श्रीमद् वाल्मीकि रामायणे
बालकाण्डे
। द्वाविंशः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
राज्ञा स्वस्त्ययनपूर्वकं रामलक्ष्मणयोर्मुनिना सह प्रस्थापनं मार्गे तयोर्विश्वामित्राद् बलातिबलाख्यविद्ययोः प्राप्तिश्च - राजा दशरथांचे स्वस्तिवाचनपूर्वक राम-लक्ष्मणांना मुनिंसह पाठविणे, मार्गात त्यांना विश्वामित्रांकडून बला आणि अतिबला नामक विद्यांची प्राप्ति -
तथा वसिष्ठे ब्रुवति राजा दशरथः स्वयम् ।
प्रहृष्टवदनो राममाजुहाव सलक्ष्मणम् ॥ १ ॥

कृतस्वस्त्ययनं मात्रा पित्रा दशरथेन च ।
पुरोधसा वसिष्ठेन मङ्‍गलैरभिमन्त्रितम् ॥ २ ॥
वसिष्ठांनी असे सांगितल्यावर राजा दशरथांचे मुख प्रसन्नतेने प्रफुल्ल झाले. त्यांनी स्वतःच लक्ष्मणासहित श्रीरामास आपल्याजवळ बोलावून घेतले. नंतर माता कौसल्या, पिता दशरथ आणि पुरोहित वसिष्ठ यांनी स्वस्तिवाचन करून, तदनंतर त्यांच्या यात्रेसंबंधी मंगलकार्य संपन्न केले. श्रीरामांना मंगलसूचक मंत्रांनी अभिमंत्रित केले गेले. ॥ १-२ ॥
स पुत्रं मूर्ध्न्युपाघ्राय राजा दशरथस्तदा ।
ददौ कुशिकपुत्राय सुप्रीतेनान्तरात्मना ॥ ३ ॥
त्यानंतर राजा दशरथांनी पुत्राचे मस्तक हुंगून अत्यंत प्रसन्नचित्ताने त्यास विश्वामित्रांकडे सोपविले. ॥ ३ ॥
ततो वायुः सुखस्पर्शो नीरजस्को ववौ तदा ।
विश्वामित्रगतं रामं दृष्ट्‍वा राजीवलोचनम् ॥ ४ ॥

पुष्पवृष्टिर्महत्यासीद् देवदुन्दुभिनिःस्वनैः ।
शङ्‍खदुंन्दुभिनिर्घोषः प्रयाते तु महात्मनि ॥ ५ ॥
त्यावेळी धूळरहित सुखद वारा वाहू लागला. कमलनयन श्रीरामांना विश्वामित्रांबरोबर जाताना पाहून देवतांनी आकाशांतून फुलांची फार मोठी वृष्टि केली. देवदुन्दुभि वाजू लागल्या. महात्मा श्रीरामांच्या यात्रेच्या वेळी शंख आणि नगार्‍यांचा ध्वनि होऊ लागला. ॥ ४-५ ॥
विश्वामित्रो ययावग्रे ततो रामो महायशाः ।
काकपक्षधरो धन्वी तं च सौमित्रिरन्वगात् ॥ ६ ॥
पुढे पुढे विश्वामित्र, त्यांच्यामागे काकपक्षधारी महायशस्वी श्रीराम आणि त्यांच्यामागे सुमित्राकुमार लक्ष्मण जात होते. ॥ ६ ॥
कलापिनौ धनुष्पाणी शोभयानौ दिशो दश ।
विश्वामित्रं महात्मानं त्रिशीर्षाविव पन्नगौ ॥ ७ ॥
त्या दोन्ही भावांनी पाठीवर भाते बांधले होते. त्यांच्या हातात धनुष्य शोभत होते आणि ते दोघेही दशदिशांना सुशोभित करीत महात्मा विश्वामित्रांच्या पाठीमागून तीन तीन फण्यांच्या दोन नागांप्रमाणे चालत होते. एका बाजूस खांद्यावर धनुष्य, दुसर्‍या बाजूस पाठीवर तूणीर (भाता) आणि मध्ये मस्तक - या तिन्हींना तीन फण्यांची उपमा दिली गेली आहे. ॥ ७ ॥
अनुजग्मतुरक्षुद्रौ पितामहमिवाश्विनौ ।
अनुयातौ श्रिया दीप्तौ शोभयन्तावनिन्दितौ ॥ ८ ॥
त्यांचा स्वभाव उच्च आणि उदार होता. आपल्या अनुपम कान्तिने प्रकाशित होणारे ते दोन्ही अनिंद्य सुंदर राजकुमार सर्व बाजूस शोभेचा प्रसार करीत विश्वामित्रांच्या मागे, ब्रह्मदेवांच्या मागे दोन्ही अश्विनीकुमार चालत असावेत, तसे जात होते. ॥ ८ ॥
तदा कुशिकपुत्रं तु धनुष्पाणी स्वलङ्‍कृतौ ।
बद्धगोधाङ्‍गुलित्राणौ खड्गवन्तौ महाद्युती ॥ ९ ॥

कुमारौ चारुवपुषौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ ।
अनुयातौ श्रिया दीप्तौ शोभयेतामनिन्दितौ ॥ १० ॥

स्थाणुं देवमिवाचिन्त्यं कुमाराविव पावकी ।
ते दोन्ही बंधु कुमार श्रीराम आणि लक्ष्मण वस्त्रे आणि आभूषणे यांनी उत्तम प्रकारे अलंकृत होते. त्यांच्या हातात धनुष्य होते. त्यांनी आपल्या हाताच्या बोटांमध्ये गोधचर्ममय (घोरपडीच्या कातड्याचे) अंगुलीत्राण धारण केले होते. त्यांच्या कटिप्रदेशावर तलवारी लटकत होत्या. त्यांची श्रीअंके (अंग) अत्यंत मनोहर दिसत होती. ते महातेजस्वी श्रेष्ठ वीर अद्‌भुत कान्तिने उद्‌भासित होऊन सर्व बाजूस आपली शोभा पसरवित कुशिकपुत्र विश्वामित्रांचे अनुसरण करीत होते. त्यावेळी ते दोन्ही वीर अचिन्त्य शक्तिशाली स्थाणुदेवांच्या (महादेवांच्या) मागे चालणार्‍या दोन अग्निकुमार स्कंद आणि विशाखाप्रमाणे शोभत होते. ॥ ९-१० १/२ ॥
अध्यर्धयोजनं गत्वा सरय्वा दक्षिणे तटे ॥ ११ ॥

रामेति मधुरां वाणीं विश्वामित्रोऽभ्यभाषत ।
गृहाण वत्स सलिलं मा भूत् कालस्य पर्ययः ॥ १२ ॥
अयोध्येपासून दीड योजने दूर गेल्यावर शरयूच्या दक्षिण तटावर विश्वामित्र मधुर वाणीने रामाला संबोधित करून म्हणाले - "वत्स राम ! आता शरयूच्या जलाने आचमन करा. या आवश्यक कार्यास विलंब होऊ नये. ॥ ११-१२ ॥
मन्त्रग्रामं गृहाण त्वं बलामतिबलां तथा ।
न श्रमो न ज्वरो वा ते न रूपस्य विपर्ययः ॥ १३ ॥
'बला अतिबला नावाने प्रसिद्ध या मंत्र समुदायास ग्रहण कर. याच्या प्रभावाने तुला कधी श्रमाचा (थकव्याच) अनुभव होणार नाही. ज्वर (रोग अथवा चिन्ताजनित कष्ट) होणार नाहीत. तुझ्या रूपात कुठल्याही प्रकारचा विकार अथवा पालट होणार नाही. ॥ १३ ॥
न च सुप्तं प्रमत्तं वा धर्षयिष्यन्ति नैर्ऋताः ।
न बाह्वोः सदृशो वीर्ये पृथिव्याmaस्ति कश्चन ॥ १४ ॥
निद्रिस्थ अथवा असावध असतांही राक्षस तुझ्यावर आक्रमण करू शकणार नाहीत. या भूतलावर बाहुबलात तुझी बरोबरी करणारा कोणीही होणार नाही. ॥ १४ ॥
त्रिषु लोकेषु वा राम न भवेत् सदृशस्तव ।
बलामतिबलां चैव पठतस्तात राघव ॥ १५ ॥
'हे तात ! रघुकुलनंदन राम ! बला आणि अतिबलाचा अभ्यास करण्याने त्रैलोक्यात तुझ्या समान कोणी राहणार नाही. ॥ १५ ॥
न सौभाग्ये न दाक्षिण्ये न ज्ञाने बुद्धिनिश्चये ।
नोत्तरे प्रतिवक्तव्ये समो लोके तवानघ ॥ १६ ॥
'हे अनघा ! सौभाग्य, चातुर्य, ज्ञान आणि बुद्धिसंबंधी निश्चयात, तसेच कुणाच्याही प्रश्नाचे उत्तर देण्यातही कोणी तुझी बरोबरी करू शकणार नाही. ॥ १६ ॥
एतद्विद्याद्वये लब्धे न भवेत् सदृशास्तव ।
बला चातिबला चैव सर्वज्ञानस्य मातरौ ॥ १७ ॥
या दोन्ही विद्यांची प्राप्ति झाल्यावर कोणीही तुझी बरोबरी करू शकणार नाही, कारण या बला आणि अतिबला नामक विद्या सर्व प्रकारच्या ज्ञानाची जननी आहेत. ॥ १७ ॥
क्षुत्पिपासे न ते राम भविष्येते नरोत्तम ।
बलामतिबलां चैव पठतस्तात राघव ॥ १८ ॥

गृहाण सर्वलोकस्य गुप्तये रघुनन्दन ।
'नरश्रेष्ठ श्रीराम ! तात रघुनंदन ! बला आणि अतिबलाचा अभ्यास केल्यानंतर तुला भूक तहान यांचेही कष्ट होणार नाहीत. म्हणून रघुकुलाला आनंदित करणार्‍या रामा ! तू संपूर्ण जगाचे रक्षण करण्यासाठी या दोन्ही विद्यांना ग्रहण कर. ॥ १८ १/२ ॥
विद्याद्वयमधीयाने यशश्चाथ भवेद् भुवि ।
पितामहसुते ह्येते विद्ये तेजःसमन्विते ॥ १९ ॥
या दोन्ही विद्यांचे अध्ययन केल्यावर या भूतलावर तुझ्या यशाचा विस्तार होईल. या दोन्ही विद्या ब्रह्मदेवांच्या तेजस्विनी कन्या आहेत. ॥ १९ ॥
प्रदातुं तव काकुत्स्थ सदृशस्त्वं हि पर्थिव ।
कामं बहुगुणाः सर्वे त्वय्येते नात्र संशयः ॥ २० ॥

तपसा सम्भृते चैते बहुरूपे भविष्यतः ।
'काकुत्स्थनंदन ! मी या दोन्ही तुला देण्याचा विचार केला आहे. राजकुमार ! तूच यांना योग्य पात्र आहेस. यद्यपि तुझ्या ठिकाणी या विद्या प्राप्त करण्यायोग्य बरेचसे गुण आहेत अथवा सर्व उत्तम गुण विद्यमान आहेत यात संशय नाही; तथापि मी तपोबलाने यांचे अर्जन केले आहे. म्हणून माझ्या तपस्येने परिपूर्ण होऊन या तुझ्यासाठी बहुरूपिणी होतील, अनेक प्रकारची फले प्रदान करतील." ॥ २० १/२ ॥
ततो रामो जलं स्पृष्ट्‍वा प्रहृष्टवदनः शुचिः ॥ २१ ॥

प्रतिजग्राह ते विद्ये महर्षेर्भावितात्मनः ।
तेव्हां श्रीराम आचमन करून पवित्र झाले. त्यांचे मुख प्रसन्नतेने खुलले. त्यांनी त्या शुद्ध अंतःकरणाच्या महर्षिंकडून त्या दोन्ही विद्या ग्रहण केल्या. ॥ २१ १/२ ॥
विद्यासमुदितो रामः शुशुभे भीमविक्रमः ॥ २२ ॥

सहस्ररश्मिर्भगवाञ्शरदीव दिवाकरः ।
विद्यांनी संपन्न होऊन भयंकर पराक्रमी श्रीराम हजारो किरणांनी युक्त शरत्कालीन सूर्याप्रमाणे शोभू लागले. ॥ २२ १/२ ॥
गुरुकार्याणि सर्वाणि नियुज्य कुशिकात्मजे ॥ २३ ॥
ऊषुस्तां रजनीं तत्र सरय्वां सुसुखः त्रयः ।
तत्पश्चात् श्रीरामांनी विश्वामित्रांची सर्व गुरुजनोचित सेवा करून हर्षाचा अनुभव घेतला. नंतर ते तिघेही तेथे शरयूच्या तटावर रात्री सुखपूर्वक राहिले. ॥ २३ ॥
दशरथनृपसूनुसत्तमाभ्यां
     तृणशयनेऽनुचिते तदोषिताभ्याम् ।

कुशिकसुतवचोऽनुलालिताभ्यां
     सुखमिव सा विबभौ विभावरी च ॥ २४ ॥
राजा दशरथांचे दोन्ही श्रेष्ठ राजकुमार त्यावेळी तृणाच्या शय्येवर, जरी ती त्यांच्या योग्य नव्हती, झोपले. महर्षि विश्वामित्र आपल्या वाणीद्वारा त्या दोघांच्या प्रति लाड-प्रेम प्रकट करीत होते. त्यामुळे त्यांना ती रात्र अत्यंत सुखमयशी प्रतीत झाली. ॥ २४ ॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् बालकाण्डे द्वाविंशः सर्गः ॥ २२ ॥
या प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील बालकाण्डाचा बाविसावा सर्ग समाप्त झाला. ॥ २२ ॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP