|
॥ श्रीरामचरितमानस ॥ (मराठी अनुवाद) ॥ उत्तराकाण्ड ॥ ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥ अध्याय ११ वा Download mp3 वायस वचना रुचिर ऐकिलें । गरुडे हर्षें पंख फुलविलें ॥ दो० :- तया प्रशंसुनि बहुपरीं शिर नमि, जोडी हात ॥ श्रीगरुडाची कृतज्ञता - काकभुशुंडीचे सुंदर भाषण ऐकले तेव्हा गरुडाने आनंदाने आपले पंख फुलविले ॥ १ ॥ त्याच्या डोळ्यात पाणी आले आणि मनात अतिशय हर्ष झाला व त्याने श्रीरघुवीराचा प्रताप हृदयात धारण केला ॥ २ ॥ पूर्वीच्या आपल्या मोहाचे स्मरण होऊन तो पश्चाताप करु लागला की अनादि ब्रह्माला मी मनुष्य समजलो. ॥ ३ ॥ त्याने वारंवार भुशुंडीच्या पायावर मस्तक नमविले व त्याला प्रभु रामचंद्रांसारखा जाणून त्याच्यावरील प्रेम वाढले ॥ ४ ॥ कोणीही गुरुशिवाय भवसागर तरुन जात नाहीत, अगदी ब्रह्मदेवासारखे वा शंकरांसारखे ॥ ५ ॥ (गरुड म्हणाला) तात ! मला संशयरुपी सर्प चावला होता व कुतर्क रुपी दु:खदायक लहरी पुष्कळ येत होत्या ॥ ६ ॥ सेवकास सुख देणार्या रघुनायक गारुडीने तुमच्यारुपाने मला जगविला. ॥ ७ ॥ तुमच्या कृपेने माझा मोह गेला व श्रीरामाचे अनुपम रहस्य मला कळले ॥ ८ ॥ तुम्हि सर्वज्ञ तज्ञ तमपारहि । सुमति सुशील सरल आचार हि ॥ सो० :- व्यापी तुम्हां न काल अति कराल कारण कवण ॥ तुम्ही सर्वज्ञ, तत्वाचे ज्ञाते आहात, मायारुपी तमाच्या अतीत आहांत ॥ १ ॥ वैराग्य ज्ञान व विज्ञान यांचे निवासस्थान आहांत आणि श्रीरघुनाथाचे प्रिय दासही आहांत ॥ २ ॥ (असे असता) हा काक देह तुम्हाला कसा मिळाला हे मला समजावून सांगा ॥ ३ ॥ स्वामी ! आपण आकाशगामी (पक्षी) असून हे सुंदर रामचरित मानस आपल्याला कुठे मिळाले ते सांगा ॥ ४ ॥ नाथ ! मी श्रीशंकरांकडून असे ऐकले आहे की महाप्रलयाचे वेळी सुद्धा तुमचा नाश होत नाही ॥ ५ ॥ शंकर कधीही असत्य बोलणार नाहीत पण माझ्या मनांत संशय निर्माण झाला आहे ॥ ६ ॥ (कारण) सर्व स्थावर जंगम जीव, नाग, मनुष्य, देव (त्रैलोक्य), सर्व जग हे काळाचे भक्ष्य आहे, नाथ ! ॥ ७ ॥ अनंत ब्रह्मांडाचा लय करणारा काळ सदा अत्यंत अनिवार्य आहे ॥ ८ ॥ (असे असता) अति कराल काल तुम्हाला व्यापीत नाही याचे कारण काय असेल ते कृपालु मला सांगावे, ज्ञानसामर्थ्य की योग बळ ? ॥ दो० ९४ रा ॥ हे प्रभु ! मी तुमच्या आश्रमभुमीत येताच माझा भ्रम व मोह नष्ट झाला, तरी नाथ ! याचे जे कारण असेल ते मला फार प्रेमाने सांगावे ॥ दो० ९४ म ॥ गरुड गिरेनें काक हर्षला । उमे ! परम अनुरागें वदला ॥ सो० :- पन्नगारि अशि नीति श्रुति संमत सज्जन वदति ॥ गरुडांच्या प्रश्नांची उत्तरे – उमे ! गरुडाच्या भाषणाने भुशुंडीला हर्ष झाला आणि तो परम प्रेमाने म्हणाला ॥ १ ॥ हे उरगारी ! धन्य, धन्य आहे तुझी बुद्धी ! तुमचे प्रश्न मला फार आवडले ॥ २ ॥ तुमच्या प्रेमळ व सुंदर प्रश्नांमुळे मला माझ्या (अनेक पूर्व) जन्माचे स्मरण झाले ॥ ३ ॥ तात ! माझी ती सर्व कथा आता मी तुम्हांला सांगतो, तुम्ही आदराने मन लावून श्रवण करा. ॥ ४ ॥ व्रत, तप, जप, यज्ञ, शम, दम, दान, वैराग्य, ज्ञान आणि विज्ञान या सर्वांचे फळ रघुपती चरणी प्रेम हेच आहे. त्या शिवाय कोणीही कल्याण पावत नाही. ॥ ५-६ ॥ रामभक्ती या देहामध्ये मिळाली म्हणून यावर माझी अति ममता जडली आहे ॥ ७ ॥ जिथे काही स्वत:चा स्वार्थ साधतो त्यावर कोणीही ममता करतो ॥ ८ ॥ हे उरगारी ! श्रुतीना मान्य असलेली अशी नीती आहे आणि संतही म्हणतात की आपले परमहित होत असेल तर अति नीचावर सुद्धा प्रीती करावी. ॥ दो० ९५ रा ॥ रेशमाच्या किड्यांपासून रेशीम मिळते, त्याची नंतर मनोहर वस्त्रे होतात म्हणून अति अपवित्र असूनही हे रेशिमकिडे लोक अगदी प्राणांसारखे जपून पाळतात. ॥ दो० ९५ म ॥ स्वार्थ साच जगिं हाच जिवाचा । प्रेम रामपदि मनकृतिवाचां ॥ दो० :- प्रथम जन्मचरिता अतां ऐका सांगुं खगेश ॥ जीवाचा खरा स्वार्थ हाच आहे की मनाने, कृतीने व वाणीने श्रीरामचरणी प्रेम करावे. ॥ १॥ जे शरीर मिळून रामभजन करता येईल तेच पावन व सुंदर शरीर होय. ॥ २ ॥ राम विमुख असणारी तनु ब्रह्मदेवासारखी जरी मिळाली तरी कवी व पंडित तिची प्रशंसा करीत नाहीत ॥ ३ ॥ या काक तनूत रामभक्ती उत्पन्न झाली, म्हणून स्वामी ! ही तनु मला अत्यंत प्रिय आहे ॥ ४ ॥ माझे मरण जरी माझ्या इच्छेवर अवलंबून आहे तरी मी या तनुचा त्यागच करीत नाही, कारण की देहाशिवाय भजन करता येत नाही असे वेद वर्णन करतात ॥ ५ ॥ पूर्वी मोहाने (अज्ञानाने) मला सुद्धा फार छळले (कारण) त्यामुळे) मी रामविमुख राहीलो आणि कधी सुखाची झोप सुद्धा मिळाली नाही. ॥ ६ ॥ अनेक जन्मात मी नाना प्रकारची योग, यज्ञ, तप, जप, दान इ. अनेक कर्मे केली ॥ ७ ॥ हे खगेशा ! जगात अशी एकही योनी नाही की जिथे मी भटकलो नाही ॥ ८ ॥ मी सर्व प्रकारचे कर्म करुन पाहीले पण आताच्या सारखा सुखी मी कधीच झालो नाही. ॥ ९ ॥ नाथ ! मला पुष्कळ जन्मांची स्मृती आहे, कारण की शिवाच्या कृपेने बुद्धीला मोह झाला नाही. ॥ १० ॥ खगराज ! आता प्रथम जन्माचे चरित्र सांगतो ते ऐका त्याच्या श्रवणाने प्रभुचरणी रती (द्दढ प्रेम) उत्पन्न होईल, आणि तेणे करुन सर्व क्लेश टळतील ॥ दो० ९६ रा ॥ प्रभो ! पूर्वी एका कल्पांत पापाचे मूळ असणारे कलियुग होते तेव्हा पुरुष आणि स्त्रिया ही अधर्म परायण होत्या. आणि सर्वच वेदशास्त्र विरोधक होते ॥ दो० ९६ म. ॥ त्या कलियुगिं कोसल पुरिं जाउन । मी जन्मलो शूद्रतनु पाउनि ॥ दो० :- ग्रस्त कलिमलें धर्म सब लुप्त सकल सद्ग्रंथ ॥ त्या कलियुगात मी अयोध्येत जाऊन शूद्र देहाने जन्मास आलो ॥ १ ॥ मनाने, कर्माने, वाणीने मी शिव उपासक झालो. पण अन्य देवांची निंदा करणारा व अभिमानी बनलो ॥ २ ॥ मी जरी रघुपतीच्या राजधानीत राहीलो तरी त्यावेळी अयोध्येचा महिमा माझ्या ध्यानात आला नाही. ॥ ३ ॥ आता अयोध्येचा प्रभाव मला कळला. वेद शास्त्रे व पुराणे महिमा सांगतात की ॥ ५ ॥ जो कोणत्याही जन्मात अयोध्येत वास करतो तो पुढे राम परायण झाल्याशिवाय राहणार नाही ॥ ६ ॥ जेव्हा धनुर्धारी राम हृदयात राहतात तेव्हा जीव अयोध्येचा प्रभाव जाणतात. वर्ण धर्म ना आश्रम चारी । श्रुति विरोधरत सब नरनारी ॥ दो० :- अशुभवेषभूषणधर भक्ष्याभक्ष्या खति ॥ कलियुगात चारी वर्ण धर्म रहात नाहीत की चारी आश्रम धर्म रहात नाहीत सर्व स्त्रीपुरुष वेदविरोध करण्यात तत्पर असतात. ॥ १ ॥ ब्राह्मण वेदांची विक्री करतात राजे लोक प्रजेला खाऊन टाकणारे होतात वेदशास्त्राची आज्ञा कोणी मानीत नाही ॥ २ ॥ ज्याला जो रुचेल तो त्याचा मार्ग, आणि जो पुष्कळ शेखी मिरवील बढाया मारील, तो पंडित ॥ ३ ॥ मिथ्यारंभार व दंभात जे तत्पर असतात त्यांनाच सगळे संत म्हणतात ॥ ४ ॥ जो परधन हरण करणारा असेल तोच चतुर शहाणा समजला जातो. जो पुष्कळ दंभ करतो त्यालाच सदाचारी म्हणतात. ॥ ५ ॥ जे असत्य भाषण व थट्टा मस्करी करण्यात कुशल असतात, त्यांनाच गुणवान समजून त्यांची प्रशंसा लोक करतात. ॥ ६ ॥ जो वेद मार्गाचा त्याग करतो आणि आचारहीन असतो त्यालाच कलियुगात मोठा विरक्त व त्यालाच मोठा ज्ञानी समजतात. ॥ ७ ॥ ज्याची नखे व जटा विशाल असतात तो कलिकालात मोठा तपस्वी म्हणून प्रसिद्ध होतो ॥ ८ ॥ जे अमंगल वेष व अमंगल भूषणे धारण करतात व भक्ष्य अभक्ष्य खातात ते कलियुगांत योगी सिद्ध पुरुष समजले जातात व पूज्य होतात. ॥ दो० ९८ रा ॥ दुसर्यांना अपकार करणारे असतात त्यांचा गौरव केला जातो व ते सन्मान्य समजले जातात जे मनाने वाणीने व कृतीने फार लबाड असतात ते कलियुगात वक्ते समजले जातात ॥ ९८ म ॥ नारि विवश नर सगळे स्वामी ! ।नाचति नटमर्कट सम नामी ॥ दो० :- ब्रह्मज्ञान च नारिनर वदति दुजी नहिं बात ॥ अहो स्वामी ! (कलियुगात) सगळे पुरुष स्रियांना विशेष वश झालेले असतात व गारुड्याच्या (मदार्याच्या) माकडासारखे त्यांच्या कलाने नाचत असतात. ॥ १ ॥ शूद्र द्विजांनाच ज्ञानाचा उपदेश करतात व गळ्यात जानवे घालून कुदाने घेतात ॥ २ ॥ पुरुष कामरत, लोभी, व क्रोधी होतात आणि वेद, ब्राह्मण, देव व संत यांचे विरोधक असतात. ॥ ३ ॥ अभागिनी स्रिया सुंदर गुणमंदिर पतीचा त्याग करुन परपुरुषाचे सेवन करतात ॥ ४ ॥ सुवासिनी स्त्रिया भूषण – रहित होतात तर विधवांचे शृंगार मात्र नवनवीन होतात. ॥ ५ ॥ गुरु आणि शिष्य आंधळ्या बहिर्यासारखे वागतात. गुरु बघत नाही व शिष्य ऐकत नाही ॥ ६ ॥ जे गुरु शिष्यांचे धन हरण करतात, पण शोक हरण करीत नाहीत, ते भयानक नरकात पडतात ॥ ७ ॥ आईबाप आपल्या बालकांना जवळ घेऊन ज्याने पोट भरेल तोच धर्म शिकवितात (भक्तीचे संस्कार निर्माण करीत नाहीत) ॥ ८ ॥ स्त्रिया पुरुष ब्रह्मज्ञाना शिवाय दुसरी गोष्टच बोलत नाहीत पण एका कवडीसाठी ब्राह्मणाची किंवा गुरुचीही हत्या करतात ॥ दो० ९९ रा ॥ शूद्र ब्राह्मणांशी भांडतात की आम्ही काय तुमच्याहून कमी आहोत काय ? जो ब्रह्म जाणतो तो विप्रवर श्रेष्ठ असे म्हणून संतापून डोळे लाल करुन पाहतात. ॥ दो० ९९ म ॥ परवधु लंपट कपट शहाणे । लिप्त मोह ममता द्रोहानें ॥ दो० :- होति वर्ण संकर कलिं भिन्नसेतु सब लोक ॥ जे परस्त्रीलंपट असतात जे मोह ममता व द्रोह यांनी लिडबिडलेले असतात पण अभेदवादी असतात तेच ज्ञानी पुरुष (असे समजतात) खगराजा ! असे कलियुगाचे चरित्र मी पाहीलेले आहे ॥ १-२ ॥ ते स्वत: पतित नष्ट झालेले असतातच पण जे कोणी कुठे सन्मार्गाचे प्रति पालन करीत असतात त्यांनाही धर्मभ्रष्ट करतात. ॥ ३ ॥ जे तर्क करुन श्रुतींना दोष देतात ते प्रत्येक नर्कात एकेक कल्प पडतात ॥ ४ ॥ तेली, कुंभार, चाण्डाल, भिल्ल, कोळी कलाल इ. जे वर्णाहून नीच असतात ते बायको मेली, घर संपत्ती इ. नष्ट झाले की मुंडक्याचे मुंडन करुन संन्यासी बनतात ॥ ५-६ ॥ ते ब्राह्मणांकडून आपली पूजा करवून घेतात. आणि आपल्या हातानी उभय लोकांचा विनाश करतात ॥ ७ ॥ ब्राह्मण वेदाध्यनरहित, विषयलोलुप, कामी, आचारभ्रष्ट, मूर्ख (स्वहित न जाणणारे), आणि शूद्रादि जातींच्या स्त्रियांचे पती झालेले असतात. ॥ ८ ॥ शूद्र नाना प्रकारे जप, व्रते, तप इ. करतात आणि व्यास पीठावर बसून पुराण सांगतात. ॥ ९ ॥ सर्व लोक आपल्या मनाने कल्पिलेला आचार करतात आणि इतकी अपार अनीती माजते की तिचे वर्णन करता येत नाही. ॥ १० ॥ कलियुगात सर्व लोक वेदमर्यादेपासून च्युत झाले व वर्णसंकर लोक झाले ते पापे करीत असतात, व त्यांचे फळ भय, रोग, वियोग, शोक इ. दु:खे भोगतात. ॥ १०० रा ॥ वेदसम्मत वैराग्य ज्ञानयुक्त हरिभक्तीचा जो मार्ग आहे तो मोहवश मनुष्य धरीत नाहीत आणि अनेक पंथ कल्पनेने काढतात ॥ १०० म ॥ छंद० :- बहु दाम सुसाजिति धाम यती । विषयीं हरली नुरली विरती ॥ दो० :- श्रुणु खगेश कलिं कपट हठ द्वेष दंभ पाखांड ॥ संन्यासी पुष्कळ पैसे जमवितात आणि पुष्कळ पैसा खर्च करुन बंगले उत्तम रीतीने सजवितात; आणि विषयांनी वैराग्य हरण केल्यामुळे वैराग्य राहीलेले नसते, तपस्वी धनवान झाले व गृहस्थ दरिद्री बनले ! कलियुगातील अशा आश्चर्याचे वर्णन करवत नाही ॥ १ ॥ कुलीन व सती स्त्रियांना हाकलून देतात व चांगल्या चालीचा त्याग करुन दासीला घरात आणून ठेवतात. जोपर्यंत बायकोचे तोंड पाहीलेले नसते तोपर्यंतच मुले आईबापांना विचारतात. ॥ २ ॥ सासुरवाड गोड वाटू लागले की कुटुंबातील माणसे वाटूं लागतात राजे पापपरायण झाले व त्यांच्या ठिकाणी धर्म राहीला नाही प्रजेला (निष्कारण डोईजड कर बसवून) प्रजेची सदा विटंबना करतात ॥ ३ ॥ श्रीमंत लोक पापी असले तरी कुलीन मानले जाऊ लागले ब्राह्मणाचे लक्षण फक्त जानवेच शिल्लक राहीले. नग्न – वस्त्रहीन राहणे हे तपाचे लक्षण मानले जाऊ लागले. जो वेद – पुराण मानीत नाही तो कलियुगात खरा हरिभक्त संत मानला जाऊ लागला ॥ ४ ॥ कवींचे थवेच्या थवे झाले दाता जगात ऐकू सुद्धा येईनासा झाला गुणांना दोष ठेवणारे पुष्कळ, पण गुणी कोणीच नाही कलियुगात वारंवार दुष्काळ पडतो आणि लोक अन्नावाचून दु:खी होऊन मरण पावतात. ॥ ५ ॥ खगेश ! ऐक कलियुगात कपट, हट्ट, द्वेष, दंभ, पाखंड, मान, मोह, काम, क्रोध, लोभ, यांनी सदा ब्रह्मांड व्यापलेले होते ॥ १०१ रा ॥ मनुष्य व्रत जप, तप, दान इ. धर्म तामसी पद्धतीने करतात इंद्र धरणीवर पाऊस पाडीत नाही व पेरलेले धान्य उगवत नाही ॥ १०१ म ॥ छंद० :- अबला कचभूषण भूक महा । धनहीन दुखी ममता बहु हा ! ॥ दो० :- व्यालारि ! श्रुणु कलि मल अवगुण आगार ॥ स्त्रियांचे केस हेच भूषण, प्रत्येक विषयांत अतृप्त, व धनहीन असून विषयसक्ती अत्यंत असल्याने सदा दु:खी व हाय ! हाय ! त्या सुखाची इच्छा करतात पण अशा मूढ असतात की धर्माची आवड मुळीच नाही, व अल्प बुद्धी असून ती कठोर, कोमल मुळीच नाही. ॥ १ ॥ मनुष्य रोग पीडीत असल्याने भोगही भोगवत नाहीत, आणि खोट्या अभिमानाने निष्कारण विरोध मात्र करीत असतात. जीवीत अगदी थोडे पाच दहा वर्षाचे पण घमेंड इतकी की जणू प्रलयाचे वेळी सुद्धा नाश नाही ॥ २ ॥ कलीने सदा माणसाचे हाल हाल केले जातात (तरी सुद्धा) कोणी कन्या की बहीण हा विचार करीत नाही. संतोष नाही, विचार नाही की शीतलता नाही सर्व जातीचे व कुजातीचे लोक भीक मागतात ॥ ३ ॥ ईर्षा, कठोर भाषण, व लोभीपणा हे दोष भरपूर झाले आणि समता नष्ट झाली सर्व लोक वियोगाने व विशोकाने मारले गेले आहेत. वर्णधर्म व आश्रम धर्म यांचे आचरण नाहीसे झाले ॥ ४ ॥ इंद्रिय, निग्रह, दान, दया आणि समजुतदारपणा कोणात नाहीत मूर्खपणा व दुसर्यांची फसवणूक यांना ऊत आला सर्व स्त्री पुरुष शरीर पोषक झाले आणि परनिंदा करणारे जगभर झाले ॥ ५ ॥ हे उरगारी ! ऐक कलिकाल पापांचे व अवगुणांचे घर आहे (परंतु) कलियुगाचा हा एक मोठा गुण आहे की, श्रमावाचून उद्धार होतो ॥ १०२ रा ॥ सत्य युगात – योग, त्रेता युगात यज्ञ, व द्वापर युगात पूजा यांनी जी गति मिळते तीच कलियुगात हरिनामाने लोकांना मिळते ॥ १०२ म ॥ कृतयुगिं सब योगी विज्ञानी । ध्यात हरिस भव तरती प्राणी ॥ दो० :- कलियुग समयुग आन ना जर नर युत विश्वास ॥ कृत युगात सर्व लोक योगी व विज्ञानी होतात आणि हरिचे ध्यान करीत सर्व प्राणी भवसागर तरतात ॥ १ ॥ त्रेता युगात मनुष्य अनेक प्रकारचे यज्ञ करतात आणि सर्व कर्मे प्रभूला समर्पण करुन भवसागर तरतात ॥ २ ॥ द्वापर युगात श्रीरघुनाथाच्या चरणाची पूजा करुन मनुष्य भवसागराचा ठाव पावतात. दुसरा आधारभूत उपाय नाही. ॥ ३ ॥ कलियुगात श्रीहरीच्या गुणकथांचे गान करुन मनुष्य भवसिंधु तरतात ॥ ४ ॥ कलियुगात योग, यज्ञ, ज्ञान यापैकी काहीही आधार नाही. श्रीरामाचे गुणगान गाणे हाच एक आधार आहे ॥ ५ ॥ सर्व भरवसा सोडून जो रामाला भजतो आणि प्रेमाने गुणगणांचे गान करतो तोच भवसागर तरतो यात मुळीच संशय नाही. नामाचा प्रताप कलियुगात गुप्त नाही प्रगट आहे. ॥ ६-७ ॥ कलीचा एक पवित्र प्रताप आहे की मानसिक पुण्य घडते, पण मानसिक पाप लागत नाही ॥ ८ ॥ कलियुगासारखे दुसरे युग नाही (कारण) जर मनुष्य विश्वासाने रामचंद्रांचे विमल गुणगण (चरित्र) गाईल तर प्रयत्ना वाचून भव तरुन जातो. ॥ १०३ रा ॥ धर्माचे चार चरण (सत्य, शौच, दया, दान) प्रसिद्ध आहेत, पण कलियुगात त्यातील एकच (दान) प्रधान आहे (कारण) कोणत्याही प्रकाराने दिलेले दान कल्याण करते. (देश, काल, पात्र यांचा विचार आवश्यक नाही.) ॥ दो०१०३ म ॥ होति हृदयिं युगधर्म जनांचे । प्रेरित मायेनें रामाचे ॥ दो० :- हरिमायाकृत दोषगुण विण हरिभजन न जात ॥ श्रीरामाच्या मायेच्या प्रेरणेने सर्व लोकांच्या हृदयात युगधर्म उत्पन्न होत असतात. ॥ १ ॥ शुद्ध सत्वगुण, समता, विज्ञान, आणि सर्वदा मन प्रसन्न राहणे हा कृत युगाचा धर्म आहे. असे जाणावे ॥ २ ॥ सत्वगुण पुष्कळ रजोगुण जरासा असणे, कर्माची आवड आणि सर्व प्रकारे सुखी असणे हा त्रेतायुगाचा धर्म आहे ॥ ३ ॥ पुष्कळ रजोगुण, थोडा सत्वगुण व थोडा तमोगुण असणे आणि मानसिक हर्षभय वाटणे हा द्वापार युगाचा धर्म ॥ ४ ॥ तर तमोगुण पुष्कळ थोडा रजोगुण व चहूंकडे विरोध हा कलिचा महिमा होय. ॥ ५ ॥ शहाणे लोक आपल्या मनातील युगधर्म जाणून अधर्माचा त्याग करतात व धर्मावर प्रीती करतात. ॥ ६ ॥ ज्याचे रघुपतीचरणी अति प्रेम आहे, त्याला कालधर्म बाधा करु शकत नाही. ॥ ७ ॥ हे खगराया ! जादूगाराचे कपट पाहणार्यांना भयानक वाटते पण जादूगाराच्या सेवकाला त्याची माया बाधत नाही ॥ ८ ॥ श्रीहरीच्या मायेने निर्माण केलेले दोष आणि गुण हरिभजनावाचून जात नाहीत याचा मनात विचार करुन सर्व कामनांचा त्याग करुन श्रीरामाचे भजन करावे ॥ दो० १०४ रा ॥ श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु |