|
॥ श्रीरामचरितमानस ॥ (मराठी अनुवाद) ॥ किष्किंधाकाण्ड ॥ ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥ अध्याय ४ था Download mp3 पदिं शिर नमुनि वदे, कर जोडी । नाथ ! नसे मम काहिंहि खोडी ॥ दो० :- ऐशी चर्चा चालतां आले वानर-यूथ ॥ पायावर मस्तक ठेवून, हात जोडून सुग्रीव म्हणाला, की नाथ ! माझा काहीही दोष नाही. ॥१॥ देवा ! तुमची माया अति प्रबल आहे व रामा ! तुम्ही जर दया केलीत तरच ती सुटते. ॥२॥ स्वामी ! देव, मानव (फार काय) मुनीसुद्धा विषयांना वश होतात ! मी तर पामर नीच पशु, वानर आणि अति कामी ! ( माझा पाड काय लागणार ?) ॥३॥ स्त्रीयांचे नेत्रकटाक्षरूपी बाण ज्याला लागले नाहीत, जो घोर क्रोधरूपी अंधार्या रात्रीत जो जागा असतो, आणि लोभरूपी पाश ज्याच्या गळ्याला बांधला गेला नाही तोवर हे राघुनाथा ! तुमच्या सारखाच होय. ॥४-५॥ हा गुण साधन करून मिळत नाही, तुमच्या कृपेने कोणी कोणी (विरळा, एखादाच) पावतो. ॥६॥ तेव्हा रघुपती हसून म्हणाले की, बंधु भरतासारखे तुम्ही मला प्रिय आहात. ॥७॥ आता मन लावून प्रयत्न करा की जेणे करून सीता शोध लागेल. ॥८॥ दो० अशी चर्चा चालू असताना, वानरांचे समूह आले आणि (थोड्याच वेळात) दशदिशांना त्रिविध वर्णाचे वानरच वानर (समूह) दिसू लागले. ॥दो.२१॥ दृष्ट उमे म्यां कीश कटक तें । मूर्खचि ते ’करुं गणना’ म्हणते ॥ दो० :- श्रवत वचन जेथें तिथें करिती कपी प्रयाण ॥ (महेश म्हणाले) उमे ! ते वानर सैन्य मी पाहिले आहे, त्याची गणना करू म्हणणारे मूर्खच ! (इतके ते अगणित होते). ॥१॥ सर्व येऊन मस्तक नमवून रामचरणांना नमन करीत आहेत व राममुखाचे अवलोकन करून सनाथ होत आहेत. ॥२॥ त्या सैन्यात असा एकही कपी राहीला नाही की रामचंद्रांनी ज्यास कुशल विचारले नाही. ॥३॥ प्रभूच्या बाबतीत यांत लेशमात्रही आश्चर्य नाही, कारण रघुराज व्यापक विश्वरूप आहेत. ॥४॥ आज्ञा मिळताच सारे जागच्या जागी उभे राहीले, नंतर सुग्रीवाने त्या सर्वाना समजावून सांगितले. ॥५॥ रामचंद्रांचे कार्य आहे आणि माझ्यावर उपकार होतील, म्हणून वानरयूथांनो, तुम्ही चारी दिशांना जा. ॥६॥ जाऊन जानकीचा शोध करा, मात्र एका महिन्यात परत आले पाहीजे. ॥७॥ शोध लावल्याशिवाय या मुदतीनंतर जे परत येतील त्यांचा वध करणे मला भाग पडेल (हे मात्र लक्षात ठेवा). ॥८॥ दो. आज्ञा ऐकताच कपी जिकडे तिकडे प्रयाण करते झाले, तेव्हा सुग्रीवाने गदगद होऊन अंगद नल हनुमान(विशेष तुकडीस) जवळ बोलावले. ॥दो. २२॥ ऐका नीलांगद हनुमान हि । जांबवंत मतिधीर सुजाणहि ॥ दो० :- जाति सकल वन धुंडित सर, सरि गिरी गुहेस ॥ हे नील, अंगद, हनुमान, जांबवंत ऐका तुम्ही सर्वच धीरबुद्धी व सुजाण आहात. ॥१॥ तुम्ही सर्व सुभटांनी मिळून दक्षिणेस जावे व सीतेचा पत्ता सर्वांना विचारावा. ॥२॥ सुग्रीव गीता : मनाने, शरीराने व वाणीने तुम्ही योग्य उपाय योजावे व रामकार्य सिद्धीस न्यावे. ॥३॥ सूर्याचे सेवन पाठीवर तर अग्निचे पोटाकडून करावे (सूर्याचे ऊन्ह पाठीवर व अग्निची उष्णता पोटावर घ्यावी). ॥४॥ आणि स्वामीची सेवा कपट सोडून जीवेभावे करावी. ॥४॥ मायेचा त्याग करून परलोकाची प्राप्ती करून घ्यावी. म्हणजे संसृतीजनित सर्व शोकादी नष्ट होतात. ॥५॥ (पण) बंधूंनो ! देह धारण केल्याचे हेच फळ की कामाचा त्याग करून रामाश्रय करावा व रामभक्ती करावी. ॥६॥ तोच खरा गुणज्ञ व तोच महान भाग्यवान की जो रामचरणी अनुरागी प्रेमी होतो ॥७॥ कोठें कुणि जैं निशिचर भेटे । प्राण घेति एकैक चपेटें ॥ दो० :- दिसे जात उपवन वर सर विकसित बहुकंज ॥ कोठे कोणी निशाचर भेटला की एकेक थोबाडीत मारून ते त्याचा प्राण घेतात. ॥१॥ ते नाना प्रकारांनी पर्वत व अरण्ये शोधीत असता कोणी मुनी आढळला की सर्वजण मिळून त्यास घेरून टाकतात. ॥२॥ कपि ते विवरीं जाती : अतिशय तहान लागून ते वानर अत्यंत व्याकुळ झाले, पाणी कोठेच मिळेना व अरण्यात ते दिशा भुलले. ॥३॥ तेव्हा हनुमंताने मनात अनुमान केले की पाण्याविना हे सारे मरावयास टेकले आहेत. ॥४॥ (म्हणून) हनुमान एक उंच पर्वताच्या शिखरावर चढून चारी दिशांस निरखून पहातात, तो जमिनीवरील एका विवराचे ठायी एक कौतुक दिसले. ॥५॥ चक्रवाक, बगळे, मल्लिक (हंसाची एक जात) त्यातून उडताना दिसले बहुतेक सर्वच पक्षी त्या विवरात प्रवेश करीत असलेले दिसले. ॥६॥ मग पवनसुत पर्वतावरून खाली आला आणि त्याने सर्वांना नेऊन ते विवर दाखविले. ॥७॥ त्यांनी हनुमंताला पुढे करून विलंब न करता त्या विवरात प्रवोश केला. ॥८॥ दो. आत जाताच एक सुंदर उपवन व पुष्कळ कमळे फुललेले एक सरोवर दिसले आणि तेथे एका मनोहर मंदिरात बसलेली एक सुंदर तपोनिधी स्त्री दिसली (स्वयंप्रभा)॥दो. २४॥ त्यानीं दुरुनी प्रणाम कृत तिज । पुसत वृत्तांतही कथित निज ॥ दो० :- बदरीवनिं ती गत, शिरीं धरुनी प्रभुआज्ञेस ॥ त्या सर्वांनी तिला दुरून प्रणाम केला व तिने विचारल्यावर आपला सर्व वृत्तांत सांगीतला. ॥१॥ तेव्हा ती म्हणाली की जलपान करा व नाना प्रकारची सुंदर रसाळ फळे खा. ॥२॥ सर्वांनी स्नान करून (पाणी पिऊन) मधुर फळे खाल्ली व ते सर्व तिच्या जवळ चालत गेले. ॥३॥ आपली कथा सांगून ती म्हणाली की मी आता रघुपतीकडे जाते. ॥४॥ तुम्ही डोळे मिटा. विवराच्या बाहेर जा. सीता मिळेल काही चिंता करू नका. (या विवरात शिरणारा बाहेर पडू शकत नाही.) मी आपल्या तपोबळाने बाहेर जाऊ शकते व तुम्हालाही काढू शकते. ॥५॥ डोळे मिटून ते वीर पुन्हा डोळे उघडतात तो ते सर्वजण सागराच्या तीरावर उभे ! ॥६॥ मग ती रघुनाथाकडे गेली, जाऊन तिने रामचरणकमलांना वंदन केले. ॥७॥ तिने नानाप्रकाराने स्तवन केले व प्रभूनी तिला आपली अनपायिनी भक्ती दिली. ॥८॥ रामचंद्रांची आज्ञा शिरसामान्य करून आणि ज्या चरणास ब्रह्मदेव व शंकर वंदन करतात ते हृदयात धारण करून ती बदरीवनात (पुन्हा त्या अविनाशी अनपायिनी भक्तीरसात बुडून तपश्चर्या करण्यास) निघून गेली ॥ दो. २५॥ इथें चिंतिती कपी मनां ही । मुदत संपली कार्य न काहीं ॥ दो० := प्रभु अवतरती स्वेच्छया सुर-गो-द्विज-महिसाठिं ॥ कपीस भेटे संपाती इकडे कपी मनात विचार करू लागले की (सुग्रीवाने दिलेली) एक महिन्याची मुदत संपली, पण अजून कार्य काहीच झाले नाही. ॥१॥ मग सर्व एकत्र मिळून आपसात विचारतात की सीतेचा शोध लागला नाही तेव्हा आता करावे तरी काय.? ॥२॥ डोळे पाण्याने भरलेले असा अंगद म्हणाला मला मरण येणार हे दोन्ही प्रकारांनी ठरलेले आहे. ॥३॥ इथे सीतेचा शोध लागला नाही म्हणून व तिथे कपिपती घरी गेल्यावर मारील. ॥४॥ पित्याच्या वधानंतर त्याने मला ठार मारलाच असता पण रामचंद्रानी राखला, त्याने माझ्यावर उपकार केले नाहीत. ॥५॥ अंगद वारंवार सर्वांना सांगत सुटला की आता आपले मरण आले यात संशयच नाही. ॥६॥ अंगदाचे ते म्हणणे ऐकून कपीवीरांना बोलवेना, ते सारखे अश्रु ढाळू लागले. ॥७॥ क्षणभर सारेच शोकमग्न होऊन तटस्थ झाले व मग सर्वजण बोलते झाले ॥८॥ हे प्रवीण युवराजा ! सीतेचा शोध लागल्याशिवाय आम्ही परत जाणारच नाही. ॥९॥ असे म्हणून ते सागर तीरावर गेले व सगळे दर्भ पसरून त्यावर बसले. ॥१०॥ अंगदाचे दु:ख पाहून ऋक्षेश जांबवंताने विशेष उपदेशपर कथा सांगीतली. ॥११॥ हे तात ! रामचंद्रांना मनुष्य मानू नका, ते अजित, अज, निर्गुण ब्रह्म आहेत हे लक्षात घ्या. जाणा. ॥१२॥ आम्ही सर्व सेवक अति महाभाग्यवान आहोत की सगुण ब्रह्माच्या ठिकाणी आमचे सतत प्रेम आहे. ॥१३॥ देव, गाई, ब्राह्मण व पृथ्वी यांच्यासाठीच प्रभू स्वत:च्या इच्छेने अवतार घेतात, त्यावेळी सगुणोपासक सर्व मोक्षाचा त्याग करून त्यांच्या बरोबर राहतात. ॥ दो. २६॥ यापरिं विविध कथा वदताती । गिरि कंदरिं ऐके संपाती ॥ दो० :- मज घेउनि जा सिंधुतटिं देउं तिलांजलि त्यास ॥ ते सर्व विविध कथा सांगत असता त्यांचा आवाज गिरीकंदरेत असलेल्या संपातीला ऐकू गेला. ॥१॥ तेव्हा तो गुहेच्या तोंडाशी आला व पाहातो तो त्यास पुष्कळ वानरे दिसली. ॥२॥ तो सहज उद्गारला आज जगदीशाने मला आहार दिला. ॥३॥ आज सगळ्यांनाच खाऊन टाकतो, कारण फार दिवस झाले अन्नावाचून मरतो आहे. ॥३॥ पोटभर आहार तर कधीच मिळाला नाही. पण आज विधात्याने एकाचवेळी भरपूर दिला आहे. ॥४॥ गिधाडाचे शब्द कानी पडताच ते कपि घाबरले व म्हणू लागले आता खरोखरच आम्ही मेलोच असे वाटते. ॥५॥ गृध्राला पाहाताच सगळे कपी उभे राहीले, जांबवंताला मनात विशेष चिंता लागली. ॥६॥ (मनात) विचार करून अंगद म्हणाला की, जटायूसारखा धन्य कोणी नाही. ॥७॥ रामकार्यासाठी देहाचा त्याग त्याने केला आणि तो हरिपुरास वैकुंठास गेला. (खरोखरच) तो परम महाभाग्यवान ! ॥८॥ (अंगदाचे) हर्षशोकयुक्त भाषण ऐकून तो पक्षी जवळ येऊ लागला तेव्हा वानर समुदाय भयभीत झाला. ॥९॥ त्याने त्यास अभय करून (जवळ) जाऊन विचारले, तेव्हा त्यांनी जटायूची सर्व कथा (त्याला) सांगितली. ॥१०॥ धाकट्या भावाची करणी ऐकून संपाती नानाप्रकारे रघुपतीचा महिमा (महती) वर्णू लागला ॥११॥ दो - मला सागराच्या तीराजवळ घेऊन जा म्हणजे मी त्याला तिलांजली देतो. (मग) मी तुम्हाला वाणीने साहाय्य करेन, व जिचा शोध तुम्ही करीत आहात ती तुम्हाला सापडेल ॥ दो २७ ॥ अनुजक्रिया कृतार्णवतीरा । स्वकथा कथित म्हणे कपिवीरां ॥ दो० :- मी बघतों तुम्हिं नाहीं दृष्टि अमित गृध्रांस ॥ धाकट्या भावाची क्रिया सागरतीराला केली व संपाती कपिवीरास म्हणाला की स्वत:ची कथा सांगतो (ते ऐका). ॥१॥ आम्ही दोघे भाऊ ऐन तारूण्यात असता आकाशात सूर्याजवळ उडत चाललो होतो. ॥२॥ तो तेज सहन करू शकला नाही म्हणून परत फिरला व (अभिमानी असल्यामुळे सूर्याजवळ गेलो) तो तेज अति अपार ! माझे पंख जळले व मी घोर चित्कार करीत जमिनीवर पडलो. ॥४॥ ज्यांचे नाव चंद्रमा असे एक मुनी होते, मला पाहून त्यांना माझी दया आली. ॥५॥ त्यांनी पुष्कळ प्रकारानी मला ज्ञानाचा उपदेश केला व माझा देहजनित अभिमानाला नाहिसा केला. ॥६॥ (चंद्रमा मुनी म्हणाले की) त्रेता युगात ब्रह्म मनुज तनु धारण करील आणि निशाचरपती त्यांच्या नारीला चोरून नेईलच. ॥७॥ तिच्या शोधासाठी प्रभू दूत पाठवतील, त्यांना तू भेटलास त्यांचा स्पर्श तुला झाला की तू पुनीत होशील. ॥८॥ आणि तुला (नवे) पंख फुटतील, काही चिंता करू नकोस. (मात्र) तू त्यांना सीता दाखवून दे म्हणजे झाले. ॥९॥ मुनीची वाणी आज खरी ठरलीच (म्हणून सांगतो ते ) ऐकून तुम्ही प्रभूचे कार्य कराच. ॥१०॥ त्रिकूट पर्वतावर लंका (नगरी) आहे, (तेथे) रावण राहतो व तो सहज शंका भयरहीत आहे. ॥११॥ तेथे अशोक उपवनात सीता रहात आहे व ती बसलेली असून शोकरत आहे. ॥१२॥ (हे सर्व) मला दिसत आहे, पण तुम्हाला दिसत नाही, कारण गृध्रांना अमित अपार दृष्टी असते. (आता) मी म्हातारा झालो आहे, नाहीतर मी तुम्हाला काहीतरी सहाय्य केले असते. ॥ दो २८॥ जो लंघिल शत-योजन सागर । तो करिं रामकार्य मति-आगर ॥ दो० :- प्रभु बलिबंधनिं वाढले ती तनु वर्णिल कोण ॥ जो शंभर योजनांचा सागर उल्लंघन करील व जो बुद्धीचे सागर असेल तोच हे रामकार्य करू शकेल. ॥१॥ माझ्याकडे बघून तरी धीर धरा, माझे शरीर कसे होते व (आता) रामकृपेने कसे झाले आहे. ॥२॥ ज्याच्या नुसत्या नामाच्या स्मरणाने पापी सुद्धा अति अपार असा भवसागर तरून जातात. ॥३॥ त्याचे तुम्ही दूत आहात (हे लक्षात ठेऊन शोक) सोडा व रामचंद्राचे ध्यान हृदयात करीत उपाय करा. ॥४॥
ऐकून कथा समीर कुमार गरूडा : असे सांगून जेव्हा तो गृध्र उडून गेला तेव्हा सगळे कपि आश्चर्यात बुडून गेले. ॥५॥ (नंतर) सर्वजण आपापले बळ सांगू लागले, पण (सागर) पार करण्याविषयी सर्वांनीच संशय प्रगाट केला. ॥६॥ ऋक्षेश जांबवान म्हणाला की आता मी अगदी म्हातारा झालो, आता शरीरात पूर्वीच्या बळाचा लेशही उरला नाही. ॥७॥ ज्यावेळी खरारी(राम) त्रिविक्रम झाले त्यावेळी मी अगदी तरूण होतो व भारी बलवान होतो. ॥८॥ दो = बलीला बंधन करण्यासाठी जेव्हा प्रभू वाढले त्या वेळच्या त्यांच्या देहाचे वर्णन कोण करणार ! (पण) मी दोन घटकांत धावत धावत सात प्रदाक्षिणा केल्या. ॥दो २९॥ जाइन लंघुनि अंगद सांगे । परि फिरतां संशय मनिं लागे ॥ छं० :- कपि-कटक संगें बधुनि निशिचर राम सीते आणिती । अंगद म्हणाला की मी सागर लंघून जाईन पण परतताना येववेल की नाही या बद्दल मनात संशय वाटतो. ॥१॥ जांबवंत म्हणाला की तुम्ही सर्वकाही करण्यास लायक आहात पण तुम्ही सर्वांचे नायक असल्याने आम्ही कसे पाठवावे. ॥२॥ ऋक्षपती जांबवान म्हणाला की हनुमान ! हे पहा ऐक की तू बलवान असून मुका का बसला आहेस ? ॥३॥ तू पवनतनय आहेस म्हणून तुझे बल पवनासारखे आहे, तू बुद्धी, ज्ञान व विज्ञान यांचे निधान आहेस. ॥४॥ जगात असे कोणते कठीण कार्य आहे की तात ! जे तुला करवणार नाही. ॥५॥ तुझा अवतार रामकार्यासाठीच आहे हे ऐकताच हनुमान पर्वताकार झाला. ॥६॥ (पर्वताकार झालेला) देह सोन्याच्या वर्णाचा असून तेज (असे) प्रकाशत आहे की जणू दुसरा पर्वतांचा राजा ! सुमेरू ! ॥७॥ वारंवार सिंहनाद केला (व म्हणाला की) हा खारा जलनिधी मी लीलेने लंघून जाईन. ॥८॥ अनुचरासहित रावणालाच (हवे तर) मारीन आणि (वाटल्यास) त्रिकूट पर्वतच उपटून येथे आणीन. ॥९॥ जांबवंत, मी विचारतो की (मी पुढे काय करू याबद्दल) मला योग्य उपदेश करा. ॥१०॥ हे तात ! तुम्ही जाऊन इतके करावे की सीतेची गाठ घ्यावी व येऊन समाचार सांगावा. ॥११॥ मग राजीवलोचन रघुवीर कौतुकासाठी कपिसेनेला बरोबर घेऊन स्वत:च्या बाहूबलाने (सीतेला सोडवून आणतील). ॥१२॥ छंद : कपि सैन्य बरोबर घेऊन व निशाचरांचा वध करून राम सीतेला आणतील, त्या त्रैलोक्य पावन करणार्या सुयशाचे वर्णन देव, मुनी व नारदादी करतील, ज्याच्या श्रवणाने गानाने, कथनाने व समजण्याने मनुष्यांना परमपद प्राप्त होते ते (सुयश) रघुवीर पदकमल तुलसीदास गात आहे. ॥छं १॥ दोहा : जे कोणी स्त्री अथवा पुरूष रघुनाथ यश रूपी भवरोगाचे औषध (रामनाम) श्रवण करतील (कर्ण पटलांनी सेवन करतील) त्यांचे सर्व मनोरथ त्रिपुरारी शंकर सिद्ध करतील ॥ दो ३०॥ ज्याचे शरीर नीलकमलासारखे श्याम असून शोभा (सौदर्य वा सौष्ठव) कोटी कामदेवांच्या शोभेपेक्षा अधिक आहे आणि त्यांचे नाम पापरूपी खगांचा वध करणारे आहे, त्यांच्या गुणसमुहांचे श्रवण करावे ॥दो ३०॥ इति श्रीमद् रामचरितमानसे सकल-कलि-कलुष-विध्वंसने श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु |