॥ श्रीरामचरितमानस ॥

(मराठी अनुवाद)

॥ उत्तराकाण्ड ॥

॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

अध्याय ४ था



Download mp3

वाजिमेध कोटी प्रभुनी कृत । अगणित दानें द्विजांस अर्पित ॥
श्रुतिपथ पालक धर्मधुरंधर । गुणातीत परि भोग पुरंदर ॥
राहि सदा पति अनुकुल सीता । शोभाखाण सुशील विनीता ॥
कृपासिंधुची प्रभुता जाणुनि । चरणकमल सेवी मन लावुनी ॥
जरी गृहीं सेवक सेवकिणी । विपुल सदा सेवाविधिगुणी ॥
स्वकरें गृह परिचर्या करते । रामचंद्र आज्ञा अनुसरते ॥
कृपासिंधु मानिति सुख जेणें । तें श्री करि सेवा विधि जाणे ॥
कौसल्यादि सासवा गेहीं । त्यास सेवि मद मान नसे ही ॥
उमा रमा ब्रह्माणि वंदिता । जगदंबा संततमनिंदिता ॥

दो० :- इच्छिति कृपाकटाक्ष सुर परिं न बघे ढुंकून ॥
रामपदाब्जीं ती रति करी स्वभाव तजून ॥ २४ ॥

श्रीरामप्रभूंनी कोट्यावधी अश्वमेध केले, ब्राह्मणांना अगणित दाने दिली ॥ १ ॥ ते वेद मार्गाचे पालन करणारे, धर्माची धुरा धारण केलेले आणि सत्वादि गुणांच्या अतीत आहेत पण ऐश्वर्यभोगात इंद्रासारखे आहेत ॥ २ ॥ शोभेची खाण, सुशील व विनम्र सीता सदा पतिअनुकूल वागते ॥ ३ ॥ कृपासिंधु रामचंद्रांची प्रभुता जाणून मन लावून त्यांच्या चरण – कमलांची सेवा करते ॥ ४ ॥ घरची कामे सीता स्वत: आपल्या हातांनी करते व रामचंद्रांच्या आज्ञेप्रमाणे वागते ॥ ५-६ ॥ जेणे करुन कृपासिंधु रघुनाथ सुख मानतील तेच सीता करते. कारण ती सेवाविधी जाणते ॥ ७ ॥ घरात ज्या कौसल्यादि सास्वा आहेत त्यांचीही सेवा करते तिला अभिमान व गर्व मुळीच नाही ॥ ८ ॥ उमा, रमा व ब्रह्माणी यांनी वंदित जगदंबा सीता सदा दोषरहित = आनंदी आहे ॥ ९ ॥ सर्व देव जिचा कृपा कटाक्ष इच्छितात पण जी ज्यांच्याकडे ढुंकून सुद्धा बघत नाही ती सीता आपला स्वभाव सोडून श्रीरामचरण कमली परम प्रेम करते. ॥ दो० २४ ॥

सानुकुल बंधू सब सेवति । रामकमलपद रति अधिका अति ॥
प्रभु मुखकमल विलोकत राहति । कधिं कृपालु मज सेवा सांगति ॥
राम बंधुंवर करिति प्रीती । शिकविति नानाविधा सुनीती ॥
सकल नगर जन हर्षित राहति । सुर दुर्लभ सब भोगां भोगिति ॥
बसति अहर्निश विधीस विनवित । श्री रघुवीर चरणरति वांछित ॥
सीते सुंदर सुत दो झाले । लव कुश निगमागमीं जाइले ॥
उभय विजयि विनयी गुणमंदिर । प्रतिबिंब किं हरिचें अति सुंदर ॥
झाले दो दो सुत भावां प्रति । सकल रूप गुण शीलवंत अति ॥

दो० :- ज्ञान गिरा गोतीत अज माया मन गुण पार ॥
तोचि सच्चिदानंदघन करि नर चरित उदार ॥ २५ ॥

भरतादिक सर्व भाऊ श्रीरघुनाथास अनुकूल राहून त्यांची सेवा करतात. (कारण) त्यांची रामपदकमली अत्यधिक प्रीती आहे. ॥ १ ॥ ते सदा प्रभुच्या मुखकमलाकडे बघत राहतात, (हेतु हाकी) कृपालु मला कधी काही तरी सेवा करण्यास सांगतील ॥ २ ॥ राम सुद्धा सर्व भावांवर प्रेम करतात व त्यांना नाना प्रकारे नीती शिकवितात ॥ ३ ॥ नगरातील सर्व लोक हर्षित राहतात व देवांनाही दुर्लभ असे सर्व भोग भोगतात ॥ ४ ॥ ते रात्रंदिवस ब्रह्मदेवाला प्रार्थना करीत राहतात आणि त्यांच्या जवळून फक्त श्रीरघुवीर चरणी द्दढ प्रेम मागतात ॥ ५ ॥ सीतेला लव व कुश असे दोन सुंदर पुत्र झाले. त्यांचे वर्णन वेदपुराणांनी केले आहे. ॥ ६ ॥ ते दोघेही विजयी, विनयी, गुणमंदिर असे अति सुंदर आहेत की जणूं रामांचीच प्रतिकृती ! ॥ ७ ॥ भरतादि भावांना सुद्धा दोन – दोन पुत्र झाले, तेही सगळे रुपसंपन्न, अति गुणवान व शीलवान झाले ॥ ८ ॥ जो अजन्मा असून बुद्धी, वाणी, इंद्रिये यांच्या पलिकडे आहे, व जो माया – मन – गुण यांच्या पलिकडे आहे तोच सच्चिदानंद घन भगवान उदार नरचरित्र करीत आहे ॥ दो० २५ ॥

करुनि सकाळिंच शरयू मज्जन । बसति सभेंत सवें द्विज सज्जन ॥
वेदपुराणां वसिष्ठ वर्णिति । ऐकति राम सकल जरि जाणिति ॥
भोजन अनुजां समेत करती । बघुनि जननिनां ये सुख भरती ॥
बंधु भरा शत्रुघ्न उपवना । जाती घेउनि पवननंदना ॥
बसुन राम गुण कथांस पुसती । चिंतुनि हनुमान् सांगे सुमती ॥
श्रवुनि विमल गुण अति सुख पावति । पुनः पुन्हा सांगाया लावति ॥
घरोघरीं सांगती पुराणा । रामचरित पावन विध नाना ॥
नारी नरहि राम गुण गाना । करिति अहर्निश जात कळत ना ॥

दो० :- पुरि अयोध्यावासि जन सुख संपदा समाज ॥
शेष सहस्र न वदुं शकति जिथें राम नृपराज ॥ २६ ॥

प्रभु रामचंद्राची दिनचर्या – रामचंद्र सकाळीच शरयू नदीत स्नान करुन मग ब्राह्मण व सज्जन यांसह सभेत बसतात ॥ १ ॥ तेथे वसिष्ठ वेद पुराणे वर्णन करुन सांगतात व राम सर्व जाणत असले तरी प्रेमादराने ते श्रवण करतात. ॥ २ ॥ भरत, शत्रुघ्न हे भाऊ हनुमंताला घेऊन उपवनात जातात ॥ ४ ॥ तेथे बसून ते रामचंद्राच्या गुणकथा पवनसुताला विचारतात व सुमति हनुमान (भगवंताचे) चिंतन करुन कथा सांगतात. ॥ ५ ॥ निर्मल रामगुणकथा श्रवण करुन ते अत्यंत सुखी होतात व त्या कथा पुन:पुन्हा सांगायला लावतात. ॥ ६ ॥ घरोघरी पुराण आणि नानाविध पावन रामचरित्रकथा सांगीतल्या जाऊ लागल्या ॥ ७ ॥ नरनारी रामचंद्रांचे गुणगान करीत असतात (त्या आनंदात) दिवस व रात्र केव्हा निघून जातात हे त्यास कळतही नाही ॥ ८ ॥ जेथे राजाधिराज राम निवास करतात, त्या अयोध्यापुरीत राहणार्‍या लोकांच्या सुखसंपत्ती समूहाचे वर्णन हजारो शेषांना करता येत नाही ॥ दो.० २६ ॥

नारदादि सनकादि मुनीश्वर । दर्शनलागि कोसलाधीश्वर ॥
प्रतिदिन सकल अयोध्ये येती । बघुनी नगर, विराग विसरती ॥
गच्च्या जातरूप मणि विरचित । विविधरंगि फर्शिनें सुसज्जित ॥
पुर चौफेर कोट अति सुंदर । रचित रंगि वेरंगि वुरुज वर ॥
जणूं नवग्रह सेना महती । बनवुनि अमरावतिस वेढती ॥
महि बहुरंगी रत्‍नीं विरचित । नाचत मुनिवरमनहि विलोकित ॥
धवल धाम वरतीं नभ चुंबिति । कळस जणूं रविशशिभा निंदिति ॥
बहुमणि रचित झरोके भ्राजति । घरोघरीं मणिदीप विराजति ॥

छं० मणि दीप राजति गृहें भ्राजतिं; देहली विद्रुम कृता ।
मणि खांब भिंति विरंचि विरचित कनकमणि मरकत युता ॥
सुंदर मनोहर मंदिरायत स्फटिक अजिरें रुचिर तीं ।
प्रति दारिं दारिं कपाट हाटक खचित वज्रहिं बहुत तीं ॥ १ ॥
दो० :- चारु चित्रशाला गृहीं गृहीं लिहित सजवून ॥
रामचरित तें बघत, मुनि मना घेइ चोरून ॥ २७ ॥

नारद सनकादिकादि मुनीश्वर कोसलेश रामचंद्रांच्या दर्शनासाठी दररोज अयोध्येत येतात व अयोध्यानगर पाहून ते आपले वैराग्य विसरतात. ॥ १-२ ॥ अयोध्येतील गच्या रत्नखचित, सोन्याने बनविलेल्या असून त्या विविध रंगाच्या फर्शीने सुसज्जित केलेल्या आहेत ॥ ३ ॥ नगराच्या सभोवती अति सुंदर तटबंदी असून त्यावर सुंदर रंगीबेरंगी बुरुज बनविलेले आहेत. ॥ ४ ॥ जणूं नवग्रहांनी मोठी सेना जमवून इंद्रपुरी वेढली आहे असे वाटते ॥ ५ ॥ (अयोध्येतील) त्या तटाच्या वरच्या भागाच्या सज्जाच्या वगैरे जमिनी विविधरंगी रत्नांच्या बनविल्या आहेत त्या पाहून मुनीवरांचे मन सुद्धा नाचू लागले ॥ ६ ॥ उज्वल महाल तर जणूं आकाशाचे चुंबन घेत आहेत आणि घरांचे कळस जणू सूर्य – चंद्राच्या तेजाची निंदा करीत आहेत. ॥ ७ ॥ महालाच्या खिडक्या विविध रत्नांच्या बनविलेल्या प्रकाशत आहेत अन प्रत्येक घरी मणीदीप विराजत आहेत. ॥ ८ ॥ मणिदीप शोभत आहेत, पोवळ्यांच्या बनविलेल्या दारांच्या चौकटींनी घरे सुशोभित आहेत, रत्नांचे खांब आहेत, माणके- पाचू इ. जडविलेल्या सोन्याच्या भींती जणूं विरंचीनेच निर्माण केल्या आहेत. रामचंद्रांचा महाल तर सुंदर – मनोहर व विशाल आहे अंगणे स्फटिकांची बनविलेली आहेत आणि प्रत्येक दाराला सोन्याच्या फळ्या असून त्यामध्ये हिरे कलाकुसरीने जडविलेले आहेत. ॥ छं० ॥ घरोघरी चित्रशाळा आहेत, त्यामध्ये श्रीरामचरित्र उत्तम प्रकारे सजवून (क्रमश:) चित्रित केले गेले आहे, ते पाहीले की मुनींचे मन सुद्धा त्यावर जडून खिळून राहते ॥ दो० २७ ॥

सुमन वाटिका सगळे लाविति । नाना सायासीं बहु सजविति ॥
लता ललित सुंदर बहु जाती । सदा वसंता समान फुलती ॥
गुंजति मधुकर मुखर मनोहर । मारुत सदा त्रिविध अति सुंदर ॥
नाना खगांस बालक पाळति । वदति मधुर उडतां बहु शोभति ॥
मोर हंस सारस पारावत । भवनांवर शोभा अति पावत ॥
जिथें तिथें पडती पडछाया । लागति कूजन नृत्य कराया ॥
पढविति शुक मैनानां बालक । म्हणा राम रघुपति जनपालक ॥
राजद्वार सर्वपरिं सुंदर । वीथि चौक बाजार मनोहर ॥

छं० :- बाजार सुंदर वर्णवेना वस्तु फुकट हि मिळतसे ।
नृप जेथ रमानिवास तेथिल संपदा वर्णिति कसे ? ॥
बसले बजाज सराफ वाणी जणुं अनेक कुबेर ते ।
सच्चरित सुंदर सब सुखी अति नारि नर शिशु जरठ ते ॥ १ ॥
दो० :- वाहे शरयु उत्तरे निर्मल जल गंभीर ॥
घाट सुबद्ध मनोहर पंकहीन तत्तीर ॥ २८ ॥

सर्व लोकांनी आपापल्या घराभोवती फुलबागा लावल्या असून त्या प्रयत्नपूर्वक सुसज्ज केल्या आहेत ॥ १ ॥ नाना प्रकारच्या सुंदर व ललित लता असून त्या वसंत ऋतूत फुलल्याप्रमाणे सदैव फुललेल्याच राहतात ॥ २ ॥ तेथे भुंगे व मधमाशा मधुर स्वराने गुंजारव करीत असतात. तो गुंजारवही मनमोहक आहे. शीतल मंद सुगंधी असा वारा सर्वत्र सतत वहात असतो ॥ ३ ॥ बालकांनी नाना प्रकारचे पक्षी पाळले आहेत ते मधुर कूजन करतात व उडताना तर फारच सुंदर दिसतात ॥ ४ ॥ मोर, हंस, करकोचे, कबुतरे, पारवे इ. पक्षी घरांवर फारच सुशोभित दिसतात ॥ ५ ॥ जिथे उडतील तिथे त्यांच्या पडछाया पडतात व त्यांना पाहून ते नृत्य व कूजन करु लागतात. ॥ ६ ॥ बालक पोपट साळुंक्यांना बोलावयास शिकवितात की राम राम रघुपती जन – पालक म्हणा ॥ ७ ॥ राजद्वार सर्व प्रकारे सुंदर आहे. रस्ते, चव्हाटे, व बाजार मनोहर आहेत. ॥ ८ ॥ बाजार तर इतका सुंदर आहे की वर्णन करणे अशक्य, आणि तेथे जिन्नस फुकट सुद्धा मिळतात जेथे लक्ष्मी निवासच भूपती आहेत तेथील संपदा कोण कशी वर्णन करु शकेल ? कापडाचे व्यापारी (बजाज) सराफ व वाणी बसले आहेत, ते जणू अनेक कुबेर आहेत स्त्रिया पुरुष बाल वृद्ध इ. सर्वच अत्यंत सुखी सुंदर व शुद्ध चरित्र संपन्न आहेत. ॥ छं० ॥ अयोध्येच्या उत्तरेस शरयु नदी वाहते व तिचे पाणी नेहमी निर्मल व खोल असते उत्तम मनोहर घाट बांधलेले असून तीरावर चिखल अजिबात नाही. ॥ दो० २८ ॥

दूर रुचिर तो स्वतंत्र घाट । जिथें पिती जल हय गज थट ॥
अति जलघाट मनोहर नाना । तेथें पुरुष न करिती स्नाना
राजघाट सब विधिं सुंदर वर । मज्जति तिथें वर्ण चारी नर ॥
तीरिं तीरिं बहु देव मंदिरें । सभोंवतीं उपवनें सुंदरें ॥
कुठें कुठें नदितीरिं उदासी । वसति बोधरत मुनि संन्यासी ॥
तीरानें तुलसिका सुशोभन । वृंद वृंद बहु रोपित मुनिगण ॥
पुरशोभा ये जरा न वदतां । बहिर्नगरही परम रुचिरता ॥
पुरदर्शन नुरवी अघडाग हि । वन उपवन वापिका तडागहिं ॥

छं० :- निरुपम तडाग सुवापि कूप मनोहरायत शोभती ।
सोपान सुंदर नीर निर्मल बघुनि सुर मुनि मोहती ॥
बहुरंगि पंकज भृंग गुंजति विहग सुंदर बोलती ।
आराम रम्य पिकादि खग-रव पांथिकां जणुं बाहती ॥ १ ॥
दो० :- रमानाथ जिथ राजा तें किं वर्णिलें जाय ॥
अणिमादिक सुख संपदा करिति पुरी निज ठाय ॥ २९ ॥

जिथे हत्ती घोडे इ. चे समूह पाणी पितात तो घाट सुंदर असून दूर व स्वतंत्र आहे ॥ १ ॥ पाणी भरण्यासाठी (स्त्रियांचे) अनेक घाट असून ते अति मनोहर आहेत व तेथे पुरुष स्नान करीत नाहीत ॥ २ ॥ राजघाट (सार्वजनिक) सर्व प्रकारे उत्तम व सुंदर आहेत व तेथे चारी वर्णाचे लोक स्नान करतात ॥ ३ ॥ नदीच्या तीरा तीरांवर विष्णु, शंकर यांची पुष्कळ मंदिरे असून त्यांच्या सभोवती उपवने आहेत ॥ ४ ॥ शरयूच्या तीरावर कुठे कुठे त्यागी ज्ञानरत मुनी व संन्यासी राहतात. ॥ ५ ॥ नदीच्या काठाकाठाने मुनीगणांनी तुलसीची सुंदर बनेच्या बनेच लावली आहेत. ॥ ६ ॥ नगराची शोभा जरा सुद्धा वर्णन करता येत नाही, व नगराच्या बाहेरही अत्यंत सौंदर्य आहे. ॥ ७ ॥ नगराचे दर्शन पापाचा डाग सुद्धा उरु देत नाही. नगराबाहेर वने, उपवने, वापी तलाव पुष्कळ आहेत. ॥ ८ ॥ अनुपम सुंदर वापी, तलाव व कूप विशाल व मनोहर असे शोभत आहेत. त्यांना असलेले सुंदर सोपान व निर्मल पाणी पाहून देव व मुनी मोहित होतात. (तलावात व वापीत) अनेक रंगाची फुले फुललेली असून भृंग गुंजारव करीत आहेत व पक्षी सुंदर बोलत आहेत उद्याने रम्य आहेत आणि कोकिळादि खगांचे कूजन जणू वाटसरुंना बोलवीत आहे. ॥ छंद ॥ जेथे रमानाथ राजा आहे, ते नगर वर्णिले जाणार कसे ? (अशक्य !) अणिमादिक अष्टसिद्धी, सुख व संपत्ती (ऋद्धी व नवनिधी) यांनी हे नगर आपले निवासस्थान केले आहे. ॥ दो० २९ ॥

जिथं तिथं नर रघुपति गुण गाती । बसुनि परस्पर हेंच शिकविती ॥
भजा प्रणत प्रतिपालक रामा । शोभा शील रूप गुण धामा ॥
श्यामल गात्रा जलज लोचना । पक्ष्म नयन इव दासत्राणा ॥
धृत शर रुचिर चाप तूणीरा । संत कंजवन रवि रणधीरा ॥
काल कराल भुजग विहगेश्वर । नमत राम अकाम ममता हर ॥
लोभ मोह मृगयूथ किराता । मनसिज करि हरि, जन सुखदाता ॥
संशय शोक निबिडतम भानुसि । दनुज गहन घन दहन कृशानुसि ॥
जनकसुतेसह रघुवीरासी । कां न भजा भवभीति हरासी ॥
बहु वासनामशक हिमराशिस । सदा एकरस अज अविनाशिस ॥
मुनिरंजन भंजन महिभारा । दास तुलसिचे प्रभुस उदारा ॥

दो० :- नगरनारिनर यापरीं करिति रामगुणगान ॥
सानिकूल सकलां असति संतत कृपा निधान ॥ ३० ॥

अयोध्याजन कृत धनिष्ठा नक्षत्र स्तुती - लोक जिथे तिथे रघुपतीचे गुण गातात आणि बसून एकमेकांस हेच शिकवितात की ॥ १ ॥ शरणागतांचा प्रतिपाल करणा‍र्‍या रामाला भजा शोभा, शील, रुप व गुण यांचे धाम – श्रीरामाला भजा ॥ २ ॥ श्यामल शरीराच्या कमलनयन रामाला भजा पापण्या डोळ्यांचे संरक्षण करतात तसे सेवकांचे रक्षण करणा‍र्‍या रामाला भजा ॥ ३ ॥ सुंदर बाण धनुष्य व भाता धारण करणार्‍या रामाला भजा संतरुपी कमलवनाला फुलविणार्‍या रणधीर श्रीरामसूर्याला भजा ॥ ४ ॥ कालरुपी भयानक भुजंगाला खाणार्‍या श्रीरामरुपी खगेश्वराला भजा. नमतांच शरण जाताच निष्कामांच्या ममतेचे हरण करणार्‍या श्रीरामाला भजा ॥ ५ ॥ लोभमोहादिरुपी हरीणांच्या कळपांना मारणा‌र्‍या श्रीरामरुपी पारध्यास भजा मदनरुपी हत्तीचा विनाश करणार्‍या सिंहाला हरिला, सेवकांस सुख देणार्‍या श्रीरामाला भजा ॥ ६ ॥ संशय व शोक रुपी निबिड अंधाराचा नाश करणार्‍या सूर्याला भजा राक्षसरुपी घनदाट अरण्याला जाळणार्‍या श्रीरामरुपी दावाग्नीला भजा. ॥ ७ ॥ हरण करणार्‍या जानकीसहित रघुवीराला कां भजत नाही ? ॥ ८ ॥ अनेक वासनारुपी डासांच्या समूहाला मारणार्‍या रामरुपी हिमराशीस का नाही भजत ? नित्य, एकरस, जन्मरहित, अविनाशी श्रीरामास का भजत नाही ? ॥ ९ ॥ मुनींना आनंद देणार्‍या व महिभार भंजन करणार्‍या तुलसीदासांच्या उदार प्रभूला का भजत नाही ? ॥ १० ॥ याप्रमाणे अयोध्येतील स्त्रिया व पुरुष रामगुण गात असतात आणि कृपानिधान रामचंद्र सर्वांस सदा अति प्रसन्न असतात. ॥ दो० ३० ॥

जेव्हां रामप्रताप दिनपति । प्रबल परम उदया ये खगपति ॥
तदा त्रिलोकीं प्रकाश भरला । सुख बहुतानां, शोक जाहला ॥
ज्यांस शोक ते करतो वर्णन । प्रथम अविद्यानिशाविनाशन ॥
जिथें तिथें अघ‌उलुकें लपलीं । कामकोपकैरव संकुचलीं ॥
प्रकृति काल गुण कर्मां नाना । कोठें सौख्य चकोरं या ना ॥
मोह मान मद मत्सर तस्कर । कुठें न चाले यांचें हुन्नर ॥
धर्मसरीं ज्ञान नि विज्ञान । हीं पंकजें विकसलीं भिन्न ॥
सुख संतोष विराग विवेक । विगत शोक हे कोक अनेक ॥

दो० :- हा प्रताप रवि ज्याचे उरिं जैं करी प्रकाश ॥
मागिल वाढति कथित जे प्रथम पावती नाश ॥ ३१ ॥

श्रीराम प्रताप दिनेश – हे खगपती ! जेव्हा रामचंद्रांचा प्रतापरुपी अत्यंत प्रबल भास्कर उदयांस आला ॥ १ ॥ तेव्हापासून तिन्ही लोक त्याच्या प्रकाशाने भरले आणि पुष्कळांना सुख झाले व पुष्कळांना दु:ख झाले ॥ २ ॥ ज्यांना शोक झाला त्यांचे वर्णन प्रथम करतो. प्रथम अविद्यारुपी रात्रीचा विनाश झाला ॥ ३ ॥ पापरुपी घुबडे जेथल्या तेथे लपून बसली आणि काम, क्रोध, इत्यादी कुमुदे मिटली ॥ ४ ॥ प्रकृती, काल, गुण व नाना कर्मे या चकोरांना कुठेच सुख मिळेनासे झाले ॥ ५ ॥ मोह, मान, मद मत्सर हे चोर आहेत, पण यांची कर्तृत्त्वकला (चौर्य) कुठेही चालेनाशी झाली ॥ ६ ॥ धर्मरुपी तलावात ज्ञान आणि विज्ञानाची निरनिराळ्या प्रकारची कमळे फुलली ॥ ७ ॥ आणि सुख, संतोष, वैराग्य व विवेक हे अनेक चक्रवाक शोकरहित बनले ॥ ८ ॥ हा रामप्रतापसूर्य ज्याच्या हृदयात जेव्हा प्रकाश पाडतो, तेव्हा नंतर वर्णन केलेले वाढतात (गुण) व आधी वर्णन केलेले (दोष) नाश पावतात ॥ दो० ३१ ॥

* * * * *

श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु

GO TOP