[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अयोध्याकाण्डे
। । सप्तचत्वारिंशः सर्गः । ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
प्रातः प्रबुद्धानां पौराणां विलापो निराशानां च तेषां नगरे निरवर्तनम् - प्रातःकाळी उठल्यावर पुरवासी लोकांचे विलाप करणे आणि निराश होऊन नगरास परतणे -
प्रभातायां तु शर्वर्यां पौरास्ते राघवं विना ।
शोकोपहतनिश्चेष्टा बभूवुर्हतचेतसः ॥ १ ॥
इकडे रात्र संपून जेव्हा प्रभात झाली तेव्हा अयोध्यावासी लोक राघव न दिसल्याने शोकाने व्याकुल होऊन निश्चेष्ट झाले. त्यांच्या हातून काही ही कर्म घडेना. ॥१॥
शोकजाश्रुपरिद्यूना वीक्षमाणास्ततस्ततः ।
आलोकमपि रामस्य न पश्यन्ति स्म दुःखिताः ॥ २ ॥
ते शोकजनित अश्रु ढाळीत अत्यंत खिन्न झाले आणि इकडे तिकडे शोध घेऊ लागले. परंतु त्या दुःखी पुरवासी जनांना राम कोठे गेले या गोष्टीचा पत्ता लागेल असे कुठलेही चिन्ह दिसून आले नाही. ॥२॥
ते विषादार्तवदना रहितास्तेन धीमता ।
कृपणाः करुणा वाचो वदन्ति स्म मनिषिणः ॥ ३ ॥
बुद्धिमान रामांशी वियोग झाल्याने ते अत्यंत दीन झाले. त्यांच्या मुखावर विषादजनित वेदना स्पष्ट दिसून येत होती. ते मनीषी पुरवासी करूणस्वराने बोलत विलाप करू लागले - ॥३॥
धिगस्तु खलु निद्रां तां ययापहतचेतसः ।
नाद्य पश्यामहे रामं पृथूरस्कं महाभुजम् ॥ ४ ॥
'हाय! आमच्या या निद्रेचा धिक्कार असो, जिच्यामुळे अचेत होऊन आम्ही त्यावेळी विशाल वक्षस्थळ असणार्‍या महाबाहु श्रीरामांच्या दर्शनापासून वञ्चित झालो. ॥४॥
कथं रामो महाबाहुः स तथावितथक्रियः ।
भक्तं जनमभित्यज्य प्रवासं तापसो गतः ॥ ५ ॥
'ज्यांची कुठलीही क्रिया निष्फळ होत नाही ते तापसवेषधारी महाबाहु राम आम्हा भक्तजनांना सोडून वनात कसे काय निघून गेले ? ॥५॥
यो नः सदा पालयति पिता पुत्रानिवौरसान् ।
कथं रघूणां स श्रेष्ठस्त्यक्त्वा नो विपिनं गतः ॥ ६ ॥
'ज्याप्रमाणे पिता आपल्या औरस पुत्रांचे पालन करतो त्याप्रकारे जे आमचे सदा रक्षण करीत होते तेच रघुकुलश्रेष्ठ राम आज आम्हाला सोडून का बरे निघून गेले ? ॥६॥
इहैव निधनं याम महाप्रस्थानमेव वा ।
रामेण रहितानां नो किमर्थं जीवितं हितम् ॥ ७ ॥
'आम्ही आता येथेच प्राण देऊ अथवा मरण्याचा निश्चय करून उत्तर दिशे कडे चालू लागू. रामरहित होऊन आमचे जीवन धारण करणे कशाप्रकारे हितकर होऊ शकेल ? ॥७॥
संति शुष्काणि काष्ठानि प्रभूतानि महान्ति च ।
तैः प्रज्वाल्य चितां सर्वे प्रविशामोऽथवा वयम् ॥ ८ ॥
'अथवा येथे अनेक मोठमोठी वाळलेली लाकडे पडलेली आहेत त्यांची चिता पेटवून आम्ही सर्व लोक तिच्यातच प्रवेश करू. ॥८॥
किं वक्ष्यामो महाबाहुरनसूयः प्रियंवदः ।
नीतः स राघवोऽस्माभिरिति वक्तुं कथं क्षमम् ॥ ९ ॥
'(जर आम्हाला कुणी श्रीरामाचा वृत्तांत विचारील तर आम्ही त्याला काय उत्तर द्यावे ?) काय आम्ही असे सांगावे की जे कुणाचे दोष पहात नाहीत आणि सर्वांशी प्रिय वचने बोलतात त्या महाबाहु राघवांना आम्ही वनात पोहोचवून दिले आहे ? काय ! ही अयोग्य गोष्ट आमच्या मुखांतून कशी बरे निघू शकेल ? ॥९॥
सा नूनं नगरी दीना दृष्ट्‍वास्मान् राघवं विना ।
भविष्यति निरानन्दा सस्त्रीबालवयोऽधिका ॥ १० ॥
'राघवाशिवाय परत आलेल्या आम्हा लोकाना पाहून स्त्रिया, बालके आणि वृद्धांसहित सारी अयोध्यानगरी निश्चितच दीन आणि आनंदहीन होऊन जाईल. ॥१०॥
निर्यातास्तेन वीरेण सह नित्यं महात्मना ।
विहीनास्तेन च पुनः कथं द्रक्ष्याम तां पुरीम् ॥ ११ ॥
'आम्ही सर्व लोक वीरवर महात्मा श्रीरामा बरोबर सर्वदा निवास करण्यासाठी निघालो होतो. त्यांचा आता वियोग झाल्यावर आम्ही अयोध्यापुरीला कसे बरे पाहू शकू ?' ॥११॥
इतीव बहुधा वाचो बाहुमुद्यम्य ते जनाः ।
विलपन्ति स्म दुःखार्ता हृतवत्सा इवाग्र्यगाः ॥ १२ ॥
याप्रकारे अनेक तर्‍हेच्या गोष्टी करीत ते सर्व पुरवासी आपल्या भुजा उंच करून विलाप करू लागले. ते वासरांची ताटातूट झालेल्या अग्रगामिनी गायींच्या प्रमाणे दुःखाने व्याकुळ होत होते. ॥१२॥
ततो मार्गानुसारेण गत्वा किञ्चित् ततः क्षणं ।
मार्गनाशाद् विषादेन महता समभिप्लुताः ॥ १३ ॥
नंतर रस्त्यावर रथाच्या खुणा दिसल्यावर सर्वच्या सर्व काही अंतरापर्यंत गेले परंतु क्षणाभरातच मार्गाचे चिह्न न मिळाल्यामुळे ते महान शोकात बुडून गेले. ॥१३॥
रथमार्गानुसारेण न्यवर्तन्त मनस्विनः ।
किमिदं किं करिष्यामो दैवेनोपहता इति ॥ १४ ॥
त्या समयी असे म्हणत - 'हे काय झाले ?' आता आम्ही काय करू ?' दैवाने आम्हाला मारून टाकले', ते मनस्वी पुरूष रथाच्या चिह्नांचे अनुसरण करीत अयोध्येकडे परत आले. ॥१४॥
तदा यथागतेनैव मार्गेण क्लान्तचेतसः ।
अयोध्यामगमन् सर्वे पुरीं व्यथितसज्जनाम् ॥ १५ ॥
त्यांचे चित्त क्लान्त झाले होते. ते सर्व ज्या मार्गाने गेले होते त्याच मार्गाने परतून अयोध्यापुरीत जाऊन पोहोंचले, जेथील सत्पुरूष श्रीरामांसाठी व्यथित झालेले होते. ॥१५॥
आलोक्य नगरीं तां च क्षयव्याकुलमानसाः ।
आवर्तयन्त तेऽश्रूणि नयनैः शोकपीडितैः ॥ १६ ॥
त्या नगरीला पाहून त्यांचे हृदय दुःखाने व्याकुळ झाले. ते आपल्या शोक पीडित नेत्रांच्या द्वारे अश्रूंची वृष्टी करू लागले. ॥१६॥
एषा रामेण नगरी रहिता नातिशोभते ।
आपगा गरुडेनेव ह्रदादुद्धृतपन्नगा ॥ १७ ॥
(ते म्हणाले-) 'जिच्या खोल कुण्डातून तेथील नाग गरूडाच्या द्वारा उचलून नेला गेलेला असेल ती नदी जशी शोभाहीन होऊन जाते; त्याप्रकारे रामरहित झालेली ही अयोध्यानगरी आता अधिक शोभून दिसत नाही आहे. ॥१७॥
चन्द्रहीनमिवाकाशं तोयहीनमिवार्णवम् ।
अपश्यन् निहतानन्दं नगरं ते विचेतसः ॥ १८ ॥
त्यांनी पाहिले सर्व नगर चंद्रहीन आकाश आणि जलहीन समुद्राप्रमाणे आनंदशून्य (आनंदरहित) होऊन गेले आहे. पुरीची ही दुरावस्था पाहून ते सर्व निश्चेष्ट झाल्याप्रमाणे झाले. ॥१८॥
ते तानि वेश्मानि महाधनानि
     दुःखेन दुःखोपहता विशन्तः ।
नैव प्रजग्मुः स्वजनं परं वा
     निरीक्षमाणाः प्रविनष्टहर्षाः ॥ १९ ॥
त्यांच्या हृदयांतील सारा उल्हास नष्ट होऊन चुकला होता. ते दुःखाने पीडित होऊन त्या महान वैभवसंपन्न गृहात मोठ्या कष्टाने प्रविष्ट झाले आणि सर्वांना पहात असून आपला आणि परका यांची ओळख त्यांना पट शकली नाही. ॥१९॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीय आदिकाव्ये अयोध्याकाण्डे सप्तचत्वारिंशः सर्गः ॥ ४७ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील अयोध्याकाण्डाचा सत्तेचाळीसावा सर्ग पूरा झाला. ॥४७॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP