॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
सुंदरकांड
॥ अध्याय पहिला ॥
लंकेचा शोध
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
रामं लक्ष्मणपूर्वजं रघुवरं सीतापतिं सुंदरम् ।
काकुत्स्थं करूणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकम् ।
राजेन्द्रं सत्यसंघं दशरथनयनम् श्यामलं शांतमूर्तिम् ।
वंदे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारिम् ॥
श्रीरामनामाचा महिमा :
श्रीरामें पावन कथा । श्रीरामें पावन वक्ता ।
श्रीरामें पावन श्रोता । श्रीराम स्वतां ग्रंथार्थ ॥ १ ॥
श्रीरामें धन्य धरणी । श्रीरामें धन्य करणीं ।
श्रीरामें धन्य वाणी । जे रामायणीं विनटली ॥ २ ॥
श्रीरामें पावन संसार । श्रीरामें पावन चराचर ।
श्रीरामें पावन नर । जें तत्पर नित्य स्मरती ॥ ३ ॥
रामनामें शुद्ध साधन । रामनाम शुद्ध ज्ञान ।
रामनामें सुते बंधन । नाम पावन सर्वार्थी ॥ ४ ॥
रामनामें सरतें तोंड । रामनामें सरलें किष्किंधाकांड ।
आतां उगवले सुंदरकांड । अति प्रचंड प्रतापी ॥ ५ ॥
पहा रामनाची थोरी । श्रीराम पाहे सर्वांतरी ।
रामनाम सत्वर उच्चारी । तेणें भवसागरीं तरतील ॥ ६ ॥
लंकेच्या उच्च भागावर बसून मारूती पुढील बेत करतो :
सुंदरकांडीची कथावृत्ती । आदि मध्य आणि प्रांती ।
हनुमंताची परम ख्याती । सीताशुद्धर्थी प्रताप ॥ ७ ॥
त्याच्या प्रतापाची थोरी । राहोनि लंकेच्या शिखरीं ।
शोधावया सीता सुंदरी । विचार करी तो ऐका ॥ ८ ॥
त्रिकूटाच्या शिखरावरी । हनुमान वेंधोनियां पाहे चौफेरीं ।
तंव देखे कनककळसांचिया हारी । गगनोदरी लखलखती ॥ ९ ॥
जैसी नक्षत्रें नभाच्या पोटीं । सुप्रभा शोभती गोमटी ।
कनक कळस लखलखिती त्रिकूटीं । कोट्यानुकोटी लंकेमध्ये ॥ १० ॥
लंकावर्णन व तिचें अभंगत्व
द्यावी अमरावतीची उपमा । त्याहूनि अधिक इची महिमा ।
लंका निर्माण करी ब्रह्मा । विश्वकर्मा प्रेरूनी ॥ ११ ॥
कुबेराची अलकावती । रावणे हिरोनि घेतां वस्ती ।
त्यासी शंकूनीऽ उमापति । अलकावती सोडविली ॥ १२ ॥
ते काळीं विश्वकर्म्याचे हाती । लंका करवी प्रजापति ।
दुर्गे दुर्गम अति निगुती । अगम्य गति सुरासुरां ॥ १३ ॥
अमरावती अलकावती । अवलोकूनियां भोगावती ।
देखोनि अधिक लंकेची स्थिती । संतोषें वस्ती रावणें केली ॥ १४ ॥
पाहतां कैलासासमान । शोभे लंकेचे महिमान ।
दुर्धेर राक्षसासहित जाण । दशानन संरक्षी ॥ १५ ॥
उत्तम मध्यम नरीं । शुद्ध अशुद्ध नरनारीं ।
नांदिजे कनकाच्या मंदिरी । लंकेची थोरी अनुपम्य ॥ १६ ॥
अगाध लंकेचे महिमान । स्वयें संरक्षी रावण ।
कोट्यानुकोटी राक्षसगण । परिभ्रमण सदा करिती ॥ १७ ॥
तेथें रिघावया जाण । संधि न लभे अणुप्रमाण ।
लंकादुर्ग अति दारूण । केंवी आपण रिघावें ॥ १८ ॥
लंकादुर्गी रिघोनि वारा । स्वयें जाऊं न शके सैरा ।
त्यासही रावणा दरारा । केला कामारा केरकाढ्या ॥ १९ ॥
जेथे पुंजेनीं गदळली वाट । तेथें वायूसी वाजती साट ।
त्या लंकेमाजी मी सर्कट । कैसेनि परिस्पष्ट वागावें ॥ २० ॥
वानररूपें लंकेआत । हिंडता होईल अनर्थ ।
कौतुकें जो तो धरील येथ । रामकार्यार्थ नासलें ॥ २१ ॥
वानररूप किंवा राक्षसरूप घेऊन कार्य पार पाडणे कठिण :
राक्षसरूप धरितां क्रूर । तेथेंही अनर्थ आहे थोर ।
ब्राह्मणमासांचा आहार । निशाचर करविती ॥ २२ ॥
राक्षसजातीचा परीक्षी । द्विजमांस स्वेच्छा भक्षी ।
तो राक्षस शुद्धपक्षी । येरू विपक्षी मारिती ॥ २३ ॥
द्विजमास मज भक्षितां । समुद्रलंघन होईल वृथा ।
कैंचा राम कैंची सीता । अधःपाता मी जाईन ॥ २४ ॥
राक्षसरूपाचा विटाळ । मज न व्हावा अळुमाळ ।
कांटाळोनि गोळांजुळ । विचार स्थूळ मांडिला ॥ २५ ॥
मग स्मरोनि रामनाम । हनुमंत पावला विश्राम ।
लंकाप्रवेश अतो दुर्गम । नीतिधर्म उपपादी ॥ २६ ॥
करूं जाता स्वयें शिष्टाई । गर्वे रावण न मानील पाहीं ।
सीता सुटेसें दान नाहीं । दानें वैदेही सुटेना ॥ २७ ॥
राक्षसांसी करितां भेद । न घडे आप्तत्वाचा बोध ।
मांसभक्षणीं संबंध । आप्तवाद तेथें कैंचा ॥ २८ ॥
भेदूं जातां राक्षसांसी । भेद जाईल दशग्रीवासीं ।
भेद न चले तयासीं । युद्धहि त्यापासीं दुस्तर ॥ २९ ॥
लंकादुर्ग अति दुर्धर । इन्द्रजित कुंभकर्ण जुंझार ।
भोंवता आहे सागर । नरवानर केंवी येती ॥ ३० ॥
श्रीराम निधडा जुंझार । रावण छेदील सपरिवार ।
आडवा सागर दुस्तर । तो लंकापुर केंवी पावे ॥ ३१ ॥
नीतिशास्त्राचा अवबोध । साम दाम भेद युद्ध ।
रावणीं न चले संबंध । नीतिविरूद्ध राक्षस ॥ ३२ ॥
बैसोनी लंकेच्या शिखरीं । नानापरी विचार करी ।
लंकादुर्ग अटक भारी । कोणीपरी शोधावें ॥ ३३ ॥
असो हा लंकेचा वृत्तांत । मज साह्य श्रीरघुनाथ ।
लंका शोधीन समस्त । सीताशुद्ध्यर्थ निजांगे ॥ ३४ ॥
वंचनीया मया सर्वे जानकीपरिमार्गतः ।
लक्षालक्षात्मरूपेण द्रक्ष्यानि जनकात्मजाम् ॥ २ ॥
इति संचिंत्य हनुमान्वैदेह्या दर्शनं तदा ।
पृषदंशमात्रः स कपिर्बभूवाद्भुतदर्शनः ॥ ३ ॥
म्हणून अत्यंत सूक्ष्म रूपाने लंकेत प्रवेश :
लक्षालक्ष स्वरूपविधी । ठकोनी राक्षसांच्या बुद्धी ।
मी करीन सीताशुद्धी । कार्यसिद्धी श्रीरामें ॥ ३५ ॥
सुरां असुरां निशाचरां । अलक्षगतीमज वानरां ।
धरधांडोळी घेऊनी नगरा । सीता सुंदरा पाहीन ॥ ३६ ॥
ऐसा करोनियां विचार । हनुमंत जाला मशकमात्र ।
ऐसें धरूनि शरीर । अति लघुतर कपि जाला ॥ ३७ ॥
मुंगीचिया नयनाआंत । खुपो नेणेचि हनुमंत ।
येणें रूपें लंकेआंत । प्रवेशोनि पहात रमाकांता ॥ ३८ ॥
कोणा न कळतां मात । जगाचे न दुखवितां चित्त ।
हनुमंत निघे लंकेआंत । असे पहात रामप्रिया ॥ ३९ ॥
खंदकपाळी अति आटाळी । उपरियाउपरी माळ्यामाळीं ।
दुर्गांचिया पौळामौळी । जनकबाळीं पहातसे ॥ ४० ॥
वनें उपवनें काननें । देवालयें शिवस्थानें ।
मठ मठिका ध्यानभुवनें । सीतेकारणें शोधित ॥ ४१ ॥
कडे कपाटे स्त्रोत कांतारें । पर्वत गुहा गिरिकंदरें ।
सूक्ष्म स्थानें अनेक विवरें । साक्षेपें वानरें शोधिली ॥ ४२ ॥
आराम विराम उपरम । समविषम विषमीं सम ।
आश्रमाचे आश्रमधाम । प्लवंगम स्वयें शोधी ॥ ४३ ॥
नाना वाटिका उदंड । शैलकक्षें पैं वितंड ।
सरोवरस्थानें प्रचंड । शोधी सुदृढ हनुमंत ॥ ४४ ॥
चूतखंडे अच्युतखंडे । कुशमर्दमपाणिपाखंडें ।
डावलोनि बंडें उदंडें । मध्यमादंडें सीता पाहे ॥ ४५ ॥
ऐसा शोधूनी बाह्यप्रांत । मग निघाला नगराआंत ।
सीता शोधावया हनुमंत । अति उदित साक्षेपें ॥ ४६ ॥
तत्वें निरसूनी समस्त । साधक आत्मासाधी निश्चित ।
तेंवी घरोघर धांडोळित । असे पाहत वैदेही ॥ ४७ ॥
ब्रह्मराक्षसांची वसती, शैवदीक्षा, त्रिपुंडधारी वगैरे विविध जाती :
पाहतां लंकेमाझारी । ब्रह्मराक्षस वसती नगरीं ।
त्यांच्या निवासाची थोरी । निजनिर्धारी अवधारा ॥ ४८ ॥
एक राक्षस लंकेमाझारी । रूद्राक्षमाळा गळां शिरीं ।
शैवदीक्षाधारी । त्रिपुंडधारी मंत्रोक्त ॥ ४९ ॥
दान अन्न देऊनि भूतांसी । काषायवस्त्रें एक सन्यासी ।
दृष्टी देखिल्या मनुष्यासी । साक्षेपेंसीं गिळिती ॥ ५० ॥
सवेंचि करिती आचमन । स्वाहा करिती होमहवन ।
कर्मे दाविती विचक्षण । धरिती ध्यान आहारार्थ ॥ ५१ ॥
एक नागवे जटाधारी । भस्मधारी शरीरीं ।
रिघोनियां वनांतरीं । गायी मारिती भक्षणार्थ ॥ ५२ ॥
तेंचि गोचर्म धरूनि करीं । आम्हीं गोजिनांबरधारी ।
ऐसें मिरविती लोकाचारीं । वेषधारी राक्षस ॥ ५३ ॥
मांस भक्षावयाचा स्वार्थ । ऐसी संपादिती मात ।
ऐसे राक्षस लंकेआंत । देखें हनुमंत विचरतां ॥ ५४ ॥
मांस भक्षितां स्वईच्छेंसी । वांटा न देती कोणासी ।
संन्याशाचें घेतां तुम्हांसी । नरकावासी पैं व्हाल ॥ ५५ ॥
अग्निहोत्री राक्षस तेथ । कुंड मंडप वेदिकायुक्त ।
दोन्ही कर कुशमंडित । सायंप्रात : होम देती ॥ ५६ ॥
मुष्टी मुष्टी कुश करी । देखिल्या मनुष्या तेणेंचि मारी ।
मांस भक्षावया होम करी । पापाचारी राक्षस ॥ ५७ ॥
होत्या पोत्याचा पुरोडाश । त्याचाहि स्वयें करिती ग्रास ।
वाटा नदेती कोणास । अति कर्कश मांसार्थी ॥ ५८ ॥
जेथें जेथें अति गौल्यता । तेथें कैंचा राम कैंची सीता ।
तेथोनी निघतां हनुमंता । होय देखता आश्चर्य ॥ ५९ ॥
वेदपाठक लंकेआंत । विजनी आरण्यकें पढत ।
मनुष्य देखिल्या तेथ । स्वयें भक्षित फळाहारा ॥ ६० ॥
अग्निहोत्राक्ष वेदाश्च राक्षसानां गृहे गृहे ।
यदा सत्यं च शौच च राक्षसांना न विद्यते ॥ ४ ॥
अग्निहोत्री, क्षत्रिय इत्यादिंची घरे शोधिली :
अग्निहोत्र वेदाध्ययन । राक्षसांघरीं संपूर्ण ।
दया सत्य शुचित्वपण । राक्षसां जाण असेना ॥ ६१ ॥
ऐसी शोधितां ब्रह्मपुरी । ब्राह्मण गोंविले दोरीं ।
कर्माभिमान त्यावरी शिरीं । सीता सुंदरी तेथें नाहीं ॥ ६२ ॥
सर्वा भूतीं असे भगवंत । ऐसी दया नाहीं तेथ ।
कैंचा राम कैंची सीता तेथ । मुद्रा मंत्र ते दीक्षा ॥ ६३ ॥
पाहतां क्षत्रियांच्या थाटा । वाढिवेचा गर्व ताठा ।
लागता हनुमताचा चपेटा । स्वयें पटापटां पडतील ॥ ६४ ॥
नाहीं वीरवृत्ती पुरी । मरणभयाची न फिटे शिरी ।
ऐसें भेड क्षत्रियां घरी । सीता सुंदरी न भेटे ॥ ६५ ॥
मरणभय पोटाआंत । ते तंव क्षत्रिय अति अशक्त ।
तयांसी नपुंसक म्हणत । सीता निश्चित तेथें नाही ॥ ६६ ॥
ऐसें शोधितां क्षत्रियापुरीं । तेथें न लभे सीता सुंदरी ।
मग निघाला वैश्यांचे घरी । श्रीरामनारी शोधावया ॥ ६७ ॥
वैश्यांचे उदिमीं चित्त । अति लोलुप वांच्छिती वित्त ।
शीघ्र प्रवेशोनी पहात । सीताशुद्धर्थ न लभेचि ॥ ६८ ॥
वैश्च्यांचे कृपण मन । कवडी कवडी सांचविती धन ।
त्यांचे घरीं सीता निधान । न लभे जाण हनुमंता ॥ ६९ ॥
आतां शोधू शूद्रजातीं । तीमाजी अठरा पगड जाती ।
तीं घरें धुंडाळित मारूती । सीता सतीशुद्ध्यर्थ ॥ ७० ॥
पाहतां साळियांच्या मागी । अवघी गारींत घातली गुडघीं ।
हनुमान निजपुच्छाच्या संयोगीं । जाळील आगीं सस्नेह ॥ ७१ ॥
चाटे असत्यवादी ऐका । अंगळु मंगळु बोलती देखा ।
हनुमंत जाणे आगळिका । लावील सीका पुरदहनीं ॥ ७२ ॥
ऐसी शोधिता चाटेवोळीं । तेथें न लभे जनकबाळी ।
पहावया सोवन्यांची आळी । निघाला आर्तुबळी हनुमंत ॥ ७३ ॥
सोवन्याचें कर्म खोटें । खार लाविती नेटपाटें ।
बाहेर मुदियांचे साटे । शिस कांटे भांडवल ॥ ७४ ॥
रूपलग लाविजे एकीं । शीसलग लाविजे आणिकीं ।
पाहतां अवघेही हीन तुकीं । तेथें जानकी दिसेना ॥ ७५ ॥
सोनारांचा परिपाक । अवघे करिती ठकठक ।
देहाचा चोर एक एक । नाडिती लोक विश्वासें ॥ ७६ ॥
कडींलग मोतींलग । दाविती झळकेंचि झगमग ।
परी तें अवघे करिती डांकलग । नगें नग हीणकस ॥ ७७ ॥
सोनारकामाचा विवेक । समुळीं विश्वासघातकू ।
लटिकीं तुकें देती तुकतुकूं । घेती जोखजोखूं दों हातीं ॥ ७८ ॥
सांगोनि विश्वासाच्या गोष्टी । खार लाविती पाठीं पोटीं ।
घालोनि सलोभाच्या पुटीं । पाडिती तुटी मुदलेंसीं ॥ ७९ ॥
साडेपंधरा घेऊनि हातीं । देता नागवले किती ।
सोनारकामाची हे ख्याती । सीता सती तेथें नाहीं ॥ ८० ॥
कांसारकामाचें कौतुक । एक एक तें नाळिक ।
अवघे काळेंचि देख । तुळा तुक तुटले ॥ ८१ ॥
कासार कामाचे परिपाटीं । अवघीम जनी केलीं बुटी ।
तेथें कैंची सीता गोरटी । निघे उठाउठीं हनुमंत ॥ ८२ ॥
व्यवहारी :
व्यवहारियांची ऐसी दशा । कळांतराची बहु आशा ।
मुदला घालूनि फांसा । लाविती आशा अति लोभे ॥ ८३ ॥
लक्ष्मी देऊनि पुढिला हातीं । काळा कागद लिहूनि घेती ।
तेणेंचि काळमुखे होती । खंती करति जीवांसीं ॥ ८४ ॥
देहींच्या खता देहींच व्यथा । त्याहूनि थोर कागदाच्या खता ।
त्याची व्यथा जीवाचें माथां । तिन्ही अवस्था अति दुःखी ॥ ८५ ॥
खत फाडिलें खताखती । जो भेटें त्यास साक्षी करिती ।
स्वप्नीं व्यवहार सांगती । ओसणती निजेलिया ॥ ८६ ॥
देखोनि स्वतांची संपत्ती । व्यवहारी सव्यें उल्लासती ।
मागों गेलिया न लगे हातीं । मग कुंथती अति दुःखें ॥ ८७ ॥
व्यवहारियांची ऐसी गती । धरण्या करितां न लभे भुक्ती ।
धनलोभ्या कैंची मुक्ती । सीता सती तेथें नाहीं ॥ ८८ ॥
तेली - साळी :
पाहतां तेलियांचें घर । नित्य करिती करकर ।
अवघे म्हणती पहारोपहार । भेटा रामचंद्र उठलिया ॥ ८९ ॥
जैहूनि आणिली जनकबाळा । तैंहूनि गेली लंकेची कळा ।
हनुमंतें धिक्कारिलें सकळां । होईल तळमळा पुरदाहें ॥ ९० ॥
तेलियाची निजजाती । नित्य नवे फेरे खाती ।
तेथें कैंची सीता सती । निघे मारूती पुढारां ॥ ९१ ॥
मुळींचा तंतु तुटतां सांग । साळी विसरले मागेंमाग ।
पांजणीपरवाणीचा उद्वेग । अति लगबग खळीलागीं ॥ ९२ ॥
खांचे रिघाले जीवें जीत । घडिया घडी न सांधे तेथ ।
सरूप नुरतेचि सवसुत । मग तणतणीत ताणोनि ॥ ९३ ॥
अहर्निशीं धोटें हाणितां । स्वरूप नुरतेचि सर्वथा ।
साऊट बारूट गेले वृथा । तेथें सीता न लभेचि ॥ ९४ ॥
तांबोळी :
तांबोळीसन्मान पानभरें । देंठझडी झाले एकसरें ।
म्हणती फेरारे फेरारे । अभ्यंतरें मुरकुटले ॥ ९५ ॥
रूसण्या फुगण्याचें कारण । पानापाशीं अति सन्मान ।
तेणें अंतरी सडलीं जाण । पडिलें खान निजलोभा ॥ ९६ ॥
पानसन्मानें अति दाटुकी। झडली अभिमानाची आटुकी ।
तोंडें तांबडी अति अळुकीं । तेथें जानकी असेना ॥ ९७ ॥
शिंपी :
शिंपियाची अति कुसरी । घेवोनि लोभाची कातरी ।
अखंड खंडी नानापरी । गुप्तत्वें चोरी त्यामाजी ॥ ९८ ॥
पहिले अखंड खंडिलें । शिविल्या म्हणती त्या दंडिलें ।
शिंपियें ऐसें कर्म केलें । बाधक झालें त्याचें त्यासीं ॥ ९९ ॥
अखंड खंडोनि करिती चोरी । तेणें शृगांरी कुंवारी नारी ।
बिरडें लावी गळ्यावरी घरोघरीं टांचूनी ॥ १०० ॥
ऎंसे कर्म केलियापाठीं । शिंपी सलोभ बोटें चाटी ।
पोट न भरे शिवण्यासाठीं । सीता गोरटी तेथें कैंची ॥ १०१ ॥
रंगारी :
रंगशाळा अलोकिक । काळें करिती शुद्धसात्विक ।
काळे हात काळें मुख । अति रंगित रंगारे ॥ १०२ ॥
नामरूपाच्या ठशावरी । काळेंबेरे पालव धरी ।
ऐसिया रंगारियाच्या घरीं । सीता सुंदरी लाभेना ॥ १०३ ॥
वेदपाठक :
वेदपाठका नवलपरी । अनाध्याय स्वाध्याय घरीं ।
उदात्त अनुदात स्वरीं । वर्णोच्चारीं अभिमान ॥ १०४ ॥
सानुनासिक अनुनासिक । उच्चार नेणतां निर्नासिक ।
त्याशीं हांसती वेदपाठक । एकासी एक उपहासिती ॥ १०५ ॥
ऐसें करितां वेदपठण । कोरडी शब्दांची खणखण ।
न वचती मानाभिमान । सीता चिद्रत्न तेथें कैंचे ॥ १०६ ॥
शास्त्री - पंडित :
पाहतां विद्वांसांचें व्याख्यान । शास्त्रव्युत्पत्ति अति सज्ञान ।
ज्ञातेपणें गर्वाभिमान । जडला तो जाण सोडीना ॥ १०७ ॥
जंव जंव शास्त्राची व्युत्पत्ती । तंव तंव अभिमानाची वस्ती ।
तेणेंचि गर्वाची होय स्फूर्ती । सीता सती तेथें नाहीं ॥ १०८ ॥
ज्योतिषी :
पाहतां ज्योतिष्यांची स्थिती । ते गोंविले ग्रहगतीं ।
अवघ्या ग्रहगतीं लावितीं । सीतासती तेथें नाहीं ॥ १०९ ॥
हाट चोहट पण विपण । शोधशोधू पाहे आपण ।
पदोपदीं सावधान । सीता चिद्रत्न स्वयें पाहे ॥ ११० ॥
सर्वलोकांमध्ये :
देखतां कणांचिया राशी । निजबीजत्वें पाहे सीतेसी ।
फुलें गुंफितां फुलरियासी । पाही सुवासीं सीतेतें ॥ १११ ॥
वाणी पसारी पाहतां । सीता पाहे आंतले पोतां
अंतर सांठवणें आंतौता । होय पाहता सीतेतें ॥ ११२ ॥
जे जे मार्गी जन भेटती । त्यांमाजी पाहे सीता सती ।
अश्वगजांहि आंतौती । सीता सती पहातसे ॥ ११३ ॥
उत्तम देखोनि पक्वान्न । सबाह्य सीता पाहे सावधान ।
हनुमंता नाठवे अन्न । लागलें ध्यान सीतेंचे ॥ ११४ ॥
घरें चत्वरें परूसद्वारें । उपर्या आटाळ्या ओवरें ।
सीतेलागोनि वानरें । सर्वांतरें शोंधिलीं ॥ ११५ ॥
अंतरी देखोनि विषमस्थिती । सीता न लभे म्हणे मारूती ।
लंका शोधित असे ऐशिया रीतीं । सीता सती भेटावया ॥ ११६ ॥
दृष्टी पडे जिकडे जिकडे । सीता पाहे तिकडे तिकडे ।
सवेग तेथूनियां उडे । सीता पुढे पुढें पहातसे ॥ ११७ ॥
पाहतां जंबुमाळीमळे । तंव ते लवलवती फळे ।
हनुमंत उपडी समूळ मूळें । जनकबाळीं शोधावया ॥ ११८ ॥
सांदीकोंदी नदोनदी । सीता पाहे बिंदोबिंदीं ।
शोधिता लंकेची पैं मांदी । कोणी शुद्धी सांगेना ॥ ११९ ॥
शोक नाहीं जियें स्थानीं । सीता वसे अशोकवनीं ।
ते तंव वार्ता न वदे कोणी । शुद्धि कैसेनि होईल ॥ १२० ॥
सर्व घरे शोधून हनुमंताचे पुढे गमन :
घरें शोधिलीं विचित्र । तेथें न लभेचि सीता सुंदर ।
उद्भट घरें थोर थोर । तींही वानरें शोधिलीं ॥ १२१ ॥
इन्द्रजितकुंभकर्णस्थान । श्रेष्ठ सेनानीं प्रधान ।
रावणाचें निजभुवन । निद्रास्थान शोधिलें ॥ १२२ ॥
हनुमंत बळिया महाबळी । घेईल रावणाची घरधांडोळी ।
नगरामाजी लावील कळी । करील रांडोळी सभेमाजी ॥ १२३ ॥
ऐसें आश्चर्यचरित्र । हनुमंत करील अद्भुत ।
श्रोतीं व्हावें दत्तचित्त । कथा विख्यात श्रीराम ॥ १२४ ॥
एका जनार्दनाशरण । गोड घांस रामायण ।
तें हें सुंदरकांड जाण । समाधान जीवशिवां ॥ १२५ ॥
इति श्रीभावार्थरामायणे सुंदरकांडे एकाकारटीकायां लंकाशोधनं नाम प्रथमोऽध्यायः ॥ १ ॥
॥ ओव्यां १२५ ॥ श्लोक ४ ॥ एवं संख्या १२९ ॥
GO TOP
|