श्रीमद् वाल्मीकि रामायणे
किष्किंधाकाण्डे
॥ एकत्रिशः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
सुग्रीवस्य प्रति लक्ष्मणस्य कोपः, श्रीरामेण तस्य सांत्वनं, किष्किंधाद्वारं उपेत्य लक्ष्मणेन सुग्रीवपार्श्वे अंगदस्य प्रेषणं, वानराणां भयं प्लक्षप्रभावाभ्यां सुग्रीवाय कर्तव्यस्योपदेशश्च - सुग्रीवावर लक्ष्मणाचा रोष, श्रीरामांनी त्यास समजाविणे, लक्ष्मणांनी किष्किंधेच्या द्वारावर जाऊन अंगदास सुग्रीवाजवळ धाडणे, वानरांचे भय तसेच प्लक्ष आणि प्रभाव यांनी सुग्रीवास कर्तव्याचा उपदेश देणे -
स कामिनं दीनमदीनसत्त्वं
शोकाभिपन्नं समुदीर्णकोपम् ।
नरेंद्रसूनुर्नरदेवपुत्रं
रामानुजः पूर्वजमित्युवाच ॥ १ ॥
श्रीरामांचे लहान भाऊ नरेन्द्रकुमार लक्ष्मणाने त्या समयी सीतेच्या कामनेने युक्त, दुःखी, उदार हृदय, शोकग्रस्त तसेच ज्यांचा रोष वाढलेला होता त्या ज्येष्ठ भ्राता महाराजपुत्र श्रीरामांना याप्रकारे म्हटले- ॥१॥
न वानरः स्थास्यति साधुवृत्ते
न मन्यते कर्मफलानुषङ्‌गाधन् ।
न भोक्ष्यते वानरराज्यलक्ष्मीं
तथा हि नातिक्रमतेऽस्य बुद्धिः ॥ २ ॥
’आर्य ! सुग्रीव वानर आहे, तो श्रेष्ठ पुरुषांसाठी उचित सदाचारावर स्थिर राहू शकणार नाही. सुग्रीवाला याची जाण नाही की अग्निला साक्षी ठेवून श्रीरघुनाथाबरोबर मैत्री-स्थापना रूपी जे सत्कर्म केले गेले आहे, त्याच्या फलानेच मला निष्कण्टक राज्यभोग प्राप्त झाला आहे, म्हणून तो वानरांच्या राज्यलक्ष्मीचे पालन आणि उपभोग करू शकणार नाही, कारण की त्याची बुद्धि मित्रधर्माच्या पालनासाठी अधिक पुढे वाढत जात नाही आहे. ॥२॥
मतिक्षयाद्ग्रायम्यसुखेषु सक्तः
तव प्रसादाप्रतिकारबुद्धिः ।
हतोऽग्रजं पश्यतु वीरवालिनं
न राज्यमेवं विगुणस्य देयम् ॥ ३ ॥
’सुग्रीवाची बुद्धी मारली गेली आहे म्हणून तो विषयभोगात आसक्त झाला आहे. आपल्या कृपेने त्याला जो राज्यादि लाभ झाला आहे, त्या उपकाराची परतफेड करण्याची त्याला आठवण नाही असे दिसते. म्हणून आता तोही मारला जाऊन आपला थोरला बंधु वीरवर वालीचे दर्शन करील. अशा गुणहीन पुरुषाला राज्य देता कामा नये. ॥३॥
न धारये कोपमुदीर्णवेगं
निहन्मि सुग्रीवमसत्यमद्य ।
हरिप्रवीरैः सह वालिपुत्रो
नरेंद्रपुत्र्या विचयं करोतु ॥ ४ ॥
’माझ्या क्रोधाचा वेग वाढत आहे. मी त्याला आवरू शकत नाही. असत्यवादी सुग्रीवास आजच मारून टाकतो. आता वालीकुमार अंगदच राजा होऊन प्रधान वानर वीरांसह राजकुमारी सीतेचा शोध करतील.’ ॥४॥
तमात्तबाणासनमुत्पतंतं
निवेदितार्थं रणचण्डकोपम् ।
उवाच रामः परवीरहंता
स्वविक्षितं सानुनयं च वाक्यम् ॥ ५ ॥
असे म्हणून लक्ष्मण धनुष्य-बाण हातात घेऊन मोठ्या वेगाने निघाले. त्यांनी आपल्या जाण्याचे प्रयोजन स्पष्ट शब्दात निवेदन केले होते. युद्धासाठी त्यांचा प्रचंड कोप वाढलेला होता तसेच ते काय करण्यास निघाले होते यावरही त्यांनी चांगल्या प्रकारे विचार केला नव्हता. त्यासमयी विपक्षी वीरांचा संहार करणार्‍या श्रीरामांनी त्यांना शांत करण्यासाठी हे अनुनय युक्त वचन बोलले- ॥५॥
न हि वै त्वद्विधो लोके पापमेवं समाचरेत् ।
पापमार्येण यो हंति स वीरः पुरुषोत्तमः ॥ ६ ॥
’सुमित्रानंदन ! तुमच्या सारख्या श्रेष्ठ पुरुषाने संसारात असे मित्रवधरूप आचरण करता कामा नये. जो उत्तम विवेकाने आपला क्रोधावर ताबा ठेवतो, तोच वीर समस्त पुरुषात श्रेष्ठ आहे. ॥६॥
नेदमद्य त्वया ग्राह्यं साधुवृत्तेन लक्ष्मण ।
तां प्रीतिमनुवर्तस्व पूर्ववृत्तं च संगतम् ॥ ७ ॥
’लक्ष्मणा ! तुम्ही सदाचारी आहात. तुम्ही याप्रकारे सुग्रीवास मारण्याचा निश्चय करता कामा नये. त्याच्या विषयी जे तुमचे प्रेम होते त्याचेच अनुसरण करा आणि त्याच्या बरोबर प्रथम जी मित्रता केली गेली आहे तीच निभावून न्या. ॥७॥
सामोपहितया वाचा रूक्षाणि परिवर्जयन् ।
वक्तुमर्हसि सुग्रीवं व्यतीतं कालपर्यये ॥ ८ ॥
’तुम्ही सांत्वनापूर्ण वाणीद्वारा कटु वचनांचा परित्याग करीत सुग्रीवास इतकेच सांगितले पाहिजे की तुम्ही सीतेच्या शोधासाठी जो समय नियत केला होता, तो निघून गेला आहे, आणि तरीही स्वस्थ बसला आहांत. ॥८॥
सोऽग्रजेनानुशिष्टार्थो यथावत् पुरुषर्षभः ।
प्रविवेष पुरीं वीरो लक्ष्मणः परवीरहा ॥ ९ ॥
आपल्या मोठ्या भावाने याप्रकारे यथोचित रूपाने समजाविल्यावर शत्रुवीरांचा संहार करणारे पुरुषप्रवर वीर लक्ष्मण यांनी किष्किंधापुरीत प्रवेश करण्याचा विचार केला. ॥९॥
ततः शुभमतिः प्राज्ञो भ्रातुः प्रियहिते रतः ।
लक्ष्मणः प्रतिसंरब्धो जगाम भवनं कपेः ॥ १० ॥
भावाचे प्रिय आणि हितात तत्पर राहणार्‍या शुभबुद्धिने युक्त बुद्धिमान् लक्ष्मण राहाने संतप्त झालेलेच वानरराज सुग्रीवांच्या भवनाकडे जाण्यास निघाले. ॥१०॥
शक्रबाणासनप्रख्यं धनुः कालांतकोपमम् ।
प्रगृह्य गिरिशृङ्‌गाुभं मंदरः सानुमानिव ॥ ११ ॥
त्या समयी ते इंद्रधनुष्याप्रमाणे तेजस्वी, काळ आणि अंतकासमान भयंकर, तसेच पर्वत शिखरासमान विशाल धनुष्य हातात घेऊन शृंगासहित मंदराचला समान भासत होते. ॥११॥
यथोक्तकारी वचनं उत्तरं चैव सोत्तरम् ।
बृहस्पतिसमो बुद्ध्या मत्वा रामानुजस्तथा ॥ १२ ॥
श्रीरामांचे अनुज लक्ष्मण आपल्या मोठ्या भावाच्या आज्ञेचे यथोक्तरूपाने पालन करणारे तसेच बृहस्पतीप्रमाणे बुद्धिमान् होते. ते सुग्रीवाशी जे काही बोलणार होते, त्यावर सुग्रीव जे काही उत्तर देतील आणि त्या उत्तरावर ते जे काही उत्तर देणार होते त्यां सर्वांना उत्तम प्रकारे समजून घेऊनच ते तेथून निघाले होते. ॥१२॥
कामक्रोधसमुत्थेन भ्रातुः कोपाग्निना वृतः ।
प्रभञ्जन इवाप्रीतः प्रययौ लक्ष्मणस्ततः ॥ १३ ॥
सीतेच्या शोधाविषयी श्रीरामांची जी कामना होती आणि सुग्रीवाच्या बेफिकीरीमुळे त्यात जो अडथळा निर्माण झाला होता त्यामुळे त्यांना जो क्रोध आला होता, त्या दोन्ही कारणामुळे लक्ष्मणाचाही क्रोधाग्नि भडकला होता. त्या क्रोधाग्निने घेरलेले लक्ष्मण सुग्रीवावर प्रसन्न नव्हते. त्याच अवस्थेत ते वायुसमान वेगाने चालले होते. ॥१३॥
सालतालाश्वकर्णाश्च तरसा पातयन् बहून् ।
पर्यस्यन् गिरिकूटानि द्रुमानन्यांश्च वेगतः ॥ १४ ॥
त्यांचा वेग इतका वाढला होता की ते मार्गात येणार्‍या साल, ताल आणि अश्वकर्ण नामक वृक्षांना त्याच वेगाने बलपूर्वक पाडून टाकीत तसेच पर्वत शिखरे आणि अन्य वृक्षांना उचलून दूर फेकून देत चालले होते. ॥१४॥
शिलाश्च शकलीकुर्वन् पद्‌भ्यां गज इवाशुगः ।
दूरमेकपदं त्यक्त्वा ययौ कार्यवशाद् द्रुतम् ॥ १५ ॥
शीघ्रगामी हत्तीप्रमाणे आपल्या पायांच्या ठोकरीने शिळांचा चुरडा करीत लांब लांब पावले टाकीत ते कार्यवश अत्यंत वेगाने चालले होते. ॥१५॥
तामपश्यद् बलाकीर्णां हरि राजमहापुरीम् ।
दुर्गामिक्ष्वाकुशार्दूलः किष्किंधां गिरिसंकटे ॥ १६ ॥
इक्ष्वाकुकुलाचे सिंह लक्ष्मण यांनी जवळ जाऊन वानरराज सुग्रीवाची विशाल पुरी किष्किंधा, जी पर्वतांच्या मध्यभागी वसलेली होती, ती पाहिली. वानरसेनेने व्याप्त असल्यामुळे ती पुरी दुसर्‍यांसाठी दुर्गम होती. ॥१६॥
रोषात् प्रस्फुरमाणोष्ठः सुग्रीवं प्रति लक्ष्मणः ।
ददर्श वानरान् भीमान् किष्किंधाया बहिश्चरान् ॥ १७ ॥
त्या समयी लक्ष्मणांचे ओठ सुग्रीवासंबंधीच्या रागाने थरथरत होते. त्यांनी किष्किंधेजवळ बर्‍याचशा भयंकर वानरांना पाहिले जे नगराच्या बाहेर फिरत होते. ॥१७॥
तं दृष्ट्‍वा वानराः सर्वे लक्ष्मणं पुरुषर्षभम् ।
शैलशृङ्‌गा्णि शतशः प्रवृद्धांश्च महीरुहान् ।
जगृहुः कुञ्जरप्रख्या वानराः पर्वतांतरे ॥ १८ ॥
त्या वानरांची शरीरे हत्तींच्या प्रमाणे विशाल होती. त्या समस्त वानरांनी पुरुषप्रवर लक्ष्मणास पाहताच पर्वतावर विद्यमान असलेली शेकडो शैल शिखरे आणि मोठमोठे वृक्ष उचलून घेतले. ॥१८॥
तान् गृहीतप्रहरणान् हरीन् दृष्ट्‍वा तु लक्ष्मणः ।
बभूव द्विगुणं क्रुद्धो बह्विंधन इवानलः ॥ १९ ॥
त्या सर्वांनी हत्यारे उचलेली पाहून लक्ष्मण दुप्पट क्रोधाने जळू लागले जणु जळत्या आगीत बरीचशी वाळलेली लाकडे टाकली असावीत. ॥१९॥
तं ते भयपरिताङ्‌गाः क्रुद्धं दृष्ट्‍वा प्लवंगमाः ।
कालमृत्युयुगांताभं शतशो विद्रुता दिशः ॥ २० ॥
क्षुब्ध झालेले लक्ष्मण काल. मृत्यु तसेच प्रलयकालीन अग्निप्रमाणे भयंकर दिसू लागले. त्यांना पाहून त्या वानरांचे देह भयाने कापू लागले आणि ते शेकडोंच्या संख्येने चारी दिशास पळून गेले. ॥२०॥
ततः सुग्रीवभवनं प्रविश्य हरिपुंगवाः ।
क्रोधमागमनं चैव लक्ष्मणस्य न्यवेदयन् ॥ २१ ॥
त्यानंतर कित्येक श्रेष्ठ वानरांनी सुग्रीवाच्या महालात जाऊन लक्ष्मणाचे आगमन आणि क्रोधाचा समाचार निवेदन केला. ॥२१॥
तारया सहितः कामी सक्तः कपिवृषस्तदा ।
न तेषां कपिसिंहानां शुश्राव वचनं तदा ॥ २२ ॥
त्यासमयी कामाच्या अधीन झालेले वानरराज सुग्रीव भोगासक्त होऊन तारे बरोबर होते. म्हणून त्यांनी त्या श्रेष्ठ वारनांचे म्हणणे ऐकलेच नाही. ॥२२॥
ततः सचिवसंदिष्टा हरयो रोमहर्षणाः ।
गिरिकुञ्जरमेघाभा नगरान् निर्ययुस्तदा ॥ २३ ॥
तेव्हा सचिवांच्या आज्ञेने पर्वत, हत्ती आणि मेघासारखे विशालकाय आणि अंगावर काटा आणतील असे वानर नगरातून बाहेर पडले. ॥२३॥
नखदंष्ट्रायुधाः सर्वे वीरा विकृतदर्शनाः ।
सर्वे शार्दूलदंष्ट्राश्च सर्वे विरुतदर्शनाः ॥ २४ ॥
ते सर्वच्या सर्व वीर होते. नखे आणि दांत हीच त्यांची आयुधे होती. ते फार विकराळ दिसत होते. त्या सर्वांच्या दाढा वाघांच्या दाढांप्रमाणे होत्या आणि सर्वांचे नेत्र खुले होते. (अथवा त्या सर्वांचे तेथे स्पष्ट दर्शन होत होते- कुणीही लपलेले नव्हते.) ॥२४॥
दशनागबलाः केचित् केचिद् दशगुणोत्तराः ।
केचिन्नागसहस्रस्य बभूवुस्तुल्यवर्चसः ॥ २५ ॥
कुणाच्या ठिकाणी दहा हत्तींचे बळ होते तर कुणी शंभर हत्तीप्रमाणे बलवान् होते, तसेच काही जणांचे तेज (बळ आणि पराक्रम) एक हजार हत्तींच्या तुल्य होते. ॥२५॥
ततस्तैः कपिभिर्व्याप्तां द्रुमहस्तैर्महाबलैः ।
अपश्यल्लक्ष्मणः क्रुद्धः किष्कंधां तां दुरासदाम् ॥ २६ ॥
हातांत वृक्ष घेऊन महाबली वानरांनी व्याप्त झालेली किष्किंधापुरी अत्यंत दुर्जय दिसून येत होती. लक्ष्मणांनी कुपित होऊन त्या पुरीकडे पाहिले. ॥२६॥
ततस्ते हरयः सर्वे प्राकारपरिखांतरात् ।
निष्क्रम्योदग्रसत्त्वास्तु तस्थुराविष्कृतं तदा ॥ २७ ॥
त्यानंतर ते सर्व महाबली वानर पुरीच्या तटबंदी आणि खंदकांतून निघून प्रकटरूपाने समोर येऊन उभे राहिले. ॥२७॥
सुग्रीवस्य प्रमादं च पूर्वजस्यार्थमात्मवान् ।
दृष्ट्‍वा कोपवशं वीरः पुनरेव जगाम सः ॥ २८ ॥
आत्मसंयमी वीर लक्ष्मण सुग्रीवाचा प्रमाद आणि आपल्या मोठ्या भावाच्या महत्वपूर्ण कार्यावर दृष्टिपात करून पुन्हा वानरराजाप्रति क्रोधाच्या वशीभूत झाले. ॥२८॥
स दीर्घोष्णमहोच्छ्वासः कोपसंरक्तलोचनः ।
बभूव नरशार्दूलः सधूम इव पावकः ॥ २९ ॥
ते अधिक उष्ण आणि दीर्घ श्वास घेऊ लागले. त्यांचे नेत्र क्रोधाने लाल झाले. त्यासमयी पुरुषसिंह लक्ष्मण धूमयुक्त अग्नीप्रमाणे प्रतीत होऊ लागले. ॥२९॥
बाणशल्यस्फुरज्जिह्वः सायकासनभोगवान् ।
स्वतेजोविषसंभूतः पञ्चास्य इव पन्नगः ॥ ३० ॥
इतकेच नव्हे तर ते पंचमुखी सर्पाप्रमाणे दिसू लागले. बाणाचे फल हेच त्या सर्पाची लवलवणारी जिव्हा भासत होती. धनुष्य हेच त्याचे विशाल शरीर होते, तसेच ते सर्वरूपी लक्ष्मण आपल्या तेजोमय विषाने व्याप्त झाले होते. ॥३०॥
तं दीप्तमिव कालाग्निं नागेंद्रमिव कोपितम् ।
समासाद्याङ्‌गददस्त्रासाद् विषादमगमत् परम् ॥ ३१ ॥
त्या प्रसंगी कुमार अंगद प्रज्वलित प्रलयाग्नी प्रमाणे तसेच क्रोधाविष्ट झालेल्या नागराज शेषाप्रमाणे दृष्टिगोचर होणार्‍या लक्ष्मणांजवळ भीतभीत गेले. ते अत्यंत विषादात पडले होते. ॥३१॥
सोऽङ्‌दंय रोषताम्राक्षः संदिदेश महायशाः ।
सुग्रीवः कथ्यतां वत्स ममागमनमित्युत ॥ ३२ ॥

एष रामानुजः प्राप्तः त्वत्सकाशमरिंदमः ।
भ्रातुर्व्यसनसंतप्तो द्वारि तिष्ठति लक्ष्मणः ॥ ३३ ॥

तस्य वाक्ये यदि रुचिः क्रियतां साधु वानर ।
इत्युक्त्वा शीघ्रमागच्छ वत्स वाक्यमरिंदम ॥ ३४ ॥
महायशस्वी लक्ष्मणाने क्रोधाने लाल डोळे करून अंगदाला आदेश दिला- ’मुला ! सुग्रीवांना माझ्या येण्याची सूचना दे. त्यांना सांग- ’शत्रुदमन वीरा ! रामांचे धाकटे बंधु लक्ष्मण आपल्या भ्रात्याच्या दुःखाने दुःखी होऊन आपल्या जवळ आले आहेत आणि नगर द्वारावर उभे आहेत. वानरराज जर आपली इच्छा असेल तर त्यांच्या आज्ञेचे उत्तम तर्हेने पालन करावे. शत्रुदमन वत्स अंगद ! बस, एवढेच सांगून तू शीघ्र माझ्याकडे परत ये.’ ॥३२-३४॥
लक्ष्मणस्य वचः श्रुत्वा शोकाविष्टोऽङ्‌गमदोऽब्रवीत् ।
पितुः समीपमागम्य सौमित्रिरयमागतः ॥ ३५ ॥
लक्ष्मणांचे म्हणणे ऐकून शोकाकुल अंगदाने महाराज सुग्रीवाजवळ जाऊन म्हटले- ’तात ! हे सौमित्र लक्ष्मण येथे आलेले आहेत.’ ॥३५॥
अथाङ्‌गणदस्तस्य सुतीव्रवाचा
संभ्रांतभावः परिदीनवक्त्रः ।
निपत्य तूर्णं नृपतेस्तरस्वी
ततो रुमायाश्चरणौ ववंदे ॥ ३६ ॥
(आता हीच गोष्ट काहीशी विस्ताराने सांगत आहेत -) लक्ष्मणांच्या कठोर वाणीमुळे अंगद मनात घाबरून गेले, त्यांच्या मुखावर अत्यंत दीनता पसरली. त्या वेगवान् कुमारांनी तेथून निघून प्रथम वानरराज सुग्रीवांच्या नंतर तारेच्या तसेच रूमाच्या चरणांना प्रणाम केला. ॥३६॥
संगृह्य पादौ पितुरग्र्यतेजा
जग्राह मातुः पुनरेव पादौ ।
पादौ रुमायाश्च निपीडयित्वा
निवेदयामास ततस्तमर्थम् ॥ ३७ ॥
उग्र तेज असणार्‍या अंगदांनी प्रथम तर पित्याचे दोन्ही पाय धरले नंतर आपली माता तारा हिच्या दोन्ही चरणांना स्पर्श केला. त्यानंतर रूमाचे दोन्ही पाय चेपले. यानंतर पूर्वोक्त गोष्ट सांगितली. ॥३७॥
स निद्राक्रांतसंवीतो वानरो न विबुद्धवान् ।
बभूव मदमत्तश्च मदनेन च मोहितः ॥ ३८ ॥
परंतु सुग्रीव मदमत्त तसेच कामाने मोहित होऊन पडलेले होते. निद्रेने त्यांच्यावर पुरता अधिकार गाजविलेला होता. त्यामुळे ते जागे होऊ शकले नाहीत. ॥३८॥
ततः किलकिलां चक्रुः लक्ष्मणं प्रेक्ष्य वानराः ।
प्रसादयंतस्तं क्रुद्धं भयमोहितचेतसः ॥ ३९ ॥
इतक्यांत बाहेर, क्रोधाविष्ट झालेल्या लक्ष्मणांना पाहून भयाने मोहितचित्त झालेले वानर त्यांना प्रसन्न करण्यासाठी दीनतासूचक वाणीने किलकिलाट करू लागले. ॥३९॥
ते महौघनिभं दृष्ट्‍वा वज्राशनिसमस्वनम् ।
सिंहनादं समं चक्रुः लक्ष्मणस्य समीपतः ॥ ४० ॥
लक्ष्मणांवर दृष्टि पडताच त्या वानरांनी सुग्रीवाच्या निकटवर्ती स्थानामध्ये एकाच वेळी महान् जलप्रवाह तसेच वज्राच्या गडगडाटाप्रमाणे जोरजोराने सिंहनाद केला. (ज्यामुळे सुग्रीवांना जाग आली.) ॥४०॥
तेन शब्देन महता प्रत्यबुध्यत वानरः ।
मदविह्वलताम्राक्षो व्याकुलः स्रग्विभूषणः ॥ ४१ ॥
वानरांच्या त्या भयंकर गर्जनेने कपिराज सुग्रीवांची झोप उडाली. त्यसमयी त्यांचे नेत्र मदाने चंचल आणि लाल झालेले होते. मनही स्वस्थ नव्हते. त्यांच्या गळ्यात सुंदर पुष्पमाला शोभत होती. ॥४१॥
अथाङ्‌गवदवचः श्रुत्वा तेनैव च समागतौ ।
मंत्रिणौ वानरेंद्रस्य सम्मतौ दारदर्शिनौ ॥ ४२ ॥

प्लक्षश्चैव प्रभावश्च मंत्रिणावर्थधर्मयोः ।
वक्तुमुञ्चावचं प्राप्तं लक्ष्मणं तौ शशंसतुः ॥ ४३ ॥
अंगदांचे पूर्वोक्त बोलणे ऐकून त्यांच्याच बरोबर आलेले दोन मंत्री प्लक्ष आणि प्रभाव जे वानरराजाचे सन्मानयोग्य होते आणि उदार दृष्टि असणारे होते; तसेच राजाला अर्थ आणि धर्माच्या विषयी चांगले-वाईट समजाविण्यासाठी नियुक्त केलेले होते, त्यांनीही लक्ष्मणांच्या आगमनाची सूचना दिली. ॥४२-४३॥
प्रसादयित्वा सुग्रीवं वचनैः सार्थनिश्चितैः ।
आसीनं पर्युपासीनौ यथा शक्रं मरुत्पतिम् ॥ ४४ ॥

सत्यसंधौ महाभागौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ ।
मनुष्यभावं संप्राप्तौ राज्यार्हौ राज्यदायिनौ ॥ ४५ ॥
राजाच्या निकट उभे असलेल्या त्या दोन्ही मंत्र्यांनी देवराज इंद्राप्रमाणे बसलेल्या सुग्रीवाला खूप विचारपूर्वक निश्चित केलेल्या सार्थक वचनांच्या द्वारा प्रसन्न केले आणि याप्रकारे म्हटले- ’राजन ! महाभाग रामलक्ष्मण हे दोघेही भाऊ सत्यप्रतिज्ञ आहेत. (ते वास्तविक भगवत्स्वरूप आहेत.) त्यांनी स्वेच्छेने मनुष्य-शरीर धारण केले आहे. ते दोघेही समस्त त्रैलोक्याचे राज्य चालविण्यास योग्य आहेत. तेच आपले राज्यदाता आहेत. ॥४४-४५॥
तयोरेको धनुष्पाणिर्द्वारि तिष्ठति लक्ष्मणः ।
यस्य भीताः प्रवेपंतो नादान् मुञ्चंति वानराः ॥ ४६ ॥
त्यांच्यापैकी एक वीर लक्ष्मण हातात धनुष्य घेऊन किष्किंधेच्या दरवाजावर उभे आहेत; ज्यांच्या भयाने थरकांप झालेले वानर जोरजोराने ओरडत आहेत. ॥४६॥
स एष राघवभ्राता लक्ष्मणो वाक्यसारथिः ।
व्यवसायरथः प्राप्तः तस्य रामस्य शासनात् ॥ ४७ ॥
’राघवांचे आदेश वाक्यच ज्यांचे सारथि आणि कर्तव्याचा निश्चय हाच ज्यांचा रथ आहे ते लक्ष्मण रामांच्या आज्ञेने येथे आलेले आहेत. ॥४७॥
अयं च दयितो राजन् ताराया दयितोऽङ्‌गतदः ।
लक्ष्मणेन सकाशं ते प्रेषितस्त्वरयानघ ॥ ४८ ॥
’राजन ! निष्पाप वानरराज ! लक्ष्मणांनी तारादेवींच्या या प्रिय पुत्र अंगदाला मोठ्या उतावळीने आपल्या निकट धाडले आहे. ॥४८॥
सोऽयं रोषपरीताक्षो द्वारि तिष्ठति वीर्यवान् ।
वानरान् वानरपते चक्षुषा निर्दहन्निव ॥ ४९ ॥
’वानरपते ! पराक्रमी लक्ष्मण क्रोधाने डोळे लाल करुन नगरद्वारावर उपस्थित आहेत आणि वानरांकडे जणु आपल्या नेत्राग्निने त्यांना दग्ध करतील की काय अशा प्रकारे पहात आहेत. ॥४९॥
तस्य मूर्ध्ना प्रणामं त्वं सपुत्रः सहबांधवः ।
गच्छ शीघ्रं महाराज रोषो ह्यद्योपशाम्यताम् ॥ ५० ॥
’महाराज ! आपण शीघ्र चलावे आणि पुत्र तसेच बंधुबांधवांसह त्यांच्या चरणी मस्तक नमवावे आणि याप्रकारे आज त्यांचा रोष शांत करावा. ॥५०॥
यथा हि रामो धर्मात्मा तत्कुरुष्व समाहितः ।
राजंस्तिष्ठ स्वसमये भव सत्यप्रतिश्रवः ॥ ५१ ॥
’राजन ! धर्मात्मा राम जसे सांगत आहेत, त्याचे सावधपणे पालन करावे. आपण आपल्या दिलेल्या वचनावर अटल राहावे आणि सत्यप्रतिज्ञ बनावे. ॥५१॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये किष्किंधाकाण्डे एकत्रिंशः सर्गः ॥ ३१ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील किष्किंधाकाण्डाचा एकतिसावा सर्ग पूरा झाला. ॥३१॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP