[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अयोध्याकाण्डे
। नवमः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
कुब्जायाः कुचक्रेण कैकेय्याः कोपभवने प्रवेशः - कुब्जेच्या कुचक्रामुळे कैकेयीचा कोपभवनात प्रवेश -
एवमुक्ता तु कैकेयी क्रोधेन ज्वलितानना ।
दीर्घमुष्णं विनिःश्वस्य मन्थरामिदमब्रवीत् ॥ १ ॥
क्रोधाने भडकलेली कैकेयी मंथरेला म्हणाली,
अद्य राममितः क्षिप्रं वनं प्रस्थापयाम्यहम् ।
यौवराज्येन भरतं क्षिप्रमद्याभिषेचये ॥ २ ॥
'कुब्जे ! मी रामाला शीघ्रच येथून वनात धाडीन आणि ताबडतोब भरताचा युवराज पदावर अभिषेक करवीन. ॥२॥
इदं त्विदानीं सम्पश्य केनोपायेन साधये ।
भरतः प्राप्नुयाद् राज्यं न तु रामः कथञ्चन ॥ ३ ॥
परंतु या समयी हा तर विचार कर की कुठल्या उपायाने आपले अभीष्ट साधन करू ? भरताला राज्य प्राप्त होईल आणि राम ते कुठल्याही प्रकारे प्राप्त करू शकणार नाही - हे काम कसे साधेल ? ॥३॥
एवमुक्ता तु सा देव्या मन्थरा पापदर्शिनी ।
रामार्थमुपहिंसन्ती कैकेयीमिदमब्रवीत् ॥ ४ ॥
देवी कैकेयीने असे म्हटल्यावर पापाचा मार्ग दाखविणारी मंथरा रामाच्या स्वार्थावर कुठाराघात करीत तेथे कैकेयीला या प्रकारे म्हणाली - ॥४॥
हन्तेदानीं प्रपश्य त्वं कैकेयि श्रूयतां वचः ।
यथा ते भरतो राज्यं पुत्रः प्राप्स्यति केवलम् ॥ ५ ॥
'कैकेयी ! ठीक आहे. आता पहा की मी काय करते ? तू माझे म्हणणे ऐक की ज्यायोगे केवळ तुझा पुत्र भरतच राज्य प्राप्त करील (राम नाही) ॥५॥
किं न स्मरसि कैकेयि स्मरन्ती वा निगूहसे ।
यदुच्यमानमात्मार्थं मत्तस्त्वं श्रोतुमिच्छसि ॥ ६ ॥
'कैकेयी ! काय तुला स्मरण नाही ? की स्मरण असूनही माझ्या पासून लपवून ठेवत आहेस ? ज्याची तू माझ्याशी अनेक वेळा चर्चा करीत राहतेस त्या आपल्या प्रयोजनाला तू माझ्या कडून ऐकू इच्छितेस कां ? याचे कारण काय आहे ? ॥६॥
मयोच्यमानं यदि ते श्रोतुं छन्दो विलासिनि ।
श्रूयतामभिधास्यामि श्रुत्वा चैतद् विधीयताम् ॥ ७ ॥
'विलासिनी ! जर माझ्याच मुखाने ऐकण्याचा तुझा आग्रह असेल तर मी सांगते, ऐक आणि ऐकून त्यास अनुसरून कार्य कर.' ॥७॥
श्रुत्वैवं वचनं तस्या मन्थरायास्तु कैकयी ।
किञ्चिदुत्थाय शयनात् स्वास्तीर्णादिदमब्रवीत् ॥ ८ ॥
मंथरेचे हे वचन ऐकून कैकेयी चांगल्या प्रकारे अंथरलेल्या त्या पलंगा वरून थोडीशी उठून बसून तिला असे म्हणाली- ॥८॥
कथयस्व ममोपायं केनोपायेन मन्थरे ।
भरतः प्राप्नुयाद् राज्यं न तु रामः कथञ्चन ॥ ९ ॥
'मंथरे ! मला तो उपाय सांग. कोठल्या उपायाने भरताला तर राज्य मिळेल परंतु राम ते कुठल्याही प्रकारे मिळवू शकणार नाही.' ॥९॥
एवमुक्ता तया देव्या मन्थरा पापदर्शिनी ।
रामार्थमुपहिंसन्ती कैकेयीमिदमब्रवीत् ॥ १० ॥
देवी कैकेयीने असे म्हटल्यावर पापाचा मार्ग दाखविणारी मंथरा रामाच्या स्वर्थावर कुठाराघात करीत त्या समयी कैकेयीला या प्रकारे म्हणाली - ॥१०॥
पुरा देवासुरे युद्धे सह राजर्षिभिः पतिः ।
अगच्छत् त्वामुपादाय देवराजस्य साह्यकृत् ॥ ११ ॥
'देवी ! पूर्व कालातील गोष्ट आहे की जेव्हा देवासुर- संग्रामाच्या वेळी राजर्षिंच्या बरोबर तुझे पतिदेव तुला बरोबर घेऊन देवराजाची सहाय्यता करण्यासाठी गेले होते. ॥११॥
दिशमास्थाय कैकेयि दक्षिणां दण्डकान् प्रति ।
वैजयन्तमिति ख्यातं पुरं यत्र तिमिध्वजः ॥ १२ ॥
स शम्बर इति ख्यातः शतमायो महासुरः ।

ददौ शक्रस्य सङ्‌‍ग्रामं देवसङ्‌‍घैरनिर्जितः ॥ १३ ॥
'कैकेयी ! दक्षिण दिशेला दण्डकारण्याच्या आत वैजयंत नावाने विख्यात एक नगर आहे, जेथे शंबर नावाने प्रसिद्ध एक महान असुर रहात होता. तो आपल्या ध्वजावर तिमि (व्हेल मासा) हे चिन्ह धारण करीत होता आणि शेकडो मायावी युक्त्यांचा जाणकार होता. देवतांचे समूहही त्याला पराजित करू शकत नव्हते. एक वेळ त्याने इंद्रा बरोबर युद्ध सुरू केले. ॥१२-१३॥
तस्मिन् महति सङ्‌‍ग्रामे पुरुषान् क्षतविक्षतान् ।
रात्रौ प्रसुप्तान् घ्नन्ति स्म तरसापास्य राक्षसाः ॥ १४ ॥
त्या समयी संग्रामात क्षत-विक्षत झालेले पुरुष रात्री जेव्हा थकून झोपी जात त्या समयी राक्षस त्यांना त्यांच्या बिछान्यावरून ओढून नेत असत आणि मारून टाकीत असत. ॥१४॥
तत्राकरोन्महायुद्धं राजा दशरथस्तदा ।
असुरैश्च महाबाहुः शस्त्रैश्च शकलीकृतः ॥ १५ ॥
त्या दिवसात महाबाहु राजा दशरथांनीही तेथे असुरांच्या बरोबर फार भारी युद्ध केले. त्या युद्धात असुरांनी आपल्या अस्त्र- शस्त्रांच्या द्वारे त्यांचे शरीरास जर्जर करून सोडले. ॥१५॥
अपवाह्य त्वया देवि सङ्‌‍ग्रामान्नष्टचेतनः ।
तत्रापि विक्षतः शस्त्रैः पतिस्ते रक्षितस्त्वया ॥ १६ ॥
देवी ! ज्यावेळी राजाची चेतना लुप्तशी झाली होती त्या समयी सारथ्याचे काम करीत असता तू आपल्या पतिला रणभूमी पासून दूर नेऊन त्यांचे रक्षण केलेस. जेव्हा तेथेही ते राक्षसांच्या शस्त्रानी घायळ झाले, तेव्हा तू पुन्हा तेथून अन्यत्र घेऊन जाऊन त्यांचे रक्षण केलेस. ॥१६॥
तुष्टेन तेन दत्तौ ते द्वौ वरौ शुभदर्शने ।
स त्वयोक्तः पतिर्देवि यदेच्छेयं तदा वरम् ॥ १७ ॥

गृह्णीयां तु तदा भर्तस्तथेत्युक्तं महात्मना ।
अनभिज्ञा ह्यहं देवि त्वयैव कथितं पुरा ॥ १८ ॥
'शुभदर्शने ! या योगे संतुष्ट होऊन महाराजांनी तुला दोन वरदान देण्याची इच्छा प्रकट केली. - देवी ! त्यावेळी तू आपल्या पतिला सांगितलेस - ' प्राणनाथ ! ज्यावेळी माझी इच्छा होईल त्यावेळी मी या वरांना मागून घेईन.' त्यावेळी त्या महात्मा नरेशाने 'तथास्तु' म्हणून तुझे म्हणणे मान्य केले होते. मी या कथेला जाणत नव्हते. पूर्वकाली तूच मला हा वृत्तांत सांगितला होतास. ॥१७-१८॥
कथैषा तव तु स्नेहान्मनसा धार्यते मया ।
रामाभिषेकसम्भारान्निगृह्य विनिवर्तय ॥ १९ ॥
'तेव्हा पासून तुझ्या स्नेहाला वश होऊन मीही गोष्ट मनातल्या मनात सदा स्मरणांत ठेवीत आले आहे. तू या वरांच्या प्रभावाने स्वामींना वश करून रामाच्या अभिषेकाच्या आयोजनाला (बदलून टाक) उलटवून टाक. ॥१९॥
तौ च याचस्व भर्तारं भरतस्याभिषेचनम् ।
प्रव्राजनं तु रामस्य वर्षाणि च चतुर्दश ॥ २० ॥
तू हे दोन्ही वर आपल्या स्वामी कडून मागून घे. एका वराच्या द्वारा भरताचा राज्याभिषेक आणि दुसर्‍याच्या द्वारा रामाचा चौदा वर्षेपर्यंत वनवास मागून घे. ॥२०॥
चतुर्दश हि वर्षाणि रामे प्रव्राजिते वनम् ।
प्रजाभावगतस्नेहः स्थिरः पुत्रो भविष्यति ॥ २१ ॥
'जेव्हा राम चौदा वर्षासाठी वनात निघून जातील' तेव्हा तेवढ्या काळात तुझा पुत्र भरत समस्त प्रजेच्या हृदयात आपल्या साठी स्नेह पैदा करून घेईल आणि या राज्यावर स्थिर होऊन जाईल. ॥२१॥
क्रोधागारं प्रविश्याद्य क्रुद्धेवाश्वपतेः सुते ।
शेष्वानन्तर्हितायां त्वं भूमौ मलिनवासिनी ॥ २२ ॥
'अश्वपतिकुमारी ! तू या वेळी मलीन वस्त्रे धारण कर आणि कोप भवनात प्रवेश करून कुपितशी होऊन विना शय्या भूमिवर झोपून राहा. (पडून राहा) ॥२२॥
मा स्मैनं प्रत्युदीक्षेथा मा चैनमभिभाषथाः ।
रुदन्ती पार्थिवं दृष्ट्‍वा जगत्यां शोकलालसा ॥ २३ ॥
राजे आले तरी त्यांच्याकडे डोळे वर करून पाहूही नको आणि त्यांच्याशी काही बोलूही नको. महाराजांना पहाताच रडत रडत शोकमग्न होऊन जमिनीवर लोळू लाग. ॥२३॥
दयिता त्वं सदा भर्तुरत्र मे नास्ति संशयः ।
त्वत्कृते च महाराजो विशेदपि हुताशनम् ॥ २४ ॥
यात जराही संदेह नाही की तू आपल्या पतिला सदा फार प्रिय वाटत आहेस. तुझ्यासाठी महाराज आगीतही प्रवेश करू शकतात. ॥२४॥
न त्वां क्रोधयितुं शक्तो न क्रुद्धां प्रत्युदीक्षितुम् ।
तव प्रियार्थं राजा हि प्राणानपि परित्यजेत् ॥ २५ ॥
ते तुला कुपित करू शकत नाहीत आणि तुला कुपित झालेली पाहू शकत नाहीत. राजा दशरथ तुझे प्रिय करण्यासाठी आपल्या प्राणांचाही त्याग करू शकतात. ॥२५॥
न ह्यतिक्रमितुं शक्तस्तव वाक्यं महीपतिः ।
मन्दस्वभावे बुद्ध्यस्व सौभाग्यबलमात्मनः ॥ २६ ॥
महाराज तुझे म्हणणे कुठल्याही प्रकारे टाळू शकत नाहीत. मुग्धे ! तू आपल्या सौभाग्याच्य बळाचे स्मरण कर. ॥२६॥
मणिमुक्तासुवर्णानि रत्‍नानि विविधानि च ।
दद्याद् दशरथो राजा मा स्म तेषु मनः कृथाः ॥ २७ ॥
राजा दशरथ तुला भुलविण्यासाठी मणि, मोती, सुवर्ण तसेच तर्‍हे तर्‍हेची रत्‍ने देण्याचा प्रयत्‍न करतील परंतु तू तिकडे आपले मन जाऊ देऊ नको. ॥२७॥
यौ तौ दैवासुरे युद्धे वरौ दशरथो ददौ ।
तौ स्मारय महाभागे सोऽर्थो न त्वा क्रमेदति ॥ २८ ॥
'महाभागे ! देवासुर संग्रामाच्या वेळी राजा दशरथांनी जे दोन वर दिले होते त्यांचे स्मरण त्यांना करून दे. वरदानाच्या रूपात मागितला गेलेला तुझा अभिष्ट मनोरथ सिद्ध झाल्या शिवाय राहू शकत नाही. ॥२८॥
यदा तु ते वरं दद्यात् स्वयमुत्थाप्य राघवः ।
व्यवस्थाप्य महाराजं त्वमिमं वृणुया वरम् ॥ २९ ॥
राघव राजा दशरथ जेव्हा स्वयं तुला जमिनीवर उठवून वर देण्यास उद्यत (तयार) होतील तेव्हां त्या महाराजांना सत्याची शपथ देऊन खूप पक्के करून त्यांच्या कडून वर माग. ॥२९॥
रामप्रव्रजनं दूरं नव वर्षाणि पञ्च च ।
भरतः क्रियतां राजा पृथिव्यां पार्थिवर्षभः ॥ ३० ॥
'वर मागते समयी सांग कि नृपश्रेष्ठ ! आपण रामाला चौदा वर्षांसाठी अत्यंत दूर वनांत धाडून द्या आणि भरताला भूमण्डलाचा राजा बनवा. ॥३०॥
चतुर्दश हि वर्षाणि रामे प्रव्राजिते वनम् ।
रूढश्च कृतमूलश्च शेषं स्थास्यति ते सुतः ॥ ३१ ॥
राम चौदा वर्षांसाठी वनात निघून गेल्यावर तुझा पुत्र भरत याचे राज्य सुदृढ होऊन जाईल आणि प्रजा आदिना वशकरून घेतल्याने येथे त्याची मुळे दृढ होऊन जातील. नंतर चौदा वर्षानंतरही ते आजीवन स्थिर बनून राहातील. ॥३१॥
रामप्रव्राजनं चैव देवि याचस्व तं वरम् ।
एनं सेत्स्यन्ति पुत्रस्य सर्वार्थास्तव कामिनि ॥ ३२ ॥
देवी ! तू राजांकडे रामाच्या वनवासाचा वर अवश्य माग. पुत्रासाठी राज्याची कामना करणार्‍या कैकेयी ! असे केल्याने तुझ्या पुत्राचे सर्व मनोरथ सिद्ध होतील. ॥३२॥
एवं प्रव्राजितश्चैव रामोऽरामो भविष्यति ।
भरतश्च गतामित्रस्तव राजा भविष्यति ॥ ३३ ॥
याप्रकारे वनवास मिळाल्यावर हे राम राम राहाणार नाहीत. (यांचा आज जो प्रभाव आहे तो भविष्यात राहू शकणार नाही.) आणि तुझे भरतही शत्रुहीन राजा होतील. ॥३३॥
येन कालेन रामश्च वनात् प्रत्यागमिष्यति ।
अन्तर्बहिश्च पुत्रस्ते कृतमूलो भविष्यति ॥ ३४ ॥
ज्या समयी राम वनांतून परत येतील, त्या वेळेपर्यंत तुमचा पुत्र भरत आंतून आणि बाहेरून द्दृढमूल होऊन जातील. ॥३४॥
सङ्‌‍गृहीतमनुष्यश्च सुहृद्‌भिः साकमात्मवान् ।
प्राप्तकालं तु मन्येऽहं राजानं वीतसाध्वसा ॥ ३५ ॥

रामाभिषेकसङ्‌कल्पान्निगृह्य विनिवर्तय ।
त्यांच्या जवळ सैनिक बलाचा संग्रह होईल. जितेंद्रिय तर ते आहेतच. आपल्या सुहृदांच्या बरोबर राहून ते दृढमूल होतील. यावेळी माझ्या (समजुती प्रमाणे) मान्यते प्रमाणे राजांना रामाच्या राज्याभिषेकाच्या संकल्पापासून हटविण्याचा समय आला आहे, म्हणून तू निर्भय होऊन राजांना आपल्या वचनांत बांधून घे आणि त्यांना रामाच्या अभिषेकाच्या संकल्पापासून हटवून टाक. ॥३५ १/२॥
अनर्थमर्थरूपेण ग्राहिता सा ततस्तया ॥ ३६ ॥

हृष्टा प्रतीता कैकेयी मन्थरामिदमब्रवीत् ।
सा हि वाक्येन कुब्जायाः किशोरीवोत्पथं गता ॥ ३७ ॥

कैकेयी विस्मयं प्राप्य परं परमदर्शना ।
अशा गोष्टी सांगून मंथरेने कैकेयीच्या बुद्धीत अनर्थालाच अर्थरूपात बदलून टाकले. कैकेयीचा तिच्या म्हणण्यावर विश्वास बसला आणि ती मनातल्या मनात फार प्रसन्न झाली. जरी ती खूप समजूतदार होती तरीही कुबडीच्या सांगण्या वरून मूर्ख बालिके प्रमाणे कुमार्गाकडे वळली - अनुचित काम करण्यास तयार झाली. तिला मंथरेच्या बुद्धीबद्दल फारच आश्चर्य वाटले आणि ती तिला याप्रकारे म्हणाली - ॥३६-३७ १/२॥
प्रज्ञां ते नावजानामि श्रेष्ठे श्रेष्ठाभिधायिनि ॥ ३८ ॥

पृथिव्यामसि कुब्जानामुत्तमा बुद्धिनिश्चये ।
त्वमेव तु ममार्थेषु नित्ययुक्ता हितैषिणी ॥ ३९ ॥
'हिताची गोष्ट सांगण्यात कुशल कुब्जे ! तू एक श्रेष्ठ स्त्री आहेस, मी तुझ्या बुद्धीची अवहेलना करणार नाही. बुद्धीच्या द्वारे कुठल्याही कार्याचा निश्चय करण्यात तू या पृथ्वीवरील सर्व कुब्जांमध्ये उत्तम आहेस. केवळ तूच माझी हितैषिणी आहेस आणि सदा सावधान राहून माझे कार्य सिद्ध करण्यास गढलेली असतेस. ॥३८-३९॥
नाहं समवबुद्ध्येयं कुब्जे राज्ञः चिकीर्षितम् ।
सन्ति दुःसंस्थिताः कुब्जा वक्राः परमपापिकाः ॥ ४० ॥
'कुब्जे ! जर तू नसतीस तर राजे जे षडयंत्र रचू इच्छित आहेत ते कदापि माझ्या बुद्धीस समजून आले नसते. तुझ्या शिवाय जितक्या कुब्जा आहेत त्या बेडौल शरीराच्या, वाकड्यातिकड्या आणि पापिणी आहेत. ॥४०॥
त्वं पद्ममिव वातेन सन्नता प्रियदर्शना ।
उरस्तेऽभिनिविष्टं वै यावत् स्कन्धात् समुन्नतम् ॥ ४१ ॥
'तू तर वायुच्या द्वारा झुकविल्या गेलेल्या कमलिनी प्रमाणे थोडीशी झुकलेली असूनही दिसण्यात प्रिय (सुंदर) आहेस. तुझे वक्षःस्थल कुब्जताच्या दोषाने व्याप्त आहे म्हणून खांद्यापर्यंत उंच दिसून येत आहे. ॥४१॥
अधस्ताच्चोदरं शान्तं सुनाभमिव लज्जितम् ।
परिपूर्णं तु जघनं सुपीनौ च पयोधरौ ॥ ४२ ॥
'वक्षःस्थलाच्या खाली सुंदर नाभिने युक्त जे उदर आहे ते जणुं वक्षस्थलाची उंची पाहून लज्जितसे झाले आहे., म्हणून शांत आणि कृश प्रतीत होत आहे. तुझे जघन विस्तृत आहे आणि दोन्ही स्तनही सुंदर आणि स्थूल आहेत. ॥४२॥
विमलेन्दुसमं वक्त्रमहो राजसि मन्थरे ।
जघनं तव निर्मृष्टं रशनादामभूषितम् ॥ ४३ ॥
'मंथरे ! तुझे मुख निर्मल चंद्रम्या समान अद्‍भुत शोभा प्राप्त करीत आहे. करगोट्याच्या लड्यांनी विभूषित तुझ्या कटीचा अग्रभाग फारच स्वच्छ - रोमादि रहित आहे. ॥४३॥
जङ्‌‍घे भृशमुपन्यस्ते पादौ च व्यायतावुभौ ।
त्वमायताभ्यां सक्थिभ्यां मन्थरे क्षौमवासिनी ॥ ४४ ॥

अग्रतो मम गच्छन्ती राजसेऽतीव शोभने ।
'मंथरे ! तुझ्या पोटर्‍या एकमेकीला चिकटलेल्या आहेत आणि दोन्ही पाय मोठे-मोठे आहेत. तू विशाल मांड्यांनी (उरूनी) सुशोभित होत आहेस. शोभने ! तू जेव्हा रेशमी साडी नेसून माझ्या पुढे पुढे चालतेस, तेव्हा तू फारच शोभून दिसतेस. ॥४४ १/२॥
आसन् याः शम्बरे मायाः सहस्रमसुराधिपे ॥ ४५ ॥

हृदये ते निविष्टास्ता भूयश्चान्याः सहस्रशः ।
तदेव स्थगु यद् दीर्घं रथघोणमिवायतम् ॥ ४६ ॥

मतयः क्षत्रविद्याश्च मायाश्चात्र वसन्ति ते ।
असुरराज शंबराला ज्या हजारो मायांचे ज्ञान आहे त्या सर्व तुझ्या हृदयांस स्थित आहेत. याशिवाय तू हजारो प्रकारच्या माया जाणतेस. या मायांचा समुदायच हे तुझे मोठे कुब्ज आहे, जे रथांच्या अग्रभागा प्रमाणे मोठे आहे. यांतच तुझी बुद्धी, स्मृति, मति, क्षत्रविद्या (राजनीति) तथा नाना प्रकारच्या माया निवास करतात. ॥४५- ४६ १/२॥
अत्र तेऽहं प्रमोक्ष्यामि मालां कुब्जे हिरण्मयीम् ॥ ४७ ॥

अभिषिक्ते च भरते राघवे च वनं गते ।
जात्येन च सुवर्णेन सुनिष्टप्तेन सुन्दरि ॥ ४८ ॥

लब्धार्था च प्रतीता च लेपयिष्यामि ते स्थगु ।
'सुंदरी कुब्जे ! जर भरताचा राज्याभिषेक झाला आणि राघव वनात निघून गेले तर मी सफल मनोरथ एवं संतुष्ट होऊन उत्तम जातिच्या खूप तापविलेल्या सोन्याच्या बनविलेल्या सुंदर स्वर्णमालेने तुझे हे कुबड अलंकृत करीन आणि याच्यावर चंदनाचा लेप लावीन. ॥४७- ४८ १/२॥
मुखे च तिलकं चित्रं जातरूपमयं शुभम् ॥ ४९ ॥

कारयिष्यामि ते कुब्जे शुभान्याभरणानि च ।
परिधाय शुभे वस्त्रे देवतेव चरिष्यसि ॥ ५० ॥
'कुब्जे ! तुझ्या मुखावर (ललाटावर) सुंदर आणि विचित्र सोन्याची सुंदर टिकली लावीन आणि तुला बरीचशी सुंदर आभूषणे एवं दोन उत्तम वस्त्रे देईन जी धारण करून तू देवाङ्‌‍गने प्रमाणे विचरण करशील. ॥४९-५०॥
चन्द्रमाह्वयमानेन मुखेनाप्रतिमानना ।
गमिष्यसि गतिं मुख्यां गर्वयन्ती द्विषज्जने ॥ ५१ ॥
चंद्रम्याशी स्पर्धा करणार्‍या आपल्या मनोहर मुखाच्या द्वारा तू अशी सुंदर दिसशील की तुझ्या मुखाची कुणी बरोबरी करू शकणार नाही तथा शत्रूंच्या मध्ये आपल्या सौभाग्याबद्दल गर्व प्रकट करीत असता तू सर्वश्रेष्ठ स्थान प्राप्त करशील. ॥५१॥
तवापि कुब्जाः कुब्जायाः सर्वाभरणभूषिताः ।
पादौ परिचरिष्यन्ति यथैव त्वं सदा मम ॥ ५२ ॥
जशी तू सदा माझ्या चरणांशी सेवा करीत असतेस, त्या प्रकारे समस्त आभूषणांनी विभूषित बर्‍याचशा कुब्जा तुझी कुब्जेचीही सदाच चरणांची परिचर्या करीत राहातील. ॥५२॥
इति प्रशस्यमाना सा कैकेयीमिदमब्रवीत् ।
शयानां शयने शुभ्रे वेद्यामग्निशिखामिव ॥ ५३ ॥
जेव्हा या प्रकारे कुब्जेची प्रशंसा केली गेली तेव्हा तिने वेदीवरील प्रज्वलित अग्नि-शिखे प्रमाणे, शुभ्र शय्येवर शयन करणार्‍या कैकेयीला या प्रकारे म्हटले- ॥५३॥
गतोदके सेतुबन्धो न कल्याणि विधीयते ।
उत्तिष्ठ कुरु कल्याणं राजानमनुदर्शय ॥ ५४ ॥
'कल्याणी ! नदीचे पाणी वाहून गेल्यावर तिच्यावर बांध बांधला जात नाही. (जर रामाचा अभिषेक होऊन गेला तर मग तुझे वर मागणे व्यर्थ होईल, म्हणून गोष्टी करण्यात वेळ घालवूं नको.) त्वरा कर, ऊठ आणि आपले कल्याण करून घे. कोपभवनात जाऊन राजाला आपल्या अवस्थेचा परिचय दे'. ॥५४॥
तथा प्रोत्साहिता देवी गत्वा मन्थरया सह ।
क्रोधागारं विशालाक्षी सौभाग्यमदगर्विता ॥ ५५ ॥
अनेकशतसाहस्रं मुक्ताहारं वराङ्‌‍गना ।
अवमुच्य वरार्हाणि शुभान्याभरणानि च ॥ ५६ ॥
मंथरेने या प्रकारे प्रोत्साहन दिल्यावर सौभाग्याच्या मदाने गर्व करणारी विशाल लोचना सुंदरी कैकेयी देवी तिच्या सहच कोपभवनात जाऊन लाखोंच्या किंमतीचे मोत्यांचे हार तथा दुसरीही अनेक सुंदर बहुमूल्य आभूषणे आपल्या शरीरांवरून उतरवून उतरवून फेकू लागली. ॥५५-५६॥
तदा हेमोपमा तत्र कुब्जावाक्यवशंगता ।
संविश्य भूमौ कैकेयी मन्थरामिदमब्रवीत् ॥ ५७ ॥
सोन्याच्या समान सुंदर कांतिची कैकेयी कुब्जेच्या बोलण्याला वश झाली, म्हणून ती जमिनीवर पडून मंथरेला याप्रमाणे म्हणाली - ॥५७॥
इह वा मां मृतां कुब्जे नृपायावेदयिष्यसि ।
वनं तु राघवे प्राप्ते भरतः प्राप्स्यते क्षितिम् ॥ ५८ ॥

सुवर्णेन न मे ह्यर्थो न रत्‍नैर्न च भोजनैः ।
एष मे जीवितस्यान्तो रामो यद्यभिषिच्यते ॥ ५९ ॥
'कुब्जे ! मला सुवर्णाशी प्रयोजन नाही, रत्‍नांशी प्रयोजन नाही, आणि तर्‍हेतर्‍हेच्या भोजनांशी काही प्रयोजन नाही, जर रामाचा राज्याभिषेक झाला तर तो माझ्या या जीवनाचा अंत होईल. आता एक तर राघव वनात निघून गेल्यावर भरताला या भूतलाचे राज्य प्राप्त होईल अथवा तू येथे महाराजांना माझ्या मृत्युचा समाचार सांगशील. ॥५८-५९॥
अथो पुनस्तां महिषीं महीक्षितो
     वचोभिरत्यर्थमहापराक्रमैः ।
उवाच कुब्जा भरतस्य मातरं
     हितं वचो राममुपेत्य चाहितम् ॥ ६० ॥
तदनंतर कुब्जा, महाराज दशरथांची राणी आणि भरताची माता कैकेयीला अत्यंत क्रूर वचनांच्या द्वारे पुन्हा अशा गोष्टी सांगू लागली की ज्या लौकिक दृष्टीने भरतासाठी हितकर आणि रामासाठी अहितकारक होत्या. - ॥६०॥
प्रपत्स्यते राज्यमिदं हि राघवो
     यदि ध्रुवं त्वं ससुता च तप्स्यसे ।
ततो हि कल्याणि यतस्व तत् तथा
     यथा सुतस्ते भरतोऽभिषेक्ष्यते ॥ ६१ ॥
'कल्याणी ! जर राघवाला हे राज्य प्राप्त झाले तर निश्चितच आपला पुत्र भरत याच्यासह तू भारी संतापात पडशील, म्हणून असा प्रयत्‍न कर ज्यायोगे तुझा पुत्र भरत यास राज्याभिषेक होऊन जाईल. ॥६१॥
तथातिविद्धा महिषीति कुब्जया
     समाहता वागिषुभिर्मुहुर्मुहुः ।
विधाय हस्तौ हृदयेऽतिविस्मिता
     शशंस कुब्जां कुपिता पुनः पुनः ॥ ६२ ॥
या प्रकारे कुब्जेने आपल्या वचनरूपी बाणांचा वारंवार प्रहार करून जेव्हा राणी कैकेयीला अत्यंत घायाळ करून सोडले, तेव्हा ती अत्यंत विस्मित आणि कुपित होऊन आपल्या हृदयावर दोन्ही हात ठेऊन वारंवार याप्रकारे म्हणू लागली - ॥६२॥
यमस्य वा मां विषयं गतामितो
     निशम्य कुब्जे प्रतिवेदयिष्यसि ।
वनं गते वा सुचिराय राघवे
     समृद्धकामो भरतो भविष्यति ॥ ६३ ॥
'कुब्जे ! आता एक तर राघव दीर्घ काळपर्यंत वनात निघून गेल्यावर भरताचा मनोरथ सफल होईल अथवा तू मला येथून यमलोकास निघून गेलेली ऐकून महाराजांना हा समाचार निवेदन करशील. ॥६३॥
अहं हि नैवास्तरणानि न स्रजो
     न चन्दनं नाञ्जनपानभोजनम् ।
न किञ्चिदिच्छामि न चेह जीवनं
     न चेदितो गच्छति राघवो वनम् ॥ ६४ ॥
जर राघव येथून वनात गेले नाही तर मी नाना तर्‍हेच्या शय्या, फुलांचे हार ,चंदन, अञ्जन, पान, भोजन अथवा इतर अन्य कुठल्या गोष्टी घेण्याची इच्छा करणार नाही, एवढेच नव्हे तर अशा स्थितिमध्ये मी हे जीवन राखण्याचीही इच्छा करणार नाही. ॥६४॥
अथैवमुक्त्वा वचनं सुदारुणं
     निधाय सर्वाभरणानि भामिनी ।
असंस्कृतामास्तरणेन मेदिनीं
     तदाधिशिश्ये पतितेव किन्नरी ॥ ६५ ॥
असे अत्यंत कठोर वचन बोलून कैकेयीने सर्व आभूषणे उतरवून टाकली आणि अंथरुण पांघरूणाशिवाय ती खाली जमिनीवर झोपली. त्या समयी ती स्वर्गातून भूतलावर पडलेल्या एखाद्या किन्नरीसमान भासत होती. ॥६५॥
उदीर्णसंरम्भतमोवृतानना
     तदावमुक्तोत्तममाल्यभूषणा ।
नरेन्द्रपत्‍नी विमला बभूव सा
     तमोवृता द्यौरिव मग्नतारका ॥ ६६ ॥
तिचे मुख वाढलेल्या अमर्षरूपी अंधकाराने आच्छादित झाले होते. तिच्या अंगावरील उत्तम पुष्पहार आणि आभूषणे उतरविली गेली होती. त्या दशेत उदास मनस्क राजराणी कैकेयी ज्यांतील तारे लुप्त झाले आहेत अशा अंधकाराने व्याप्त आकाशाप्रमाणे प्रतीत होत होती. ॥६६॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् अयोध्याकाण्डे नवमःसर्गः ॥ ९ ॥
या प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील अयोध्याकाण्डाचा नववा सर्ग पुरा झाला. ॥९॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP