संपातिं पर्वतशिखरादवतार्याङ्गदेन तं प्रति जटायुर्वधवृत्तांतस्य निवेदनं, रामसुग्रीवयोर्मैत्रीं वालिनो वधं च निशाम्य स्वप्रायोपवेशनस्य यत्कारणं तस्य वर्णनम् -
|
अंगदांनी संपातिला पर्वत शिखरावरून खाली उतरवून त्यांना जटायु मारला गेल्याचा वृत्तांत सांगणे तसेच राम-सुग्रीवांची मैत्री तसेच वालिवधाचा प्रसंग ऐकवून आपल्या आमरण उपवासाचे कारण निवेदन करणे -
|
शोकाद् भ्रष्टस्वरमपि श्रुत्वा ते हरियूथपाः । श्रद्दधुर्नैव तद्वाक्यं कर्मणा तस्य शंकिताः ॥ १ ॥
|
शोकामुळे संपत्तिचा स्वर विकृत झाला होता. त्यांनी सांगितलेली, गोष्ट ऐकूनही वानर-यूथपतिंनी त्यावर विश्वास ठेवला नाही, कारण ते त्यांच्या कर्माविषयी शंकित होते. ॥१॥
|
ते प्रायमुपविष्टास्तु दृष्ट्वा गृध्रं प्लवंगमाः । चक्रुर्बुद्धिं तदा रौद्रां सर्वान् नो भक्षयिष्यति ॥ २ ॥
|
आमरण उपवासासाठी तेथे बसलेल्या वानरांनी त्या समयी त्या गिधाडास पाहून असा भयंकर विचार केला की हा आम्हा सर्वांना खाऊन तर टाकणार नाही ना ? ॥२॥
|
सर्वथा प्रायमासीनान् यदि नो भक्षयिष्यति । कृतकृत्या भविष्यामः क्षिप्रं सिद्धिमितो गताः ॥ ३ ॥
|
’ठीक आहे, आम्ही सर्व तर सर्व प्रकारे मरणांत उपवासाचे व्रत घेऊनच बसलो होते. जर हा पक्षी आम्हांला खाऊन टाकील तर मग आमचे काम होऊन जाईल. आम्हांला लवकरच सिद्धी प्राप्त होईल. ॥३॥
|
एतां बुद्धिं ततश्चक्रुः सर्वे ते हरियूथपाः । अवतार्य गिरेः शृङ्गा्द् गृध्रमाहाङ्ग दस्तदा ॥ ४ ॥
|
मग तर त्या समस्त वानर यूथपतिंनी हाच निश्चय केला. त्या समयी त्या गृध्राला त्या पर्वत शिखरावरून उतरवून अंगद म्हणाले- ॥४॥
|
बभूवर्क्षरजा नाम वानरेंद्रः प्रतापवान् । ममार्यः पार्थिवः पक्षिन् धार्मिकस्तस्य चात्मजौ ॥ ५ ॥
सुग्रीवश्चैव वाली च पुत्रौ घनबलावुभौ । लोके विश्रुतकर्माभूद् राजा वाली पिता मम ॥ ६ ॥
|
’पक्षिराज ! पूर्वी एक प्रतापी वानरराजा होऊन गेले ज्यांचे नाव होते ऋक्षराजा. राजा ऋक्षराजा माझे पितामह होते. त्यांना दोन धर्मात्मा पुत्र झाले- सुग्रीव आणि वाली. दोघेही फार बलवान् झाले. त्यांपैकी राजा वाली हे माझे पिता होते. संसारात आपल्या पराक्रमामुळे त्यांची फार ख्याती होती. ॥५-६॥
|
राजा कृत्स्नस्य जगत इक्ष्वाकूणां महारथः । रामो दाशरथिः श्रीमान् प्रविष्टो दण्डकावनम् ॥ ७ ॥
लक्ष्मणेन सह भ्रात्रा वैदेह्या चापि भार्यया । पितुर्निदेशनिरतो धर्म्यं पंथानमाश्रितः ॥ ८ ॥
|
’काही वर्षे पूर्वी इक्ष्वाकुवंशाचे महारथी वीर दशरथकुमार श्रीमान् रामचंद्र, जे संपूर्ण जगाचे राजे आहेत, पित्याच्या आज्ञेचे पालन करण्यात तत्पर होऊन धर्ममार्गाचा आश्रय घेऊन दण्डकारण्यात आले होते. त्यांच्या बरोबर त्यांचे लहान बंधु लक्ष्मण तसेच त्यांची धर्मपत्नी वैदेही सीताही होती. ॥७-८॥
|
तस्य भार्या जनस्थानाद् रावणेन हृता बलात् । रामस्य तु पितुर्मित्रं जटायुर्नाम गृध्रराट् ॥ ९ ॥
ददर्श सीतां वैदेहीं ह्रियमाणां विहायसा । रावणं विरथं कृत्वा स्थापयित्वा च मैथिलीम् । परिश्रांतश्च वृद्धश्च रावणेन हतो रणे ॥ १० ॥
|
’जनस्थानात आल्यावर त्यांची पत्नी सीता हिचे रावणाने बलपूर्वक हरण केले. त्या समयी गृध्रराज जटायुंनी, जे रामांच्या पित्याचे मित्र होते - पाहिले - रावण आकाशमार्गाने वैदेहीला घेऊन जात आहे हे पहाताच ते रावणावर तुटून पडले आणि त्याचा रथ नष्टभ्रष्ट करून त्यांनी मैथिलीला सुरक्षितरूपाने भूमीवर उतरविले. परंतु ते वृद्ध तर होतेच, युद्ध करता करता थकून गेले आणि शेवटी रणक्षेत्रात रावणाच्या हाताने मारले गेले. ॥९-१०॥
|
एवं गृध्रो हतस्तेन रावणेन बलीयसा । संस्कृतश्चापि रामेण गतश्च गतिमुत्तमाम् ॥ ११ ॥
|
’याप्रकारे महाबली रावणाच्या द्वारे जटायुचा वध झाला. स्वतः श्रीरामांनी त्यांचा दाहसंस्कार केला आणि ते उत्तम गतिला (साकेतधामास) प्राप्त झाले. ॥११॥
|
ततो मम पितृव्येण सुग्रीवेण महात्मना । चकार राघवः सख्यं सोऽवधीत्पितरं मम ॥ १२ ॥
|
’त्यानंतर राघवांनी माझे काका महात्मा सुग्रीवाशी मैत्री केली आणि त्यांच्या सांगण्यावरून त्यांनी माझ्या पित्याचा वध केला. ॥१२॥
|
मम पित्रा विरुद्धो हि सुग्रीवः सचिवैः सह । निहत्य वालिनं रामः ततस्तमभिषेचयत् ॥ १३ ॥
|
’माझ्या पित्याने मंत्र्यांसहित सुग्रीवांना राज्य सुखापासून वंचित केले होते. म्हणून श्रीरामांनी माझा पिता वाली यांना मारून सुग्रीवांना राज्याभिषेक करविला. ॥१३॥
|
स राज्ये स्थापितस्तेन सुग्रीवो वानरेश्वरः । राजा वानरमुख्यानां येन प्रस्थापिता वयम् ॥ १४ ॥
|
’त्यांनीच सुग्रीवांना वालीच्या राज्यावर स्थापित केले. आता सुग्रीव वानरांचे स्वामी आहेत. मुख्य मुख्य वानरांचेही राजे आहेत. त्यांनी आम्हाला सीतेच्या शोधासाठी धाडले आहे. ॥१४॥
|
एवं रामप्रयुक्तस्तु मार्गमाणास्ततस्ततः । वैदेहीं नाधिगच्छामो रात्रौ सूर्यप्रभामिव ॥ १५ ॥
|
’याप्रकारे श्रीरामांकडून प्रेरित होऊन आम्ही लोक वैदेही सीतेचा शोध करीत इकडे तिकडे फिरत आहोत पण आतापर्यंत त्यांचा पत्ता लागला नाही. ज्याप्रमाणे रात्री सूर्याच्या प्रभेचे दर्शन होत नाही त्या प्रकारे आम्हांला या वनात जानकीचे दर्शन झाले नाही. ॥१५॥
|
ते वयं दण्डकारण्यं विचित्य सुसमाहिताः । अज्ञानात्तु प्रविष्टाः स्म धर्मिण्या विवृतं बिलम् ॥ १६ ॥
|
’आम्ही आपल्या मनाला एकाग्र करून दण्डकारण्यात उत्तम प्रकारे शोध करीत असता अज्ञानवश पृथ्वीच्या एक उघड्या विवरात घुसलो. ॥१६॥
|
मयस्य मायाविहितं तद् बिलं च विचिन्वताम् । व्यीततस्तत्र नो मासो यो राज्ञा समयः कृतः ॥ १७ ॥
|
’ते विवर मयासुराच्या मायेने निर्माण झाले होते. त्यात शोधता शोधता आमचा एक महिना निघून गेला, जो अवधि राजा सुग्रीवांनी आम्ही परतण्यासाठी म्हणून निश्चित केला होता. ॥१७॥
|
ते वयं कपिराजस्य सर्वे वचनकारिणः । कृतां संस्थामतिक्रांता भयात् प्रायमुपास्महे ॥ १८ ॥
|
’आम्ही सर्व लोक राजा सुग्रीवांचे आज्ञाकारी आहोत, परंतु त्यांच्या द्वारा निश्चित केलेली मुदत उलटून गेली आहे, म्हणून त्यांच्या भयाने आम्ही येथे आमरण उपवास करत आहोत. ॥१८॥
|
क्रुद्धे तस्मिंस्तु काकुत्स्थे सुग्रीवे च सलक्ष्मणे । गतानामपि सर्वेषां तत्र नो नास्ति जीवितम् ॥ १९ ॥
|
’काकुत्स्थ कुलभूषण श्रीराम, लक्ष्मण आणि सुग्रीव तिघेही आमच्यावर कुपित होतील. अशा स्थितिमध्ये तेथे परत गेल्यानंतरही आम्हा सर्वांचे प्राण वाचू शकणार नाहीत. ॥१९॥
|
इत्यार्षे श्रीमद्रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये किष्किंधाकाण्डे सप्तपञ्चाशः सर्गः ॥ ५७ ॥
|
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील किष्किंधाकाण्डाचा सत्तावन्नावा सर्ग पूरा झाला. ॥५७॥
|