अशोकवनिकायां प्रविश्य तस्याः शोभाया दर्शनमेकस्मिन्नशोके प्रच्छन्नीभूतेन हनुमता तत एव तस्या अनुसन्धानम् -
|
हनुमन्ताचे अशोक वाटिकेत प्रवेश करून त्या वाटिकेची शोभा पहाणे, तथा एका अशोक वृक्षावर लपून राहून तेथून सीतेचे अनुसन्धान करणे -
|
स मुहूर्तमिव ध्यात्वा मनसा चाधिगम्य ताम् ।
अवप्लुतो महातेजाः प्राकारं तस्य वेश्मनः ॥ १ ॥
|
नन्तर सीतेचा शोध घेण्याविषयी एक मुहूर्तपर्यन्त विचार करून आणि मनातल्या मनात सीतेचे ध्यान करून ते महातेजस्वी हनुमान रावणाच्या महालावरून उडी मारून अशोक वाटिकेभोवती असलेल्या तटबन्दीवर चढले. ॥१॥
|
स तु संहृष्टसर्वाङ्गः प्राकारस्थो महाकपिः ।
पुष्पिताग्रान् वसन्तादौ ददर्श विविधान् द्रुमान् ॥ २ ॥
|
त्या तटबन्दीवर बसलेले असता महाकपि हनुमन्ताच्या सर्वांगावर आनन्दाचे रोमांच उठले. त्यांनी तेथून वसन्तऋतूच्या आरंभी प्रफुल्लित झालेले फळा-फुलांनी डंवरलेले नाना प्रकारचे वृक्ष पाहिले. त्यांचे अग्रभाग फुलांनी लगडलेले होते. ॥२॥
|
सालानशोकान् भव्यांश्च चंपकांश्च सुपुष्पितान् ।
उद्दालकान् नागवृक्षांश्चूतान् कपिमुखानपि ॥ ३ ॥
तथाम्रवणसम्पन्नाँल्लताशतसमन्वितान् ।
ज्यामुक्त इव नाराचः पुप्लुवे वृक्षवाटिकाम् ॥ ४ ॥
|
तेथे साल, अशोक, निम्ब आणि प्रफुल्लित चंपक वृक्ष खूप होते. उद्दाळक, नागकेसर वृक्ष आणि वानरांच्या मुखासारखी लाल फळे देणारे आम्रवृक्षही पुष्प आणि मञ्जिरीने सुशोभित झाले होते. आमरायींनी युक्त ते सर्व वृक्ष शेकडो लतांनी वेढलेले होते. हनुमान प्रत्यंचेतून सुटलेल्या बाणाप्रमाणे उड्डाण करुन त्या वृक्षांच्या वाटिकेमध्ये जाऊन पोहोंचले. ॥३-४॥
|
स प्रविश्य विचित्रां तां विहगैरभिनादिताम् ।
राजतैः कांचनैश्चैव पादपैः सर्वतो वृताम् ॥ ५ ॥
विहगैर्मृगसङ्घैश्च विचित्रां चित्रकाननाम् ।
उदितादित्यसङ्काशां ददर्श हनुमान् बली ॥ ६ ॥
|
त्या विचित्र वाटिकेत सोने आणि चान्दीच्या सारख्या वर्णाचे अनेक वृक्ष होते आणि त्या वृक्षांनी ती वाटिका सर्व बाजूनी वेढली गेली होती. तिच्यात नाना प्रकारचे पक्षी कलरव करीत असल्याने ती सर्व वाटिका त्यांच्या किलबिलाटाने निनादित झाली होती. त्या वाटिकेत प्रवेश करून हनुमन्तानी तिचे निरीक्षण केले. विविध प्रकारच्या पशु, पक्ष्यांच्या समुदायांनी ती विचित्र शोभेने युक्त दिसत होती. ती विचित्र काननांनी अलंकृत होती आणि सूर्योदयकालीन अरूण रंगाने प्रकाशित भासत होती. ॥५-६॥
|
वृतां नानाविधैर्वृक्षैः पुष्पोपगफलोपगैः ।
कोकिलैर्भृङ्गराजैश्च मत्तैर्नित्यनिषेविताम् ॥ ७ ॥
|
फुलाफळांनी लगडलेल्या नाना प्रकारच्या वृक्षांनी व्याप्त असलेल्या त्या अशोकवाटिकेचे सेवन मदमत्त झालेले कोकिळ आणि भ्रमर करीत होते. ॥७॥
|
प्रहृष्टमनुजां काले मृगपक्षिमदाकुलाम् ।
मत्तबर्हिणसङ्घुष्टां नानाद्विजगणायुताम् ॥ ८ ॥
|
ती वाटिका अशी होती कि तेथे गेल्याने प्रत्येक वेळी लोकांची मने प्रसन्न होत असत. मृग आणि पक्षी मदमत्त होऊन जात. मत्त मोरांचा कलरव उर्फ केका तेथे निरन्तर गुञ्जत असे आणि विविध प्रकारचे पक्षी तेथे निवास करून राहिले होते. ॥८॥
|
मार्गमाणो वरारोहां राजपुत्रीमनिन्दिताम् ।
सुखप्रसुप्तान् विहगान् बोधयामास वानरः ॥ ९ ॥
|
त्या वाटिकेत सती-साध्वी सुन्दर राजकुमारी सीतेचा शोध करीत असता हनुमन्तांनी घरट्यात सुखपूर्वक झोपी गेलेल्या पक्ष्यांना जागविले. ॥९॥
|
उत्पतद्भिर्द्विजगणैः पक्षैर्वातैः समाहताः ।
अनेकवर्णा विविधा मुमुचुः पुष्पवृष्टयः ॥ १० ॥
|
उडणार्या विहंगमाच्या पंख्याच्या वार्यामुळे तेथील वृक्ष अनेक प्रकारच्या रंगीबेरंगी फुलांची वृष्टी करू लागले. ॥१०॥
|
पुष्पावकीर्णः शुशुभे हनुमान् मारुतात्मजः ।
अशोकवनिकामध्ये यथा पुष्पमयो गिरिः ॥ ११ ॥
|
त्यावेळी फुलांनी आच्छादित झाल्याने पवनकुमार हनुमान जणु काही त्या अशोकवनान्त फुलांचा बनविलेला पर्वतगिरिच शोभावा तसे शोभू लागले. ॥११॥
|
दिशः सर्वाभिधावन्तं वृक्षखण्डगतं कपिम् ।
दृष्ट्वा सर्वाणि भूतानि वसन्त इति मेनिरे ॥ १२ ॥
|
संपूर्ण दिशांमध्ये धावणार्या आणि वृक्षसमूहात संचार करणार्या हनुमन्तास पाहून समस्त प्राणी यांना असे वाटू लागले की साक्षात ऋतुराज वसन्तच तेथे वानररूपाने विचरत आहे की काय ? ॥१२॥
|
वृक्षेभ्यः पतितैः पुष्पैरवकीर्णाः पृथग्विधैः ।
रराज वसुधा तत्र प्रमदेव विभूषिता ॥ १३ ॥
|
वृक्षांपासून गळून पडलेल्या विविध प्रकारच्या फुलांनी आच्छादित झालेली तेथील भूमी शृंगारांनी विभूषित झालेल्या तरूणी प्रमाणे शोभून दिसू लागली. ॥१३॥
|
तरस्विना ते तरवः तरसा बहु कम्पिताः ।
कुसुमानि विचित्राणि ससृजुः कपिना तदा ॥ १४ ॥
|
त्यावेळी त्या वेगवान वानरवीराद्वारा वेगाने वारंवार हलविले गेलेले ते वृक्ष विचित्र पुष्पांचा वर्षाव करू लागले. ॥१४॥
|
निर्धूतपत्रशिखराः शीर्णपुष्पफल द्रुमाः ।
निक्षिप्तवस्त्राभरणा धूर्ता इव पराजिताः ॥ १५ ॥
|
या प्रकारे शाखांची पाने झडल्यामुळे आणि फुले फळे आणि पालवी वृक्षांपासून तुटून सर्वत्र विखुरली गेल्यामुळे उघडे-बोडके दिसणारे ते वृक्ष हरलेल्या जुगार्याप्रमाणे, ज्याने आपली वस्त्रे आणि अलङ्कारादि डावावर लावलेले होते आणि हरल्यामुळे जो या विरहित झाला होता, तसे भासत होते. ॥१५॥
|
हनूमता वेगवता कम्पितास्ते नगोत्तमाः ।
पुष्पपर्णफलान्याशु मुमुचुः फलशालिनः ॥ १६ ॥
|
वेगवान हनुमानांनी गदागदा हलविल्यामुळे त्या फळांनी लगडलेल्या श्रेष्ठ वृक्षांनी तात्काळ आपली पाने, फुले, फळे इत्यादिंचा परित्याग केला. ॥१६॥
|
विहङ्गसङ्घैर्हीनास्ते स्कन्धमात्राश्रया द्रुमाः ।
बभूवुरगमाः सर्वे मारुतेन विनिर्धुताः ॥ १७ ॥
|
पवनपुत्र हनुमानाच्या द्वारे कंपित केले गेलेले ते वृक्ष त्यांच्यावर पाने, फुले, फळे न राहिल्याने केवळ शाखांचा आश्रय घेऊन राहिले होते. पक्षी समुदायही त्यांना सोडून निघून गेले होते. त्या अवस्थेत ते सर्वच्या सर्व प्राणीमात्रांसाठी अगम्य झाले होते. ॥१७॥
|
विधूतकेशी युवतिर्यथा मृदितवर्णका ।
निष्पीतशुभदन्तोष्ठी नखैर्दन्तैश्च विक्षता ॥ १८ ॥
तथा लाङ्गूलहस्तैस्तु चरणाभ्यां च मर्दिता ।
तथैवाशोकवनिका प्रभग्नवनपादपा ॥ १९ ॥
|
जिचे केस मोकळे सुटले आहेत, अंगराग निघून गेला आहे, सुन्दर दन्तावलीने युक्त अधर-सुधेचे पान केले आहे तसेच जिचे बरेचसे अवयव नखक्षत आणि दन्तक्षत यांनी उपलक्षित झालेले आहे अशा प्रियतमाच्या उपभोगात आणल्या गेलेल्या युवतीप्रमाणे त्या अशोकवाटिकेची दशा होत होती. हनुमन्ताच्या हात-पाय-पुच्छ आदिंनी ती तुडविली गेली होती आणि तिच्यातील चांगले चांगले वृक्ष मोडून पडले होते. त्यामुळे ती श्रीहीन बनली होती. ॥१८-१९॥
|
महालतानां दामानि व्यधमत् तरसा कपिः ।
यथा प्रावृषि वेगेन मेघजालानि मारुतः ॥ २० ॥
|
ज्याप्रमाणे वर्षाऋतूत वायु आपल्या वेगाने विन्ध्यपर्वतावरील मेघसमूहांना छिन्नभिन्न करतो त्याप्रमाणे कपिवर हनुमानांनी तेथे पसरलेल्या विशाल लता-वल्लरीच्या विताणांना (मंडपाना) तोडून टाकले होते. ॥२०॥
|
स तत्र मणिभूमीश्च राजतीश्च मनोरमाः ।
तथा काञ्चनभूमीश्च विचरन् ददृशे कपिः ॥ २१ ॥
|
तेथे विचरत असता त्या वानरवीराने अशा विविध प्रकारच्या भूमींचे दर्शन केले की ज्यांच्यामध्ये रत्ने, चान्दी, सोने आदि जडविलेले होते. ॥२१॥
|
वापीश्च विविधाकाराः पूर्णाः परमवारिणा ।
महार्हैर्मणिसोपानैरुपपन्नास्ततस्ततः ॥ २२ ॥
मुक्ताप्रवालसिकताः स्फाटिकान्तरकुट्टिमाः ।
काञ्चनैस्तरुभिश्चित्रैर्तीरजैरुपशोभिताः ॥ २३ ॥
|
त्या वाटिकेत त्यांनी जेथे तेथे विभिन्न आकारांच्या अनेक विहिरी पाहिल्या. त्या उत्तम जलाने भरलेल्या होत्या आणि मणिमय सोपानांनी (पायर्यांनी) युक्त होत्या. त्यांच्यात मोती आणि प्रवाळांच्या चूर्णाची वाळू होती. जलाच्या खाली स्फटिक मण्यांची फरशी बनविलेली होती आणि विहिरींच्या काठावर निरनिराळ्या प्रकारचे विचित्र सुवर्णमय वृक्ष शोभत होते. ॥२२-२३॥
|
बुद्धपद्मोत्पलवनाश्चक्रवाकोपशोभिताः ।
नत्यूहरुतसंघुष्टा हंससारस नादिताः ॥ २४ ॥
|
त्यान्तील प्रफुल्लित कमळवनामुळे आणि चक्रवाकांच्या जोड्यांमुळे त्यांची शोभा वाढली होती आणि सारसांचा, चातकांचा आणि हंसांचा कलरव तेथे गुञ्जत होता. ॥२४॥
|
दीर्घाभिर्द्रुमयुक्ताभिः सरिद्भिश्च समन्ततः ।
अमृतोपमतोयाभिः शिवाभिरुपसंस्कृताः ॥ २५ ॥
|
अनेकानेक विशाल तटवर्ती वृक्षांनी सुशोभित अमृताप्रमाणे मधुर जलाने परिपूर्ण आणि सुखदायिनी नद्या चारी बाजूनी त्या विहिरींना सदा संस्कारित करीत होत्या. (अर्थात त्यांना स्वच्छ पाण्याने परिपूर्ण संपन्न बनवीत होत्या.) ॥२५॥
|
लताशतैरवतताः सन्तानकुसुमावृताः ।
नानागुल्मावृतवनाः करवीरकृतान्तराः ॥ २६ ॥
|
त्यांच्या तटांवर शेकडो प्रकारच्या लता पसरलेल्या होत्या. फुललेल्या कल्पवृक्षांनी त्यांना चारी बाजूने वेढलेले होते. त्यांचे जल नाना प्रकारच्या झाडींनी झाकले गेले होते आणि मधे मधे फुललेले कण्हेरीचे वृक्ष गवाक्षाप्रमाणे शोभत होते. ॥२६॥
|
ततोऽम्बुधरसङ्काशं प्रवृद्धशिखरं गिरिम् ।
विचित्रकूटं कूटैश्च सर्वतः परिवारितम् ॥ २७ ॥
शिलागृहैरवततं नानावृक्ष समावृतम् ।
ददर्श कपिशार्दूलो रम्यं जगति पर्वतम् ॥ २८ ॥
|
नन्तर तेथे हनुमन्त कपिश्रेष्ठांनी मेघाप्रमाणे काळा आणि उंच शिखरे असलेला एक पर्वत पाहिला. त्याची शिखरे फार विचित्र होती. त्याच्या चारी बाजूस दुसरीही अनेक पर्वत शिखरे शोभून दिसत होती. त्यात अनेक दगडी गुफा होत्या आणि त्या पर्वतावर अनेकानेक वृक्षही उगवले होते, त्यामुळे तो पर्वत जगान्त अत्यन्त रमणीय भासत होता. ॥२७-२८॥
|
ददर्श च नगात् तस्मान्नदीं निपतितां कपिः ।
अङ्कादिव समुत्पत्य प्रियस्य पतितां प्रियाम् ॥ २९ ॥
|
कपिवर हनुमन्तानी त्या पर्वतावरून खाली उडी घेणारी एक नदी पाहिली, ती प्रियतमाच्या अंकावरून उसळून खाली पडलेल्या प्रियतमे सारखी भासत होती. ॥२९॥
|
जले निपतिताग्रैश्च पादपैरुपशोभिताम् ।
वार्यमाणामिव क्रुद्धां प्रमदां प्रियबन्धुभिः ॥ ३० ॥
|
ज्यांच्या डहाळ्या खाली झुकून पाण्याला स्पर्श करित होत्या, अशा तटवर्ती वृक्षांमुळे ती नदी अशी शोभत होती की जणु प्रियकरावर रूसून अन्यत्र जाणार्या युवतीला तिच्या प्रिय सख्या पुढे जाण्यापासून अडवीत आहेत. ॥३०॥
|
पुनरावृत्ततोयां च ददर्श स महाकपिः ।
प्रसन्नामिव कान्तस्य कान्तां पुनरुपस्थिताम् ॥ ३१ ॥
|
नन्तर त्या महाकपिने पाहिले की त्या शाखांनी अडल्यामुळे नदीच्या जलाचा प्रवाह परत फिरल्याप्रमाणे दिसत होता. जणुं काय परत प्रसन्न झालेली प्रेयसी प्रियकराच्या सेवेत उपस्थित झाली आहे. ॥३१॥
|
तस्यादूरात् स पद्मिन्यो नानाद्विजगणायुताः ।
ददर्श कपिशार्दूलो हनुमान् मारुतात्मजः ॥ ३२ ॥
|
त्या पर्वतापासून थोड्या दूर अन्तरावर कपिश्रेष्ठ पवनपुत्र हनुमन्तानी अनेक कमळ-मण्डित सरोवरे पाहिली, त्यांच्यात नाना प्रकारचे पक्षी किलबिलत होते. ॥३२॥
|
कृत्रिमां दीर्घिकां चापि पूर्णां शीतेन वारिणा ।
मणिप्रवरसोपानां मुक्तासिकतशोभिताम् ॥ ३३ ॥
|
या खेरिज त्यांनी एक कृत्रिम तलावही पाहिला. तो शीतल पाण्याने भरलेला होता. त्यात रत्नांच्या पायर्या होत्या आणि तो मोत्यांच्या चुर्याच्या वाळुका राशीने सुशोभित झाला होता. ॥३३॥
|
विविधैर्मृगसङ्घैश्च विचित्रां चित्रकाननाम् ।
प्रासादैः सुमहद्भिश्च निर्मितैर्विश्वकर्मणा ॥ ३४ ॥
काननैः कृत्रिमैश्चापि सर्वतः समलङ्कृताम् ।
|
त्या अशोक वाटिकेत विश्वकर्म्याने बनविलेले मोठ मोठे महाल आणि कृत्रिम वने सर्व बाजूनी तिची शोभा वाढवीत होते. नाना प्रकारच्या मृगसमूहांनी त्या वाटिकेस विचित्र शोभा प्राप्त झाली होती, तसेच तिच्यामध्ये विचित्र वन-उपवनेही शोभून दिसत होती. ॥३४ १/२॥
|
ये केचित् पादपास्तत्र पुष्पोपगफलोपगाः ॥ ३५ ॥
सच्छत्राः सवितर्दीकाः सर्वे सौवर्णवेदिकाः ।
|
तेथे जे काही वृक्ष होते ते सर्व फुले फळे देणारे होते. त्यांची छाया छत्राप्रमाणे घनदाट होती. त्या सर्वांच्या खाली चान्दीची आणि तिच्यावर सोन्याची या प्रमाणे वेदी बनविलेल्या होत्या. ॥३५ १/२॥
|
लताप्रतानैर्बहुभिः पर्णैश्च बहुभिर्वृताम् ॥ ३६ ॥
काञ्चनीं शिंशुपामेकां ददर्श स महाकपिः ।
वृतां हेममयीभिस्तु वेदिकाभिः समन्ततः ॥ ३७ ॥
|
त्यानन्तर महाकपि हनुमानांनी एक सुवर्णमय शिंशपा (अशोक) वृक्ष पाहिला. तो अनेक लताविताणांनी आणि अगणित पानांनी व्याप्त होता. तो वृक्षही सर्व बाजूनी सुवर्णमय वेदिकांनी वेढलेला होता. ॥३६-३७॥
|
सोऽपश्यद् भूमिभागांश्च नगप्रस्रवणानि च ।
सुवर्णवृक्षानपरान् ददर्श शिखिसन्निभान् ॥ ३८ ॥
|
या खेरीज त्यांने आणखीही बरेच मैदानी प्रदेश, पहाडी निर्झर आणि अग्निप्रमाणे दीप्तीमान सुवर्णमय वृक्ष पाहिले. ॥३८॥
|
तेषां द्रुमाणां प्रभया मेरोरिव महाकपिः ।
अमन्यत तदा वीरः काञ्चनोऽस्मीति सर्वतः ॥ ३९ ॥
|
त्यावेळी वीर महाकपि हनुमानांनी सुमेरू प्रमाणे त्या वृक्षांच्या प्रभेमुळे आपल्या स्वत:सही सर्व बाजूने सुवर्णमयच मानले. ॥३९॥
|
तां काञ्चनान् वृक्षगणान् मारुतेन प्रकम्पितान्म् ।
किङ्किणीशतनिर्घोषां दृष्ट्वा विस्मयमागमत् ॥ ४० ॥
स पुष्पिताग्रान् रुचिरान् तरुणाङ्कुरपल्लवान् ।
|
तो सुवर्णमय वृक्षसमूह ज्यावेळी वार्याच्या झोताने हलू लागे तेव्हा त्यान्तून शेंकडो घुंगुर वाजावेत तसा मधुर ध्वनी उत्पन्न होत असे. हे सर्व पाहून हनुमन्तास फार विस्मय वाटला. त्या वृक्षांच्या शाखांवर सुन्दर फुले उमलली होती आणि नवीन नवीन अंकुर आणि पालवी फुटलेली होती, त्यामुळे ते फारच सुन्दर दिसत होते. ॥४० १/२॥
|
तामारुह्य महावेगः शिंशपां पर्णसंवृताम् ॥ ४१ ॥
इतो द्रक्ष्यामि वैदेहीं रामदर्शनलालसाम् ।
इतश्चेतश्च दुःखार्तां संपतन्तीं यदृच्छया ॥ ४२ ॥
|
महान वेगवान हनुमान त्या हिरव्यागार शिंपपा वृक्षावर चढले आणि विचार करू लागले की मी येथून श्रीरामचन्द्रांच्या दर्शनासाठी उत्सुक झालेल्या त्या विदेहनन्दिनी सीतेला पाहीन की जी दु:खाने आतुर होऊन स्वेच्छेने इकडे तिकडे येरझारा घालीत असेल. ॥४१-४२॥
|
अशोकवनिका चेयं दृढं रम्या दुरात्मनः ।
चन्दनैश्चंपकैश्चापि बकुलैश्च विभूषिता ॥ ४३ ॥
इयं च नलिनी रम्या द्विजसङ्घनिषेविता ।
इमां सा राजममहिषी नूनमेष्यति जानकी ॥ ४४ ॥
|
दुरात्मा रावणाची ही अशोक वाटिका अत्यन्त रमणीय आहे. चन्दन, चंपक आणि बकुळीच्या वृक्षांनी हिची शोभा वाढली आहे. इकडे हे पक्ष्यांनी सेवित कमळमण्डित सरोवरही फार सुन्दर आहे. राज-महिषी जानकी याच्या तटावर निश्चितच येत असावी. ॥४३-४४॥
|
सा रामा राजमहिषी राघवस्य प्रिया सती ।
वनसंचारकुशला ध्रुवमेष्यति जानकी ॥ ४५ ॥
|
राघवाची प्रिया, सती साध्वी, ती राज्ञी रामजानकी वनान्त संचार करण्यात अत्यन्त कुशल आहे. ती अवश्य इकडे येईल. ॥४५॥
|
अथवा मृगशावाक्षी वनस्यास्य विचक्षणा ।
वनमेष्यति साद्येह रामचिन्तासुकर्शिता ॥ ४६ ॥
|
अथवा या वनाच्या वैशिष्ट्याचे ज्ञानात निपुण, मृगशावका सारखे नेत्र असलेली सीता आज या तलावाच्या तटवर्ती वनात अवश्य येईल. कारण ती रामचन्द्रांच्या वियोगाच्या दु:खाने अत्यन्त कृश झालेली असेल. (आणि या सुन्दर स्थानी आल्याने तिची चिन्ता थोडीशी कमी होऊ शकेल.) ॥४६॥
|
रामशोकाभिसन्तप्ता सा देवी वामलोचना ।
वनवासरता नित्यमेष्यते वनचारिणी ॥ ४७ ॥
|
सुन्दर नेत्र असणारी देवी सीता भगवान श्रीरामाच्या विरहशोकाने फारच सन्तप्त झाली असेल. वनवासात त्यांचे परस्परावर सदैव प्रेम होते, म्हणून ती वनात संचार करीत असता अवश्य इकडे येईल. ॥४७॥
|
वनेचराणां सततं नूनं स्पृहयते पुरा ।
रामस्य दयिता चार्या जनकस्य सुता सती ॥ ४८ ॥
|
श्रीरामांची प्रिय पत्नी सती साध्वी जनकनन्दिनी सीता प्रथमपासूनच वनवासी जीव जन्तूंवर निश्चितच प्रेम करीत असेल (म्हणून त्यांच्यासाठी वनात भ्रमण करणे स्वाभाविक आहे, म्हणून येथे तिचे दर्शन होण्याची संभावना आहे.) ॥४८॥
|
सन्ध्याकालमनाः श्यामा ध्रुवमेष्यति जानकी ।
नदीं चेमां शुभजलां सन्ध्यार्थे वरवर्णिनी ॥ ४९ ॥
|
ही प्रात:कालीन सन्ध्या (उपासना) करण्याची वेळ आहे. यामध्ये मन लावणारी आणि सदा षोडश-वर्षाप्रमाणे अवस्था जिची असते अशी अक्षय यौवना जनककुमारी सुन्दर सीता सन्ध्याकालीन उपासनेसाठी या पुण्यसलीला नदीच्या तटावर अवश्य येईल. ॥४९॥
|
तस्याश्चाप्यनुरूपेयमशोकवनिका शुभा ।
शुभायाः पार्थिवेन्द्रस्य पत्नी रामस्य सम्मता ॥ ५० ॥
|
जी राजाधिराज श्रीरामचन्द्रांची समादरणीय पत्नी आहे, त्या शुभलक्षण संपन्न सीतेसाठी ही सुन्दर अशोकवाटिका सर्वप्रकारे अनुकूलच आहे. ॥५०॥
|
यदि जीवति सा देवी ताराधिपनिभानना ।
आगमिष्यति सावश्यमिमां शीतजलां नदीम् ॥ ५१ ॥
|
जर चन्द्रमुखी सीतादेवी जीवित असेल तर ती या शीतल जळ असणार्या सरितेच्या तटावर अवश्य पदार्पण करील. ॥५१॥
|
एवं तु मत्वा हनुमान् महात्मा
प्रतीक्षमाणो मनुजेन्द्रपत्नीम् ।
अवेक्षमाणश्च ददर्श सर्वं
सुपुष्पिते पर्णघने निलीनः ॥ ५२ ॥
|
असा विचार करीत महात्मा हनुमान नरेन्द्रपत्नी सीतेच्या शुभ आगमनाची प्रतीक्षा करण्यात तत्पर होऊन सुन्दर फुलांनी सुशोभित आणि घनदाट पर्णराजी असलेल्या त्या अशोक वृक्षावर लपून राहून त्या संपूर्ण वनावर दृष्टिपात करित राहिले. ॥५२॥
|
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीय आदिकाव्ये सुन्दरकाण्डे चतुर्दशः सर्गः ।
|
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यान्तील सुन्दरकाण्डाचा चौदावा सर्ग पूरा झाला. ॥१४॥
|