श्रीमद् वाल्मीकि रामायणे
युद्धकाण्डे
॥ षटत्रिंश: सर्ग: ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

माल्यवंतं निर्भर्त्स्य नगरगुप्तिं विधाय रावणस्य निजान्तःपूरे गमनम् - माल्यवानावर आक्षेप आणि नगराच्या रक्षणाची व्यवस्था करून रावणाचे आपल्या अंत:पुरात जाणे -
तत् तुत्तु माल्यवतो वाक्यं हितमुक्तं दशाननः ।
न मर्षयति दुष्टात्मा कालस्य वशमागतः ॥ १ ॥
दुष्टात्मा दशमुख रावण काळाच्या अधीन होत होता म्हणून तो माल्यवानाने सांगितलेली हितकारक गोष्ठी सहन करू शकला नाही. ॥१॥
स बद्ध्वा भ्रुकुटिं वक्त्रे क्रोधस्य वशमागतः ।
अमर्षात् परिवृत्ताक्षो माल्यवंतमथाब्रवीत् ॥ २ ॥
तो क्रोधाला वशीभूत झाला. अमर्षामुळे त्याचे नेत्र गरगरा फिरू लागले. त्याने भुवया वक्र करून माल्यवानास म्हटले- ॥२॥
हितबुद्ध्या यदहितं वचः परुषमुच्यते ।
परपक्षं प्रविश्यैव नैतच्छ्रोत्रगतं मम ॥ ३ ॥
तुम्ही शत्रुचा पक्ष घेऊन हित-बुद्धिने जी माझ्या अहिताची कठोर गोष्ट सांगितली आहे ती पूर्णपणे माझ्या कानापर्यंत पोहोचली नाही. ॥३॥
मानुषं कृपणं रामं एकं शाखामृगाश्रयम् ।
समर्थं मन्यसे केन त्यक्तं पित्रा वनाश्रयम् ॥ ४ ॥
बिचारा राम एक मनुष्य तर आहे, ज्याने काही वानरांचा आश्रय घेतला आहे. पित्याने त्याग केल्यामुळे त्याने वनाचा आश्रय केला आहे. त्याच्यामध्ये काय अशी विशेषता आहे की ज्यामुळे तुम्ही त्याला फार सामर्थ्यशाली मानत आहात. ॥४॥
रक्षसामीश्वरं मां च देवतानां भयंकरम् ।
हीनं मां मन्यसे केन ह्यहीनं सर्वविक्रमैः ॥ ५ ॥
मी राक्षसांचा स्वामी आहे तसेच सर्व प्रकारच्या पराक्रमाने संपन्न आहे. देवतांच्याही मनात मी भय उत्पन्न करतो, मग कुठल्या कारणाने तुम्ही मला रामापेक्षा हीन समजत आहात ? ॥५॥
वीरद्वेषेण वा शङ्‌के पक्षपातेन वा रिपोः ।
त्वयाऽहं परुषाण्युक्तो परप्रोत्साहनेन वा ॥ ६ ॥
तुम्ही जी मला कठोर गोष्ट ऐकविली आहे, त्यासंबंधी मला अशी शंका आहे की एकतर तुम्ही माझ्यासारख्या वीराचा द्वेष करत आहात अथवा शत्रुला मिळालेले आहात अथवा शत्रूनी असे सांगण्यासाठी अथवा करण्यासाठी तुम्हांला प्रोत्साहन दिले आहे. ॥६॥
प्रभवन्तं पदस्थं हि परुषं कोऽभिभाषते ।
पण्डितः शास्त्रतत्त्वज्ञो विना प्रोत्साहनेन वा ॥ ७ ॥
जो प्रभावशाली असण्याबरोबरच आपल्या राज्यावर प्रतिष्ठित आहे, अशा पुरूषाला कोण शास्त्रतत्वज्ञ विद्वान शत्रूचे प्रोत्साहन मिळाल्याशिवाय अशी कटुवचने ऐकवू शकेल ? ॥७॥
आनीय च वनात् सीतां पद्महीनामिव श्रियम् ।
किमर्थं प्रतिदास्यामि राघवस्य भयादहम् ॥ ८ ॥
कमलहीन कमलेप्रमाणे सुंदर सीतेला वनातून घेऊन आल्यावर आता केवळ राघवाच्या भयाने मी कसा परत देऊं ? ॥८॥
वृतं वानरकोटीभिः ससुग्रीवं सलक्ष्मणम् ।
पश्य कैश्चिदहोभिश्च राघवं निहतं मया ॥ ९ ॥
कोट्यावधी वानरांनी घेरलेल्या सुग्रीव आणि लक्ष्मणासहित राघवांना मी काही दिवसातच ठार मारून टाकीन, हे तू आपल्या डोळ्यांनी पहा. ॥९॥
द्वन्द्वे यस्य न तिष्ठन्ति दैवतान्यपि संयुगे ।
स कस्माद् रावणो युद्धे भयमाहारयिष्यति ॥ १० ॥
ज्याच्या समोर द्वंदयुद्धात देवताही उभ्या राहू शकत नाहीत, तोच रावण युद्धात कुणामुळे भयभीत होईल ? ॥१०॥
द्विधा भज्येयमप्येवं न नमेयं तु कस्यचित् ।
एष मे सहजो दोषः स्वभावो दुरतिक्रमः ॥ ११ ॥
माझे मधोमध दोन तुकडे झाले तरी होऊं देत, पण कुणाच्याही समोर मी वाकू शकत नाही. हा माझा सहज दोष आहे आणि स्वभाव कुणासाठीही दुर्लंघ्यच असतो. ॥११॥
यदि तावत् समुद्रे तु सेतुर्बद्धो यदृच्छया ।
रामेण विस्मयः कोत्र येन ते भयमागतम् ॥ १२ ॥
जरी रामाने दैववशात्‌ समुद्रावर सेतु बांधला असला तरी यात आश्चर्य करण्यासारखी काय गोष्ट आहे ? ज्यामुळे तुम्हांला इतके भय वाटत आहे ? ॥१२॥
स तु तीर्त्वार्णवं रामः सह वानरसेनया ।
प्रतिजानामि ते सत्यं न जीवन् प्रतियास्यति ॥ १३ ॥
मी तुमच्या समोर सत्यप्रतिज्ञा करून सांगत आहे की समुद्र पार करून वानरसेनेसहित आलेले राम येथून जिवंत परत जाऊ शकणार नाहीत. ॥१३॥
एवं ब्रुवाणं संरब्धं रुष्टं विज्ञाय रावणम् ।
व्रीडितो माल्यवान् वाक्यं नोत्तरं प्रत्यपद्यत ॥ १४ ॥
अशा गोष्टी बोलणारा रावण क्रोधाविष्ट आणि रुष्ट झालेला आहे, हे जाणून माल्यवान्‌ फार लज्जित झाला आणि त्याने काहीही उत्तर दिले नाही. ॥१४॥
जयाशिषा तु राजानं वर्धयित्वा यथोचितम् ।
माल्यवानभ्यनुज्ञातो जगाम स्वं निवेशनम् ॥ १५ ॥
माल्यवानाने महाराजांचा जय असो या विजयसूचक आशीर्वादाने राजाला यथोचित प्रोत्साहन दिले आणि त्याची आज्ञा घेऊन तो आपल्या घरी निघून गेला. ॥१५॥
रावणस्तु सहामात्यो मंत्रयित्वा विमृश्य च ।
लङ्‌कायास्तु तदा गुप्तिं कारयामास राक्षसः ॥ १६ ॥
नंतर राक्षस रावणाने मंत्र्यांसहित परस्पर विचार विमर्श करून तात्काळ लंकेच्या रक्षणाची व्यवस्था केली. ॥१६॥
स व्यादिदेश पूर्वस्यां प्रहस्तं द्वारि राक्षसम् ।
दक्षिणस्यां महावीर्यौ महापार्श्वमहोदरौ ॥ १७ ॥

पश्चिमायामथ द्वारि पुत्रमिन्द्रजितं तथा ।
व्यादिदोश महामायं राक्षसैर्बहुभिर्वृतम् ॥ १८ ॥
त्याने पूर्वद्वारावर त्याच्या रक्षणासाठी राक्षस प्रहस्ताला तैनात केले, दक्षिण द्वारावर महापराक्रमी महापार्श्व आणि महोदराला नियुक्त केले, तसेच पश्चिम द्वारावर आपला पुत्र इंद्रजित यास ठेवले, जो महान्‌ मायावी होता. तो बर्‍याचशा राक्षसांनी घेरलेला होता. ॥१७-१८॥
उत्तरस्यां पुरद्वारि व्यादिश्य शुकसारणौ ।
स्वयं चात्र गमिष्यामि मंत्रिणस्तानुवाच ह ॥ १९ ॥
तदनंतर नगराच्या उत्तर द्वारावर शुक आणि सारण यांना रक्षणासाठी जाण्याची आज्ञा देऊन रावण मंत्र्यांना म्हणाला- मी स्वत: उत्तर द्वारावर जाईन. ॥१९॥
राक्षसं तु विरूपाक्षं महावीर्यपराक्रमम् ।
मध्यमेऽस्थापयद् गुल्मे बहुभिः सह राक्षसैः ॥ २० ॥
नगराच्या मध्यभागांतील छावणीवर त्याने बहुसंख्य राक्षसांसह महान्‌ बल-पराक्रमाने संपन्न राक्षस विरूपाक्षाला स्थापित केले. ॥२०॥
एवं विधानं लङ्‌कायाः कृत्वा राक्षसपुंगवः ।
कृतकृत्यमिवात्मानं मन्यते कालचोदितः ॥ २१ ॥
याप्रकारे लंकेमध्ये पुरीच्या रक्षणाची व्यवस्था करून काळप्रेरित- राक्षसशिरोमणी रावण आपणच आपल्याला कृतकृत्य मानू लागला. ॥२१॥
विसर्जयामास ततः स मंत्रिणो
विधानमाज्ञाप्य पुरस्य पुष्कलम् ।
जयाशिषा मंत्रिगणेन पूजितो
विवेश सोन्तःपुरमृद्धिमन्महत् ॥ २२ ॥
याप्रकारे नगराच्या संरक्षणाची प्रचुर व्यवस्था करण्यासाठी आज्ञा देऊन रावणाने सर्व मंत्र्यांना निरोप दिला आणि स्वत:ही त्यांच्या विजयसूचक आशीर्वादाने सन्मानित होऊन आपल्या समृद्धिशाली आणि विशाल अंत:पुरात तो निघून गेला. ॥२२॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् युद्धकाण्डे षट्त्रिंशः सर्गः ॥ ३६ ॥ याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकांडाचा छत्तीसावा सर्ग पूरा झाला. ॥३६॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP