श्रीमद् वाल्मीकि रामायणे
युद्धकाण्डे
॥ त्रयधिकशततमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीरामकर्तृकं रावणस्य भर्त्सनं, रामेणाहतस्य रावणस्य तदीयसारथिना रणाद् बहिरपनयनम् -
श्रीरामांचे रावणाला फटकारणे आणि त्यांच्या द्वारा घायाळ केला गेलेल्या रावणाला सारथ्याने रणभूमीच्या बाहेर घेऊन जाणे -
स तु तेन तदा क्रोधात् काकुत्स्थेनार्दितो रणे ।
रावणः समरश्लाघी महाक्रोधमुपागमत् ।। १ ।।
काकुत्स्थ श्रीरामचंद्राच्या द्वारा क्रोधपूर्वक अत्यंत पीडित केले गेल्यानंतर युद्धाची इच्छा ठेवणार्‍या रावणाला महान्‌ क्रोध आला. ॥१॥
स दीप्तनयनोऽमर्षाद् चापमुद्यम्य वीर्यवान् ।
अभ्यर्दयत् सुसङ्‌क्रुद्धो राघवं परमाहवे ।। २ ।।
त्याचे नेत्र अग्निसमान प्रज्वलित झाले. त्या पराक्रमी वीराने अमर्षपूर्वक धनुष्य उचलले आणि अत्यंत कुपित होऊन त्या महासमरात राघवांना पीडित करण्यास आरंभ केला. ॥२॥
बाणधारासहस्रैस्तैः स तोयद इवाम्बरात् ।
राघवं रावणो बाणैः तटाकमिव पूरयन् ।। ३ ।।
जसा मेघ आकाशातून जलधारांची वृष्टि करून तलावाला भरून टाकतो त्याच प्रकारे रावणाने हजारो बाणधारांची वृष्टि करून राघवांना आच्छादित करून टाकले. ॥३॥
पूरितः शरजालेन धनुर्मुक्तेन संयुगे ।
महागिरिरिवाकम्प्यः काकुत्स्थो न प्रकम्पते ।। ४ ।।
युद्धस्थळी रावणाच्या धनुष्यांतून सुटलेल्या बाणसमूहांनी व्याप्त झाल्यावरही काकुत्स्थ विचलित झाले नाहीत, कारण ते महान पर्वताप्रमाणे अचल होते. ॥४॥
स शरैः शरजालानि वारयन् समरे स्थितः ।
गभस्तीनिव सूर्यस्य प्रतिजग्राह वीर्यवान् ।। ५ ।।
ते समरांगणात आपल्या बाणांनी रावणाच्या बाणांचे निवारण करत स्थिरभावाने उभे राहिले. त्या पराक्रमी रघुवीरांनी सूर्याच्या किरणांप्रमाणे शत्रूचे बाण ग्रहण केले. ॥५॥
ततः शरसहस्राणि क्षिप्रहस्तो निशाचरः ।
निजघानोरसि क्रुद्धो राघवस्य महात्मनः ।। ६ ।।
त्यानंतर शीघ्रतापूर्वक हात चालविणार्‍या निशाचर रावणाने कुपित होऊन महामना राघवेंद्रांच्या छातीमध्ये हजारो बाण मारले. ॥६॥
स शोणित समादिग्धः समरे लक्ष्मणाग्रजः ।
दृष्टः फुल्ल इवारण्ये सुमहान् किंशुकद्रुमः ।। ७ ।।
समरभूमीमध्ये त्या बाणांनी घायाळ होऊन लक्ष्मणांचे मोठे भाऊ श्रीराम रक्ताने न्हाऊन निघाले आणि जंगलातील फुललेल्या पळशाच्या महान्‌ वृक्षाप्रमाणे दिसून येऊ लागले. ॥७॥
शराभिघातसंरब्धः सोऽपि जग्राह सायकान् ।
काकुत्स्थः सुमहातेजा युगान्तादित्यवर्चसः ।। ८ ।।
त्या बाणांच्या आघातांनी कुपित होऊन महातेजस्वी काकुत्स्थ रामांनी प्रलयकालच्या सूर्याप्रमाणे तेजस्वी सायक हातात घेतले. ॥८॥
ततोऽन्योन्यं सुसंरब्धौ तावुभौ रामरावणौ ।
शरान्धकारे समरे नोपालक्षयतां तदा ।। ९ ।।
नंतर तर ते दोघे परस्पर रोषावेशाने युक्त होऊन बाण सोडू लागले. समरांगणात बाणांनी जणु अंधकार पसरला. त्यासमयी श्रीराम आणि रावण दोघेही एक दुसर्‍यास पाहू शकत नव्हते. ॥९॥
ततः क्रोधसमाविष्टो रामो दशरथात्मजः ।
उवाच रावणं वीरः प्रहस्य परुषं वचः ।। १० ।।
याच वेळी क्रोधाविष्ट झालेल्या वीर दशरथनंदन रामांनी हसत हसत रावणाला कठोर वाणीमध्ये म्हटले - ॥१०॥
मम भार्या जनस्थानाद् अज्ञानाद् राक्षसाधम ।
हृता ते विवशा यस्मात् तस्मात्त्वं नासि वीर्यवान् ।। ११ ।।
नीच राक्षसा ! तू माझ्या नकळत जनस्थानातून माझ्या असहाय स्त्रीला हरण करून आणलेस म्हणून तू बलवान्‌ अथवा पराक्रमी तर कदापि नाहीस. ॥११॥
मया विरहितां दीनां वर्तमानां महावने ।
वैदेहीं प्रसभं हृत्वा शूरोऽहमिति मन्यसे ।। १२ ।।
विशाल वनात माझ्यापासून वियोग झालेल्या दीन अवस्थेत विद्यमान वैदेहीचे बलपूर्वक अपहरण करून तू आपल्याला शूरवीर समजतो आहेस कां ? ॥१२॥
स्त्रीषु शूर विनाथासु परदाराभिमर्शनम् ।
कृत्वा कापुरुषं कर्म शूरोऽहमिति मन्यसे ।। १३ ।।
असहाय अबलांच्यावर वीरता दाखविणार्‍या निशाचरा ! परस्त्रीच्या अपहरणासारखे कापुरूषोचित कर्म करून तू आपल्या शूरवीर मानत आहेस का ? ॥१३॥
भिन्नमर्याद निर्लज्ज चारित्रेष्वनवस्थित ।
दर्पान् मृत्युमुपादाय शूरोऽहमिति मन्यसे ।। १४ ।।
धर्माची मर्यादा भंग करणार्‍या पापी, निर्लज्ज आणि सदाचारशून्य निशाचरा ! तू बळाच्या घमेंडीत वैदेहीच्या रूपाने आपल्या मृत्युलाच बोलावून घेतले आहेस. काय अजूनही स्वतःला शूरवीर समजत आहेस ? ॥१४॥
शूरेण धनदभ्रात्रा बलैः समुदितेन च ।
श्लाघनीयं महत्कर्म यशस्यं च कृतं त्त्वया ।। १५ ।।
तू फार शूरवीर, बलसंपन्न आणि साक्षात्‌ कुबेराचा भाऊ जो आहेस म्हणून तू हे परम प्रशंसनीय आणि महान्‌ यशोवर्धक कर्म केले आहेस. ॥१५॥
उत्सेकेनाभिपन्नस्य गर्हितस्याहितस्य च ।
कर्मणः प्राप्नुहीदानीं तस्याद्य सुमहत् फलम् ।। १६ ।।
अभिमानपूर्वक केले गेलेल्या त्या निंदित आणि अहितकर पापकर्माचे जे महान्‌ फळ आहे ते तू आज आत्ता प्राप्त करून घे. ॥१६॥
शूरोऽहमिति चात्मानं अवगच्छसि दुर्मते ।
नैव लज्जाऽस्ति ते सीतां चौरवद् व्यपकर्षतः ।। १७ ।।
दुर्मते निशाचरा ! तू आपल्याला शूरतेने संपन्न समजत आहेस परंतु सीतेला चोराप्रमाणे चोरून आणते समयी तुला जराही लाज वाटली नाही ? ॥१७॥
यदि मत्सन्निधौ सीता धर्षिता स्यात् त्वया बलात् ।
भ्रातरं तु खरं पश्येः तदा मत्सायकैर्हतः ।। १८ ।।
जर माझ्या समीप तू सीतेचे बलपूर्वक अपहरण केल असतेस तर आतापर्यंत माझ्या सायकांनी मारला जाऊन आपला भाऊ खर याचे दर्शन करीत असतास. ॥१८॥
दिष्ट्याऽसि मम मन्दात्मन् चक्षुर्विषयमागतः ।
अद्य त्वां सायकैस्तीक्ष्णैः नयामि यमसादनम् ।। १९ ।।
मंदबुद्धे ! सौभाग्याची गोष्ट आहे की आज तू माझ्या डोळ्यांसमोर आला आहेस. आता मी तुला आपल्या तीक्ष्ण बाणांनी यमलोकात पोहोचवितो. ॥१९॥
अद्य ते मच्छरैश्छिन्नं शिरो ज्वलितकुण्डलम् ।
क्रव्यादा व्यपकर्षन्तु विकीर्णं रणपांसुषु ।। २० ।।
आज माझ्या बाणांनी छेदले जाऊन रणभूमीच्या धुळीत पडलेले झगमगणार्‍या कुण्डलांनी युक्त तुझ्या मस्तकास मांसभक्षी जीवजंतु ओढून नेवोत. ॥२०॥
निपत्योरसि गृध्रास्ते क्षितौ क्षिप्तस्य रावण ।
पिबन्तु रुधिरं तर्षाद् बाणशल्यान्तरोत्थितम् ।। २१ ।।
रावणा ! तुझे शव पृथ्वीवर फेकून पडलेले असावे, त्याच्या छातीवर बरीच गिधाडे तुटून पडो आणि बाणांच्या टोकाने केले गेलेल्या छेदांच्या द्वारे प्रज्वलित होणार्‍या तुझ्या रक्ताला मोठ्‍या तहानेने पिवोत. ॥२१॥
अद्य मद्‌बाणभिन्नस्य गतासोः पतितस्य ते ।
कर्षन् त्वन्त्राणि पतगा गरुत्मन्त इवोरगान् ।। २२ ।।
आज माझ्या बाणांनी विदीर्ण आणि प्राणशून्य होऊन पडलेल्या तुझ्या शरीरातील आतड्‍यांना पक्षी, गरूड जसे सर्पांना खेचतो तसे खेचोत. ॥२२॥
इत्येवं स वदन् वीरो रामः शत्रुनिबर्हणः ।
राक्षसेन्द्रं समीपस्थं शरवर्षैरवाकिरत् ।। २३ ।।
असे म्हणत शत्रूंचा नाश करणार्‍या वीर श्रीरामांनी जवळच उभा असलेल्या राक्षसराज रावणावर बाणांची वृष्टि करण्यास आरंभ केला. ॥२३॥
बभूव द्विगुणं वीर्यं बलं हर्षश्च संयुगे ।
रामस्यास्त्रबलं चैव शत्रोर्निधनकाङ्‌क्षिणः ।। २४ ।।
त्यासमयी युद्धस्थळी शत्रूवधाची इच्छा ठेवणार्‍या श्रीरामांचे बळ, पराक्रम, उत्साह आणि अस्त्रबळ वाढून दुप्पट झाले. ॥२४॥
प्रादुर्बभूवुरस्त्राणि सर्वाणि विदितात्मनः ।
प्रहर्षाच्च महातेजाः शीघ्रहस्ततरोऽभवत् ।। २५ ।।
आत्मज्ञानी रघुनाथांसमोर सर्व अस्त्रे आपल्या आपण प्रकट होऊ लागली. हर्ष आणि उत्साहामुळे महातेजस्वी भगवान्‌ श्रीरामांचा हात अत्यंत वेगाने चालू लागला. ॥२५॥
शुभान्येतानि चिह्नानि विज्ञायात्मगतानि सः ।
भूय एवार्दयद् रामो रावणं राक्षसान्तकृत् ।। २६ ।।
आपल्या ठिकाणी ही शुभ लक्षणे प्रकट झालेली जाणून राक्षसांचा अंत करणारे भगवान्‌ राम पुन्हा रावणाला पीडित करू लागले. ॥२६॥
हरीणां चाश्मनिकरैः शरवर्षैश्च राघवात् ।
हन्यमानो दशग्रीवो विघूर्णहृदयोऽभवत् ।। २७ ।।
वानरांनी फेकलेले प्रस्तर समूह आणि राघवांनी सोडलेल्या बाणांच्या वर्षावाने आहत होऊन रावणाचे हृदय व्याकुळ आणि विभ्रांत झाले. ॥२७॥
यदा च शस्त्रं नारेभे न चकर्ष शरासनम् ।
नास्य प्रत्यकरोद् वीर्यं विक्लेवेनान्तरात्मना ।। २८ ।।

क्षिप्ताश्चापि शरास्तेन शस्त्राणि विविधानि च ।
न रणार्थाय वर्तन्ते मृत्युकालोऽभ्यवर्ततः ।। २९ ।।

सूतस्तु रथनेतास्य तदवस्थं निरीक्ष्य तम् ।
शनैर्युद्धाद् असम्भ्रान्तो रथं तस्यापवाहयत् ।। ३० ।।
जेव्हा ह्र्दयाच्या व्याकुळतेमुळे त्याच्यात शस्त्र उचलण्याची, धनुष्य खेचण्याची आणि श्रीरामांच्या पराक्रमाचा सामना करण्याची क्षमता राहिली नाही तसेच जेव्हा श्रीरामांनी शीघ्रतापूर्वक सोडलेले बाण आणि निरनिराळी शस्त्रे त्याच्या मृत्युची साधक बनू लागली आणि त्याचा मत्युकाळ समीप येऊन पोहोचला तेव्हा त्याची अशी अवस्था पाहून त्याच्या रथचालक सारथ्याने जराही न कचरता त्याचा रथ रणभूमीपासून दूर नेला. ॥२८-३०॥
रथं च तस्याथ जवेन सारथिः
निवार्य भीमं जलदस्वनं तदा ।
जगाम भीत्या समरन्महीपतिं
निरस्तवीर्यं पतितं समीक्ष्य ॥ ३१ ॥
आपल्या राजाला शक्तिहीन होऊन रथात पडलेला पाहून रावणाचा सारथि मेघासमान गंभीर घोष करणार्‍या त्याच्या भयानक रथाला परत फिरवून त्याच्यासहच भयाने समरभूमीतून बाहेर निघून गेला. ॥३१॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् युद्धकाण्डे त्र्यधिकशततमः सर्गः ।। १०३ ।।
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकाण्डाचा एकशे तीनावा सर्ग पूरा झाला. ॥१०३॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP