
आपापल्याला घरात सर्व लोक विचार करतात की राक्षस कुळाची आता काही धडगती नाही. ॥ २ ॥
कारण ज्यांच्या दूताच्या बळाचे वर्णन करणे अशक्य ते नगरात आले म्हणजे काय भलं होणार ? (संहारच व्हायचा) ॥ ३ ॥
पुरजन काय म्हणतात हे मंदोदरीला दूतींकडून कळले व ती अधिक व्याकुळ झाली. ॥ ४ ॥
मंदोदरीचा (प्रथम) उपदेश -
एकांतात हात जोडून, पतीच्या पाया पडून नीतीरसाने भरलेली वचने ती बोलू लागली. ॥ ५ ॥
कान्ता (प्रिया) ! हरीशी वैर करणे सोडून द्या व माझे अति हितकारक म्हणणे मनावर घ्या. ॥ ६ ॥
ज्यांच्या दूतांच्या करणीची आठवण झाली की राक्षसींचे अजूनही गर्भपात होत आहेत; ॥ ७ ॥
त्यांची स्त्री सीता आपल्या सचिवाला बोलावून त्याच्याबरोबर पाठवून द्या; व हे प्रिया आपले स्वहित साधा. ॥ ८ ॥
तुमच्या कुलरूपी कमलवनाला दुःख देणारी (करपून टाकणारी) शीत निशेसारखी ही सीता आली आहे. ॥ ९ ॥
नाथ ! ऐका. सीता रामार्पण केल्याशिवाय तुमचे हित शंकर व ब्रह्मदेव सुद्धा करू शकणार नाहीत. ॥ १० ॥
रामाबाण सर्पसमूहासारखा असून राक्षसमूह हे बेडकांच्या समूहासारखे आहेत. जोपर्यंत गिळत नाहीत तोपर्यंतच हट्ट सोडून प्रयत्न करा. ॥ दो. ३६ ॥
शठ ऐकुनी तिची ती वाणी । विहसे विश्वविदित अभिमानी ॥
भित्रा नारी स्वभाव साचें । मंगलात भय मन अतिकाचें ॥
मर्कट कटक भार जर येइल । खाति विचारे निशिचर जगतिल ॥
कापति लोकप ज्याच्या त्रासें । त्याची नारि सभय, बहु हासें ॥
वदुनि हसुनि आलिंगुनि तिजला । ममता अधिका सभे चालला ॥
चिंता चित्तीं मंदोदरिला । विधि विपरीत वळे निज पतिला ॥
बसे सभें अशि खबर मिळाली । सिंधु पार सेना सब आली ॥
पुसे ’सचिव ! मत उचित वदावें’ । ते सब हसले स्वस्थ बसावें ॥
विजित सुरासुर तैं श्रम नाहीं । नर वानर या किंमत कांहीं ॥
दो :- सचिव वैद्य गुरु हे प्रिय लोभ-भयें वदतील ।
राज्य धर्म तनु तीन तरी सत्वर विनाशतील ॥ ३७ ॥
अभिमानी म्हणून जगात प्रसिद्ध असलेला तो दुर्जन तिची ती वाणी ऐकून मोठ्याने हसला. ॥ १ ॥
(व म्हणाला) स्त्रियांचा स्वभाव भित्रा हेच खरे ! मंगलात सुद्धा भय ! याचाच अर्थ मन अति कच्चे, कोवळे ! ॥ २ ॥
जर मर्कटांच्या सैन्याचे समूह आले तर बिचारे राक्षस खातील व जगतील. ॥ ३ ॥
ज्याच्या भयाने लोकपाल थरथर कापतात त्याची पत्नी भयभीत झाली, हे फार हास्यास्पदच आहे. ॥ ४ ॥
असे म्हणून मोठ्याने हसून तिला अधिक ममतेने आलिंगन दिले व अधिक ममतेने सभेत चालला. ॥ ५ ॥
मंदोदरीच्या मनात चिंता उत्पन्न झाली की, आपल्या प्रिय पतीवर दैवच उलटले यात शंकाच नाही. ॥ ६ ॥
सभेत जाऊन बसल्यावर अशी बातमी मिळाली की समुद्राच्या पलिकडे सर्व वानरसेना आली आहे. ॥ ७ ॥
तेव्हा त्याने विचारले की सचिवांनो, योग्य ते मत सांगा. सर्व हसले व म्हणाले स्वस्थ रहावे. ॥ ८ ॥
सर्व देव दानवांना जिंकले, तेव्हा श्रम पडले नाहीत, मग नर-वानर यांची काय किंमत ? ॥ ९ ॥
सचिव, वैद्य व गुरु तिघे जर लोभाने वा भयाने प्रिय बोलतील तर राज्य, धर्म व देह या तिघांचा लवकरच विनाश होईल. ॥ दो. ३७ ॥
तोच रावणा योग मिळाला । घालिति किति कानीं स्तुति माला ॥
जाणुनि समय बिभीषण आला । भ्रातृचरणिं शिर नमिता झाला ॥
बसे निजासनिं पुनरपि वंदुनि । वदे वचन अनुशासन पावुनि ॥
जर कृपाल मज पुसिली वार्ता । वदतो हिता यथामति ताता ! ।
जो कांक्षी कुणि निज कल्याणां । सुयश सुमति शुभ गति सुख नाना ॥
तो स्वामी ! परनारि-मुखानां । त्यजो चतुर्थि चंद्र सम जाणां ॥
धनी चतुर्दश भुवनांचा ही । भूत-द्रोहें टिकत किं नाहीं ॥
गुणसागर नागर नर असला । तिळ लोभें कुणि म्हणति नच भला ॥
दो :- काम कोप मद लोभ सब नाथा ! नरका पंथ ॥
सोडुनि सब रघुवीर ही भजा भजति ज्यां संत ॥ ३८ ॥
पण रावणाला अहितकर असेच साह्य मिळाले. सचिवांनी त्यांच्या कानात कितीतरी स्तुती सुमनांच्या माळा घातल्या. ॥ १ ॥
योग्य वेळ जाणून बिभीषण सभेत आला व त्याने वडील भावाच्या पायावर मस्तक नमवून नमस्कार केला. ॥ २ ॥
हे कृपालू, ताता ! मला आपण ज्या अर्थी ही गोष्ट विचारलीत त्या अर्थी मी आपल्या बुद्धीप्रमाणे हित सांगतो. ॥ ४ ॥
बिभीषण गीता -
ज्या कोणाला आपले कल्याण व्हावे अशी इच्छा असेल, ज्याला सुयश, सुबुद्धी, शुभगती व नाना प्रकारच्या सुखांची इच्छा असेल; ॥ ५ ॥
स्वामी ! लक्षात घ्या, की त्याने गणेश चतुर्थीच्या चंद्राप्रमाणे परस्त्रियांचे मुख सुद्धा अवलोकन करू नये. ॥ ६ ॥
चौदा भुवनांचा स्वामी सुद्धा भूतद्रोह केल्याने टिकत नाही. ॥ ७ ॥
मनुष्य गुणसागर नागर (शहरी सुसंस्कृत) पण तिळभरही परधनाचा लोभ असेल तर त्याला कोणीही चांगला म्हणत नाहीत. ॥ ८ ॥
नाथ ! काम क्रोध मद लोभ इ. सर्व नरकास नेणारे मार्ग आहेत, त्या सर्वांना सोडून त्या रघुवीरासच भजा, शरण जा, ज्यास संत भजतात. ॥ दो. ३८ ॥
तात ! राम ना नरभूपाळ हि । भुवनेश्वर काळाचा काळ हि ॥
ब्रह्म अनामय अज भगवंत । व्यापक अजित अनादि अनंत ॥
गो-द्विज-धेनु-देव हितकारी । कृपासिंधु मानुष-तनुधारी ॥
जन रंजन खलगण भंजक ते । बंधू वेदधर्मरक्षक ते ॥
त्यजुनि वैर नमणें त्यां माथा । प्रणतार्ती-भंजन रघुनाथा ॥
द्यावी प्रभुस नाथ ! वैदेही । भजा राम निर्हेतू स्नेही ॥
प्रभु ना त्यजिति शरण जो गेला । जगद्द्रोह-अघ जरि केलेला ॥
नाम जयाचें त्रितापनाशन । प्रभु तो प्रगट समज मनिं रावण ॥
दो :- नमितो वारंवार पद विनवितसें दशशीस ॥
मान मोह मद टाकुनी भजा कोशलाधीश ॥ ३९रा ॥
मुनि पुलस्ति कळवीति मज शिष्यमुखें ही मात ॥
प्रभुस कथित मी शीघ्र ती सुसमय पावुनि तात ॥ ३९म ॥
हे तात ! राम बाह्यांगी नरभूपाळच नाहीत तर ते भुवनेश्वर (परमात्मा) असून काळाचाही काळ आहेत. ॥ १ ॥
ते ब्रह्म आहेत, मायादोष रहित, जन्म रहित, षड्गुणैश्वर्य संपन्न, व्यापक, अजित, अनादि व अनंत आहेत. ॥ २ ॥
गो (पृथ्वी), ब्राह्मण, धेनु व देव यांचे हितकर्ते आहेत. कृपासागर आहेत म्हणून मनुष्यरूप घेतले आहे. ॥ ३ ॥
बंधू ! भक्तांचे मनोरंजन करणारे खल-समुदायाचा विनाश करणारे व वेदधर्माचे रक्षण करणारे ते दोघे बंधू आहेत. ॥ ४ ॥
त्या प्रणतांची दुःखे नष्ट करणार्या रघुनाथास वैर सोडून मस्तक नमवा. ॥ ५ ॥
आणि नाथ ! वैदेही प्रभूला परत द्या व त्या निर्हेतुक स्नेह करणार्या रामाला भजा. ॥ ६ ॥
ज्याने सर्व जगाचा द्रोह करण्याचे पाप केले असेल, तो सुद्धा जर शरण गेला तर प्रभू त्याचाही त्याग करीर नाहीत. ॥ ७ ॥
ज्यांचे नाम सुद्धा त्रितापांचा विनाश करणारे आहे, तोच प्रभू प्रगट झाला आहे. हे रावणा ! मनात नीट समज. ॥ ८ ॥
हे दशशीर्षा, मी तुमच्या पायांना वारंवार नमन करतो व विनवितो की, मान, मद मोह इ. सोडा, आणि कोसलाधीशाला शरण जा. ॥ दो. ३९ रा ॥
पुलस्ती मुनींनी ही फार महत्त्वाची गोष्ट मला कळविली होती तीच मी योग्य समय मिळताच हे तात ! शीघ्रतेने स्वामींना सांगितली. (त्यात माझ्या पदरचे काहीही नाही)॥ ३९ म ॥
सचिव माल्यवान् चतुर वयस्कर । अति सुख मानी श्रवुनि वचन वर ॥
तात अनुज तव नीति-विभूषण । धरा मनीं जें कथित बिभीषण ॥
रिपु-उत्कर्ष कथिति शठ दोनी । दूर करां, न असे का कोणी ? ॥
माल्यवंत निज गृहा परतला । मग कर जुळुनि बिभीषण वदला ॥
सुमति कुमति सर्वांतरिं वसति । नाथ ! पुराण निगम हे वदती- ॥
सुमति तिथें संपत्ती नाना । कुमति तिथें किं विपत्ति निदानां ॥
तव हृदिं कुमति वसे उलटी, तरि । अहिता हित मानितां मित्र अरि ॥
काळरात्र निशिचर वंशाप्रति । सीतेवर त्या प्रीति करां अति ॥
दो: - तात धरुनि पद मागतो मम राखा प्रेमास ॥
द्या सीता रामा, अहित तुमचें होइ न खास ॥ ४० ॥
माल्यवंत नावाचा चतुर व वयस्क सचिव ते उत्तम भाषण ऐकून अति सुख मानता झाला. ॥ १ ॥
तो म्हणाला तात ! तुमचा धाकटा भाऊ नीतीविभूषण आहे, म्हणून बिभीषणाने जे सांगितले ते मनावर घ्या. ॥ २ ॥
रावण म्हणाला, हे दोन्ही शठ शत्रूचा उत्कर्ष सांगत आहेत. यांना दूर करा रे कोणीतरी ! ॥ ३ ॥
माल्यवंत आपल्या घरी परत गेला. मग पुन्हा हात जोडून बिभीषण म्हणाला - ॥ ४ ॥
नाथ ! सुमती वा कुमती सर्वांच्याच हृदयात राहतात आणि वेद व पुराणे असे सांगतात की, जिथे सुमति असते तेथे नाना प्रकारची संपत्ती असते व जेथे कुमति असते तेथे विपत्ति व संपत्तिनाश हे ठरलेलेच ! ॥ ५-६ ॥
तुमच्याच हृदयात उलट कुमति वास करीत आहे, आणि म्हणूनच तुम्ही शत्रूला हितचिंतक (मित्र) व मित्राला शत्रू मानीत आहांत. ॥ ७ ॥
उदाहरणार्थ - राक्षकुलाला काळरात्र बनून आलेली सीता, त्या सीतेवर तुम्ही अति प्रीती करता. ॥ ८ ॥
हे तात ! मी तुमचे पाय धरून मागणे मागतो, माझ्या प्रेमाखातर एवढे करा. सीता रामाला द्या म्हणजे तुमचे अहित तरी नक्कीच होणार नाही. ॥ दो. ४० ॥
श्रुति पुराण बुध संमत वाणी । वदला बिभीषण नीती वानी ॥
श्रवत दशानन रोषें उठला । मृत्यु निकट ये अतां तुज खला ॥
जगसि सदा शठ मीच जगवला । रिपुचा पक्ष मूढ तुज रुचला ॥
वदसि न खल ! जगिं कोण असाही । मी भुजबळें विजित जो नाहीं ॥
मम पुरिं वसुनि तापसीं प्रीती । शठ मिळ जा त्यां सांग किं नीती ॥
वदुनि असें करि पद-प्रहारां । अनुज धरी पद वारंवारां ॥
हीच उमे संतांची महती । अपकारां करतां हित करती ॥
भलें पित्यासम मला मारलें । राम भजत हित नाथ आपलें ॥
सचिवां सहित गगनपथिं जाउनि । वदे असे सर्वांस बजाउनि ॥
दो :- राम सत्यसंकल्प प्रभु सभा तुझी वश काल ॥
शरण रघुविरा जात मी दोष न आतां द्याल ॥ ४१ ॥
वेद, पुराण व संत यांना संमत असलेले भाषणच बिभीषणाने केले व नीतीचे वर्णन केले (पण व्यर्थ, परिणाम उलटाच झाला). ॥ १ ॥
हे ऐकताच दशानन रोषाने उठला व म्हणाला की, रे खला ! मृत्यु तुझ्याजवळ आला आहे. ॥ २ ॥
शठा ! मीच सदा जगवला म्हणून आज जिवंत आहेस, आणि मूढा ! तुला शत्रूचा पक्ष रुचला ? आँ ! ॥ ३ ॥
जगात असा कोण आहे की मी ज्याला माझ्या भुजबळाने जिंकला नाही ? दुष्टा का नाही सांगत ? ॥ ४ ॥
माझ्या नगरीत राहून त्या गोसावड्यावर प्रीती करतोस ? शठा ! जा, त्याच्याचकडे जा व सांग त्याला नीती ! ॥ ५ ॥
असे म्हणून रावणाने त्यास लाथ मारून दूर सारले. पण अनुजाने पुन्हा पुन्हा त्याला नमन केले. ॥ ६ ॥
उमे ! संतांची हीच महती असते की उपकार करण्यार्याचेही ते हितच करतात. ॥ ७ ॥
बिभीषण म्हणाला ! तुम्ही पित्याप्रमाणे मला मारलेत, चांगलेच केलेत, पण नाथ ! रामभक्तीनेच तुमचे हित होईल हे मी पुनः सांगतो. ॥ ८ ॥
शेवटी नाईलाजास्तव सचिवांना बरोबर घेऊन आकाशमार्गात गेला व सर्वांना बजावून असे म्हणाला - ॥ ९ ॥
राम प्रभू आहेत, सत्य संकल्प आहेत आणि तुझी सभा काळाला वश झाली आहे. मी आता रघुवीरास शरण जात आहे. आता मात्र मला कोणीही दोष देऊ नका. ॥ दो. ४१ ॥
गत हें वदुनि बिभीषण जेव्हां । आयुहीन सब झालें तेव्हां ॥
साधु-अवज्ञा त्वरित भवानी । करी अखिल कल्याणां हानी ॥
रावण बिभीषणा जै त्यागी । तैंच होइ गत विभव अभागी ॥
हर्षित रघुपतिकडे निघाला । मनीं करित किति मनोरथांला ॥
निरखिन जाउन चरणाब्जांना । अरुण मृदुल सेवक-सुखदांना ॥
पद लागत तरली ऋषिनारी । जे दंडकवन पावनकारी ॥
जें पद जनक सुता हृदिं धरते । कपट कुरंगा-संगिं धावते ॥
हर-उरसरिं सरोज पद जेही । अहो भाग्य मी पाहिन तेही ॥
दो :- मन ज्या पद-पादुकांमधिं राहिं भरत लाऊन ॥
ते पद आज बघेन या नेत्रिं अतां जाऊन ॥ ४२ ॥
असे सांगून जेव्हा बिभीषण गेला तेव्हाच ते सारे सभासद गतायुषी झाले. ॥ १ ॥
भवानी ! साधूचा अपमान सकल कल्याणांची शीघ्र हानी करतो. ॥ २ ॥
जेव्हा रावणाने बिभीषणाचा त्याग केला तेव्हा तो गतवैभव झालेला अभागी बनला. ॥ ३ ॥
विभीषणाचे मनोरथ -
बिभीषण अत्यानंदाने रघुपतीकडे जाण्यास निघाला. तो मनांत अनेकानेक मनोरथ रचितच ! ॥ ४ ॥
जाऊन अरुण वर्णाच्या व कोमल सेवकांना सुखदायक अशा चरण-कमलांना निरखून पाहीन. ॥ ५ ॥
जे पाय लागताच ऋषीनारी (अहल्या) तरली व जे दंडकारण्यास पावनकारी ठरले. ॥ ६ ॥
कपट मृगाच्या पाठोपाठ धावणार्या ज्या चरणकमलांना जनकसुतेने हृदयांत धारण केले आहे. ॥ ७ ॥
शंकरांच्या मन-मानससरोवरात जे चरण-कमलासारखे राहतात, ते आज मी पाहीन ! धन्य माझे भाग्य ! ॥ ८ ॥
ज्या पायांच्या पादुकांमध्ये भरताने आपले मन लावून ठेवले आहे - ते पाय मी (राक्षस असूनही) या डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहीन ! काय माझे भाग्य थोर ! ॥ दो. ४२ ॥