श्रीमद् वाल्मीकि रामायणे
उत्तरकाण्डे
॥ एकोनसप्ततितमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
शत्रुघ्नलवणयोर्युद्धं लवणस्य वधश्च -
शत्रुघ्न आणि लवणासुराचे युद्ध तसेच लवणाचा वध -
तच्छ्रुत्वा भाषितं तस्य शत्रुघ्नस्य महात्मनः ।
क्रोधामाहारयत् तीव्रं तिष्ठ तिष्ठेति चाब्रवीत् ॥ १ ॥
महामना शत्रुघ्नाचे ते भाषण ऐकून लवणासुराला फार क्रोध आला आणि तो बोलला - अरे उभा रहा; उभा रहा. ॥१॥
पाणौ पाणिं च निष्पिष्य दन्तान् कटकटाय्य च ।
लवणो रघुशार्दूलं आह्वयामास चासकृत् ॥ २ ॥
तो हातावर हात रगडत आणि दात खात रघुकुळाचे सिंह शत्रुघ्न यांना वारंवार ललकारू लागला. ॥२॥
तं ब्रुवाणं तथा वाक्यं लवणं घोरदर्शनम् ।
शत्रुघ्नो देवशत्रुघ्न इदं वचनमब्रवीत् ॥ ३ ॥
भयंकर दिसणार्‍या लवणाला याप्रकारे बोलतांना पाहून देवशत्रूंचा नाश करणार्‍या शत्रुघ्नांनी असे म्हटले - ॥३॥
शत्रुघ्नो न तदा जातो यदान्ये निर्जितास्त्वया ।
तदद्य बाणाभिहतो व्रज त्वं यमसादनम् ॥ ४ ॥
राक्षसा ! जेव्हा तू दुसर्‍या वीरांना पराजित केले होतेस, तेव्हा त्यासमयी शत्रुघ्नाचा जन्म झालेला नव्हता. म्हणून आज माझ्या या बाणांच्या प्रहाराने तू सरळ यमलोकाचा रस्ता धर. ॥४॥
ऋषयोऽप्यद्य पापात्मन् मया त्वां निहतं रणे ।
पश्यन्तु विप्रा विद्वांसः त्रिदशा इव रावणम् ॥ ५ ॥
पापात्मन्‌ ! जसे देवतांनी रावणाला धराशायी झालेला पाहिला होता त्याच प्रकारे विद्वान्‌ ब्राह्मण आणि ऋषि आज रणभूमिमध्ये माझ्या द्वारा मारल्या गेलेल्या तुला दुराचारी राक्षसाला ही पाहोत. ॥५॥
त्वयि मद्‌बाणनिर्दग्धे पतितेऽद्य निशाचर ।
पुरे जनपदे चापि क्षेममेव भविष्यति ॥ ६ ॥
निशाचरा ! आज माझ्या बाणांनी दग्ध होऊन जेव्हा तू धरतीवर कोसळशील, त्या समयी या नगरात आणि जनपदातही सर्वांचे कल्याणच होईल. ॥६॥
अद्य मद्‌बाहुनिष्क्रान्तः शरो वज्रनिभाननः ।
प्रवेक्ष्यते ते हृदयं पद्ममंशुरिवार्कजः ॥ ७ ॥
आज माझ्या भुजांतून सुटलेला वज्रासमान टोक असलेला बाण जसा सूर्याचा किरण कमलकोशात प्रविष्ट होऊन जातो; त्याप्रकारे तुझ्या छातीत घुसेल. ॥७॥
एवमुक्तो महावृक्षं लवणः क्रोधमूर्च्छितः ।
शत्रुघ्नोरसि चिक्षेप स च तं शतधाच्छिनत् ॥ ८ ॥
शत्रुघ्नाने असे म्हटल्यावर लवण क्रोधाने जणु मूर्च्छितसा झाला आणि एक महान्‌ वृक्ष घेऊन त्याने शत्रुघ्नाच्या छातीवर फेकून मारला, परंतु शत्रुघ्नांनी त्याचे शेकडो तुकडे करून टाकले. ॥८॥
तद्दृष्ट्‍वा विफलं कर्म राक्षसः पुनरेव तु ।
पादपान् सुबहून् गृह्य शत्रुघ्नायासृजद् बली ॥ ९ ॥
तो वार फुकट गेला हे पाहून त्या बलवान्‌ राक्षसाने पुन्हा बरेचसे वृक्ष घेऊन शत्रुवर फेकले. ॥९॥
शत्रुघ्नश्चापि तेजस्वी वृक्षानापततो बहून् ।
त्रिभिश्चतुर्भिरेकैकं चिच्छेद नतपर्वभिः ॥ १० ॥
परंतु शत्रुघ्न फार तेजस्वी होते त्यांनी आपल्यावर येणार्‍या त्या बहुसंख्य वृक्षांतून प्रत्येकाला वाकलेली गांठ असणार्‍या तीन-तीन अथवा चार-चार बाण मारून छाटून टाकले. ॥१०॥
ततो बाणमयं वर्षं व्यसृजद् राक्षसोपरि ।
शत्रुघ्नो वीर्यसम्पन्नो विव्यथे न स राक्षसः ॥ ११ ॥
नंतर पराक्रमी शत्रुघ्नांनी त्या राक्षसावर बाणांची झड लावली परंतु तो निशाचर यामुळे व्यथित अथवा विचलित झाला नाही. ॥११॥
ततः प्रहस्य लवणो वृक्षमुद्यम्य वीर्यवान् ।
शिरस्यभ्यहनच्छूरं स्रस्ताङ्‌गः स मुमोह वै ॥ १२ ॥
तेव्हा बल-विक्रमशाली लवणाने हसून एक वृक्ष उचलला आणि तो शूरवीर शत्रुघ्नांच्या डोक्यावर फेकून मारला. त्याच्या आघाताने शत्रुघ्नांचे सारे अंग शिथिल झाले आणि त्यांना मूर्छा आली. ॥१२॥
तस्मिन्निपतिते वीरे हाहाकारो महानभूत् ।
ऋषीणां देवसंघानां गन्धर्वाप्सरसां तथा ॥ १३ ॥
वीर शत्रुघ्न पडताच ऋषि, देवसमूह, गंधर्व आणि अप्सरा यांच्यात महान्‌ हाहाकार माजला. ॥१३॥
तमवज्ञाय तु हतं शत्रुघ्नं भुवि पातितम् ।
रक्षो लब्धान्तरमपि न विवेश स्वमालयम् ॥ १४ ॥

नापि शूलं प्रजग्राह तं दृष्ट्‍वा भुवि पातितम् ।
ततो हत इति ज्ञात्वा तान् भक्षान् समुदावहत् ॥ १५ ॥
शत्रुघ्नांना जमिनीवर पडलेले पाहून लवणाला वाटले की हे मरून गेले, म्हणून अवसर मिळालेला असूनही तो राक्षस आपल्या घरी गेला नाही आणि शूल घेऊनही आला नाही. त्यांना धराशायी झालेले पाहून सर्वथा मेलेलेच समजूनच तो आपली भोजनसामग्री एकत्रित करू लागला. ॥१४-१५॥
मुहूर्ताल्लब्धसंज्ञस्तु पुनस्तस्थौ धृतायुधः ।
शत्रुघ्नो वै पुरद्वारि ऋषिभिः सम्प्रपूजितः ॥ १६ ॥
दोन घडीतच शत्रुघ्नांना शुद्ध आली. ते अस्त्रे-शस्त्रे घेऊन उठले आणि परत नगर द्वारावर जाऊन उभे राहिले. त्यासमयी ऋषिंनी त्यांची खूप प्रशंसा केली. ॥१६॥
ततो दिव्यममोघं तं जग्राह शरमुत्तमम् ।
ज्वलन्तं तेजसा घोरं पूरयन्तं दिशो दश ॥ १७ ॥
त्यानंतर शत्रुघ्नांनी तो दिव्य, अमोघ आणि उत्तम बाण हातात घेतला, जो आपल्या घोर तेजाने प्रज्वलित होऊन दाही दिशांमध्ये जणु व्याप्त होत होता. ॥१७॥
वज्राननं वज्रवेगं मेरुमन्दरसंन्निभम् ।
नतं पर्वसु सर्वेषु संयुगेष्वपराजितम् ॥ १८ ॥
त्याचे मुख आणि वेग वज्रासमान होते. तो मेरू आणि मंदराचलासमान भारी होता. त्याची गाठ वाकलेली होती तसेच तो कुठल्याही युद्धात पराजित होणारा नव्हता. ॥१८॥
असृक्चन्दनदिग्धाङ्‌गं चारुपत्रं पतत्रिणम् ।
दानवेन्द्राचलेन्द्राणां असुराणां च दारुणम् ॥ १९ ॥
त्याचे सारे अंग रक्तरूपी चंदनाने चर्चित होते. पंख फार सुंदर होते. तो बाण दानवराजरूपी पर्वतराजांसाठी तसेच असुरांसाठी फारच भयंकर होता. ॥१९॥
तं दीप्तमिव कालाग्निं युगान्ते समुपस्थिते ।
दृष्ट्‍वा सर्वाणि भूतानि परित्रासमुपागमन् ॥ २० ॥
तो प्रलयकाळ उपस्थित झाल्यावर प्रज्वलित झालेल्या कालाग्निसमान उद्दीप्त होत होता. तो पाहून समस्त प्राणी त्रस्त झाले. ॥२०॥
सदेवासुरगन्धर्वं मुनिभिः साप्सरोगणम् ।
जगद्धि सर्वमस्वस्थं पितामहमुपस्थितम् ॥ २१ ॥
देवता, असुर, गंधर्व, मुनि आणि अप्सरांच्या बरोबरच सारे जगत्‌ अस्वस्थ होऊन ब्रह्मदेवापर्यंत पोहोचले. ॥२१॥
उवाच देवदेवेशं वरदं प्रपितामहम् ।
देवानां भयसंमोहो लोकानां संक्षयं प्रति ॥ २२ ॥
जगतातील त्या सर्व प्राण्यांनी वर देणार्‍या देवदेवेश्वर प्रपितामह ब्रह्मदेवांना म्हटले - भगवन्‌ ! समस्त लोकांच्या संहाराच्या संभावनेमुळे देवतांच्या वरही भय आणि मोह पसरला आहे. ॥२२॥
कच्चिल्लोकक्षयो देव सम्प्राप्तो वा युगक्षयः ।
नेदृशं दृष्टपूर्वं च न श्रुतं प्रपितामह ॥ २३ ॥
देवा ! काय लोकांचा संहार तर होणार नाही ना अथवा प्रलयकाल तर येऊन पोहोचलेला नाही ना ? प्रपितामह ! संसाराची अशी अवस्था न पूर्वी कधी पाहिली गेली आहे आणि ना कधी ऐकण्यातही आली आहे. ॥२३॥
तेषां तद् वचनं श्रुत्वा ब्रह्मा लोकपितामहः ।
भयकारणमाचष्ट लोकानामभयंकरः ॥ २४ ॥
त्यांचे हे वचन ऐकून देवतांचे भय दूर करणारे लोकपितामह ब्रह्मदेवांनी प्रस्तुत भयाचे कारण सांगितले. ॥२४॥
उवाच मधुरां वाणीं शृणुध्वं सर्वदेवताः ।
वधाय लवणस्याजौ शरः शत्रुघ्नधारितः ॥ २५ ॥

तेजसा तस्य सम्मूढाः सर्वे स्मः सुरसत्तमाः ।
ते मधुर वाणीने म्हणाले - संपूर्ण देवतांनो ! माझे बोलणे ऐका. आज शत्रुघ्नांनी युद्धस्थळी लवणासुराचा वध करण्यासाठी जो बाण हातात घेतला आहे, त्याच्या तेजाने आपण सर्व लोक मोहित होत आहोत. या श्रेष्ठ देवताही यामुळे घाबरलेल्या आहेत. ॥२५ १/२॥
एष पूर्वस्य देवस्य लोककर्तुः सनातनः ॥ २६ ॥

शरस्तेजोमयो वत्सा येन वै भयमागतम् ।
मुलांनो ! हा तेजोमय सनातन बाण आदिपुरुष लोककर्ता भगवान्‌ विष्णुंचा आहे; ज्यांच्या पासून तुम्हांला भय प्राप्त झाले आहे. ॥२६ १/२॥
एष वै कैटभस्यार्थे मधुनश्च महाशरः ॥ २७ ॥

सृष्टो महात्मना तेन वधार्थे दैत्ययोस्तयोः ।
परमात्मा श्रीहरिने मधु आणि कैटभ - या दोन दैत्यांचा वध करण्यासाठी या महान्‌ बाणाची सृष्टि केली होती. ॥२७ १/२॥
एक एव प्रजानाति विष्णुस्तेजोमयं शरम् ॥ २८ ॥

एषा एव तनुः पूर्वा विष्णोस्तस्य महात्मनः ।
एकमात्र भगवान्‌ विष्णुच या तेजोमय बाणाला जाणतात कारण की हा बाण साक्षात्‌ परमात्मा विष्णुचीच प्राचीन मूर्ती आहे. ॥२८ १/२॥
इतो गच्छत पश्यध्वं वध्यमानं महात्मना ॥ २९ ॥

रामानुजेन वीरेण लवणं राक्षसोत्तमम् ।
आता तुम्ही लोक येथून जा आणि श्रीरामांचे लहान भाऊ महामनस्वी वीर शत्रुघ्नांच्या हाताने राक्षसप्रवर लवणासुराचा वध होतांना पहा. ॥२९ १/२॥
तस्य ते देवदेवस्य निशम्य वचनं सुराः ॥ ३० ॥

आजग्मुर्यत्र युध्येते शत्रुघ्नलवणावुभौ ।
देवाधिदेव ब्रह्मदेवांचे हे वचन ऐकून देवता जेथे शत्रुघ्न आणि लवणासुर दोघांचे युद्ध चालू होते त्या स्थानावर आल्या. ॥३० १/२॥
तं शरं दिव्यसंकाशं शत्रुघ्नकरधारितम् ॥ ३१ ॥

ददृशुः सर्वभूतानि युगान्ताग्निमिवोत्थितम् ।
शत्रुघ्नांच्या द्वारा हातात घेतल्या गेलेल्या त्या दिव्य बाणाला सर्व प्राण्यांनी पाहिले, तो प्रलयकाळच्या अग्निसमान प्रज्वलित होत होता. ॥३१ १/२॥
अकाशमावृतं दृष्ट्‍वा देवैर्हि रघुनन्दनः ॥ ३२ ॥

सिंहनादं भृशं कृत्वा ददर्श लक्षणं पुनः ।
आकाश देवतांनी भरून गेलेले पाहून रघुनंदन शत्रुघ्नांनी मोठ्‍या जोराने सिंहनाद करून लवणासुराकडे पाहिले. ॥३२ १/२॥
आहूतश्च पुनस्तेन शत्रुघ्नेन महात्मना ॥ ३३ ॥

लवणः क्रोधसंयुक्तो युद्धाय समुपस्थितः ।
महात्मा शत्रुघ्नांनी पुन्हा ललकारल्यावर लवणासुर क्रोधाने भरून गेला आणि परत युद्धासाठी त्यांच्या समोर आला. ॥३३ १/२॥
आकर्णात् स विकृष्याथ तद् धनुर्धन्विनां वरः ॥ ३४ ॥

तं मुमोच महाबाणं लवणस्य महोरसि ।
तेव्हा धनुर्धरांमध्ये श्रेष्ठ शत्रुघ्नांनी आपले धनुष्य कानापर्यंत खेचून त्या महाबाणाला लवणासुराच्या विशाल वक्षःस्थळावर सोडले. ॥३४ १/२॥
उरस्तस्य विदार्याशु प्रविवेश रसातलम् ॥ ३५ ॥

गत्वा रसातलं दिव्यः शरो विबुधपूजितः ।
पुनरेवागमत्तूर्णं इक्ष्वाकुकुलनन्दनम् ॥ ३६ ॥
तो देवपूजित दिव्य बाण तात्काळच त्या राक्षसाच्या हृदयाला विदीर्ण करून रसातलात घुसला, तसेच रसातलात जाऊन तो परत तात्काळच इक्ष्वाकुकुलनंदन शत्रुघ्नांच्या जवळ आला. ॥३५-३६॥
शत्रुघ्नशरनिर्भिन्नो लवणः स निशाचरः ।
पपात सहसा भूमौ वज्राहत इवाचलः ॥ ३७ ॥
शत्रुघ्नांच्या बाणाने विदीर्ण होऊन निशाचर लवण वज्राने प्रहार केलेल्या पर्वतासमान एकाएकी पृथ्वीवर कोसळला. ॥३७॥
तच्च शूलं महत्तेन हते लवणराक्षसे ।
पश्यतां सर्वदेवानां रुद्रस्य वशमन्वगात् ॥ ३८ ॥
लवणासुर मारला जातांच तो दिव्य आणि महान्‌ शूल सर्व देवतांच्या देखत भगवान्‌ रूद्रांजवळ आला. ॥३८॥
एकेषुपातेन भृशं निपात्य
लोकत्रयस्यापि रघुप्रवीरः ।
विनिर्बभावुत्तमचापबाणः
तमः प्रणुद्येव सहस्ररश्मिः ॥ ३९ ॥
याप्रकारे उत्तम धनुष्य-बाण धारण करणारे रघुकुलांतील प्रमुख वीर शत्रुघ्न एकाच बाणाच्या प्रहाराने तीन्ही लोकांचे भय नष्ट करून ज्याप्रमाणे त्रिभुवनांतील अंधःकार दूर करून सहस्त्र किरणधारी सूर्यदेव प्रकाशित होतात, त्याप्रमाणे सुशोभित झाले. ॥३९॥
ततो हि देवा ऋषिपन्नगाश्च
प्रपूजिरे ह्यप्सरसश्च सर्वाः ।
दिष्ट्या जयो दाशरथेरवाप्तः
त्यक्त्वा भयं सर्प इव प्रशान्तः ॥ ४० ॥
सौभाग्याची गोष्ट आहे की दशरथनंदन शत्रुघ्नांनी भय सोडून विजय प्राप्त केला आणि सर्पासमान लवणासुर मरून गेला असे म्हणून देवता, ऋषि, नाग आणि समस्त अप्सरा त्यासमयी शत्रुघ्नांची खूप प्रशंसा करू लागल्या. ॥४०॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् उत्तरकाण्डे एकोनसप्ततितमः सर्गः ॥ ६९ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील उत्तरकाण्डाचा एकोणसत्तरावा सर्ग पूरा झाला. ॥६९॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP