श्रीमद् वाल्मीकि रामायणे
युद्धकाण्डे
॥ त्रिषष्टितम: सर्ग: ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

कुंभकर्णस्य रावणं प्रति तत्कुकृत्यनिमित्तक उपालंभः, तं सान्त्वयित्वा स्वकीय युद्धविषयकोत्साहस्य तेन प्रकटनं च -
कुंभकर्णाने रावणाला त्याच्या कुकृत्यांसाठी उपालम्भ देणे आणि त्याला धीर देऊन युद्धविषयक उत्साह प्रकट करणे -
तस्य राक्षसराजस्य निशम्य परिदेवितम् ।
कुंभकर्णो बभाषेदं वचनं प्रजहास च ॥ १ ॥
राक्षसराज रावणाचा तो विलाप ऐकून कुंभकर्ण खदखदून हसू लागला आणि याप्रकारे म्हणाला- ॥१॥
दृष्टो दोषो हि योऽस्माभिः पुरा मंत्रविनिर्णये ।
हितेष्वनभिरक्तेन सोऽयमासादितस्त्वया ॥ २ ॥
हे बन्धो ! पूर्वी (विभीषण आदिंच्या बरोबर) विचार करतेसमयी आम्ही लोकांनी जो दोष पाहिला होता, तोच तुला या समयी प्राप्त झाला आहे, कारण तू हितैषी पुरुषांवर आणि त्यांच्या म्हणण्यावर विश्वास केला नाहीस. ॥२॥
शीघ्रं खल्वभ्युपेतं त्वां फलं पापस्य कर्मणः ।
निरयेष्वेव पतनं यथा दुष्कृतकर्मणः ॥ ३ ॥
तुला शीघ्रच आपल्या पापकर्माचे फळ मिळाले आहे. ज्याप्रमाणे कुकर्मी पुरुषांचे नरकात पडणे निश्चित असते, त्या प्रकारे तुलाही आपल्या दुष्कर्माचे फळ मिळणे अवश्यंभावीच होते. ॥३॥
प्रथमं वै महाराज कृत्यमेतदचिन्तितम् ।
केवलं वीर्यदर्पेण नानुबंधो विचारितः ॥ ४ ॥
महाराज ! केवळ बळाच्या घमेंडीने तू प्रथम या पापकर्माची काही पर्वा केली नाहीस. याच्या परिणामाचा तू काहीही विचार केला नव्हतास. ॥४॥
यः पश्चात् पूर्वकार्याणि कुर्यादैश्वर्यमास्थितः ।
पूर्वं चोत्तरकार्याणि न स वेद नयानयौ ॥ ५ ॥
जो ऐश्वर्याचा अभिमान बाळगून प्रथम करण्यायोग्य कार्यांना नंतर करतो आणि नंतर करण्यायोग्य कार्ये आधी करून टाकतो, तो नीति आणि अनीतिला जाणत नाही. ॥५॥
देशकालविहीनानि कर्माणि विपरीतवत् ।
क्रियमाणानि दुष्यन्ति हवींष्यप्रयतेष्विव ॥ ६ ॥
जे कार्य उचित देश-काळ नसतांना विपरीत स्थितिमध्ये केले जाते, ते संस्कारहीन अग्निमध्ये हवन केलेल्या हविष्याप्रमाणे केवळ दु:खास कारण होते. ॥६॥
त्रयाणां पञ्चधा योगं कर्मणां यः प्रपद्यते ।
सचिवैः समयं कृत्वा स सम्यग् वर्तते पथि ॥ ७ ॥
जो राजा सचिवांसह विचार करून क्षय, वृद्धि आणि स्थानरूपाने उपलक्षित, साम, दान आणि दण्ड - या तीन्ही कर्मांच्या पाच(*) प्रकारच्या प्रयोगांना उपयोगात आणतो, तोच उत्तम नीति-मार्गावर विद्यमान आहे, असे समजले पाहिजे. ॥७॥
(* - कार्याला आरंभ करण्याचा उपाय, पुरुष आणि द्रव्यरूप सम्पत्ति, देश-कालाचा विभाग, विपत्ति टाळण्याचा उपाय आणि कार्याची सिद्धि - हे पाच प्रकारचे योग आहेत.)
यथागमं च यो राजा समयं विचिकीर्षति ।
बुध्यते सचिवैर्बुध्या सुहृदश्चानुपश्यति ॥ ८ ॥
जो नरेश नीतिशास्त्रानुसार मंत्र्यांच्या बरोबर क्षय(**) आदिसाठी उपयुक्त समयाचा विचार करून तदनुरूप कार्य करतो आणि आपल्या बुद्धिने सुहृदांनाही ओळखतो (त्यांची पारख करतो) तोच कर्तव्य आणि अकर्तव्याचा विवेक प्राप्त करतो. ॥८॥
(** - जेव्हा आपली वृद्धि आणि शत्रुची हानी याचा समय असेल तेव्हा दण्डोपयोगी यान (युद्धयात्रा) उचित आहे. आपली आणि शत्रुची समान स्थिति असेल तर सामपूर्वक संधि करणे उचित आहे. तसेच जेव्हा आपली हानी आणि शत्रुची वृद्धि याचा समय असेल, तर काही देऊन त्याचा आश्रय ग्रहण करणे उचित आहे.)
धर्ममर्थं हि कामं वा सर्वान् वा रक्षसां पते ।
भजेत पुरुषः काले त्रीणि द्वन्द्वानि वा पुनः ॥ ९ ॥
राक्षसराज ! नीतिज्ञ पुरुषाने धर्म, अर्थ अथवा काम किंवा सर्वांचे आपल्या समयावर सेवन केले पाहिजे अथवा तीन्ही द्वन्द्वांचे - धर्म-अर्थ, अर्थ-धर्म आणि काम-अर्थ या सर्वांचे ही उपयुक्त समयीच सेवन करावे. (***)॥९॥
(*** - येथे ही गोष्ट सांगितली गेली आहे की शास्त्रास अनुसरून प्रात:काळी धर्माचे, मध्याह्नकाळी अर्थाचे आणि रात्री कामसेवन करण्याचे विधान आहे; म्हणून त्या त्या समयी धर्म आदिचे सेवन केले पाहिजे अथवा प्रात:काळी धर्म आणि अर्थरूप द्वन्दाचे, मध्याह्नकाळी अर्थ आणि धर्माचे आणि रात्री काम आणि अर्थाचे सेवन करावे. जो प्रत्येक समयी केवळ कामाचेच सेवन करतो, तो पुरुषांमध्ये अधम कोटीचा आहे.)
त्रिषु चैतेषु यच्छ्रेष्ठं श्रुत्वा तन्नावबुध्यते ।
राजा वा राजमात्रो वा व्यर्थं तस्य बहुश्रुतम् ॥ १० ॥
धर्म, अर्थ आणि काम - या तीन्हीमध्ये धर्मच श्रेष्ठ आहे, म्हणून विशेष प्रसंगी अर्थ आणि कामाची उपेक्षा करून धर्माचेच सेवन केले पाहिजे - ही गोष्ट विश्वसनीय पुरुषांकडून ऐकूनही जो राजा अथवा राजपुरुष जाणून घेत नाही अथवा समजूनही स्वीकार करत नाही, त्याचे अनेक शास्त्रांचे अध्ययन व्यर्थच आहे. ॥१०॥
उपप्रदानं सान्त्वं च भेदं काले च विक्रमम् ।
योगं च रक्षसां श्रेष्ठ तावुभौ च नयानयौ ॥ ११ ॥

काले धर्मार्थकामान् यः संमंत्र्य सचिवैः सह ।
निषेवेतात्मवान् लोके न स व्यसनमाप्नुयात् ॥ १२ ॥
राक्षसशिरोमणे ! जो मनस्वी राजा मंत्र्यांशी चांगल्याप्रकारे सल्ला-मसलत करून समयास अनुसरून दान, भेद आणि पराक्रमाचा, यांच्या पूर्वोक्त पाच प्रकारच्या योगांचा, नय अथवा अनयाचा तसेच योग्य समयी धर्म, अर्थ आणि कामाचे सेवन करतो, तो या लोकात कधी दु:ख अथवा विपत्तिचा भागी होत नाही. ॥११-१२॥
हितानुबंधमालोक्य कुर्यात् कार्यमिहात्मनः ।
राजा सहार्थतत्त्वज्ञैः सचिवैः बुद्धिजीविभिः ॥ १३ ॥
राजाला आवश्यक आहे की तो अर्थतत्त्वज्ञ तसेच बुद्धिजीवी मंत्र्यांचा सल्ला घेऊन जे आपल्यासाठी परिणामी हितकर दिसून येत असेल तेच कार्य करावे. ॥१३॥
अनभिज्ञाय शास्त्रार्थान् पुरुषाः पशुबुद्धयः ।
प्रागल्भ्याद्वक्तुमिच्छन्ति मंत्रिष्वभ्यन्तरीकृताः ॥ १४ ॥
जे पशुप्रमाणे बुद्धि असणारे कशाही प्रकारे मंत्र्यांच्यामध्ये संम्मिलित केले गेलेले असतात, ते शास्त्रांच्या अर्थाला तर जाणत नाहीत, पण धृष्टतावश केवळ थापा मारू पहातात. ॥१४॥
अशास्त्रविदुषां तेषां कार्यं नाभिहितं वचः ।
अर्थशास्त्रानभिज्ञानां विपुलां श्रियमिच्छताम् ॥ १५ ॥
शास्त्रज्ञान- शून्य आणि अर्थशास्त्रापासून अनभिज्ञ असूनही प्रचुर सम्पत्तिची इच्छा करणार्‍या त्या अयोग्य मंत्र्यांनी सांगितलेली गोष्ट कधीही मान्य करता कामा नये. ॥१५॥
अहितं च हिताकारं धार्ष्ट्याज्जल्पन्ति ये नराः ।
अवेक्ष्य मंत्रबाह्यास्ते कर्तव्याः कृत्यदूषकाः ॥ १६ ॥
जे लोक धृष्टतेमुळे अहितकर गोष्टीला हिताचे रूप देऊन ती सांगतात, ते निश्चितच सल्ला घेण्यायोग्य नसतात. म्हणून त्यांना या कार्यापासून दूर करणे आवश्यक आहे. ते तर काम बिघडविणारेच असतात. ॥१६॥
विनाशयन्तो भर्तारं सहिताः शत्रुभिर्बुधैः ।
विपरीतानि कृत्यानि कारयन्तीह मंत्रिणः ॥ १७ ॥
काही वाईट मंत्री साम आदि उपायांचा ज्ञाता असलेल्या शत्रुंना सामील होतात आणि आपल्या स्वामीचा विनाश करणयासाठीच त्यांच्या कडून विपरीत कर्मे करवितात. ॥१७॥
तान् भर्ता मित्रसंकाशान् अमित्रान् मंत्रनिर्णये ।
व्यवहारेण जानीयात् सचिवानुपसंहितान् ॥ १८ ॥
जेव्हा काही वस्तुसाठी अथवा कार्याच्या निश्चयासाठी मंत्र्यांचा सल्ला घेतला जातो, त्या समयी राजाने व्यवहारद्वाराच त्या मंत्र्यांना ओळखण्याचा प्रयत्‍न करावा, जे लाच वगैरे घेऊन शत्रूंना सामील झालेले आहेत आणि आपले मित्र असल्याप्रमाणे राहून वास्तविक शत्रूचे काम करतात. ॥१८॥
चपलस्येह कृत्यानि सहसानुप्रधावतः ।
छिद्रमन्ये प्रपद्यन्ते क्रौञ्चस्य खमिव द्विजाः ॥ १९ ॥
जो राजा चंचल आहे - आपातरमणीय वचनांना ऐकूनच संतुष्ट होऊन जात असतो आणि सहसा विचार न करताच कुठल्याही कार्यासाठी धाव घेतो, त्याचे छिद्र (दुर्बळता) शत्रुलोक, जसे क्रौञ्च पर्वताच्या छेदाला पक्षी जाणतात, त्याप्रमाणे बरोबर ताडतात. (क्रौंच पर्वताच्या छेदातून जाऊन पक्षी जसे पर्वताच्या दुसर्‍या बाजूस ये- जा करतात, त्याच प्रकारे शत्रुही राजाच्या त्या छिद्राचा अथवा दुर्बलतेचे फायदा घेतात.) ॥१९॥
यो हि शत्रुमवज्ञाय नात्मानमभिरक्षति ।
अवाप्नोति हि सोऽनर्थान् स्थानाच्च व्यवरोप्यते ॥ २० ॥
जो राजा शत्रूची अवहेलना करून आपल्या रक्षणाचा प्रबंध करत नाही, तो अनेक अनर्थांचा भागी होतो आणि आपल्या स्थानापासून (राज्यापासून) खाली उतरविला जातो (पदभ्रष्ट केला जातो). ॥२०॥
यदुक्तमिह ते पूर्वं प्रियया मेऽनुजेन च ।
तदेव नो हितं वाक्यं यथेच्छसि तथा कुरु ॥ २१ ॥
तुमची प्रिय पत्‍नी मंदोदरी आणि माझा लहान भाऊ विभीषण यांनी पहिल्याने तुला जे काही सांगितले होते तेच आपल्यासाठी हिताचे होते. आता तुझी जशी इच्छा असेल तसे कर. ॥२१॥
तत् तु श्रुत्वा दशग्रीवः कुंभकर्णस्य भाषितम् ।
भ्रुकुटिं चैव संचक्रे क्रुद्धश्चैनमभाषत ॥ २२ ॥
कुंभकर्णाचे हे बोलणे ऐकून दशमुख रावणाने भुवया वक्र केल्या आणि रागावून त्यास म्हटले - ॥२२॥
मान्यो गुरुरिवाचार्यः किं मां त्वमनुशाससे ।
किमेवं वाक्छ्रमं कृत्वा युक्तं तद् विधीयताम् ॥ २३ ॥
तू माननीय गुरू आणि आचार्यांप्रमाणे मला उपदेश का देत आहेस ? याप्रकारे भाषण देण्याचे परिश्रम करण्याने काय लाभ होणार आहे ? यासमयी जे उचित आणि आवश्यक असेल ते काम कर. ॥२३॥
विभ्रमाच्चित्तमोहाद् वा बलवीर्याश्रयेण वा ।
नाभिपन्नमिदानीं यद् व्यर्था तस्य पुनः कथाः ॥ २४ ॥
मी भ्रमाने, चित्ताच्या मोहाने अथवा आपल्या बळ-पराक्रमाच्या भरवशावर पहिल्याने जे तुम्हां लोकांचे म्हणणे मानले नाही त्याची यासमयी पुन्हा चर्चा करणे व्यर्थ आहे. ॥२४॥
अस्मिन् काले तु यद् युक्तं तदिदानीं विचिंत्यताम् ।
गतं तु नानुशोचन्ति गतं तु गतमेव हि ॥ २५ ॥

ममापनयजं दोषं विक्रमेण समीकुरु ।
जी गोष्ट घडून गेली ती तर घडून गेली. बुद्धिमान्‌ लोक घडलेल्या गोष्टीसाठी वारंवार शोक करत नाहीत. आत्ता यावेळी आपण काय करावयास हवे याचा विचार कर. आपल्या पराक्रमाने माझे अनीतिजनित दु:ख शांत करून टाक. ॥२५ १/२॥
यदि खल्वस्ति मे स्नेहो विक्रमं वाधिगच्छसि ॥ २६ ॥

यदि वा कार्यं ममैतत्ते हृदि कार्यतमं मतम् ।
जर माझ्यावर तुझा स्नेह आहे आणि आपल्या ठिकाणी यथेष्ट पराक्रम आहे असे तू समजत असशील आणि जर माझ्या या कार्याला परम कर्तव्य समजून हृदयात स्थान देत असशील तर युद्ध कर. ॥२६ १/२॥
स सुहृद् यो विपन्नार्थं दीनमभ्युपपद्यते ॥ २७ ॥

स बंधुर्योऽपनीतेषु साहाय्यायोपकल्पते ।
तोच सुहृद आहे जो सारे कार्य नष्ट झाल्याने दु:खी झालेल्या स्वजनावर अकारण अनुग्रह करतो आणि तोच बंधु आहे जो अनीतिच्या मार्गावर चालण्याने संकटात पडलेल्या पुरुषांची सहायता करतो. ॥२७ १/२॥
तमथैवं ब्रुवाणं तु वचनं धीरदारुणम् ॥ २८ ॥

रुष्टोऽयमिति विज्ञाय शनैः श्लक्ष्णमुवाच ह ।
रावणाला याप्रकारे धीर आणि दारूण वचन बोलतांना पाहून त्याला रूष्ट समजून कुंभकर्ण हळूहळू मधुर वाणीमध्ये काही बोलण्यास उद्यत झाला. ॥२८ १/२॥
अतीव हि समालक्ष्य भ्रातरं क्षुभितेन्द्रियम् ॥ २९ ॥

कुंभकर्णः शनैर्वाक्यं बभाषे परिसान्त्वयन् ।
त्याने पाहिले की माझ्या भावाची सारी इंद्रिये विक्षुब्ध झाली आहेत म्हणून कुंभकर्णाने हळू हळू त्यास सान्त्वना देत म्हटले- ॥२९ १/२॥
शृणु राजन् अवहितो मम वाक्यं अरिंदम ॥ ३० ॥

अलं राक्षसराजेन्द्र सन्तापमुपपद्य ते ।
रोषं च संपरित्यज्य स्वस्थो भवितुमर्हसि ॥ ३१ ॥
शत्रुदमन महाराज ! सावधान होऊन माझे म्हणणे ऐका. राक्षसराज ! संताप करणे व्यर्थ आहे. आता तुम्ही रोष सोडून स्वस्थ व्हावयास पाहिजे. ॥३०-३१॥
नैतन्मनसि कर्तव्यं मयि जीवति पार्थिव ।
तमहं नाशयिष्यामि यत्कृते परितप्यते ॥ ३२ ॥
पृथ्वीनाथ ! मी जिवंत असताना तुम्ही मनात असा भाव आणता कामा नये. तुम्हांला ज्याच्यामुळे संतप्त व्हावे लागत आहे त्यांना मी नष्ट करीन. ॥३२॥
अवश्यं तु हितं वाच्यं सर्वावस्थं मया तव ।
बंधुभावादभिहितं भ्रातृस्नेहाच्च पार्थिव ॥ ३३ ॥
महाराज ! अवश्यच मला सर्व अवस्थांमध्ये तुमच्या हिताचीच गोष्ट सांगितली पाहिजे. म्हणून मी बंधुभाव आणि भ्रातृस्नेह यामुळेच अशा गोष्टी बोललो. ॥३३॥
सदृशं यत्तु कालेऽस्मिन् कर्तुं स्नेहेन बंधुना ।
शत्रूणां कदनं पश्य क्रियमाणं मया रणे ॥ ३४ ॥
यासमयी एका भावाने स्नेहवश जे काही करणे उचित असेल तेच मी करीन. आता रणभूमीमध्ये माझ्याकडून होणारा (केला जाणारा) शत्रूंचा संहार तुम्ही पहा. ॥३४॥
अद्य पश्य महाबाहो मया समरमूर्धनि ।
हते रामे सह भ्रात्रा द्रवन्तीं हरवाहिनीम् ॥ ३५ ॥
महाबाहो ! आज युद्धाच्या आरंभीच माझ्याद्वारा भावासहित राम मारले गेल्यावर तुम्ही पहाल की वानरांची सेना कशा प्रकारे पळून जात आहे. ॥३५॥
अद्य रामस्य तद् दृष्ट्‍वा मयाऽऽनीतं रणाच्छिरः ।
सुखी भव महाबाहो सीता भवतु दुःखिता ॥ ३६ ॥
महाबाहो ! आज मी संग्रामभूमीमध्ये रामांचे मस्तक कापून आणीन. ते पाहून तुम्ही सुखी व्हा आणि सीता दु:खात बुडून जाईल. ॥३६॥
अद्य रामस्य पश्यन्तु निधनं सुमहत् प्रियम् ।
लङ्‌कायां राक्षसाः सर्वे ये ते निहतबान्धवाः ॥ ३७ ॥
लंकेमध्ये ज्या राक्षसांचे सगेसोयरे मारले गेले आहेत, तेही आज रामाचा मृत्यु पाहोत. ही त्यांच्यासाठी फारच प्रिय गोष्ट होईल. ॥३७॥
अद्य शोकपरीतानां स्वबंधुवधशोचिनाम् ।
शत्रोर्युधि विनाशेन करोम्यश्रुप्रमार्जनम् ॥ ३८ ॥
आपले बंधु-बांधव मारले गेल्याने जे लोक अत्यंत शोकात बुडून गेले आहेत; आज, युद्धात शत्रुचा नाश करून मी त्यांचे अश्रू पुशीन. ॥३८॥
अद्य पर्वतसंकाशं ससूर्यमिव तोयदम् ।
विकीर्णं पश्य समरे सुग्रीवं प्लवगेश्वरम् ॥ ३९ ॥
आज पर्वतासमान विशालकाय वानरराज सुग्रीवाला समरांगणात रक्ताने न्हाऊन पडलेला तू पहाशील, जो सूर्यरहित मेघासमान दृष्टिगोचर होईल. ॥३९॥
कथं त्वं राक्षसैरेभिः मया च परिसांत्वितः ।
जिघांसुभिर्दाशरथिं व्यथसे त्वं सदानघ ॥ ४० ॥
निष्पाप निशाचरराज ! हे राक्षस, तसेच मी, सर्वजण दाशरथि रामाला मारून टाकण्याची इच्छा बाळगत आहोत आणि तुम्हाला या गोष्टीसाठी आश्वासन देत आहोत तरीही तुम्ही सदा व्यथित का रहात आहां ? ॥४०॥
मां निहत्य किल त्वां हि निहनिष्यति राघवः ।
नाहमात्मनि सन्तापं गच्छेयं राक्षसाधिप ॥ ४१ ॥
राक्षसराज ! पहिल्याने माझा वध करूनच राम तुम्हाला मारू शकतील, परंतु मी स्वत:विषयी रामापासून संताप अथवा भय मानत नाही. ॥४१॥
कामं त्विदानीमपि मां व्यादिश त्वं परंतप ।
न परः प्रेषणीयस्ते युद्धायातुलविक्रम ॥ ४२ ॥
शत्रूंना संताप देणार्‍या अनुपम पराक्रमी वीरा ! यासमयी तू इच्छेनुसार मला युद्धासाठी आदेश दे. शत्रूंशी लढण्यासाठी तुम्हांला दुसर्‍या कोणाकडे पहाण्याची आवश्यकता नाही आहे. ॥४२॥
अहमुत्सादयिष्यामि शत्रूंस्तव महाबलान् ।
यदि शक्रो यदि यमो यदि पावकमारुतौ ॥ ४३ ॥

तानहं योधयिष्यामि कुबेरवरुणावपि ।
तुमचे महाबली शत्रु जरी इंद्र, यम, अग्नि, वायु, कुबेर आणि वरूण असले तरी मी त्यांच्याशीही युद्ध करीन तसेच त्यांना सर्वांना उपटून फेकून देईन. ॥४३ १/२॥
गिरिमात्रशरीरस्य शितशूलधरस्य मे ॥ ४४ ॥

नर्दतस्तीक्ष्णदंष्ट्रस्य बिभीयाद् वै पुरंदरः ।
माझे पर्वतासमान विशाल शरीर आहे. मी हातात तीक्ष्ण त्रिशूल धारण करतो आणि माझ्या दाढाही फार तीक्ष्ण आहेत. मी सिंहनाद केल्यावर इंद्राचाही भयाने थरकाप होईल. ॥४४ १/२॥
अथवा त्यक्तशस्त्रस्य मृद्नतस्तरसा रिपून् ॥ ४५ ॥

न मे प्रतिमुखः कश्चित् स्थातुं शक्तो जिजीविषुः ।
अथवा जरी मी शस्त्र त्याग करूनही वेगपूर्वक शत्रूंना तुडवित रणभूमीमध्ये विचरण करू लागलो तर कोणीही जगण्याची इच्छा करणारा पुरुष माझ्या समोर टिकू शकत नाही. ॥४५ १/२॥
नैव शक्त्या न गदया नासिना निशितैः शरैः ॥ ४६ ॥

हस्ताभ्यामेव संरभ्य हनिष्यामि सवज्रिणम् ।
मी ना शक्तिने, ना गदेने, ना तलवारीने आणि ना तीक्ष्ण बाणांनीही काम साधेन. रोषाने भरून केवळ दोन्ही हातांनीच वज्रधारी इंद्रासारख्या शत्रुलाही मृत्युच्या स्वाधीन करीन. ॥४६ १/२॥
यदि मे मुष्टिवेगं स राघवोऽद्य सहिष्यति ॥ ४७ ॥

ततः पास्यन्ति बाणौघा रुधिरं राघवस्य तु ।
जर राघव आज माझ्या मुष्टिचा वेग सहन करू शकतील तर माझे बाणसमूह निश्चितच त्यांच्या रक्ताचे पान करतील. ॥४७ १/२॥
चिन्तया तप्यसे राजन् किमर्थं मयि तिष्ठति ॥ ४८ ॥

सोऽहं शत्रुविनाशाय तव निर्यातुमुद्यतः।
राजन्‌ ! मी जिवंत असतांना तुम्ही कशासाठी चिंतेच्या आगीत जळत आहात ? मी तुमच्या शत्रूंचा विनाश करण्यासाठी आत्ता रणभूमीत जाण्यासाठी उद्यत आहे. ॥४८ १/२॥
मुञ्च रामाद् भयं घोरं निहनिष्यामि संयुगे ॥ ४९ ॥

राघवं लक्ष्मणं चैव सुग्रीवं च महाबलम् ।
तुम्हांला रामापासून जे घोर भय वाटत आहे, त्याचा त्याग करा. मी रणभूमीमध्ये राम, लक्ष्मण आणि महाबली सुग्रीवाला अवश्य मारून टाकीन. ॥४९ १/२॥
हनुमन्तं च रक्षोघ्नं लङ्‌का येन प्रदीपिता ॥ ५० ॥

हरींश्च भक्ष्ययिष्यामि संयुगे समुपस्थिते ।
असाधारणमिच्छामि तव दातुं महद् यशः ॥ ५१ ॥
युद्ध उपस्थित झाल्यावर मी, राक्षसांचा संहार करणार्‍या त्या हनुमानाला जिवंत सोडणार नाही; ज्याने लंका जाळली होती. त्याच बरोबर अन्य वानरांनाही मी खाऊन टाकीन. आज मी तुम्हांला अलौकिक आणि महान्‌ यश प्रदान करु इच्छितो. ॥५०-५१॥
यदि चेन्द्राद् भयं राजन् यदि वापि स्वयंभुवः ।
ततोऽहं नाशयिष्यामि नैशं तम इवांशुमान् ॥ ५२ ॥
राजन्‌ ! जर तुम्हांला इंद्र अथवा स्वयंभू ब्रह्मदेवापासूनही भय असेल तर मी ते भयही, सूर्य जसा रात्रीच्या अंधकाराला नष्ट करून टाकतो त्याप्रमाणे नष्ट करून टाकीन. ॥५२॥
अपि देवाः शयिष्यन्ते क्रुद्धे मयि महीतले ।
यमं च शमयिष्यामि भक्षयिष्यामि पावकम् ॥ ५३ ॥
मी कुपित झालो तर देवताही धराशायी होऊन जातील.(मग मनुष्य आणि वानरांची काय गोष्ट आहे ?) मी यमराजाला ही शान्त करून टाकीन. सर्वभक्षी अग्निलाही भक्षण करून टाकीन. ॥५३॥
आदित्यं पातयिष्यामि सनक्षत्रं महीतले ।
शतक्रतुं वधिष्यामि पास्यामि वरुणालयम् ॥ ५४ ॥
नक्षत्रांसहित सूर्यालाही पृथ्वीवर पाडून टाकीन; इंद्राचाही वध करून टाकीन आणि समुद्रालाही पिऊन टाकीन. ॥५४॥
पर्वतांश्चूर्णयिष्यामि दारयिष्यामि मेदिनीम् ।
दीर्घकालं प्रसुप्तस्य कुंभकर्णस्य विक्रमम् ॥ ५५ ॥

अद्य पश्यन्तु भूतानि भक्ष्यमाणानि सर्वशः ।
नन्विदं त्रिदिवं सर्वं आहारो मम पूर्यते ॥ ५६ ॥
पर्वतांचा चुराडा करीन. भूमण्डळाला विदीर्ण करून टाकीन. आज माझ्याकडून खाल्ले जाणारे सर्व प्राणी, दीर्घकाळपर्यत झोपून उठलेल्या माझा कुंभकर्णाचा पराक्रम पाहू देत. हे सर्व त्रैलोक्य आहार बनले तरीही माझे पोट भरू शकणार नाही. ॥५५-५६॥
वधेन ते दाशरथेः सुखावहं
सुखं समाहर्तुमहं व्रजामि ।
निहत्य रामं सह लक्ष्मणेन
खादामि सर्वान् हरियूथमुख्यान् ॥ ५७ ॥
दाशरथि रामाचा वध करून मी तुला उत्तरोत्तर सुखाची प्राप्ति करविणारे सुख-सौभाग्य देण्याची इच्छा करतो आहे. लक्ष्मणासहित रामाचा वध करून सर्व मुख्य मुख्य वानरयूथपतिंना मी खाऊन टाकीन. ॥५७॥
रमस्व कामं पिब चाद्य वारुणीं
कुरुष्व कृत्यानि विनीय दुःखम् ।
मयाद्य रामे गमिते यमक्षयं
चिराय सीता वशगा भविष्यति ॥ ५८ ॥
राजन्‌ ! आता मजा करा. मदिरा प्या आणि मानसिक दु:खाला दूर करून सर्व कार्ये करा. आज माझ्याकडून रामाला यमलोकात पोहोचविले जाईल, मग तर सीता चिरकालासाठी (सदाच) तुझ्या अधीन होऊन जाईल. ॥५८॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद्युद्धकाण्डे त्रिषष्टितमः सर्गः ॥ ६३ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकाण्डाचा त्रेसष्टावा सर्ग पूरा झाला. ॥६३॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP