॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
युद्धकांड
॥ अध्याय सत्त्याहत्तरावा ॥
श्रीरामांना अयोध्यादर्शन -
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
जानकीची प्रेमावस्था । देखोनियां रघुनाथा ।
हर्ष दाटला निजचित्ता । उचलोनि तत्वता आलिंगिली ॥ १ ॥
उठवोनियां जानकीसी । रामेश्वरदर्शन घ्यावयासी ।
राम चालिला अतिप्रीतीसीं । विमान भूमीसीं उतरलें ॥ २ ॥
श्रीरामाचें विमान रामेश्वरी उतरताच ऋषीचे रामदर्शनार्थ आगमन :
भूमीं उतरतां विमान । रामदर्शनालागून ।
आली ऋषिमंडळी धांवोन । केलें नमन अति प्रीतीं ॥ ३ ॥
अगस्तिलोपामुद्रासमवेत । ऋषी पातले समस्त ।
त्यांते दोखोनियां रघुनाथा । नमन करीत लोटांगणीं ॥ ४ ॥
भूमीं उतरतां विमान । श्रीरामदर्शनालागून ।
तिहीं करोनियां उठवण । रघुनंदन नमियेला ॥ ५ ॥
तेथे ऋषींचा जयजयकार । वानरवीरांचा भुभुःकार ।
नादें कोंदलें अंबर । दिशा समग्र दुमदुमिल्या ॥ ६ ॥
रावण निवडूनियां सकुळी । सोडविली सुरमंडळी ।
नवग्रहांची बेडी तुटली । संस्थापिलीं ऋषिकुळें ॥ ७ ॥
श्रीरामें नमिले ऋषिगण । ऋषींनी नमिला रघुनंदन ।
तुझेनि धर्मे जनस्थान । वसतिस्थान मुनिवरां ॥ ८ ॥
हेंचि नवल सांगों किती । तुवां स्थापिली त्रिजगती ।
सृष्टि प्रतिपाळावया रघुपती । अवतार निश्चिती पै तुझा ॥ ९ ॥
अगस्तिकृत रामगुणसंकीर्तन :
ऐसा ऋषीश्वरांचा भार । स्तविते झाले रघुवीर ।
तंव अगस्तिलोपामुद्रा चतुर । स्तवन सत्वर करितीं झाली ॥ १० ॥
जय जय सकळकल्याणा । सकळमंगलनिधाना ।
सज्जनवनचंदना । सत्समाधाना कैवल्यनिधे ॥ ११ ॥
जयजयाजी दुष्टनिर्दळणा । दुःखघ्ना द्वैतभंजना ।
द्वैताद्वैतदेखणा । देखणेपणा श्रीरामा ॥ १२ ॥
जयभवजाळनिरसना । मत्त भवइभ भंजना ।
भक्त जनसंरक्षणा । प्रेमपरिपूर्णा अनुग्रहशीळा ॥ १३ ॥
सुरसंकटनिरसना । सुरवरसंस्थापना ।
निवटोनियां दशानना । केलें त्रिमुवना संतुष्ट ॥ १४ ॥
ऋषि वाल्मीकाचे भाष्य । अनागत अति सुरस ।
तें आणिलें सत्यास । केलें सकळांस संतुष्ट ॥ १५ ॥
पूर्वी मज श्रीशंकरें । सांगीतलें अत्यादरें ।
श्रीराम भेटेल निर्धा । जाय सत्वरें दक्षिणेसी ॥ १६ ॥
काशीविरहें अत्यंत । मी झालों अति दुःखित ।
तेणें काळें मज समस्त । चरित्र अनागत सांगितलें ॥ १७ ॥
जें ध्येय श्रीशंकराचें । निर्गुण ब्रह्म साचें ।
आजि दर्शन झालें त्याचें । कळले आमुचें भाग्य जें ॥ १८ ॥
निजभाग्याचा परम सोहळा । जो परब्रह्माचा पुतळा ।
तो श्रीराम घनसांवळा । स्वयें निजडोळां देखिला ॥ १९ ॥
श्रीरामांकडून अगस्तींची स्तुती :
ऐसें अगस्तीचे वचन । ऐकतांवी रघुनंदन ।
स्वयें झाला हास्यवदन । कृतकल्याण तुझेनि आम्ही ॥ २० ॥
घेवोनि स्वामीचें दर्शन । पुढारें करितां गमन ।
तुझे अनुग्रहें जाण । सकळ विघ्न निरसलें ॥ २१ ॥
तुझे निजकृपेंकरोन । आपेंआप दशवदन ।
निवटला न लागतां क्षण । ससैन्य जाण स्वामिया ॥ २२ ॥
तुझेनि धर्मे कृपानिधी । सुखें सुटली सुरमांदी ।
स्वयें बैसले निजपदीं । निजानंदीं गर्जत ॥ २३ ॥
तुम्हीं वसविलें दंडकारण्य । तैंच निमाला रावण ।
तैं सुटले सुरगण । रघुनंदन निमित्तमात्र ॥ २४ ॥
ऐसें अगरीचे स्तवन । आच्छादोनि अवतारचिन्ह ।
करिता झाला रघुनंदन । तेणें ऋषिगण सुखरूप ॥ २५ ॥
लोपामुद्रेला सेतुची माहिती सांगू नये असे राम सीतेला सांगतात :
रघुनाथ म्हणे जानकीसी । लोपामुद्रा पुसेल कीर्तीसी ।
तरी न सांगावें सेतुबंधासी । सांगता छळणासी पावसील ॥ २६ ॥
पुढील कथानुसंधान । रामेश्वरतीर्थविधान ।
सारावया रघुनंदन । सहित ऋषिगण चालिले ॥ २७ ॥
विधियुक्त स्नानतर्पण । तीर्थविधी पिंडदान ।
सकळीं संपादिलें संपूर्ण । श्रीरघुनंदन निजनिष्ठा ॥ २८ ॥
वैदेहि याहि कलशोद्धवधर्मपत्नीं
तस्याः पुरः कथय पूर्वकथा: समस्ताः ।
पृष्टापि मा वद पयोनिधिबंधनं तत्
सा वै पुनश्चुलकितांबुनिधे: कलत्रम् ॥ १ ॥
ये मज्जन्ति जिमज्जयांति च परांस्ते प्रस्तरा दुस्तरे
वाद्धौ वीर तरंति वाजरभटान् संतारयंतेपि व
नैते ग्रावगुणा ज वारिधिगुणा नो वानराणां गुणा:
श्रीमद्दाशरथेः प्रतापमहिमा सोऽयं समुज्जृंभते ॥ २ ॥
सीता - लोपामुद्रेचा संवाद :
येरीकडे जानकीसी । लोपामुद्रा अति प्रीतीसीं ।
क्षेमालिंगन निजानंदेंसीं । महासायासी भेटी झाली ॥ २९ ॥
भेटोनि येर येरीप्रती । लोपामुद्रा अति प्रीतीं ।
पुसती झाली श्रीराम कीर्ती । रावणघातीं केली जे ॥ ३० ॥
श्रीरामें करोनि वनाभिगमन । चरित्र केलें कोण कोण ।
हें मज अति प्रीतीकरून । स्वयें आपण सांगावें ॥ ३१ ॥
ऐकतां लोपामुद्रेचें वचन । जानकी झाली आनंदघन ।
भावार्थाचें निजजीवन । नेणे छळण सर्वथा ॥ ३२ ॥
भावार्थे सीता सती । सकळ श्रीरामाची कीर्ती ।
सांगती झाली अति प्रीतीं । विशेष खयाती सेतुबंधाची ॥ ३३ ॥
रावणवधाचेनि मिषें जाण । वाळी वधोनि रघुनंदन ।
सुग्रीवा केलें राज्याभिषिंचन । तारिले पाषाण सागरीं ॥ ३४ ॥
समरांगणीं करोनि रण । ससैन्य सपुत्रप्रधान ।
निवटोनियां दशानन । केला बिभीषण लंकापति ॥ ३५ ॥
लोपामुद्रा अगस्तीच्या सामर्थ्याचे वर्णन करते :
ऐकोनि जानकीची वचनोक्ती । येरी हांसिन्नली चित्ती ।
विचार न करितां निश्चिती । वानसीं कीर्ती रामाची ॥ ३६ ॥
स्त्रीराज्यलोभेंकरून । वाळी निमाला आपण ।
तुझ्या निजकोपाग्नीनें जाण । भस्म रावण पै झाला ॥ ३७ ॥
एक लोभें जळाला । दुसरा क्रोधाग्नी आहाळला ।
त्याचा प्राण सहजचि गेला । रामें वध केला तो काय ॥ ३८ ॥
वानिसी सेतुबंधनाची ख्याती । पाषाणीं बांधिला अपांपती ।
स्वयें कष्टला रघुपती । तो केला अगस्तीने आचमन ॥ ३९ ॥
जळेंवीण सागर । शोषिता तया ऋषीश्वरा ।
जीवनहीन झाली धरा । जळचरां आकांत ॥ ४० ॥
स्थळीचे आटतां जीवन । ब्राह्मणांचें संध्यास्नान ।
सत्कर्मे राहिलीं पूर्ण । क्षुधा सुरगण पीडिले ॥ ४१ ॥
मग मिळोनियां समस्तीं । विनविलें ऋषीप्रती ।
सोडोनि मूत्रद्वारें निश्चिती । अपांपती क्षार केला ॥ ४२ ॥
ऐसी लोपामुद्रेची वचनोक्ती । ऐकोनि हांसली सीता सती ।
आपुल्या निजपतीची ख्याती । अगाध कीर्ती सांगसी ॥ ४३ ॥
अगस्तीच्या करणीने सर्व दुःखी झाल्याचे सीता सांगते :
घालोनियां लोटांगणीं । उपहासें बोले जनकनंदिनी ।
अगाध ऋषीची करणी । विश्वालागूनी दुःखजनक ॥ ४४ ॥
देव पीडिले क्षुधावर्ती । ऋषी सांडवले धर्मस्थिती ।
प्राणी आहारेंवीण पीडिती । तळमळती जीवनेंवीण ॥ ४५ ॥
गायी हंबरडा हाणिती । जळचरां प्राणांतवृत्ती ।
प्राणिमात्रां दुःखप्राप्ती । त्रिजगती हाहा ॥ ४६ ॥
कष्टीं प्रार्थितां सुरवर । मुक्त केला तो सागर ।
तो करोनि सांडिला क्षार । झाला सर्वत्र असेव्य ॥ ४७ ॥
असतांही समुद्रतीरीं । तृषा पीडितां शरीरीं ।
घेवों नये चूळभरी । करी बोहरी जीविताची ॥ ४८ ॥
ऐसी ऋषीश्वराची ख्याती । अल्पासाठी तपःसंपत्ती ।
स्वयें वेंचोनि निमेषगती । स्वयें उरती अभिमानग्रस्त ॥ ४९ ॥
आतां श्रीरामाची कथा । जे बोललीस यथार्थता ।
श्रीराम सर्वथा अकर्ता । कर्तव्यता त्या नाहीं ॥ ५० ॥
जैसें जैसें ज्याचें प्राचीन । त्या त्या कर्मानुरूप जाण ।
फळदाता रघुनंदन । स्वयें कर्तेपण त्या नाहीं ॥ ५१ ॥
आणिक एक अद्भुत । श्रीरामाचें आचरित ।
साधु आज्ञा शिरीं वंदित । ख्याति विख्यात त्रिलोकीं ॥ ५२ ॥
तुझ्या स्वामीचें निजमूत्र । जगीं होईल अपवित्र ।
यालागीं कृपाळु रघुवीर । केलें साचार जगद्वंद्य ॥ ५३ ॥
सेतुबंधीं रामतीर्थी । सकृत् स्नानमात्रें मुक्ती ।
मनें स्मरण जे करिती । ते ते होती नित्यमुक्त ॥ ५४ ॥
तुझ्या स्वामीचे मूत्रमहिमे । वंद्य केलें श्रीरामें ।
ऐकतांचि अगस्तिरमे । विस्मयो परम वर्तला ॥ ५५ ॥
मोठ्यांपुढे आपला महिमा सगाणे उचित नव्हे
असे सीतेला रामांनी सागून संतमहिमा वर्णिला:
तें ऐकतां रघुनाथ । जानकीतें निवारित ।
सजनापुढें निजकृत । नये निश्चित पै सांगों ॥ ५६ ॥
महंतापुढें निजख्याती । बोलणें हेचि अपकीर्ती ।
अबले नेणसी निश्चितीं । मौनस्थितीं पै राहें ॥ ५७ ॥
श्रीरामाचें महिमान । जें तूं वानिसी गहन ।
तें सत्कृपेस्तव जाण । संदेह आन असेना ॥ ५८ ॥
पूर्वी मज नेणे कोणी । सजनांचे कृपेकरोनी ।
वंद्य झालो त्रिभुवनीं । विश्व चिंतनीं लागलें ॥ ५९ ॥
मज नाहीं रूप नांव । तो मी सस्कृपेस्तव ।
स्वयें झालो सावयव । चतुर्बाहु मेघश्याम ॥ ६० ॥
मज नांवे हषीकेशादिक । संतीं ठेविलीं सम्यक ।
अलंकार कौस्तुभादिक । अर्पिले देख अति प्रीतीं ॥ ६१ ॥
मज ठाव नाहीं एके ठायीं । म्हणोनी वैकुंठ रचिलें तिहीं ।
सिंहासनादि पदवी पाहीं । संतीं तिहीं अर्पिली ॥ ६२ ॥
विप्रप्रसादाद्धरणीधरोहं । विप्रप्रसादात्कमलावरोहम् ।
विप्रप्रसादाद्विजयो जयोहं विप्रप्रसादान्मम रामनाम ॥ १३ ॥
रमा मुरूय महासिद्धी । संतीं अर्पिल्या भजनविधी ।
अष्टभोगादि समृद्धी । भोगविधी अर्पिले ॥ १६३ ॥
जगीं व्हावया निजमान्य । सज्जनांचा दक्षिण चरण ।
तेंचि माझें निजभूषण । निजचिन्ह श्रीवत्स ॥ १६४ ॥
इतरीं करितां भजनासी । सर्वस्व आपुलें अर्पी त्यांसी ।
शेखी अर्षी निजरूपासी । परि श्रीवत्सासी न देववे ॥ ६५ ॥
तें नाहीं मजअधीन । जो ब्राह्मणाचा अनन्य शरण ।
त्यासींच प्राप्ती होय जाण । पदरजें स्नान नित्य करितां ॥ ६६ ॥
म्हणोनी जानकिये आपण । ज्याचेनि रजे होय पावन ।
त्यापुढें निजकीर्तिवर्णन । सर्वथा जाण नये करूं ॥ ६७ ॥
ऐसे गुह्य निजप्रीतीसीं । श्रीरामें सांगितलें जानकीसी ।
तेणें उल्लास झाला तिसीं । संतमहिमेसी ऐकोनी ॥ ६८ ॥
लोपामुद्रा संतोषली । तिणें जानकी आलिंगली ।
तुझेचि धर्मेकरोनि वहिली । महिमा ऐकिली रामाची ॥ ६९ ॥
रामकृत अगस्तिमहिमा :
लोटांगणीं अति प्रीतीसी । रामें विनविला अगस्तिऋषी ।
तुझेनि धर्मे विश्वनाथासी । दक्षिणेसीं येणें झालें ॥ ७० ॥
तेणें प्रसंगें जगासीं । दर्शन झालें जोतिर्लिंगासीं ।
जें अलक्ष बहुकाळेंसी । तेंचि जगासी प्रत्यक्ष ॥ ७१ ॥
नव्हे आजकालचें स्थापन । वाकुकालिंग नव्हे जाण ।
ज्योतिर्लिंग पुरातन । अनुग्रह करोन प्रकट केलें ॥ ७२ ॥
रावण शिवाचा निजगण । त्याचें देखोनि उग्र भजन ।
तेणें होवोन प्रसन्न । निजज्योति जाण अर्पिली ॥ १७३ ॥
तें हें रावणानुग्रहें पूर्ण । ज्योतिर्लिंग पुरातन ।
श्रीशंकरें आपण । जगदुद्धरणा प्रकटिलें ॥ ७४ ॥
व्रतहीन तपोहीन । तीर्थहीन दानहीन ।
स्वधर्मच्युत कर्महीन । होती पावन रामेश्वरीं ॥ ७५ ॥
महापापी दुराचारी । केवळ पतित संसारी ।
त्यांचा उद्धार रामेश्वरीं । दर्शनकरितां एकवार ॥ ७६ ॥
तुझे कृपेस्तव तत्वतां । येणें झालें श्रीविश्वनाथा ।
करूनि सेतुबंध सरतां । जगदुद्धारता तुझेनि ॥ ७७ ॥
तुवां वसविलें दंडकारण्य । म्हणोनि झालें अति पावन ।
राक्षसविरोधापासून । केलें मोचन तीर्थाचें ॥ ७८ ॥
तुझेनि धर्मेकरोनि जाण । दंडकारण्य अतिपावन ।
सकळविरोधी रावण । तुझे कृपेंकरोन निवटिला ॥ ७९ ॥
ऐसें स्तवोनि अगस्तीसी । आज्ञा पुसतां तयासी ।
येरीं नमिलें लोटांगणेंसीं । बोलावया आम्हासी वदन कैंचें ॥ ८० ॥
अगस्तिकृत राममहिमा :
तुझेनि आमुचें उद्धरण । तुझेनि पावन दंडकारण्य ।
तुझेनि तीर्थांपावनपण । जगदुद्धारण तुझेनि ॥ ८१ ॥
लिंगाचें जें पावनपण । तें तुझेनि नामेंकरोन ।
नामेंतीर्थ पावन । जग पावन तुझेनि ॥ ८२ ॥
श्रीरामा तुझे नामापरतें । आन पावन नाहीं सरतें ।
नामें उद्धरती पतितें । जे तीर्थांचेनि बापे न सुटती ॥ ८३ ॥
सकळ धर्माचे शेवटीं । कुंटणी वर्णामाजी ओखटी ।
सकुडी बैसविली वैकुंठीं । पक्ष्यासाठी श्रीराम ॥ ८४ ॥
विश्वेश्वर काशीप्रती । जें उपदेशी देहांती ।
चतुर्विध जनां मुक्ती । नामें निश्चितीं पै तुझ्या ॥ ८५ ॥
तो तूं प्रत्यक्ष घनसांवळा । आजि देखिलासे डोळां ।
सकळ भाग्य आलें फळा । रघुकुळपाळा श्रीरामा ॥ ८६ ॥
ऐसें परस्परें जाण । येरयेरांचें करोनि स्तवन ।
श्रीरामें मागोनि आज्ञापन । केलें प्रदक्षण लिंगासी ॥ ८७ ॥
श्रीरामांनी स्वतःच्या नावाचे नगर बसवून ते ब्राह्मणांना दान दिले :
जनस्थानीं मुनिवरां । वसवावया रघुवीरा ।
मानसीं कळवळा पुरा । करीं विचार निर्वाहीं ॥ ८८ ॥
दंडकारण्यीं ऋषिगण । अति साधु गोब्राह्मण ।
मननशील ब्रह्मसंपन्न । आहारेंवीण पीडती ॥ ८९ ॥
मागों नेणती सर्वथा । अयाचितां कैंचा दाता ।
त्यांच्या अन्नाची संस्था । करावी तत्वतां आजींचि ॥ ९० ॥
म्हणोनि निजनामें नगर । रामें वसवोनि रामपुर ।
ब्राह्मणां दिधलें अग्रहार । ऋषीश्वरनिर्वाहो ॥ ९१ ॥
तें श्रीरामाचें आज्ञोत्तर । ब्राह्मणांचे वृत्तिक्षेत्र ।
राजीं पाळिले उत्तरोत्तर । अवधि द्वापरापर्यंत ॥ ९२ ॥
कलियुगांतील एका राजाने रामाज्ञा मोडून ब्राह्मणांचे ते नगर हिरावून घेतलें :
पुढें कलियुगाचे नृपती । श्रीरामआज्ञा बहुतीं ।
स्वयें पाळिली यथास्थितीं । कोणाएकाची वृत्ती क्षोभली ॥ ९३ ॥
विकल्प धरोनियां मना । राजभाग ब्राह्मणां ।
मागों आदरिलें जाण ॥ न देतां दंडणा करूं पाहे ॥ ९४ ॥
शीघ आणा कारभार । अथवा दाखवावे पत्र ।
तुम्हासी कोणीं अग्रहार । दिलें सत्वर सांगावें ॥ ९५ ॥
अन्यथा करोनि दंडन । पूर्वी भक्षिलें आणवीन ।
वचन ऐकतां ब्राह्मण । झाले उद्विग्न अति दुःखी ॥ ९६ ॥
परंपरागत अग्रहार । आम्ही खातों उत्तरोत्तर ।
वडिलीं कोठे ठेविलें पत्र । नाही गोचर आम्हांसी ॥ ९७ ॥
अन्न श्रीरामदत्त । वार्ता ऐको दिवस बहुत ।
पत्राचा काय जो झाला अर्थ । आम्ही निश्चित जाणूं ना ॥ ९८ ॥
म्हणोनि झाले चिंतातुर । तंव दूतओढती सत्वर ।
तेणें आकांत झाला थोर । द्विजवर अति दुःखी ॥ ९९ ॥
त्या ब्राह्मणांकडून श्रीरामांचा धांवा :
श्रीरामकृत सरोवर । नगराबाहेर सविस्तर ।
तेथें जावोनि समग्र । मरणा तत्यर बैसले ॥ १०० ॥
मागील दिवसांचा समग्र । किती द्यावा कारभार ।
पुढेंकेंवी भरे दुर्भर । मरणा तत्पर यालागीं ॥ १०१ ॥
विषप्रयोग करोनि देख । प्राण सांडणें आवश्यक ।
म्हणोनि मिनले सकळिक । विचार आणिक असेना ॥ १०२ ॥
अंध पंगु मुके दीन । दरिद्रदोषें आचारहीन ।
ऐसियांतें रघुनंदन । सर्वथा जाण नुपेक्षी ॥ १०३ ॥
तो आम्हांलागीं उदासभूत । कां झाला रघुनाथ ।
कां उपेक्षिलें निजव्रत । म्हणोनि अनाथ सांडिलों ॥ १०४ ॥
जेणें वेदांचा उद्धार केला । ग्राहग्रस्त गज सोडविला ।
अंबरीषालागीं पावला । त्याचा सोशिला जन्मभार ॥ १०५ ॥
हिरण्याक्षें अवनी । नेतां आणिली तो निवटोनी ।
प्रल्हादाच्या व्यथा देखोनी । स्तंभ फोडूनी प्रकटला ॥ १०६ ॥
सहस्रार्जुन होवोनि प्रबळ । गोब्राह्मणादि सकळ ।
पीडिता झाला बहुकाळ । तो निवटी तत्काळ परशुधर ॥ १०७ ॥
रावण होवोनि प्रबळ । बंदी घातले सुर सकळ ।
त्यांची देखोनि कळवळ । रघुकुळपाळ पावला ॥ १०८ ॥
वेगीं येवोनि वनांतरा । संहार केला निशाचरां ।
शिळीं बुजोनि सागरा । केलें वानरां जगद्वंद्य ॥ १०९ ॥
निवटोनि लंकानाथ । सुर सोडविले समस्त ।
संस्थापिला शरणागत । कीर्ति अद्भुत तिही लोकीं ॥ ११० ॥
ऐसीं अनंत चरित्रे । ज्यांची पुराण वाखाणितें ।
तेणें मोकलिलें रघुनाथें । निजअंकितें विसरला ॥ १११ ॥
कैंचें आम्ही दावूं पत्र । कोठोन देऊं करभार ।
दीनदयाळ रघुवीर । ती ब्रीदें' समग्र काय झालीं ॥ ११२ ॥
धांव पाव गा रघुवीरा । म्हणोनि आक्रंदती सैरां ।
नेत्रीं अश्रूंचिया धारा । दीर्घस्वरें रूदन करिती ॥ ११३ ॥
धावा ऐकून मारुतिराय रक्षणासाठी आले :
तें न साहेचि वायुसुता । श्रीरामाज्ञा उछंघिता ।
त्याच्या करीन मी निःपाता । म्हणोनी हनुमंत पातला ॥ ११४ ॥
लहानथोर देखातां जन । आधींपत्र देवों काढून ।
तें न मानी तरी दंड करीन । नि संतान होय जेणें ॥ ११५ ॥
ब्राह्मणांच्या वृत्तीचें हरण । त्यावरी श्रीरामदत्त जाण ।
श्रीरामाचे कृपेंकरोन । करीन शासन मी त्यांसीं ॥ ११६ ॥
अधर्मशीळ नृपवर । ते केवळ पै तस्कर ।
मी श्रीरामाचा किंकर । दंड साचार करीन ॥ ११७ ॥
म्हणोनि सकळां लोकांदेखत । क्रोधें पातला हनुमंत ।
ब्राह्मणा आश्वासोनि तेथ । उडी सरोवरांतघातली ॥ ११८ ॥
मारुतीने सरोवरातून रामाज्ञा कोरलेली शिळा त्या ब्राह्मणांना दिली :
पवनपुत्र आतुर्बळी । उडी घालोनि तत्काळीं ।
महाशिळा बाहेर काढिली । टाकून दिधली द्विजांपुढें ॥ ११९ ॥
तेणें चमत्कारिले सकळिक । कैंचा वानर एकाएक ।
येवोनि बुडी दिधली देख । शिळा अलोलिक काढिली ॥ १२० ॥
ऐसे मिळोनि समग्र । अवघे झाले आश्चर्यपर ।
एक म्हणती कायसा विचार । शिळा सत्वर पैं शोथा ॥ १२१ ॥
म्हणोनियां सकळीं । शिळा धुवोनि शुद्ध केली ।
तंव तेथें अक्षरें भली । वरी देखिली नागरे ॥ १२२ ॥
तंव हरिखले सत्वर । श्रीरामें पाठविला वानर ।
काढून दिधलें शासनपत्र । श्रीरघुवीर कृपाळु ॥ १२३ ॥
त्याचें करोनि प्रतिलेखन । करावया राजदर्शन ।
सकळ निघाले मिळोन । श्रीरघुनंदनप्रतापें ॥ १२४ ॥
रामें वांचविलें आम्हांसी । म्हणोनि आनंद सकळांसी ।
निघाले अति आनंदेंसी । वृत्त रायासी सांगावया ॥ १२५ ॥
त्या राजाला तो शिलालेख दाखविला. त्याला आनंद :
पत्राचेनि अति हरिखें । येवोनि रायाजवळिके ।
पत्र दाविती कौतुकें । पहावें विवेकें करोनी ॥ १२६ ॥
परंपरा श्रीरामदत्त । आम्हीसेवितों काळ बहुत ।
तें पत्र पुसता स्वामिनाथ । वेंगीं हनुमंत पातला ॥ १२७ ॥
घालोनि सरोवरीं उडी । शासनपत्र तांतडीं ।
काढोनियां लवडसवडी । अति निर्वडी पाठविलें ॥ १२८ ॥
ऐसेंहिजांचे उत्तर । ऐकतांचि नृपवर ।
झाला अत्यंत आल्हादपर । मस्तकीं पत्र वंदिलें ॥ १२९ ॥
मन ठेवोनि श्रीरामभक्तीं । अति नम्र अत्यंत प्रीतीं ।
पत्र वाची नुपती । सावध श्रोतींपरिसावें ॥ १३० ॥
सामान्योऽयं धर्मसेतुर्नराणां काले काले पालनीयो महद्भिः ।
सर्वानेतान्भाविनः पार्थिवेंद्रान् भूयो भूयो वाचते रामचंद्र; ॥
श्रीरामाज्ञेचा शिलालेख :
भूमंडळीचे नृपवर । युगानुयुगीं उत्तरोत्तर ।
त्यांसी माझा नमस्कार । प्रीतिपुरस्कर विनंतीसीं ॥ १३१ ॥
माझें नाव दाशरथी । सूर्यवंशी रघुपती ।
सकळीं मिळोनि माझी विनंती । भावें नृपतीं पाळावी ॥ १३२ ॥
सकळावरोधी दशशिरी । पीडूं आदरिली धरत्री ।
यासी निवटावया झडकरी । सेतु सागरीं बांधिला ॥ १३३ ॥
आणोनियां महापाषाण । सेतु बांधिला निमेषेंकरोन ।
सोडवोनियां सुरगण । दशानन निवटिला ॥ १३४ ॥
तेणें काळें चराचर । सकळ त्रैलोक्यीं सुख निर्भर ।
सेतुबंधीं रामेश्वर । जगदुद्धार करीतसे ॥ १३५ ॥
त्याहूनि हा पावन । धर्मसेतु अति गहन ।
ब्राह्मणांसी क्षेत्रदान । निर्वाहार्थ जाण दीधलें ॥ १३६ ॥
तेथील भक्षोनियां अन्न । द्विज करिती वेदाध्ययन ।
वेदघोषें जन पावन । श्रीनारायण संतुष्ट ॥ १३७ ॥
क्षत्रियांचा धर्म नव्हे । जे याञ्चा करावी स्वयें ।
तरी द्विजकार्यालागीं पाहें । याचिताहें तुम्हांप्रति ॥ १३८ ॥
ब्राह्मणांच्या सेवेचे महिमान :
जें ब्राह्मणांचें वृत्तिहरण । सर्वथा न करावें आपण ।
तेणें सकळकुळा कल्याण । सुख गहन पावती ॥ १३९ ॥
तेचि धन्य नृपवर । ज्यांसीं द्विजसेवा निरंतर ।
त्यांच्या निर्वाहीं तत्पर । अत्यादर जयांसी ॥ १४० ॥
देखतां द्विजसंकटासी । सर्वांग ओढवी उल्लासीं ।
पार नाहीं त्याच्या भाग्यासीं । हें निश्चयेंसीं अवधारा ॥ १४१ ॥
हेंचि भगवंताचें व्रत । द्विजसेवा इथंभूत ।
त्यांचा निर्वाहो निश्चित । स्वयें करित निजांगें ॥ १४२ ॥
याचिलागीं अवतारमाळा । स्वयें धरणे घननीळा ।
दुष्ट निवटोनि सकळा । द्विजकुळा रक्षावें ॥ १४३ ॥
जो द्विजद्वेष करी । तोचि भगवंताचा वैरी ।
त्यासी निवटावया निर्धारीं । आयुधें धणी चक्रादि ॥ १४४ ॥
जो करी द्विजवृत्तिहरण । दंडी अभिशापेंकरोन ।
धूर्तवादें ठकून । नागवी ब्राह्मण धनलोभें ॥ १४५ ॥
त्याचें सकळ निःसंतान । स्वयें करी भगवान ।
स्वर्गस्थ जे पितर जाण । त्यांसीही पतन तत्काळ ॥ १४६ ॥
वाचा मनें धरादान । स्वयें दिधलें आपण ।
त्याचें करितां अभिलाषण । स्वयें भगवान क्षोभेल ॥ १४७ ॥
अथवा जें को परदत्त । आपला संबंध नाहीं जेथ ।
त्याचेनि अभिलाषे निश्चित । होईल घात नवल काय ॥ १४८ ॥
याकारणें पुढतपुढती । भावी जे कां भूपती ।
विनवीत असें त्यां अति प्रीतीं । पुढील निश्चिती होतील जे ॥ १४९ ॥
तिहीं परिसोनि विनंती । स्वयें मानावी निश्चिती ।
सांडूनि लोभाची आसक्ती । ब्राह्मणभक्ती करावी ॥ १५० ॥
लोभें ऐहिकीं न मानी कोणी । लोभें निंद्य होइजे जनीं ।
लोभें परलोकाची हानी । निंद्य पतनीं पडे लोभें ॥ १५१ ॥
वंचोनि उत्तम लोकासी । लोभें होइजे नरकवासी ।
म्हणोनि निर्लोभ मानसीं । द्विजसेवेसी करावें ॥ १५२ ॥
निर्विकल्प निर्लोभ पूर्ण । तोचि माझा पढियंता जाण ।
ऐसें श्रीरामाचें वचन । पत्रावरून परिसिलें ॥ १५३ ॥
देखतांचि पत्राक्षरें । आश्चर्यवंत समग्रें ।
कृपा केली रघुवीरें । राखिलें द्विजवरें आकांती ॥ १५४ ॥
रामाज्ञावाचून त्या राजाने आदराने त्या ब्राह्मणांना त्यांचे राज्य दिले :
शिरीं वंदोनियां पत्रासी । आला दिधली द्विजांसी ।
सुखें जावें निजनगरासी । श्रीरामदत्तासी सुखें भोगा ॥ १५५ ॥
कोणी करील विपरीत । त्याचा मी करीन घात ।
ऐसें बोलतां नृपनाथ । ब्राह्मण हर्षयुक्त निघाले ॥ १५६ ॥
संकटीं सोडविलें आकांतासीं । म्हणोनि आनंद सकळांसी ।
आतां जावोनि नगरासी । हनुमंतासी करूं पूजा ॥ १५७ ॥
सकळ वृत्तांत पुसों त्यासी । तुझा वास कोणे देशीं ।
पुनरपि ओढवल्या विघ्नासी । केंवी भेटसी स्वामिया ॥ १५८ ॥
ते ब्राह्मण त्या सरोवरावर मारुतीच्या
भेटीसाठी आले; परंतु भेट झाली नाही :
ऐसा करोनि संप्रधार । द्विज निघाले वेगवत्तर ।
ठाकोन आले सरोवर । हनुमान वीर न देखती ॥ १५९ ॥
अबळें ब्राह्मणे निश्चिती । न भेटतांचि शीघ्रगती ।
मुलोनि गेली विषयप्रीतीं । नोळखिती सज्जना ॥ १६० ॥
द्रव्यलोभें जो भुलला । अथवा कामातुर झाला ।
विषयविघातें पडला । निमग्र झाला चिंतेसीं ॥ १६१ ॥
त्याची बुद्धि अंध झाली । हिताहित न देखे वहिली ।
विषयगतीं बुडोन गेली । कांहीं केल्या उपडेना ॥ १६२ ॥
स्वस्थ असावें बुद्धीसीं । तरी जाणावें निजहितासी ।
कोण ओळखे निजसज्जनासी । हनुमंतासी कोण पुसे ॥ १६३ ॥
पत्र देखोनि तांतडीं । संतोषाची उभवोनि गुढी ।
राजभेटी लवडसवडी । द्विजवर पै गेले ॥ १६४ ॥
मागें सरोवरीं हनुमंतें । प्रकाशावया तीर्थमहिमेतें ।
प्रतिष्ठिलें राममूर्तीतें । त्याच्या नामातें परिसावें ॥ १६५ ॥
दानउदार रघुपती । याचक देखतां निश्चिती ।
देतां बहु न मने चित्तीं । अद्भुतशक्ती पै देणें ॥ १६६ ॥
म्हणोनि नामगौरव । हनुमान म्हणे उदार राघव ।
तेंचि अभिधान स्वयमेव । उत्तरोत्तर चिंतिती ॥ १६७ ॥
ब्राह्मणांचे हृदयीं जाण । चिंताताप अति दारुण ।
सबळ वाढला होता संपूर्ण । त्याचें निरसन पै झालें ॥ १६८ ॥
म्हणोनि यासीं अभिधान । सरोवर हृदयतापनाशन ।
तीर्थविख्यात पावन । अद्यापि जाण वर्णिती ॥ १६९ ॥
तेथें करेनियां स्नान । उदार रामाचे दर्शन ।
सद्भावें करितां संपूर्ण । निश्चळ मन पै होय ॥ १७० ॥
द्वंद्वदुःख पै त्रिशुद्धी । निरसोनिया आधिव्याधी ।
समाधान निजानंदीं । कीर्ति अगाधी हनुमानाची ॥ १७१ ॥
तेथून श्रीराम विमानातून पुढे निघाले :
येरीकडे रघुनंदन । नमोनी सकळ ऋषिगण ।
विमानीं करोनि आरोहण । सत्वर जाण चालिला ॥ १७२ ॥
अति प्रीतींकरोनि नमन । श्रीराम आरूढतां विमान ।
जयजयकार जाहला पूर्ण । नादें त्रिभुवन कोंदलें ॥ १७३ ॥
पूर्वानुक्रमें रघुपती । विमानीं बैसतां निश्चिती ।
विमान उसळले अंतरिक्षस्थितीं । शीघ्रगतीं आकाशीं ॥ १७४ ॥
विमानासरसीं किराणें । देत उडालीं वानरगणें ।
भार चालिले पै गगनें । लाजिला पवन उड्डानासीं ॥ १७५ ॥
भुभुःकार वानरांचें । माजी उच्चारण नामाचें ।
जयजयकार सिद्धांचें । चरित्र रामाचें वर्णिती ॥ १७६ ॥
गगनीं चालतां विमान । मागुतेनि रघुनंदन ।
जानकीतें हातीं धरून । निजचरित्र जाण सांगत ॥ १७७ ॥
तू ऐकें जानकी सुंदरी । तुझेनि वियोगे दुःख भारी ।
मी हिंडलो गिरिकदरीं । निजनिर्धारीं तें ऐक ॥ १७८ ॥
एव विंध्याभिध: शैलो नदीनदसमन्वितः ।
एषा मे दृश्यते सीते किष्किंधा चित्रकानना ॥ ५ ॥
सुग्रीवनगरीं रम्या वाली यत्र हतो मया ।
एतन्माल्यवतः शृंगं किश्किंधोपरि भास्वरम् ॥ ६ ॥
सुग्रीवभेटीपासून सीताहरणापर्यंतचा कथाभाग राम सीतेला सांगतात :
पैल किष्किंधाभवन । फळी पुष्पी मंडित वन ।
वाळी बळियाढा दारुण । त्याचें भवन जानकिये ॥ १७९ ॥
बंधूची हिरोनि कामिनी । राज्य करी किष्किंधाभवनीं ।
वरमदें उन्मत्त होवोनी । बंधूलागोनि दवडिलें ॥ १८० ॥
विध्वंसोनि त्या वरदासी । बाणें निवटोनि वाळीसी ।
दारेसहित राज्यासी । क्षणार्धेसीं हरितलें ॥ १८१ ॥
सोडविली सुग्रीवपत्नी । हरितली वाळीची राणी ।
दोन्हीं सुग्रीवासी देवोनि । राज्याभिषिंचनीं गौरविला ॥ १८२ ॥
तेणें उपकारें दाटला । वानरभार घेवोनि आला ।
मातें सर्वस्वें विनटला । वर्तो लागला ममाज्ञा ॥ १८३ ॥
व्रतें धरोनि दुर्धर्ष । राहिलों प्रसवणगिरीस ।
स्वयें देखतां पर्वतास । येथें चातुर्मास्य क्रमियेलें ॥ १८४ ॥
पुढें पाहें पंपासरोवर । जेथें भेटले वानरवीर ।
पुढें शबरीस्थान पवित्र । जे म्यां सत्वर उद्धरिली ॥ १८५ ॥
पैल शरभंग ऋवीची पर्णकुटी । जे तुवांहि देखिली दृष्टीं ।
धिक्कारोनि ब्रह्मसृष्टी । उठाउठीं उद्धरिला ॥ १८६ ॥
आमुचा आश्रम पंचवटीं । जेथें येवोनि रावण कपटी ।
तुज वाहोनियां पाठीं । हरण गोरटी पै केलें ॥ १८७ ॥
ऐसें अति प्रीतीं रावणारी । सांगता जानकी सुंदरी ।
तंव विमान गगनांतरी । त्वरेंकरी चालिलें ॥ १८८ ॥
सांडूनि मलयाद्रिशेषाद्री । प्रसवणादि सिंहाद्री ।
महादेवाचा ब्रह्माद्री । आनंदगिरी ओलांडिला ॥ १८९ ॥
जेथें अत्रि आणि अनसूया । स्वयें भेटले रघुराया ।
अनुग्रहिली रामजाया । जाणोनियां भविष्य ॥ १९० ॥
तो सांडोनि आनंदगिरी । विमान चालिले झडकरी ।
क्षणें ओलांडिला विंध्याद्री । अति मनोहरी शोभा ज्याची ॥ १९१ ॥
असौ सुनतु शैलेन्द्रश्चित्रकूट प्रकाशते ।
यत्र मां कैकयीपुत्रः प्रमोदयितुमागतः ॥ ७ ॥
चित्रकूटावरील भरतभेटीची माहिती :
सुमध्यमे सुमंगले । ऐक जानकिये वेल्हाळे ।
आम्हां भेटावया प्रेमळे । दोघेही आले कैकयीपुत्र ॥ १९२ ॥
करोनि पितृकार्य पिंडदान । कष्टी बोळविले दोघे जण ।
तो हा चित्रकूटपर्वत जाण । निवासस्थान आमुचें ॥ १९३ ॥
पैल मंदाकिनी पुण्यसरिता । वंद्य ब्रह्मांदिका समस्तां ।
जियेचा शिंतोडा लागतां । उद्धार तत्वतां जडजीवां ॥ १९४ ॥
अंतरिक्ष असतां विमानीं । तळीं दिसे सकळ अवनी ।
देखोनियां राजधानी । जानकीलागूनी सांगत ॥ १९५ ॥
आमुचे आप्त अत्यंतर । वाल्मीक भरद्वाज मुनिवर ।
यांचे आश्रममनोहर । पैल सुंदर देखत ॥ १९६ ॥
गंगा यमुना अति विख्यात । माजी सरस्वती अति गुप्त ।
गुहक आमुचा निजभक्त । नगर विख्यात दिसे त्याचें ॥ १९७ ॥
जेथें एक रात्र राहून । बोळविलासुमंत प्रधान ।
तें हें गुहकनगर जाण । अति पावन जानकिये ॥ १९८ ॥
एषा सा दृश्यते सीते शजधानी पितृर्मगम ।
अयोध्या कुरु वैदैहि प्रणामं पुनरागता ॥ ८ ॥
ततस्ते वानराः सर्वे राक्षसाः सबिभीषणाः ।
उत्प्ल्युत्योत्प्ल्युत्य ददृशुस्तां पूरीं शुभकाननाम् ॥ ९ ॥
अयोध्यादर्शनाने सर्वांना आनंदीआनंद :
त्याहूनि पुढे अलोलिक । राजधानी अति सम्यक ।
पैल दिसत असे देख । आमुचा जनक जेथ होता ॥ १९९ ॥
ते हे देखतां अयोध्यानगरी । अतिमंडित माड्यागोपुरी ।
पताका तोरणे चौफेरीं । अति कुसरीं शोभत ॥ २०० ॥
पैल देखराजभुवन । अति मंडित सिंहासन ।
नित्य जेथें दशरथारोहण । करीं नमन तयासीं ॥ २०१ ॥
ऐकोनीं श्रीरामवचन । जानकी झाली आनंदघन ।
केलें साष्टांगीं नमन । करसंपुट जाण जोडोनी ॥ २०२ ॥
तें देखोनि सौमित्र । झाला अत्यंत आल्हादपर ।
केला सांष्टांग नमस्कार । हर्ष थोर उथळला ॥ २०३ ॥
देखोनियां सिंहासन । श्रीरामें घातलें लोटांगण ।
आनंद उथळला संपूर्ण । वानरगण हरिखले ॥ २०४ ॥
अयोध्येचें आराम गहन । वनें उपवनें विश्रामस्थान ।
देखोनियांवानरगण । करिती गर्जन रामनामें ॥ २०५ ॥
देतीं उलटीं किराणें । नामें गर्जती दीर्घस्वनें ।
नाचतातीं वानरगणें । बिभीषणासमवेत ॥ २०६ ॥
येरयेरां क्षेम देती । येरयेरां नमस्कारिती ।
विजयी होवोनि रघुपती । अयोध्येप्रती स्वयें आला ॥ २०७ ॥
एका जनार्दना शरण । पुढें कथा अति गहन ।
श्रीरामभरताचें दर्शन । श्रोते अवधान देती स्वयें ॥ २०८. ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धाकांडेएकाकारटीकायां
श्रीरामअयोध्यादर्शनं नाम सप्तसप्ततितमोऽध्याय : ॥ ७७ ॥
॥ ओंव्या २०८ ॥ श्लोक ९ ॥ एवं २१७ ॥
GO TOP
|