राज्ञा स्वकृतेन मुनिकुमारवधेन तदीयपित्रोर्विलापस्य तत्प्रदत्तशापस्य च प्रसंगं श्रावयित्वा कौसल्यायाः पार्श्वे रोदं रोदं निशीथे स्वप्राणानां परित्यागः -
|
राजा दशरथांनी आपल्या द्वारे मुनिकुमाराच्या वधाने दुःखी झालेल्या त्यांच्या मातापित्याचा विलाप आणि त्यांनी दिलेल्या शापाचा प्रसंग ऐकवून कौसल्येच्या समीप रडत, शोक करीत अर्ध्या रात्रीच्या समयी आपल्या प्राणांचा त्याग करणे -
|
वधमप्रतिरूपं तु महर्षेस्तस्य राघवः ।
विलपन्नेव धर्मात्मा कौसल्यामिदमब्रवीत् ॥ १ ॥
|
त्या महर्षिंच्या अनुचित वधाचे स्मरण करून धर्मात्मा रघुकुल नरेशांनी आपल्या पुत्रासाठी विलाप करीत राणी कौसल्येला या प्रकारे म्हटले- ॥१॥
|
तदज्ञानान्महत्पापं कृत्वा सङ्कुलितेन्द्रियः ।
एकस्त्वचिन्तयं बुद्ध्या कथं नु सुकृतं भवेत् ॥ २ ॥
|
’देवी ! अजाणता हे महान कर्म केले गेल्याने माझी सर्व इंद्रिये व्याकुळ होत होती. मी एकदा बुद्धिपूर्वक विचार करू लागलो की आता कोठल्या उपायाने माझे कल्याण होईल ? ॥२॥
|
ततस्तं घटमादाय पूर्णं परमवारिणा ।
आश्रमं तमहं प्राप्य यथाख्यातपथं गतः ॥ ३ ॥
|
’त्यानंतर तो घडा उचलून मी शरयूच्या जलाने भरला आणि तो घेऊन मुनिकुमारांनी सांगितलेल्या मार्गाने त्यांच्या आश्रमात गेलो. ॥३॥
|
तत्राहं दुर्बलावन्धौ वृद्धावपरिणायकौ ।
अपश्यं तस्य पितरौ लूनपक्षाविव द्विजौ ॥ ४ ॥
|
’तेथे पोहोचल्यावर मी त्यांच्या दुर्बळ, अंध आणि वृद्ध मातापित्यांना पाहिले, ज्यांचा दुसरा कोणी सहाय्यक नव्हता. त्यांची अवस्था पंख कापले गेलेल्या दोन पक्ष्यांसारखी झाली होती. ॥४॥
|
तन्निमित्ताभिरासीनौ कथाभिरपरिक्रमौ ।
तामाशां मत्कृते हीनावुपासीनावनाथवत् ॥ ५ ॥
|
’ती दोघे आपल्या पुत्राचीच चर्चा करीत त्याच्या येण्याची आशा धरून बसलेली होती. त्या चर्चेमुळे त्यांना परिश्रम अथवा थकवा यांचा अनुभव येत नव्हता जरी माझ्यामुळेच त्यांची ती आशा धुळीत मिसळली गेली होती. तरीही ती दोघे त्या आशेच्या आधारावर बसून राहिलेली होती. आता मात्र ती दोघे सर्वथा अनाथासारखीच होऊन गेली होती. ॥५॥
|
शोकोपहतचित्तश्च भयसंत्रस्तचेतनः ।
तच्चाश्रमपदं गत्वा भूयः शोकमहं गतः ॥ ६ ॥
|
’माझे हृदय प्रथम पासूनच शोकामुळे घाबरलेले होते. भयाने माझे मन ठिकाणावर नव्हते. मुनिंच्या आश्रमावर पोहोचल्यावर माझा तो शोक अधिकच वाढला. ॥६॥
|
पदशब्दं तु मे श्रुत्वा मुनिर्वाक्यमभाषत ।
किं चिरायसि मे पुत्र पानीयं क्षिप्रमानय ॥ ७ ॥
|
’माझ्या पायांची चाहूल ऐकून ते मुनि या प्रकारे म्हणाले- मुला ! उशीर का लावीत आहेस ? लवकर पाणी आण. ॥७॥
|
यन्निमित्तमिदं तात सलिले क्रीडितं त्वया ।
उत्कण्ठिता ते मातेयं प्रविश क्षिप्रमाश्रमम् ॥ ८ ॥
|
’तात ! ज्या कारणांमुळे तू बराच वेळपर्यंत जलात क्रीडा केलीस त्याच कारणामुळे तुझी ही माता तुझ्यासाठी उत्कंठित झाली आहे. म्हणून त्वरितच आश्रमात प्रवेश कर. ॥८॥
|
यद् व्यलीकं कृतं पुत्र मात्रा ते यदि वा मया ।
न तन्मनसि कर्तव्यं त्वया तात तपस्विना ॥ ९ ॥
|
’मुला ! तात ! जर तुझ्या आईने अथवा मी तुझे काही अप्रिय केले असेल तर ते तू आपल्या मनात आणता कामा नये, कारण तू तपस्वी आहेस. ॥९॥
|
त्वं गतिस्त्वगतीनां च चक्षुस्त्वं हीनचक्षुषाम् ।
समासक्तास्त्वयि प्राणाः कथं त्वं नाभिभाषसे ॥ १० ॥
|
’आम्ही असहाय आहोत, तूच आमचा सहायक आहेस. आम्ही आंधळे आहोत, तूच आमचे नेत्र आहेस. आमचे प्राण तुझ्यातच अडकलेले आहेत. सांग, बरे तू बोलत का नाहीस ? ॥१०॥
|
मुनिमव्यक्तया वाचा तमहं सज्जमानया ।
हीनव्यञ्जनया प्रेक्ष्य भीतचित्त इवाब्रुवम् ॥ ११ ॥
|
’मुनिला पहाताच माझ्या मनात भीती उत्पन्न झाली. माझी वाचा अडखळू लागली. कित्येक अक्षरांचा उच्चारच होत नव्हता. याप्रकारे अस्पष्ट वाणीत मी बोलण्याचा प्रयत्न केला. ॥११॥
|
मनसः कर्म चेष्टाभिरभिसंस्तभ्य वाग्बलम् ।
आचचक्षे त्वहं तस्मै पुत्रव्यसनजं भयम् ॥ १२ ॥
|
’मानसिक भयाला बाहेरील प्रयत्नांनी दाबून मी काही बोलण्याची क्षमता प्राप्त केली आणि मुनिंच्यावर पुत्राच्या मृत्युने जे संकट येऊन कोसळले होते ते त्यांच्या पुढे प्रकट करीत म्हटले- ॥१२॥
|
क्षत्रियोऽहं दशरथो नाहं पुत्रो महात्मनः ।
सज्जनावमतं दुःखमिदं प्राप्तं स्वकर्मजम् ॥ १३ ॥
|
’महात्मन् ! मी आपला पुत्र नाही, दशरथ नावाचा एक क्षत्रिय आहे. मी माझ्या कर्माच्या योगे असे दुःख प्राप्त केले आहे की सत्पुरुषांनी ज्याची सदा निंदा केली आहे. ॥१३॥
|
भगवंश्चापहस्तोऽहं सरयूतीरमागतः ।
जिघांसुः श्वापदं किञ्चिन्निपाने वागतं गजम् ॥ १४ ॥
|
’भगवन् ! मी धनुष्य बाण घेऊन शरयूच्या तटावर आलो होतो. माझ्या येण्याचा उद्देश हा होता की कोणी जंगली हिंस्त्र पशु अथवा हत्ती घाटावर पाणि पिण्यास आला तर मी त्याला मारीन. ॥१४॥
|
तत्र श्रुतो मया शब्दो जले कुम्भस्य पूर्यतः ।
द्विपोऽयमिति मत्वाहं बाणेनाभिहतो मया ॥ १५ ॥
|
’थोड्या वेळानंतर मला पाण्यात घडा भरण्याचा आवाज ऐकू आला. मी समजलो कोणी हत्ती येऊन पाणी पित आहे, म्हणून त्याच्यावर बाण सोडला. ॥१५॥
|
गत्वा तस्यास्ततस्तीरमपश्यमिषुणा हृदि ।
विनिर्भिन्नं गतप्राणं शयानं भुवि तापसम् ॥ १६ ॥
|
’नंतर शरयूच्या तटावर जाऊन पाहिले की माझा बाण एका तपस्व्याच्या छातीमध्ये लागलेला आहे आणि तो मृतप्राय होऊन जमिनीवर पडला आहे. ॥१६॥
|
ततस्तस्यैव वचनादुपेत्य परितप्यतः ।
स मया सहसा बाण उद्धृतो मर्मतस्तदा ॥ १७ ॥
|
’त्या बाणाने त्याला फार पीडा होत होती म्हणून त्यावेळी त्यांच्याच सांगण्या वरून एकाएकी मी तो बाण त्यांच्या मर्मस्थानातून काढून टाकला. ॥१७॥
|
स चोद्धृतेन बाणेन सहसा स्वर्गमास्थितः ।
भगवन्तावुभौ शोचन्नन्धाविति विलप्य च ॥ १८ ॥
|
’बाण काढताच त्या बरोबरच ते तात्काळ स्वर्गास निघून गेले. मरते समयी त्यांनी आपल्या पूजनीय अंध पिता-माता यांच्यासाठी अत्यंत शोक आणि विलाप केला होता. ॥१८॥
|
अज्ञानाद् भवतः पुत्रः सहसाभिहतो मया ।
शेषमेवं गते यत् स्यात् तत् प्रसीदतु मे मुनिः ॥ १९ ॥
|
’या प्रकारे अजाणता माझ्या हातून आपल्या पुत्राचा वध झालेला आहे. अशा स्थितित माझ्या प्रति जो शाप अथवा अनुग्रह शेष असेल तो देण्यासाठी महर्षि आपण माझ्यावर प्रसन्न व्हावे.’ ॥१९॥
|
स तच्छ्रुत्वा वचः क्रूरं मया तदघशंसिना ।
नाशकत् तीव्रमायासं स कर्तुं भगवानृषिः ॥ २० ॥
|
’मी माझ्या मुखाने माझे पाप प्रकट केले होते म्हणून माझे क्रूरतेने भरलेले बोलणे ऐकूनही ते पूज्यपाद महर्षि मला कठोर दण्ड - भस्म होण्याचा शाप देऊ शकले नाहीत. ॥२०॥
|
स बाष्पपूर्णवदनो निश्वसञ्शोकमूर्च्छितः ।
मामुवाच महातेजाः कृताञ्जलिमुपस्थितम् ॥ २१ ॥
|
’त्यांच्या मुखावरून अश्रुंच्या धारा वाहू लागल्या आणि ते शोकाने मूर्च्छित होऊन दीर्घ निःश्वास घेऊ लागले. मी हात जोडून त्यांच्या समोर उभा होतो. त्या समयी त्या महान तेजस्वी मुनीनी मला म्हटले- ॥२१॥
|
यद्येतदशुभं कर्म न स्म मे कथयेः स्वयम् ।
फलेन्मूर्धा स्म ते राजन् सद्यः शतसहस्रधा ॥ २२ ॥
|
’राजन् ! जर आपले हे पापकर्म तू स्वतः येथे येऊन सांगितले नसतेस तर तात्काळ तुझ्या मस्तकाचे शेकडो- हजारो तुकडे झाले असते. ॥२२॥
|
क्षत्रियेण वधो राजन् वानप्रस्थे विशेषतः ।
ज्ञानपूर्वं कृतः स्थानाच्च्यावयेदपि वज्रिणम् ॥ २३ ॥
|
’नरेश्वर ! जर कुणी क्षत्रिय जाणून बुजून कुणाचा विशेषतः वानप्रस्थिचा वध करील तर तो वज्रधारी इंद्र का असेना तो वध त्याला त्याच्या स्थानापासून भ्रष्ट करून टाकतो. ॥२३॥
|
सप्तधा तु भवेन्मूर्धा मुनौ तपसि तिष्ठति ।
ज्ञानाद् विसृजतः शस्त्रं तादृशे ब्रह्मवादिनि ॥ २४ ॥
|
’तपस्येत तत्पर असलेल्या तशा ब्रह्मवादी मुनिवर जाणून- बुजून शस्त्राचा प्रहार करणार्या पुरुषाच्या मस्तकाचे सात तुकडे होऊन जातात. ॥२४॥
|
अज्ञानाद् हि कृतं यस्मादिदं ते तेन जीवसे ।
अपि ह्यकुशलं न स्याद् राघवाणां कुतो भवान् ॥ २५ ॥
|
’तू अजाणता हे पाप केले आहेस म्हणून अद्यापपर्यंत जिंवत आहेस. जर जाणून बुजून केले असतेस तर समस्त रघुवंशीयांचे कुळच नष्ट झाले असते, एकट्या तुझी तर गोष्टच कशाला ? ॥२५॥
|
नय नौ नृपतं देशमिति मां चाभ्यभाषत ।
अद्य तं द्रष्टुमिच्छावः पुत्रं पश्चिमदर्शनम् ॥ २६ ॥
|
’त्यांनी मला हेही सांगितले - ’नरेश्वर ! तू आम्हा दोघांना जेथे आमचा पुत्र मरून पडला आहे त्या स्थानावर घेऊन चल. या वेळी आम्ही त्याला पाहू इच्छितो. हे आमच्यासाठी त्याचे अंतिम दर्शन असेल.’ ॥२६॥
|
रुधिरेणावसिक्ताङ्गं प्रकीर्णाजिनवाससम् ।
शयानं भुवि निःसंज्ञं धर्मराजवशं गतम् ॥ २७ ॥
अथाहमेकस्तं देशं नीत्वा तौ भृशदुःखितौ ।
अस्पर्शयमहं पुत्रं तं मुनिं सह भार्यया ॥ २८ ॥
|
’तेव्हा मी एकटाच त्या अत्यंत दुःखात पडालेल्या दंपतिला त्या स्थानी घेऊन गेलो जेथे त्यांचा पुत्र काळाच्या अधीन होऊन पृथ्वीवर निश्चेष्ट पडलेला होता. त्याचे सारे अंग रक्ताने माखलेले होते. मृगचर्म आणि वस्त्र विखरून पडलेले होते. मी पत्निसहित मुनिंना त्यांच्या पुत्राच्या शरीराचा स्पर्श करविला. ॥२७-२८॥
|
तौ पुत्रमात्मनः स्पृष्ट्वा तमासाद्य तपस्विनौ ।
निपेततुः शरीरेऽस्य पिता चैनमुवाच ह ॥ २९ ॥
|
ती दोन्ही तपस्वी (पतीपत्नी) आपल्या पुत्राला स्पर्श करून त्याच्या अत्यंत निकट जाऊन त्याच्या शरीरावर कोसळले. नंतर पित्याने पुत्राला संबोधित करून म्हटले- ॥२९॥
|
नाभिवादयसे माद्य न च मामभिभाषसे ।
किं च शेषे तु भूमौ त्वं वत्स किं कुपितो ह्यसि ॥ ३० ॥
|
’मुला ! आज तू मला प्रणामही करीत नाहीस आणि माझ्याशी बोलतही नाहीस ! तू जमिनीवर का झोपलास आहेस ? काय तू आमच्यावर रुसला आहेस की काय ? ॥३०॥
|
नन्वहं तेऽप्रियः पुत्र मातरं पश्य धार्मिकीम् ।
किं च नालिङ्गसे पुत्र सुकुमार वचो वद ॥ ३१ ॥
|
’मुला ! जर मी तुला प्रिय नसेन तर तू आपल्या ह्या धर्मनिष्ठ मातेकडे तरी जरा बघ. तू तिला हृदयाशी का धरीत नाहीस ? वत्सा ! काही तरी बोल.’ ॥३१॥
|
कस्य वा पररात्रेऽहं श्रोष्यामि हृदयङ्गमम् ।
अधीयानस्य मधुरं शास्त्रं वान्यद् विशेषतः ॥ ३२ ॥
|
’आता उत्तर रात्री मधुर स्वराने शास्त्र अथवा पुराण आदि अन्य कुठल्या ग्रंथाचा विशेषरूपाने स्वाध्याय करून कोणाच्या मुखाने मी मनोरम शास्त्र चर्चा ऐकेन ? ॥३२॥
|
को मां संध्यामुपास्यैव स्नात्वा हुतहुताशनः ।
श्लाघयिष्यत्युपासीनः पुत्रशोकभयार्दितम् ॥ ३३ ॥
|
’आता कोण स्नान, संध्योपासना तथा अग्निहोत्र करून माझ्या जवळ बसून पुत्रशोकाच्या भयाने पीडित झालेल्या मला म्हातार्याला सान्त्वना देत माझी सेवा करील ? ॥३३॥
|
कन्दमूलफलं हृत्वा यो मां प्रियमिवातिथिम् ।
भोजयिष्यत्यकर्मण्यमप्रग्रहमनायकम् ॥ ३४ ॥
|
’आता कोण असा आहे, जो कंद, मूळ आणि फळे आणून मला- अकर्मण्य, अन्नसंग्रह रहित आणि अनाथाला प्रिय अतिथी प्रमाणे भोजन करवील ? ॥३४॥
|
इमामन्धां च वृद्धां च मातरं ते तपस्विनीम् ।
कथं पुत्र भरिष्यामि कृपणां पुत्रगर्धिनीम् ॥ ३५ ॥
|
’मुला ! तुझी ही तपस्विनी माता आंधळी, म्हातारी, दीन तसेच पुत्रासाठी उत्कंठित राहाणारी आहे. मी स्वतः अंध असल्याने तिचे भरण- पोषण कसे करू शकेन ? ॥३५॥
|
तिष्ठ मा मा गमः पुत्र यमस्य सदनं प्रति ।
श्वो मया सह गन्तासि जनन्या च समेधितः ॥ ३६ ॥
|
’पुत्रा ! थांब, आज यमराजाच्या घरी जाऊ नको. उद्या माझ्या बरोबर आणि आपल्या मातेबरोबर चल. ॥३६॥
|
उभावपि च शोकार्तावनाथौ कृपणौ वने ।
क्षिप्रमेव गमिष्यावस्त्वया हीनौ यमक्षयम् ॥ ३७ ॥
|
’आम्ही दोघे शोकाने, आर्त, अनाथ आणि दीन झालो आहोत. तू राहिला नाहीस त्यामुळे आम्ही ही लवकरच यमलोकाचा रस्ता धरू. ॥३७॥
|
ततो वैवस्वतं दृष्ट्वा तं प्रवक्ष्यामि भारतीम् ।
क्षमतां धर्मराजो मे बिभृयात् पितरावयम् ॥ ३८ ॥
|
’त्यानंतर सूर्यपुत्र यमराजाचे दर्शन करून मी त्यांना ही गोष्ट सांगेन- ’धर्मराज माझ्या अपराधाची क्षमा करा आणि माझ्या पुत्राला सोडून द्या की ज्यायोगे हा आपल्या मातापित्यांचे भरण-पोषण करू शकेल. ॥३८॥
|
दातुमर्हति धर्मात्मा लोकपालो महायशाः ।
ईदृशस्य ममाक्षय्यामेकामभयदक्षिणाम् ॥ ३९ ॥
|
’ते धर्मात्मा आहेत, लोकपाल आहेत, माझ्या सारख्या अनाथाला एकवेळ अभयदान देऊ शकतात. ॥३९॥
|
अपापोऽसि यदा पुत्र निहतः पापकर्मणा ।
तेन सत्येन गच्छाशु ये लोकास्त्वस्त्रयोधिनाम् ॥ ४० ॥
या हि शूरा गतिं यान्ति सङ्ग्रामेष्वनिवर्तिनः ।
हतास्त्वभिमुखाः पुत्र गतिं तां परमां व्रज ॥ ४१ ॥
|
’मुला, तू निष्पाप आहेस, परंतु एका पापकर्मा क्षत्रियाने तुझा वध केला आहे. या कारणाने माझ्या सत्याच्या प्रभावाने तू तात्काळ अस्त्रयोधी शूर वीरांना जो लोक प्राप्त होतो त्या लोकास जा. मुला ! युद्धात पाठ न दाखविणारे शूरवीर सन्मुख युद्ध करीत असता मारले गेल्यावर ज्या गतिला प्राप्त होतात, त्याच उत्तम गतिला तू ही जा. ॥४०-४१॥
|
यां गतिं सगरः शैब्यो दिलीपो जनमेजयः ।
नहुषो धुन्धुमारश्च प्राप्तास्तां गच्छ पुत्रक ॥ ४२ ॥
|
’वत्सा ! राजा सगर, शैल्य, दिलिप, जनमेजय, नहुष आणि धुन्धुमार ज्या गतिला प्राप्त झाले आहेत, तीच तुलाही मिळो. ॥४२॥
|
या गतिः सर्वभूतानां स्वाध्यायात् तपसश्च या ।
भूमिदस्याहिताग्नेश्च एकपत्नीव्रतस्य च ॥ ४३ ॥
गोसहस्रप्रदातॄणां गुरुसेवाभृतामपि ।
देहन्यासकृतां या च तां गतिं गच्छ पुत्रक ॥ ४४ ॥
|
’स्वाध्याय आणि तपस्येने समस्त प्राण्यांच्या आश्रयभूत असलेल्या परब्रह्माची प्राप्ति होते तेच तुलाही प्राप्त होवो. वत्सा ! भूमिदाता, अग्निहोत्री, एकपत्नीव्रती, एक हजार गाईंचे दान करणारे, गुरुची सेवा करणारे तसेच महाप्रस्थान आदिंच्या द्वारा देहत्याग करणार्या पुरुषांना जी गति मिळते, तीच तुलाही प्राप्त होवो. ॥४३-४४॥
|
न हि त्वस्मिन् कुले जातो गच्छत्यकुशलां गतिम् ।
स तु यास्यति येन त्वं निहतो मम बान्धवः ॥ ४५ ॥
|
’आमच्या सारख्या तपस्व्यांच्या या कुळात जन्मलेला कुणीही पुरुष वाईट गतिला प्राप्त होऊ शकत नाही. वाईट गति तर त्याची होईल ज्याने माझ्या बांधवरूप तुला अकारण मारले आहे.’ ॥४५॥
|
एवं स कृपणं तत्र पर्यदेवयतासकृत् ।
ततोऽस्मै कर्तुमुदकं प्रवृत्तः सह भार्यया ॥ ४६ ॥
|
या प्रकारे ती (दोघे) वारंवार विलाप करू लागली. तत्पश्चात आपल्या पत्नीसह ते आपल्या पुत्राला जलाञ्जलि देण्याच्या कार्यात प्रवृत्त झाले. ॥४६॥
|
स तु दिव्येन रूपेण मुनिपुत्रः स्वकर्मभिः ।
स्वर्गमध्यारुहत् क्षिप्रं शक्रेण सह धर्मवित् ॥ ४७ ॥
|
’त्याच वेळी तो धर्मज्ञ मुनिकुमार आपल्या पुण्यकर्मांच्या प्रभावाने दिव्यरूप धारण करून तात्काळच इंद्रासहित स्वर्गास जाऊ लागला. ॥४७॥
|
आबभाषे च तौ वृद्धौ सह शक्रेण तापसः ।
आश्वस्य च मुहूर्तं तु पितरं वाक्यमब्रवीत् ॥ ४८ ॥
|
’इंद्रासहित त्या तपस्व्याने आपल्या दोन्ही वृद्ध मातापित्यांना एक मुहूर्तपर्यंत आश्वासन देत त्यांच्याशी संभाषण केले, नंतर तो आपल्या पित्याला म्हणाला- ॥४८॥
|
स्थानमस्मि महत् प्राप्तो भवतोः परिचारणात् ।
भवन्तावपि च क्षिप्रं मम मूलमुपैष्यथः ॥ ४९ ॥
|
’मी आपल्या दोघांच्या सेवेने महान स्थानाला प्राप्त झालो आहे. आता आपण दोघेही लवकरच माझ्या जवळ यावे. ॥४९॥
|
एवमुक्त्वा तु दिव्येन विमानेन वपुष्मता ।
आरुरोह दिवं क्षिप्रं मुनिपुत्रो जितेंद्रियः ॥ ५० ॥
|
’असे म्हणून तो जितेन्द्रिय मुनिकुमार त्या सुंदर आकाराच्या दिव्य विमानाने लवकरच देवलोकास निघून गेला. ॥५०॥
|
स कृत्वाथोदकं तूर्णं तापसः सह भार्यया ।
मामुवाच महातेजाः कृताञ्जलिमुपस्थितम् ॥ ५१ ॥
|
त्यानंतर पत्नीसहित त्या महातेजस्वी तपस्वी मुनिने त्वरितच पुत्राला जलाञ्जलि देऊन हात जोडून उभा असलेल्या मला म्हटले- ॥५१॥
|
अद्यैव जहि मां राजन् मरणे नास्ति मे व्यथा ।
यः शरेणैकपुत्रं मां त्वमकार्षीरपुत्रकम् ॥ ५२ ॥
|
’राजन् ! तू आजच मलाही मारून टाक, आता मरण्यात मला कष्ट होणार नाहीत. माझा एकच मुलगा होता, ज्याला तू आपल्या बाणाचे लक्ष्य बनवून मला पुत्रहीन करून टाकलेस. ॥५२॥
|
त्वया च यदज्ञानान्निहतो मे स बालकः ।
तेन त्वामपि शप्स्येऽहं सुदुःखमतिदारुणम् ॥ ५३ ॥
|
’तू अज्ञानवश जी माझ्या बालकाची हत्या केली आहेस, त्यामुळे मीही तुला अत्यंत भयंकर तसेच महान शोक व दुःख देणारा शाप देईन. ॥५३॥
|
पुत्रव्यसनजं दुःखं यदेतन्मम साम्प्रतम् ।
एवं त्वं पुत्रशोकेन राजन् कालं करिष्यसि ॥ ५४ ॥
|
’राजन ! या वेळी पुत्राच्या वियोगाने मला जसे कष्ट होत आहेत, तसेच तुलाही होतील. तूही पुत्रशोकानेच कालवश होशील. ॥५४॥
|
अज्ञानात्तु हतो यस्मात् क्षत्रियेण त्वया मुनिः ।
तस्मात् त्वां नाविशत्याशु ब्रह्महत्या नराधिप ॥ ५५ ॥
त्वामप्येतादृशो भावः क्षिप्रमेव गमिष्यति ।
जीवितान्तकरो घोरो दातारमिव दक्षिणाम् ॥ ५६ ॥
|
’नरेश्वर ! क्षत्रिय असून तू अजाणता वैश्यजातीय मुनीचा वध केला आहेस, म्हणून लवकरच तुला ब्रह्महत्येचे पाप तर लागणार नाही तथापि लवकरच तुलाही अशीच भयानक आणि प्राण घेणारी अवस्था प्राप्त होईल. ज्याप्रमाणे दक्षिणा देणार्या दात्याला त्यास अनुसरून फळ प्राप्त होते त्याप्रमाणेच. ॥५५-५६॥
|
एवं शापं मयि न्यस्य विलप्य करुणं बहु ।
चितामारोप्य देहं तन्मिथुनं स्वर्गमभ्ययात् ॥ ५७ ॥
|
’या प्रकारे मला शाप देऊन ते बराच वेळ करुणाजनक विलाप करीत राहिले नंतर त्या दोघा पतीपत्नीनी आपल्या शरीरास जळत्या चितेत घालून ते स्वर्गास निघून गेले. ॥५७॥
|
तदेतच्चिन्तयानेन स्मृतं पापं मया स्वयम् ।
तदा बाल्यात् कृतं देवि शब्दवेध्यनुकर्षिणा ॥ ५८ ॥
|
’देवी ! या प्रकारे बाल स्वभावामुळे मी पूर्वी शब्दभेदी बाण मारून आणि नंतर मुनिच्या शरीरांतून बाण ओढून काढून जे त्या वधरूपी पाप केले होते, तेच आज या पुत्रवियोगाच्या चिंतेत पडलेल्या मला स्वतःच आठवले आहे. ॥५८॥
|
तस्यायं कर्मणो देवि विपाकः समुपस्थितः ।
अपथ्यैः सह सम्भुक्ते व्याधिमन्नरसो यथा ॥ ५९ ॥
तस्मान्मामागतं भद्रे तस्योदारस्य तद् वचः ।
|
’देवी ! अपथ्य वस्तुंच्या बरोबर अन्नरस ग्रहण केल्यावर जसा शरीरात रोग उत्पन्न होतो त्या प्रकारेच हे त्या पापकर्माचे फळ उपस्थित झाले आहे. म्हणून कल्याणी ! त्या उदार महात्म्याचे वचन या समयी माझ्या जवळ फळ देण्यासाठी आलेले आहे.’ ॥५९ १/२॥
|
इत्युक्त्वा स रुदंस्त्रस्तो भार्यामाह तु भूमिपः ॥ ६० ॥
यदहं पुत्रशोकेन सन्त्यजिष्यामि जीवितम् ।
चक्षुर्भ्यां त्वां न पश्यामि कौसल्ये त्वं हि मां स्पृश ॥ ६१ ॥
|
असे म्हणून ते भूपाल मृत्युच्या भयाने त्रस्त होऊन आपल्या पत्नीस रडत रडत म्हणाले - कौसल्ये ! आता मी पुत्रशोकाने आपल्या प्राणांचा त्याग करीन. यावेळी मी तुला आपल्या डोळ्यानी पाहू शकत नाही, तू मला स्पर्श कर. ॥६०-६१॥
|
यमक्षयमनुप्राप्ता द्रक्ष्यन्ति नहि मानवाः ।
यदि मां संस्पृशेद् रामः सकृदन्वारभेत वा ॥ ६२ ॥
धनं वा यौवराज्यं वा जीवेयमिति मे मतिः ।
|
’जो मनुष्य यमलोकास जाणार असतो (मरणासन्न होतो) तो आपल्या बांधवजनांना पाहू शकत नाही. जर श्रीराम एकवेळ येऊन मला स्पर्श करील, अथवा हे धनवैभव आणि युवराजपद स्वीकारील तर माझा विश्वास आहे की मी जिवंत राहू शकेन. ॥६२ १/२॥
|
न तन्मे सदृशं देवि यन्मया राघवे कृतम् ॥ ६३ ॥
सदृशं तत्तु तस्यैव यदनेन कृतं मयि ।
|
’देवी ! मी राघवा बरोबर जे वर्तन केले आहे ते माझ्या योग्य नव्हते. परंतु श्रीरामानी माझ्याशी जो व्यवहार केला आहे तो सर्वथा त्यांच्या योग्यच आहे. ॥६३ १/२॥
|
दुर्वृत्तमपि कः पुत्रं त्यजेद् भुवि विचक्षणः ॥ ६४ ॥
कश्च प्रव्राज्यमानो वा नासूयेत् पितरं सुतः ।
|
’कोण बुद्धिमान पुरुष या भूतलावर आपल्या दुराचारी पुत्राचाही परित्याग करू शकतो ? (एक मीच असा आहे की ज्याने आपल्या धर्मात्मा पुत्राचा त्याग केला आहे.) तसेच कोण असा पुत्र आहे की ज्याला घरातून घालवून दिले जाऊनही तो आपल्या पित्याची निंदा करत नाही, त्याला दोष देत नाही ? परंतु श्रीराम गुपचुप निघून गेले. त्यांनी माझ्या विरूद्ध एक शब्दही उच्चारला नाही). ॥६४ १/२॥
|
चक्षुषा त्वां न पश्यामि स्मृतिर्मम विलुप्यते ॥ ६५ ॥
दूता वैवस्वतस्यैते कौसल्ये त्वरयन्ति माम् ।
|
’कौसल्ये ! आता माझे डोळे तुला पाहू शकत नाहीत, स्मरण शक्तिही नाहीशी होऊ लागली आहे. तिकडे पहा, हे यमराजाचे दूत मला येथून घेऊन जाण्यासाठी उतावळे होत आहेत. ॥६५ १/२॥
|
अतस्तु किं दुःखतरं यदहं जीवितक्षये ॥ ६६ ॥
नहि पश्यामि धर्मज्ञं रामं सत्यपराक्रमम् ।
|
’मी प्राणान्त समयी देखील सत्यपराक्रमी धर्मज्ञ रामाचे दर्शन करू शकत नाही. त्यापेक्षा अधिक दुःख माझ्यासाठी आणखी काय असू शकणार आहे ? ॥६६ १/२॥
|
तस्यादर्शनजः शोकः सुतस्याप्रतिकर्मणः ॥ ६७ ॥
उच्छोषयति वै प्राणान् वारि स्तोकमिवातपः ।
|
या संसारात ज्यांची बरोबरी करणारा दुसरा कोणीही नाही त्या प्रिय पुत्र श्रीरामांना न पाहू शकण्याचा शोक, जसे ऊन थोडेसे जल असेल तर त्यास त्वरित सुकवून टाकते त्याप्रमाणे, माझ्या प्राणांना शुष्क करून टाकीत आहे. ॥६७ १/२॥
|
न ते मनुष्या देवास्ते ये चारुशुभकुण्डलम् ॥ ६८ ॥
मुखं द्रक्ष्यन्ति रामस्य वर्षे पञ्चदशे पुनः ।
|
’ते मनुष्य नसून देवताच आहेत जे पंधराव्या वर्षी वनातून परत आल्यावर श्रीरामांचे सुंदर मनोहर कुण्डलांनी अलंकृत मुख आपल्या डोळ्यांनी पाहतील.’ ॥६८ १/२॥
|
पद्मपत्रेक्षणं सुभ्रु सुदंष्ट्रं चारुनासिकम् ॥ ६९ ॥
धन्या द्रक्ष्यन्ति रामस्य ताराधिपसमं मुखम् ।
|
’जे कमलाप्रमाणे नेत्र, सुंदर भुवया, स्वच्छ दांत आणि मनोहर नासिका यांनी सुशोभित श्रीरामाच्या चंद्रोपम मुखाचे दर्शन करतील, ते धन्य आहेत. ॥६९ १/२॥
|
सदृशं शारदस्येन्द्रोः फुल्लस्य कमलस्य च ॥ ७० ॥
सुगन्धि मम रामस्य धन्या द्रक्ष्यन्ति ये मुखम् ।
निवृत्तवनवासं तमयोध्यां पुनरागतम् ॥ ७१ ॥
द्रक्ष्यन्ति सुखिनो रामं शुक्रं मार्गगतं यथा ।
|
’जे माझ्या श्रीरामाच्या शरच्चंद्र सदृश मनोहर आणि प्रफुल्ल कमलासमान सुवासिक मुखाचे दर्शन करतील ते धन्य आहेत. ज्याप्रमाणे (मूढता आदि अवस्थांचा त्याग करून आपल्या उच्च) मार्गात स्थित शुक्राचे दर्शन करून लोक सुखी होतात त्याच प्रमाणे वनवासाचा अवधी पूर्ण करून अयोध्येला परतून आलेल्या श्रीरामांना जे लोक पहातील तेच लोक सुखी होतील. ॥७०-७१ १/२॥
|
कौसल्ये चित्तमोहेन हृदयं सीदतेतराम् ॥ ७२ ॥
वेदये न च संयुक्ताञ्शब्दस्पर्शरसानहम् ।
|
’कौसल्ये ! माझ्या चित्ताला मोह पडत आहे, हृदय जणु विदीर्ण होत आहे, इंद्रियांशी संयोग होऊनही मला शब्द, स्पर्श आणि रस आदि विषयांचा अनुभव येत नाही आहे. ॥७२ १/२॥
|
चित्तनाशाद् विपद्यन्ते सर्वाण्येवेन्द्रियाणि मे ।
क्षीणस्नेहस्य दीपस्य संरक्ता रश्मयो यथा ॥ ७३ ॥
|
’ज्याप्रमाणे तेल समाप्त झाल्यावर दीपकाची अरुण प्रभा विलीन होऊन जाते त्याप्रमाणे चेतना नष्ट होत असल्याने माझी सर्व इंद्रियेही नष्ट होऊ लागली आहेत. ॥७३॥
|
अयमात्मभवः शोको मामनाथमचेतनम् ।
संसाधयति वेगेन यथा कूलं नदीरयः ॥ ७४ ॥
|
’ज्या प्रमाणे नदीचा वेग आपल्याच किनार्याला तोडून पाडून टाकतो त्याचप्रमाणे माझा, आपणच उत्पन्न केलेला, शोक मला वेगाने अनाथ आणि अचेत करीत आहे. ॥७४॥
|
हा राघव महाबाहो हा ममायासनाशन ।
हा पितृप्रिय मे नाथ हा ममासि गतः सुत ॥ ७५ ॥
|
’हा महाबाहु राघवा ! हा माझ्या कष्टांना दूर करणार्या श्रीरामा ! हा पित्याच्या प्रिय पुत्रा ! हा माझ्या नाथा ! हा माझ्या मुला ! तू कोठे निघून गेला आहेस ? ॥७५॥
|
हा कौसल्ये न पश्यामि हा सुमित्रे तपस्विनि ।
हा नृशंसे ममामित्रे कैकेयि कुलपांसनि ॥ ७६ ॥
|
’हा कौसल्ये ! आता मला काहीही दिसत नाही. हा तपस्विनी सुमित्रे ! आता मी या लोकातून जात आहे. हा माझ्या शत्रु, क्रूर कुलांगार कैकेयी ! (तुझी कुटील इच्छा पुरी झाली)’ ॥७६॥
|
इति मातुश्च रामस्य सुमित्रायाश्च सन्निधौ ।
राजा दशरथः शोचञ्जीवितान्मुपागमत् ॥ ७७ ॥
|
या प्रकारे राममाता कौसल्या आणि सुमित्रेच्या निकट शोकपूर्ण विलाप करीत असता राजा दशरथांच्या जीवनाचा अंत झाला. ॥७७॥
|
तथा तु दीनः कथयन् नराधिपः
प्रियस्य पुत्रस्य विवासनातुरः ।
गतेऽर्धरात्रे भृशदुःखपीडित-
स्तदा जहौ प्राणमुदारदर्शनः ॥ ७८ ॥
|
आपल्या प्रिय पुत्राच्या वनवासाने शोकाकुल झालेले राजा दशरथ या प्रकारे दीनतापूर्वक वचन बोलत असता अर्धी रात्र संपता संपता दुःखाने अत्यंत पीडित झाले आणि त्याच वेळी त्या उदारदर्शी नरेशांनी आपल्या प्राणांचा त्याग केला. ॥७८॥
|
इत्यार्षे श्रीमद्रामायणे वाल्मीकीय आदिकाव्ये अयोध्याकाण्डे चतुःषष्टितमः सर्गः ॥ ६४ ॥
|
या प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील अयोध्याकाण्डाचा चौसष्टावा सर्ग पूरा झाला. ॥६४॥
|