श्रीमद् वाल्मीकि रामायणे
बालकाण्डे
। पञ्चविंशः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
श्रीरामेणानुयुक्तेन विश्वामित्रेण ताटकाया जन्मविवाहशापादि प्रसंगं श्रावयित्वा तस्य ताटकावधाय प्रेरणम् - श्रीरामांनी विचरल्यावरून विश्वामित्रांनी त्यांना ताटकेची उत्पत्ति, विवाह एवं शाप आदिंचा प्रसंग ऐकवून त्यांना ताटका वधासाठी प्रेरीत करणे -
अथ तस्याप्रमेयस्य मुनेर्वचनमुत्तमम् ।
श्रुत्वा पुरुषशार्दूलः प्रत्युवाच शुभां गिरम् ॥ १ ॥
अपरिमित प्रभावशाली विश्वामित्र मुनींचे हे उत्तम वचन ऐकून पुरुषसिंह श्रीरामांनी ही शुभ वाणी उच्चारली - ॥ १ ॥
अल्पवीर्या यदा यक्षी श्रूयते मुनिपुङ्‍गव ।
कथं नागसहस्रस्य धारयत्यबला बलम् ॥ २ ॥
"मुनिश्रेष्ठ ! जर ही यक्षिणी एक अबला म्हणून गणली जाते तर तिची शक्ति अल्पच असावयास पाहिजे. मग ही हजार हत्तींचे बळ कसे धारण करीत आहे ?" ॥ २ ॥
इत्युक्तं वचनं श्रुत्वा राघवस्यामितौजसः ।
हर्षयञ्श्लक्ष्णया वाचा सलक्ष्मणमरिंदमम् ॥ ३ ॥

विश्वामित्रोऽब्रवीद् वाक्यं शृणु येन बलोत्कटा ।
वरदानकृतं वीर्यं धारयत्यबला बलम् ॥ ४ ॥
अमिततेजस्वी श्रीराघवाचे असे म्हणणे ऐकून विश्वामित्र आपल्या मधुर वाणीने लक्ष्मणासहित शत्रुदमन श्रीरामाला हर्ष प्रदान करीत म्हणाले, "रघुनंदना ! ज्या कारणाने ताटका भयंकर बलशाली झाली आहे ते मी सांगतो. ऐका. तिच्यामध्ये वरदानजनित बलाचा उदय झालेला आहे. म्हणून ती अबला असूनही (सबला झालेली आहे) बल धारण करीत आहे. ॥ ३-४ ॥
पूर्वमासीन्महायक्षः सुकेतुर्नाम वीर्यवान् ।
अनपत्यः शुभाचारः स च तेपे महत्तपः ॥ ५ ॥
'पूर्वकाळांतील गोष्ट आहे. सुकेतु नावाने प्रसिद्ध एक महान यक्ष होता. तो अत्यंत पराक्रमी आणि सदाचारी होता. पण त्याला काहीही सन्तान नव्हते, म्हणून त्याने फार मोठी तपस्या केली होती. ॥ ५ ॥
पितामहस्तु सुप्रीतस्तस्य यक्षपतेस्तदा ।
कन्यारत्‍नं ददौ राम ताटकां नाम नामतः ॥ ६ ॥
'श्रीरामा ! यक्षराज सुकेतुच्या तपस्येमुळे ब्रह्मदेव फार प्रसन्न झाले. त्यांनी सुकेतुला एक कन्यारत्‍न प्रदान केले. तिचे नाव ताटका होते. ॥ ६ ॥
ददौ नागसहस्रस्य बलं चास्याः पितामहः ।
न त्वेव पुत्रं यक्षाय ददौ चासौ महायशाः ॥ ७ ॥
'ब्रह्मदेवांनी त्या कन्येला एक हजार हत्तींच्या समान बल दिले होते. परंतु त्या महायशस्वी पितामहाने त्या यक्षाला पुत्र मात्र दिला नाही (त्याच्या संकल्पानुसार पुत्र प्राप्त झाला असता तर त्याच्याद्वारे जनतेला अत्याधिक पीडा झाली असती असा विचार करून ब्रह्मदेवांनी पुत्र दिला नाही). ॥ ७ ॥
तां तु बालां विवर्धन्तीं रूपयौवनशालिनीम् ।
जम्भपुत्राय सुन्दाय ददौ भार्यां यशस्विनीम् ॥ ८ ॥
'हळूहळू ती यक्षबालिका मोठी होऊ लागली आणि वय वाढून रूप यौवनाने सुशोभित झाली. त्या अवस्थेत सुकेतुने आपल्या यशस्विनी कन्येला जम्भपुत्र सुन्दाच्या हाती त्याची पत्‍नी म्हणून सोपविले. ॥ ८ ॥
कस्यचित्त्वथ कालस्य यक्षी पुत्रं व्यजायत ।
मारीचं नाम दुर्धर्षं यः शापाद् राक्षसोऽभवत् ॥ ९ ॥
'काही काळानंतर त्या ताटिका यक्षिणीने मारीच नावाने प्रसिद्ध एका दुर्जय पुत्रास जन्म दिला, जो अगस्त्य मुनिंच्या शापाने राक्षस झाला. ॥ ९ ॥
सुन्दे तु निहते राम अगस्त्यमृषिसत्तमम् ।
ताटका सहपुत्रेण प्रधर्षयितुमिच्छति ॥ १० ॥
'श्रीरामा ! अगस्त्यांनीच शाप देऊन सुन्दालाही ठार मारले. तो मारला गेल्यावर ताटका पुत्रासहित जाऊन मुनिवर अगस्त्यांना ठार मारण्याची इच्छा करू लागली. ॥ १० ॥
भक्षार्थं जातसंरम्भा गर्जन्ती साऽभ्यधावत ।
आपतन्तीं तु तां दृष्ट्‍वा अगस्त्यो भगवानृषिः ॥ ११ ॥

राक्षसत्वं भजस्वेति मारीचं व्याजहार सः ।
ती कुपित होऊन मुनिंना खाऊन टाकण्यासाठी गर्जना करीत धावत आली. तिला येतांना पाहून भगवान् अगस्त्य मुनिंनी मारीचास म्हटले, 'तू देवयोनि रूपाचा परित्याग करून राक्षस भावास प्राप्त होशील.'' ॥ ११ १/२ ॥
अगस्त्यः परमामर्षस्ताटकामपि शप्तवान् ॥ १२ ॥

पुरुषादी महायक्षी विकृता विकृतानना ।
इदं रूपं विहायाशु दारुणं रूपमस्तु ते ॥ १३ ॥
'नंतर अत्यंत अमर्षाने भरलेल्या ऋषिंनी ताटकेलाही शाप दिला - 'तू विकराळ मुख असणारी नरभक्षिणी राक्षसी होऊन जा ! तू तर आहेस महायक्षिण, परंतु आता शीघ्रच या रूपाचा त्याग करून तू भयंकर रूप धारण करशील. ॥ १२-१३ ॥
सैषा शापकृतामर्षा ताटका क्रोधमूर्च्छिता ।
देशमुत्सादयत्येनमगस्त्याचरितं शुभम् ॥ १४ ॥
'या प्रकारे शाप मिळाल्यामुळे ताटकेचा अमर्ष आणखीनच वाढला. ती क्रोधाने बेभान झाली आणि त्या दिवसापासून अगस्त्य जेथे राहात होते त्या सुंदर देशास उध्वस्त करू लागली. ॥ १४ ॥
एनां राघव दुर्वृत्तां यक्षीं परमदारुणाम् ।
गोब्राह्मणहितार्थाय जहि दुष्टपराक्रमाम् ॥ १५ ॥
'रघुनंदना ! तू गायी आणि ब्राह्मणांचे हित करण्यासाठी या दुष्ट, पराक्रमी, परम भयंकर दुराचारिणी यक्षिणीचा वध करून टाक. ॥ १५ ॥
न ह्येनां शापसंसृष्टां कश्चिदुत्सहते पुमान् ।
निहन्तुं त्रिषु लोकेषु त्वामृते रघुनन्दन ॥ १६ ॥
रघुकुलाला आनंदित करणार्‍या वीरा ! या शापग्रस्त ताटकेला मारण्यासाठी तिन्ही लोकात तुझ्या शिवाय कोणीही पुरुष समर्थ नाही. ॥ १६ ॥
न हि ते स्त्रीवधकृते घृणा कार्या नरोत्तम ।
चातुर्वर्ण्यहितार्थं हि कर्तव्यं राजसूनुना ॥ १७ ॥
नरश्रेष्ठ ! तू स्त्री हत्येचा विचार करून हिच्यावर दया दाखवू नको. एका राजपुत्राला चार्‍ही वर्णांच्या हितासाठी जरी स्त्री हत्याही करावी लागली तरी तिच्यापासून विन्मुख होता कामा नये. ॥ १७ ॥
नृशंसमनृशंसं वा प्रजारक्षणकारणात् ।
पातकं वा सदोषं वा कर्तव्यं रक्षता सदा ॥ १८ ॥
'प्रजापालक नरेशाने प्रजाजनांच्या रक्षणासाठी क्रूरतापूर्ण अथवा क्रूरतारहित, पातकयुक्त अथवा सदोष कर्मही करावे लागले तरी ते केले पाहिजे, ही गोष्ट त्याने नेहमी ध्यानात ठेवली पाहिजे. ॥ १८ ॥
राज्यभारनियुक्तानामेष धर्मः सनातनः ।
अधर्म्यां जहि काकुत्स्थ धर्मो ह्यस्यां न विद्यते ॥ १९ ॥
ज्यांच्यावर राज्याचे पालन करण्याचा भार आहे, त्यांचा तर हा सनातन धर्म आहे. काकुत्स्थ कुलनंदन ! ताटका महापापिणी आहे. तिच्यात उत्तम धर्माचा लेशही नाही, म्हणून तिला मारून टाक. ॥ १९ ॥
श्रूयते हि पुरा शक्रो विरोचनसुतां नृप ।
पृथिवीं हंतुमिच्छन्तीं मन्थरामभ्यसूदयत् ॥ २० ॥
'नरेश्वर ! असे ऐकले जाते की पूर्वकाळी विरोचनाची कन्या मंथरा सार्‍या पृथ्वीचा नाश करण्याची इच्छा करीत होती. तिचा हा विचार जाणून इंद्राने तिचा वध केला होता. ॥ २० ॥
विष्णुना च पुरा राम भृगुपत्‍नी पतिव्रता ।
अनिन्द्रं लोकमिच्छन्ती काव्यमाता निषूदिता ॥ २१ ॥
'श्रीरामा ! प्राचीन काळी शुक्राचार्यांची माता आणि भृगुची पतिव्रता पत्‍नी त्रिभुवनास इंद्ररहित करण्याची इच्छा करीत होती. हे जाणून भगवान् विष्णुंनी तिला मारून टाकले. ॥ २१ ॥
एतैश्चान्यैश्च बहुभी राजपुत्रैः महात्मभिः ।
अधर्मसहिता नार्यो हताः पुरुषसत्तमैः ।
तस्मादेनां घृणां त्यक्त्वा जहि मच्छासनान्नृप ॥ २२ ॥
यांनी तसेच अन्य बर्‍याच महामनस्वी पुरुषप्रवर राजकुमारांनी पापाचरणी स्त्रियांचा वध केला आहे. नरेश्वर ! म्हणून तूही माझ्या आज्ञेने दया अथवा घृणेचा त्याग करून या राक्षसीला ठार मारून टाक." ॥ २२ ॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् बालकाण्डे पञ्चविंशः सर्गः ॥ २५ ॥ या प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील बालकाण्डाचा तेविसावा सर्ग समाप्त झाला. ॥ २५ ॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP