॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

युद्धकांड

॥ अध्याय एक्केचाळीसावा ॥
सुलोचनेचा अग्निप्रवेश

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥


रणीं मारोनि इंद्रजित । सौ‍मित्र झाला विजयान्वित ।
तेणें सुखावला रघुनाथ । सुग्रीवयुक्त स्वानंदे ॥ १ ॥
हटी नष्टी कोटिकपटी । येणें इंद्रजित दुर्धर सृष्टीं ।
तो मारितां शस्त्रवृष्टीं । सुखानुकोटी सर्वांसी ॥ २ ॥
सुखी झाले नरवानर । सुखी झाले ऋषीश्वर ।
दैत्य दानव सुरवर । सुखी समग्र सौ‍मित्रें ॥ ३ ॥

इंद्रजिताची पत्‍नी ध्यानस्थ असता इंद्रजिताचा भुजदंडपात :

येरीकडे लंकेमाझारी । इंद्रजिताची भुजा थोरी ।
पडली सुलोचनामंदिरीं । खड्गधारी सायुध ॥४ ॥
सुलोचना निजमंदिरीं । शिवस्वरुप आणोनि अंतरी ।
शिवस्मरणीं निरंतरीं । ध्यान करीत शिवाचें न् ॥ ५ ॥
जवळी असतां सखिया बहुत । शिवपूजा करीत अद्‍भुत ।
तंव अंगणीं पडुनी अकस्मात । ध्वनि होय भुजदंडाचा ॥ ६ ॥
ऐकोनियां तो ध्वनी । सुलोचना गजबजली मनीं ।
सवें सखिया घेऊनी । पाहे अंगणी निजदृष्टीं ॥ ७ ॥
सख्या म्हणती सुलोचने । स्वर्गी देवांदैत्यांशीं दारुण ।
युद्ध होत आहे जाण । भुजा तेथून पडियेली ॥ ८ ॥
ऐसा संवाद करितां जाणा । घाबरेपणें सुलोचना ।
जवळी येवोनियां नयनां । पतिहस्त जाणा ओळखिला ॥ ९ ॥
देखोनि इंद्रजिताचा कर । सुलोचना भूमीं घालीं शरीर ।
हृदयीं कवळोनियां सत्वर । विचार साचार पूसत ॥ १० ॥
म्हणे भुजे मायबहिणी । मूळ आलिस मज साजणी ।
पति इंद्रजित रणांगणीं । केंवी सोडूनी आलीस ॥ ११ ॥
अभ्यंग मार्जन उद्वर्तन । करोनियां नीराजन ।
स्वयें घालोनि लोटांगण । पुसे आपण भुजेसी ॥ १२ ॥
निकुंभिले गेलियापाठीं । काय वर्तलें रणसंकटीं ।
तूं आलीस कासयासाठीं । ते गुह्य गोष्टी मज सांगें ॥ १३ ॥
मजपासून इंद्रजित । युद्धा गेलिया वृत्तांत ।
काय झाला तो साद्यंत । मज यथार्थ सांगावा ॥ १४ ॥
आम्ही तुम्ही वो साजणी । दोघी जणी एकांगबहिणी ।
काय वर्तलें रणांगणीं । समूळ कहाणी मज सांगें ॥ १५ ॥
जरी मी असेन सत्यव्रत । पतिव्रता सुनिश्चित ।
तरी त्वां तेथींचा वृत्तांत । मज साद्यंत सांगावा ॥ १६ ॥
तंव ते अचेतन भुजा । चेतना नाहीं तेथें सहजा ।
येरींने स्मरला कैलासराजा । शरण तुज मी स्वामिया ॥ १७ ॥

सुलोचनेच्या प्रार्थनेने इंद्रजिताच्या भुजदंडामध्ये शिवशक्तीचा प्रवेश :

पतिभुजा अंगणी आली । चेतनाविरहित पडली ।
आत्मशक्ति चेतवूनि वहिली । सजीव केली पाहिजे ॥ १८ ॥
म्हणोनियां शिवालागीं । स्तुति करितां तये प्रसंगी ।
शिव दयाळु भक्तांलागीं । आज्ञा करी इंद्रातें ॥ १९ ॥
म्हणे भुजांतरी प्रवेशोन । इंद्रजिताचे समरवर्तमान ।
समूळ करावें कथन । येथें अनमान न करावा ॥ २० ॥
होतां शिवाचे आज्ञापन । भुजांतरीं इंद्र जाण ।
प्रविष्ट होवोनि आपण । करी सचेतन भुजेसी ॥ २१ ॥
ऐकतां सुलोचनेचे वचन । आलें भुजेसी स्फुरन ।
संज्ञा दावूनियां खूण । मागे साधन लेखनाचें ॥ २२ ॥
तंव तिणें भूमिकेवरी । दऊत लेखणी झडकरी ।
आणोनि ठेवली निर्धारी । लिहून सत्वरीं मागितलें ॥ २३ ॥

भुजेने सर्व वृतांत लिहिला :

पाचबद्ध भूमिकेवरी । दऊत लेखणी घेऊन करीं ।
ओळी लिहिल्या व्यक्ताक्षरीं । अर्थकुसरीविन्यासें ॥ २४ ॥
तंव ते भूमि पाचबद्ध । अक्षरें उमटलीं शुद्ध ।
तीं सुलोचना वाची सुबद्ध । अर्थ विविध जाणूनी ॥ २५ ॥
पतिव्रते सुलोचने । तुज विचारोनि गेलिया जाण ।
लाहोनि रावणाचें आज्ञापन । युद्ध दारुण मग केलें ॥ २६ ॥
जिंकोनियां वानरगण । निकुंभिलेसीं जावोनि जाण ।
होमासी आरंभ करुन । अग्नि सुप्रसन्न म्यां केला ॥ २७ ॥
प्रसन्न झालिया वन्ही । रथ प्रकटला प्रत्यक्ष दहनीं ।
चार अंगुळे चाकें राहोनी । साठा नयनीं देखिला ॥ २८ ॥
रथ होतांचि प्रकट । युद्ध करीन मी अचाट ।
ऐसा संकल्पाचा लोट । होतां अदृष्ट निष्कल ॥ २९ ॥
तंव घेऊन वानरभार । बिभीषण आणि हनुमान वीर ।
सवें घेऊनि सौ‍मित्र । घाला सत्वर घातला ॥ ३० ॥
घेवोनियां प्रचंड शिळा । हनुमान होऊनि उतावेळ ।
रथावरी घालितां गोळांगुळा । रथ झाला भूमिगत ॥ ३१ ॥
मज करीं धरोनियां जाण । अंगदें आंसुडितां आपण ।
नेत्र उघडोनि पाहतं जाण । तंव वानरगण देखिले ॥ ३२ ॥
मग सावध होवोनियां । सारथियें रथ आणोनियां ।
रथारोहण करोनियां । युद्ध त्यांसवां मांडिलें ॥ ३३ ॥
लक्ष्मण वीर जगजेठी । प्रवेशोनि यज्ञवाटीं ।
युद्धा येतां कडकडाटीं । देखिला दृष्टीं म्यां मेघनादें ॥ ३४ ॥
त्यासीं छळ करोनि कपटीं । गेलों मेघांचिये पृष्ठीं ।
हनुमंतानें उठाउठीं । आणिला नेहटीं सौ‍मित्र ॥ ३५ ॥
लक्ष्मणें आणि आम्हीं । युद्ध मांडिलें रणभूमीं ।
लक्ष्मणें बाणाक्रमीं । शरीर रणभूमीं पाडिलें ॥ ३६ ॥
लक्ष्मणें विंधोनि सत्वरी । उभय भुजा छेदिल्या शरीं ।
एक पडली धरेवरी । लंकेमाझारीं दुसरी ॥ ३७ ॥
घालितां श्रीरामाची शपथ । तेणें बाणासीं बळ अत्यंत ।
इंद्रजिताचा शिरःपात । केला निश्चित सौ‍मित्रें ॥ ३८ ॥
एक भुजादंड् उडाला । तो तुजकारणें मूळ धाडिला ।
शिर रामचंद्रनमनाला । गेलें तुजला कळावें ॥ ३९ ॥
धड पडिलें निकुंभिळेसीं । शिर नेलें रामचंद्रापासीं ।
आतां आपल्या सतीत्वासी । प्रकट जनांसी दाखवीं ॥ ४० ॥
सतीत्व असेल संपूर्ण । तरी अवलोकावा लक्ष्मण ।
वंदूनि श्रीरामाचे चरण । शिर आपण मागावें ॥ ४१ ॥
मी प्राण अर्पूनि लक्ष्मणा । भवसमुद्रपार झालों जाणा ।
तुझी मार्गप्रतीक्षा सुलोचना । करितों जाण वेगें येईं ॥ ४२ ॥

वृत्तांत वाचून सुलोचनेचा विलाप :

ऐशा पाचबद्ध भूमीवरी । वाचिल्या अक्षरांच्या हारी ।
तेणें सुलोचना सुंदरी । अंग धरेवरी टाकित ॥ ४३ ॥
इंद्रजिता तुजविण । मज दाही दिशा झाल्या शून्य ।
कवणा देऊं आलिंगन । शुभ वचन कोणा बोलूं ॥ ४४ ॥
मजवांचून तुजला । क्षण वोयोग न वचे साहिला ।
तो तूं आज टाकून मजला । सायुज्यपदाला जाऊं पाहसी ॥ ४५ ॥
तुजवीण मी अनाथ । शिरी नाहीं मज नाथ ।
आतां काय हे जीवित । येईन त्वरित तुजपासीं ॥ ४६ ॥
पुच्छ तुटल्या सापसरळी । कीं जळावेगळी मासोळी ।
तेंवी सुलोचना तळमळी । नाहीं ते वेळीं देहशुद्धी ॥ ४७ ॥
गडबडां भूमीवरी लोळत । नानापरी आक्रंदत ।
बहुत ग्लानि करित । आक्रोश बहुत मांडिला ॥ ४८ ॥

सुलोचनेची सहगमनाची तयारी :

तंव शांतिमती सखी जाण । आणि विवेक सखा आपण ।
शांतिमती सुलोचनेलागून । विवेका विचारुण म्हणे माते ॥ ४९ ॥
आतां पतिसमागम । सायुज्यपद अति सुगम ।
प्राप्त होय उत्तम धाम । तो उपाय परम योजावा ॥ ५० ॥
ऐसें ऐकतां वचन । सुलोचना विचारी आपण ।
विना वैराग्यप्राप्तीवीणा रामचरण नातुडती ॥ ५१ ॥

सुलोचनेचे संपत्तिदान :

सांडोनि प्रपंचविलास । सर्व भावीं झाली उदास ।
गृहधनादि सर्वस्वास । झाली उदास सुलोचना ॥ ५२ ॥
त्रैलोक्यींची संपत्ती । इंद्रजितीं मेळविली होती ।
तिची गणना करावी किती । बहु संपत्तिसागर ॥ ५३ ॥
वस्त्रें ललामें अमोलिक । तयांचे न करवती लेख ।
सुलोचना मानी ओक । देहसार्थक मांडिलें ॥ ५४ ॥
आशा तृष्णा कामना । यांची बोळवण करुन जाणा ।
निस्पृह झाली सुलोचना । दानधर्मा करुं सरली ॥ ५५ ॥
जडित मुद्रा अलंकार । मणिमंडित उत्तम हार ।
इंद्रजिताचें भांडार । वांटी समग्र द्विजांसी ॥ ५६ ॥
बोलावूनि ऋषी ब्राह्मण । आणि सुवासिनी जाण ।
वांटिती झाली धन । अपरिमित जाण ते काळीं ॥ ५७ ॥
करोनि लोभाचि बोहरी । न देणें दवडोनि दूरी ।
कृपणता घालूनि बाहेरी । वांटी सुंदरी सर्वस्व ॥ ५८ ॥
लोभें धन पुरों जाती । मुळींच त्यांकडे माती ।
भूमीं निक्षेपली संपत्ती । तोंडी माती पाषान ॥ ५९ ॥
तैशी नोहे सुलोचना । सर्व संपत्ती दिधली दाना ।
देतं उल्लास चौगुणा । वांटिले धना निर्लोभत्वें ॥ ६० ॥
दास दासी सेवक । त्यांसी दिधलें यथेष्ट कनक ।
मागत्यासी नव्हे विमुख । सती चोख सुलोचना ॥ ६१ ॥
आप्त याचक तृप्त झाले । धन अपरिमित उरलें ।
नेतां नेववेना उबगले । धन राहिलें तळीं बहुत ॥ ६२ ॥
मग सुलोचना निजगृहासी । नमस्कारोनि साष्टांगेंसीं ।
सखिया घेवोनि सामागमेंसी । निघे सासूसी भेटावया ॥ ६३ ॥
सतीपणाचे अळंकारी । पांढरा तोडर गळसरी ।
हरिद्राकुंकमसिंदूरीं । दिसे सुंदरी घवघवीत ॥ ६४ ॥
शुभ्र कंचुकी शुभ्र वस्त्र । शुभ्र सुमनांचा शृंगार ।
तेणें शोभतसे सुंदर । मनोहर पतिव्रता ॥ ६५ ॥
वाहनारुढ व्हावें जरी । राम न लभे निर्धारीं ।
याकरितां पादचारी । निजनिर्धारीं चालली ॥ ६६ ॥
आदरें भुजेच्या पूजना । करोनीं भावें प्रदक्षिणा ।
घालोनियां लोटांग्णा । वाहिली जाणा सुखासनीं ॥ ६७ ॥
करोनियां रामनामस्मरण । सुलोचना निघे आपण ।
पदोपदीं पतीचें स्मरण । करीत गर्जन वेळोवेळा ॥ ६८ ॥
आलीं सभामंडपासीं । रावण देखिला मंदोदरीसीं ।
साष्टांगें करोनि नमनासी । वृत्तांतासी निवेदी ॥ ६९ ॥
करितां सासूसी नमस्कार । तंव ते आक्रंदली थोर ।
माझा निमाला ज्येष्ठ कुमर । दुःख दुर्धर घोटेना ॥ ७० ॥
ये रे माझ्या ज्येष्ठ सुता । नांवानिगिया इंद्रजिता ।
लक्ष्मणें तुझिया केलें घाता । मुखही सर्वथा दिसेना ॥ ७१ ॥
तुझेनि मजला परम सुख । अंती तुझें न देखें मुख ।
तेणें मज झालें परम दुःख । दुःखदायक संसार ॥ ७२ ॥
बाणांचिये शेजेवरी । पहुडलासी अमित्रकरीं ।
मी तंव निजाची सोयरी । अति दूरी अंतरलें ॥ ७३ ॥
तुझा आश्रय लंकानाथा । निश्चयेंसी केला होता ।
रणीं पावलासी घाता । हे दुःखावस्था अनिवार ॥ ७४ ॥
ऐशी आक्रंदोनि भारी । गडबडां लोळे धरणीवरी ।
संबोखी सुलोचना नारी । निजविचारीं अति गुह्य ॥ ७५ ॥
तुम्हीं न करावें खेदासी । अति सत्यत्वें सतीत्वासीं ।
आजिचेनि सातवे दिवसीं । रावणासीं प्राणांत ॥ ७६ ॥
मंदोदरी बोले आपण । मजही आहे हे ज्ञान ।
शिकविलें नायक रावण । कुळनिर्दळण याचेनि ॥ ७५ ॥

रावणाचा आक्रोश व युद्धावर जाण्याचा आदेश :

आश्वासोनि मंदोदरी । येतां सुलोचना बाहेरी ।
रावण देखोनि शंख करी । दीर्घ स्वरीं आक्रंदे ॥ ७८ ॥
तिहीं लोकां दुर्धर देख । ज्याचा प्रताप अटक ।
तो मारिला एकाएक । मनुष्यमशकें लक्ष्मणें ॥ ७९ ॥
आठवितां पुत्रदुःख । दहाही मुखीं करी शंख ।
दुःखे तळमळित दशमुख । अधोमुख मूर्च्छित ॥ ८० ॥
दुःखें मूर्च्छित दशानना । थापटोनी सुलोचना ।
करोनियां समाधाना । गुह्य ज्ञाना अनुवादे ॥ ८१ ॥
संमुख घायीं देतां प्राण । वीर पावती कृतकल्याण ।
पति पावला ब्रह्मपद पूर्ण । दुःख आपण न करावें ॥ ८२ ॥
बाणीं श्रीरामशपथवृत्ती । सौ‍मित्राचिये निजहस्तीं ।
इंद्रजितासी परम गती । दुःख तदर्थी न करावे ॥ ८३ ॥
धैर्य धरोनि संपूर्ण । सांडा शोक दुःख रुदन ।
माझें कांहीं विज्ञापन । सावधान अवधारा ॥ ८४ ॥
अहो स्वामी लंकानाथा । श्वशुर आणि माता पिता ।
तुम्हीच माझे सर्वथा । ऐका आतां वचन माझें ॥ ८५ ॥
इंद्रजिताचें शिरकमळ । घेवोनि गेले गोळांगूळ ।
तें आणोनि द्यान ये वेळ । तरी मज सकल पावलें ॥ ८६ ॥
ऐंसें बोलतां सुलोचना । आवेश आलासे रावणा ।
सैन्य पालाणार् पालाणा । सन्नद्ध सेना करा वेगीं ॥ ८७ ॥
म्हणे सुलोचने माये । स्वस्थ होवोनियां राहें ।
इंद्रजिताचें शिर लवलाहें । आतांचि पाहें आणितों ॥ ८८ ॥
जिंकोनि सौ‍मित्र रघुनाथ । विधोनियां वानर समस्त ।
इंद्रजिताच्या शिरासमवेत । भेटी त्वरित पैं येतों ॥ ८९ ॥
तंवपर्यंत आपण । स्वस्थ करोनि अंतःकरण ।
येथें असावें जाण । युद्धाकारणें मी जातों ॥ ९० ॥

मंदोदरीचा उपदेश :

ऐसा आविर्भाव जाणून । मंदोदरीनें सुलोचनेलागून ।
एकांती नेऊनी जाण । ऐशापरी सांगितलें ॥ ९१ ॥
रावण बोलतो ज्या गोष्टी । त्यां अवघ्या मिथ्या चावटी ।
तुवां स्वयें जाऊन उठाउठीं । श्रीरामाभेटी पैं घ्यावी ॥ ९२ ॥
नमोनियां रामचरण । तया जावोनियां शरण ।
शिर आणोनि स्वहित जाण । आपणा आपण उद्धारीं ॥ ९३ ॥
झालियाविना शरणागत । कार्य न साधे त्वरित ।
आपलें आपण स्वहित । करावें निश्चित साजणी ॥ ९४ ॥

इंद्रजिताच्या शिरप्राप्तीसाठी सुलोचनेचे श्रीरामाकडे गमन :

ऐसें जाणोनि साचार । स्वयें करावा विचार ।
दृढ धरोनियां निर्धार । श्रीरघुवीर सेंवीं माये ॥ ९५ ॥
परस्वाधीन जो होय । त्याचें कार्य कधीं न होय ।
स्वयें आपण आपली सोय । स्वहित पाहें साधावें ॥ ९६ ॥
ऐकोनि मंदोदरीची मात । सुलोचना घाली प्रणिपात ।
येवोनि नमिला लंकानाथ । आज्ञा त्वरित मागतसें ॥ ९७ ॥
मागावया पतीच्या शिरा । भेटूं जाईन श्रीरामचंद्रा ।
आज्ञा मज द्यावी दशशिरा । तूं सासुरा मजलागीं ॥ ९८ ॥
क्षोभें बोले दशशिर । सीताविरहें विरहातुर ।
तुज देखोनि अति सुंदर । रामचंद्र सोडिना ॥ ९९ ॥
ऐकोनि रावणाचें वचन । सुलोचना हास्यवदन ।
परम भ्रांत दशानन । नेणें महिमान श्रीरामाचें ॥ १०० ॥
श्रीराम परस्त्रीसहोदर । ज्याचें नाम परम पवित्र ।
नामें पावन चराचर । श्रीरघुवीर परब्रह्म ॥ १ ॥
विकल्प नांदे रावणासीं । विकल्प नाहीं रामासीं ।
पाप नातळें रघुवीरासी । नाम जगासी तारक ॥ २ ॥
ऐसें बोलतां सुलोचना । मंदोदरी येवोनी जाण ।
भेटावया रघुनंदना । आज्ञापना देववी ॥ ३ ॥
जाणोनियां भविष्यचिन्ह । आज्ञा देता झाला रावण ।
मग सुलोचना निघे आपण । रामा नमन करावया ॥ ४ ॥
करितां योगयागकोटी । स्वप्नीं नव्हे श्रीरामभेटी ।
तो श्रीराम आज देखेन दृष्टीं । हर्षे गोरटी चालली ॥ ५ ॥
हृदयीं कवळोनि भुजादंड । पादचारी अति प्रचंड ।
रामनामें गर्जोन वितंड । ध्यान अखंड रामाचें ॥ ६ ॥
वाजंत्रांच्या गडगर्जनीं । चालली सत्वशिरोमणी ।
पदोपदीं ओवाळणी । अक्षय वाणीं नारींची ॥ ७ ॥
सवें सखिया सांगातिणी । रामरुप आणोनि ध्यानीं ।
सुलोचना एकनिष्ठ मनीं । रामस्मरणीं चालली ॥ ८ ॥
देखतां श्रीरामाचें कटक । सुलोचनेसीं अति हरिख ।
आजी माझें भाग्य चोख । रघुकुलटिळक देखेन ॥ ९ ॥
जयजयकारें गर्जन । करोनि घाली लोटांगण ।
वंदावया श्रीरामचरण । कर जोडून राहिली ॥ ११० ॥
वानरीं देखिली सुलोचना । रावणें सीता धाडिली जाणा ।
सर्वीं करोनि गर्जना । रामराणा नमियेला ॥ ११ ॥
वानर म्हणती रामराया । जानकी आदिमाया ।
रावणें दिधली धाडोनियां । युद्धभया मानूनी ॥ १२ ॥
ऐकोनी वानरांचें वचन । काय बोले रघुनंदन ।
रावण जीवंत असतां जाण । सीता आपण देखोंना ॥ १३ ॥
पुरता वृत्तांत जाणोनी । कोण येतें विचारोनीं ।
समस्त स्वस्त होवोनी । अवलोकोनी पहा वेगीं ॥ १४ ॥
रामभक्तांसीं पाहीं । पापवासना सर्वथा नाहीं ।
तंव सुलोचना येत पायीं । रामनाम गर्जत ॥ १५ ॥
वानरीं खालत्या केल्या माना । तंव आली सुलोचना ।
घालोनि रामासीं प्रदक्षिणा । समस्त भूमीं ठेविलें ॥ १६ ॥

सुलोचनेची श्रीरामांना प्रार्थना :

हनुमंत म्हणे श्रीरघुनाथा । पैल हे इंद्रजिताची कांता ।
सुलोचना पतिव्रता । वंदनार्था आली असे ॥ १७ ॥
तूं तंव कृपालु रघुनाथा । पुसोनि पूर्ण मनोगत ।
हिचे पुरवावे मनोरथ । ऐसें हनुमंत बोलिला ॥ १८ ॥
श्रीराम म्हणे वो माये । उठीं उठीं वो सये ।
इच्छा असेल ती बोल स्वयें । पुरवीन जायें निजामा ॥ १९ ॥
ऐसें त्रिवार बोलतां । सुलोचना उठली तत्वतां ।
हृदयीं भुजादंड असतां । श्रीरघुनाथा स्तवन करी ॥ १२० ॥
जय जय वो श्रीरामा । भक्तकामल्पद्रुमा ।
मी शरण आलें मेघश्यामा । चरणमहिमा कोण जाणे ॥ २१ ॥
मी तंव तुझ आलें शरण । वानरीं इंद्रजिताचें शिर जाण ।
आणिले तें देवोनि आपण सनाथ मजला करावें ॥ २२ ॥
भेटवावें सौ‍मित्रा । तो आम्हां स्वानंदसोयरा ।
द्यावें इंद्रजिताच्या शिरा । विहिताचारा करीन ॥ २३ ॥
मी तंव तुझी कन्यका । जामातृशिर देवोनि देखा ।
बोळवण कारी रघुनायका । आणिकमी न मागें कांही ॥ २४ ॥
ऐसें बोलतां सुलोचना । हृदयीं कळवळला रामराणा ।
अवलोकोनि वानरसेना । काय वचना बोलत ॥ २५ ॥
अहो सुग्रीवा जांबवंता । नळ नीळ अंगदादि तत्वतां ।
विचार मानला कीं समस्तां । इंद्रजितकांता काय बोले ॥ २६ ॥
हे तंव रावणाची सून । आम्हालागीं आली शरण ।
इंद्रजिताचें शिर देऊन । बोळवण केली पाहिजे ॥ २७ ॥
ऐसें बोलतां रघुनाथ । सुग्रीव म्हणे वानरनाथ ।
सुलोचने तुज वृत्तांत । कैसा त्वरित समजला ॥ २८ ॥
शिर आणिलें वानरीं । तुज श्रुत जालें कवणेपरीं ।
भुजदंड धरिला हृदयावरी । तो झडकरीं दाविला ॥ २९ ॥
परिसें वानरनाथा सुग्रीवा । माझे अंगणभूमीवरी बरवा ।
भुजदंड आला जेव्हां । प्रार्थना तेव्हां म्यां केली ॥ १३० ॥
पाचबद्ध भूमीवरी । वर्तमान लिहिलें सविस्तरीं ।
तो हा भुजदंड हृदयावरीं । म्हणोनि निर्धारीं दाविला ॥ ३१ ॥

सुग्रीवाचे आव्हान :

तंव बोलिला सुग्रीव वीर । तोंडचे तोंडीं समाचार ।
कोण मानी साचार । ऐक निर्धार सांगतों ॥ ३२ ॥
शिर प्रत्यक्ष बोलेल । तुझे पतिव्रत्या साक्ष देईल ।
आम्हां साच मानेल । नाहीं तरी फोलकट ॥ ३३ ॥
श्रीरामसंज्ञेकरोनी । शिर दिधलें आणोनी ।
सुलोचना देखोनि नयनीं । हर्षित मनीं पैं झाली ॥ ३४ ॥
शिर घेवोनियां सन्निध । अंचळें पुसोनि यथाविध ।
निढळा मिळवोनि निढळ विनोद । बोले सुबद्ध सुलोचना ॥ ३५ ॥
आसन घातलें पद्मासन । भुजदंड आणि शिर जाण ।
पुढें मांडीवरी घेऊन । काय आपण बोलत ॥ ३६ ॥
अहो इंद्रजिता स्वामी । वानरीं तुचचें शिर रणभूमीं ।
घेऊन आणिलें झेलती व्योमीं । तो राग स्वामी न धरावा ॥ ३७ ॥
मी तंव तुझी निजदासी । प्रतारणा न करावी मजसी ।
साक्ष देवोनि वानरांसी । पतिव्रतापणासी साच करीं ॥ ३८ ॥
वानरीं मांडिली माझी छळणा । तुजवांचून सांगूं कवणा ।
ऐसें बोलोनि सुलोचना । करी नमना हस्तेंसीं ॥ ३९ ॥
नानापरी उपचारीं । शिरालागीं प्रार्थना करी ।
शिर न बोले निर्धारी । मग अंतरीं विचारित ॥ १४० ॥
एका शुद्ध भावावीण । वरपंगी उपचार जाण ।
करिता न बोले शिर आपण । आतां सतीपण दावूं यांसी ॥ ४१ ॥
जरी मी सत्य पतिव्रता । असेन साचार तत्वतां ।
तरी साक्ष देवो माझा भर्ता । श्रीरघुनाथासमक्ष ॥ ४२ ॥
सबाह्य अभ्यंतरीं आपण । म्हणे मी पतिव्रता असेन ।
इंद्रजिता तुजवांचून । शेषासमान सर्वही ॥ ४३ ॥
ऐसा असल्या निर्धार । साक्ष बोलावी प्रखर ।
बोला अचेतन हें शिर । पतिव्रता साचार सुलोचना ॥ ४४ ॥

इंद्रजिताच्या शिराचे उत्तर :

ऐकतां सतीचें उत्तर । थरथरलें अचेतन शिर ।
देखतां श्रीरामचंद्र । साक्ष साचार अनुवादे ॥ ४५ ॥
जैसा रामचंद्र सत्य सत्य । तैसें सुलोचनेचें पातिव्रत्य ।
जाणोनियां इत्थंभूत । कार्य निश्चित करीं स्वामी ॥ ४६ ॥
ऐशी साक्ष देतां शिर । वानरीं केला जयजयकार ।
सुखावला श्रीरामचंद्र । चिंतातुर लक्ष्मण ॥ ४७ ॥
केवळ अचेतन शिर । साक्ष वदलें पैं साचार ।
संतोषोनी श्रीरामचंद्र । काय उत्तर बोलत ॥ ४८ ॥
रघुनंदन म्हणे सुलोचने । काय इच्छा तें बोलणें ।
काय मागसी तें देईन सजणे । प्रसन्नवदनें बोलिला ॥ ४९ ॥
सुलोचना म्हणे गा श्रीरामा । भक्तकामकल्पद्रुमा ।
पतिशिर देवोनी आम्हां । पुनर्जन्मा देऊं नको ॥ १५० ॥
तुझ्य़ा चरणीं अक्षय वास । तुझ्या नामीं दृढ विश्वास ।
हेंचि देवोनि आम्हांस । निजधामास बोळवीं ॥ ५१ ॥
ऐसें मागे सुलोचना । संतोषला रामराणा ।
पावाल अक्षयी निजभवना । आशीर्वचन जाण माझ्या ॥ ५२ ॥
आणीक होवोनि हर्षान्वित । काय बोलता रघुनाथ ।
आतां उठवीन इंद्रजित । म्हणोनि हस्त उचलिला ॥ ५३ ॥
तंव बोलिला हनुमंत वीर । स्वामींनीं हा परोपकार ।
पुरे करावा विचार समग्र । आतां उदार न व्हावें ॥ ५४ ॥
तंव बोलिला लक्ष्मण । हनुमानाचें वचन प्रमाण ।
स्वामींनी करोनि आपण । आज्ञापन द्यावें सुलोचने ॥ ५५ ॥
सुग्रीव बोले सुलोचनेप्रती । शिर घेवोनि नीघ त्वरितीं ।
विलंब न करावा ये अर्थीं । जायीं निश्चितीं निजमाये ॥ ५६ ॥
ऐसें ऐकतां वचन । शिरा भुजादंड कवळोन ।
श्रीरामा नमस्कार प्रदक्षिण । करोनि विनवणी करीतसें ॥ ५७ ॥

एक दिवस युद्ध स्थगित करण्याची सुलोचनेची श्रीरामांना विनंती :

ऐकें स्वामी रघुनाथा । आजिंचा दिवस युद्धवार्ता ।
आपण न करावी सर्वथा । वानर आपले आंवरावे ॥ ५८ ॥
अवश्य म्हणे रघुनंदन । करी सुग्रीवा आज्ञापन ।
आजिंचा दिवस वानरगण । रणकंदना न जावे ॥ ५९ ॥

सुलोचनेचे सहगमन :

ऐसें होतां सुलोचना । भुजदंड आणि शिर जाणा ।
मस्तकीं वाहोनि रणांगणा । निकुंबळें जाणा जाती झाली ॥ १६० ॥
सर्व सखियांसमवेत । रामनामें गर्जत ।
चरणचाली निकुंबळेंत । आली जेथ धड होतें ॥ ६१ ॥
शिर जोडोनि धडासी । उभय भुजा ठेवोनि समीपेंसीं ।
अग्निप्रवेशाचे सामग्रींसीं । स्वयें साहित्यासी मांडिलें ॥ ६२ ॥
तंव रावणाचे हेरीं । वर्तमान निवेदिलें ते अवसरीं ।
रावण मंदोदरी सहपरिवारीं । स्वयें झडकरी तेथें आलीं ॥ ६३ ॥
रावणें येवोनि आपण । कुंड करोनि चतुष्कोण ।
आंत चंदनकाष्ठें घालून । त्यास कृशान लाविला ॥ ६४ ॥
सुलोचना कुंडासमीप । येती झाली आपेंआप ।
सतीपणाचें घेऊन रुप। अग्नीसमीप उभी ठेली ॥ ६५ ॥
इंद्रजिताचें सर्व शरीर । चितेमाजी सपरिकर ।
घालोनियां अति सत्वर । अग्नि साचार लाविला ॥ ६६ ॥
आपण राहोनि कुंडाजवळी । सतीपणाचीं वाणें तें काळीं ।
देती झाली वेल्हाळी । सत्या सकळी मिळाल्या ॥ ६७ ॥
स्वर्गीं करिती जयजयकार । विमानीं दाटले सुरवर ।
वन्हि चेतला समग्र । कुंड जाहलें वन्हिमय ॥ ६८ ॥
येरी पुजोनि रंगशिळा । कुंडाप्रति प्रदक्षिणा केल्या ।
उभी राहिली रंगशिळां । चहूंकडे अबला विलोकी ॥ ६९ ॥
स्वर्गीं दाटलीं विमानें । सत्याही देखिल्या नयनें ।
सुलोचनें एकाग्र मनें । करोनि आपण काय करी ॥ १७० ॥
इंद्रजिताचें निजरुप । ध्यानीं आणिलें आपेआप ।
तंव देहभावना निजस्वरुप । आपेंआप विरालीं ॥ ७१ ॥
विसरोनियां देहभान । इंद्रजिताच्या स्वरुपीं निमग्न ।
स्वयें होवोनि आपण । अग्निप्रवेशन करिती झाली ॥ ७२ ॥
तंव देदीप्यमान विमानीं । इंद्रजित देखिला नयनीं ।
उभयतां एके ठायीं होवोनी । सायुज्यसदनीं प्रवेशलीं ॥ ७३ ॥
क्षणाभाजी दुजी सृष्टी । देखते झाले सर्वही दृष्टीं ।
देव करिती पुष्पवृष्टी । जयजयकार बोभाटीं गर्जत ॥ ७४ ॥
देव गेले आपल्या स्थाना । लंकावासी जन जाणा ।
आठवीत सुलोचनेच्या गुणा । आपलाल्या भवना स्वयें गेले ॥ ७५ ॥
लंकानाथ आणि मंदोदरी । अति आक्रोशें रुदन करी ।
रावण म्हणे निर्धारीं एकें सुदरी मंदोदरी ॥ ७६ ॥
आजी वडील पुत्र वडील सून । जाली उभयतांची बोळवण ।
आतां आपणही जाण । सत्वर प्रयाण करावें ॥ ७७ ॥
शोक करणें कासयासी । आतां राहणें नाहीं आपणासी ।
ऐसें बोलोनि सहपरिवारेंसीं । निजभवनासी पैं आले ॥ ७८ ॥
ज्या रावणाची संपत्ती । गणितां न गणवे गणती ।
पुत्रपौत्र बहुसंतती । ऐसा निश्चितीं दुजा नाहीं ॥ ७९ ॥
नगरी पाहतां सुवर्णाची । सर्व देव सेवा करिती ज्याची ।
विपरीत कळा कैसी आजची । एक रावणचि उरला असे ॥ १८० ॥
तोही मरेल रामबाणें । निदानीं उरेल बिभीषण ।
ऐसें काळाचें करणें । कोण जाणे कैसें होय ॥ ८१ ॥
एका जनार्दना शरण । सुलोचनाग्निप्रवेश्न ।
झालें सकळ निरुपण । सज्जनीं सावधान परिसावें ॥ ८२ ॥
पुढें रामरावणांचें युद्ध । होईल आतां सुसंबद्ध ।
श्रोते परिसोत विविध । निजबोध रावणा ॥ ८३ ॥
एकाएकीं एकनाथ । शरणागत भावार्थें ।
जनार्दनाचें मी अपत्य । लळे समस्त पाळित ॥ १८४ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां
सुलोचनाग्निप्रवेशनं नाम एकचत्वारिंशोऽध्यायः ॥ ४१ ॥ ओव्या ॥ १८४ ॥


GO TOP