[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अरण्यकाण्डे
॥ एकोनसप्ततितमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
लक्ष्मणेनायोमुख्यै दण्डदानं कबन्धस्य बाहुबन्धे प्रविष्टयो श्रीरामलक्ष्मणयोश्चिन्ता -
लक्ष्मणांचे अयोमुखीला दण्ड देणे तसेच श्रीराम आणि लक्ष्मणांचे कबंधाच्या बाहुबंधात पडून चिंतीत होणे -
कृत्वैवमुदकं तस्मै प्रस्थितौ राघवौ तदा ।
अवेक्षन्तौ वने सीतां जग्मतुः पश्चिमां दिशम् ॥ १ ॥
याप्रकारे जटायुला जलाञ्जली प्रदान करून ते दोन्ही रघुवंशी बंधु त्या समयी तेथून प्रस्थित झाले आणि वनात सीतेचा शोध करीत पश्चिम दिशेस (नैऋत्य कोणात) आले. ॥१॥
तौ दिशं दक्षिणां गत्वा शरचापासिधारिणौ ।
अविप्रहतमैक्ष्वाकौ पन्थानं प्रतिपेदतुः ॥ २ ॥
धनुष्य, बाण आणि खड्ग धारण केलेले ते दोन्ही इक्ष्वाकुवंशी वीर त्या दक्षिण-पश्चिम दिशेकडे पुढे जाताजाता एका अशा मार्गावर पोहोंचले जेथे लोकांची ये-जा होत नव्हती. ॥२॥
गुल्मैर्वृक्षैश्च बहुभिर्लताभिश्च प्रवेष्टितम् ।
आवृतं सर्वतो दुर्गं गहनं घोरदर्शनम् ॥ ३ ॥
तो मार्ग बरेचसे वृक्ष, झाडी आणि लतावेली द्वारा सर्व बाजूनी घेंरलेला होता. तो फारच दुर्गम, गहन आणि दिसण्यात भयंकर होता. ॥३॥
व्यतिक्रम्य तु वेगेन गृहीत्वा दक्षिणां दिशम् ।
सुभीमं तन्महारण्यं व्यतियातौ महाबलौ ॥ ४ ॥
तो वेगपूर्वक ओलांडून ते दोन्ही महाबली राजकुमार दक्षिण दिशेने त्या अत्यंत भयानक आणि विशाल वनांतून पुढे निघून गेले. ॥४॥
ततः परं जनस्थानात् त्रिक्रोशं गम्य राघवौ ।
क्रौञ्चारण्यं विविशतुर्गहनं तौ महौजसौ ॥ ५ ॥
त्यानंतर जनस्थानापासून तीन कोस दूर जाऊन ते महाबली श्रीराम आणि लक्ष्मण क्रौञ्चारण्य नावाने प्रसिद्ध गहन वनामध्ये गेले. ॥५॥
नानामेघघनप्रख्यं प्रहृष्टमिव सर्वतः ।
नानावर्णैः शुभैः पुष्पैर्मृगपक्षिगणैर्युतम् ॥ ६ ॥
ते वन अनेक मेघ समूहाप्रमाणे श्याम प्रतीत होत होते. विविध रंगाच्या सुंदर फुलांनी सुशोभित झाल्यामुळे ते सर्व बाजूनी हर्षोत्फुल्ल झाल्यासारखे दिसत होते. त्यामध्ये बरेचसे पशुपक्षी निवास करीत होते. ॥६॥
दिदृक्षमाणौ वैहेहीं तद्वनं तौ विचिक्यतुः ।
तत्र तत्रावतिष्ठन्तौ सीताहरणदुःखितौ ॥ ७ ॥
सीतेचा पत्ता लावण्याच्या इच्छेने ते दोघे त्या वनात तिचा शोध करू लागले. जिकडे- तिकडे शोध घेतांना थकून गेल्यावर ते विश्रामासाठी थांबत असत. वैदेहीच्या अपहरणाने त्यांना फारच दुःख होत होते. ॥७॥
ततः पूर्वेण तौ गत्वा त्रिक्रोशं भ्रातरौ तदा ।
क्रोञ्चारण्यमतिक्रम्य मतङ्‌गाश्रममन्तरे ॥ ८ ॥
त्यानंतर ते दोघे बंधु तीन कोस पूर्वेस जाऊन क्रौञ्चारण्यास पार करून मतङ्‌ग मुनिंच्या आश्रमाजवळ गेले. ॥८॥
दृष्ट्‍वा तु तद् वनं घोरं बहुभीममृगद्विजम् ।
नानासत्त्वसमाकीर्णं सर्वं गहनपादपम् ॥ ९ ॥
ते वन फार भयंकर होते. त्यात बरेचसे भयानक पशु आणि पक्षी निवास करीत होते. अनेक प्रकारच्या वृक्षांनी व्याप्त ते सारे वन गहन वृक्षांच्या रांगानी भरलेले होते. ॥९॥
ददृशाते गिरौ तत्र दरीं दशरथत्मजौ ।
पातालसमगम्भीरां तमसा नित्यसंवृताम् ॥ १० ॥
तेथे पोहोचून दशरथ राजकुमारांनी तेथील पर्वतावर एक गुहा पाहिली जी पाताळासमान खोल होती. ती सदा अंधःकाराने आवृत्त राहात असे. ॥१०॥
आसाद्य तौ नरव्याघ्रौ दर्यास्तस्याविदूरतः ।
ददृशाते महारूपां राक्षसीं विकृताननाम् ॥ ११ ॥
तिच्या जवळ जाऊन त्या दोन्ही नरश्रेष्ठ वीरांनी एक विशालकाय राक्षसी पाहिली, जिचे मुख अत्यंत विकराळ होते. ॥११॥
भयदामल्पसत्त्वानां बीभत्सां सौद्रदर्शनाम् ।
लम्बोदरीं तीक्ष्णदंष्ट्रां करालां परुषत्वचम् ॥ १२ ॥
ती लहान लहान जंतुना भय दाखविणारी तसेच दिसण्यातही भयंकर होती. तिचा चेहरा पाहून घृणा उत्पन्न होत होती. तिचे लांब पोट, तीक्ष्ण दाढा, आणि त्वचा कठोर होती. ती फार विक्राळ दिसत होती. ॥१२॥
भक्षयन्तीं मृगान् भीमान् विकटां मुक्तमूर्धजाम् ।
अवैक्षतां तु तौ तत्र भ्रातरौ रामलक्ष्मणौ ॥ १३ ॥
ती भयानक पशुंनाही पकडून खाऊन टाकीत होती. तिचा आकार विकट होता आणि केस मोकळे होते. त्या कंदरेच्या जवळ दोन्ही भावानी श्रीराम आणि लक्ष्मणांनी तिला पाहिले. ॥१३॥
सा समासाद्य तौ वीरौ व्रजन्तं भ्रातुरग्रतः ।
एहि रंस्यावहेत्युक्त्वा समालंभत लक्ष्मणम् ॥ १४ ॥
ती राक्षसी त्या वीरांजवळ आली आणि आपल्या भावाच्या पुढे पुढे चालणार्‍या लक्ष्मणाकडे पाहून म्हणाली - ये आपण दोघे रमण करू. असे म्हणून तिने लक्ष्मणाचा हात पकडला. ॥१४॥
उवाच चैनं वचनं सौमित्रिमुपगुह्य च ।
अहं त्वयोमुखी नाम लाभस्ते त्वमसि प्रियः ॥ १५ ॥
इतकेच नव्हे तर तिने सैमित्राला आपल्या भुजांमध्ये आवळून धरले आणि या प्रकारे म्हटले- माझे नाव अयोमुखी आहे मी तुला भार्यारूपाने प्राप्त झाले तर समजून घे, फार मोठा लाभ झाला आहे आणि तुम्ही माझे प्रिय पति आहात. ॥१५॥
नाथ पर्वतदुर्गेषु नदीनां पुलिनेषु च ।
आयुश्चिरमिदं वीर त्वं मया सह रंस्यसे ॥ १६ ॥
प्राणनाथ ! वीर ! हे दीर्घकाल पर्यंत स्थिर राहाणारे आयुष्य मिळवून तू पर्वताच्या दुर्गम कंदरांमध्ये आणि नद्यांच्या तटावर माझ्यासह सदा रमण करशील. ॥१६॥
एवमुक्तस्तु कुपितः खड्गमुद्धृत्य लक्ष्मणः ।
कर्णनासस्तनं तस्या निचकर्तारिसूदनः ॥ १७ ॥
राक्षसीने असे म्हटल्यावर शत्रुसूदन लक्ष्मण क्रोधाने जळू लागले. त्यांनी तलवार काढून तिचे कान, नाक आणि स्तन कापून टाकले. ॥१७॥
कर्णनासे निकृत्ते तु विस्वरं विननाद सा ।
यथागतं प्रदुद्राव राक्षसी घोरदर्शना ॥ १८ ॥
नाक आणि कान कापले गेल्यावर ती भयंकर राक्षसी जोरजोराने ओरडू लागली आणि जेथून आली होती तिकडेच पळून गेली. ॥१८॥
तस्यां गतायां गहनं व्रजन्तौ वनमोजसा ।
आसेदतुरमित्रघ्नौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ ॥ १९ ॥
ती निघून गेल्यावर दोघे भाऊ शक्तिशाली श्रीराम आणि लक्ष्मण अत्यंत वेगाने चालून एका गहन वनात जाऊन पोहोचले. ॥१९॥
लक्ष्मणस्तु महातेजाः सत्त्ववाञ्छीलवाञ्छुचिः ।
अब्रवीत् प्राञ्जलिर्वाक्यं भ्रातरं दीप्ततेजसम् ॥ २० ॥
त्या वेळी महातेजस्वी, धैर्यवान्‌, सुशील आणि पवित्र आचार-विचार असणार्‍या लक्ष्मणांनी हात जोडून आपले तेजस्वी भ्राता श्रीरामास म्हटले- ॥२०॥
स्पन्दते मे दृढं बाहुः उद्विग्नमिव मे मनः ।
प्रायशश्चाप्यनिष्टानि निमित्तान्युपलक्षये ॥ २१ ॥

तस्मात् सज्जीभवार्य त्वं कुरुष्व वचनं मम ।
ममैव हि निमित्तानि सद्यः शंसन्ति संभ्रमम् ॥ २२ ॥
आर्य ! माझा डावा बाहु जोरजोराने लवत आहे आणि मन उद्विग्नसे होत आहे. मला वारंवार वाईट शकुन (अपशकुन) दिसून येत आहेत म्हणून आपण भयाचा सामना करण्यासाठी तयार व्हावे. माझी गोष्ट मानावी. हे जे अपशकुन होत आहेत ते केवळ मलाच तात्काळ प्राप्त होणार्‍या भयाची सूचना देत आहेत. ॥२१-२२॥
एष वञ्जुलको नाम पक्षी परमदारुणः ।
आवयोर्विजयं युद्धे शंसन्निव विनर्दति ॥ २३ ॥
(या बरोबर एक शुभ शकुन ही होत आहे) हा जो वञ्जुळ नामक अत्यंत दारूण पक्षी आहे, तो युद्धात आपणा दोघांचा विजय सूचित करीत असल्यासारखा जोरजोराने बोलत आहे. ॥२३॥
तयोरन्वेषतोरेवं सर्वं तद् वनमोजसा ।
संजज्ञे विपुलः शब्दः प्रभञ्जन्निव तद् वनम् ॥ २४ ॥
याप्रकारे बलपूर्वक त्या सार्‍या वनात ते दोघे भाऊ जेव्हा सीतेचा शोध करीत होते. त्या समयी तेथे फार जोराने, जणु त्या वनाचा विध्वंस करीत आहे की काय असा शब्द झाला. ॥२४॥
संवेष्टितमिवात्यर्थं गहनं मातरिश्वना ।
वनस्य तस्य शब्दोऽभूद् वनमापूरयन्निव ॥ २५ ॥
त्या वनात जोरजोराने वादळ सुरू झाले. सर्व वन त्या वावटळीत सापडले. वनात त्या शब्दाचा जो प्रतिध्वनि उठला त्याने तो सर्व वनप्रांत दणाणून गेला. ॥२५॥
तं शब्दं काङ्‌क्षमाणस्तु रामः खड्गी सहानुजः ।
ददर्श सुमहाकायं राक्षसं विपुलोरसम् ॥ २६ ॥
भावासह तलवार हातात घेऊन भगवान्‌ श्रीराम त्या शब्दाचा वेध घेण्याची इच्छा करीतच होते की एका रूंद छाती असलेल्या विशालकाय राक्षसावर त्यांची दृष्टि पडली. ॥२६॥
आसेदतुश्च तद् रक्षस्तावुभौ प्रमुखे स्थितम् ।
विवृद्धमशिरोग्रीवं कबन्धमुदरेमुखम् ॥ २७ ॥
त्या दोन्ही भावांनी त्या राक्षसास आपल्या समोरच उभा असलेला पाहिले. तो दिसण्यात खूपच मोठा होता, परंतु त्याला मस्तक नव्हते आणि गळाही नव्हता. कबंध (धडमात्र)च त्याचे स्वरूप होते आणि त्याच्या पोटातच त्यांचे तोंड बनलेले होते. ॥२७॥
रोमभिर्निशितैस्तीक्ष्णैर्महागिरिमिवोच्छ्रितम् ।
नीलमेघनिभं रौद्रं मेघस्तनितनिःस्वनम् ॥ २८ ॥
त्याच्या सार्‍या शरीरावर टोकदार आणि तीक्ष्ण रोम होते. तो महान्‌ मेघाप्रमाणे काळा होता आणि मेघासमानच गंभीर स्वरात गर्जना करीत होता. ॥२८॥
अग्निज्वालानिकाशेन ललाटस्थेन दीप्यता ।
महापक्षेण पिङ्‌गेन विपुलेनायतेन च ॥ २९ ॥

एकेनोरसि घोरेण नयनेन सुदर्शिना ।
महादंष्ट्रोपपन्नं तं लेलिहानं महामुखम् ॥ ३० ॥
त्याच्या छातीतच (त्याचे) ललाट होते आणि ललाटांतच एकच लांब-रूंद तसेच अग्निच्या ज्वाळेप्रमाणे जळत असणारा भयंकर डोळा होता ज्याने त्यास चांगले दिसत होते. त्याची पापणी फार मोठी होती आणि तो डोळा पिंगट वर्णाचा होता. त्या राक्षसाच्या दाढा फारच मोठ्‍या होत्या, तशीच तो आपल्या लपलपणार्‍या जीभेने आपल्या विशाल मुखाला वारंवार चाटत राहिला होता. ॥२९-३०॥
भक्षयन्तं महाघोरानृक्षसिंहमृगद्विजान् ।
घोरौ भुजौ विकुर्वाणमुभौ योजनमायतौ ॥ ३१ ॥

कराभ्यां विविधान् गृह्य ऋक्षान् पक्षिगणान् मृगान् ।
आकर्षन्तं विकर्षन्तमनेकान् मृगयूथपान् ॥ ३२ ॥
अत्यंत भयंकर अस्वले, सिंह, हिंस्त्र पशु आणि पक्षी - हेच त्याचे भोजन होते. तो आपल्या एकेक योजन लांब दोन्ही भयंकर भुजांना दूरवर पसरत असे आणि त्या दोन्ही हातांनी नाना प्रकारचे अनेक कोल्हे, पक्षी, पशु तसेच मृगांच्या यूथपतिंना पकडून ओढून घेत असे. त्यांतील जे त्याला भोजनासाठी अभिष्ट नसतील, त्यांना (त्या जतुंना) तो त्याच हातांनी मागे ढकलून देत असे. ॥३१-३२॥
स्थितमावृत्य पन्थानं तयोर्भ्रात्रोः प्रपन्नयोः ।
अथ तं समतिक्रम्य क्रोशमात्रं ददर्शतुः ॥ ३३ ॥

महान्तं दारुणं भीमं कबन्धं भुजसंवृतम् ।
कबन्धमिव संस्थानादतिघोरप्रदर्शनम् ॥ ३४ ॥
दोघे भाऊ श्रीराम आणि लक्ष्मण जेव्हा त्याच्या निकट पोहोंचले तेव्हा तो त्यांचा रस्ता अडवून उभा राहिला. तेव्हा ते दोघे भाऊ त्याच्या पासून दूर सरकले आणि लक्ष्यपूर्वक त्याच्याकडे पाहू लागले. त्यावेळी तो एक कोस लांब असल्याचे कळले. त्या राक्षसाची आकृती केवळ कबंध (धड) रूपातच होती, म्हणून त्याला कबंध म्हटले जात असे. तो विशाल, हिंसापरायण, भयंकर तसेच दोन मोठ मोठ्‍या भुजांनी युक्त होता आणि दिसण्यात अत्यंत घोर प्रतीत होत होता. ॥३३-३४॥
स महाबाहुरत्यर्थं प्रसार्य विपुलौ भूजौ ।
जग्राह सहितावेव राघवौ पीडयन् बलात् ॥ ३५ ॥
त्या महाबाहु राक्षसाने आपल्या दोन्ही विशाल भुजा पसरून त्या दोन्ही रघुवंशी राजकुमारांना बलपूर्वक पीडा देत एकाच वेळी पकडले. ॥३५॥
खड्‌गिनौ दृढधन्वानौ तिग्मतेजौ महाभुजौ ।
भ्रातरौ विवशं प्राप्तौ कृष्यमाणौ महाबलौ ॥ ३६ ॥
दोघांच्या हातात तलवारी होत्या, दोघांजवळ मजबूत धनुष्ये होती आणि दोघेही भाऊ प्रचण्ड तेजस्वी, विशाल भुजांनी युक्त तसेच अत्यंत बलवान्‌ होते. तरीही त्या राक्षसाच्या द्वारे ओढले गेल्यावर विवशतेचा अनुभव करू लागले. ॥३६॥
तत्र धैर्याच्च शूरस्तु राघवो नैव विव्यथे ।
बाल्यादनाश्रयाश्चैव लक्ष्मणस्त्वभिविव्यथे ॥ ३७ ॥
त्यासमयी तेथे शूरवीर राघव श्रीराम तर धैर्यामुळे व्यथित झाले नाहीत परंतु बाळबुद्धि असल्याने तसेच धैर्याचा आश्रय न घेतल्याने लक्ष्मणांच्या मनात फार व्यथा झाली. ॥३७॥
उवाच च विषण्णः सन् राघवं राघवानुजः ।
पश्य मां विवशं वीर राक्षसस्य वशंगतम् ॥ ३८ ॥
तेव्हा श्रीरामांचे लहान भाऊ लक्ष्मण विषादग्रस्त होऊन राघवास म्हणाले- वीरवर ! पहा, मी राक्षसाच्या अधीन होऊन विवश झालो आहे. ॥३८॥
मयैकेन तु निर्युक्तः परिमुच्यस्व राघव ।
मां हि भूतबलिं दत्त्वा पलायस्व यथासुखम् ॥ ३९ ॥
राघवा ! एकमात्र मलाच या राक्षसास भेट देऊन आपण स्वतः याच्या बाहुबंधनातून मुक्त होऊन जावे. या भूताला माझाच बळी देऊन आपण सुखपूर्वक येथून निघून पळून जावे. ॥३९॥
अधिगन्तासि वैदेहीमचिरेणेति मे मतिः ।
प्रतिलभ्य च काकुत्स्थ पितृपैतामहीं महीम् ॥ ४० ॥

तत्र मां राम राज्यस्थः स्मर्तुमर्हसि सर्वदा ।
माझा विश्वास आहे की आपण शीघ्रच वैदेहीला प्राप्त करून घ्याल. काकुत्स्थ श्रीरामा ! वनवासातून परतल्यावर पिता- पितामहांच्या भूमीला अधिकारात घेऊन जेव्हा आपण राजसिंहासनावर विराजमान व्हाल, तेव्हा तेथे सदा माझेही स्मरण करीत राहावे. ॥४० १/२॥
लक्ष्मणेनैवमुक्तस्तु रामः सौमित्रिमब्रवीत् ॥ ४१ ॥

मा स्म त्रासं वृथा वीर न हि त्वादृग् विषीदति ।
लक्ष्मणाने असे म्हटल्यावर श्रीरामांनी त्या सौमित्रास म्हटले- वीरा ! तू भयभीत होऊ नको. तुझ्या सारखे शूरवीर या प्रकारे विषाद करीत नाहीत. ॥४१ १/२॥
एतस्मिन्नन्तरे क्रूरो भ्रातरौ रामलक्ष्मणौ ॥ ४२ ॥

तावुवाच महाबाहुः कबन्धो दानवोत्तमः ।
इतक्यात क्रूर हृदयाच्या दानवशिरोमणी महाबाहु कबंधाने त्या दोन्ही भावांना - श्रीराम आणि लक्ष्मणांना म्हटले - ॥४२ १/२॥
कौ युवां वृषभस्कन्धौ महाखड्गधनुर्धरौ ॥ ४३ ॥

घोरं देशमिमं प्राप्तौ दैवेन मम चाक्षुषौ ।
वदतं कार्यमिह वां किमर्थं चागतौ युवाम् ॥ ४४ ॥
तुम्ही दोघे कोण आहात ? तुमचे खांदे बैलासारखे उंच आहेत. तुम्ही मोठ मोठ्‍या तलवारी आणि धनुष्य धारण केलेली आहेत. या भयंकर देशात तुम्ही दोघे कशासाठी आला आहात ? येथे तुमचे काय कार्य आहे ? सांगा. भाग्यानेच तुम्ही दोघे माझ्या दृष्टीस पडला आहात. ॥४३-४४॥
इमं देशमनुप्राप्तौ क्षुधार्तस्येह तिष्ठतः ।
सबाणचापखड्गौ च तीक्ष्णशृङ्‌गाविवर्षभौ ॥ ४५ ॥

मां तूर्णमनुसंप्राप्तौ दुर्लभं हि जीवितं हि वाम् ।
मी येथे भुकेने पीडित होऊन उभा होता आणि तुम्ही स्वतः धनुष्य बाण आणि खड्ग घेऊन तीक्ष्ण शिंग असलेल्या दोन बैलाप्रमाणे तात्काळच या स्थानावर माझ्या निकट येऊन पोहोंचला आहात. म्हणून आता तुम्हा दोघांचे जिवंत राहाणे कठीण आहे. ॥४५ १/२॥
तस्य तद् वचनं श्रुत्वा कबन्धस्य दुरात्मनः ॥ ४६ ॥

उवाच लक्ष्मणं रामो मुखेन परिशुष्यता ।
कृच्छ्रात् कृच्छ्रतरं प्राप्य दारुणं सत्यविक्रम ॥ ४७ ॥

व्यसनं जीवितान्ताय प्राप्तमप्राप्य तां प्रियाम् ।
दुरात्मा कबंधाचे हे बोलणे ऐकून श्रीरामांनी तोंडास कोरड पडलेल्या लक्ष्मणास म्हटले- सत्यपराक्रमी वीर ! कठीणात कठीण असह्य दुःख प्राप्त झाल्याने आपण दुःखी होतोच, तो पर्यंत पुन्हा प्रियतमा सीतेची प्राप्ती होण्यापूर्वीच आपल्या दोघांवर हे महान्‌ संकट आले आहे, जे जीवनाचा अंत करणारे आहे. ॥४६-४७ १/२॥
कालस्य सुमहद् वीर्यं सर्वभूतेषु लक्ष्मण ॥ ४८ ॥

त्वां च मां च नरव्याघ्र व्यसनैः पश्य मोहितौ ।
नहि भारोऽस्ति दैवस्य सर्वभूतेषु लक्ष्मण ॥ ४९ ॥
नरश्रेष्ठ लक्ष्मणा ! काळाचे महान्‌ बळ सर्व प्राण्यांवर आपला प्रभाव पाडत असते. पहा ना, तू आणि मी दोघेही काळाने दिलेल्या अनेकानेक संकटांनी मोहित होत आहोत. लक्ष्मणा ! दैव अथवा काळासाठी संपूर्ण प्राण्यांच्यावर शासन करणे भाररूप (कठीण) नाही. ॥४८-४९॥
शूराश्च बलवन्तश्च कृतास्त्राश्च रणाजिरे ।
कालाभिपन्नाः सीदन्ति यथा वालुकसेतवः ॥ ५० ॥
जसे वाळूचे बांधलेले पूल पाण्याच्या आघातांनी वाहून जातात. त्याप्रकारे मोठ मोठे शूरवीर, बलवान्‌ आणि अस्त्रवेत्ते पुरुषही समरांगणात काळाच्या वशीभूत होऊन कष्टात (संकटात) पडतात. ॥५०॥
इति ब्रुवाणो दृढसत्यविक्रमो
     महायशा दाशरथिः प्रतापवान् ।
अवेक्ष्य सौमित्रिमुदग्रविक्रमः
     स्थिरां तदा स्वां मतिमात्मनाकरोत् ॥ ५१ ॥
असे म्हणून सुदृढ तसेच सत्यपराक्रमी, महान्‌ बल-विक्रमांनी संपन्न महायशस्वी प्रतापशाली दशरथनंदन श्रीरामांनी सैमित्राकडे पाहून त्या समयी स्वतः आपल्या बुद्धिला सुस्थिर केले. ॥५१॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽरण्यकाण्डे एकोनसप्ततितमः सर्गः ॥ ६९ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकि निर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील अरण्यकाण्डाचा एकोणसत्तरावा सर्ग पूरा झाला. ॥६९॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP