यज्ञरक्षणाय रामं मे देहीति विश्वामित्रवचः श्रुत्वा दशरथस्य दुःखं मोहश्च -
|
विश्वामित्रांच्या मुखाने श्रीरामास बरोबर घेऊन जाण्याची मागणी ऐकून राजा दशरथांचे दुःखीत एवं मूर्च्छित होणे -
|
तच्छ्रुत्वा राजसिंहस्य वाक्यमद्भुतविस्तरम् ।
हृष्टरोमा महातेजा विश्वामित्रोऽभ्यभाषत ॥ १ ॥
|
नृपश्रेष्ठ महाराज दशरथांचे हे अद्भुत विस्ताराने युक्त वचन ऐकून महातेजस्वी विश्वामित्र पुलकित झाले आणि म्हणाले - ॥ १ ॥
|
सदृशं राजशार्दूल तवैवं भुवि नान्यतः ।
महावंशप्रसूतस्य वसिष्ठव्यपदेशिनः ॥ २ ॥
|
"राजसिंह ! हे बोलणे आपल्या योग्यच आहे. या पृथ्वीवर दुसर्या कुणाच्या मुखातून असे उदार वचन निघण्याची सम्भावना नाही. का असणार नाही, आपण महान् कुळात उत्पन्न झाला आहात आणि वसिष्ठांसारखे ब्रह्मर्षि आपल्याला उपदेश करतात. ॥ २ ॥
|
यत्तु मे हृद्गतं वाक्यं तस्य कार्यस्य निश्चयम् ।
कुरुष्व राजशार्दूल भव सत्यप्रतिश्रवः ॥ ३ ॥
|
'ठीक आहे. आता जी गोष्ट माझ्या हृदयात आहे ती ऐका. नृपश्रेष्ठ ! ऐकून ते कार्य अवश्य पूर्ण करायचा निश्चय करा. आपण माझे कार्य सिद्ध करण्याची प्रतिज्ञा केली आहे. या प्रतिज्ञेला सत्य करून दाखवा. ॥ ३ ॥
|
अहं नियममातिष्ठे सिद्ध्यर्थं पुरुषर्षभ ।
तस्य विघ्नकरौ द्वौ तु राक्षसौ कामरूपिणौ ॥ ४ ॥
|
'पुरुष श्रेष्ठ ! मी सिद्धिसाठी एका नियमाचे अनुष्ठान करीत आहे. त्यात इच्छेनुसार रूप धारण करणारे दोन राक्षस विघ्न आणीत आहेत. ॥ ४ ॥
|
व्रते मे बहुशश्चीर्णे समाप्त्यां राक्षसाविमौ ।
मारीचश्च सुबाहुश्च वीर्यवन्तौ सुशिक्षितौ ॥ ५ ॥
|
'माझ्या या नियमाचे अधिकांश कार्य साध्य झाले आहे. आता त्याच्या समाप्तीच्या वेळी ते दोन राक्षस येऊन धडकले आहेत. त्यांची नावे मारीच आणि सुबाहु. ते दोघेही बलवान् आणि सुशिक्षित आहेत. ॥ ५ ॥
|
तौ मांसरुधिरौघेण वेदिं तामभ्यवर्षताम् ।
अवधूते तथाभूते तस्मिन् नियमनिश्चये ॥ ६ ॥
कृतश्रमो निरुत्साहस्तस्माद् देशादपाक्रमे ।
|
'त्यांनी माझ्या यज्ञवेदीवर रक्त आणि मांसाचा वर्षाव सुरू केला आहे. या प्रकारे त्या समाप्त होत आलेल्या नियमात विघ्न उत्पन्न झाल्याने माझे परिश्रम वाया गेले आहेत आणि मी उत्साह रहित होऊन त्या स्थानापासून निघून आलो आहे. ॥ ६ १/२ ॥
|
न च मे क्रोधमुत्स्रष्टुं बुद्धिर्भवति पार्थिव ॥ ७ ॥
|
'पृथ्वीनाथ ! त्याच्यावर आपल्या क्रोधाचा प्रयोग करावा, त्यांना शाप द्यावा असा विचार माझ्या मनांत येत नाही. ॥ ७ ॥
|
तथाभूता हि सा चर्या न शापस्तत्र मुच्यते ।
स्वपुत्रं राजशार्दूल रामं सत्यपराक्रमम् ॥ ८ ॥
काकपक्षधरं वीरं ज्येष्ठं मे दातुमर्हसि ।
|
'कारण तो नियमच असा आहे की ज्याचा प्रारंभ केल्यावर कुणाला शाप देता येत नाही. म्हणून हे नृपश्रेष्ठ ! आपण आपला काकपक्षधर सत्यपराक्रमी, शूरवीर ज्येष्ठ पुत्र श्रीराम मला द्या. ॥ ८ १/२ ॥
|
शक्तो ह्येष मया गुप्तो दिव्येन स्वेन तेजसा ॥ ९ ॥
राक्षसा ये विकर्तारस्तेषामपि विनाशने ।
श्रेयश्चास्मै प्रदास्यामि बहुरूपं न संशयः ॥ १० ॥
|
'ते माझ्याकडून सुरक्षित राहून आपल्या दिव्य तेजाने त्या विघ्नकारी राक्षसांचा नाश करण्यास समर्थ आहेत. मी त्यांना अनेक प्रकारचे श्रेय प्रदान करीन, यात संशय नाही. ॥ ९-१० ॥
|
त्रयाणामपि लोकानां येन ख्यातिं गमिष्यति ।
न च तौ राममासाद्य शक्तौ स्थातुं कथञ्चन ॥ ११ ॥
|
'त्या श्रेयाची प्राप्ती करून ते तिन्ही लोकात विख्यात होतील. श्रीरामासमोर आल्यावर ते दोन्ही राक्षस कोणत्याही प्रकारे टिकू शकणार नाहीत. ॥ ११ ॥
|
न च तौ राघवादन्यो हन्तुमुत्सहते पुमान् ।
वीर्योत्सिक्तौ हि तौ पापौ कालपाशवशं गतौ ॥ १२ ॥
रामस्य राजशार्दूल न पर्याप्तौ महात्मनः ।
|
'या रघुनंदनाशिवाय दुसरा कोणीही पुरुष या राक्षसांना मारण्याचे साहस करू शकत नाही. नृपश्रेष्ठ ! आपल्या बळाचा गर्व करणारे ते दोन्ही पापी निशाचर कालपाशाच्या अधीन झालेले आहेत, म्हणून महात्मा श्रीरामाच्या समोर टिकू शकणार नाहीत. ॥ १२ १/२ ॥
|
न च पुत्रगतं स्नेहं कर्तुमर्हसि पार्थिव ॥ १३ ॥
अहं ते प्रतिजानामि हतौ तौ विद्धि राक्षसौ ।
|
'भूपाल ! आपण पुत्रविषयक स्नेहाला समोर आणू नका. मी आपल्याला प्रतिज्ञापूर्वक सांगतो आहे की त्या दोन्ही राक्षसांना श्रीरामांच्या द्वारे मारले गेलेलेच समजा. ॥ १३ १/२ ॥
|
अहं वेद्मि महात्मानं रामं सत्यपराक्रमम् ॥ १४ ॥
वसिष्ठोऽपि महातेजा ये चेमे तपसि स्थिताः ।
|
'सत्यपराक्रमी महात्मा श्रीराम कोण आहेत हे मी जाणतो. महातेजस्वी वसिष्ठ तसेच हे अन्य तपस्वी देखील जाणतात. ॥ १४ १\२ ॥
|
यदि ते धर्मलाभं च यशश्च परमं भुवि ॥ १५ ॥
स्थिरमिच्छसि राजेन्द्र रामं मे दातुमर्हसि ।
|
राजेन्द्र ! जर आपण या भूमण्डलावर धर्म लाभ आणि उत्तम यशास स्थिर राखण्याची इच्छा करत असाल तर श्रीरामास मला देऊन टाका. ॥ १५ १/२ ॥
|
यद्यभ्यनुज्ञां काकुत्स्थ ददते तव मंत्रिणः ॥ १६ ॥
वसिष्ठप्रमुखाः सर्वे ततो रामं विसर्जय ।
|
'काकुत्स्थनंदन, जर वसिष्ठ आदि आपले मंत्री आपल्याला अनुमति देत असतील तर आपण श्रीरामास माझ्याबरोबरच पाठवा. ॥ १६ १/२ ॥
|
अभिप्रेतमसंसक्तमात्मजं दातुमर्हसि ॥ १७ ॥
दशरात्रं हि यज्ञस्य रामं राजीवलोचनम् ।
|
मी श्रीरामाला घेऊन जाणेच अभीष्ट आहे. तेही आता मोठे झाले असल्याने आसक्तिरहित झाले आहेत. म्हणून आपण यज्ञाच्या अवशिष्ट दहा दिवसांसाठी आपले पुत्र कमलनयन श्रीराम यांना मला देऊन टाका. ॥ १७ १/२ ॥
|
नात्येति कालो यज्ञस्य यथायं मम राघव ॥ १८ ॥
तथा कुरुष्व भद्रं ते मा च शोके मनः कृथाः ।
|
रघुनंदन ! ज्यायोगे माझा यज्ञाचा समय व्यर्थ व्यतीत होणार नाही असे आपण करा. आपले कल्याण असो. आपापल्या मनाला शोक आणि चिंतेच्या स्वाधीन करू नका. ॥ १८ १/२ ॥
|
इत्येवमुक्त्वा धर्मात्मा धर्मार्थसहितं वचः ॥ १९ ॥
विरराम महातेजा विश्वामित्रो महामतिः ।
|
असे धर्म आणि अर्थानी युक्त वचन बोलून धर्मात्मा महातेजस्वी, परमबुद्धिमान विश्वामित्र गप्प झाले. ॥ १९ १/२ ॥
|
स तन्निशम्य राजेन्द्रो विश्वामित्रवचः शुभम् ॥ २० ॥
शोकेन महताविष्टश्चचाल च मुमोह च ।
|
विश्वामित्रांचे हे शुभवचन ऐकून महाराज दशरथ पुत्र वियोगाच्या आशंकेने अत्यंत दुःखी झाले. त्या विचाराने पीडित होऊन एकाएकी कापू लागले आणि मूर्च्छित होऊन पडले. ॥ २० १/२ ॥
|
लब्धसंज्ञस्तदोत्थाय व्यषीदत भयान्वितः ॥ २१ ॥
इति हृदयमनोविदारणं
मुनिवचनं तदतीव शुश्रुवान् ।
नरपतिरभवन्महान् महात्मा
व्यथितमनाः प्रचचाल चासनात् ॥ २२ ॥
|
थोड्या वेळाने जेव्हां ते सावध झाले तेव्हां भयभीत होऊन ते विवाद करू लागले. विश्वामित्र मुनिंचे वचन राजाचे मन आणि हृदय विदीर्ण करणारे होते. ते ऐकून त्यांचे मन फार व्यथित झाले. ते महामनस्वी महाराज आपल्या आसनापासून विचलित होऊन मूर्च्छित झाले. ॥ २१-२२ ॥
|
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् बालकाण्डे एकोनविंशः सर्गः ॥ १९ ॥
|
या प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील बालकाण्डाचा एकोणिसावा सर्ग समाप्त झाला. ॥ १९ ॥
|