|
॥ श्रीरामचरितमानस ॥ (मराठी अनुवाद) ॥ अयोध्याकाण्ड ॥ अध्याय २८ वा ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥ Download mp3 प्रभु पद पद्म पराग शपथ जी । सत्य सुकृत सुख सीमा शुभ ती ॥ छं० :- स्नेहें शिथिल रघुराज साधु समाज मुनि मिथिलापती ॥ प्रभूच्या चरणकमलरजांची जी शपथ तीच सत्य सुकृत व सुख यांची शुभ सीमा आहे ( मग प्रभुपद रज व प्रभुपद यांचे काय सांगावे ?) ॥ १ ॥ ती शपथ घेऊन जागृती निद्रा, व स्वप्नातील हृदयाची रुची सांगतो ॥ २ ॥ देवा ! स्वार्थ चार पुरुषार्थ आणि छल यांना सोडून स्वाभाविक स्नेहाने स्वामींची सेवा करणे ॥ ३ ॥ उत्तम स्वामींची आज्ञा पालन करणे यासारखी दुसरी सेवा नाही, देवा ! तोच प्रसाद या दासाला लाभो ॥ ४ ॥ असे म्हणताच भरत भारी प्रेमव्याकुळ झाले अंगावर रोमांच उठले व डोळ्यांत पाणी आले ॥ ५ ॥ व ( असे) व्याकुळ होऊन प्रभूचे चरणकमल धरले, त्या वेळेचा स्नेह व तो समय यांचे वर्णन करता येत नाही ॥ ६ ॥ कृपासागर रामचंद्रांनी गोड सुंदर शब्दांनी त्यांचा सन्मान करुन हाताला धरुन त्यांस जवळ बसविले ॥ ७ ॥ भरतांनी केलेली विनंती ऐकून आणि त्यांचा स्वभाव पाहून सभा आणि रघुराजही स्नेहाने शिथिल झाले ॥ ८ ॥ रघुराज साधुसमाज, मुनी वसिष्ठ व मिथिलापती विदेह स्नेहाने शिथिल झाले; व मनातल्या मनांत बोलण्याची शक्ती न राहील्यामुळे भरताची भक्ती व बंधुभाव यांचा अति महिमा फार वाखाणू लागले मलिन झाल्यासारखे विबुध भरताची प्रशंसा करीत सुमन वर्षू लागले तुलसीदास म्हणतात की हे ऐकून ( दोन्ही समाजातील) सर्व लोक रात्री कमळे संकोचतात तसे संकुचित झाले ॥ छंद ॥ दोन्ही समाजातील सर्व नारी नर दीन व दु:खी झाले आहेत असे पाहून महामलीन मधवा ( इंद्र) मेलेल्यांना मारुन आपले मंगल करु बघत आहे ॥ दो० ३०१ ॥ कपट कुचाल सीम सुरराजहि । पर-हानी प्रिय अपलें काजहि ॥ दो० :- भरत जनक मुनिजन सचिव ज्ञानि साधु वाचून ॥ सुरराज कपट व कुचाल यांची सीमा आहे व त्याला दुसर्याची हानी प्रिय वाटते व आपले कार्य प्रिय वाटते ॥ १ ॥ पाक दैत्याचा रिपु जो इंद्र त्याची रीती कावळ्यासारखी कुटील व मलीन असून कोणावरही विश्वास नाही ॥ २ ॥ पूर्वीच कुविचाराने कपट एकत्र केले होते त्याचे उच्याटन आता सर्वाच्या शिरावर घातले ॥ ३ ॥ ( त्यामुळे) सुरमायेने सर्वलोक विशेष मोहित झाले. पण त्यांचे अतिशय राम प्रेम नष्ट झाले नाही ॥ ४ ॥ तथापि उच्याटनामुळे भय वाटू लागले मन स्थिर राहीले नाही क्षणभर वनाची आवड वाटते तर दुसर्याच क्षणीं घर प्रिय वाटते ॥ ५ ॥ सरिता व सागर यांच्या संगमाच्या ठिकाणी जशी जलाची गति तशीच जणू द्विधा मनोगती झाल्याने लोक अति दु:खी झाले आहेत ॥ ६ ॥ दुश्चित = किंकर्तव्य मूढ झाल्याने चित्ताला कुठेही संतोष नाही पण हे मर्म ( आपल्या मनाची स्थिती) कोणी कोणाला सांगत नाही ॥ ७ ॥ हे जाणून कृपानिधान मनात हसून मनातच म्हणतात की श्वान, युवान व मधवान हे सारखेच आहेत ॥ ८ ॥ भरत, जनकराजा, वसिष्ठादि मुनीसमाज, सचिव ज्ञानी साधू यांच्या शिवाय इतर सर्व लोकांना ज्यांच्या त्यांच्या योग्यते प्रमाणे ( कमी जास्त प्रमाणात) देवमायेने ग्रासले ॥ दो० ३०२ ॥ दिसले कृपाब्धिला जन विव्हळ । स्नेहें निज भारी सुरपति छळ ॥ दो० :- भरत विमल यश विमल विधु सुमति चकोर कुमारि ॥ आपल्या फार स्नेहाने व सुरपतीच्या प्रभळ मायेने लोक फार व्याकुळ झाले आहेत हे कृपासिंधु रामचंद्रांस दिसले ॥ १ ॥ सभा, जनकराजा, गुरुवसिष्ठ, कौशिकादि महीसुर व मंत्री यांच्या सर्वांच्या बुद्धिला भरताच्या प्रबल भक्तीने नियंत्रित केले आहे ( ती क्रियाशील होऊ शकत नाही) ॥ २ ॥ हे सर्व चित्रांत रेखाटल्यासारखे रामाच्या मुखाकडे निरखीत राहीले आहेत व दुसर्यांनी पढविल्यासारखे बोलण्यास संकोच वाटत आहे ( म्हणून कोणी काही बोलत नाही) ॥ ३ ॥ भरताची प्रीती, विनंती, नम्रता व मोठेपणा ऐकणे सुखद वाटते पण वर्णन करणे कठीण वाटत आहे ॥ ४ ॥ ज्यांच्या भक्तीच्या लवलेशाला पाहून सर्व मुनी व मिथिलापती प्रेममग्न झाले ॥ ५ ॥ त्यांचा महिमा तुलसीदासास कसा वर्णन करता येईल ? पण भक्तीच्या स्वभावाने सुमतीला उल्हासित केली ॥ ६ ॥ पण स्वत: लहान व महिमा मोठा हे जाणून कविकुलाच्या मर्यादेला मान देऊन ती लाजली ॥ ७ ॥ गुणवर्णन करण्याची अपार रुची आहे पण वर्णन करुं शकत नाही; कारण मतीची गती बालकाच्या वाणीसारखी कुंठित झाली ॥ ८ ॥ भरताचे विमल यश हा पूर्णचंद्र होय व तुलसीदासांची सुमणी चकोर – कुमारी होय; निर्मल राम – सेवकाच्या निर्मल हृदयरुपी विमल आकाशात उगवलेल्या त्या चंद्राकडे ती टक लावून ( तटस्थ होऊन) बघतच राहीली आहे ॥ दो० ३०३ ॥ भरत स्वभाव निगमां सुगम न । कवि ! लघुमतिचें क्षमा चपलपण ॥ दो० :- कर्म वचन मानस विमल तुम्हीं तुम्हां सम तात ॥ भरताचा स्वभाव वेदांना सुद्धा सुगम नाही, म्हणून कवि हो ! या लधुमतिच्या चपलपणाची क्षमा करा ॥ १ ॥ भरताच्या सद्भावाचे श्रवण कथन केल्याने सीतारामपदी कोण रत होणार नाही ? ॥ २ ॥ भरताचे स्मरण केल्याने ज्यास रामप्रेम सुलभ होणार नाही त्याच्यासारखा करंटा जगांत कोणी नाही ॥ ३ ॥ दयाळू व सुज्ञ रामचंद्रांनी सर्वांची दशा व भक्तांच्या जीवीची स्थिती जाणली ॥ ४ ॥ ( आणि) धर्मधुरीण, धीर, नीती-निपुण व सत्य – स्नेह शील व सुख – सागर ॥ ५ ॥ नीतीचे व प्रीतीचे पालन रघुराज देशकाल परिस्थिती व समाज पाहून ॥ ६ ॥ वाचन बोलले; ते वाणीच्या सर्वस्वा सारखे परिणामी हित करणारे, कानांना चंद्रामृतासारखे आहे ॥ ७ ॥ जाणा तात तरणिकुल रीती । सत्यसंघ पितृ कीर्ती प्रीती ॥ दो० :- राज्य काज सब लाज पत धर्म धरणि धन धाम ॥ ( पण मला राहवतच नाही म्हणून सांगतो) तात तुम्ही तरणि = सूर्यकुलाची रीत सत्यप्रतिज्ञ पित्याची कीर्ती व प्रीती ॥ १ ॥ गुरुजनांची लाज समाज व समय, मित्र – शत्रू – मध्यम यांचे हृदय या सर्व गोष्टी जाणतां ॥ २ ॥ तुम्हांला सर्वांचे कर्म, तुमचे स्वत:चे परम – हित व धर्म आणि माझे परमहित हे सर्व माहीत आहे ॥ ३ ॥ मला तुमचा भारी भरवसा वाटतो तथापि प्रसंगानुसार कांही सागतो ॥ ४ ॥ नाथ ! पित्याच्या अभावी होणारी आपली दुर्दशा केवळ कुलगुरुंच्या पूर्ण कृपेने वाचली आहे ॥ ५ ॥ नाही तर प्रजा, सेवक वर्ग व परिवार यांचा सुद्धा नाश झाला असता ॥ ६ ॥ सूर्य – दिनेश जर अकाली मावळला तर जगात कोणाला क्लेश होणार नाहीत सांगा बर ! ॥ ७ ॥ तसाच हा दैवाने उत्पात केला होता पण मुनी ( वसिष्ठ) व मिथिलापती यांनी वाचवला ॥ ८ ॥ सर्व राज्यकार्य, लाज व पत ( प्रतिष्ठा) धर्म, धरणी, धन व घर या सर्वाचे पालन गुरु महिमाच करील व परिणाम शुभ होईल ॥ दो० ३०५ ॥ सहित समाजा तुमचा अमचा । गृहिं वनिं पाता प्रसाद गुरुचा ॥ दो० :- सेवक कर पद नयनसे स्वामी मुखा स्मान ॥ समाजासहित तुमचा घरी व आमचा वनात रक्षक गुरुप्रसादच आहे ॥ १ ॥ गुरु, माता, पिता व स्वामी यांची आज्ञा ( पालन) सकल धर्मरुपी धरणीला धारण करणारा शेष आहे ॥ २ ॥ ( म्हणून) ते आज्ञापालन तुम्ही करावे व मला करु द्यावे व तात ! तुम्ही तराणे कुलाचे पालक व्हावे ॥ ३ ॥ ( आज्ञा ही) साधकाला सर्वच सिद्धी देणारी एक कीर्ती सद्गती व भूतीमय त्रिवेणीच आहे ॥ ४ ॥ या विचाराने मोठे संकट सोसणे व प्रजेला व परिवाराला तुम्ही सुखी करणे योग्य आहे ॥ ५ ॥ विपत्ती माझ्यासह सर्वांमध्येच विभागली गेली आहे, पण तुम्हाला १४ वर्षांच्या अवधित फार कठिण आहे ॥ ६ ॥ तुम्ही मृदु आहात हे कळत असून सुद्धा मी तुम्हाला कठीण कार्य सांगत आहे, पण हे माझे करणे अनुचित नाही कारण की काळच कठीण आहे ॥ ७ ॥ संकटकाळी चांगले बंधूच साह्य करतात, हातच वज्राचे घाव निवारण करतो ॥ ८ ॥ सेवक हात, पाय, डोळे यांच्यासारखे असावे आणि स्वामी मुखासारखा असावा. तुलसीदास म्हणतात की ही प्रीतीची रीती ऐकून सुकवी तिचे गान – प्रशंसा करतात. ॥ दो० ३०६ ॥ श्रवुनि सभा सब रघुवर भाषित । प्रेमपयोधि सुधेमधिं मिश्रित ॥ दो० :- देव ! देव अभिषेचना संमतिनें गुरुराय ॥ प्रेमरुपी क्षीरसागरांतून काढलेल्या अमृतात मिसळलेले रघुवराचे भाषण ऐकून ॥ १ ॥ ते सर्व लोक स्नेहसमाधीत ( मग्न झाल्यामुळे) शिथिल झाले, हे पाहून शारदेने मौन धरले ॥ २ ॥ भरताला परम परितोष प्राप्त झाला की नाथ प्रसन्न झाले आणि दु:ख व दोष विमुख झाले गेले ॥ ३ ॥ मुख प्रसन्न झाले ( कारण) मन प्रसन्न होऊन विषाद नष्ट झाला ( व इतका आनंद झाला की) जणू मुक्याला सरस्वतीचाच प्रसाद मिळाला ॥ ४ ॥ पुन्हा प्रेमाने प्रणाम करुन कमलांसारखे हात जोडून भरत म्हणाले की - ॥ ५ ॥ नाथ ! आपल्याबरोबर ( वनांत) गमन करण्याचे सुख मला मिळाले व या जगांत जन्मास आल्याचा लाभही मिळाला ॥ ६ ॥ देव आता कृपाल ! आपण जी आज्ञा द्याल ती मी शिरसामान्य करुन आदराने पालन करीन ॥ ७ ॥ पण देवा ! ज्याची सेवा करुन ( १४ वर्षांचा) अवधि लंघन करता येईल असा काहीतरी आधार द्या ॥ ८ ॥ देव ! आपल्या अभिषेकासाठी गुरुरायांच्या संमतीने सर्व तीर्थाचे जल आणले आहे, त्याचे काय करु ती आज्ञा द्यावी ॥ दो० ३०७ ॥ महा मनोरथ एक मना ही । भय संकोचें वदवत नाहीं ॥ दो० :- भरत राम संवाद सब परिसुनि मंगल मूल ॥ एक मोठा मनोरथ मनात आहे, पण भयाने व संकोचाने सांगवत नाही ॥ १ ॥ तात ! सांगा ! असे जेव्हा प्रभु म्हणाले तेव्हा भरत स्नेहाने सुंदर बोलले ॥ २ ॥ पवित्र चित्रकूट त्यावरील पवित्र तीर्थे, पवित्र स्थळे, पावन वन, खग पशु, तलाव, नद्या, निर्झर व पर्वत समूह ॥ ३ ॥ आणि विशेष करुन प्रभूच्या चरणांनी अंकित झालेली अवनी इ. सर्व आज्ञा मिळाली तर नि:शेष ( एकदा) पहावी अशी फार इच्छा आहे ॥ ४ ॥ तात ! अत्रि मुनींची आज्ञा अवश्य द्यावी व निर्भयपणे वनांत हिंडावे ॥ ५ ॥ बंधो ! मुनींच्या कृपेने वन मंगलदायक, परम पावन व परम रमणीय झाले ॥ ६ ॥ ऋषिनायक – अत्रि जेथे सांगतील तेथे सर्व तीर्थजल ठेवावे ॥ ७ ॥ प्रभूचे वचन ऐकून भरत सुखी झाले व त्यांनी अत्रीमुनींच्या चरणकमलावर आनंदाने मस्तक ठेवले ॥ ८ ॥ सकल मंगलमूल असा भरत – राम संवाद ऐकून सगळ्य़ा स्वार्थी देवांनी प्रशंसा करुन कल्पवृक्षांच्या फुलांचा वर्षाव केला ॥ दो० ३०८ ॥ धन्य भरत गोस्वामि राम जय । देव बळें वदतात हर्षमय ॥ दो० :- वदले भरता अत्रि कीं शैल समीप सुकूप ॥ धन्य भरत, धन्य भरत, जय गोस्वामी राम, जय गोस्वामी राम ! जोरजोराने म्हणत देव हर्षमय झाले ॥ १ ॥ वसिष्ठादि मुनी, मिथिलापती जनक व सगळी सभा यांना भरताचे भाषण ऐकून उत्साह चढला ॥ २ ॥ भरत व राम यांचे गुणसमूह व सुंदर स्नेह यांची विदेहराज पुलकित होऊन प्रशंसा करु लागले ॥ ३ ॥ सेवक व स्वामी यांचा स्वभाव सुंदर आणि त्यांचे प्रेम व नेम अति पावनांना सुद्धा पावन करणारे आहे असे म्हणून जे ते आपापल्या बुद्धिप्रेमाने प्रशंसा करु लागले ( व प्रशंसा करता करता) सचिव सभासद इ. सर्वच अनुराग मग्न झाले ॥ ४-५ ॥ राम-भरत संवाद ऐकून दोन्ही समाज ( राजपरिवार) हर्षविशादांना वश झाले ॥ ६ ॥ रामजननीने दु:ख व सुख समान मानले व राण्यांचे सांत्वन करण्यासाठी रामगुणांचे वर्णन केले ॥ ७ ॥ कोणी रघुवीराची महती वर्णू लागतात तर कोणी भरताची सुजनता वर्णन करीत आहेत ॥ ८ ॥ भरत कूप व भरत चित्रकूट यात्रा – अत्रि ऋषी भरतांस म्हणाले की या पर्वताच्या जवळच एक शुद्ध पवित्र सुकूप आहे, तेथे हे पावन अनुपम, अमृतासारखे पुष्कळ तीर्थजल तेथे ठेऊ ॥ दो० ३०९ ॥ भरत अत्रि अनुशासन पावुनि । जलपात्रें सब देती धाडुनि ॥ दो० :- वदत कूप महिमा सकल गत जेथें रघुराव ॥ अत्रि मुनींची आज्ञा मिळतांच भरतांनी तीर्थजलाची सर्व पात्रे ( पुढे) पाठवून दिली ॥ १ ॥ मग अनुज ( शत्रुघ्न) अत्रि, इतर मुनी व साधू यांच्या सहित भरत जिथे अगाध कूप होता तेथे गेले ॥ २ ॥ ते पावन जल त्या पुण्यस्थळीं ठेवले, तेव्हा अत्रि आनंदित होऊन प्रेमाने असे म्हणाले की - ॥ ३ ॥ तात ! हे सिद्धस्थळ असून अनादि आहे. ( परंतु) काळाने लुप्त झाल्यामुळे ( कोणाला) अगदी माहीत नव्हते ॥ ४ ॥ जेव्हा सेवकांनी हे स-रस ( सजल व सुंदर) स्थळ पाहीले तेव्हा चांगल्या पाण्यासाठी त्यांनी हा कूप खणला ॥ ५ ॥ दैवयोगाने विश्वावर उपकारच झाले .( कारण) जो धर्म विचार सुद्धा अति अगम होता तो सुगम झाला ॥ ६ ॥ आता याला ‘ भरतकूप ’ म्हणतील, हा अतिपावन तीर्थजलाच्या योगाने अति पावन झाला आहे ॥ ७ ॥ जे प्राणी प्रेमाने व नेमाने स्नान करतील ( या जलाने) ते कर्माने – मनाने – वाणीने विमल होतील ॥ ८ ॥ कूप महिमा वर्णन करीत सर्व लोक परतले व जेथे रघुराज होते तेथे गेले मग अत्रींनी या तिर्थात असलेला पुण्याचा प्रभाव रघुवरास सांगितला ॥ दो० ३१० ॥ वदत धर्म इतिहासां प्रीती । उजाडले गत रात्र सुखी ती ॥ दो० :- जृंभत वदतां राम सब सिद्धि सुलभ कोणांहि ॥ प्रीतीने धार्मिक ऐतिहासिक सांगण्यात ( व ऐकण्यात) ती रात्र सुखात गेली व उजाडले ॥ १ ॥ अनुजा सहित भरतांनी आपले नित्यकर्म उरकले आणि राम व गुरु वसिष्ठ यांची आज्ञा घेतली ॥ २ ॥ साज ( वेषभूषा) केलेले ते दोघे समाजासहित रामवनांत फिरण्यासाठी पायी निघाले ॥ ३ ॥ ते ( भरत – शत्रुघ्न) कोमल चरणांनी अनवाणी चालत आहेत ( असे पाहून) मही मृदु झाली पण तिला मनांत संकोच वाटत आहे ॥४॥ कुश, कांटे, खडे, खाजकुहिली, कुसळे, कठोर – कठिण वस्तु, आणि घाणेरडे अपवित्र पदार्थ वस्तु इ. लपविले गेले ॥ ५ ॥ ( याप्रमाणे) मही मृदु व सुंदर करुन त्रिविध वायू सुखदायक बनून ॥ ६ ॥ देवफुले वर्षून मेघ छायेने, वृक्ष फुलाफळांनी, तृण मृदुतेने ॥ ७ ॥ हरिणे वगैरे पशु ( प्रेमाने) पाहून व पक्षी आपल्या मधुर बोलण्याने सर्व भरत रामप्रिय आहेत हे जाणून त्यांची सेवा करु लागले ॥ ८ ॥ जांभई देत असता जे ‘ राम ’ म्हणतात त्या कोणालाही सकल सिद्धी सुलभ होतात; भरत तर रामचंद्रांना प्राणप्रिय आहेत, म्हणून त्यांच्या बाबतीत हे काही नवल नाही ॥ दो० ३११ ॥ विपिनीं फिरत भरत या रीतीं । प्रेम नेम मुनि बघुनि लाजती ॥ दो० :- क्षेत्र तीर्थ सब पाहिलीं भरतें पांच दिनांत ॥ या पुढे दिलेल्या पद्धतीने भरत वनांत फिरत असतां त्यांचे प्रेम व वेग पाहून मुनींना लाज वाटू लागली ॥ १ ॥ पुण्य जलाशय, भूमीचे विभाग पशु, पक्षी, तृण, तरु, पर्वत, वन बागा ॥ २ ॥ ही सर्व सुंदर, चित्र विचित्र व विशेषच पवित्र आणि सर्वच दिव्य ( आहेत असे) पाहून भरत ( अत्रि ऋषींना) विचारत ॥ ३ ॥ ते ऐकून ऋषीराज ( अत्रि) हेतु ( कारण) नाम, गुण व पुण्य प्रभाव आनंदाने सांगतात ॥ ४ ॥ मनात आनंदित होऊन ( प्रसन्न मनाने) कुठे तीर्थात स्नान करतात तर कुठे प्रणामच करतात कुठे नुसते दर्शनच घेतात व मनात प्रेम आनंद वाढतात ॥ ५ ॥ कुठे मनीची आज्ञा घेऊन बसतात व सीतेसहित रामलक्ष्मणांचे स्मरण ( ध्यान) करतात ॥ ६ ॥ स्नेह, उत्तम सेवा व स्वभाव पाहून वनदेव प्रमुदित होऊन आशीर्वाद देतात. ॥ ७ ॥ दररोज अडीच प्रहर दिवस गेल्यावर परत फिरतात व येऊन प्रभुषद कमलांचे दर्शन घेतात ॥ ८ ॥ ( त्याप्रमाणे) सर्व क्षेत्रे व तीर्थे भरतांनी पाच दिवसांत पाहीली हरिहर – सुयश कथन श्रवण करण्यात दिवस गेला व रात्र होत आली ॥ दो० ३१२ ॥ श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु |