श्रीमद् वाल्मीकि रामायणे
उत्तरकाण्डे
॥ त्रिचत्वारिंशः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
भद्रेण पौराणां मुखाद् आकर्णितायाः सीताविषयक अशुभचर्चायाः श्रीरामसमक्षे निवेदनम् -
भद्राचे पुरवासींच्या मुखाने सीतेविषयी ऐकलेल्या अशुभ चर्चेची माहिती श्रीरामांना अवगत करविणे -
तत्रोपविष्टं राजानं उपासन्ते विचक्षणाः ।
कथानां बहुरूपाणां हास्यकाराः समन्ततः ॥ १ ॥
तेथे बसलेल्या महाराज श्रीरामांच्या जवळ अनेक प्रकारच्या कथा सांगण्यात कुशल, हास्य विनोद करणारे सखे सर्व बाजूनी येऊन बसत असत. ॥१॥
विजयो मधुमत्तश्च काश्यपो मङ्‌गलः कुलः ।
सुराजिः कालियो भद्रो दन्तवक्रः सुमागधः ॥ २ ॥
त्या सख्यांची नावे या प्रकारे आहेत - विजय, मधुमत्त, काश्यप, मंगल, कुल, सुराजि, कालिय, भद्र, दंतवक्त्र आणि सुमागध. ॥२॥
एते कथा बहुविधाः परिहाससमन्विताः ।
कथयन्ति स्म संहृष्टा राघवस्य महात्मनः ॥ ३ ॥
हे सर्व लोक अत्यंत हर्षाने युक्त होऊन महात्मा राघवांच्या समोर अनेक प्रकारच्या हास्य-विनोदपूर्ण कथा सांगत असत. ॥३॥
ततः कथायां कस्यांचिद् राघवः समभाषत ।
काः कथा नगरे भद्र वर्तन्ते विषयेषु च ॥ ४ ॥
या समयी कुठल्यातरी कथेच्या प्रसंगात राघवांनी विचारले -भद्र ! आजकाल नगर आणि राज्यात कुठल्या गोष्टीची चर्चा विशेषरूपाने होत आहे ? ॥४॥
मामाश्रितानि कान्याहुः पौरजानपदा जनाः ।
किं च सीतां समाश्रित्य भरतं किं च लक्ष्मणम् ॥ ५ ॥

किं नु शत्रुघ्नमुद्दिश्य कैकयीं किं नु मातरम् ।
वक्तव्यतां च राजानो वरे राज्ये व्रजन्ति च ॥ ६ ॥
नगर आणि जनपदाचे लोक माझ्या संबंधी, सीता, भरत, लक्ष्मण तसेच शत्रुघ्न आणि माता कैकेयीच्या विषयी काय काय बोलत असतात ? कारण राजा जर आचार-विचार हीन असेल तर तो आपल्या राज्यात तसेच वनातही (ऋषि-मुनिंच्या आश्रमात) निन्देचा विषय बनतो - सर्वत्र त्याच्या वाईटपणाची चर्चा होत असते. ॥५-६॥
एवमुक्ते तु रामेण भद्रः प्राञ्जलिरब्रवीत् ।
स्थिताः कथा शुभाः राजन्वर्तन्ते पुरवासिनाम् ॥ ७ ॥
श्रीरामचंद्रांनी असे सांगितल्यावर भद्र हात जोडून म्हणाला - महाराज ! आजकाल पुरवासी लोकामध्ये आपल्या संबंधी सदा चांगलीच चर्चा चालत असते. ॥७॥
अमुं तु विजयं सौम्य दशग्रीववधार्जितम् ।
भूयिष्ठं स्वपुरे पौरैः कथ्यन्ते पुरुषर्षभ ॥ ८ ॥
सौम्य ! पुरूषोत्तम ! दशग्रीवाच्या वधासंबंधी जो आपला विजय आहे त्यावरून नगरातील सर्व लोक खूपच गोष्टी बोलत असतात. ॥८॥
एवमुक्तस्तु भद्रेण राघवो वाक्यमब्रवीत् ।
कथयस्व यथातत्त्वं सर्वं निरवशेषतः ॥ ९ ॥

शुभाशुभानि वाक्यानि कान्याहुः पुरवासिनः ।
श्रुत्वेदानीं शुभं कुर्यां न कुर्यामशुभानि च ॥ १० ॥
भद्राने असे म्हटल्यावर राघवांनी म्हटले - पुरवासी माझ्या विषयी कोण-कोणत्या शुभ अथवा अशुभ गोष्टी बोलत असतात त्या सर्व यथार्थ रूपाने पूर्णतः सांग. या समयी त्यांच्या शुभ गोष्टी ऐकून ज्यांना ते शुभ मानतात त्यांचे मी आचरण करीन आणि अशुभ गोष्टी ऐकून ज्यांना ते अशुभ समजतात त्यांचा (त्या कृत्यांचा) मी त्याग करीन. ॥९-१०॥
कथयस्व च विस्रब्धो निर्भयं विगतज्वरः ।
कथयन्ति यथा पौराः पापा जनपदेषु च ॥ ११ ॥
ती विश्वस्त आणि निश्चिंत होऊन न कचरता सांग. पुरवासी आणि जनपदातील लोक माझ्या विषयी कशा प्रकारे अशुभ चर्चा करीत आहेत. ॥११॥
राघवेणैवमुक्तस्तु भद्रः सुरुचिरं वचः ।
प्रत्युवाच महाबाहुं प्राञ्जलिः सुसमाहितः ॥ १२ ॥
राघवांनी असे म्हटल्यावर भद्राने हात जोडून एकाग्रचित्त होऊन त्या महाबाहु श्रीरामांना ही परम सुंदर गोष्ट सांगितली - ॥१२॥
शृणु राजन्यथा पौराः कथयन्ति शुभाशुभम् ।
चत्वरापणरथ्यासु वनेषूपवनेषु च ॥ १३ ॥
राजन्‌ ! ऐकावे. पुरवासी लोक चौकातून, बाजारात, रस्त्यांवर तसेच वन आणि उपवनात ही आपल्या विषयी कशा प्रकारे शुभ आणि अशुभ गोष्टी बोलत असतात, हे सांगतो. ॥१३॥
दुष्करं कृतवान्रामः समुद्रे सेतुबन्धनम् ।
अश्रुतं पूर्वकैः कैश्चिद् देवैरपि सदानवैः ॥ १४ ॥
ते म्हणतात - श्रीरामांनी समुद्रावर पूल बांधून दुष्कर कर्म केले आहे. असे कर्म पूर्वी कुणा देवतेने आनि दानवाने केल्याचे ही कधी ऐकलेले नाही. ॥१४॥
रावणश्च दुराधर्षो हतः सबलवाहनः ।
वानराश्च वशं नीता ऋक्षाश्च सह राक्षसैः ॥ १५ ॥
श्रीरामांच्या द्वारा दुर्धर्ष रावण, सेना आणि वाहने यांच्यासहित मारला गेला तसेच राक्षसांसहित रीस आणि वानरही वश केले गेले आहेत. ॥१५॥
हत्वा च रावणं सङ्‌ख्ये सीतामाहृत्य राघवः ।
अमर्षं पृष्ठतः कृत्वा स्ववेश्म पुनरानयत् ॥ १६ ॥
परंतु एक गोष्ट खटकत आहे की युद्धात रावणाला मारून राघव सीतेला आपल्या घरी घेऊन आले. त्यांच्या मनात सीतेच्या चारित्रासंबंधी रोष अथवा अमर्ष उत्पन्न झाला नाही. ॥१६॥
कीदृशं हृदये तस्य सीतासम्भोगजं सुखम् ।
अङ्‌कमारोप्य तु पुरा रावणेन बलाद्धृताम् ॥ १७ ॥

लङ्‌कामपि पुरा नीतां अशोकवनिकां गताम् ।
रक्षसां वशमापन्नां कथं रामो न कुत्सति ॥ १८ ॥

अस्माकमपि दारेषु सहनीयं भविष्यति ।
यथा हि कुरुते राजा प्रजा तमनुवर्तते ॥ १९ ॥
त्यांच्या हृदयात सीता-संभोगजनित सुख कसे वाटत आसेल ? प्रथम रावणाने बलपूर्वक सीतेला आपल्या अंकावर घेऊन तिचे अपहरण केले होते, नंतर तो तिला बलपूर्वक लंकेतही घेऊन गेला आणि तेथे त्याने अंतःपुरातील क्रीडा-कानन अशोकवनिकेमध्ये तिला ठेवले. याप्रकारे राक्षसाच्या अधीन होऊन ती बरेच दिवस राहिली होती तरीही श्रीराम तिची घृणा-तिरस्कार का करीत नाहीत ! आता आम्हांलाही स्त्रियांच्या अशा गोष्टी सहन कराव्या लागतील कारण की राजा जसे करतो, प्रजाही त्याचेच अनुकरण करू लागते. ॥१७-१९॥
एवं बहुविधा वाचो वदन्ति पुरवासिनः ।
नगरेषु च सर्वेषु राजन् जनपदेषु च ॥ २० ॥
राजन्‌ ! याप्रकारे सर्व नगर आणि जनपदात पुरवासी माणसे बर्‍याचशा गोष्टी बोलत आहेत. ॥२०॥
तस्यैवं भाषितं श्रुत्वा राघवः परमार्तवत् ।
उवाच सुहृदः सर्वान् कथमेतद् वदन्तु माम् ॥ २१ ॥
भद्राचे हे भाषण ऐकून राघवांनी अत्यंत पीडित होऊन समस्त सुहृदांना विचारले - आपण मला सांगावे, हे कुठपर्यंत ठीक आहे. ॥२१॥
सर्वे तु शिरसा भूमौ अवभिवाद्य प्रणम्य च ।
प्रत्यूचू राघवं दीनं एवमेतन्न संशयः ॥ २२ ॥
तेव्हा सर्वांनी जमिनीवर मस्तक टेकवून श्रीरामांना प्रणाम करून दीनतापूर्ण वाणीमध्ये म्हटले - प्रभो ! भद्राचे हे कथन ठीक आहे, यात जराही संशय नाही आहे. ॥२२॥
श्रुत्वा तु वाक्यं काकुत्स्थः सर्वेषां समुदीरितम् ।
विसर्जयामास तदा वयस्यान् शत्रुसूदनः ॥ २३ ॥
सर्वांच्या मुखाने ही गोष्ट एकून शत्रुसूदन श्रीरामांनी तात्काळ त्या सर्व सुहृदांना निरोप दिला. ॥२३॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् उत्तरकाण्डे त्रिचत्वारिंशः सर्गः ॥ ४३ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील उत्तरकाण्डाचा त्रेचाळिसावा सर्ग पूरा झाला. ॥४३॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP